Friday 28 December 2012

महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास




महारांचा आणि महार बटालियनचा शौर्य इतिहास
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१ 

कुठलीही तमा न बाळगता शत्रूंवर तुटून पडणारा...आपले साहस, शौर्य, प्रामाणिकपणा, धाडस आणि देशभक्तीने इतिहास गाजविणारा...युद्धकौशल्य आणि निडरता या अंगभूत गुणकौशल्याने ओतप्रोत भरलेला...स्वतःसोबत इतरांच्या सुरक्षेसाठी धडपडणारा...व्यवस्थेने उपेक्षित ठरवूनही सदैव लढवैय्या म्हणून जगलेला...चातुर्वर्ण्यांच्या विषारी अस्पृश्यतेच्या जखमा माथ्यावर कोरून समतेच्या प्रवाहाला गती देणारा...उथळ माथ्याने स्वाभिमानाने जगणारा...बाबासाहेबांच्या एका हाकेने लाचारीच्या चीरेबंदीला चिरून टाकणारा...भारतीय सैन्यात मानाचा तुरा रोवणारा...युद्धभूमीवर विजयाच्या पताका फडकाविणारा...बाबासाहेबांच्या भिमगर्जनेने विषमतेच्या विरुद्ध पेटून उठणारा...बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्धाच्या शांती, समता, बंधुता, प्रज्ञा, शिल, करुणेला प्राणापलीकडे जपणारा...भीमा कोरेगावच्या लढाईत ब्राम्हणशाहीचे प्रतिक पेशव्यांच्या हजारो सैनिकांचा निप्पात करणारा...१ जानेवारी १८१८ ला भीमा कोरेगाव च्या स्तंभावर जागतिक शौर्याचा इतिहास कोरणा-या महारांचा इतिहास अतिशय विलक्षण आहे. त्या महारांच्या विलक्षण शौर्य इतिहासाला शतशः नमन करणे इथल्या प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. आजही देशाची सुरक्षा करण्यात सदैव तत्पर असलेल्या त्या महार बटालियन च्या प्रत्येक शूर सैनिकाला इथला प्रत्येक देशवासीयांच्या माध्यमातून दिलेली ही सलामी...

१६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमधील शौर्य व धाडस पाहून सैन्यामध्ये महत्वाच्या स्थानावर त्यांना रुजू केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यापासून ख-या अर्थाने महार सैनिकाला ओळख प्राप्त झाली. शिवाजी महाराजांच्या सुरक्षेत, राज्य विस्तारात, राज्याच्या सुरक्षेत महार सैनिकांनी मोठी भूमिका बजावल्याचे इतिहासाच्या पानापानातून दिसून येते. शिवाजी महाराजांचे प्राण वाचविणारा 'जीवा' महाले इतिहासात प्रसिद्ध झाला. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण या सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देते. महार जात शूर, पराक्रमी, लढवैय्यी असतांनाही चातुर्वर्ण्यांच्या अतिशुद्र वर्गवारीत टाकण्यात आल्याने सदैव दुर्लक्षित केली गेली. परंतु याची तमा न बाळगता महारांनी सदैव आपल्यातील शौर्याच्या बळावर या देशावर अधिराज्य गाजविले आहे. शिवाजी महाराजानंतर अनेकांनी महार सैन्यांच्या बळावर युद्ध जिंकली आहेत.
१८ व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महारांमधील या पराक्रमाला लक्षात घेऊन सर्वप्रथम बॉम्बे रेजिमेंट महार बटालियन ची स्थापना करण्यात आली. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ ला पहिल्या महार रेजिमेंट च्या द्वितीय बटालियनच्या ५०० महार सैनिकांनी पेशव्यांच्या २० हजार घोड्स्वार आणि ८ हजार पायदळी सैनिकांना निकराची झुंज देऊन पेशवाईचा निप्पात केला. ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांच्या सैनिकांना नामोहरण करून आपल्या एकमेवाद्वितीय शौर्याचा इतिहास रचला. त्या इतिहासाची साक्ष आजही भीमा कोरेगाव चा विजय स्तंभ देतो आहे. तो विजय स्तंभ हा महारांच्या शौर्याचा प्रतिक आहे. आजही आंबेडकरी समाजाला तो विजय स्तंभ आपल्या पूर्वजांच्या शौर्य इतिहासाची जाणीव देऊन देशभक्तीसाठी प्रवृत्त करतो आहे.
 १८५८ च्या युद्धात २१ वी आणि २७ वी महार रेजिमेंट ची तुकडी प्राणपणाने लढली. १८९२ पर्यंत ब्रिटीश भारतात सैन्यामध्ये महार बटालियन आपले वेगळे महत्व टिकवून होती. परंतु १८९२ ला महार बटालियन संपुष्टात आणून सैन्य भरतीत नवीन धोरण ब्रिटीश सरकारने अंगिकारले. 'क्लास रेजिमेंट' नावाने सैन्यामध्ये नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात आली. प्राचीन महार रेजिमेंट च्या ऐवजी 'क्लास रेजिमेंट' ची १८८२ ला झालेली भरतीने महार सैन्यांना बेदखल करण्यात आले. १८८५ मध्ये तत्कलीन भारतीय सैन्याचे कमांडर-इन-चीफ जनरल लॉर्ड रॉबर्ट यांनी "मार्शल रेस' नावाची थेरी अंगीकारली. व त्या माध्यमातून भारतीय समाजातील जन्मजात आणि नैसर्गिक युद्ध कौशल्य असणा-या जाती जमातीच्या लोकांना सैन्यामध्ये भारती करण्यात आले. ज्यामुळे शेकडो वर्षे आपल्या साहस आणि धाडसाचे कौशल्य पणाला लावून सैन्याची धुरा वाहून नेली त्या महार बटालियन ला ब्रिटीश सैन्यातून बेदखल करण्यात आले. ज्यामुळे महार बटालियन च्या सैन्यात आणि महार समाजात ब्रिटीश सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला होता.
महार बटालियन बरखास्त करण्यात आल्यानंतर १८९४ मध्ये गोपाल बाबा वलंगकर यांनी ब्रिटीश सरकारला निवेदन केले. आणि त्या निवेदनात महार बटालियन ची पुन्हा निर्मिती करून महार सैनिकांना सैन्यात भरती करण्यात यावी अशी विनंती केली. १९०४ मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महार बटालियन च्या पुर्नगठनासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली. आणि ब्रिटीश सरकारने अंगिकारलेल्या तत्कालीन सैन्य भरती धोरणाचा विरोध केला. ज्या महार बटालियनच्या महार सैन्यांनी इतिहासात आपल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे पुरावे दिले त्याच महार बटालियनला बरखास्त करण्याचे सरकारचे धोरण एक न उलगडणारे कोडेच होते. कदाचित महार बटालियन बरखास्त करावी यासाठी बाह्य परिस्थितीचा दबाव आणला गेला असावा याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने महारांना अतिशुद्रचा दर्जा देऊन समाजव्यवस्थेतून बेदखल केले होते. त्याच महार समाजाने सैन्यामध्ये येउन पराक्रमाचे अनेक विक्रम गाजविणे म्हणजे चातुर्वर्णनाने स्वतःच्या बाजूला गोंजारत ठेवलेल्या क्षत्रियांचा आणि संपूर्णच जातिव्यवस्थेचा इतिहास अमान्य ठरविणे असेच होते. त्यामुळे महार बटालियन च्या बरखास्तीचा खरा इतिहास दडवून ठेवला गेल्याची पूर्ण शक्यता नाकारता येत नाही.
महार बटालियनच्या पराक्रमाची आणि शौर्याची उणीव ब्रिटीश सैन्याला जाणवणार हे सिद्धच होते. महार बटालियन सैन्यापासून फार काळ लांब ठेवता येणार नाही अशीच परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याची जी दारूण परिस्थिती उद्भवली हे लक्षात घेता पहिल्या महायुद्धाच्या परिस्थितीने ब्रिटीश सरकारला महार बटालियन सैन्यात पुन्हा निर्माण करणे भाग पडले. १९१७ ला पुन्हा १११ सैनिकांची महार बटालियनच्या सैन्यात भरती करण्यात आली. १९२० ला महार बटालियन ७१ व्या पंजाब रेजिमेंट मध्ये सामावून घेण्यात आली. व पुन्हा १९२१ ला महार बटालियन बरखास्त करण्यात आली. १८१८ च्या आधीचा एक काळ असा होता की ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाम्बे आर्मीमध्ये १/६ सदस्य हे महार बटालियनचे होते. परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महार बटालियनच्या संदर्भाने ब्रिटीश सरकारने वेळोवेळी घेतलेले निर्णय हे शंकेस पात्र ठरतात. कदाचित पडद्यामागील इतिहास लपवून ठेवण्यात आल्याने भारतातील प्रस्थापित जातीव्यवस्थेचे शिकार महार बटालियनला करण्यात आले असावे. अशी शंका घेण्यास वाव मिळतो. कदाचित महार बटालियनचा इतिहास दडवून ठेवण्यात आले हा सुद्धा एका षडयंत्राचाच भाग असावा. भीमा कोरेगाव चे स्तंभ विजयस्तंभ म्हणून ब्रिटिशांनी उभारले नसते तर महार बटालियन चा आज उपलब्ध असलेला इतिहासही पडद्याआड गेला असता हे तेवढेच सत्य वाटते.
जुलै १९४१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युव कॉन्सिलच्या डिफेन्स अड्व्हाय्झरी कमिटी वर नियुक्ती करण्यात आली. या पदाचा वापर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षापासून सैन्यातून बरखास्त करण्यात आलेली महार बटालियन / रेजिमेंट सैन्यात पुन्हा स्थापन करण्यात यावी यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नांना यश आले. १ आक्टोम्बर १९४१ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या Frontier Force Rifles च्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियन ची स्थापना बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियन ची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टीनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली. त्यावेळेस महार रेजिमेंट च्या टोपीवरील बिल्ल्यावर भीमा कोरेगाव चे पिल्लर असणारे चिन्ह व त्यावर "World Mahar" कोरण्यात आले. हे चिन्ह दुस-या महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी तयार केले होते. जे प्रत्येक महार बटालियनच्या सैनिकांच्या डोक्यावर पराक्रमी विजय चिन्ह म्हणून शोभून दिसत होते.
तिसरी महार रेजिमेंट बटालियन बेळगाव, कर्नाटक येथेच १९४२ ला लेफ्टीनंट जनरल कर्नल कम्बिएर आणि मेजर सरदार बहादूर लाडकोजीराव भोसले यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आली. द्वितीय महायुद्धाच्या वेळी पहिली व तिसरी महार रेजिमेंट North-West Frontier Province च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली. तर दुसरी आणि २५ वी बटालियन देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. द्वितीय महायुद्धाच्या काळात महार बटालियन बर्मा campaign मध्ये ब्रिटीशांच्या बाजूने प्राणपणाने लढली. जी मोहीम अतिशय धोकादायक आणि शौर्य पणाला लावून लढायची होती त्या मोहिमेत महार बटालियन चा वापर केला गेला. यावरून सैन्यातील महार बटालियन चे महत्व लक्षात घेण्यासारखे आहे. या मोहिमेत ५ महार बटालियनचे सैनिक शहीद झाले. व त्याच बटालियन च्या एका ऑफिसर ला त्याच्या शौर्यासाठी गौरविण्यात सुद्धा आले होते.
१ ऑक्टोबर १९४६ ला महार रेजिमेंट मशीनगन रेजिमेंट म्हणून नावारूपास आली. 'महार रेजिमेंट' चे 'महार मशीनगन रेजिमेंट' असे नवीन नाव देण्यात आले. 'महार मशीनगन रेजिमेंट' चे केंद्र कामठी, नागपूर येथेच स्थापन करण्यात आले. मात्र यावेळी 'महार रेजिमेंट' च्या टोपीवरील बिल्ल्यावरील चिन्हात बदल करण्यात आले. बदललेल्या चिन्हात भीमा कोरेगावच्या स्तंभावर Cross Wicker मशीनगन चे चिन्ह कोरण्यात आले.  'महार मशीनगन रेजिमेंट'च्या ३ बटालियननी पंजाब च्या सीमावर्ती प्रदेशात पंजाब सीमा सैनिक दलात काम केले. १९४७ ला भारताच्या फाळणीच्या वेळी संरक्षण शरणार्थी म्हणूनही  'महार मशीनगन रेजिमेंट' बटालियनने काम केले. पंजाब प्रांतात सीमा सुरक्षा दल म्हणून काम करतांना 'महार मशीनगन रेजिमेंट' ने आपले शौर्य पणाला लावून हरयाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक गावांना सुरक्षा प्रदान केली होती. महार रेजिमेंट / बटालियन पासून तर  'महार मशीनगन रेजिमेंट' पर्यंतचा हा प्रवास अनेक शौर्य इतिहासांना प्रस्थापित करून गेला. परंतु त्याची नोंद भारतीय जातीय मानसिकतेतून लिहिल्या गेलेल्या इतिहासाने कधी घेतली नाही हेच दिसून येते.
महार बटालियन मधील १, २, ३, ७, ८ आणि १३ या बटालियन या पूर्णपणे महार बटालियन होत्या. ज्यात प्रामुख्याने महार सैनिकांचा समावेश होता. ४, ५ आणि ६ या तीन बटालियन तुकड्यांनी सीमा सुरक्षा दल म्हणून काम केले. ज्या तीन तुकड्या पंजाब प्रांतात सीमावर्ती प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. महार बटालियन च्या १६ व्या तुकडीला ८ व्या पराशुट बटालियन मध्ये बदलण्यात आले होते. व १९८१ ला हीच बटालियन यांत्रिक पायदळाच्या १२ व्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. महार बटालियन चे शौर्य सैन्याच्या प्रत्येक विभागात आपे पराक्रम गाजवून गेले. ज्यामुळे महार बटालियन ला ब्रिटीशकालीन भारतीय सैन्यातच नव्हे तर स्वतंत्र भारताच्या सैनिक दलामध्येसुद्धा मानाने-सन्मानाने गौरविण्यात आले. आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मान पातळीवर नेउन पोहचविले. जाज्वल्य देशभक्ती आणि देशाचे संरक्षण यात महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार समाजात जन्म घेणा-या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेल्या इतिहासाचा गर्व आहे. आणि तो असायलाच पाहिजे. अश्या शूर, पराक्रमी आणि लढवैय्या पूर्वजांचे वारस म्हणून महार समाजाने अभिमान बाळगला तर त्यात काहीही गैर ठरणारे नाही.
महार बटालियनने स्वातंत्र्यपूर्व काळातच आपले शौर्य गाजविलेले नसून स्वतंत्र भारतातही महार बटालियनच्या शौर्याचा इतिहास दिसून येतो. महार सैन्यांनी आणि महार बटालियनने कांगो आणि सोमालियाच्या मोहिमेमध्ये सुद्धा पराक्रम गाजविलेले आहेत. इतकेच नव्हे तर पोलो, पवन, मेघदूत आणि विजय या मोहिमेवरही महार सैन्याचे व महार बटालियनचे मोठे योगदान राहिलेले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होण्यास असमर्थता दर्शविली होती. जी अखंड भारताच्या दृष्टीने आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक होती. त्यात हैद्राबाद येथील संस्थानाचा उल्लेख करावा लागेल. त्यावेळेस सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थानाचे निजाम / प्रमुख उस्मान अली खान आणि आसिफ झा VII यांच्या विरोधात Hydrabad Police-Military Operation भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आले होते. ज्या मोहिमेचे Code नाव 'POLO' असे ठेवण्यात आले होते. या पोलो मोहिमेमध्ये सुद्धा महार सैनिकांनी आणि महार बटालियननी पराक्रम दाखविल्याचा इतिहास आहे.
१९८७ ला दक्षिण भारतात LTTE लिट्टे या संघटनेविरुद्ध भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या "Operation पवन" या मोहिमेत महार बटालियन ने महत्वाची भूमिका बजावली होती. १३ एप्रिल १९८४ ला काश्मीर मधील सियाचीन संघर्षात भारत सरकारने राबविलेल्या 'Operation मेघदूत' या मोहिमेतही महार बटालियन आणि महार सैनिकांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आणि सरतेशेवटी १९९९ ला झालेल्या भारत पाकीस्थान यांच्यातील कारगील युद्धामध्येसुद्धा महार बटालियन पराक्रम गाजवून गेली आहे. म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही देशाच्या संरक्षणासाठी महार बटालियन आणि महार सैनिक सदैव समोर राहिलेले दिसून येतात. अतिशय अल्प पुराव्यांच्या आधारावर मिळालेला हा महार बटालियन आणि महार सैनिकांच्या योगदानाचा इतिहास इतका जाज्वल्य आहे की प्रत्येक भारतीयात महार सैनिकात असलेले धाडस आणि साहस निर्माण झाले. तर या देशावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. इतकेच काय तर देशांतर्गत चालना-या आतंकवादी कारवाया संपुष्टात आणता येईल. गरज आहे ती महार बटालियन च्या सैन्याकडून प्रेरणा घेण्याची...
असे म्हटले जाते की अंगभूत नैसर्गिक गुण हे त्या व्यक्तीला, समाजाला त्यांच्या पूर्वजांकडून लाभलेले असते. इथल्या महारांना आणि महार समाजाला त्यांच्या पराक्रमी आणि साहसी पूर्वजांचे नैसर्गिक गुण लाभलेले आहेत. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या रूपाने त्याचे प्रात्यक्षिक या देशाने अनुभवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरही वेळोवेळी देशहीतासाठी या समाजाने घेतलेली भूमिका हे त्यांच्या पूर्वजांच्या इतिहासाला पुनरुज्जीवित करणारी ठरली आहे. परंतु पूर्वजांच्या शौर्य आणि पराक्रमी इतिहासाचे जप करीत बसण्यापेक्षा त्या इतिहासाला भविष्यकाळात टिकवून ठेवण्याची जबाबदारी इथल्या महारांची किंवा धर्मांतरित झालेल्या आधुनिक बौद्ध समाजाची आहे. इथल्या प्रतीक्रांतीवाद्यांना महारांच्या इतिहासाला पुसू न देता तो इतिहास जिवंत ठेऊन पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढ्यांची असणार आहे. हे लक्षात असू द्या... तेव्हाच या समाजाला आपल्या पूर्वजांच्या पावलांवर पाऊल ठेवून नव इतिहासाची निर्मिती करता येईल...  

**************************
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर... ९२२६७३४०९१