Tuesday, 28 May 2019

गिरीश कुबेर यांना वंचित बहूजन आघाडीचा झेंडू बाम

गिरीश कुबेर यांना वंचित बहूजन आघाडीचा झेंडू बाम*

प्रति,
          मा. गिरीश कुबेर
          संपादक, दै. लोकसत्ता
महोदय,
           आपल्या पत्रकारितेबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपल्यात थोडीफार शिल्लक असलेली धर्मनिरपेक्षता व पुरोगामित्व दाखवून आपण पत्रकारिता करता. कधीकधी ती पत्रकारिता तुमच्यावर असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला बळी पडून पटरी सोडून जातांना आम्ही अनेकदा पाहीलेली आहे. खासकरून जेव्हा जेव्हा आंबेडकरी, वंचित, बहूजन, अल्पसंख्याक समुदायाच्या अस्मितापुर्ण राजकारणाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा तुमच्यातली उच्चवर्णीय (उच्चपक्षीय) सांस्कृतिकता हावी होऊन तुम्ही उच्चवर्णिय कंपूच्या तंबूत बसून पत्रकारिता करीत असता. हा प्रश्न फक्त तुमचाच नाही तर महाराष्ट्रात व देशात पुरोगामित्वाची, धर्मनिरपेक्षतेची झूल पांघरूण असलेल्या सर्वच पत्रकारांची जवळपास तीच अवस्था आहे. याला कारण देखील तसेच आहे. आज तर वंचित बहूजन आघाडीने सर्वांचीच डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळे वंचितांनी वाढवलेली राजकीय डोकेदुखी इतकी असह्य झाली की तुम्हाला लोकसत्ताच्या संपादकीय 'वंचित संचित' लेखात व्यक्त व्हावे लागले. तुम्ही वंचित बहूजन आघाडीची हवा काढून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. व वंचित बहूजन आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. कुबेर साहेब तुमच्यासारख्या व वागळे सारख्या अनेकांना व्यक्त होण्यास वंचित बहूजन आघाडीने बाध्य केले यातच वंचित बहूजन आघाडीचे यश आहे. असे आम्ही समजतो. तुमच्या टिकांना वंचित बहूजन समाजाने अतिशय सकारात्मक घेऊन त्याच संवेगाने पुढे जाण्याचा प्रण घेतला आहे. त्याबद्दल तुमचे आभारच.

आता तुमच्या 'वंचित संचित' ला आम्ही उत्तररूपी झेंडू बाम पाठविल्याशिवाय तुमची डोकेदुखी काहीकेल्या थांबणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. शेवटी तुमच्यासारख्या पत्रकारांना आम्ही गमावू इच्छित नाही. कारण आम्ही तुम्हाला मित्र विरोधकांच्या यादीत ठेवतो. त्यासाठी आम्ही वंचितांचा झेंडू बाम तयार केला आहे. येणाऱ्या काळात ज्यांची डोकेदुखी वंचित बहूजन आघाडीमुळे वाढणार आहे त्यांना त्यांना हे वंचित बाम पाठविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

कुबेर साहेब तुम्ही प्रमोद महाजनांचे उदाहरण देऊन अतिशय चाणाक्ष पद्धतीने भाजपची चाणक्यनीती मांडण्याचा प्रयत्न केला. भारिपला तर तुम्ही आधीच भाजपच्या बाजूने करून टाकलात. परंतु त्यासोबतच वंचित बहूजन आघाडी हा नवा रुपही भाजपच्या बाजूने दाखविण्याचा प्रयत्न केलात. आता कुबेर साहेब मला स्वाभिमानी व स्वतंत्र राजकारण करणारे म्हणजे भाजपच्या बाजूचे असे म्हणणे असेल तर कॉग्रेस, शिवसेना, जनता दल, भाजप, राष्ट्रवादी स्वतंत्र पायावर उभी होत असतांना हे सर्व पक्ष कुणाच्या बाजूचे होतात. की त्यांचे राजकारण हे कुणाच्या बाजुचे राहत नसून सत्तास्थापनेचे राजकारण असते. मात्र सत्तेपासून वंचित असलेल्या समुहांनी स्वतंत्र राजकारण उभा करण्याचा प्रयत्न केला तर ते कुणाच्यातरी बाजुचेच असते हे तुमचे म्हणणे कुठल्या जगातल्या राजकीय तत्त्वज्ञान व सिद्धांताला धरून आहे हे जरा स्पष्ट कराल का ? तुम्ही ज्या प्रमोद महाजनांचे उदाहरण देऊन मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय वाटचालीला प्रश्नार्थक करता. तर तुम्हाला हे माहित असेलच की जेव्हा प्रमोद महाजन यांचे राजकीय पटलावर फारसे परिचित चाणक्य नव्हते तेव्हा १९८९ ला मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हि.पी. सिंग यांना केंद्राच्या सत्तेत बसवून ओबिसींच्या प्रलंबित मंडल आयोगाला लागू करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सत्ताही गमावली व मंत्रीपद देखील नाकारले. परंतु ओबिसींच्या अधिकार प्राप्तीच्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाही. तेव्हाही बाळासाहेब आंबेडकरांनी कॉग्रेस-भाजप व्यतिरिक्त स्वतंत्र राजकारण केले. याचाच अर्थ बाळासाहेब आंबेडकरांचा अगदी सुरुवातीपासूनच स्वतंत्र राजकारणाचा पिंड राहीलेला आहे. याचा अभ्यास करण्यात तुम्ही थोडेसे मागे राहीलात किंवा जाणिवपूर्वक ते तुमच्या डोक्याच्या विशिष्ट कप्प्यात बंधिस्त करुन ठेवलात. मध्यंतरीच्या काळात ज्याप्रमाणे बाबरी मस्जिद, रिडल्स, गोध्रा यासारख्या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी डोके वर काढत होते तेव्हा जनमत लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकर कॉंग्रेस सोबत गेलेत. पण कॉग्रेसने त्याही काळात निराशाच केली त्यामुळे २००४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी परत एकदा स्वतंत्र राजकारणाची कास धरली ती आजतागायत कायम आहे. परंतु तुमची पत्रकारीता २००४, २००९, २०१४ या काळात बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र राजकारणावर बोलायला तयार झाली नव्हती. कारण तुमच्या उच्चवर्णीय पक्षांना तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा पाहिजे तसा फटका बसत नव्हता. म्हणून तुम्ही उच्चवर्णिय राजकीय पक्षांच्या सत्ताखुर्चिवर बसून आंबेडकरी राजकारणाची हेटाळणीयुक्त टेहाळणी करीत होतात. तुम्हाला राजकीय मालकपणाचा भास कायम होता. व वंचित बहूजन समाज हा तुमचा मतदाररूपी गुलाम होता तोपर्यंत तुम्ही अगदी मजेत गुण्यागोविंदाने होतात. पण २०१९ ला त्याच बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र राजकारणाचा फटका तुमच्या उच्चवर्णिय राजकीय पक्षांना (कॉंग्रेस-भाजप व सहकारी) बसणार आहे, असे दिसताच तुमची बि.पि., श्युगर, पित्ताची लेवल वाढली आणि तुमच्यातला सुप्तावस्थेतील उच्चवर्णिय खडबडून जागा झाला व वंचितांच्या स्वतंत्र राजकारणाला घरगडी बनविण्याचा प्रयत्न करू लागला. कुबेर साहेब वंचित बहूजन समाजाचे राजकीय आज्ञेत राहायचे दिवस आता संपलेत हे निदान वंचित बहूजन समाजातील तरूणांकडे व त्यांचा वंचित बहूजन आघाडीत असलेल्या सहभागाकडे पाहून तरी निदान लक्षात घ्या.

कुबेर साहेब पुढे तुम्ही असेही म्हणता की, वंचित बहूजन आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या १० जागा पराभूत झाल्यात. वंचित बहूजन आघाडीने विरोधकांची म्हणजे (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) यांची मते खाल्लीत व त्यामुळे भाजपला १० जागांचा फायदा झाला. हा तुमचा तर्क इतका तकलादू व तथ्यहीन आहे की त्यावरून असे लक्षात येते की तुम्हाला राजकारण अद्याप कळलेले नाही. कुबेर साहेब मला सांगा, ज्या १० जागा वंचित बहूजन आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी हल्ली असे तुम्ही म्हणता त्या १० जागांवर वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार नसते तर ज्या मतदारांनी वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांना मत दिली त्या मतदारांनी हमखास कॉंग्रेस-राष्ट्रवादी च्या उमेदवारांनाच मतदान केले असते असे कशाच्या आधारावर म्हणता ? कुठल्या आधारावर गृहीत धरता मतदारांना ? कुठले मोजमाप व कुठली मोजपट्टी लावता तुम्ही वंचित बहूजन आघाडीला मतदान दिलेल्या मतदारांसाठी ? हा तर्क लावतांना तुम्ही कोणत्या राजकीय एजन्सीचा आधार घेता ? एकीकडे राजकारणात कुणीच कुणाचा परमानंट (कायमचा) मतदार नसतो हे जागतिक राजकारणात सिद्ध झाले असतांना तुम्ही सरसकट वंचित बहूजन आघाडीला मतदान करणाऱ्या मतदारांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा मतदार गृहीत धरता यावरून तुमची राजकीय बुद्धीची कुवत लक्षात येते. *कुबेर साहेब लोकसत्ताच्या वातानुकूलित खोलीतून बाहेर पडा व गावात, वस्तीत खेड्यात येऊन अगदी पहील्यांदा मतदान करणाऱ्या १८ वर्षाच्या मतदाराला विचारा की 'तु तुझे मतदान कुणाला दिले ?' तर तो नवमतदार देखील म्हणतो की, 'मी कुणाला मतदान दिले हे गुप्त आहे. मी तुला का सांगू.' आणि कुबेर साहेब तुम्हाला वंचित बहूजन आघाडीला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांनी येऊन सांगितले की त्या १० जागांवर वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार नसते तर आम्ही सर्वच मतदारांनी फक्त आणि फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादी च्या उमेदवारांनाच मतदान केले असते.* कुबेर साहेब खरंच तुमचा राजकीय अभ्यास जरा कच्चा दिसतो.

चला तुमच्या राजकीय ज्ञानात भर घालण्यासाठी एक उदाहरण देतो. याच २०१९ च्या नागपूर लोकसभेचे उदाहरण देतो. नाना पटोले हे भाजप चे बंडखोर यावेळी कॉग्रेस च्या तिकीटावर नागपूरातून गडकरी यांच्या विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळेस नागपूरातील वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार लोकांच्या पसंतीस उतरला नाही. बसपा व अन्य तत्सम पक्षाकडे वळल्यास भाजप पुन्हा निवडून येते अशा गैरसमजुतीमुळे नागपूरातील आंबेडकरी, ललित, मुस्लिम मतदार जवळपास ९०% कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा झाला. जवळपास ४ लाखांच्या आसपास असलेला हा वंचित बहूजन आघाडीचा मतदार निदान ३ ते ३.५ लाखांच्या आसपास कॉंग्रेसकडे वळता झाला. परंतु तुमचाच उच्चवर्णिय कॉग्रेसी मतदार ज्यांच्या बळावर पटोलेंची भिस्त होती तोच कॉंग्रेसकडून पाय काढून घेऊन भाजपकडे वळला. व तुमच्या उच्चवर्णिय कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा उमेदवार नानाभाऊ पटोले नागपूरातून सपाटून पडला. त्याला कुणी पाडले तर तुमच्याच उच्चवर्णीय कॉंग्रेस-राष्ट्रवादी मतदारांनी पाडले. वंचित बहूजन आघाडीच्या मतदारांनी नाही पाडले. तोच कित्ता रामटेक लोकसभा मतदारसंघातही गिरवला गेला. याचा अभ्यास करून तुम्ही विश्लेषण केले असते. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कामी आले असते. त्यामुळे कुबेर साहेब फक्त १० जागांचा अभ्यास न करता ४१ जागांचा अभ्यास करा जीथून भाजप-सेनेचे उमेदवार निवडून आले आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या उच्चवर्णिय राजकारणाचे वास्तव चित्रण डोळ्यात भरेल. पण आम्हाला माहीती आहे तसे तुम्ही करणार नाही म्हणून. कारण तसे तुम्हाला तो उच्चवर्णीय मतदार करू देणार नाही. मात्र वंचित बहूजन मतदाराला तुमचा तुम्ही गुलाम समजता त्यामुळे तो थोडाजरी इकडेतिकडे सरकला की तुमच्या सत्ताखुर्चीच्या बुडाखालून धूर निघायला सुरवात होते. व तुम्ही त्या मतदारांना परत गुलामीची जाणीव करून द्यायला सदा तत्पर असता. पण कूबेर साहेब वंचित बहूजन मतदारांनी राजकीय गूलामी झिडकारली हे तुमच्या लक्षात कसे येत नाही.

कुबेर साहेब तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मागासांची चळवळ आधी कॉग्रेस आणि नंतर भाजप यांच्या आश्रयाने वाढली. इथेही तुमचा अभ्यास जरा कमीच पडलेला दिसतो. इतक्या मोठ्या दैनिकाचे संपादक त्यातही नावात गिरीश कुबेर म्हणजे विचारांचा, अभ्यासाचा, इतिहासाचा कुबेर तुमच्यात अपेक्षित होता. परंतु त्या सर्व़च अपेक्षांवर तुम्ही सपशेल अपयशी ठरतांना दिसतात. कुबेर साहेब दलित, आदिवासी, मागासांची चळवळ कॉग्रेस, भाजप च्या आश्रयाने वाढली नाही तर जेव्हा जेव्हा या चळवळीने स्वतंत्र स्वाभिमानी वाटचाल केली तेव्हा तेव्हा ही चळवळ वाढली व जेव्हा जेव्हा ही चळवळ कॉग्रेस-भाजप च्या आश्रयाला गेली तेव्हा तेव्हा ही चळवळ संपली असाच इतिहास आहे. जरा इतिहासाची पाने पलटून बघा. १९६९ पर्यंत दलितांची चळवळ स्वतंत्र पायावर होती तेव्हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष होती. परंतू १९६९ नंतर कॉग्रेसच्या आश्रयाला जाऊन संपली. मा. बाळासाहेब आंबेडकरांनी १९८९ ला परत या चळवळीला कॉग्रेसच्या आश्रमातून बाहेर काढले तर मंडल कमिशन लागू झाला. आणि आज परत मनुवाद डोकं वर काढतांना, देशाचे संविधान धोक्यात असतांना कॉग्रेस-भाजपच्या आश्रमातून या चळवळीला बाहेर काढून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहूजन आघाडीचा सक्षम राजकीय पर्याय या चळवळीचा म्हणून स्वत:च्या भक्कम पायावर उभा केला. कुबेर साहेब तुम्ही वंचित बहूजन मतदारांना गृहीत धरून आपल्याकडे वळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहात पण यात तुमचीच फसगत होऊन पाणी नसलेल्या हौदात तैराकीचे धडे घेण्यासारखी आपल्या उच्चवर्णीय राजकारणाची अवस्था झालेली आहे.

कुबेर साहेब तुम्ही पुढे म्हणता की, वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांनी लाख लाख मते घेतल्याने किंवा वंचितांच्या नेतृत्वांकडे थोडीफार साधनसंपत्ती आल्याने वंचितांच्या या राजकारणाने मागासांचे नक्की काय भले झाले किंवा होईल. या राजकारणाने समाज किती पुढे जाईल ? असे प्रश्न उभे करून परत तुम्ही तुमच्या ज्ञानाची दिवाळखोरी दाखविली असे तुम्हाला नाही का वाटत ? कुबेर साहेब सामाजिक परिवर्तन, लाभ, तोटा ह्या काय रातोरात चमत्कारिक रित्या घडणाऱ्या गोष्टी आहेत का हो ? आणि हे आम्हाला न कळण्याइतपत आम्ही दुधखुळे पण नाही. कुबेर साहेब भारताच्या स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेस १८८५ ला स्थापन झाली. तेव्हा लगेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले का ? हिंदु रक्षणासाठी १९२५ ला आर एस एस स्थापन झाली व १९८४ ला भाजप ची स्थापना झाली. लगेच हिंदूंचे रक्षण झाले का ? व आज तरी होत आहे का ? मराठी माणसांच्या व महाराष्ट्राच्या भल्यासाठी १९६१ ला शिवसेना स्थापन झाली. लगेच मराठी माणसांचे व महाराष्ट्राचे भले झाले का ? निदान शिवाजींच्या मावळ्यांचे तरी भले झाले का ? सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा समोर करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना १९९९ ला केली. लगेच सोनिया गांधी विदेशी ठरून देशाचे काही भले झाले का ? निदान मराठ्यांचे तरी भले झाले का ? बिचारे इतक्या वर्षानंतरही मराठा आरक्षणासाठी दारोदार भटकत का आहेत ? कुबेर साहेब वंचितांना विचारलेले तुमचे प्रश्न कधी तरी तुमच्या या उच्चवर्णीय राजकीय सवंगड्यांना विचारलेत का ? तुम्ही विचारूच शकत नाही. कारण मनुस्मृतीत उच्चवर्णियांना प्रश्न विचारता येत नाही कींवा तशी मुभाच दिली गेलेली नाही. उच्चवर्णीय नेहमीच प्रश्नांकीत वलयाच्या बाहेर राहीले आहेत. मात्र इथला वंचित बहूजन त्याच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न केल्यास उत्तर देण्यास बाध्यच आहे. त्यांची प्रत्येक कृती ही प्रश्नांकीतच आहे. हेच मनुस्मृतीने शिकविले आहे. बरोबर ना कुबेर साहेब. अहो पहिल्या ४ महिन्याच्या वंचित बहूजन आघाडीला मिळालेल्या ४१ लाखांच्या मतांवर तुम्ही इतके प्रश्न करायला लागलात याचा अर्थच असा आहे की वंचित बहूजन आघाडी येणाऱ्या काळात प्रस्तापित तुमच्या उच्चवर्णिय राजकीय सवंगड्यांना रिप्लेस करणार आहे याची चाहूल तुम्हाला लागली आहे. कुबेर साहेब मागासांचे भले होईल का ? समाज किती पुढे जाईल ? याची फार काळजी घेण्याची तसदी आपण घेऊ नये. कुबेर साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या वंचित बहूजन आघाडीचे घोषवाक्य आहे, 'स्वत:च्या अधिकारासाठी, स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च्या हातात सत्ता घ्या. व स्वत:चे प्रश्न स्वत:च संविधानाच्या माध्यमातून सोडवून घ्या.' वंचित बहूजन आघाडीचा व वंचित समाजाचा थोडासा अभ्यास / गृहपाठ करून घेतला असता तर प्रश्न पडले नसते व वंचित समुहाला प्रश्न विचारण्याची तसदी घ्यावी लागली नसती. *'आपली वंचित बहूजन आघाडी'* आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्याचा पुर्ण अधिकार आहे. शब्दांकडे लक्ष असू द्या. अन्यथा मनुस्मृतीने तुम्हाला वर उल्लेख केलेल्या कुठल्याच तुमच्या उच्चवर्णिय राजकीय सवंगड्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील दिलेला नाही.

शेवटी कुबेर साहेब ज्या भिमा कोरेगाव प्रकरणाचा तुम्ही उल्लेख करता त्या भिमा कोरेगाव प्रकरणात बाळासाहेब आंबेडकरांनी सामंजस्याची भुमिका घेतली नसती तर महाराष्ट्रात आज जी शांतता आहे ती दिसली नसती. तुम्ही सूद्धा हा लोकसत्ताचा संपादकीय आज लिहू शकला नसता. *आंबेडकर हे सामंजस्याचे प्रतिक आहे.* हे तुमच्यासारख्यांनी विसरून चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, त्याच भीमा कोरेगाव प्रकरणाने वंचित बहूजन आघाडीची निर्मिती केलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महाराष्ट्रातील वंचित समुहाने भिमा कोरेगाव प्रकरण लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. निदान हा सामाजिक कल तरी लक्षात घ्यावा. इथेच सर्वकाही सापडते. याव्यतिरिक्त तुम्हाला किंवा मला अधिक भाष्य करण्यात अर्थ नाही. म्हणून समाजाने प्रस्थापितांना लाथाडण्याचा प्रयत्न केला परंतु तुमच्याच य. दु. जोशी यांच्या संकल्पनेतील सॉफ्ट हिंदुत्वाची (नावापुरती/सत्तेपुरती) कास धरणारी कॉंग्रेस व हार्ड हिंदूत्वाची कास धरणारी भाजप यांनी मिळून छे ! संगनमताने हार्ड / अतिरेकी हिंदुत्व लादणारी भाजप सत्तेवर बसविली आहे. कारण आलटून पालटून सत्ता कुणाचीही बसली तरी तुमच्या उच्चवर्णिय सवंगड्यांना त्याचा काही फरक पडणार नाही. मात्र वंचित, बहूजन, मागास, दलित, अल्पसंख्यांक, मुस्लिम समुदायाच्या सामाजिक परिप्रेक्षावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे तोंडदेखले का होईना पण तुम्ही भाजपच्या सत्तेवर येण्याचे खापर महाराष्ट्रातील वंचित बहूजनांनी स्थापण केलेल्या 'वंचित बहूजन आघाडीवर फोडायला तयार बसलेला आहात. परंतू संपुर्ण देशातून कॉंग्रेस हद्दपार केली गेली, नाकारली गेली त्याची कारणमिमांसा व त्यावर चिकार शब्दही बोलायला तयार नाहीत. यातच सर्व तुमचा खटाटोप कशासाठी आहे हे दिसून येते.

सरतेशेवटी कुबेर साहेब, वंचितांचे हे राजकारण दिवसेंदिवस अधिक घट्ट होईल. तुमच्यासारख्यांची डोकेदुखी अधिक वाढून दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल. त्यासाठी वंचित बहूजन आघाडीच्या राजकारणाचे हे झेंडू बाम एकदाचे कपाळावर लावून चोळून घ्या. व कायमची डोकेदुखी बंद करून वंचितांच्या राजकारणाच्या बाजूने थोडे सकारात्मकतेने पाहून त्यावरही दोन शब्द वंचितांचा राजकीय उत्साह वाढविणारे लिहीण्यास सुरवात करा. निदान तुमच्या मिडीया स्वतंत्रतेला वंचितांचे राजकारण पोषकच राहील. मिडीयाची राजकीय गुलामगिरी व वंचितत्व दूर करण्यास वंचितांच्या राजकारणाचा तुम्हाला लाभ होईल ही बाब विस्मरणात जाऊ देऊ नका ही विनंती.

कळावे लोभ असावा.
सा.न.वि.वि.

आपलाच
अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर,
वंचित बहूजन आघाडी, महाराष्ट्र.

2 comments:

  1. Very good explanation sir .... jabardast

    ReplyDelete
  2. राजकारणात तसेच साहित्य मिडीया क्षेत्रात काहींनी आपली मक्तेदारी वाढवून ठेवली आहे व इतरांना नेहमीच कमकुवत समजण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो अशांची मक्तेदारी संपविण्याची वेळ आली आहे.

    ReplyDelete