Friday, 10 May 2019

चला आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर वंचितांचा झेंडा फड्कावूया..


#Once_Again_Ambedkar
चला आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर वंचितांचा झेंडा फड्कावूया...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              लोकसभा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा महाराष्ट्रातील झंजावात २९ एप्रिल ला संपला. महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या ४८ जागांवर चार टप्प्यात निवडणुका पार पडल्या. कोण किती जागा जिंकणार ? कोण कुठे जिंकणार ? कोण कुठे पुढे असणार ? कुणी कुणी साथ दिली ? कुणी कुणी साथ सोडली ? कुठे चुकले ? कुठे जमले ? कुठे कमी पडले ? कुठे अंगलट आले ? कुणाचे पारडे जड ? कुणाचे पारडे हलके ? कोण किती मते खाणार ? कुणाची मते खाल्ल्याने कुणाचा फायदा होणार ? कोण हरणार आणि कोण जिंकणार ? अश्या साऱ्याच प्रश्नांचा बाजार, चर्चांचे फड, सोशल मिडीयावरील दावेदारी इथून पुढे २३ मे च्या निकालाच्या दिवसांपर्यंत रंगत जाणार. महाराष्ट्रात ही चर्चा तर अधिकच रंगतदार असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत घेतलेली भरारी लक्षवेधी ठरणार आहे. भाजप-सेना युती व कॉंग्रेस-राका महागटबंधन दोन्ही प्रस्थापित पक्षांना महाराष्ट्राने घाम फोडला. इथल्या वंचीतांनी पुकारलेला राजकीय एल्गार पारंपारिक राजकीय वातावरणाची दिशा बदलणारा ठरला आहे. ‘बदल होतोय, बदल घडतोय, वंचित आता राजकारणाचा चेहरा मोहरा बदलतोय.’ याचा प्रत्यय महाराष्ट्राने घेतला आहे. कालपर्यंत ज्यांची साधी दखलही घेतली जात नव्हती तो पक्ष, तो समूह, ते नेते आज प्रतिस्पर्धी बनले याचे शल्य प्रस्थापितांना सातत्याने सलत राहील.
          महाराष्ट्राच्या ४ टप्प्यातील निवडणुकीत सर्वच ४८ जागांवर तुल्यबळ लढती झाल्यात. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-सेना-आरएसएस विरोधात उघड विरोध दिसून आला. सरकार विरोधातील मानसिकता ठळकपणे दिसून आली. त्यामुळे तुल्यबळ लढत देण्याइतपत मतदान देखील भाजप-सेना उमेदवारांना झाले असेल अशी शंका आहे. जिथे विरोधी पक्षांचे उमेदवार कमकुवत ठरले तिथे जनतेसमोर पर्याय नसल्याने नाईलाजास्तव भाजप-सेना उमेदवारांना मतदान करावे लागले असेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळाली. असे असतांना देखील आज महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार भाजप-सेनेचे निवडून येतील असे दावे केले जात आहेत. त्या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे याची तपासणी करणे गरजेचे आहे. जन्मात विरोधी असतांनाही भाजप-सेनेला सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याचा आत्मविश्वास येतो कुठून ? कुठल्या आधारावर असे दावे केले जातात ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे evm. evm हा एकमेव त्यांच्या आत्मविश्वासाचा बालेकिल्ला आहे.  त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत आहे.
राजकारणाच्या रंगतदार चर्चेत कार्यकर्ते आणि सट्टाबाजारी जोरदार बारूद भरीत आहेत. अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. जनमत चाचणीच्या नावाखाली आधीच विजयाचे फटाके फोडले जात आहेत. मतदार मात्र सर्वत्रच संभ्रमात आहे. मतदाराने इमाने इतबारे आपली जबाबदारी पार पाडली. पसंतीच्या पक्षाला, पसंतीच्या उमेदवाराला, पसंतीच्या नेत्याला मत देऊन, evm वर विश्वास टाकून मतदार मोकळा झाला. जिंकून कोण येईल याची शाश्वती त्याला नाही. त्याने ज्याला मत दिले किंवा त्याच्यासोबत अनेकांनी ज्याला मत दिले ते निवडून येतील कि evm मशीनला ज्याला निवडून आणण्याचा आदेश दिला जाईल त्याला ती evm मशीन निवडून येईल हे प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा सांगता येत नाही. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात मतदारांची इतकी संभ्रमावस्था आहे कि देशाच्या संसदेत निवडून गेलेला प्रतिनिधी जनतेने निवडून दिला कि, evm ने निवडून दिला हेच लोकांना कळत नाही.
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात ४८ जागांवर उमेदवार लढविले आहेत. या ४८ जागांपैकी ४६ जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुल्यबळ लढतीत आहेत. फक्त नागपूर आणि रामटेक या २ लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारसा प्रभाव पाडू शकले नाही. उर्वरित ४६ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जवळपास ७० ते ९० टक्के आंबेडकरी समूह एकवटून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केले आहे. तसेच कमी अधिक प्रमाणात ४० ते ६० टक्के मुस्लीम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांना मतदान केले आहे. वंचित बहुजन ओबीसी मतदार हा जवळपास ३० ते ५० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा मतदार राहिला आहे. धनगर आणि माळी समूह त्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदार संघात तर ७० ते ९० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा होता. परंतु उर्वरित मतदार संघात देखील कमी अधिक प्रमाणात २० ते ४० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा मतदार राहिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने ज्या प्रकारे वंचित जात समूह ठळक स्वरुपात राजकारणात पुढे आणून जातीय समीकरण मांडले त्यानुसार महाराष्ट्रातील इतरही उमेदवारांना या समीकरणाचा लाभ होतांना दिसून येत आहे. आज महाराष्ट्रात पहिल्यांदा ही सोशल इंजिनीअरिंग वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे.
एकंदरीत या सर्व गोष्टींचा व झालेल्या मतदानाचा व मतदानानंतर आलेल्या मतदारांच्या कलाचा विचार केल्यास वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात १० ते १५ जागांवर पहिल्या १ नंबर वर राहणार आहे. या १० ते १५ जागांमधून काही जागा पराभूत झाल्याच तर अतिशय कमी फरकाने म्हणजेच २५ ते ५० हजार मतांच्या फरकाने पराभूत होतील असे चित्र दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास २० ते २५ जागा ह्या २ नंबर वर राहण्याची शक्यता आहे. आणि ह्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे कमी अधिक प्रमाणात ५० हजार ते १ लाख मतांच्या फरकाने पराभूत होतील असा अंदाज आहे. आणि उर्वरित १५ ते २० जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जवळपास तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहतील परंतु या प्रत्येक उमेदवारांना मिळणारे मतदान हे जवळपास १ लाखाच्या पुढे असेल. फक्त नागपूर आणि रामटेक या २ मतदार संघातील उमेदवार हे २५ हजार मतदानाच्या खाली राहतील असा एकंदरीत अंदाज झालेल्या मतदानावरून दिसून येतो. अदखलपात्र मतदार या निवडणुकीत दखलपात्र होऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मोठा मतदार समूह म्हणून पुढे आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ही झालेल्या एकूण मतदानापैकी जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त मतदान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निश्चितच मिळविणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडी प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रात मान्यताप्राप्त होईल हे निश्चित आहे. हे सर्व विश्लेषण evm च्या सुचारू आणि पारदर्शक संचालनावर निर्भर राहणार आहे. evm ने निकाल फिरविला गेला तर हे विश्लेषण खोटे ठरेल पण evm ने पारदर्शक निकाल लावले तर वरील विश्लेषण तंतोतंत ठरेल व वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात आपले पाय घट्ट करेल.
आज कुठल्याही जनमत चाचण्यात वंचित बहुजन आघाडीला स्थान दिले जात नाही. पण ही परिस्थिती आता चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर बदलणारी असणार आहे. महाराष्ट्राचा सर्वच जनमत चाचण्यांचा कौल १५ मे नंतर अचानक बदललेला दिसणार आहे. जसजसे निवडणुकांचा ७ वा टप्पा जवळ येईल व निवडणुका पार पडतील त्यानंतर सर्वच जनमत चाचण्या बदलतील. जनमत चाचण्या हा एक प्रकारचा मानसिक खेळ आहे. जो मतदारांसोबत खेळला जातो. विरोधातील मतांना व मतदारांना आपल्याकडे झुकविण्यासाठी हा जनमत चाचण्यांचा खेळ सुरवातीपासून संपूर्ण निवडणुकीत मतदारांशी खेळला जातो. परंतु शेवटच्या टप्प्यात या खेळाला चेहरा मोहरा बदलेला आपल्याला दिसणार आहे. व वास्तव म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातील जनमत चाचण्यात आपले स्थान निश्चितच मिळविणार आहे. सोबतच या निवडणुकीत महाराष्ट्रात काही मतदार संघात धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. ज्याचा अंदाज हा राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक, जनमत चाचण्या एक्स्पर्ट, विविध वृत्तवाहिन्या यांना अद्याप घेता आलेला नाही.
२०१९ च्या लोकसभेला समोर जातांना वंचित बहुजन आघाडीने ज्या अठरा पगड जात समूहांना सोबत घेऊन वंचिततेचा नारा लावून महाराष्ट्रातील संपूर्ण प्रस्थापितांच्या राजकारणाला ढवळून काढले. याचे नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. हे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ च्या प्रांतिक निवडणुकात स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून दिलेला राजकीय लढा आज प्रत्येक आंबेडकरवाद्यांना आठवतो आहे. अलुतेदार आणि बलुतेदार, खोत आणि कुळ यांच्या संघर्षातून उभा झालेला श्रमिकांचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून एका राजकीय न्यायाकडे घेऊन गेले. व समाजातील वंचित वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. व प्रांतिक विधिमंडळातून त्यांना न्याय मिळवून दिला. स्वतंत्र मजूर पक्षाच्या पहिल्याच निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ जागा प्रांतिक विधिमंडळावर निवडून आणल्या आणि तत्कालीन कॉंग्रेस च्या मुंबई प्रांतिक विधिमंडळातील सत्तेला आव्हान उभे केले होते. आज मा. बाळासाहेब आंबेडकरांनी वर्तमान मनुवादी भाजप-आरएसएस च्या सरकारच्या सत्तेपुढे वंचितांचे / वंचित बहुजन आघाडीचे आव्हान उभे केले आहे.
आज मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आधुनिक भारतात महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अठरापगड जातीच्या वंचित समूहांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी या राजकीय मंचावर एकवटून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निकराचा लढा दिला. निकराची राजकीय झुंज दिली. प्रस्थापितांचे राजकारण तोडले. सत्तेची दारे वंचितांसाठी मोकळी केली. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले होते. आज मा. बाळासाहेब आंबेडकर हे देखील वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादन करतील असा विश्वास आज महाराष्ट्रातील प्रत्येक वंचित समूहात निर्माण झाला आहे.
२३ मे च्या निकालातून वंचितांचे एकत्रीकरण दिसून येईल. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने वंचितांच्या राजकीय प्रवासाला सुरवात होईल. वंचितांच्या राजकारणाची पहिली पायरी मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जनतेने चढलेली आहे. लोकसभा निवडणुकीत निदान ५ ते १० लोकसभेच्या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाल्या तर निश्चितच त्याचा प्रभाव येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर पडणार आहे. वंचित बहुजन आघाडी या स्वतंत्र नावाने ही पहिली निवडणूक लढविली गेली. त्यामुळे अनेक विरोधकांकडून वंचित बहुजन आघाडी भोवती संशयकल्लोळ निर्माण करण्यात आला होता. निश्चितच त्याचा फटका काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला झालेला आहे हे नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील सर्वच वंचित समूह या निवडणुकीत एकवटला असे नाही. काहींनी दूर राहून बघ्याची भूमिका घेतली. तर काहींनी या वंचितांच्या प्रयोगाला बाहेर राहून तपासण्याचे काम केले. वंचित बहुजन आघाडीच्या या लोकसभा निवडणुकीतील यशाचे आकलन अनेकांना करता येत नाही आहे. त्यातही संभ्रम आहे. प्रश्नचिन्ह आहे. निकालात यश मिळेल कि नाही अशी साशंकता आहे. परंतु दबक्या आवाजात आज सर्वत्र, सर्व समूहात, सर्व पक्षांत, सर्व मतदारात हे बोलले जात आहे की, वंचित बहुजन आघाडी ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत किंगमेकर ची भूमिका निभावणार आहे. विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला नेत्रदीपक यश संपादन करता येणार आहे. हा आशावाद पुढे पुढे सरकत गेला तर येणारी विधानसभा ही वंचित बहुजन आघाडीच्या हाती असणार आहे. राज्याची सत्ता वंचितांच्या हाती असणार आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या ५ लोकसभा जागा जरी निवडून आल्या तरी महाराष्ट्रातील हा आशावाद द्विगुणीत होईल. आणि महाराष्ट्रातून कॉंग्रेस – भाजप चे परंपरागत सत्ताबदल बेदखल होऊन एक नवा महाराष्ट्र अनुभवायला मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक सोशल इंजिनीअरिंग च्या बळावर, भावनिक वातावरणाच्या बळावर, भाजप-आरएसएस विरोधात जनतेमध्ये असलेल्या नकारात्मक भावनेच्या बळावर, महाराष्ट्रात उभ्या झालेल्या सामाजिक संघर्षाच्या बळावर, सामाजिक आंदोलनात मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकांच्या बळावर काही प्रमाणात लढविली आहे हे नाकारता येत नाही. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापनावर पाहिजे तो भर दिला नाही. किंवा वंचित बहुजन आघाडीच्या व भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य ते निवडणूक व्यवस्थापन करता आले नाही हे प्रामाणिकपणे आपण स्वीकारले पाहिजे. निवडणूक व्यवस्थापनाच्या अभावी वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास ५ ते १० जागा अगदी थोड्या फरकाने पडणार आहेत. या मतदार संघात योग्य ते निवडणूक व्यवस्थापन केले गेले असते तर निश्चितच या जागांवर देखील वंचित बहुजन आघाडीला यश संपादन करता आले असते. भावनेच्या भरावर नेतृत्व लाट तयार होते परंतु लाट फार काळ राजकारणात तग धरून राहत नाही. नरेंद्र मोदी व भाजप याचे मोठे उदाहरण आहे. अगदी ५ वर्षाच्या काळात मोदी लाट संपली. व्यवस्थापन कौशल्य त्यांच्याजवळ होते परंतु नेतृत्व क्षमतेच्या अभावाने आज भाजप पराभवाच्या छायेत आहे. वंचित बहुजन आघाडीकडे खंबीर व क्षमतापूर्ण नेतृत्व आहे. पण व्यवस्थापन कौशल्य आपल्याकडे नाही.
हा लेख वाचतांना महाराष्ट्रातील जवळपास सर्वच टप्प्यातील निवडणुका संपलेल्या असतील. तेव्हा कार्यकर्त्यांनी झालेल्या निवडणुकीचे आत्मचिंतन केले पाहिजे. काय चुकले ? कुठे चुकले ? कुठे कमी पडले ? याचा गांभीर्याने विचार व्हावा. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करायला व त्यादृष्टीने व्यवस्थापन निर्माण करायला आम्हाला जवळपास ५ ते ६ महिन्यांचा कालावधी मिळतो आहे. या कालावधीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योग्य ते निवडणूक व्यवस्थापन केले तर निश्चितच विधानसभेवर वंचित बहुजन आघाडी वंचितांचा झेंडा फडकवू शकणार आहे. मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र, अविरत घेतलेली मेहनत आम्हाला योग्य त्या निर्णयात परावर्तीत करावी लागणार आहे. संधी आलेली आहे. त्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हाती आहे. परत संधी मिळेल या भ्रमित आशावादात न राहता सातत्यपूर्ण व्यवस्थापनातून राजकीय प्रगल्भतेकडे, राजकीय स्थिरतेकडे आम्हाला प्रवास करावा लागेल. याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व वंचित बहुजन आघाडीच्या घटक समूहांनी व मतदारांनी घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितांचा झेंडा हमखास फडकणार आहे. हे लक्षात घेऊन कामाला लागा. येणार राजकीय काळ हा वंचित समूहांच्या राजकीय उत्थानाचा काळ असणार आहे. उद्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचितांचा, वंचितामधील असणार आहे. हे आपल्या मस्तिष्कावर कोरून ठेवून कामाला लागा. 
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


1 comment:

  1. अच्छे कार्यों को सोचते ही नहीं रहिए,
    उन्हें सारे दिन कीजिए ताकि जीवन
    एक भव्य मधुर गीत बन जाए।

    ReplyDelete