Friday 31 August 2012

राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही.

आज सद्यकालीन स्थितीत आंबेडकरी समाजाचा प्रश्न राजकीय वाटत असला तरी तो पूर्णार्थाने खरा नाही. आम्ही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्तरावर पिछाडलेले आहोत. हेच वास्तव आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाचा आजचा प्रश्न हा सामाजिक आणि आर्थिक असाच आहे. अगदी तसाच जसा बाबासाहेबांच्या काळात होता. फरक इतकाच आहे की सामाजिक चटके तीव्र नसले तरी स्वरूप बदलून अर्थ-सामाजिक (Sociao - Economic) बनले आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या कायदेपुरक समतावादी व्यवस्थेने आम्हाला आमची ओळख प्राप्त झाली. त्यामुळे आर्थिक विवंचनेत या समाजाला पाडून पुनश्च्य तीच पेशवाईच्या व्यवस्थेला प्राचारण केले जात आहे.

कार्ल मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे इतिहासात मानवी गुलामीच्या अवस्थेला आर्थिकता कारणीभूत ठरली. अगदी हाच धागा अलीकडे मनुवादी विचारसरणीने पकडलेला आहे. समाजाचे आर्थिक खच्चीकरण करून सामाजिक गुलामगिरीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. आंबेडकरी समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे असे जर कुणी म्हणत असेल तर ते निव्वळ धाडसाचे होईल. अश्या लोकांना मला विचारावेसे वाटते की, फेब्रुवारी १९२८ च्या बहिष्कृत भारताच्या अंकात लिहिल्याप्रमाणे, "व्यक्तिगत उंची वाढली म्हणून समाजाची उंची वाढली हे म्हणणे धाडसाचे आहे तितकेच ते अप्रस्तुतही आहे. व्यक्तिगत उंची वाढली म्हणजे समाजाची उंची वाढत नाही. समाजाची उंची ही बहुसंख्यांकाच्या कल्याणाशी निगडीत असते. आणि एकदा का सामाजिक उंची गाठता आली की व्यक्तिगत उंची गाठायला वेळ लागत नाही." हे मांडायचे प्रयोजन इतकेच की, आजही समाज लाचार आहे. आजही समाज आर्थिक बाबतीत प्रस्थापितांवर निर्भर आहे. आणि ही निर्भरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि एकदा का निर्भरता वाढत गेली तर स्वाभिमान नावाचा मर्दानी बाणा कुठेतरी लुप्त होतांना दिसून येतो. भौतिक साधनांसाठी, नौकरीसाठी, परिवारासाठी इ. अनेक परिस्थितीत. आणि हे वास्तव आज समाजात अस्तित्वात असल्यामुळेच प्रतीक्रांतीवाद्यांनी आंबेडकरी समाजात शिरकाव करून दुफळी माजवलेली आहे. 

आज आम्ही राजकीय पातळीवर कितीही कमकुवत वाटत असलो तरी आम्ही समाजाची राजकीय उंची वाढविण्यात यशस्वी झालेलो आहोत. सत्ता असली काय आणि नसली काय परंतु सत्तेवरचे नियंत्रण आम्ही मिळविलेले आहे. भूमिहीनांचा सत्याग्रह असो, आणीबाणीच्या काळात घेतलेले निर्णय असो, स्वाभिमानाला धरून उभारलेले भावनिक आंदोलन असो, मंडळ कमिशन साठी पुकारलेला लढा असो की संविधानातील कल्याणकारी तत्वे टिकवून ठेवण्यासाठी विविध काळात निर्माण केलेला सामाजिक दबाव असो, आमच्या वाढलेल्या राजकीय उंचीचेच प्रतिक आहे. कुठलीही राजकीय समीकरणे आम्हाला वगळून मंडळी जात नाही यात आमचा राजकीय विजय आहे. असे आम्हाला वाटते. कुठलेही राजकीय निर्णय आम्हाला लक्षात घेतल्याशिवाय घेतले जात नाही. हे आमच्या राजकीय सजगतेचे प्रतिक आहे. 

प्रश्न हा आहे की, फक्त सत्ता आपल्याकडे नाही किंवा ती आपल्याकडे यावी म्हणून आम्ही आणखी किती दिवस समाजाचा स्वाभिमान गमावणार आहोत. कारण जगतांना सत्तेची वाट पाहता येत नाही. तर दैनंदिन जीवनातल्या गरजा भागविण्यासाठी आर्थिक स्त्रोतांच्या शोधात बाहेर पडावेच लागते. आणि ज्या परिस्थितीत ही सर्व आर्थिक स्त्रोते प्रस्थापितांच्या हातात आहेत तोपर्यंत आम्ही दैनंदिन जीवनात स्वाभिमानाला धाब्यावर बसवूनच गरजापुर्तीचा प्रयत्न करणार आहोत. निदान याचा विचार तरी आधुनिक काळात आंबेडकरी समाजात / आंबेडकरी चळवळीत काम करणा-या लोकांनी विचार करणे गरजेचे आहे. 

आज गरज आहे ती आर्थिक उत्पन्नाची स्तोते
समाजाच्या हातात देण्याची. निर्माण करण्याची. त्यासाठी प्रयत्न करण्याची. व्यक्तिगत आणि सामाजिक स्वाभिमान टिकवून ठेवायचा असेल तर या आर्थिक घटकांची नितांत गरज आहे. त्यामुळे आता आम्ही समाजाच्या आर्थिक संपन्नतेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाज स्वबळावर उभा राहू शकणार नाही. आणि जोपर्यंत समाज स्वबळावर उभा होत नाही तोपर्यंत व्यक्तीचे सामाजिक, सांस्कृतिक बलस्थान बळकट होणार नाहीत. हा समाज जगाच्या पातळीवरील अत्युच्च समाज आहे ज्या समाजाला बुद्ध धम्माचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे हे सर्व करायला आम्हाला फार काही वेळ द्यावा लागेल असे नाही. गरज आहे ती बुद्ध तत्वज्ञानातील मानव्यिक तत्वांना सामाजिक परिप्रेक्षात उतरविण्याची आणि अंगीकारण्याची. 

हे सर्व जर तात्त्विक आणि तार्कीतदृष्ट्या समजून घेऊन त्या दिशेने मार्गक्रमण करायला लागलो तर निश्चितच आज आमची वाढलेली राजकीय उंची सत्तेत परिवर्तीत व्हायला वेळ लागणार नाही. आंबेडकरी चळवळीचे शिलेदार म्हणविना-यांनी सत्तेची अनेक प्रयोग करून बघितले आहेत. हाताळून बघितले आहेत. परंतु शेवटी व्यक्तिगत उंची गाठण्याच्या पलीकडे या सत्तावादी राजकारणाची मजल पोहचू शकली नाही. समाजाची उंची दिवसेंदिवस खुजी होत चालली आहे. नव्या आव्हानांना पेलण्यात आमची शक्ती इतकी खर्च होत आहे की आम्ही योग्य तो मार्गच पकडू शकलेलो नाही. त्यामुळे राजकारण की समाजकारण की अर्थकारण हे ठरविण्यातच गुरफटलो गेलो आहोत. ही कोंडी हा समाज जितक्या अल्पावधीत फोडून काढेल तितक्या लवकर या समाजाला आपले भविष्य सुकर करता येईल. आणि ही कोंडी आर्थिक संपन्नतेशिवाय फुटू शकणार नाही असे आमचे निर्भीड मत आहे. 
  
----डॉ. संदीप नंदेश्वर

Wednesday 29 August 2012

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या

चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेला तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.

दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे. जो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. जो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. जो चळवळीपासून दूर जातो आहे. जो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.

आंबेडकरी चळवळीत आमच्या काही जबाबदा-या आहेत....

१)   विचार आत्मसात करीत असतांना त्याची सत्यासत्यता पळताळून  पाहणे.
२)   शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्त्रोतांचे बळकटीकरण करणे.
३)   आधुनिक संसाधनांचा वापर कसा करता येईल याचे प्रशिक्षण घेणे व देणे. सोबतच ही आधुनिक संसाधने आपल्या हातात घेता येतील असा प्रयत्न करणे.
४)   भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सरकारी योजना बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचविणे. शासकीय अनुदानाचा वापर करून समाजाचे आर्थिक सबलीकरण करता यावे यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे.
५)   वाढत चाललेली राजकीय उदासीनता घालविण्यासाठी राजकीय प्रशिक्षण संस्था किंवा तत्सम प्रयत्न करणे.
६)   धम्मातील वाढती प्रदूषणे आणि प्रतीक्रांतीची छुपी आक्रमणे याच्या जाळ्यात हा समाज मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्याला त्यातून बाहेर काढून त्यांच्यात प्रतीक्रांतीची पाऊले ओळखण्याची कुवत निर्माण करण्यासाठी आंबेडकरी विचारातील महत्वाची आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचविणे.

निदान इतक्या काही गोष्टी जरी आम्हाला प्राथमिक स्तरावर करता  आल्या तर निश्चितच सद्यकालीन परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.

-------टीप-----------------------ही सविस्तर मांडणी किंवा अंतिम मांडणी नाही हे लक्षात घ्यावे.------------------
---डॉ. संदीप नंदेश्वर.    

बाबासाहेब संविधान अमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते.

बाबासाहेब संविधान अमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते.

महावीर सांगलीकर हा बाळबोध भट आजकाल भारतीय संविधान आणि बाबासाहेबांच्या योगदानावर बरळतो आहे...त्याला उत्तर द्यावे इतकी त्याची लायकी नाही... पण आज संविधानाच्या संबंधाने काही प्रश्न उपस्थित होतात म्हणून संविधानाविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर व्हायला हवा....

भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यापासून सुरु झाली आहे.  आणि शेवट हा २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेच्या संविधान स्वीकारापर्यंत ती चालली आहे. या मध्यंतरीच्या काळात १९१९ चा montague - Chemsford  सुधारणा कायदा महत्वाचा आहे. ज्या कायद्याने भारतीयांना मर्यादित राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य बहाल केले. हा १९१९ चा कायदा बनण्याआधी साउथबुरो कमिशन १९१८ समोर डॉ. बाबासाहेबांनी निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या १९१९ च्या montague - Chemsford  सुधारणा कायदात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. बाबासाहेब वगळता तिथे या देशातील कुठल्याही अन्य व्यक्ती वा संघटनांचा समावेश का झाला नाही. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच या देशाच्या स्वातंत्र्याची आणि या देशातल्या जनतेच्या हिताची काळजी होती हेच दिसून येते.

त्यानंतर १९२७ ला सायमन कमिशन इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात आले. त्या कमिशन ला महात्मा गांधीच्या नेतृत्वातील कॉंग्रेस ने विरोध केला. आणि Go Back सायमन चा नारा लावला. कॉंग्रेस ने कुठलेही सहकार्य या कमिशन ला केले नाही. परंतु बाबासाहेबांनी या कमिशन ला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सदर केले. त्या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे यासोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधीमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले होते. तेव्हा कॉंग्रेस काय; गांधी काय; तर या देशातले इतर अन्य महा-(पुरुष), संस्था-संघटना निष्काम कर्मयोगाच्या समाधी अवस्थेत बसल्या होत्या.

१९२७ च्या सायमन कमिशन ने केलेल्या शिफारशीनुसारच इंग्रज संसदेने गोलमेज परिषद बोलावली. त्यात प्रामुख्याने बाबासाहेबांना पुनःच्या आमंत्रित करण्यात आले. या पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीप्रणीत कॉंग्रेस ने बहिष्कार घातला. परंतु बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत हजेरी देत इंग्रज सरकारला या देशाला कश्याप्रकारच्या कायद्याची गरज आहे. हे पटवून दिले. भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधीमंडळांची रचना कशी असावी हे सुद्धा पटवून दिले. हे गांधी आणि कॉंग्रेस ला माहित झाल्याने गांधी व कॉंग्रेस चे महत्व टिकून राहावे म्हणून गांधी दुस-या गोलमेज परिषदेला हजार झाले. तिथेही गांधी आणि बाबासाहेब यांच्यात भारतीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यक असणा-या तरतुदी संबंधाने मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली. शेवटी गोलमेज परिषदेने बाबासाहेबांच्या बाजूने ठराव घेतला. गांधींना त्यात सपशेल अपयश पचवावे लागले आणि बाबासाहेबांपुढे घुताने टेकावे लागले. (कृपया पुणे कराराच्या संबधाचा जो विषय आहे त्यावर मी बोलत नाही. तो विषय वगळता अन्य ठरावावर मी बोलत आहे) याच गोलमेज परिषदेने घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आणि त्याचेच रुपांतर पुढे १९३५ च्या कायद्यात झाले. म्हणजेच याही कायद्यात बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.

पुढे भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी त्यांनी विविध आयोगांना भारतात पाठविले. त्यातलेच पहिले १९४२ ला परत सायमन कमिशन भारतात आले. तेव्हाही गांधीप्रणीत कॉंग्रेस ने त्याला विरोध केला. परंतु बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. आपल्या मागण्यांचे निवेदन देत राहिले. त्यानंतर पुन्हा संविधान निर्मितीच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठी क्रिप्स मिशन (त्रीमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध) भारतात आले. तेव्हा थोडीशी कॉंग्रेस ची भूमिका मवाळ झाली होती. कारण प्रत्येक वेळेस बाबासाहेब आपल्या मागण्या इंग्रजांकडून मान्य करवून घेत होते. परत १९४६ ला माउंटबेटन च्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. जो संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. कॉंग्रेस किंवा गांधी किंवा अन्य कुणापेक्षा पेक्षा जास्त योगदान संविधान निर्मितीच्या पूर्वइतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राहिलेले आहे.

माउंटबेटन ने दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरु झाल्या. बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले. (तेव्हाही कॉंग्रेस ने बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. कारण पूर्वइतिहास त्यांना माहित असल्याने...कॉंग्रेस चे काहीही चालले नसते म्हणून) ९ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेची पहिली बैठक बोलाविण्यात आली. आणि भारतीय संविधानाचे प्रारूप कसे असावे यावर दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत प्रत्येकच सदस्याला मते मांडण्याची संधी देण्यात आली. बाबासाहेबांना आपली मते मांडण्यासाठी वाट पहावी लागत होती.

अखेर १७ डिसेंबर १९४६ ला बाबासाहेबांना संविधान सभेसमोर संविधानाच्या प्रारुपावर मत मांडण्यासाठी अचानक आमंत्रित करण्यात आले. (अचानक यासाठी कि अनेक सदस्य बाकी असल्याने बाबासाहेबांना याची कल्पनाच नव्हती कि त्यांना या दिवशी आपली मते मांडवी लागतील म्हणून...) बाबासाहेबांनी सुरवातीलाच याचा उल्लेख केला कि "माझा नंबर आज लागेल याची मला कल्पना नव्हती. तशी पूर्वसूचना मला मिळाली असती तर मी पूर्वतयारीनिशी माझे मत मांडले असते. पण तरीही मी माझे मत मांडणार आहे..." बाबासाहेबांचे ते संविधान सभेतील पहिले भाषण सुरु झाले. संपूर्ण सभागृह अवाक होऊन अतिशय एकाग्रचित्त झाले होते.

बाबासाहेब एकावर एक मुद्दे आपल्या बुद्धिचातुर्याने संविधान सभेसमोर मांडत होते. सभागृहातील एकही सदस्य त्या बाबासाहेबाच्या भाषणाच्या वेळी उठला नाही कि जागचा हलला सुद्धा नाही. बाबासाहेबांच्या मुखातून जणू काही भविष्याचे संविधानाच बाहेर पडत होते. ज्यात संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची एक आचारसंहिताच लिहिली जात होती. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृह टाळ्यांच्या गळगळाटांने निनादून उठले. संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मानच झुकविली. बाबासाहेबांचे विरोधकही त्या भाषणाने इतके प्रभावी झाले कि त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्दही फुटत नव्हते.

अश्यातच भारत आणि पाकिस्थानाची फाळणी होण्याचे संकेत होते. ती झाली. बाबासाहेबांचा मतदार संघ पाकिस्तानात गेला. त्यामुळे संविधान सभेतील त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते. अश्या परिस्थितीत बाबासाहेबांचे समर्थक आणि संविधान सभेतील अन्य सभासद ज्यांनी बाबासाहेबांचे १३ डिसेंबर १९४६ चे भाषण ऐकले होते त्यांचा कॉंग्रेस वर दबाव निर्माण झाला. कॉंगेस ला पण बाबासाहेबांना संविधान सभेतील कामकाजापासून अलिप्त ठेवता येत नव्हते. कारण इतकी प्रचंड विद्वत्ता आणि कल्याणाचा जाहीरनामा संपूर्ण कॉंग्रेस मध्ये कुणाकडेही नव्हते. भारताचे संविधान बाबासाहेबंशिवाय बनणे अशक्यप्राय होते हे कॉंग्रेस चांगल्याने जाणून होती. म्हणून शेवटी बी जी खेरांना पत्र लिहून जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व अन्य कारणाने रद्द करण्यात आले. आणि त्या टिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले. कॉंग्रेस, संविधान सभा, भारत देश या सर्वांचीच ती गरज होती. बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाने सर्वांच्याच हिताचे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते. 

संविधान निर्मितीचा हा पूर्ण इतिहास आपण लक्षात घेतला तर बाबासाहेब संविधान अमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते. परंतु काही बांडगुळे ठराविक अंतराने बाबासाहेब आणी भारतीय संविधानावर चिखलफेक करतात. ती मोडून काढण्यासाठी हा इतिहास आम्ही लक्षात घेतला पाहिजे. या देशात संविधान किती माणसांपर्यंत पोहचला आहे ? हे पाहायचे असेल तर अलीकडच्या काळात अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येत आहेत. इथली माणसे INDIAN PINAL CODE, HINDU LAW, COMPANY LAW, FAMILY LAW, CONTRACT LAW etc. अश्या अनेक कायद्यांची भेसळ भारतीय संविधानाशी करतात. उदा. "कसाबला लवकर फाशी होत नाही कारण संविधान जबाबदार आहे." "भ्रष्टाचार्यांना रोकता येत नाही. कारण संविधान जबाबदार आहे." सर्व प्रश्नांसाठी वेगळे कायदे असतांना ही बाळबोध माणसे सरसकट भारतीय संविधानाला आणि बाबासाहेबांना जबाबदार ठरवितात. हे किती हास्यास्पद आहे. आणि या देशातल्या अश्या बाळबोध माणसांमध्ये किती संविधानिक जागृती झाली आहे हे आपल्या लक्षात येईल.

बाबासाहेब आणि भारतीय संविधान यावर बोटे ठेवून उलटसुलट इतिहास मांडणा-या, वाचना-या, लिहिणा-या, सांगणा-या बाल्बोधांनी हा इतिहास वाचवा आणि नंतरच चर्चा करावी.
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१  

Thursday 23 August 2012

विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती


विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५


अलीकडे जीवन हरवून बसलेल्या माणसांचा लोंढा अध्यात्माच्या पायथ्याशी शरण जाऊ लागला आहे. माणूसपण मिळविण्यासाठी धडपडणारी माणसे जीवनाच्या चक्रव्युहात माणूसपण हरवून बसतात. भौतिक सुखाच्या अमानवीय तृप्तीसाठी चाललेली स्पर्धा जीवनात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करते. जगण्याचा अर्थच समजून घेता न आल्याने सामाजिक जीवनातून अलिप्ततेची भावना बळावत जाते. मग मानवी प्रवास देव, आत्मा, परमात्मा यांच्या दिशेने मार्गक्रमित होऊन अध्यात्माच्या मानसिकतेला शरण जातो. आणि इथूनच मानवी जीवनाच्या अपरिमित -हासाला सुरवात होते.

मानवी उत्क्रांतीचा काळ हा संघर्षाचा होता. विकसनशील माणूस संघर्षातून घडला. अमानवियतेविरुद्धच्या क्रांत्या संघर्ष्यातूनच झाल्या. मानवतावादाची उत्क्रांतीही संघर्षातून झाली. आज मानवी जीवनाला माणूस नावाची ओळख प्राप्त होण्यात या संपूर्ण संघर्षकाळाचा मोठा वाटा राहिलेला आहे. संघर्षाने केलेली क्रांती ही संघर्षातून उलथवून लावता येत नाही. म्हणून आजपर्यंतच्या इतिहासात ज्या काही प्रतीक्रांत्या झाल्या त्या मानवाच्या मानसिकतेवर हल्ला करून, त्यांच्या भावनिक मानसिकतेची शिकार करून झालेल्या आहेत. क्रांती-प्रतीक्रांतीचा हा  संपूर्ण इतिहास संघर्ष विरुद्ध मानसिक हल्ला असाच राहिलेला आहे. 

इ.स.पूर्व ४ थ्या शतकात मानसिक स्वातंत्र्य गमावलेल्या माणसाला मानसिक गुलामीतून तथागत बुद्धांनी बाहेर काढले. अष्टांगिक मार्गाच्या रूपाने जगण्याचा मार्ग बहाल केला. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी पंचशील प्रदान केले. आणि सामाजिक अस्तित्व टिकविण्यासाठी त्रिशरण प्रचलित केले. जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी १० पारमिता घालून दिल्या. वैदिकांनी मानवी समाजावर घालून दिलेल्या चिरेबंद मानसिक गुलामीच्या कळ्या बुद्धांच्या या सिद्धांतांनी मोकळ्या होऊ लागल्या.  प्रत्युत्तसमुत्पाताच्या सिद्धांताने व्यवहारातील कार्यकारण भाव चिंतन आणि मननाच्या पातळीवर आणून मानवी समाजावरील बौद्धिक झापडबंद कवाडे मोकळी केली. मानवी विज्ञानाला प्रस्थापित केले. अदृश्य शक्तीची चिरेबंदी मानवी व्यवहारवादी तत्वज्ञानातून मोडकळीस आणली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची रुजवण समाजात केली. कर्मकांड, आत्मा, पुर्नजन्म मोडीत काढून ख-या मानवी विकासाचा पाया रचला. जो आजतागायत जगाला मार्गदर्शक आहे.

बुद्धाची ही क्रांती वैदिकांची व्यवस्था मोडीत काढणारी असल्याने तथागतांच्या महापरीनिर्वानानंतर बुद्ध तत्वज्ञानाला प्रदूषित करण्यासाठी वैदिकांनी आपली विषारी पाऊले पसरायला सुरवात केली. इ.स. ४ थ्या शतकात म्हणजे बुद्धाच्या महापरीनिर्वानानंतर जवळपास ८०० वर्षांनी बुद्ध तत्वज्ञानाची मांडणी लिखित स्वरुपात होऊ लागली. तोपर्यंत बरीच सरमिसळ बुद्ध तत्वज्ञानामध्ये झालेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथातून हे स्पष्ट होते. वैदिकांनी केलेल्या घुसखोरीला मोडीत काढून बुद्धाच्या सामाजिक संदेशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्ध स्वरुपात जगासमोर आणले. विखुरलेल्या आणि प्रदूषित झालेल्या बुद्धाच्या तत्वज्ञानाला शुद्ध स्वरुपात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविता यावे म्हणून २२ प्रतिज्ञा दिल्या. २२ प्रतिज्ञा या दुसरे तिसरे काहीही नसून बुद्ध तत्वज्ञानाचे अगदी सोपे व संक्षिप्त रूप आहे. ज्यामुळे हजारो वर्षे वैदिकांच्या वंशावळीने लादलेली गुलामी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेबांच्या धम्मचक्रप्रवर्तन क्रांतीने मोडीत काढली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केलेल्या धम्मचक्र क्रांतीला त्यांच्या महापरीनिर्वानानंतर पुन्हा मानसिक हल्ल्यातून प्रतीक्रांतीवाद्यांनी रोखून धरले. आज तर बुद्ध आणि आंबेडकरी तत्वज्ञानाला विपश्यना आणि समाधीच्या काटेरी कुंपणात गुंफून नष्ट करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञानाने प्रेरित झालेल्या माणसांना मानसिक गुलाम केले जात आहे. विपश्यना आणि समाधी बुद्धाच्या नावावर खपवून काही मानसिक रोगी समाजाला पंगु बनवू पाहत आहेत. वैदिकांनी बुद्ध धम्मात सोडलेले काही बहुरूपी बुद्ध-आंबेडकरी समाजाला चार भिंतीच्या आत बंधिस्त करीत आहेत. डोळे बंद करवून, समाधिस्त बसवून बुद्ध-आंबेडकरांच्या क्रांतीला थंड करीत आहेत. प्रतीक्रांतीची ही मानसिक विषारी पाऊले किती भयंकर सामाजिक गुलामगिरीला आमंत्रण देत आहेत. हे पाहणे आधुनिक समाजाला क्रमप्राप्त आहे.

आज बुद्ध तत्वज्ञान हे आंबेडकरी चष्म्यातूनच बघितले गेले पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘आधुनिक बुद्ध’ आहेत. इतकेच नाही तर ते ‘महाबुद्ध’ आहेत. परंतु समाजाने बुद्ध तत्वज्ञानाला बाबासाहेबांच्या चष्म्यातून बघू नये, म्हणून विपश्यना बुद्धांनी सांगितली आहे; समाधी बुद्ध तत्वज्ञानाचाच भाग आहे; अश्या प्रकारची पेरणी करून माणसांची मानसिकता दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण हयातीत कधीही समाधी वा विपश्यना केली नाही. उलट "बुद्ध आणी त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या पान. क्र. २२५ वर समाधी, विपश्यनेला नाकारून बुद्धाने सामाजिक संदेश दिला नाही का ? असा प्रश्न विचारून बुद्धाने सामाजिक संदेशालाच अधिक महत्व दिले आहे. असे उत्तरही दिले आहे. तसेच मिलिंद कॉलेज च्या भूमिपूजनाच्या वेळी, देहूरोड येथील बुद्ध मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी समाधिस्त बुद्धाला नाकारून उघड्या डोळ्यांचा आणि मार्गस्त बुद्ध प्रमाण मानला. रंगून येथील भाषणात तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे 'विपश्यना आणि समाधीमुळे भारतात बुद्ध तत्वज्ञान प्रदूषित झाले आहे' असे म्हटले.

मुळात बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, बुद्धांनी व्यक्तीसापेक्ष संदेशाला सामाजिक परीवेशामध्ये मांडलेले आहे. याचे कारणही तितकेच मानव्यिक आहे. कारण माणसाची खरी ओळख ही त्याला त्याच्या समाजातूनच प्राप्त होत असते. समाजाच्या बाहेर राहून माणसाचे अस्तित्व निर्माण होत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नांना व सामाजिक परिस्थितीला जुळवून घेतांना मानवी कार्यकारणभावाला बुद्धाने प्रमाण मानले. मानवी वर्तनापासून तर मानवी प्रगतीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते. जिच्या कार्यकारणभावातून व्यक्ती जीवन घडत जाते. विपश्यना आणी समाधीने याच कार्यकारणभावाला मोडीत काढून व्यक्तीला एकलकोंडे, स्वार्थी, सामाजिक प्रश्नांपासून दूर व सामाजिक परिस्थितीपासून अलिप्त बनविले जात आहे.

ज्या गोयंका गुरुजी ने विपश्यनेचे भूत भारतात पसरविले ते स्वतः २००७ च्या दीक्षाभूमी येथील भाषणात म्हणतात, "बुद्ध धर्मातील तत्वे अतिशय चांगली आहेत. ज्यामुळे बुद्ध धर्म जगात स्वीकारला गेला. परंतु ही सर्व तत्वे आमच्या वैदिक संस्कृतीतून घेतली गेली आहेत." आता या गोयकांच्या वक्तव्याला कश्याप्रकारे समजून घ्यायचे ? याचाच अर्थ असा होतो की विपश्यना / समाधी हे वैदिकांच्या संस्कृतीचे बांडगुळ आहे. आणि स्वतः गोयंका हे सुद्धा वैदिकच आहेत. एक वैदिक माणूस बुद्ध धम्म देशात कसा काय पसरवू शकणार आहे ? निदान याचा तरी विचार गोयंका गुरुजीच्या पायाशी लोळणा-यांनी करावा.

मुळात विपश्यना माणसाला आत्मिक समाधानासाठी एकाग्रचित्त व्हायला सांगते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर आत्मिक समाधान त्या माणसाला हवे असते. ज्या व्यक्तीला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती झाली आहे. पण भौतिक सुख मिळविण्याच्या नादात त्याला गमवावे लागलेले स्वत्व आणि करावे लागलेले अमानवीय कृत्य, ज्याची अनुभूती सर्व भौतिक सुख मिळाले असतांनाही समाधानाची अंतिम पातळी गाठू शकत नाही. भ्रष्टाचारी, श्रीमंत, नौकरदार(अवैध मार्गाने भौतिक सुखाच्या मार्गाला लागलेले) आणि समाजाचा विसर पडून स्वतः च्या विश्वात जगणा-या माणसांनाच विपश्यना किंवा समाधी मानसिक समाधान प्राप्त करून देऊ शकते. पण याने नैतिक समाजाची निर्मिती होणार आहे का ? याउलट जी माणसे समाजात वावरतात; जी समाजाच्या परिस्थितीशी समरस असतात; जी सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सदैव अग्रेसर असतात; अश्या माणसांना त्यांचे कर्तुत्व अंतिम आत्मिक समाधान मिळवून देत असते. अश्या माणसांना कधीच विपश्यना वा समाधी करण्याची गरज भासत नाही.  बुद्ध तत्वज्ञानातील नैतिक समाजाच्या निर्मितीची मांडणी यावरच केली गेली आहे.  

धम्म फक्त मानसिक समाधान देतो. आणि त्यामुळे धम्माकडे आकृष्ट झाले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे म्हणणे असेल तर मला वाटते की ती नाण्याची एकच बाजू होईल. ती पण अपूर्ण. धम्म जगणे शिकवितो. धम्म वागणे शिकवितो. धम्म माणसाला माणसाची ओळख देतो. धम्म भटकलेल्यांना मार्ग देतो. धम्म व्यक्तिमत्व बहाल करतो. धम्म विकासाला चालना देतो. मानवी जीवनातील यशापर्यंत धम्म घेऊन जातो. आणि जेव्हा धम्मामुळे हे सर्व मिळते तेव्हा भौतिक सुखाची अपेक्षा मानवी जीवनात राहत नाही. आवश्यक त्या सर्वच गरजांची पूर्तता मानवी यशाच्या परिभाषेत सामावलेली असते. त्यामुळे धम्माला फक्त मानसिक समाधानापुरते बंधिस्त करता येणार नाही. आणि तसा दृष्टीकोन पण धम्मासाठी घातक आहे. जगतांना भेडसावणा-या सर्व सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, जातीय, शैक्षणिक, राजकीय प्रश्नाची सोडवणूक धम्मात आहे. असे मला वाटते. आणि हे सर्व विपश्यना किंवा समाधीतून होऊ शकत नाही.

डोळे बंद करून एकाग्रचित्त होणे, आत्मिक विहार करणे, श्वासावर नियंत्रण ठेवणे, शारीरिक गरजांना (लोभ, माया) विसरणे हे कुठल्या माणसांची लक्षणे आहेत ? जी माणसे समाजासाठी झटतात; जी समाजासाठी जगतात ती या सर्वच पातळ्यांच्या फार उंच पातळीवर पोहोचलेली असतात. एकंदरीत बुद्धाचा संदेशही मानवाला सामाजिक बनविणे आहे. प्रज्ञा, मैत्री, दान इ. माध्यमातून समाजासाठी धावून जाण्याची प्रवृत्ती बुद्ध निर्माण करतात. ज्यामुळे बुद्धांनी विपश्यना वा समाधीसारख्या साधनांना नाकारून "चरक भिकव्वे चारीकम, बहुजन हिताय, बहुजन सुखाय" चा संदेश दिला. तो कुठल्याच विपश्यनेमध्ये किंवा समाधीच्या अवस्थेत बसत नाही.

मुळात बुद्ध स्वीकारत असतांना आम्ही कुठला बुद्ध स्वीकारतो हेसुद्धा जास्त महत्वाचे आहे. सुजाताने दिलेली खीर बुद्धांनी प्राशन केल्यानंतर मार्गस्त झालेले बुद्ध स्वीकारायचे ? की, गृहराज्य त्याग केल्यानंतर सप्तऋषींच्या आश्रमात अघोरी विद्याग्रहण करूनही सत्याची ओळख न पटलेले बुद्ध स्वीकारायचे ? सप्तऋषींच्या आश्रमात बुद्धांनी विपश्यना / समाधी केली. परंतु सत्याचा मार्ग सापडला नाही. अश्याच ध्यानस्त मुद्रेत शरीराला क्लेश देऊन समाधी करीत बुद्ध बसले असतांना सुजाता ने त्यांना खीर दिली. ती खीर प्राशन करून बुद्धांच्या शरीरात चैतन्य संचारले. तेव्हा त्यांना प्रचीती झाली की, मी आतापर्यंत शरीराला क्लेश देऊन केलेली साधना व्यर्थ होती. त्यातून मला कुठलेही ज्ञान प्राप्त होऊ शकले नाही. म्हणून ती खीर प्राशन केल्यानंतर ते सामाजिक समूहाच्या (गावाच्या) दिशेने मार्गस्त होतात. आणी त्यानंतर समाजाच्या सानिध्यात राहून चिंतन आणि मननाने सामाजिक दुःखाकडे बघतात. तेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती होते. खरे बुद्ध हे सुजाताने दिलेली खीर प्राशन केल्यानंतर सापडतात. निदान याचा तात्त्विक आणि सैद्धांतिक विचार तरी विपश्यना आणि समाधी करणा-यांनी किंवा त्याचा पुरस्कार करणा-यांनी करावा.

आज माणसांना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांनी वेढलेले आहे. क्षणाक्षणाला व्यवस्थेविरुद्ध मानवी स्वातंत्र्यासाठी लढावे लागते. इतकेच काय तर बौद्धिक स्वातंत्र्यासाठीही लढावे लागते. याचे उत्तर विपश्यना किंवा समाधीत नसून उघड्या डोळ्याने घडणा-या घटनांची चिकित्सक मांडणी करून बुद्धाच्या प्रत्युत्तसमुद्त्पाताच्या सिद्धांतात आहे. विपश्यना किंवा समाधी संघर्षाची उर्मी संपविते. आज व्यवस्था कुठल्याच परिस्थितीत वंचित समूहाच्या हिताची नाही. अश्यापरिस्थितीत व्यवस्थेशी दोन हात करूनच आपले हक्क व अधिकार मिळवावे लागत असतील, तर ते विपश्यनेच्या डोळे बंद अवस्थेतून मिळविता येतील का ? मानवी न्यायाची मुहूर्तमेढ व्यवस्थेच्या माध्यमातून करायची असेल, तर माणूस सतत बाह्य वातावरणाशी संघर्षरत राहणे गरजेचे आहे. परंतु तो संघर्षरत राहू नये यासाठीच विपश्यनेचे भूत समाजात पेरले जात आहे. ज्यामुळे आज ज्यांच्या हातात व्यवस्था आहे; ती त्यांच्याच हातात राहील. आणि क्रांती करणारा समाज पुन्हा मानसिक गुलामीत लोटला जाईल. क्रांतीला प्रेरणा देणारे बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञान प्रदूषित होईल. आणि त्यामुळे क्रांतीला जळामुळापासून उपटून फेकता येईल. असे हे या विपश्य्यी वैदिकांचे षड्यंत्र आहे.

मानसशास्त्र सांगते की, माणूस जेव्हा समाधिस्त असतो तेव्हा तो त्याच्या आजूबाजूला घडणा-या घटना / घडामोडींपासून अलिप्त असतो. अश्या परिस्थितीत तो मोठ्या प्रमाणात बाह्य वातावरणापासून असुरक्षित असतो. बाह्य वातावरणाचा धोका समाधिस्त माणूस हाणून पाडू शकत नाही. मानवी जीविताला सर्वात अधिक धोका हा समाधिस्त अवस्थेतच जास्त असतो. शिवाय शारीरिक क्लेश आहेच. मानसशास्त्र हे सर्व व्यक्तीसाठी सांगते. 

तसेच मानव्यशास्त्राचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, जेव्हा जेव्हा समाज समाधी अवस्थेमध्ये होता; बाहेरच्या वातावरणापासून किंवा घडणाऱ्या घटना / घडामोडींपासून अलिप्त राहिला; तेव्हा तेव्हा समाज आपले स्वातंत्र्य गमावून बसला. आणि गुलामीच्या अवस्थेत लोटला गेला. वैदिकांनी इथे हजारो वर्षे गुलामी लादली आणि राज्य केले ते समाजाला अश्याच प्रकारे भ्रमिष्ट करून केलेले आहे. तीच अवस्था समाजावर या विपश्यनेच्या विषारी समाधी अवस्थेने आधुनिक काळात लादायचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे विपश्यनेची ही विषारी पाऊले समाजाने ओळखणे गरजेचे आहे. बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी कधीही विपश्यना सांगितलेली नाही. बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा संदेश हा व्यक्तीच्या सामाजिक अस्तिवाला प्राप्त करण्यासाठी होता. बाह्य सामाजिक वातावरणाच्या प्रभावाने निर्माण होणा-या सामाजिक गुण दोषांना संतुलित करून मानवी स्वातंत्र्य बहाल करणारी क्रांती बुद्ध आणि बाबासाहेबांनी केली आहे. परंतु आज सामाजिक प्रश्नांपासून, सामाजिक अन्यायापासून विचलित करण्यासाठी माणसांना विपश्यनेच्या दावणीला बांधले जात आहे. विपश्यनेचे हे वैदिक गाजर गवत आताच नष्ट केले नाही. तर प्राचीन काळातील गुलामगिरीची अवस्था समाजावर पुनश्च्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या परिस्थितीत माणसे मानसिक स्वातंत्र्य गमावून बसलेले असल्यामुळे गुलामीच्या विरुद्ध बंद करून उठणार नाहीत. डोळे बंद करून गुलामगिरीला आमंत्रण देण्यापेक्षा डोळे सताळ उघडे ठेऊन प्रतीक्रांतीला हाणून पाडा ! त्यातच तुमचा विजय आहे. बुद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीला क्रांतीचीच आज खरी गरज आहे.
ôôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५ 

Wednesday 15 August 2012

मी आणि माझी चळवळ



मी आणि माझी चळवळ
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५

एखाद्या पामराने किंवा एखाद्या पणतीने सूर्याला कवेत घ्यावे. अथवा तशी तुलना करावी. असा खोडकरपणा मी करतो आहे. असे समजण्याचे कारण नाही. उलट सूर्याच्या तेजोमय प्रकाशात प्रत्येकालाच जीवनाची वाट प्राप्त होत असते. सूर्याच्या उर्जेने जीवन प्राप्त होत असते. नव्हे ती निसर्ग नियमाची एक शास्त्रशुद्ध मांडणीच आहे. त्यातलाच मी एक पामर. मलाही सूर्याच्या किरणांनी जीवन बहाल केले. मलाही जीवनाची वाट सूर्याच्या तेजोमय प्रकाशातूनच लाभली. फरक फक्त एवढाच की तो आकाशातील सूर्य नसून विचारातील सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. मी जन्मलो याच विचारसुर्याच्या सावलीत. वाढलोही याच विचारसुर्याच्या सानिध्यात. आणि आता जगतोही याच विचारसुर्याच्या विश्वात. त्याच्याच साक्षीने. पण या तिन्ही कालखंडाचे संदर्भ आणि जाणीवा मात्र वेगळ्या होत्या. ते दिवस, ते क्षण आठवायला गेलो की हाथ थरथरायला लागतात. उर दाटून येतो. त्यामुळे हे विचार, ही साक्ष आणि माझ्यातले परिवर्तन सूक्ष्मपणे मांडत गेलो. तर कदाचित कादंबरी लिहिली जाईल. दुःख, दारिद्र्याचा लेखाजोगा मांडत बसलो. तर क्रमित कादंब-या बाजारात येतील. आणि मग माझ्यातला व्यवसाय जागा होऊन दुःखी जीवनाचे भांडवल कार्पोरेट जगण्याचा आधार बनेल. म्हणून शक्यतो माझ्यात झालेले परिवर्तन अगदी सुसाट वेगाने मांडण्याचा प्रयत्न या लेखातून करीत आहे.

तुम्ही भोगलेले दुःख, यातना, दारिद्र्य सर्व वंचितांच्या वाट्याला आलेले आहे. हे गृहीतक समोर ठेवून जगण्यातल्या परीस्थितीय बदलाला ग्राह्य धरून ही मांडणी होत आहे. जन्मापासून तर आतापर्यंतचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. माझा जन्म जरी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित कुटुंबात नव्हे वंशात झाला असला तरी आजूबाजूची परिस्थिती पूरक नव्हती. मी वाढलो असलो जरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारसुर्याच्या-क्रांतीसुर्याच्या सानिध्यात; तरी साधने पूरक नव्हती. संसाधनांची जुळवाजुळव करता करता गरीबीचे, दारिद्र्याचे चटके इतके बसत गेले की वय वर्ष मोजण्याची संधीच कधी मिळाली नाही. परंतु दुःखाच्या सानिध्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक सुखाने कधी हिम्मत हारू दिली नाही. १४ एप्रिल, कोजागिरी पौर्णिमा, विजयादशमी (दसरा) आणि ६ डिसेंबर एवढेच काय ते माहित व्हायचे. या दिवसांनी आपण एका महासुर्याचे अनुयायी आहोत. याची पुरेपूर जाणीव मात्र करून दिली. लहानपणापासून या दिवसांमध्ये ऐकू येणारे बाबासाहेबांचे गीत कानावर पडले की अंगात दारिद्र्यावर मात करण्याची ताकत तयार व्हायची. लढण्याची जिद्द आणि जगण्याची उमेद देऊन जायची. एका दिवसासाठी, काही कालावधीसाठी, काही वेळासाठी, काही क्षणासाठी. पण नंतरचे तेच रटाळवाणे जगणे. दिवस उजाडला की पोटाच्या आकांताने धावत सुटणे. नाही सापडले तर कट्ट्यावरच्या गप्पा आणि टवाळखोरी फावल्या वेळेतली.

झोपडपट्टीचे जीवन माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासूनच आले. कुळा-मातीच्या घरात, साफ-विंचू अश्या जीवघेण्या साथीदारांच्या सहवासात मी राहिलो. त्यामुळे गावात चालणा-या सर्वच     ब-या-वाईट घटना-घडामोडीचा मी एक भाग. थोडाथोडका नव्हे तर तब्बल वयाच्या २२ वर्षापर्यंत मी त्याचाच एक भाग होतो. आईने कितीही सांगितले की, तुला खूप शिकायचे आहे. परिवारात कुणीही नौकारीवर नाही. मला शिकू दिले नाही. पण तुम्ही शिका ! आणि नौकरी करा. आईचे हे उपदेश कानावर नेहमी पडत असले तरी गावातल्या वातावरणाने सर्वच भावंडांना घेरले होते. त्यामुळे कुणीच १० वी च्या पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षा निश्चितच माझ्याकडून वाढलेल्या होत्या. घरात कुणीही पहिल्या प्रयत्नात १० वी पास केली नाही. पण मी पहिल्याच प्रयत्नात १० वी पास केली. अभ्यासाचा ताण कमी झाला. म्हणून पुढील २ वर्षे नानाविध कारनामे करून दाखविले. अगदी झोपडपट्टीच्या जीवनाला साजेसे असेच. आणि अनपेक्षित १२ वी ला सर्व स्वप्नांची राखरांगोळी केली. नापास असा शिक्का आयुष्यावर मारून बसलो. आणि पुढील एक वर्ष मानसिक तणावात अगदी जगत राहिलो. अनेकदा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण हिम्मत झाली नाही. हार का मानायची ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातच पुढील प्रवासाला सुरवात केली.

पदवीचे शिक्षण शहरात जाऊन घ्यावे अशी अपेक्षा असतांना घरच्या परिस्थितीने परवानगी नाकारली. 'आहे तितके शिक्षण इथेच घेणे' हे बीजगणित आयुष्याशी जुळले. पण प्रवाही जगाशी साधर्म्य साधू पाहणारी माझी वृत्ती गावातल्या वातावरणात मला अस्वस्थ करीत होती. पर्याय नव्हता. जे मिळेल ते घेणे. जे जमेल ते करणे. आणि आपली वाट आपण तयार करणे. याशिवाय तरणोपाय नव्हता. पण अस्वस्थ आणि परिस्थितीने बांधले गेल्याची सल मनाला बोचतांना सरळ मार्गावर चालतांनाही आडवळणावर तोल जाणे शक्यच होते. जाणीवपूर्वक तोल जाणे. आणि त्यानंतरचे परिणाम भोगणे. हे आता माझ्या जीवनाचे सूत्रच बनले होते. स्वतःहून बिळात हात घालणे आणि डंक बसला की स्वतःला सावरणे. हा विळ्या भोपड्याचा खेळ सुरु असतांनाच मानसिक अस्वस्थता बोलून दाखविण्याचे कुठलेही साधन मिळत नव्हते. म्हणून स्वतःला महाविद्यालयाच्या सक्रीय चक्रव्युहात झोकून दिले. इतके की प्रध्यापकांसोबतच्या झकापकी पर्यंत. ठरवून टाकले होते की, आता यानंतर कुणासमोरही झुकायचे नाही. मनाला पटत नसेल तर होकारार्थी मान हलवायची नाही. मग तो कुणीही असो. पण सोबतच माझी परिस्थिती आणि बाहेरच्या जगाच्या घटना घडामोडी बेचैन करून सोडत होत्या. मनातली ही घालमेल कुणासमोर तरी मांडावी म्हणून अगदी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतांना लिहायला लागलो. बोलायला लागलो. अनेक चर्चासत्रे, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, काव्यचर्चा, कविसंमेलने पालथी घालायला लागलो. स्वतःत इतके वर्ष दडवून ठेवलेली अंगार ओकू लागलो. आणि एका वादळी आयुष्याला सुरवात केली.

मी लिहायला लागलो ती सुरवातही अगदी मजेदार. मी महाविद्यालयाच्या गच्चीवर बसलो होतो. बाहेर पाऊस सुरु होता. मी मनातून अस्वस्थ होतो. पदवीचे शेवटचे वर्ष असल्याने तारुण्यातले गुण-दोष अनुभवायला आले होते. मी स्वतःलाही त्या प्रक्रियेत झोकून दिले होते. बाहेरचे वातावरण पोषक होते. आतील वातावरण सूचक होते. समोरच होती ती...डोक्यात विचारांचे चक्रीवादळ उठले होते. पण पुढील भविष्याच्या चिंतेने मला चक्रावून सोडले होते. काय करावे सुचत नव्हते. अशात पेन कागद हातात आले. कविता लिहायला बसलो. अगदी स्वतःवरच. अनेकांच्या लिखाणाला ज्या विषयाने सुरवात झाली तोच विषय माझ्याही लिखाणाच्या सुरवातीचा विषय होऊ शकला असता. पण ते झाले नाही. रंजलेल्या, गांजलेल्या माणसांना अधिकारच नसतो ते विलासी मायावादी जीवन जगण्याचा. अधिकारही नसतो 'प्रेम' करण्याचा. मग अश्यात स्वतःच्या जीवनानुभवाशिवाय दुसरे काय सुचणार. 'जीवन' हाच विषय प्रथमदर्शनी आला. आणि अचानक पेन पावसाच्या वेगाने मुसळधार बरसायला लागला. जीवनातील अनुभवाची क्षितिजे ओलेचिंब करू लागला.... धो...धो...धो...करत पेन सुटला....

जीवनाच्या महासागरात

जगत असा आहे.

ध्येय आहे प्रगतीचे

लढत तसा आहे.....

 

सागराच्या लाटांनी

घेरले असे आहे.

त्यातून सुटण्याचा

फक्त मार्ग शोधत आहे......

 

हे शब्द कसे धाऊन आले. कळलेच नाही. जीवनाचे आणि जगण्याचे गणित सोडवून गेले. आजही तेच शब्द सोबत आहेत. हेच माझ्या जगण्याचे आणि जीवनाचे वास्तव मी स्वीकारले आणि पुढील वाटचालीसाठी मार्गस्त झालो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक ज्वलंत निखारा आहे. माणुसकी हरविलेल्या समाजात निखळ आणि स्वच्छंद वाहणारा विचारांचा निर्झर झरा आहे. प्रत्येकच माणसाच्या जीवनाला विशाल, महाकाय विकासाचे स्वरूप देणारा महासागर आहे. आणि विचारांच्याच बळावर शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण करणारा महासूर्य आहे. हा महासुर्य प्रत्येकालाच सहज उपलब्ध आहे. आज तर भारतीय समाजात हा विचारांचा तडपता महासूर्य संविधान आणि मानवाधिकाराच्या लढ्यातून प्रत्येकालाच जगण्याची प्रज्ञा शिकवीत आहे. परिवर्तन चळवळीच्या सर्वच अनुयायांच्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन घडून आले आहे. मानव्याची ओळखही याच महापुरुशामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे. मानवी परिवर्तनाचा हा वाटसरू माझ्याही जीवनात आला आहे. माझ्या जीवनातले आमुलाग्र परिवर्तन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारविश्वामुळेच झाले आहे.

आयुष्याच्या रुपेरी पडद्यावर जीवनाचे स्वप्न पाहण्याचा अधिकार गमावून बसलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या कुटुंबात माझा जन्म झाला असल्याने जातीचे हिमालय माझ्याभोवती उभे राहणे साहजिकच होते. ते केवळ छळतच नव्हते तर अंगावरची चामडीसुद्धा सोलत होते. अश्या परिस्थितीत मी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नागपूरला आलो. नागपूर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असल्याने निश्चितच चळवळीच्या संपर्कात राहण्याची संधी मिळाली. त्यातही नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर वसतिगृह म्हणजे चळवळीची कार्यशाळाच. त्यामुळे माझ्यातल्या आंबेडकरी बाण्याला इथे वाव मिळाला. परंतु शेवटी कितीही म्हटले तरी 'ज्यांच्या हातात सत्ता तेच शहाणे' ही म्हण वसतीगृहातल्या जीवनातही प्रत्यक्ष अनुभवता आली. पण माझ्यातला कुठल्याही परीस्थित कुणाही समोर न झुकणारा बाणा वसतीगृहातल्या अनेकांना मनस्ताप देऊन गेला. मी मात्र कणखरपणे लढलो. इथेही स्पर्धा होतीच. कौण कुणाआधी जिंकेल ? यासाठी शर्यती चालायच्या. आणि सर्वच शर्यती माझ्या विरुद्ध दिशेने असायच्या. वस्तीगृहातला एक एक क्षण मी एक एक जीवन म्हणून जगलो आहे. वसतिगृहात राहत असतांना परीस्थीतीपोटी मी केलेल्या उपोषणाची (१ महिन्यांचा उपवास कुणालाही न सांगता जेवण करण्याइतपत पैसे नसल्याने) आधुनिक उपोषण करणा-यांशी तुलनाच होऊ शकत नाही. उपाशी, अर्धपोटी, एक वेळ असे करून काढलेले जीवन मला अतिशय स्फूर्तीदायक वाटतात. आजही त्या जीवनाची प्रेरणा मला मिळत आहे. मी केलेले कष्ट, भोगलेल्या यातना बाबासाहेबांनी सोसलेल्या दुःखासमोर नगण्य आहेत. याची जाणीव झाल्याने आणखी दुःख सहन करण्याची शक्ती सहजच प्राप्त होते.

२००४-२००५ हे माझ्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष ठरले. २००४ मध्ये मी पदव्युत्तर परीक्षा आणि नेट परीक्षा दोन्ही पास केल्या. कुणालाही विश्वास बसत नव्हता. परंतु माझा माझ्या जिद्दीवर आणि कर्तुत्वावर निस्सीम विश्वास होता. वसतीगृहातल्या सर्व विरोधकांची तोंडे बंद झाली होती. लगेच मी जानेवारी २००५ ला नागपूर विद्यापीठात पी.एच.डी साठी नामांकन दाखल केले. तोपर्यंत नागपूर मध्ये घालविलेल्या ३ वर्षाच्या काळात अनेक चर्चासत्र आणि व्याख्यानांमधून आंबेडकरी चळवळीत चाललेली अंतर्गत संघर्षाची झळ बुद्धीच्या पटलावर पोहचली होती. त्यामुळे पी. एच. डी. साठी विषय निवडतांना अडचण गेली नाही. याच पार्श्वभूमीवर विषय डोक्यात घट्ट बसला. "आंबेडकरी चळवळ आणि बहुजन समाज पार्टी : सहसंबंधाचा एक चिकित्सक अभ्यास" या विषयावरच पी. एच. डी. करायचे ठाम करून मी त्याचा प्रारूप तयार केला. अनेकांना मार्गदर्शक म्हणून विनवणी केली. काहींनी विषय नाकारला. काहींनी नकार दिला. मी मात्र माझ्या विषयावर ठाम होतो. शेवटी माझे पी. एच. डी. मार्गदर्शक डॉ. मोरे यांनी मला होकार दिला. आणि इतका विश्वासही दाखविला की "हा विषय तुझ्या डोक्यातून आला आहे. त्यामुळे यावर तू जास्त चांगल्याने काम करू शकतो. तू संशोधनाचे काम सुरु कर ! आणि मला कुठे सही करायची तेवढे मात्र सांग !" त्यांनी दाखविलेल्या विश्वासाने माझा आनंद द्विगुणीत झाला. आणि मी माझ्या संशोधन कार्याला सुरवात केली. एक एक पान उलगडत गेलो. बाबासाहेब शब्दाशब्दात सापडत गेले. बाहेर बाजारभूनग्यांनी चळवळीची केलेली वाताहत. भाषणातून पेरलेले बाबासाहेब आणि त्यांच्या लिखाणातून सापडणारे बाबासाहेब. वास्तवातले/पुस्तकातले/ खंडातले बाबासाहेब काही निराळेच होते. आणि यांनी मोठ्यामोठ्या बढाया मारून भाषणातून पेरून ठेवलेले बाबासाहेब काही वेगळेच सापडले. आणि संशोधनातील आवड आणखीनच वाढत गेली. आणि इथूनच माझ्या ख-या आंबेडकरी चळवळीतील प्रवेशाची सुरवात झाली. 

२००५ ला एका कॅडर कॅम्प ला जाण्याची संधी मिळाली. कॅडर कॅम्प म्हटल्यानंतर बी एस पी आणि बामसेफ हे समीकरणच होते. आणि या सर्व संघटना/पक्षांविषयी चांगल्याने जाणून होतो. थोडाफार अभ्यासही केला होता. घरी आईने बी एस पी च्या चिन्हांवर स्थानिक निवडणूक लढविली होती. त्यामुळे बराच संबंध आला होता. कॅडर कॅम्पला वसतिगृहातील बरेच विध्यार्थी असल्याने आणि पी. एच. डी. संशोधनासाठी मदत होईल या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो. मुख्यतः त्या कॅडर कॅम्पचे मुख्य आयोजक/मार्गदर्शक विजन मानकर होते. आंबेडकरी अभ्यासक म्हणून, उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात कॅडर कॅम्पचा फायदा मला निश्चितच झाला. बाबासाहेबांच्या विचारांना सत्तावादी राजकारणाकडे घेऊन जाण्यासाठी कश्याप्रकारे पोस्टमार्टम केले जाते हे पाहायला, शिकायला आणी अनुभवायला मिळाले. शेवटी प्रत्येक कॅडरसाठी त्या कॅम्प मधील एकूणच निरीक्षणावरून केले जाणारे भाकीत माझ्यासाठी जरा जास्तच लाभदायक ठरले. मी कॅडर कॅम्प मध्ये सांगण्यात येणा-या प्रत्येकच गोष्टीकडे चिकित्सक बुद्धीने पाहत होतो. अनेक प्रश्नांची सरबत्ती आणि माझ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी व समाधानासाठी प्रशिक्षकांची उडणारी भंबेरी पाहून विजय मानकरांनी मला "भविष्यातील बुद्धिवादी" असे बिरूद लावले होते. माझ्या व्यक्तीमत्वासमोर लावलेले "भविष्यातील बुद्धिवादी" हे बिरूद माझे जीवन बदलविणारे ठरले. आता जबाबदारी वाढली होती. बाबासाहेबांना समजून घेतांना; बाबासाहेब वाचतांना; बाबासाहेब लिहितांना अतिशय सावधगिरी बाळगणे. वर्तमानातल्या बाबासाहेबांच्या विधानांचे मूळ शोधतांना अनेक चकित करणा-या गोष्टी हाती लागल्या. मी आणखीनच आंबेडकरी चळवळीच्या, बाबासाहेबांच्या विचारांच्या जवळ ओढला गेलो.

२००५ ला लग्न झाल्याने वसतीगृहातल्या जीवनातून थेट सामाजिक जीवनात प्रवेश केला. तेव्हा अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या आणी नेत्यांच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली. सामाजिक प्रश्नांवर आंबेडकरी परिप्रेक्षातून विविध वर्तमानपत्रातून मी लिखाण करायला लागलो. त्यामुळे निश्चितच आंबेडकरी चळवळीने मला आपल्याकडे ओढून घेतले. समाजाच्या विविध कार्यक्रमातील आणि आंदोलनातील प्रत्यक्ष सहभाग वाढत गेला. परिचय वाढत गेला. माझ्यातली अभ्यासू शैली, माझ्यातली वक्तृत्व शैली अनेकांना आपलेसे करून गेली. चळवळीने आपुलकी दिली. समाजाने मान-सन्मान दिला. आणि अतिशय कमी वयातच माझ्यात सामाजिक प्रौढपणा निर्माण केला. परंतु वयाच्या बंधनांमुळे चळवळीतल्या अनेकांशी वादही वाढतच गेले. मुळात ते वैचारिक असतीलही. अनुभवाच्या पातळीवरचे असतीलही. पण चळवळीला मी चालतो. माझा आंबेडकरी दृष्टीकोन, माझ्यातला आक्रमकपणा चालत नाही. म्हणून चळवळीतल्या अनेकांनी माझ्याविषयी दुषित मानसिकता बाळगली होती.

अनेकदा मी चुकतही गेलो. त्यात आंबेडकरी चळवळीतले धगधगते पँथर राजा ढाले यांचा एका चर्चासत्रात माझ्याकडे संचालनाचे काम असतांना मी त्यांचा केलेला अपमान आजही विसरलेलो नाही. “मी माझी चिकित्सा करू नये. माझे विचार मांडू नये.” अशी सूचना अध्यक्षपदावरून राजा ढाले यांनी करताक्षणी मी संचालन करणे सोडून खाली प्रेक्षकांच्या रांगेत येऊन बसलो. आणि मग त्या ठिकाणी उडालेली तारांबळ...सर्व काही अनपेक्षितपणे. कुणी कल्पनाही केली नसेल. मी असे वागू शकतो याची. पण आजही मी चुकलो की नाही ? याचा उलगडा होऊ शकलेला नाही. चळवळीत काम करीत असतांना तरुणांनी त्यांचे विचार, त्यांचा दृष्टीकोन का मांडू नये ? आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना का थांबविल्या जाते ? हे प्रश्न मला आजही विचलित करतात. तरीही जर मी चुकलो असेल तर चळवळीतल्या अनेक गणमान्य माणसांनी माझ्या चुका दुरुस्त करण्यास हातभार लावला. परंतु सर्वात जास्त हातभार लावला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांच्या लेखन व भाषण खंडानी. मी कुठे चुकलो ? काय चुकलो ? हे तपासून पाहिल्याशिवाय मी स्वस्थ बसत नव्हतो. त्यामुळे सहजच बाबासाहेबांचे लिखाण, त्यांचे विचार डोळ्यासमोरून थेट डोक्यापर्यंत पोहचू लागले.

संशोधन करीत असल्यामुळे प्रत्येक विचाराला, वाक्याला, संदर्भाला तपासून पाहण्याची सवय लागली. संशोधनाचा विषयही तितकाच गंभीर असल्याने तथ्यांची काटेकोर तपासणी करणे भाग होते. माझा विषय हा आंबेडकरी चळवळीच्या जिव्हाळ्याचा विषय होता. बी एस पी ने आंबेडकरी चळवळीत शिरकाव करून ब-यापैकी जनमत आपल्या बाजूने करून घेतले होते. सत्ता त्यांच्या हातात होती म्हणून समाज त्यांच्याविषयी ब्र सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. समाज कांशीराम यांना बाबासाहेबांच्या तुलनेत बसवू लागला होता. एका निरीक्षकाने तर इतके म्हटले होते की, "तुमचे संशोधन आणि त्यातून येणारे निष्कर्ष यातून एकतर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. किंवा तुमच्या घरावर दगडे मारेल." त्यांचे म्हणणे खरे होते. काहींनी तर असे म्हटले की, "तुमचे निष्कर्ष काहीही निघाले तरी तुम्हाला फार मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल." यांचेही म्हणणे खरे होते. दोन गट, दोन प्रवाह. एक बाबासाहेबांच्या त्यांच्या संकल्पनेतल्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था संघटनांमध्ये काम करणारा होता. तर दुसरा गट या सर्वांना सोडून नवीनच बाबासाहेब मांडणारा आणि सत्तेची स्वप्ने दाखविणारा होता. यात मात्र चळवळीची वाताहत होत होती. मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी आंबेडकरी चळवळ मागे पडत होती.

जबाबदारीचे भान ठेऊन माझे संशोधन अधिकच खोलात जाऊ लागले होते. इतक्यात 'द प्रोब्लेम ऑफ रुपी' हा बाबासाहेबांचा ग्रंथ वाचण्यात आला. बाबासाहेबांचे हे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठाने नाकारायचे ठरविले होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "मी अतिशय मेहनतीने हे संशोधन केलेले आहे. मी मांडलेल्या निष्कर्षाला तुम्ही अमान्य करून ते सप्रमाण सिद्ध करून दाखवा. अन्यथा मी हे संशोधन माझ्या देशात जाऊन प्रकाशित करेन. आणि त्यानंतर होणा-या परिणामांना सर्वस्वी ब्रिटीश सरकार जबाबदार राहील." संशोधानाप्रती बाबासाहेबांचा असणारा हा विश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी केलेले संशोधन मला बरेच काही सांगून गेले. त्यामुळे मी डगमगलो नाही. अतिशय चिकित्सक बुद्धीने संशोधन होत गेले. वाचन होत गेले. लिखाण होत गेले. आणि संशोधनासोबतच माझ्यातला एक एक पैलू उलगडू लागला.

मानवी जीवन अनेक पैलूंनी जकडलेले असते. मानवी समस्या व सामाजिक प्रश्न जाणून घ्यायचे असेल तर त्या प्रत्येक पैलूंची उकल करत जावे लागते. अस्पृश्यता निवारणाची लढाई, गरिबी व शोषणाविरुद्धची लढाई कायदेशीर मार्गाने जिंकण्याचे कसब बाबासाहेबांनी कसे मिळविले ? विपरीत परिस्थितीत आजूबाजूचे वातावरण अनुकूल नसतांना एकहाती लढा कसा जिंकून दाखविला ? या प्रश्नाच्या शोधात मी पडलो. तेव्हा उत्तर मिळाले की बाबासाहेबांनी मानवी समाजाच्या सर्व अंगांना व्यापणा-या विषयांचे सखोल अध्ययन केले. तेव्हाच त्यांना या परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. बाबासाहेबांच्या चिंतनावर, लेखनावर, कार्यावर आणि विचारांवर त्यांनी विविध पाश्चात्य देशातील विद्यापीठांतून घेतलेल्या शिक्षणाचा प्रभाव दिसून येतो. म्हणूनच बाबासाहेबांची तथ्ये खोडून काढण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. याच अध्ययन आणि चिंतनाच्या बळावर बाबासाहेब जगातल्या सर्व शोषित-पिढीत समाजाला त्यांच्या उद्धाराचा मार्ग देऊ शकले.

आजही समाजात अनेक प्रश्न नव्या संदर्भाने उपस्थित झाले आहेत. ते समजून त्यावर उपाय शोधून काढायचे असेल तर एकशास्त्रीय अभ्यास करून त्याची उकल होणार नाही. मानवी सामाजिक जीवनातील विविध समस्यांचे उकल हे सखोल अध्ययन आणि चिंतनाशिवाय होऊ शकत नाही. यावर दृढ विश्वास बसला. २००४ ला राज्यशास्त्र विषयात एम. ए. आणि नेट परीक्षा पास करून मी प्राध्यापक म्हणून काम करीत असतांना असे लक्षात आले की, मानव्यशास्त्र एका विषयाच्या अध्ययनातून समजून घेणे शक्य नाही. सामाजिक शास्त्र हे मानवी जीवनाच्या विविध अंगांशी जुडलेले आहे. त्यामुळे मी माझे पुढील शिक्षण थांबविले नाही. आंदोलन, चळवळ, परिवार सर्वच स्तरावर काम करीत असतांना शिक्षणात खंड पडू दिला नाही. अनेक विषयांचा अभ्यास होत गेला. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, आंबेडकर विचारधारा, इतिहास इ. विषयातून एम. ए. पूर्ण केले. आणि सर्वच विषयांच्या नेट परीक्षा पास केल्या. सोबतच कायद्याचे ज्ञान असावे. म्हणून एल एल बी केले. हे सर्व बाबासाहेबांच्या प्रेरणेतून घडून आले. आंबेडकरी विचारातून घडून आले. आंबेडकरी चळवळीने पुरविलेल्या सकारात्मकतेतून घडून आले. जातीवादी समाजाने केलेल्या छळातून मिळालेल्या दाहकतेतून घडून आले. गरिबी आणि दारिद्र्याच्या परिस्थितीने शिकविलेल्या जगण्यातून घडून आले आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. आणि कलम ही तलवारीच्या धारेपेक्षाही तेज आहे. यांना साधन म्हणून जी व्यक्ती आपल्या जीवनात वापरते. ती व्यक्ती स्वतःसोबतच समाजाचाही उद्धार करीत असते. बाबासाहेबांचा हा संदेश जीवनात मौलिक बदल घडवून आणतो. याच प्रेरणेतून मी शिक्षण घेत आलो. आणि पुढेही घेत राहणार आहे. तलवारीपेक्षा लिखाणाची ताकत समाजात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते. हे बाबासाहेबांनी सप्रमाण सिद्ध केले. त्याच प्रेरणेने मी वयाच्या २० व्या वर्षापासून लिहित आलो. आणि अव्याहतपणे लिहित आहे. सामाजिक प्रश्नांसाठी लढतांना स्वकीयांची पर्वा न करता लढणे आम्हाला बाबासाहेबांनीच शिकविलेले आहे. त्याच प्रेरणेतून आज सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनातील सहभागापासून तर समाजाला भेडसावणा-या समस्यांच्या निवारणासाठी आंदोलने उभी करण्यापर्यंत मजल मारता आली. आंबेडकरी परिप्रेक्षातून सामाजिक परिवर्तन घडून आले पाहिजे. इथल्या संविधानातील शोषित-पिडीत-वंचित समाजाचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजे. यासाठीचा संघर्ष सुरु आहे. आणि भविष्यातही तो सुरु राहील. आंबेडकरी राजकारणापासून, समाजकारण, अर्थकारण, संस्कृतीकरण आणि शिक्षणापर्यंत सर्वच पातळ्यांवर या समूहाची पीछेहाट होणार नाही. याची दक्षता घेऊन सदैव जागृत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक विकृती निर्माण करण्या-यांवर तुटून पडणे, अन्यायाविरुद्ध लढणे. हे आज नित्याचेच बनले आहे. 

ôôô  डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५ ôôô

Sunday 12 August 2012

धम्माचे राजकारण चळवळीला घातक



धम्माचे राजकारण चळवळीला घातक
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

१९४५ द्वितीय जागतिक महायुद्धानंतर जगातील बहुतांश देशांनी लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि कायद्याचे राज्य स्वीकारले. वसाहतवादी, धार्मिक आणि राजेशाही जवळपास संपुष्टात आली. भारताने तर संसदीय व्यवस्था, लोकशाही आणि कायद्याचे राज्य संविधानाच्या माध्यमातून स्वीकारून जगासमोर एक आदर्श निर्माण केला. यासोबतच धर्माला मिळणारा राजाश्रय संपुष्टात येऊन धार्मिक स्वतंत्राचा व्यक्तीशः अधिकार प्राप्त झाला. जगात आता कुठेही कुठल्याही धर्माला राजाश्रय प्राप्त नाही. (काही इस्लामिक राज्य वगळता) बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशी धार्मिक लोकसंख्येच्या आधारावर विभागणी करण्यात आली. परंतु राज्याचा कुठलाही एक धर्म म्हणून स्वीकारला गेला नाही. खुद्द पाकिस्थानातही हिंदू आणि इतरही धर्माचे लोक राहत असल्याने त्यांना निव्वळ इस्लाम धर्माचा जागतिक पुरस्कार करता येत नाही. आधुनिक काळात राजसत्ता आणि धर्म या भिन्न आहेत. परंतु भारतात आजही हिंदू धर्माचा पुरस्कार केला जातो. संविधानातून नव्हे तर हिंदू कट्टरपंथीयांच्या माध्यमातून. मग पाकिस्तानात जर इस्लाम चा पुरस्कार केला गेला तर इथल्या हिंदूंच्या पोटात आगडोंब का उठते हे कळायला मार्ग नाही. याचाच अर्थ इथले कट्टरपंथीय लोकशाही आणि संविधान मान्य करीत नाही. कायद्याचे राज्य मान्य करीत नाही. हेच सिद्ध होत आहे. आणि तसा उल्लेख हिंदू कट्टरपंथीयांकडून वारंवार जाहीररित्या केला गेला आहे.

हे सर्व कट्टरपंथीय धार्मिक संप्रदायाकडून होते हे मान्य करता येईल. परंतु भारतात बौद्ध धम्माचे पुरस्कर्ते म्हणवून घेणारे काही बहुरूपी (मुळात ते बुद्धिस्ट नसल्यामुळे बहुरूपी) बामसेफ, बीएसपी आणि एम्बस चे विद्वान बौद्ध धम्माला इतिहासाचे दुषणे देत राजाश्रय मिळवून देण्याच्या वल्गना करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांची ही प्रताडणा आहे. सत्ता प्राप्त केल्याशिवाय बौद्ध धम्माला राजाश्रय मिळणार नाही. आणि बौद्ध धम्म फलद्रूप होणार नाही. अशी या विद्वानांची मांडणी किती हास्यास्पद वाटते ! सत्ता मिळाल्यावरच बौद्ध धम्माचा स्वीकार करणार असे म्हणणारे मादक विद्वान नेते आणि त्यांचे मेंढपाळ कार्यकर्ते नेमक्या कुठल्या धर्माकडे वाटचाल करीत आहेत ? हे तरी आता आधुनिक पिढीने समजून घ्यावे. सत्तेसाठी धम्माचा स्वीकार केला जात नाही ही बाब बौद्ध धम्मासाठी अतिशय लांच्छनास्पद आहे.

धम्म हा जीवनमार्ग आहे. तो जीवनमार्ग न स्वीकारता राजकारणासाठी धम्माला वेठीस धरणे म्हणजे देशद्रोहच नाही तर समाजद्रोह सुद्धा आहे. आम्ही धम्मानुसार वागतो. धम्म चालवितो. मात्र धम्माचा स्वीकार करीत नाही. हिंदू धर्माला शिव्या देतो. पण त्याच हिंदू धर्मात राहून स्वतःला वेगळे भासवितात. किंवा ते परिवर्तनवादी आंबेडकरी असण्याचा होरा मिरवितात. ही कुठली राजनीती आहे ? हे आता तरुण पिढीने ओळखणे गरजेचे आहे. अश्या वल्गना जेव्हा या (बुद्धी नसलेल्या) विचारवंतांकडून ऐकायला येतात. तेव्हा हा समाज आणखी किती काळ फसविला जाणार आहे ? बौद्ध धम्माला या बहुरूपी सत्तावाद्यांकडून आलेली ग्लानी आम्ही केव्हा दूर करणार आहोत. किती दिवस ताटकळत राहायचे.? धम्माच्या नावाने यांचे राजकारण किती दिवस सहन करायचे ? धम्माच्या नावाने राजकारण करणा-या देशद्रोही समाजद्रोह्यांना आम्ही केव्हा उघडे पाडणार आहोत ? यांना केव्हा धडा शिकविणार आहोत ? बर्मा, मलेशिया, थायलंड, चीन, जपान इ. देशांमध्ये बौद्ध धम्माला राजाश्रय नाही.  तरी तिथे बौद्ध धम्म फलद्रूप होतो आहे. भारतातच या विद्वान नेत्यांना धम्मासाठी सत्तेची काय गरज आहे ? धम्माचे करण्यात येणारे हे राजकारण आंबेडकरी चळवळीला अतिशय घातक असेच आहे.

या सर्व परिस्थितीत धम्म तुटत चालला आहे. जगातील बुद्ध धम्माकडे आकर्षित होणा-यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र राजकारणाच्या बुरख्याखाली भारतात धम्माला ग्लानी चढत आहे. पंतप्रधान बनल्यानंतर धम्माचा स्वीकार करू ! सत्ता मिळाल्यानंतर लाखो करोडोंच्या संख्येत धम्मपरिवर्तन करू ! २००४ ला करू ! २००६ ला करू ! कुणी म्हणतो ५ वर्षांनी करणार ! कुणी म्हणतात १० वर्षांनी करणार ! काय सुरु आहे ? या देशात बौद्ध धम्माच्या अनुषंगाने !  काहीच कळायला मार्ग नाही. बौद्ध धम्मातील तत्वे अंगीकारण्याचा ढोंग करणारी, धम्माची ओढ दाखविणारी असंख्य माणसे आढळून येतील. पण बुद्ध धम्माचा स्वीकार करणार नाही. मग अशी माणसे बुद्धिस्ट म्हणायची का ? 

धम्माला किंवा या ठिकाणी आपण त्याला धर्म या अनुषंगाने जरी घेतले तरी धर्म ही जीवनप्रणाली असते. जीवन जगण्याची आचारसंहिता धर्म प्रदान करीत असते. माणूस धर्माशिवाय जगू शकत नाही. म्हणूनच जगातला प्रत्येक माणूस कुठल्या न कुठल्या धर्माचा धर्माभिमानी आहे. जीवनाची नितीमुल्ये ही धर्मातूनच प्राप्त होत असतात. असे अनेक विद्वान समाजशास्त्रज्ञांनी मांडले आहे. परंतु अलीकडच्या काळात सर्वधर्मसमभावाचे निधर्मी बांडगुळ उभे करून स्वतःला जगावेगळी करणारी माणसे गल्लीबोळात पाहायला मिळत आहेत. यांचा सर्वधर्मसमभाव हा फक्त यांच्या बुद्धीच्या पोकळ वल्गना आहेत. प्रत्यक्षात मात्र कुठेतरी हीच माणसे कट्टर धर्माभिमानी असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वधर्मसमभाव ही कायद्याच्या समोरील बाब आहे जी माणसाला स्वतःच्या धर्मातील अस्तित्व टिकवून ठेऊन इतर धर्माविषयी आदरभाव बाळगायला शिकविते. जरी त्या धर्मातील तत्वे आणि सिद्धांत मनाला पटत नसली तरी ती मानायला भाग पाडते. अश्या यांच्या सर्वधर्मसमभावात यांनी स्वतःचा धर्म टिकवून ठेऊन बौद्ध धम्मातील माणसांना भावनिक बनविले आहे. ज्यामुळे भारतात बौद्ध धम्म फलद्रूप न होता रसातळाला जात आहे.

आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत ! अशी पांढरपेशी ओळख तयार करून काहींनी राजकारण केले. तर काहींनी या धर्मनिरपेक्षतेला कट्टर धार्मिकतेचा साज चढविला. मुळात व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. व्यवस्था धर्मनिरपेक्ष असते. धर्मनिरपेक्षता हा व्यवस्थेचा गुणधर्म आहे. व्यक्तीचा नाही. ज्यात शासनस्तरावरून आणि कायद्याच्या चौकटीत कुठल्याही धर्माला विशेष महत्व प्राप्त होत नाही. व्यवस्था प्रत्येकच धर्माचा पुरस्कार करते. प्रत्येक धर्मियांच्या भावनांचा आदर व सन्मान शासनस्तरावरून केला जातो. प्रत्येक नागरिक हा कुठल्यातरी धर्माचा पाईक आहे हे वास्तव स्वीकारून त्याला त्याच्या धार्मिक भावनांचा आदरसन्मान करण्याची मुभा प्राप्त होते. व्यक्तीसाठी सर्वधर्मसमभाव आणि व्यवस्थेसाठी धर्मनिरपेक्षता अशी स्पष्ट विभागणी आहे. तरीही काहींनी त्यात भेसळयुक्त बुद्धीची सरमिसळ करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 'भारत बौद्धमय करण्याच्या' स्वप्नाला पद्धतशीरपणे बाजूला सारले आहे. 

बाबासाहेबांनी "हा देश बुद्धमय करेन" अशी घोषणा करून प्रस्थापित व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे केले होते. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वावर आधारित भारतीय संवैधानिक व्यवस्था बुद्ध धम्माच्या तत्वावर जेव्हा उभी राहते तेव्हा समाजातील विषमता आणि भेदाभेद नाहीसे होऊन मानवतावादाच्या प्रस्थापनेला सुरवात होते. ही खरी बाबासाहेबांची कल्पना असावी. कायद्याच्या चौकटीत मानवी द्वेषाला बांधून भारतीय समाजाच्या मनामनात असलेल्या धार्मिक कट्टरवादाला बाबासाहेबांनी चाबकाचे फटके मारून 'भारतीय' अशी समानतेची, जाज्वल्य राष्ट्राभिमानाची ओळख प्राप्त करून दिली. या देशातील प्रत्येक माणसांचे जाती व धर्माच्या आधारावर केलेले हजारो वर्षातील विभाजन 'संविधान' या नव्या प्रारुपात मोडकळीस आणले. जे बुद्ध धम्माशिवाय शक्य नव्हते. हेच बाबासाहेबांना सूचित करायचे असेल. पण आज त्यांच्या या संकल्पनेला तडा जातांना पाहून प्रत्येक मानवतावादी माणसाला वेदना होत आहेत.

आज भारतात बौद्ध धर्म असा उल्लेख आमची धार्मिक ओळख निर्माण करण्यासाठी करण्यात येत असला तरी धर्म आणि धम्म यातला फरक आम्ही ओळखला पाहिजे. बौद्ध धर्म हा आमचे संवैधानिक संघटन प्रदर्शित करण्यासाठी आहे. आमचे धार्मिक अस्तित्व मिळवून देण्यासाठी आहे. पण मुळात आमच्या जीवनप्रणालीत तो धर्म नसून धम्म आहे. बौद्ध धर्म ही आमची कायदेशीर ओळख आहे. तर धम्म ही आमची जीवनप्रणाली. दोन्ही एकदुस-याला पूरक आहेत. पण त्यामुळे धर्म आणि धम्म यात साम्यता वा साधर्म्य साधता येणार नाही. धर्म ही चौकटीबद्ध संहिता असते. ज्या चौकटीला तोडून बाहेर पडता येत नाही. मानवी विकासाची गुंफणही चौकटीतच केली जाते व त्यासाठी मानवी बुद्धी स्वातंत्र्यालाही कैद करून टाकले जाते. धम्म ही चौकटविरहित मानवी विकासाला पूरक अश्या परिस्थितीच्या निर्मितीसाठी नितीवादी स्वातंत्र्य बहाल करणारी जीवनप्रणाली आहे. जी बुद्धीवरील झापडे दूर करून कल्याणाचा मार्ग प्रदर्शित करते. ज्यामुळे धम्म ही एक संहिताच बनत नसून तो एक मानवी जीवनमार्ग बनतो.

आमच्या पराक्रमाची धार कमी झाल्यामुळे आम्ही धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी इतरांवर निर्भर राहायला लागलो आहोत का ? धम्म ही एक जीवनप्रणाली व जीवनमार्ग म्हणून आम्ही काही आदर्श निर्माण करू शकलो का ? बौद्ध धर्मीय म्हणून स्वाभिमानाने व्यवस्थेत शिरकाव करू शकलो का ? स्वतःची ओळख आम्ही स्वतः निर्माण करू शकलो का ? ज्याआधारे इतरांनी त्याचा आदर्श घेऊन आपल्यात समाविष्ट होण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वज्ञानी चेह-याला आम्ही कुरूप का बनविले ? का आम्ही लाचार झालोत की, कुणीतरी येईल आणि बुद्ध धम्मावर भरभरून बोलेल. स्वतःसोबत तो त्याच्या जातीच्या माणसांना घेऊन येईल. मग बौद्धांची संख्या वाढेल. आणि भारत बौद्धमय होईल. ही लाचारी आतातरी आम्ही फेकून दिली पाहिजे. अन्यथा यापुढेही माणसे येतील. धम्म स्वीकारण्याचा ढोंग करतील. राजकारणासाठी तुमचा वापर करून घेतील. आणि सत्ता मिळाली कि तुम्हाला लाथाडून देऊन पुन्हा ते दलित वा हिंदू म्हणूनच जगतील.

सावधान रहा ! जे धम्म स्वीकाराची घोषणा करतात त्यांच्यापासून ! ते धम्माचे राजकारण करतात. हे ओळखा ! आजपर्यंत धम्माचे राजकारण असेच केले गेले. यापुढेही असेल केले जाईल. आमची नालायकी जागतिक तत्वज्ञानाला बदनाम करीत आहे. याचा विचार आम्ही कधी तरी केला आहे का ? धम्माच्या होणा-या राजकारणापासून सावध होऊन स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करा ! धम्माचा जीवनमार्ग इतरांसाठी आदर्श असा जगून दाखवा ! तेव्हा इतरांना धम्मात येण्याची विनवणी करावी लागणार नाही. धम्माचे नैतिक आचरण इतरांना धम्माकडे आकर्षित करून घेईल. मग धम्मस्वीकाराच्या पोकळ घोषणा होणार नाहीत. प्रत्यक्ष धम्म प्रवर्तन घडून येतील. आणि बाजारभुंग्यांनी चालविलेले धम्माचे राजकारण मोडीत निघून भारत बौद्धमय बनेल.

"सम्यक जय भीम"
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.