Monday 11 February 2019


#Once_Again_Ambedkar
मनुवादी अर्थव्यवस्था लादु पाहणारी शेखचिल्ली सरकार.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

          कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशाचा कणा असते. अर्थव्यवस्थेच्या सुचारू संचालनावर देशाचे भविष्य निर्भर असते. त्यासाठी प्रत्येक अर्थव्यवस्था दीर्घकालीन व अल्पकालीन विकासाचे धोरण निश्चित करीत असते. भारतातही पंचवर्षीय योजना (धोरण) बनविण्याचा हेतू हा दीर्घकालीन विकासाचे धोरण निर्धारित करण्यासाठी भारतीय संविधानाने आखलेला आहे. तर अल्पकालीन विकास धोरणांसाठी दरवर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प तयार केला जातो. परंतु आज देशात कुठल्याही स्वरूपात पंचवार्षिक धोरण बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे. आणि दुसरीकडे दर वर्षीचा आर्थिक अर्थसंकल्प फक्त शेखचिल्लीच्या स्वप्नागत गृहीतक बनून राहिलेला आहे. भाजप सरकारच्या मागच्या ४ अर्थसंकल्पात कुठेही शाश्वत अर्थसंकल्प आलेला या देशाने पाहिलेला नाही. विकासाच्या नावाने फसव्या घोषणा, फक्त काही धनदांडग्या व्यापारी श्रेष्ठीजन वर्गाला लाभदायक होईल असे अर्थसंकल्पीय नियोजन एवढेच मागच्या ४ वर्षाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. 

चाणक्य-कौटिल्याचे वंशज समजणाऱ्या भाजप/आरएसएस सरकारला या देशाची संविधानिक शाश्वत अर्थव्यवस्था कळली कि नाही ? हा आज देशातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. कि यांना या देशातून समान वितरणाची, सर्वांना आर्थिक विकासाची समान संधी देणारी, घरेलू उत्पादक क्षमतेला वाढवून रोजगार निर्मिती करणारी, कृषीव्यवस्थेला चालना देऊन कच्च्या मालाची बाजारपेठ समृद्ध करणारी संविधानिक शाश्वत अर्थव्यवस्था नष्ट करून यांना मनुस्फृती पुरस्कृत अन्यायकारक, लुटारू, शोषण करणारी अर्थव्यवस्था या देशावर लादायची आहे. याचा जोरकस प्रयत्न भाजप सरकारने मागच्या ४ वर्षांपासून सातत्याने केला आहे. देशाची अर्थव्यवस्था, त्या अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामान्य नागरिकांवर होणारे परिणाम, वार्षिक अर्थसंकल्प व पंचवार्षिक योजना या प्रत्यक्ष नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जुडलेल्या आहेत इ. गोष्टींची नागरिकांमध्ये असलेली अनभिज्ञता याचा वापर करून भाजप सरकारने देशाचा कणाच मोडीत काढला आहे. देशातील अर्थव्यवस्थेच्या संदर्भात नागरिकांमध्ये असलेले अज्ञान याचा फायदा घेऊन भाजप सरकारने देशाला फसविण्याचाच प्रयत्न केला आहे.

मुख्यतः भारतीय अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान अर्थव्यवस्था म्हणून गौरविली जाते. पण मुळात देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम पंचवार्षिक योजना वगळता नंतरच्या कुठल्याही पंचवार्षिक योजना कृषीक्षेत्राला चालना देणाऱ्या तयार झाल्याच नाहीत. देशात वाढत जाणारी लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा, वाढलेल्या गरजेनुसार वाढलेली कच्च्या व पक्क्या मालाची मागणी, कच्या मालाच्या मागणीच्या पूर्ततेसाठी करावे लागणारे आवश्यक ते नियोजन न केल्याने परकीय वस्तूंवर देशाची वाढलेली निर्भरता या देशाला अंतर्बाह्य पोखरून गेली. देशातील नागरिकांच्या मागणीला अनुसरून वाढलेल्या बाजारपेठा व भारतीय बाजारपेठांनी ग्राहककेन्द्री बाजारपेठ म्हणून घेतलेली भरारी, आजपर्यंत या देशाच्या कुठल्याच सरकारला व कुठल्याच अर्थमंत्र्याला दिसून आली नाही याची अजूनही खंत वाटते. भारत देश हा ग्राहककेन्द्री बाजारपेठ म्हणून विकसित होत असतांना पाश्चात्य देशांनी भारतीय बाजारपेठेवर मारलेला विळखा खऱ्या अर्थाने या देशाच्या उद्ध्वस्तीकरणाला कारणीभूत ठरलेला आहे. हे सर्व होत असतांना देशातले बेगडी अर्थतज्ञ राजकीय सत्तेचे गुलाम बनल्याने देशाच्या सत्तेला आर्थिक समृद्धीचा विचार बहाल करू शकले नाही. लुटारू राजकीय अर्थकारण देशाच्या अर्थसंकल्पाचे व पंचवार्षिक योजनांचे माहेरघर ठरल्याने विकासाचा उद्देशच सफल होऊ शकला नाही. संसदेच्या सभागृहात अर्थशास्त्राची बाराखडी माहिती नसलेल्या जनप्रतिनिधींनी (मग ते सत्तेतले असोत कि विरोधी पक्षातले असोत) कधी यावर मंथन न करता आपल्या मतदार संघात अर्थसंकल्पातील लुट कशी करता येईल याचाच विचार झाल्याने भारतीय अर्थव्यवस्था उर्ध्वगामी न बनता सातत्याने अधोगामी होत राहिली. व सामान्य माणसाचा विकास खुंटत गेला.

मध्यंतरी देशाचा आर्थिक वृद्धी दर ८% करण्याचा व तो कायम ठेवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला होता. त्यासाठी FDI च्या भूलथापा देऊन भाजप सरकार सामान्य लोकांना निव्वळ मुर्ख बनविले होते. भारताचे प्रवासी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशात जाऊन मोठमोठ्या उद्योगपती व त्यांच्या सिईओ यांना भेटून जणूकाही भारत देशालाच विकायला निघालेत कि काय असे वाटायला लागले होते. कॉंग्रेस सरकारच्या काळात FDI ला कडाडून विरोध करणारी भाजपा स्वतःचे सरकार आल्यावर त्याच FDI च्या माध्यमातून देशाला विकायला निघालेत. FDI च्या नावाखाली येणारी गुंतवणूक कुणासाठी आहे ? शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करून त्यांना भूमिहीन बनवून कुठली आर्थिक प्रगती होणार ? कृषिपूरक व कृषीला चालना देणारी व्यवस्था मोडीत काढून आम्ही कुठला विकास सध्या करणार आहोत ? देशातील ७० टक्के श्रमिक व मजूर कृषी रोजगारावर अवलंबून असतांना शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावून आम्ही कुठल्या दिशेने वाटचाल करायला लागलो आहोत ? ७० टक्के कृषक श्रमिक मजुरांना बेरोजगार बनवून त्यांना भूखबळीने मारून आम्ही कुठला शाश्वत विकास करणार आहोत ? हे आकलनापलिकडचे झालेले आहे. भारताची गौरवपूर्ण कृषीअर्थव्यवस्था मोडकळीस काढून व्यापारी अर्थव्यवस्था FDI च्या माध्यमातून लादली जात आहे. देशाची स्थावर मालमत्ता कृषी, कोयला, खनिज संपत्ती, सोने, कुशल कामगार इ. विदेशी व्यापाऱ्यांच्या घशात घालून देश विकसीत होण्याची स्वप्ने पाहणे म्हणजे "ईस्ट इंडीया कंपनीची" पुनर्स्थापना करणेच होय. याला "शेखचिल्ली" ची सरकार असेच म्हणावे लागेल.

देशाचा विकास हा देशांतर्गत स्थावर संपत्तीवर निर्भर असतो. ती टीकवून ठेऊन स्थानिक कुशलता वृद्धिंगत करून नव्या निर्मितीला चालना देणे गरजेचे असते. इथे स्थानिक कुशलता देशोधडीला लागून बेरोजगारी देशाच्या तरुणाईला शेवटच्या घटका मोजायला भाग पाडतेय. FDI ने बेरोजगारी कमी होईल की नव्याने सरकारने लादलेली बेरोजगारी निर्माण होईल. याचा विचार या देशाची सरकार करणार की नाही. जग भारताकडे निश्चित बाजारपेठ म्हणूनच बघते. तुम्ही जगाकडे तुमच्या देशी वस्तुंची बाजारपेठ म्हणून केव्हा बघणार ? आज ग्रामिण अर्थव्यवस्था संपुष्टात आली. शहरी अर्थव्यवस्था गरिबांचे रक्त पित आहे. खेडे ओसाड पडून, शहरे फोफावत आहेत. समाजाचा आर्थिक समतोल साधणारे कृषी प्रक्रीया उद्योग संपुष्टात आलेत. ग्रामीण कुशल कारागिर रिकामे पडलेत. व देशाच्या टांकसाळीतील हक्काचे तारणाचे सोने मंदीरातून लुटले जाऊ लागलेत. कुशलता मंदीराची घंटा वाजवून "घोकपट्टीचे मेरीट" शिक्षणसंस्थेतून बाहेर काढू लागली. व खरी कुशल विद्वत्ता आत्महत्या करीत आहे.  हा असमतोलपणा संतुलित करण्यात FDI कामात येणार का ? की, स्थानिक उद्योगांना मोडून आम्ही विदेशी पाहुण्यांना आमच्या डोक्यावर आणून बसविणार आहोत ? देशातल्या तरुण, सुशिक्षित वर्गाला विश्वासात घेऊन आम्ही अर्थव्यवस्थेची वाट चोखाळणार आहोत ? की, फक्त नरेंद्र मोदी विकास म्हणतो, भाजप विकास म्हणते म्हणून वाट्टेल तो खेळ भारतीयांसोबत करणार आहोत ? याचे उत्तर आम्हाला या मनुवादी अर्थव्यवस्थेच्या शेखचिल्ली सरकार कडून घ्यावे लागणार आहे.

विदेशी व्यापारी, कारखानदार, उद्योगपतींच्या भेटी घेणारे प्रवासी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जरा निवासी प्रधानमंत्री बनून देशी शेतकरी, कामगार, बेरोजगारांच्या भेटी घ्या. व शेती व्यापार, शेती उद्योग व शेती कारखाने निर्माण करण्याकडे लक्ष द्या. आपल्या मनुवादी अर्थशास्त्रात थोडासा भर घालून ज्यांनी देशाची अमुल्य अशी स्थावर खनिज मालमत्ता (जल, जंगल, जमिन) सुरक्षित करून ठेवली आहे त्यांचे आभार माना. तुमची पिढी त्यांचे आभार मानणार नाही. परंतु भविष्याच्या अनेक पिढ्या त्यांचे आभार मानतील. प्रवासी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जरा देशातल्या नागरिकांच्या विनंतीला मान देऊन निवासी प्रधानमंत्री बनून देशांतर्गत अर्थव्यवस्थेला सुदृढ बनविण्यासाठी मोलाचे योगदान द्या. परदेशी अर्थव्यवस्थेची काळजी करू नका. परदेशी व्यापारी अर्थव्यवस्था देशात आणून देशातल्या युवकांना रोजगार मिळणार नाही. देशातल्या युवकांना रोजगाराच्या संधी विदेशात उपलब्ध होतात परंतु स्व:देशात त्यांना रोजगार मिळत नाही हे आजच्या युवकांपुढील मोठे आव्हान आहे. या आव्हानाला हा देश व ही अर्थव्यवस्था स्वीकारणार कि नाही ? यावर देशाचे भविष्य निर्भर राहील.

आंररराष्ट्रीय अलिप्ततावाद हा सुरवातीच्या काळात भारतासाठी योग्यच होता कारण भारताला नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. पण आज अलिप्ततावाद योग्य नाही. खंबीर भूमिका घेणे गरजेचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था आज आंतरराष्ट्रीय संबंधाला आपल्याकडे आकर्षित करते आहे. अशा परिस्थितीत भारतीय प्रवासी प्रधानमंत्री विदेश दौऱ्यावर जाऊन काय साध्य करतात हेच कळायला मार्ग नाही. अलिप्ततावादाचे दुसरे एक कारण असे होते की, भारताचे सिमावर्ती देश व त्या देशातली कट्टरवादी मानसिकता, सोबतच बंडखोर प्रवृत्ती. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व सुव्यवस्थेला आव्हाण होते. पण आज तशी परिस्थिती राहीलेली नाही. सिमावर्ती भागात चाललेली घुसपेठ व शक्तीप्रदर्शन वगळता अंतर्गत सुव्यवस्थेला कुठलाही धोका नाही. परंतु परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली भारताचे प्रवासी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेला पोकळ करीत आहेत. याचे परिणाम तात्कालिन परिस्थीतीत दिसत नसले, तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर दुरगामी परिणाम करणारे ठरतील. देशाचा सामाजिक व आर्थिक ढाचा कोसळून पडेल एवढे मात्र निश्चीत. अंतर्गत अर्थव्यवस्था परकिय गुंतवणुकीने मोडकळीस निघेल व देशात आर्थिक विषमतेची दरी आणखीच रुंदावत जाईल. शेतकरी देशोधडीला लागेल. लघुउद्योग संपल्यात जमा होतील. चिंतेचा खरा विषय हा आहे की, देशाचे प्रवासी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी सततच्या विदेश यात्रा गुंतवणूकीच्या नावावर करीत असतांना या देशातले निवासी अर्थशास्त्रज्ञ, अभ्यासक, आर्थिक विश्लेषक गाळ झोपेत आहेत. यांना गाळ झोपेत ठेवल्या गेले आहे की झोपवल्या गेले आहेत. हाच खरा चिंतेचा विषय आहे. परंतु दुसरीकडे विदेशी गुंतवणूक आणण्याच्या नादात नरेंद्र मोदी विदेशात फिरत असतांना मल्या, मोदी, चौकसी सारखे देशातले गुंतवणूकदार देशातली संपत्ती घेऊन विदेशात पळून गेले. देशाची गंगाजळी खाली करून विदेशात पळणाऱ्या या देशी पाहुण्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विदेशात फिरत होते कि त्यांची विदेशात व्यवस्था करून देण्यासाठी जात होते ? हे आता देशातल्या जनतेने वेळीच ओळखून घेतले पाहिजे.

देशाचा आर्थिक ढाचा कोसळू द्यायचा नसेल, तर भारताच्या प्रवासी प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांना निवासी प्रधानमंत्री बनविण्याचा सल्ला कुठल्यातरी अर्थशास्त्रज्ञांनी देणे गरजेचे आहे. देशाचे प्रवासी प्रधानमंत्री लवकरच निवासी प्रधानमंत्री बनतील यासाठी हवाई ट्राफीक जाम करणारा संशोधक आम्हाला शोधावा लागेल. परंतु तो शोधूनही सापडत नाही अशा परिस्थिती प्रवासी प्रधानमंत्री म्हणून २०१४ ला सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी व भाजप सरकारला कायमचे प्रवासी बनविल्याशिवाय व देशात निवासी सरकार सत्तेवर बसविल्याशिवाय शाश्वत अर्थव्यवस्था स्थिरस्थावर होणार नाही. आज देशात जे काही चाललेले आहे ते फक्त एक स्वप्नवत दिवास्वप्नच आहे. जनतेला वेठीस धरून जनतेचे रक्त शोषून घेतले जात आहे. योजनांच्या नावाखाली लुबाडणूक चालविली जात आहे. एका कुटुंबाची अर्थव्यवस्था ज्याला चालविता आली नाही तो देशाची अर्थव्यवस्था चालवायला लागलेला आहे. भाजीपाला कुठल्या भावात मिळतो ? धान्याचा काय भाव आहे ? किराणा घ्यायला किती पैसे लागतात ? एकंदरीत सामान्य माणसाच्या रोजच्या जेवणाला किती पैसे लागतात ? हे ज्याला माहित नाही अशी व्यक्ती विकास नावाची जादूची कांडी फिरवून रोज सामान्य माणसांना मारून देशाचे पोट भरायचे स्वप्न दाखवायला निघालेला आहे. व अशा शेखचिल्ली माणसाच्या हातात जनतेने देश सोपवून स्वतःच्या जगण्या-मरण्याचाच डाव खेळला आहे. हा डाव आम्हाला परत खेळता येणार नाही.

मुळात मनुवादाच्या कुशीत वाढलेल्या नरेंद्र मोदी यांना व मनुस्मृतीच्या कुंडीत वाढलेल्या भाजप ला इथल्या शाश्वत अर्थव्यवस्थेला संपवून मनुवादी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे. जी सामान्य माणसांचा विचार करणारी नसेल तर समाजातील काही उच्चपदस्थ माणसांसाठी सामान्य माणसांना पायदळी तुडवून वर्णवर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करायची आहे. काहींना मालक बनवून काहींना गुलाम बनवायचे आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी अर्थशास्त्रच या देशाला शाश्वत विकासाकडे घेऊन जाणारे आहे. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाचा विचार करणारे, सामान्य माणसांमध्ये समान आर्थिक वितरणाची व्यवस्था निर्माण करणारे, खाजगी व सार्वजनिक क्षेत्राचा समतोल साधणारे, देशाच्या साधन संपत्तीवर सामान्य माणसांचा हक्क व अधिकार सांगणारे, मानवी जीवनाची आर्थिक मूल्य संविधानात निर्धारित करणारे आंबेडकरी अर्थशास्त्र या देशाला मनुवादी अर्थशास्त्र लाडू पाहणाऱ्या नरेंद्र मोदी/भाजप सरकारच्या तावडीतून सोडवू शकते. त्यासाठी मनुवादी अर्थव्यवस्थेला लाथाडून आंबेडकरी संविधानिक अर्थव्यवस्था परत स्वीकारण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मनुवादी अर्थव्यवस्था लादू पाहणाऱ्या या शेखचिल्ली सरकारच्या हातात या देशाची सत्ता परत जाणार नाही याची काळजी आम्हा सर्वांना घ्यायची आहे. तेव्हाच देशात शाश्वत विकासाचे वारे वाहू लागतील हे भारतीयांनी लक्षात घ्यावे.
                 adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.


#Once_Again_Ambedkar
आधुनिक अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या राज्यात
२०१९ च्या निवडणुका (वंचित) जनता विरुद्ध आरएसएस, भाजप, मोदी.
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.                       

अलिबाबा आणि चाळीस चोरांची कहाणी आपण सर्वांनी पाहिली, वाचली व ऐकली आहे. पण आधुनिक भारतातही हल्ली अलिबाबा आणि चाळीस चोरांची आधुनिक कहाणी पुन्हा आपल्यासमोर येत आहे. संविधानाने प्रत्येक भारतीयांना दिलेल्या संविधानिक हक्क, अधिकार, समान वितरणाची व्यवस्था हिसकावून भारतीयांच्या संपत्तीवरच डाका टाकलेला आहे. चाळीस चोरांची टोळी तर आपल्यात जागोजागी दिसून पडेल परंतु आधुनिक अलिबाबा शोधूनही सापडत नाही. देशात एकीकडे संविधानिक संपत्तीचा खजिना आहे तर दुसरीकडे भारतीय राजकारणी व त्यांच्या माध्यमातून चाळीस चोरांनी लुटून ठेवलेल्या संपत्तीचा खजिना आहे. या संपत्तीचा वाटा भारतीयांना अजून प्राप्त करायचा आहे. आज चाळीस चोरांच्या राज्यात वावरणारी जनतेला अलिबाबा बनून आपला वाटा प्राप्त करण्यासाठी या चाळीस चोरांच्या टोळीने निर्माण केलेल्या गुहेत घुसून २०१९ ला ‘खुल जा सीम सीम’ म्हणण्याची वेळ आली आहे.

परंतु असा संकल्प करतांनाच अलिबाबा च्या भावाच्या रुपात असलेले कासिम सारखे स्वार्थी आपल्या आजूबाजूला सभोवताल दिसून येतील. जे स्वतःच्या स्वार्थासाठी या चाळीस चोरांच्या संपत्तीवर एकटाच डल्ला मारण्याचा प्रयत्न करतील. या आधुनिक कासिमांनाही आम्हाला ओळखावे लागेल. या कासीम च्या औलादिंना आधुनिक चाळीस चोरांची टोळी अभय देईल अशा भ्रमात ते समाजाला भ्रमित करीत आहेत. पण कहाणीतील कासीमचा चाळीस चोरांच्या टोळीने ज्याप्रमाणे वध केला व मुंडके वस्तीतल्या चौकात लटकावून जनतेमध्ये धाक निर्माण केला. तशीच परिस्थिती आज आधुनिक चाळीस चोरांच्या राजकीय टोळीने भारतीयांची केलेली आहे. ही आधुनिक राजकीय उद्योजक चाळीस चोरांची टोळी २०१४ पासून भारतीयांना घाबरविण्याचाच प्रयत्न करीत आहेत. जनता घाबरलेली असावी व ही घाबरलेली जनता आधुनिक चाळीस चोरांनी जमा केलेल्या संपत्तीवर आपला हक्क सांगू नये व मुकाट्याने स्वतःला यांच्यावर लुटून द्यावे याच दिशेने आज पाऊले टाकली जात आहेत. या पावलांना तोडल्याशिवाय भारतीयांना, देशातल्या वंचितांना, मागास घटकांना त्यांचा वाटा मिळणार नाही.

२०१४ च्या दिव्यप्रतापी घोषणा, जुमले, लबाडी सारेच काही अद्यापही आम्ही विसरलेलो नाहीत. कोंबडी मारून खायची असेल तर दाणे टाकून जवळ बोलावून तिचा घात केला जातो. तसेच निवडणुकांच्या काळात मतदारांना दाणे टाकून आपल्या बाजूने मते वळविण्याचा प्रयत्न केला जातो. व एकदा का हा मतदार यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकला कि पुढचे ५ वर्ष त्याच जनेतेला / मतदारांना मारून ही प्रस्थापित राजकीय चाळीस चोरांची टोळी जगत असते. २०१४ पासून देशात निर्माण झालेले वातावरण, धार्मिक उन्माद, देशात तयार झालेली असहिष्णुता, वंचित आणि मागास घटकांचे घेतले गेलेले बळी व झालेले हल्ले, नागरिकांना दिल्या गेलेल्या सामाजिक, आर्थिक जखमा इ. सर्व बघितले तर नागरिकांचा घात केला गेला हे निर्विवाद सत्य ठरते. या अनुभवातून आम्ही काय धडा घेऊन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांना पुढे जातो त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

२०१९ च्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. परत एकदा मोदी टोळीने जनतेसमोर दाणे टाकायला सुरवात केलेली आहे. त्या संदर्भाने मिडियातून बातम्या पेरल्या जात आहेत. काही निर्णय घेतले जात आहेत. उद्देश एकच आहे तो म्हणजे काही दिवसांसाठी मतदारांना पिंजऱ्यात कैद करायचे व निवडणुका संपल्या व सत्ता हाती आली कि, मतदारांची तंदुरी बनवून पुढचे ५ वर्ष खात राहायचे. केव्हापर्यंत आम्ही यांच्या ताटातली तंदुरी बनून लोकशाहीचे गीत गात राहायचे कि या चोरांच्या टोळीकडून लोकशाहीच हिसकावून घेऊन जनतेच्या हातात द्यायची याचा विचार आम्हाला पुढच्या काळात करायचा आहे.

अलीकडे ४ हजार रुपये शेतकऱ्यांना महिन्याकाठी दिले जातील. १० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या गेल्या. कसे दिले जातील ? कशाचे दिले जातील ? मानधन असेल कि कर्ज असेल ? पेन्शन असेल कि अनुदान असेल ? सगळे काही गुलदस्त्यात. पण त्यासोबतच तसा निर्णय होईल कि नाही ? कि तो सुद्धा एक जुमलाच असेल हे निश्चित कुणालाच सांगता येणार नाही. असे निर्णय धोरणात्मक होतांना कधीच दिसून आले नाही. निवडणुकांच्या तोंडावर पैशाचे आमिष म्हणजे पैसे देऊन मत मिळविणे यापेक्षा दुसरी काय अपेक्षा आम्हाला मोदींसारख्या राजकीय चोरांच्या टोळीकडून करता येण्यासारखी आहे.

दुसरीकडे आर्थिक दुर्बल सवर्णांना १० % आरक्षणाची घोषणा मोदींनी केली. या घोषणेला १ दिवस लोटत नाही, तोच लोकसभेत आर्थिक दुर्बल सवर्णांना १० % आरक्षण देणारे विधेयक पारित होते. देशाच्या लोकसंख्येत जेमतेम १० ते १२ टक्के प्रमाण असलेल्या सवर्णांना थेट १० % आरक्षण आर्थिक आधारावर दिल्या जाते. सवर्णांच्या लोकसंख्येत जेमतेम २ ते ३ टक्के आर्थिक दुर्बल घटक असतील असे गृहीत धरले तरीही १० % आरक्षण म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात ३ ते ५ पट आरक्षणाचा लाभ त्यांना घेता येईल. याचाच अर्थ असा होतो कि परत कुठल्या तरी दुर्बल आरक्षित वर्गाचे गळे कापून सवर्ण हित साधून घेता येईल. भारताच्या संविधानात आरक्षण आर्थिक आधारावर दिले जाऊ शकत नाही. आरक्षणाचा आधार सामाजिक दुर्बलता हा आहे. असे असतांना देखील आर्थिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचा केला जाणारा हा प्रयत्न म्हणजे सामाजिक दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण घेणाऱ्या समाजाचा सामुहीक वध करण्याच्या षड्यंत्राचाच हा एक भाग आहे. आर्थिक दुर्बलता ठरविण्याचे एकमेव साधन म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा कुटुंबप्रमुखाचा ‘उत्पन्न दाखला’. आता हा ‘उत्पन्न दाखला’ बाजारात १०० ते ५०० रु. च्या भावाने सर्रास विकला जातो. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या आवारात १०० ते ५०० रु. भावात पाहिजे तेवढा ‘उत्पन्न दाखला’ मिळवून देणारे दुकाने थाटलेली दिसतील. व आर्थिक निकषावर आरक्षण घेणाऱ्यांच्या स्पर्धेत सर्वच लाभार्थी होतील. तेव्हा संविधानिक आरक्षणावर असंवैधानिक सवर्ण आरक्षणाने केलेला कब्जा कसा दूर होईल ? वारंवार आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणारी आरएसएस मानसिकतेची टोळी आमच्या या प्रश्नाचे उत्तर देईल का ?

काय विचित्र अवस्था आहे या देशाची बघा. आर्थिक दुर्बलतेला कंटाळून, कर्जाच्या बोझ्याखाली दररोज इथला शेतकरी आत्महत्या करतो आहे. फाशी घेतो आहे. फासावर लटकाविला जातो आहे. मारल्या जातो आहे. भूमिहीन, अल्पभूधारक, कष्टकरी, शेतमजूर रोज मरतो. परंतु त्याला त्याच्या या दुर्बलतेच्या आधारावर आरक्षण भेटू शकत नाही. कारण आर्थिक दुर्बलतेने मरणारा शेतकरी आर्थिक निकषावरच्या आरक्षणात बसत नाही. परंतु पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केलेल्या विधानानुसार देशातील सामाजिक आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे सवर्णांची मुले विदेशात स्थायी होऊ लागली आहेत. ही विदेशात स्थायी होणारी सवर्णांची मुले आर्थिक दुर्बलतेच्या निकषात बसतात व त्यांच्यासाठी सरकारला १० % आर्थिक आरक्षणाची तरतूद करावी लागते.

यावरून हेच लक्षात येते कि, सवर्णांची सत्ता सवर्णांचे हित जपेल कि फाटक्या धोतरात शेताच्या धुऱ्यावर फासावर लटकणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या हितासाठी काम करेल ? फाटक्या धोतराचा विचार करणारा फुले शाहू आंबेडकरांचा देश होता, तर सुट, बूट घालून विदेशात शिक्षण घ्यायला जाणाऱ्या सवर्णांचा मोदीचा देश आहे. या मोदी, भाजप, आरएसएस च्या देशात फाटक्या धोतराच्या अजून चिंध्या केल्या जातील. चिंध्या पांघरून सोने विकणारा माझा शेतकरी कायम दुर्बलतेने मारला जातो आहे. व सोने पांघरून चिंध्या विकणारा सवर्ण विदेशात स्थायी होत आहे. हाच काय तो माझा भारत देश आधुनिक पिढीसमोर उभा केला गेला आहे.

चिंध्या विकणाऱ्यांचे नेतृत्व करणारे मोदी म्हणतात २०१९ च्या निवडणुका या जनता विरुद्ध महाआघाडी अशा होतील. बघा देशाला कसे फसविले जाते. आर्थिक निकषावर सवर्णांना १० % आरक्षण देणारे विधेयक लोकसभेमध्ये ठेवले जाते तेव्हा विधेयकाच्या बाजूने ४१५ मते पडतात. फक्त मोदी हेच सवर्णांचे नेतृत्व करतात असे गृहीत धरले तर भाजप सरकारकडे २७६ जागाच आहेत. त्यातही सवर्णांचे प्रतिनिधी किती ? परंतु त्या सर्वांनी मोदी सरकारच्या सवर्ण बाजूने मतदान केले असेल तरीही (४१५-२७६ = १३९ ) ही १३९ मते सवर्ण आरक्षणाच्या बाजूने कुणी दिले ? कुठल्या कुठल्या पक्षाच्या उमेदवारांनी आर्थिक निकषावर सवर्ण आरक्षणाला मते दिली. लोकसभेतल्या ५४५ सभासदांमध्ये ४१५ सभासद सवर्ण धार्जिणे, सवर्णांचे गुलाम कसे काय बनले ? सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणारे दलित, आदिवासी, मागासवर्गीय (ओबीसी) लोकसभेमध्ये फक्त (५४५-४१५ = १३०) १३० च्या संख्येतच आहेत का ? याचाच अर्थ बेंबीच्या देठापासून भाजप / आरएसएस / मोदी सरकारच्या विरोधात रान माजविणारे कॉंग्रेस व तत्सम विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा सवर्ण आरक्षणाला होकार दिला. याचाच अर्थ ते सुद्धा सवर्णांचेच प्रतिनिधित्व करतात. दुर्बलांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणारे व स्वतःला परिवर्तनवादी विचारांचे सांगणारे रामदास आठवले, रामविलास पासवान व मायावती सारखे बेगडी नेते व त्यांचे पक्ष हे सवर्ण आरक्षणाच्या बाजूने उभे होत असतील तर या देशातल्या संविधानप्रेमी नागरिकांना मग प्रश्न असा पडतो कि, लोकसभेत दलित, वंचित, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजुरांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत कि नाही ? यांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत कि नाही ? कि या वर्गाने फक्त घाण्याचा बैल बनून दर पंचवार्षिक योजनेप्रमाणे नित्यनेमाने सवर्णांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षांच्या उमेदवारांना सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फक्त मतदान करायचे ? २०१४ ला केले आता २०१९ ला करायचे ? व आपल्या फाटक्या धोतराच्या चिंध्या बनवून दुर्बलतेची लक्तरे दिवसागणिक वर्षोनिवर्षे वेशीवरच टांगायची ?

बंधुंनो, ही निर्णयात्मक परिस्थिती आहे. हा निर्णयाचा काळ आहे. अनेक वर्षांपासून महिला राजकीय आरक्षणाचा विषय रेंगाळत पडला आहे. अनेकदा संसदेच्या पटलावर आला व आपटला आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करायला सवर्णांच्या पार्ट्या व त्यांचे प्रतिनिधित्व करणारे सभासद पुढे धजावत नाही. परंतु सबळ व हजारो वर्षांपासून सुबत्तेने परिपूर्ण असलेल्या सवर्ण वर्गाला आर्थिक दुर्बल बनवून आरक्षण देण्यासाठी पुढे येतात. तेव्हा या देशातली समानता व न्याय ऑनर किलिंग ने मारली जाते. अश्या परिस्थितीत खरच २०१९ च्या निवडणुका या जनता विरुद्ध महाआघाडी अशा होतील का ? कि आम्हाला फक्त फसविले जात आहे. याचा विचार या दलित, वंचित, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला व मजुरांनी करावा.

१० % दुर्बल सवर्ण आर्थिक आरक्षणाने देशातील सामाजिक व राजकीय मानसिकतेचे स्पष्टीकरण केलेले आहे. या देशाचे नेतृत्व इथला बहुजन करीत नसून सवर्णच करीत आहेत. बहुजन वर्गातील या पक्षांचे प्रतिनिधित्व करणारे गुलाम हे त्याठिकाणी बहुजनांच्या अधिकार व हक्कासाठी व त्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जात नसून ते कॉंग्रेस, भाजप सारख्या सवर्ण धार्जिण्या पक्षांची गुलामी करण्यासाठी जातात. हेच सिद्ध होत आहे. अशा परिस्थितीत या चाळीस चोरांच्या टोळीविरुद्ध बंद पुकारून दलित, आदिवासी, वंचित, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला व मजुरांच्या हक्कासाठी, इतके वर्ष ज्यांनी या वर्गाला लुबाडले त्यांना त्यांचा वाटा परत मिळवून देण्यासाठी आम्हाला वंचितांना न्याय मिळवून देणारा पर्याय निवडावा लागणार आहे. महागटबंधन कि महाआघाडी, भाजप कि कॉंग्रेस, या भूलभुलय्या चक्रव्युहात न सापडता तिसरा पर्याय स्वतःसाठी निर्माण करावा लागणार आहे. पर्याय उपलब्ध असेल तर तो निवडावा लागणार आहे.  व २०१९ च्या निवडणुका दलित, आदिवासी, मागास, श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, महिला व मजुर (वंचित) जनता  विरुद्ध आरएसएस, भाजप, मोदी, कॉंग्रेस, सवर्ण अशा लढाव्या लागणार आहे. तेव्हाच देशाचे संविधान व ही लोकशाही फलद्रूप होईल. देशातल्या जनतेला अलिबाबा चा निर्धारित वाटा प्राप्त होईल. व चाळीस चोरांच्या टोळीने जमविलेला संपत्तीचा साठा देशातील नागरिकांमध्ये समप्रमाणात वितरीत होईल. ही झुंज निकराची आहे. ही लढाई अस्तित्वाची आहे. ही वाटचाल स्वाभिमानाची आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, भाजप/आरएसएस (सवर्ण धार्जिणे सर्वच) विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या आहेत. वंचीतांनो, दुर्बलांनो ही लढाई तुमच्या भवितव्याची आहे याचा विसर पडू देऊ नका. तेव्हाच तुम्हाला तुमचा या देशातून हिरावलेला वाटा परत मिळेल. हे लक्षात ठेवा.
                                                                            adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.