Saturday 18 April 2020

बाबासाहेब* : *एक दगड माराच

*बाबासाहेब* : *एक दगड माराच*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर



बाबासाहेब... अहो बाबासाहेब...
एक दगड उचला हातात
आणि फेकून मारा ...
होssss....
तुम्ही बरोबर च ऐकलं...
एक दगड फेकूनच मारा आमच्यावर...

तुम्हाला सांगतो !
कुणीच तक्रार करणार नाही तुमच्या विरोधात...
उलट तुम्हालाच म्हणतीलsss...
आम्ही चुकलो... आम्हाला माफ करा...
आणखी एक दगड उचला आणि घाला आमच्या डोक्यात...
पण बाबासाहेब आमच्यावर नाराज होऊ नका !

बाबासाहेब तुमच्या दगडानी झालेली जखम भरेपर्यंत शांत बसतील...
आणि परत हातात तुमचा फोटो घेऊन...
तर कधी तोंडाने जय भीम चा नारा देऊन...
परत निघतील तोच पुर्ववत बाजार मांडायला ...
जोपर्यंत तुमचा दुसरा दगड डोकं फोडत नाही तोपर्यंत...

बाबासाहेब...
तुम्ही फेकून मारलेला दगड चुकून मोदींना लागला... तर
मोदीजी तुम्हाला साष्टांग दंडवत घालून...
'मन की बात' च्या स्टुडिओत शिरतील... आणि लगेच...
"मित्रोंहsss ! मुझे बडे अफसोस के साथ कहना पड रहा है ! की...
डॉ. भिमराव आंबेडकर जी के सपनों का भारत बनाने में...
हम पिछले ६० सालों में असफल रहे है !...
लेकिन मैं उसे जल्द से जल्द पुरा करने की कोशिश करूंगा !
हमारी सरकार जल्द ही बाबासाहाब डॉ. भिमराव आंबेडकर जी के सपनो को पुरा करेगी !"
तिकडे संसद वाऱ्यावर... संसदेतील चर्चा वाऱ्यावर...
सरकारने घेतलेल्या संसदेबाहेरील निर्णयाचे संसदेच्या पटलावरील निवेदन वाऱ्यावर...
सारेच सांसदीय व्यवस्थेचे मुल्य वाऱ्यावर सोडून...
बाबासाहेब...
तुम्ही पाहीलेले भारताचे स्वप्न...
'मन की बात' मधून धुळीस मिळतांना दिसतील...
पण बाबासाहेब...
तूमचे स्वप्न तोडतांना नावही तुमचेच घेतील...

बाबासाहेब...
तुमचा फेकून मारलेला दगड...
जर मोहन भागवतांना लागला... तर
मोहन भागवत ही तुमच्या पाया पडून घेतील...
आणि गर्वाने सांगतील...
बाबासाहेब... संघाचा प्रत्येक स्वयंसेवक...
प्रांतकालीन आणि सायंकालीन संघशिक्षा वर्गात,
तुमचे स्मरण करून, तुम्हाला नतमस्तक होतो...
आज प्रत्येक स्वयंसेवक हिंदूला तुमची महती पटली आहे...
बाबासाहेब...
तुम्ही आज आरएसएसवादी हिंदुंचे गर्व आणि अभिमान बनला आहात...
बघितलं बाबासाहेब...
तुम्ही मारलेल्या दगडाचा परिणाम...
बाबासाहेब... तुम्ही फक्त काही क्षणांसाठी डोळे बंद करा..
भगवाधारी टोळके... "बन के रहेगा हिंदुस्थान..."
चे नारे लावीत जातीय आणि धार्मिक दंगली उफाळलेल्या दिसतील...
बाबासाहेब... हाच आहे तुमचा संघीय सन्मान...

बाबासाहेब...
तुम्ही फेकून मारलेला दगड सोनिया गांधीजींना जरी लागला...
तरी... त्या म्हणतील...
बाबासाहेब... असाच एक एक दगड...
हाणा... या प्रत्येक कॉंग्रेसी नेत्यांच्या डोक्यात...
कित्येक दगडं तुम्ही नेहरूजींच्या, गांधीजींच्या डोक्यात हाणले होते...
तरीही त्यांनी कायम तुमचा सन्मानच केला...
इतकेच काय ! तर तुमच्याशिवाय...
या देशाचे संविधान देखील बनू दिले नाही...
आणि कायम तुम्हाला संसदेच्या पटलावर ठेवले...
बाबासाहेब...तुमच्या पश्च्यात...
तुमच्या अनुयायांनी व नेत्यांनी देखील...
आमच्यासोबत राहून... कायम आम्हाला सत्तेत बसविले...
पण हे कॉग्रेसी नेते कायम...
तुम्ही दिलेला संदेश व धोके विसरत आले...
अन् घालवून बसले सत्ता...
हिंदुत्ववादी, मनुवाद्यांच्या हातात...
आता तुम्हीच यांचे डोके फोडून...
डोके ठिकाणावर आणा बाबासाहेब...
बाबासाहेबsss...
बघितले का कॉंग्रेसजनांचे तुमच्याप्रती असलेले निर्मळ...
आणि तितकेच निर्लाज्य प्रेम...

बाबासाहेब...
आता अशी दगडं भिरकावून मारा...की
इथल्या प्रत्येक दलित नेता डोकं फुटून रक्तबंबाळ झाला पाहिजे...
जे तुमचे अनुयायी, विचार वारस, घराणं वारस सांगून...
बेगडीचे, ठीगळीचे, दमडीचे राजकारण करतात...
तुम्हाला सांगतो बाबासाहेब...
हे लोटांगण घालीत तुमच्याजवळ येतील...
अन् सांडलेल्या रक्तातून बाबासाहेब कसे कणाकणातून सांगताहेत...
हे दाखवण्याचा प्रयत्न करतील...
आमचे हृदयही एकदा चिरूनच बघा बाबासाहेब...
म्हणून तुम्हाला विनवण्या करतील...
हृदयात यांच्या यांचे हृदय नसून...
खुद्द बाबासाहेब... तुम्हीच हृदय बनून धडकता...
बाबासाहेब... तुम्ही यांचे लोटांगण, रक्त, हृदय बघून
गदगदीत झाले असाल...
आता पलटून यांच्या पाठीमागे डोकावून बघा !
कुणाच्या पाठीवर कॉंग्रेस चा...
कुणाच्या पाठीवर भाजपा चा...
तर कुणाच्या पाठीवर निव्वळच स्वाभिमानाचा...
शिक्का कोरलेला दिसेल...
इतकेच नाही हो बाबासाहेब...
काहींच्या पाठीवर काहीच दिसणार नाही...अगदी कोऱ्या..
माहितेय यांच्या पाठा कोऱ्या का आहेत...
बाबासाहेब...त्या कोऱ्या इतक्यासाठीच की,
वेळप्रसंगी कुणाचाही तात्पुरता शिक्का पाठीवर मारून फिरता यावे म्हणून...
बाबासाहेब... एवढेच काय...
तर काहींचा आर एस एस, मनुवादी, पेशवाई सरकार विरोधाच्या आड...
"संविधान धोक्यात आहे!"...
हा भावनिक धंदा जोरात चाललाय बरं का !
परंतु बाबासाहेब...
संसदेत, विधिमंडळात जाऊन, किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्हे बरं का !
हे सर्व चाललेय फक्त बाहेरूनच...
बघा बाबासाहेब...
किती महान नेते आहेत आपले...
तुमच्यापेक्षाही धुरंदर...
तुम्हाला करता आले असते का मनुवादी व्यवस्थेला हद्दपार...
संसदेच्या बाहेर राहून...
तुम्हाला स्थापन करता आली असती का समता, न्याय, बंधूता...
घटनासमितीच्या बाहेर राहून...
बाबासाहेब...
जे तुम्हाला जमले नाही...
ते महान कार्य हे करीत आहेत...
कुणी बाहेर राहून...तर कुणी आत राहून...

बाबासाहेब...
आता काही दगडं या समाजावर देखील फेकून मारा...
तुम्ही दगड मारला म्हणून...
हे इतका मोठा जुलूस 'जय भिम !' चा नारा देऊन काढतील...
की सारेच जागतिक विक्रम मोडीत निघतील...
कुणी म्हणेल दगड तुम्ही कॉग्रेसी गोटातून मारला...
कुणी म्हणेल दगड तुम्ही हिदुत्व गोटातून मारला...
कुणी म्हणेल दगड तुम्ही भाजपाई गोटातून मारला...
कुणी म्हणेल दगड तुम्ही वंचिताई गोटातून मारला...
पण सारेच तुम्ही मारलेल्या दगडाचे स्वागत करून...
तुमची जयंती 'भीम जयंती' म्हणून एकत्र हर्षोल्हासात साजरी करतील...
बाबासाहेब....
एकदा डोकावून बघा दारात...
जात तुम्हाला अगदी दारावरच दिसेल...
माणुस मात्र त्यानंतरच सापडेल...
बाबासाहेब...
डोळे एकदा वर करून, कळसाकडे बघा...
धर्म तुम्हाला शिखरावर दिसेल...
माणूस मात्र तुमच्या पायाखाल दारिद्र्यात खितपत पडलेला दिसेल.
बाबासाहेब...
कुणी तुम्हाला नौकरीत दिसेल, कुणी खुर्चीत दिसेल...
कुणी बंगल्यात दिसेल, कुणी महालात दिसेल...
कुणी पालावर दिसेल, कुणी उघड्यावर दिसेल...
कुणी न्यायात दिसेल, कुणी अन्यायात दिसेल...
बाबासाहेब...
तुम्ही सोडून गेलेला भारत...
आज तुम्हाला तसाच दिसेल...
कुणी तुमचा विरोधक, तर कुणी तुमचा समर्थक दिसेल...
बाबासाहेब... हा भारत देश तुम्हाला तसाच दिसेल...

बाबासाहेब...
आता शेवटचा एक दगड संविधानाला फेकून मारा..
संविधानच तुम्हाला वास्तव सांगेल...
तुमच्याजवळ येऊन सलामी ठोकेल...
तुम्हाला 'Guard of Honor" देण्यासाठी...
जिवाचा आटापिटा करेल.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नेऊन बसवेल...
आणि म्हणेल बाबासाहेब...
आता माझी जागा तुम्हीच घ्या...
मी थकलोय या पुस्तकात कोंडून कोंडून...
इथे रोजच लावतात मला फाशी...
फुलांनी सजवून देतात श्रद्धांजली...
आणि परत एखादं दिवशी...
मला बाहेर काढून...
नागरी सत्कारही करून घेतात...
बाबासाहेब तुम्हाला सांगतो...
महत्प्रयासाने तुम्ही मला बनविण्यासाठी घेतलेली मेहनत...
या नाकर्ते राज्यकर्त्यांनी पायदळी तुडविली..
संविधानाचे राज्य कमी आणि
जाती, धर्माचेच राज्य जास्त केले...
अस्पृश्यतेने अन्यायाच्या पोरीशी लग्न केले...
अन् ...
भेदाभेद जन्माला येऊ नये म्हणून...
न्यायाचा न्यायालयाच्या पायरीवरच खून करण्यात आला...
'समते'ने शहरात पळून जाऊन स्पर्धेशी प्रेमविवाह केला...
पण... वस्तीत शिरल्याक्षणी 'समते'चा गर्भपात झाला...
बाबासाहेब लक्षात घ्या...
इथे 'बंधूता' थाटात कधी मंदीर मस्जीत फिरत राहीली...
पण गोमातेने बंधूतेला दाव्याने बांधून...
कधी अर्धनग्न, कधी पुर्णनग्न करून मारले...
तर कधी अखलाख हकनाक जिवानीशी मारले...
बाबासाहेब...
हल्ली या संसद भवनात चर्चा कमी होतात...
टि.व्ही वरच्या कार्यक्रमातून मात्र...
कायदेपंडित रंगतात...
बाबासाहेब...
हल्ली निर्णय संसद घेत नाही...तर
धर्म, मिडीया आणि धर्मगुरू मिळून निर्णय घेतले जातात.
संघीय बौद्धिकाचा कायदा होतो आणि
प्रधानमंत्र्याचा विचार हा शासकीय आदेश होतो...
बाबासाहेब...
हल्ली आंतरराष्ट्रीय संबंधावरील नीति कमी आणि
राज्यांमधील सरकारं पाडायची नीति अधिक ठरविली जाते.
शत्रुंना कमी आणि विरोधी पक्षांना जास्त ठोकले जाते...
कायद्याचे गुन्हेगार शिक्षा भोगतात आणि
सामाजिक, धार्मिक, राजकीय, पक्षिय गुन्हेगार शिक्षा ठोठावतात...
अहो बाबासाहेब...
इथे सारेच ईश्वर साक्षीने खरे-खोटे चाललेय...
कायद्याच्या पुस्तकांनी भंगाराशी सौदा केलाय...
संविधान नावाचे काही आहे...
हे आता हळूहळू विस्मरनात चाललेय...
'मोदी है तो, मुमकीन है!' च्या नाऱ्याने...
गगनभेदी उच्चांक गाठलाय...
बाबासाहेब...
एकतर माझ्यावर चढलेली, चढवलेली...
धुळ तरी बाजूला करा...
नाही तर या उन्मादी सत्तेच्या वारूळावर...
एक दगड फेकून मारून उध्वस्त करा...
आधुनिक मनुवादी व्यवस्थेचा हा उन्मादी डोलारा...
परत एकदा दगडांनी ठेचून काढा...
बाबासाहेब...
परत इथल्या दगडांना कोरून... समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि एकतेचा जाहीरनामा कोरा...
परत या देशाच्या मस्तकावर 'भारतीय संविधान' कोरा...
बाबासाहेब...
तुम्हीच एकदा भारतीय लोकशाहीचा नारा बुलंद करा...
तुम्हीच एकदा भारतीय लोकशाहीचा नारा बुलंद करा...
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर