Friday 22 March 2013

आंबेडकरी चळवळीच्या वर्तमान आणि भविष्याचा वेध



आंबेडकरी चळवळीच्या वर्तमान आणि भविष्याचा वेध
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर…. 8793397275, 9226734091

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या २४ फेब्रुवारी २०१३ ला औरंगाबाद ला झालेल्या महाराष्ट्रातील बौद्धांच्या महाअधिवेशनाने सामाजिक परिवर्तनाची हाक दिली. या सामाजिक परिवर्तनाच्या हाकेला ३ लाख लोकांची साक्ष होती. Adv. बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या जाहीरनाम्याला निदान ३ लाख लोकांनी दिलेल्या पाठींब्याला १२० कोटी जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपली आहे. कुठलेही सामाजिक परिवर्तनाचे बिगुल हे तात्कालिक परिवर्तन घडवून आणीत नाही. ते भविष्यातील वाटचालीला प्रेरणा देऊन येण्या-या काळातील परीवर्तनात्मक बदलला चालना देतात. "व्यक्तिगत हितापेक्षा सामुदायिक हीत हेच पुढल्या परिवर्तनवादी चळवळीचे ब्रीदवाक्य व्हावे." ही Adv. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका व्यापक बुद्धीझम आणि आंबेडकरीझम ला स्पर्श करणारी आहे. बुद्धाची शिकवण व धम्म समूहासाठी आहे. समूह कल्याणासाठी आहे. तसे बाबासाहेबांचे विचार, कार्य, कृती, आंदोलन हे सुद्धा व्यक्तिगत हितापेक्षा सामुदायिक सामाजिक परिवर्तनाला प्रेरक आहेत. या दृष्टीने विचार करता Adv. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका वर्तमान आणि भविष्यकालीन परिवर्तन चळवळीची आधारशीला ठरेल.

बाळासाहेब आंबेडकर यांची भूमीका आज समाजाच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. परंतु ही भूमिका व ही मांडणी फक्त आकर्षणाचे केंद्रच बनून राहू नये. तर या भूमिकेला पेलून धरणारा एक समाज निर्माण व्हावा. ज्याची शक्ती ही फक्त सामाजिक आंदोलनापुर्ती मर्यादित न राहता व्यवस्था निर्मितीच्या ध्येयापर्यंत पोहोचणारी असेल. परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व ठरवून राजकीय शक्ती आणि सामाजिक संघटन निर्माण करणारी असेल. वितंडवाद आणि सामाजिक-राजकीय शक्ले मोडीत काढून समाजाच्या एका निश्चित भूमिकेपर्यंत पोहोचणारी असेल. एकंदरीतच परिवर्तनवादी चळवळीचे एकसंघ नेतृत्व करणारी असेल. तेव्हाच या एका ऐतिहासिक अधिवेशनाला व त्यात घेण्यात आलेल्या भूमिकेला न्याय देता येईल.

हे सर्व करीत असतांना राजकीय बदलाकडे डोळेझाक करून चालणार नाही. २०१४ ला होणा-या राजकीय बदलाचा वेध घेऊन पुढील वाटचाल या भूमिकेने निर्धारित करावी. कारण सामाजिक परिवर्तनाला तत्कालीन राजकीय व्यवस्था व परिस्थिती अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय व्यवस्था व परिस्थिती आपल्या बाजूने कशी ओढून घेता येईल याचाही विचार करावा. नव्हे या भूमिकेला पेलून धरणा-यांनी याला समाजाच्या राजकीय शक्तीत रुपांतरीत करावे. अन्यथा येणारी राजकीय परिस्थिती या सामाजिक परिवर्तनाला पूरक असणार नाही.

लोकशाही व्यवस्था राजकारणाच्या पायावर उभी असते. लोकशाही व्यवस्थेत संतुलित आणि समाजाभिमुख राजकारण व्यवस्थेच्या यशाचा मानबिंदू ठरत असते. परंतु हल्लीचे राजकारण आक्रमक बनत चालले आहे. आणि या आक्रमक राजकारणाचे  केंद्रबिंदू आहेत भाषा, प्रांत, आणि धर्म.  समाजाचे प्रश्न, सत्ताधा-यांच्या जबाबदा-या आणि विरोधकांचे सत्ताधा-यांवरील नियंत्रण हे हल्लीच्या राजकारणातून हद्दपार झालेले पाहुन लोकशाही आत्महत्तेच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात राज ठाकरे, गुजरात मध्ये नरेंद्र मोदी, पश्चिम बंगाल मध्ये ममता बनर्जी, तामिळनाडू मध्ये जय ललिता, उत्तरप्रदेश मध्ये यादव आणि मायावती तर मध्यप्रदेश मध्ये उमा भारती हे या आक्रमक राजकारणाचे मानकरी ठरले आहेत. समाजाचे प्रश्न आणि ते सोडविण्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधक म्हणून हवी असणारी तळमळ यांच्या राजकारणात दिसत नाहीच. उलट समाजाच्या प्रश्नांवर आपणच बलात्कार करून इतरांना आरोपी बनविण्यातच हल्लीचे राजकारण व्यस्त झाले आहे. अश्या भाषा, प्रांत, आणि धर्म या आधारावर आक्रमक झालेल्या राजकारणाला वैचारिक राजकारण कितपत पेलून धरेल. वैचारिक राजकारणाची या आक्रमक राजकारणाला मोडीत काढण्यासाठी काय भूमिका असेल ? आणि समाज आक्रमक राजकारणाकडे वळेल कि वैचारिक राजकारणाकडे वळेल ? यावर उद्याची लोकशाही आणि या देशाची अखंडता निर्भर असेल.

व्यक्तिगत जीवनात माणसांना विचाराने एकत्र आणणे कठीण असते. पण सामाजिक जीवनात जिथे समाजाचे प्रश्न आणि सामाजिक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. तिथे विचाराने लोकांना एकत्र आणणे सहज शक्य आहे. व्यक्तिगत जीवनात सर्वच मूर्ख नसतात आणि सर्वच शहाणे पण नसतात. मात्र सामाजिक अस्तित्वासाठी सर्वच शहाणे होऊन एकमताने अस्तित्व टिकविण्यासाठी लढा उभारत असतात. इतिहासातल्या क्रांत्या ह्या सामाजिक अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र येऊनच लढल्या गेल्या. आणि ज्या व्यक्तिगत स्वार्थासाठी लढल्या गेल्या. त्या क्रांत्या कधीच झाल्या नाही. किंवा क्रांत्त्यांना चारीमुंड्या मात खावी लागली. आंबेडकरी विचारांच्या लोकांना एवढे तरी नक्कीच समजत असावे.

माणूस हा त्यांच्या विचाराने, कार्याने आणि व्यक्तिमत्वाने ओळखला जायला पाहिजे. परंतु अजूनही आपण माणसांची ओळख ही बनवू शकलो नाही. संघटना, पक्ष, संस्था या आधारावर त्याची ओळख करून त्याला आणि त्याच्यातल्या माणूसपणाला आपण दूर करीत आहोत. माणसाची ओळख ही त्याच्या विचाराने, कार्याने आणि व्यक्तिमत्वानेच व्हायला पाहिजे. संघटना, पक्ष, संस्था या आधारावर तो ओळखला जाऊ नये. निदान परिवर्तनवादी समाजाने तरी हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. अन्यथा प्रतिगामी हिंदू आणि पुरोगामी समाजात काहीच फरक करता येणार नाही. कारण त्यांनी माणसांची ओळख जात, धर्म, लिंग, वंश या आधारावर केली तर पुरोगामी समाज माणसांची ओळख पक्ष, संघटना आणि संस्था या आधारावर करतो. आंबेडकरी समाज समूह हे लक्षात घेईल का ?

आंबेडकरी समाजाने आत्मचिंतन करावे कि विषमतेच्या विरुद्ध लढता लढता का आम्ही आमच्यामध्येच अनवधानाने विषमता निर्माण करीत गेलो का ? ज्या तत्वाच्या विरुद्ध, ज्या संस्कृतीच्या विरुद्ध आम्ही लढत आलो तीच तत्वे आणि संस्कृती जर आंबेडकरी समाजात निर्माण झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी आता समाजाने सखोल चिंतन करावे. समाजात विषमता निर्माण करणारी कुठलीही कृती किंवा वैचारिकता सामाजिक प्रकटीकरणातून येणार नाही. याची दक्षता घेण्याची गरज आहे.

अलीकडे समाज पराजयी मानसिकतेतून जगत आहे. इतकेच काय तर सत्ताधारी माणसे सुद्धा पराजयी मानसिकतेतून जगत आहेत. हे येणा-या काळातील एका मोठ्या सामाजिक संकटाची चाहूल आहे. इतके वर्षांच्या षड्यंत्रकारी वाटचालीनंतर अलीकडे ते त्यांच्या प्लान मध्ये यशस्वी होण्याच्या पायरीपर्यंत पोहचले आहेत. आणि समाज भीतीदायक अवस्थेत पराजयी मानसिकतेने जगतो आहे. तुम्ही येणा-या वादळाकडे कसे बघता ? त्यावर सर्व निर्भर राहील.

भेदरलेल्या मानसिकतेत समाजाला जगतांना पाहून सामाजिक प्रतीक्रांतीच्या इतिहासाची आठवण होते. समाज जेव्हा भयभीत होतो, समाज जेव्हा एका विशिष्ट मानसिकतेखाली पिळला जातो. तेव्हा समाज गुलामीच्या अवस्थेकडे ओढला जातो. हे सत्य स्वीकारावे लागेल. कारण ती लक्षणे आज दिसून येत आहेत. समाज सहज त्या विशिष्ट मानसिकतेची गुलामी स्वीकारावयास तयार होत आहे. कारण चहुबाजूने त्याच्या स्वातंत्र्याच्या क्रांतीची चाहुल संपलेली दिसतेय. त्यामुळे फक्त तो स्वतःला येणा-या गुलामीच्या व्यवस्थेत कसे टिकून राहता येईल ? याचाच प्रयत्न करीत असतो. अधिकार आणि स्वातंत्र्याची पर्वा सोडून व्यक्तिगत जीवन सुरक्षित करण्यासाठी प्रस्थापितांशी करार करतो. आज तशीच परिस्थिती समाजाच्या चहुबाजूला निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आज नाही तर उद्या पण आम्ही गुलामिकडे वाटचाल सुरु केली आहे. गुलामिकडे वळणारी मानसिकता थोपवायची असेल तर क्रांतीची जाणीव समाजाला द्यावी लागेल. लोकशाही, धर्मनिरपेक्षता संपुष्टात येउन मनुवादी गुलामगिरी विजयी पातळीपर्यंत येउन पोहचली आहे. गुलामगिरी अटळ आहे. वेळीच सावध व्हा ! समाजालाही सावध करा !

विचारधारेला मानणारा वर्ग (समाज/समूह) संघटीत असेल तर विचारधारा सदैव क्रांतीचे गीत गात राहील. परंतु समाज असंघटीत आणि दुभंगला असेल तर विचारधारा कितीही श्रेष्ठ असली तरी क्रांतीचा पाया उभारताच येत नाही. समाजाचा असंघटीतपणा विरोधकांच्या हातात दिलेले कोलीत असते. याचा लाभ घेऊन विरोधक क्रांतिकारी विचारधारेत घुसपेठ करून त्या विचारधारेलाच कमकुवत करीत जातात. अश्या परिस्थितीत विचारधारेला समाजात क्रांती घडवून आणण्यास हजारो वर्षाचा काळ जावा लागतो. विचारधारेचा सुवर्ण काळ जेव्हा समाज गमावतो तेव्हा तो समाज हजारो वर्षाच्या गुलामगिरीत लोटला जातो. बुद्ध तत्वज्ञानासोबत हे घडले. आंबेडकरी विचारधारेसोबत हे आता घडू पाहते आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "विचारधारेला पेलून धरणारे अनुयायी व समाज जर योग्य नसले तर विचारधारा संपुष्टात येते." मला वाटते कि यावरून आंबेडकरवाद्यांना कळून येईल कि आज त्यांना काय करण्याची गरज आहे. समाजाच्या संघटीतपणाची गरज आहे. आपसातील हेवेदावे विसरून समाजात एकत्र येण्याची गरज आहे. विचारांतील/तत्वज्ञानातील अंतर्गत मतभेद बाजूला सारून विचारसरणी व तत्वज्ञानाचा खंबीर पाया मजबूत करण्याची गरज आहे.

BSP एक राजकीय पक्ष म्हणून देशातल्या अन्य पक्षाच्या तुलनेत तुल्यबळ वाटत असला तरी पक्षांतर्गत हुकुमशाही आणि स्व स्वार्थापोटी ध्येय व उद्धीष्टातील कमकुवतपणा या पक्षाचे भविष्य संपविण्यास कारणीभूत ठरू शकतो. BSP पक्ष म्हणून वाढावा असे या देशातील परिवर्तनवादी विचार मानणा-या प्रत्येक माणसाला वाटेल. परंतु पक्ष नेतृत्वात असलेला अकारण स्वत्वाचा ध्यास कुठेतरी पक्षाला धोका निर्माण करीत आहे. BSP या देशातल्या अन्य पक्षाच्या तुलनेत एक राजकीय पक्ष म्हणून मान्य आहे. परंतु या पक्षाला दिलेली विचारांची जोड पूर्णतः चुकीची आहे. बहुजन समाज पार्टीने पेरलेले विष इतके भयंकर आहे कि त्यांना कांशीराम आणि मायावती व्यतिरिक्त दुसरे जग दिसतच नाही. प्रधानमंत्री बनले कि सर्व प्रश्न सुटतील अश्या आविर्भावात जगणा-या दीनदमडीच्या लोकांनी बाबासाहेब संपविला. हे सत्य आहे. आणि ते सत्य राहणार. यांना विचारांचे कितीही खाद्य पुरविले तरी यांना जे शिकविले आहे तेच हे पोपटासारखे बोलत राहणार. काय मूर्खांचा कारखाना बनविलाय बी एस पी ने ?

 BSP या पक्षाला स्वतःची अशी कुठलीही विचारधारा नाही. राजकारण (मग कुठल्याही पातळीवर जाऊन केलेले) हाच एक विचार या पक्षाचा आहे. BSP हा आंबेडकरवादी पक्ष असे म्हणून आंबेडकरी विचारांची अवहेलना करू नका. BSP ची आतापर्यंतची वाटचाल हि कुठेही आंबेडकरी विचारांतून झालेली नाही. आंबेडकरी माणसांच्या बळावर BSP हा पक्ष मोठा झाला पण विचार मात्र कधीच अवलंबले नाही. त्यामुळेच BSP ची तुलना RPI या पक्षासोबतही होऊ शकत नाही. BSP वाढावी परंतु विचारांना / परिवर्तनवादी विचारधारेला प्रदूषित करून वाढू नये. एवढीच एक अपेक्षा.

BSP पक्षाने RPI पक्ष संपला असे समजण्याची भूल करू नये. सामाजिक आंदोलने जेव्हापर्यंत सुरु आहेत तोपर्यंत RPI हा पक्ष जिवंत आहे.  RPI हा राजकीय पक्ष आहे. राजकीय सत्ता किंवा राजकीय प्रभाव निर्माण करण्यात १९७० नंतर हा पक्ष फार प्रभावी ठरला नसला तरी RPI ने सामाजिक आंदोलनाला बळकटी देऊन राजकीय प्रभाव संपूर्ण देशावर टिकवून ठेवला हेही तेवढेच सत्य आहे. आज पण RPI राजकीय पक्ष म्हणून प्रथमदर्शनी भासत असला तरी ते एक सामाजिक आंदोलन आहे. असेच दिसून येते. सत्तेमध्ये किंवा संसदीय राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणात हा पक्ष सपशेल अपयशी ठरत असला तरी सामाजिक आंदोलनात हा पक्ष संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर आहे. हे मान्य करावे लागेल. RPI च्या सामाजिक आंदोलनाचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे. आणि तोच या पक्षाचा मुख्य गाभा आहे. याच आधारावर येणा-या काळात हा पक्ष नव्या नेतृत्वातून (स्थानिक आणि राष्ट्रीय) संसदीय राजकारणात आणि निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होऊ शकतो. RPI संपली असे समजण्याची भूल करू नये. सामाजिक आंदोलने जेव्हापर्यंत सुरु आहेत तोपर्यंत RPI हा पक्ष जिवंत आहे. चिंता आहे ती फक्त याची कि RPI या पक्षाला निवडणुकीच्या राजकारणात यश कसे प्राप्त करता येईल. आणि हे यश बहुतांशताः समाजाच्या भूमिकेवर आणि आंबेडकरी चळवळीमध्ये नव्याने आलेल्या सुशिक्षित नवतरुणांच्या भूमिका व वाटचालीवर निर्भर करेल.

विचारांच्या कार्यकर्त्यांची अलीकडे खमंग चर्चा घडून येत आहे. बी एस पी आणि आर पी आय च्या कार्यकर्त्यांमध्ये खमंग चर्चा तर रोजच घडतांना दिसते. एखाद्या पक्षावर, नेत्यावर लिहिले तर हे विचारांचे कार्यकर्ते प्राण वाचविण्याच्या धडपडीने जसा माणूस पेटून उठतो तसा पक्ष व नेता वाचविण्यासाठी चर्चेला पेटून उठतात. परंतु या चर्चा खरच निकोप आणि वैचारिक होतात का ? चर्चेअंती हाती काही एक विचार वा निर्णय सापडतो का ? हा प्रश्न त्या प्रत्येक विचारांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला विचारावा. आम्ही विचाराने विभागलो गेलेलो नाही. मात्र खंत आहे कि नेत्यांनी आणि पक्षांनी आम्ही इतके विभागलो आहोत कि पक्ष आणि नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही विचारांना सुद्धा नाकारत आहोत. ख-या आणि शुद्ध विचारांना पण चुकीचे ठरवीत आहोत. आपली ही कृती किती घातक-विघातक परिणाम घडविणारी आहे याची आम्हाला कल्पना आहे का ? पक्ष तुटला, नेता हरपला तरी चालेल. नव्याने उभारता येतो. पण विचार तुटला, हरपला तर पुन्हा जुळविणे कठीण असते. हे कळते का आपल्याला. कळत असेल तर मग आपण पक्ष आणि नेत्यांच्या प्रेमापोटी विचार का संपवीत आहोत ? जर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा.

आंबेडकरी चळवळ स्थळ, काळ, परिस्थितीत कालानुरूप चालत राहील. त्यामुळे ती संपणार नाही. असे अनेकांचे मत आहे. आंबेडकरी चळवळ जिवंत राहील. ती जिवंत राहावी. अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. कारण या देशाला हीच एक चळवळ मानवतावादी विचार पुरवू शकते. इतकेच नाही तर विषमतावादी, अमानवतावादी, जातीवादी आणि धर्मवादी वातावरणात समतेचे स्फुलिंग आंबेडकरी चळवळच फुलवू शकते. यात तिळमात्र शंका नाही. विषमतावादी, मुलतत्ववादी, जातीवादी माणसांचे हितसंबंध ज्या समाजाशी जुळले आहेत त्या समाजात त्यांचे रक्तसंबंध आणि नातेसंबंध जिवंत जपण्यासाठी विरोधकांनाही आंबेडकरी चळवळ टिकून राहावी असेच वाटेल. परंतु ती आंबेडकरी चळवळ ही विषमतावादी, धर्मवादी, जातीवादी, मुलतत्ववादी विचारांना विरोध करणारी नसावी हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून त्यांनी आंबेडकरी चळवळीला संपविले नाही तर आंबेडकरी चळवळीत प्रदूषणे पसरविलीत. ज्यामुळे आंबेडकरी चळवळीचा विषमता, जाती संपवून समतामुलक समाज निर्मितीचा, जातीविरहित समाजनिर्मितीचा कणा बोथड झाला आहे. चळवळ भरकटत गेली. विरोधाभास निर्माण झाला. हे असेच सुरु राहिले तर आंबेडकरी चळवळ संपणार नाही तर आंबेडकरी विचार कालबाह्य होऊन विरोधकांना अभिप्रेत आंबेडकरी चळवळ अस्तित्वात राहील. याला तुम्ही आंबेडकरी चळवळ टिकून आहे म्हणाल ? कि आंबेडकरी चळवळ संपली आहे म्हणाल ? बुद्ध-आंबेडकरी विचारांना दूर सारून आंबेडकरी चळवळीचा विचार करता येत नाही. त्यामुळे तो विचार आंबेडकरी चळवळीसाठी सदैव केंद्रबिंदू राहावा असे वाटत असेल. तर आंबेडकरी चळवळीत आलेले प्रदूषण दूर करावेच लागेल. अन्यथा "आंबेडकरी चळवळ संपली आहे..." असेच म्हणावे लागेल.

नाला मानवी समाजाने केलेला कुडा-कचरा, मल-मुत्र इ. प्रकारची घाण वाहून नेण्याचे काम करीत असतो. त्यामुळे त्याच्याकडे तिरस्काराच्या नजरेने पहिले जाते. मानवी समाजाची घाण वाहता वाहता नाल्याचे पात्र हळूहळू कमी व्हायला लागते. व एक काळ असा येतो कि नाल्याचे अस्तित्वच संपुष्टात यायला लागते. नदीचे मात्र याउलट आहे. नदी आपल्या प्रवाही पात्रात येणारे सर्व अडथळे बाजूला सारून पात्रातील घाण किना-यावर फेकून देते. आणि स्वच्छ निर्मल प्रवाहानिशी सतत वाहत असते. त्यामुळे मनुष्य समाज नाल्याचे पाणी न पीता नदीचे पाणी पीत असतो.

            सामाजिक चळवळीचे सुद्धा असेच असते. फक्त संदर्भ बदलतात. इथे मानवी विचाररुपी घाण जर निर्माण झाली तर चळवळीला नाल्याचे रूप यायला वेळ लागत नाही. आणि चळवळ वैचारिक प्रवाही असली तर ती समाजाला प्राण पुरवीत असते. आज आंबेडकरी समाजाच्या संदर्भाने असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. १९७० च्या दशकापासून आलेली प्रतीक्रांतीवादी विचारांची घाण आणि ती घेऊन आलेले तिचे बगलबच्चे बिनबोभाटपणे आंबेडकरी चळवळीत वावरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे या घाणीने आंबेडकरी चळवळीचे स्वच्छ रूप दुषित करून टाकले आहे. आंबेडकरी चळवळ आज प्रदूषणातून जात आहे. आज आंबेडकरी चळवळीत आलेली प्रतीक्रांतीवादी विचारांची घाण आणि तिचे बगलबच्चे जोपर्यंत साफ केले जात नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळीला प्रवाहित करता येणार नाही. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे नव्याने प्रवाही होऊ पाहणा-यांची ही जबाबदारी आहे कि त्यांनी आंबेडकरी चळवळीत आलेली घाण ओळखून, तिला बाजूला सारून चळवळीला पुर्नप्रवाहित करावे. आंबेडकरी चळवळीला नाला बनवू नये तर तिचे पूर्वीचे नदीचे रूप तसेच प्रवाही ठेवावे. जिथे मनुष्य समाज आपल्या उत्कर्षाचा मार्ग शोधेल.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.