Wednesday 28 November 2012

सूर्यमालिकेतील निखळ तारा सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर




सूर्यमालिकेतील निखळ तारा सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर
....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१
*************

दिनांक १२-१२-१९१२ ला बाबासाहेब नावाच्या महासुर्य आणि रमाई नावाच्या त्यागमुर्तीच्या पोटी जन्माला आलेले भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर...बाबासाहेबांच्या अपेक्ष्यांच्या भाराने दबून राहिलेले...परीस्थितीतीने दिलेल्या चटक्यांनी जीवघेण्या आजाराशी अहोरात्र लढणारे...बापाचे महापुरुषत्व पेलतांना स्वतःमधल्या सामान्यत्वाला बळी पडलेले...बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर स्वतःसोबत संपूर्ण परिवाराला समाजासाठी, धम्मकार्यासाठी  झोकून देणारे...पण सदैव समाजातून दुर्लक्षित झालेले...त्यागाचा बळी ठरलेले...महापुरुषाचा वारसा लाभला असतांना उपेक्षिताचे जीवन जगणारे...समाजाच्या रोषाचे बळी ठरलेले भैय्यासाहेब आंबेडकर सूर्यमालिकेत चमकूनही काळाच्या पडद्याआड लुप्त झालेला निखळ तारा म्हणून फार कमी लोकांनी ओळखला...त्यांचा जन्मशताब्दी वर्ष १२-१२-२०१२ भारतीय बौद्ध महासभा ( दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ) च्या वतीने साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने भैय्यासाहेबांच्या जीवनाला, त्यांच्या कर्तुत्वाला, नेतृत्वाला आणि व्यक्तिमत्वाला समर्पित केलेली ही आदरांजली...

महापुरुषाच्या पोटी जन्म घेऊन स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किती कठोर परिस्थितीचा सामना करावा लागतो. याचा प्रत्यय भैय्यासाहेब आंबेडकरांना निश्चितच आला होता. नव्हे संपूर्ण आयुष्यात ते ओझे घेऊन जगावे लागले असावे. जगाने ज्या महानावाच्या क्रांतीचा, विचारांचा आणि बुद्धीचा गौरव केला तो महामानव व्यक्तिमत्वाच्या पडताळणीचा आधार बनत असेल. अश्या परिस्थितीत स्वतंत्र व्यक्तिमत्व कसे उभारायचे. याचे दडपण निश्चितच भैय्यासाहेबांना होते. मोठ्या वृक्षाखाली पालव्या कोमेजून जातात तशीच परिस्थिती भैय्यासाहेबांवर ओढवली असेल. हे समजून घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून किती दडपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला. याचा विचार करून भैय्यासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितले गेले नाही. हीच खरी शोकांतिका ठरली. याच गृहीतकांवर आधारित भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू सापडू शकतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते. सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तीमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडतांना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्ये निर्माण होत गेली. त्यांचा स्वभाव तापट होता. पण तितकाच तो मृदूही होता. निश्चितच बाबासाहेबांना आपल्या मुलाकडूनही काही अपेक्षा होत्या. त्या लादलेल्या नसल्या तरी व्यावहारिकतेच्या परिपेक्षात परीस्थितीतीय बदलाच्या होत्या. या अपेक्षांच्या दडपणामुळे बाबासाहेबांच्या तापटपणाचा सामना भैय्यासाहेबांना करावा लागला असेल हे निश्चितच. त्यामुळे भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वावर त्याचाही प्रभाव जाणवायचा. भैय्यासाहेब कधीही प्रखर नव्हते. भैय्यासाहेबांचा स्वभाव शांत होता. शिवाय शारीरिक व्याधीमुळेसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता. संधिवाताचा सामना करतांना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही. परंतु काही समाजकंठकांनी त्यांच्या या आजाराचे भांडवल करून भैय्यासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांनी बाबासाहेबांच्या परिवाराची केलेली ही प्रताडना आहे. बाबासाहेबांनी या समाजासाठी आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड अश्याप्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराची (मुलाची) प्रताडना करून जर आम्ही करीत असू तर आम्हाला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार राहतो का ? 

हजारो शोषित-पिडीत-मागास वर्गाच्या उत्थानासाठी जगतांना बाबासाहेबांनी कधी मुलांच्या आजाराकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी समाजासाठी दिलेल्या या बलिदानाचे बळी त्यांची इतर मुलेही ठरली. भैय्यासाहेब हे बाबासाहेबांचे एकमेव वारस होते जे जगले. हे दडपण पेलून धरतांना भैय्यासाहेबांनी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण केले. कदाचित ते असामान्य नसेलही परंतु शांत, चिंतनशील, सहनशील, वैचारिक असे गुणवैशिष्ट्य त्यांच्या व्यक्तीमत्वात निश्चितच होते. बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पडतांना त्यांच्या शांत व्यक्तिमत्वाचा निश्चितच लाभ झाला. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचा त्यांच्या कार्यकाळात अनेक राज्यांमध्ये व्याप वाढू लागला.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून अनेकांनी बाबासाहेबांचे भांडवल केलेले आहे. बाबासाहेबांचे भांडवल करून अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला आहे. बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून लोकसभा, राज्यसभा सदस्य ते मुख्यमंत्री पदापर्यंत काहींनी मजल मारली आहे. अश्या सर्व परिस्थितीत भैय्यासाहेब आंबेडकर हे तर बाबासाहेबांचे एकमेव वारस होते. त्यांनी म्हटले असते तर ही सर्व पदे सर्वात आधी त्यांच्याकडे धावून आली असती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगप्रसिद्ध महामानवाचा वारस म्हणून भैय्यासाहेबांना पाहिजे ते यश सहज मिळविता आले असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे भांडवल करून त्यांना व्यक्तिगत स्वार्थ साधता आला असता. परंतु त्यांनी याचा साधा गर्व सुद्धा कधी बाळगला नाही. ज्या काळात बाबासाहेब करोडो माणसांचे हृदयसम्राट होते. त्या काळात त्यांचे वारस भैय्यासाहेब हे अतिशय सामान्य जीवन जगले. यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या महानतेची दुसरी पावती देण्याची गरज भासत नाही.

राजकीय स्वार्थ, राजकीय पद, सत्ता या सर्वाचा त्याग करण्याची प्रवृत्ती आजपर्यंत कुणामध्ये दिसून आली नाही. संधी मिळाली तर प्रत्येकच माणूस यासाठी नको ते प्रकार / नको तो व्यवहार / नको ती पातळी गाठायला तयार असतो. परंतु बाबासाहेबांच्या महापरीनिर्वानानंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी यासाठी कधी हट्ट धरला नाही. किंवा कुठलेही पद घेतले नाही. बाबासाहेबांचा राजकीय वारस म्हणून स्वतःला कधी समोर केले नाही. सदैव इतरांना पुढे करून त्यांना समर्थन देऊन स्वतः मात्र आयुष्यभर धम्माचे काम करीत राहिले. धम्म कार्यात स्वतःला वाहून घेतले. आजच्या आधुनिक पिढीला आणि जे स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवून घेतात त्यांच्यासाठी भैय्यासाहेबांचे व्यक्तिमत्व आदर्श ठरावे असेच होते.

स्वातंत्र्याच्या उद्घोषात मिळालेले राजकीय स्वातंत्र्य व राजकीय पदे भूषविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणा-यांच्या पिढीत भैय्यासाहेब धम्मासाठी काम करतात.  आणि राजकीय भूमिका घेण्याची जबाबदारी दादासाहेब गायकवाडांसारख्या माणसांवर सोडून देतात. यापेक्षा मोठा त्याग बाबासाहेबानंतर या समाजात इतर कुठल्याही नेत्याने केलेला नाही. बाबासाहेबांनी पाहिलेले भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व त्यासाठी धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भैय्यासाहेबांनी स्वतःला झोकून दिले. त्याचाच परिणाम आहे कि आज भारतीय बौद्ध महासभा देशातल्या २२ राज्यांमध्ये अस्तित्व टिकवून आहे.

भैय्यासाहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला. धम्मकार्य केले तरीही काहींनी त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही. ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळविता आले नसले, तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली आहे. ती भैय्यासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांचाच परिपाक आहे. हे निश्चितच म्हणावे लागेल. समाज भैय्यासाहेबांना बदनाम करणा-यांना बळी पडला. आणि त्यामुळे भैय्यासाहेबांना धम्मकार्यात अपेक्षित सहकार्य केले गेले नाही. तरीही भैय्यासाहेबांनी धम्माचा किल्ला एकहाती लढला. कुठल्याही स्वार्थाविना. भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांना दिलेली हि खरी आदरांजलीच होती. बाबासाहेबांनी समाजासाठी केलेल्या पारिवारिक त्यागाचा वारसा भैय्यासाहेबांनी जिवंत ठेवला. हे मोठे ऋण बौद्ध व आंबेडकरी समाजाला फेडता येणे शक्य नाही.

भैय्यासाहेब दादासाहेब गायकवाडांच्या खांद्याला खांदा लावून सदैव त्यांच्या पाठीशी राहिले. १९६२ ला भैय्यासाहेबांचा ५० वा वाढदिवस साजरा केला गेला होता. तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ दादासाहेब गायकवाडांनी काढलेले गौरवोद्गार अतिशय बोलके आहे. दादासाहेब गायकवाड म्हणाले होते, " भैय्यासाहेब माझ्यासारख्या आंधळ्यांची काठी आहेत ". डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैय्यासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले. चळवळीत इतरांना सहकार्य केले. चळवळीला दिशा देण्याचे काम केले. पण कधीही स्वतःचे नेतृत्व समाजावर लादले नाही. नेतृत्व संघर्षापासून सदैव स्वतःला अलिप्त ठेवले. आधुनिक काळात नेतृत्व स्पर्धेत उतरलेल्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे.

तत्कालीन समाजात भैय्यासाहेबांना सन्मान होता. याचा प्रत्यय दलित पँथर च्या काळात मुंबईतील एका महारवाड्यात आला होता. त्या ठिकाणी कुठल्याही आंबेडकरी नेत्यांना येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दलित पँथरच्या नेत्यांनाही मज्जाव करण्यात आला होता. संपूर्ण समाज अन्याय व दहशतीत जगत होता. अश्या परिस्थितीत फक्त भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्या इलाख्यात जाण्याची तयारी दर्शविली. अनेकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भैय्यासाहेब आपल्या निर्णयावर खंबीर राहून त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या ठिकाणी आंबेडकरी नेत्यांना आणि दलित पँथरच्या नेत्यांना मज्जाव केला गेला होता. त्या ठिकाणी भैय्यासाहेबांना विरोध करण्यासाठी कुणीही समोर आले नाही. हा संदर्भ ज. वि. पवार यांनी लिहिलेल्या आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ खंड - ४ यात सापडतो.  यावरून भैय्यासाहेबांचे खंबीर व्यक्तिमत्व आणि परिस्थितीला हाताळून नेण्याचे मनोधैर्य या त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुणांचेही दर्शन होते.

सदैव सामान्य माणसाचे जीवन जगणारे भैय्यासाहेब शेवटपर्यंत सामान्य माणूस म्हणूनच जगले. भैय्यासाहेब अहंकारशून्य, गर्व नसलेले, मदतीला धावून जाणारे, चळवळीत काम करणा-यांचे मनोधैर्य वाढविणारे होते. धम्मकार्यात मग्न असणारे भैय्यासाहेब बाबासाहेबांनी दिलेल्या वारस्यात नाही तर बाबासाहेबांनी दिलेल्या संदेश वहनातच संदेशवाहक म्हणून जगले. धम्माचे प्रचारक म्हणून जगले. त्यांच्या हयातीतच अनेकांनी त्यांच्या विषयी समाजात पेरून ठेवलेले बदनामीचे विष पचवून ते जगले. कधीही त्यांनी कुणावर टीका केली असेल असे ऐकिवात नाही. आपल्या शत्रूंनाही त्यांनी आपल्या धम्मकार्यातून चोख प्रत्युत्तर दिले. त्यांच्यावर होणा-या टीकेकडे दुर्लक्ष करून धम्माचा प्रचार व प्रसार केला. व्यक्तिमत्वाचा प्रचारकी व बडेजाव आणणारा थाट त्यांनी कधी बाळगला नाही. त्यांच्या टीकाकारांना त्यांनी कधीही उत्तरे देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचे टीकाकारही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चाहते व्हावे. असेच व्यक्तिमत्व घेऊन भैय्यासाहेब जगले.

बाबासाहेबांच्या पश्चात बाबासाहेबांच्या परिवाराकडे ज्या समाजासाठी बाबासाहेबांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्याच समाजाने दुर्लक्ष केले. कुठल्या न कुठल्या प्रकारे बाबासाहेबांच्या परिवाराला बदनाम करण्यातच काहींनी आपले आयुष्य घालविले. भैय्यासाहेबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न विविध पातळ्यांवर झाला. खास करून १९८० नंतर बीएसपी आणि बामसेफ सारख्या संघटनांनी तर बाबासाहेबांच्या परिवाराला आणि त्या परिवारातील प्रत्येक सदस्याने या समाजाला दिलेल्या योगदानाला झाकून टाकण्यासाठी प्रतीक्रांतीवादी शक्तींशी हातमिळवणी करून बदनामी केली. त्यामुळे समाजातल्या सर्वसामान्य माणसांना बाबासाहेबानंतर त्यांच्या परिवाराने या समाजाला दिलेल्या योगदानाची माहितीच मिळू शकली नाही. आणि ज्यांनी या परिवाराला बदनाम केले त्यांनी मात्र प्रतीक्रांतीवादी शक्तींशी हातमिळवणी करून मुख्यमंत्री ते राज्यपाल पदापर्यंत मजल मारली.

भैय्यासाहेब आंबेडकर हे बाबासाहेबानंतरचे एकमेव नेते होते, जे समाजासाठी व धम्मकार्यासाठी जगले. ज्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच बघितला नाही. राजकीय लालसा कधी बाळगली नाही. सत्तेच्या मोहजाळातून अलिप्त राहिले. टीकाकारांना उत्तरे न देता शांत राहून अप्रत्यक्ष उत्तरे देत राहिले. कुणाच्याही विरुद्ध भूमिका न घेता, कुणावर टीका करीत न बसता भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माची जबाबदारी पार पाडत राहिले. भैय्यासाहेबांनी स्वतःसोबत मीराताई आंबेडकरांनाही धम्मकार्यात वाहून घेतले. इतकेच नाही तर भैय्यासाहेबांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणून आजही त्यांची मुले बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर व आनंदराज आंबेडकर स्वतःच्या कर्तुत्वाने या समाजात स्वतःचे स्थान निर्माण करीत आहेत. पण कधीही त्यांनी बाबासाहेबांचे वारस म्हणून संपूर्ण समाजाचे आम्हीच नेते असा आव आणला नाही. हा भैय्यासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलांवर केलेल्या संस्काराचाच परिणाम म्हणावा लागेल. भैय्यासाहेबांचे या समाजासाठी, आंबेडकरी चळवळीसाठी त्यागाचे हे प्रतिक आहे.

आधुनिक पिढीला, आधुनिक आंबेडकरी चळवळीत काम करणा-या कार्यकर्त्यांना, समाजाची धुरा पेलून धरण्याची इच्छा असलेल्या समाज सुधारकांना, राजकीय नेतृत्व मिळविण्याची घाई झालेल्या नेत्यांना, आंबेडकरी चळवळीचे ऋण फेडू पाहणा-या अनुयायांना, आंबेडकरी समाजाला आणि या जगात बौद्ध म्हणवून घेणा-या प्रत्येकच माणसाला भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांच्या त्यागाचा, व्यक्तिमत्वाचा व त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा लागेल. आंबेडकरी चळवळ राजकीय स्वार्थाने सत्तालोलुप बंधनात अडकली असतांना भैय्यासाहेबांचा आदर्श समाजासमोर निर्माण करणे आज काळाची गरज आहे. नव्हे ती आंबेडकरी चळवळीचीच गरज आहे.

भैय्यासाहेबांसारखे नेतृत्व पुन्हा या चळवळीला लाभणार नाही. भैय्यासाहेब हे या चळवळीसाठी आदर्श म्हणून जगले होते. आणि यानंतरच्या पिढीसाठीही आदर्श राहतील. बदनामीचे कितीही मोठे वादळ भैय्यासाहेबांच्या व्यक्तीमत्वाभोवती उभे केले गेले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची ते कमी करू शकणार नाही. आमच्यासारखे आंबेडकरी चळवळीचा निस्वार्थ व डोळस अभ्यास करणारे कार्यकर्ते सदैव भैय्यासाहेबांचे ऋणी राहतील. व त्यांच्या व्यक्तिमत्वातील उंचीला ढासळू देणार नाही. आंबेडकरी चळवळीत डॉ. बाबासाहेबांच्या पोटी जन्मलेल्या सुर्यपुत्राचा, धीरगंभीर व्यक्तिमत्वाचा, प्रत्यक्ष त्यागमूर्तीचा, आदर्श अश्या सामान्य कार्यकर्त्याचा, आदर्श धम्म संदेशवाहकाचा हा समाज, ही चळवळ सदैव ऋणी राहील. आज १२-१२-२०१२ ला भैय्यासाहेब नावाच्या त्यागमूर्तीच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचा आदर्श समाजाने घेतला तर ख-या अर्थाने ती त्यांच्या कार्याला, व्यक्तिमत्वाला अर्पण केलेली आदरांजली ठरेल.

भैय्यासाहेब...
तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यागाचा वारसा लाभलेली 
"लोखंडाचे चणे चावणारी आंबेडकरी चळवळ" उभारायला आम्ही निघालो आहोत.
भैय्यासाहेब...
फेकलेल्या तुकड्यातून उभारलेल्या राजकीय महालाचा निरोप घेऊन
आम्ही निघालो आहोत विजयस्तंभाच्या शिळेवर माथा टेकून
प्रतीक्रांतीवाद्यांचा बुरुज उध्वस्त करायला.
भैय्यासाहेब...
धम्म प्रचार आणि प्रसाराचा तुम्ही घालून दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन 
धम्माच्या रोपट्याचा बोधिवृक्ष करायचा भारतीय बौद्ध महासभा निर्धार करीत आहे.
भैय्यासाहेब...
आता तुमचा प्रत्येक शिलेदार  इथे उभा झाला आहे 
रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्टांची पूर्ती करणे
हा एकमेव जाहीरनामा घेऊन...

....डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१

********************

8 comments:

  1. Great information about Bhayyasaheb Ambedkar... thanks sandeeep ji.

    ReplyDelete
  2. जयभीम, डॉ संदीप जी
    त्यागमूर्ती भैय्यासाहेब आंबेडकर यांचा निस्वार्थी असा जीवन परिचय, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाच्या विकासाच्या प्रती कार्य करीत असताना त्यांच्यावर विरोधकांचे झालेला आघात, बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या ध्येयपूर्तीच्या कार्यासाठी अडथळा ठरू नये म्हणून राजकारणात सहभागी न होता धम्माचे कार्य अविरत पणे संपूर्ण देशांत भारतीय बौद्ध महासभेचे जाळे निर्माण करणे, आपला आंबेडकरी वारसा पुढील पिढीने ही जपावा त्याकरिता आपल्या मुलांवरील संस्कार या सर्व आणि इतर घटनांचे जे अभ्यासपूर्ण लेखन आपण केले आहे ते खरोखरच प्रशंसनीय आहे. धन्यवाद !!!

    ReplyDelete
  3. jay bhim sir,apratim lekh aahe. nahi tar ya samajane suryaputrala nehmich badnam kele aahe. adhik dhanyevad.

    ReplyDelete
  4. Better Best Information.Salut Sandip Sir

    ReplyDelete
  5. भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यस्तुपाचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक,सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याचे यथार्थ लेखन. खूप छान. भैय्यासाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम

    ReplyDelete