Friday, 31 May 2019

कोणता झेंडा घेऊ हाती ! ही कोंडी फुटली.


#Once_Again_Ambedkar
कोणता झेंडा घेऊ हाती ! ही कोंडी फुटली.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              प्रबुद्ध भारत पाक्षिकातील ‘परत एकदा आंबेडकर’ या सदरातील हा ५० वा लेख आहे. मागील २ वर्षात सातत्याने हे सदर लिहितांना एक नवी उर्जा या महाराष्ट्रातील दलित, वंचित, बहुजन समाजामध्ये निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र हे सदर लिहितांना स्वप्नरंजन किंवा कल्पनाविलास टाळण्याचा नेहमी प्रयत्न केला. या सदरात नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक व राजकीय लढ्याचा, त्यातून पुढे आलेल्या आंबेडकरी तत्वज्ञानाचा वर्तमान परिप्रेक्षात मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक व राजकीय लढ्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांच्या संपर्कातून, गावातल्या परिस्थितीचा, शहरातील वातावरणाचा जवळून अभ्यास करून आणि सामाजिक, राजकीय वातावरणात रोजच्या येणाऱ्या अनुभवातून जे दृष्टीक्षेपात येत होते तेच या सदरातील सर्व लेखांमध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला. हेच या सदराचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच या सदरातील लेखांनी सामान्य माणसांच्या मनाचा ठाव घेतला. जे प्रश्न चळवळीतल्या सामान्य माणसांच्या डोक्यात घोंगावत होते. त्या प्रश्नांना घेऊन त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या सदराने केलेला आहे. सोबतच त्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर वर्तमानात कशा पद्धतीने करीत आहेत याचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला गेला. त्याला यश आले कि अपयश आले हे वाचकांनी ठरवायचे.
या मालिकेतला ५० वा हा लेख लिहितांना विशेषार्थाने काही गोष्टी पुढे आल्या आहेत. एक तर लोकसभेच्या निवडणुका संपून निकाल हाती आले आहेत. तर दुसरीकडे मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ‘वंचित बहुजन आघाडी’ने महाराष्ट्रात दखलपात्र मजल मारीत बहुतांश दलित, वंचित, बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या एकत्र केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे वर्तमान आणि भविष्यकालीन चित्र संपूर्णरीत्या बदलविले आहे. निकालात निवडून येण्यात औरंगाबाद वगळता वंचित बहुजन आघाडी थोडीफार अपयशी ठरली असेल परंतु ४१ लाखांच्या वर मते घेऊन सर्वच प्रस्थापितांना चिंतेत पाडले आहे. प्रस्थापितांची त्यातही प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची चिंता चिता होण्याची भीती त्यांना सतावित आहे. त्यांची ही चिंता कायम ठेऊन वंचितांच्या या राजकीय उठावाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात काय रणनीती आखणार आहोत ? या पार्श्वभूमीवर आम्ही पुढचे चिंतन करणे गरजेचे आहे.
          २०१९ ची देशाची सार्वत्रिक निवडणूक समाजाला राजकीय वातावरणात ढवळून काढणारी ठरली. कधी नव्हे ती या निवडणुकीत अनेक मुद्द्यांची राजकीय चर्चा समाजात होतांना पाहायला मिळाली. त्या सर्व चर्चांचा ओघ हा भाजप ने देशामध्ये निर्माण केलेल्या अस्वस्थतेच्या विरोधातला होता. भाजप आणि मोदी सरकारने दिलेल्या स्वप्नवत आश्वासनांनी निराशा केल्याचा तो सूर होता. परत या देशावर भाजप व मोदीची सत्ता येणार नाही यासंदर्भात गल्लीबोळात ते चावडी पर्यंत याच चर्चांचे फड रंगले व रंगविले जात होते. तर दुसरीकडे मोदी यांची रंगविली गेलेली (Shadow Image) नेतृत्वाची सावली आणि त्याच्या तुलनेत कुठल्याच पक्षात दिसून न येणारे नेतृत्व किंवा खुजे नेतृत्व असा भासविला जाणारा मानसिक प्रचार हा या निवडणुकीत महत्वाचा ठरला. देशाचे लोकतंत्र मोदींच्या नेतृत्वात सुरक्षित नाही ही भावना असल्यामुळे मोदींना सत्ताच्युत करण्यासाठी पर्यायाच्या शोधात मतदार होता. परंतु शेवटपर्यंत मतदारांना तो पर्याय भेटू शकला नाही. किंवा दुसऱ्या अर्थाने असेही म्हणता येईल की, तो पर्याय उभाच होऊ दिला गेला नाही. त्यामुळे परत एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात बहुमतातली भाजप ची सरकार निवडून आली. आणि पुढील ५ वर्ष या सरकारचा अनाकलनीय राज्यकारभार सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय आता भारतीय जनतेसमोर उरलेला नाही.
          महाराष्ट्रात मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने भाजपच्या धार्मिक धृविकरणाविरोधात राजकीय उठाव करण्याचा प्रयत्न केला. हा उठाव आज बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला. राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने हा उठाव पाहिजे तसा यशस्वी झाला नसला तरी राजकीय मानसिकतेच्या संकलीकरणाच्या दृष्टीने या उठावाला शतप्रतिशत यश आले आहे असे म्हणता येईल. याच सदरातील मागच्या एका लेखात मी वंचित बहुजन आघाडी ची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ च्या काळात ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन करून केलेल्या राजकीय उठावाशी केला होता. वंचित बहुजन आघाडीला आज भेटलेले राजकीय यश हे निश्चितच तेव्हा स्वतंत्र मजूर पक्षाला मिळालेल्या राजकीय यशाशी तुलना करण्यास पात्र आहे. दलित, वंचित, बहुजन समाजाची राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्नच जवळपास वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे. आंबेडकरी समाजासमोर एक सक्षम राजकीय मंच उभा केला गेला. आणि मा. बाळासाहेब आंबेडकर यांचे एक विश्वासार्ह नेतृत्व समाजात प्रस्थापित झाले. याच आधारावर पुढील काळात दलित, वंचित, बहुजन आणि अल्पसंख्याक मुस्लीम समाजाची राजकीय वाटचाल निर्धारित होणार आहे.
          कालपर्यंत ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था दलित राजकारणाची होती. दलित समाजात राजकीय नेतृत्वावरील अविश्वासाची परत इतकी मोठी होती की ती तोडून एक विश्वासार्ह नेतृत्व आणि राजकीय मंच या समाजासमोर उभा करणे काळाची गरज होती ती गरज आज बऱ्याचप्रमाणात मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने आणि वंचित बहुजन आघाडीने भरून काढली. तर दुसरीकडे वंचित, बहुजन व मुस्लीम अल्पसंख्यांक समुदाय हा प्रस्थापित पक्षांच्या गळी लागला होता. त्यातून तो बाहेर पडू पाहत नव्हता. आश्वासक अन्य नेतृत्वाच्या अभावाने तो त्या प्रस्थापित पक्षांना सोडून बाहेर पडायला तयार नव्हता. तर दुसरीकडे मुस्लीम समुदायात असुरक्षितता हे त्याचे मोठे एक कारण होते. ज्यामुळे हा समुदाय प्रस्थापित कॉंग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार म्हणून फरफटत जात होता. वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही समाजाला एक आश्वासक नेतृत्व आणि राजकीय मंच उपलब्ध करून दिल्याने तो प्रस्थापित पक्षांनी केलेली कोंडी फोडून बाहेर येण्यास तयार झाला आहे. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत मिळालेले मतदान हे सुद्धा त्याला त्यातून बाहेर पडून एका नव्या पर्यायाशी जुळायला बाध्य करीत आहे.
          असे असले तरीही २०१९ च्या निवडणुकीत सर्वच दलित समुदाय हा वंचित बहुजन आघाडीच्या सोबत होता असे म्हणता येत नाही. जवळपास महाराष्ट्रातील फक्त २५ टक्के दलित समुदाय वंचित बहुजन आघाडीसोबत आला. याचे कारण हे होते की, या निवडणुकीत भाजप ला सत्तेपासून दूर केल्याशिवाय दलितांवरील भाजप शासन काळातील वाढलेले अन्याय अत्याचार कमी होणार नाही. त्यासाठी ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ या द्विधामनस्थितीत हा समाज होता. वंचित बहुजन आघाडी आश्वासक वाटत असली तरी निर्णयात्मक राहील की नाही याविषयी संभ्रम पसरविला गेला होता. त्यामुळे कॉंग्रेस सोबत जाण्यात दलित समुदायाने धन्यता मानली. परंतु त्यांची ती अपेक्षा सपशेल अपयशी ठरली. कॉंग्रेस ला या निवडणुकीत पाहिजे ते यश मिळविता आले नाही. व वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच निवडणुकीत आश्वासक मतदान मिळविले. त्यामुळे पुढच्या काळात द्विधामनस्थितीत असलेला दलित समुदाय जो यावेळेस कॉंग्रेस सोबत होता तो परत वंचित बहुजन आघाडीकडे वळेल अशी अपेक्षा आहे.
          यासोबतच वंचित बहुजन समुदायामध्ये सुद्धा द्विधामनस्थिती पाहायला मिळत होती. जातवार उमेदवारी बहाल केल्याने जातीच्या उमेदवारासोबत काही समुदाय उभा झाला. परंतु तोच समुदाय इतर मतदार क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीसोबत होता असे निश्चित म्हणता येत नाही. तरीही जवळपास १० % वंचित बहुजन समाजाची मते वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पाडून घेण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु आज वंचित बहुजन समाजातील वंचित बहुजन आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांना मिळालेली मते व त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा झालेला इथला पूर्वाश्रमीचा दलित व आजचा आंबेडकरी समूह, त्यामुळे त्या उमेदवारांना मिळालेली भरघोस मते ही सर्व जमेची बाजू म्हणून वंचित बहुजन आघाडीसाठी महत्वाची ठरणार आहे. येणाऱ्या काळात हा वंचित बहुजन समाज परत एकदा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीसोबत जुळायला तयार होईल. येणाऱ्या विधानसभेपर्यंत निदान ४० ते ५० टक्के वंचित बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीसोबत आला तरीही या समुदायाची जवळपास ५० आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून जातील. अशी अपेक्षा आहे.
          वारंवार हिंदू अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायात असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. कट्टर हिंदुत्वाला पुरस्कृत करून मुस्लीम समुदायावर अन्याय देखील केल्याच्या अनेक घटना या देशात घडलेल्या आहेत. त्यामुळे मुस्लीम समुदायाने या निवडणुकीत देखील कट्टर हिंदुत्वाला पुरस्कृत करणाऱ्या भाजपा ला सत्तेतून दूर करण्यासाठी मृदू हिंदुत्ववादी कॉंग्रेस सोबत जाण्यात धन्यता मानली. वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम समुदायाला आपल्या राजकीय मंचावर समसमान स्थान दिले असतांना देखील व एमआयएम सारखा पक्ष व असुओद्दिन ओवैसी सारखे आश्वासक नेतृत्व सोबत घेऊन देखील मुस्लीम समुदाय सर्वच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत आल्याचे चित्र दिसले नाही. परंतु औरंगाबाद लोकसभेची एकमेव जागा वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात आल्याने व तिथून इम्तियाज जलील सारखे तरुण नेतृत्व दलित वंचित समुदायाच्या पाठींब्याने निवडून आल्याने मुस्लीम समुदायात चैतन्याचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थाने मुस्लीम समुदायाला प्रतिनिधित्व देऊ शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये या निवडणुकीच्या निकालाने निर्माण झाला. त्यामुळे हा समुदाय देखील येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीसोबत विश्वासाने उभा होईल. अशी अपेक्षा आहे.
          एक गोष्ट यात महत्वाची आहे ती अशी की, लोकसभेच्या निकालानंतर एकदुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप सोशल मिडियातून होऊ लागलेत. वंचित बहुजन आघाडीने बांधलेली वंचित, बहुजन, अल्पसंख्याक समुदायाची एकमुठ तोडण्यासाठी हे कारणीभूत राहू शकते. पहिल्याच निवडणुकीत सर्वच समुदाय सर्वच ठिकाणी आपल्या सोबत राहील अशी राजकारणात अपेक्षा करणे अतिरेकी ठरू शकते. कुठल्याही सामाजिक परिवर्तनाला वेळ द्यावा लागतो. एका दिवसात, रातोरात किंवा अगदी काही दिवसात सामाजिक परिवर्तन होत नसते. किंवा तशी अपेक्षा देखील केली जाऊ शकत नाही. कारण कुठलेही सामाजिक परिवर्तन हे सुक्ष्मतेतून व्यापकतेकडे वाटचाल करणारे असते. लगेच व्यापक सामाजिक परिवर्तन कधीच होत नसते. इतिहासातही असे सामाजिक परिवर्तन घडून आलेले नाही. आणि तशी अपेक्षा वर्तमानातून किंवा भविष्यात देखील करता येणारी नाही. वंचित बहुजन आघाडीचा आज लागलेला निकाल व मिळालेले यश हे सूक्ष्म सामाजिक परिवर्तन आहे. या सूक्ष्म सामाजिक परिवर्तनाला लक्षात घेऊन आता याची धग व्यापक सामाजिक परिवर्तनाकडे घेऊन जाणारी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेत या सामाजिक परिवर्तनाचे व्यापक रूप निश्चितच पाहायला मिळणार आहे.
          राजकारण हे एक प्रकारचे मायाजाळ आहे. या मायाजाळात अनेक लोक वाहवत जावून सामाजिक परिवर्तनाचे राजकारण विसरून स्व हिताने झपाटले जावून राजकारणाच्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयात अडथळा निर्माण करू शकतात. सत्ता व संपत्तीने परिपूर्ण राजकारणात ही माणसे दुर्लक्षित केली जातात. परंतु समाज परिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून उभे केलेल्या साधनहीन राजकारणात व राजकीय पक्षात ही माणसे अतिशय धोकादायक असतात. ती फक्त धोकादायकच नव्हे तर वंचितांच्या एकूणच राजकीय ध्येयाला मोडीत काढणारे ठरू शकतात. अश्या लोकांना वंचितांच्या राजकारणात स्थान असू नये. कारण त्यांच्या नसण्याने सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाला काहीही फरक पडत नाही. परंतु त्यांच्या असण्याने सामाजिक परिवर्तनाचे राजकारण अल्पावधीत मोडीत निघून आज एकत्र आलेला वंचित, बहुजन, अल्पसंख्यांक समुदाय उद्या विभक्त होऊ शकतो. आज निर्माण झालेला त्यांचा विश्वास उद्या अविश्वासात परावर्तीत होऊ शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने पुढील वाटचाल करणे गरजेचे राहील. तेव्हाच वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाला यश प्राप्त होईल.
          आज वंचित, बहुजन, दलित व अल्पसंख्यांक समुदायात असलेली ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ ही कोंडी फुटलेली आहे. वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आज त्यांच्या पुढे उभा आहे. त्या पर्यायाला अंगीकारून हा समुदाय पुढील काळात वंचित बहुजन आघाडीला भक्कम साथ देईल असा विश्वास आहे. कालपर्यंतच नव्हे तर या २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जो वंचित, बहुजन, दलित, अल्पसंख्यांक समुदायातील वर्ग कॉंग्रेस सोबत गेला तो मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळेल. इम्तियाज जलील च्या रूपाने वंचित बहुजन आघाडीचा एकमेव मुस्लीम समुदायातील एक तरुण खासदार संसदेत प्रतिनिधित्व करीत असल्याने मुस्लीम समुदायात एक नवचैतन्य निर्माण होऊन येणाऱ्या विधानसभेत २५ ते ३० मुस्लीम समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार निवडून येऊ शकतात हा विश्वास मुस्लीम समुदायात निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळे निदान येणाऱ्या निवडणुकीत ५० ते ६० टक्के मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीसोबत राहील असे म्हणता येईल.
          एकंदरीतच महाराष्ट्रातील वंचित, बहुजन, दलित, अल्पसंख्यांक समुदायाला वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेशाचा मार्ग सापडलेला आहे. फक्त मतदार म्हणून आजपर्यंत आपला वापर झाला. आता आपल्याच मतांच्या बळावर आपल्याला अपेक्षित राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकते, हा विश्वास वंचित बहुजन आघाडीने दलित, धनगर, मुस्लीम व अन्य वंचित समुदायात निर्माण केला. हेच वंचित बहुजन आघाडीचे मोठे यश आहे असे म्हणण्यास हरकत नाही. वंचित बहुजन आघाडीची सुरवात चांगली आहे तर अंतिम उद्देशही लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाचे उद्धिष्ट उराशी बाळगून कटिबद्ध होऊया.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275

1 comment:

  1. Do not dwell in the past, do not dream of the future, concentrate the mind on the present moment.”
    जय शिवराय जय भीम जय भारत करतो Sir अपनास खूप छान लिहिले

    ReplyDelete