Sunday, 10 July 2011

सांगा दोष कुणाचा ?


सांगा दोष कुणाचा ?

काल.....
माझी आई....
माझ्या मुलीला...
काजू देत बसली.
तितक्यात...
माझा पुतण्या खेळून घरी आला.
आईने त्याला पाहून
एक काजू दिला.
मुलगी रडायला लागली.
त्याला माझे काजू का दिले ? म्हणून.....
प्रश्नांची सरबत्ती करीत.....
आक्रोश करू लागली.
मी चिडलो.....
ती पुन्हा रडायला लागली.
जवळ येऊन तक्रार करू लागली.
मांडीवर डोके ठेऊन...
आसवे ढाळू लागली.
मी तिला समजाविले...
ताई आपल्या घासातला
एक घास
इतरांना दिल्यास
तुझे समाधान होणार नाही का ?
पोटभर खाऊन पोट दुखविण्यापेक्षा...
त्यातील थोडे इतरांना दिले तर.....!(?)
तुझी आणि त्याची तत्कालीन गरज पूर्ण होईल.
आणि
उद्याच्या आशेने तुझे जीवन सफल होईल.
मुलगी अवाक होऊन.....
विस्तीर्ण आकाशाकडे पाहू लागली.
जणू जगाची रीतच.....
तिला कळू लागली.
चेह-यावरचे भाव माझ्या...
अलगद टिपू लागली.
प्रश्नागत वलयात...
मला आणि तिलाही ठेऊ लागली.

सांगा दोष कुणाचा ?
वडिलांचे छत्र हरविलेल्या
माझ्या पुतण्याचा ?
जो कुणाच्या तरी आधारावर
जगण्याचा संघर्ष करीत आहे.
कि,
आई-वडिलांच्या मायाळू छत्राखाली
आनंदात जगणा-या माझ्या मुलीचा
जी स्वतःचा वाटा
इतरांना देण्यास तयार होत नाही.
कि,
आजी साठी सर्वच
नातवंडे समान असतात
अश्या भाबळ्या आशेने
मायेचा पदर देणा-या माझ्या आईचा ?
जी नातवाची इच्छा पूर्ण करू पाहते
कुठलाही दुजाभाव ठेवता
वाटा वितरीत करू पाहते.
कि,
माझा.... ज्याने
समान वितरणाची सवय लावतांना
सर्व माणसाचा वाटा निर्धारित केला नाही ?
कि,
व्यवस्थावादी स्वार्थी वातावरणाचा...
जो आम्हा सर्वांच्या सभोवताली 
विळखा घालून बसला आहे.
समान वितरण होऊ देता
मिळेल तेवढे स्वतःसाठीच
वापरण्याची सवय लावीत आहे.
उत्तराच्या शोधात मी एक परोपकारी.....
गुन्ह्याच्या प्रश्नांकित वलयात
माझी मुलगी निरागस ललकारी.....
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment