#Once_Again_Ambedkar
बौद्ध धम्मात
आणि बौद्ध धर्मियांत राजकारणाचे महत्व
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
१८ मे २०१९ ला संपूर्ण जगात बुद्ध जयंती मोठ्या
थाटामाटात साजरी होईल. तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाईल. एक दिवस त्यांच्या
तत्वज्ञानाच्या अनुपालनाचा बागुलबुवा उभा केला जाईल. बुद्ध जयंती जशी जगात साजरी
केली जाईल. तशीच ती बुद्धाच्या गृह्क्षेत्रात म्हणजेच भारतातही तितक्याच थाटामाटात
साजरी होईल. प्रत्येक बुद्धविहारात जयंतीचे कार्यक्रम साजरे होतील. कुणी बुद्ध भीम
गीतांचा कार्यक्रम घेईल. कुणी खिरदान कार्यक्रम करतील. कुणी प्रबोधनाचे कार्यक्रम
घेतील. तर कुणी बुद्ध चरित्रावर व्याख्यानांचे कार्यक्रम घेतील. बुद्ध भीम गीत
गाणाऱ्यांना मानधन मिळेल. प्रबोधनकारांना रग्गड मानधन मिळेल. बुद्ध चरित्रावर
व्याख्यान देणाऱ्या भाषणकारांना देखील योग्य तो मोबदला मिळेल. एकंदरीतच सर्वांचा
व्यवसाय संपूर्ण आठवडा मस्त पैकी भरभराटीला आलेला असेल. पण या सर्वात बुद्ध
जनमानसात पोहचेल की नाही ? बुद्ध जनमानसात रुजेल की नाही ? खरा बुद्ध जनतेपुढे
मांडला जाईल की नाही ? या प्रश्नांची उत्तरे मात्र देता येणार नाही. बुद्ध जयंती
संपली की त्यानंतर काय चालते हे आपण सर्वांना माहिती आहे.
त्रिशरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना
याच्या पुढे बुद्ध जाणार की नाही ? याची चिंता मला वयाच्या चाळीशीत लागलेली आहे.
तशीच ती माझ्या पिढीच्या अनेकांना लागली असेल व मागेपुढे लागेलही. भविष्यातही हे
प्रश्न पडतील. कधीतरी या प्रश्नांचे समाधान करावेच लागणार आहे. बुद्ध फक्त इतकाच
आहे का ? बुद्ध फक्त विहारातच आहे का ? बुद्ध फक्त भिक्षूंच्या वाणीतून येतो
तेवढाच आहे का ? बुद्ध फक्त विहारातून जितका कानावर पडतो तितकाच आहे का ? स्वतःला
बौद्ध, बुद्धिस्ट म्हटले की तिथेच बुद्ध संपतो का ? बुद्ध गीतांतून ऐकायला येणारा
बुद्धच तेवढा घ्यायचा का ? प्रबोधनातून मांडला जाणारा बुद्ध तेवढाच मर्यादित आहे
का ? भाषणातून सांगला जाणारा बुद्ध हाच खरा बुद्ध आहे का ? त्याच्याही पुढे मालिका
आणि चित्रपटातून दाखविला जाणारा बुद्ध हेच बुद्धाचे चरित्र आहे का ? धम्म म्हणजेच
बुद्ध की बुद्ध म्हणजेच धम्म ? हे कोडेही सोडवावे लागणार आहे कि नाही. धम्माच्या
पुढेही कुठेतरी बुद्ध असेल किंवा बुद्धाच्या परिमित सीमेत बुद्ध बांधला जातो का ?
बुद्ध मानवी जीवनाला माणुसकीत बांधणारा धम्म देतो, मानवतावाद देतो म्हणून फक्त
धार्मिकतेत बुद्ध थांबत नाही. तो तिथेच न थांबता, बुद्ध सामाजिकता देतो. बुद्ध
आर्थिकताही देतो. बुद्ध राजकारणाचा आदर्शही देतो. एकंदरीतच बुद्ध मानवीयतेच्या
सर्व अंगांना स्पर्श करतो. परंतु बुद्धांची सर्वव्यापकता विसरली गेली. दुर्लक्षित
केली गेली. त्यात सर्वात दुर्लक्षित जर काही केले गेले असेल तर ते म्हणजे
बुद्धांची राजकीयता व राजकारणाचा आदर्श. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत
बुद्धांची हीच सर्वव्यापकता ओळखली होती. म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्धांच्या
प्रत्येक तात्त्विक व बौद्धिक अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या लेखात फक्त
बुद्धांचे राजकीय तत्वज्ञान, आणि बौद्धांचे राजकारण एवढाच विचार आपण केला तर पुढील
अनेक पिढ्यांच्या प्रश्नांचे समाधान आपण करू शकू.
नुकतेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात देखील चार
टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत स्वतःला बुद्धिस्ट म्हणविणारा
पांढरपेशी जो स्थानिक बुद्धविहारात आपले साम्राज्य राखून आहे. विहाराचा प्रमुख
आहे. विहार कमिटीचा सदस्य आहे. तो कुठे होता ? त्याची भूमिका काय होती ? काही
अपवाद असतील असे गृहीत धरुयात. परंतु ‘धम्म आणि राजकारणात गफलत होऊ नये.’, ‘धम्मात
राजकारण येऊ नये.’, ‘विहारातून राजकारण केले जाऊ नये.’ हे नेहमी कानावर पडणारे
वाक्य याही निवडणुकीत कानावर पडले नसतील तर नवलच. अशी वाक्ये ज्या ज्या मुखातून
द्रवतात, त्या त्या बुद्धीला बुद्ध, धम्म, विहार आणि राजकारण कळले आहे का ? हा
प्रश्न पुढे येतो. यावर्षीची बुद्ध जयंती साजरी करीत असतांना बुद्ध, धम्म, विहार
आणि राजकारण यांच्यात मेळ घालून पुढे गेलोत, तर काहीतरी भविष्याला दिशा देता येईल
हे आपण लक्षात घ्यावे.
१७ मे १९४१ ला बुद्धजयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता’ या
साप्ताहिकातून एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘बुद्धजयंती आणि
तिचे राजकीय महत्व.’ या लेखात त्यांनी जातक कथेतील बुद्ध चरित्र थोडक्यात समजावून
सांगण्याचा प्रयत्न केला. व त्यानंतर भारतीय सामाजिक व राजकीय परिप्रेक्षात बुद्ध
व त्यांचे तत्वज्ञान किती महत्वाचे आहे, आवश्यक आहे. हे समजावून सांगण्याचा
प्रयत्न केला. सोबतच इथली ब्राम्हणी व्यवस्था, चातुर्वर्ण्य, जात, ब्राम्हण,
ब्राम्हणेत्तर इ. चे सामाजिक अधिष्ठान, संघर्ष, सत्ता, पिळवणूक भारतीय समाजकारणात
व राजकारणात वास्तवात कसे मांडले जाते याचे विविध दाखले देऊन स्पष्ट करण्याचा
प्रयत्न केला. लोकशाही आणि बुद्ध यातील संतुलन साधतांना बुद्ध जयंतीला कसे राजकीय
महत्व आहे. हे समजावून सांगण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. या
लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ब्राम्हणी धर्म आणि लोकशाही ह्या
परस्परविरोधी, एकमेकांस विरोधी गोष्टी आहेत. लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य
नाहीसे झाले पाहिजे. हे चातुर्वर्ण्य जंतू काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या
तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही, असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही म्हणतो की, राजकारणाची
रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्धजयंती सर्व हिंदूंनी साजरी करणे हितावह व आवश्यक
आहे....” त्याच लेखात पुढे म्हणतात, “हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंती करून होणार
नाही, कृष्णाची जयंती करून होणार नाही किंवा गांधींची जयंती करून होणार नाही. राम,
कृष्ण, गांधी हे ब्राम्हणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला
त्यांचा काही उपयोग होणार नाही. उपयोग झाला तर एका बुद्धाचाच होऊ शकेल त्याची आठवण
घेणे आणि त्याचीच मात्र घेणे हाच एक हिंदुमात्राच्या राजकीय व सामाजिक
रक्तशुद्धीचा उपाय आहे, असे आम्हास निःसंशय वाटते.” (संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता १९२९ ते १९५६, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड २०, पान क्र. ३३५) एकंदर लोकशाहीचे प्रचलित व संचालित रूप बुद्ध तत्वज्ञानात
मांडण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. लोकशाहीनेच हा देश पुढे जाऊ
शकतो. लोकशाहीनेच इथला सामाजिक संघर्षाचा डोलारा उद्ध्वस्त होऊ शकतो. लोकशाहीनेच
इथली जुलमी व अन्यायकारी व्यवस्था उलथवून टाकता येऊ शकते. म्हणून लोकशाहीच्या
सुसूत्रीकरणासाठी आणि ब्राम्हणी राजकारणाच्या रक्तशुद्धीसाठी बुद्ध तत्वज्ञान
महत्वाचे आहे. व त्यासाठी बुद्ध जयंतीला राजकीय महत्व आहे. व ती हिंदूंनी देखील
लोकशाहीच्या संरक्षणासाठी साजरी केली पाहिजे इतकाच उद्दात्त हेतू डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या पुढे होता.
बुद्ध तत्वज्ञान लोकशाही मांडते. लोकशाहीचे समर्थन करते. अन्यायाला टाळून
न्यायाचे राज्य मांडते. जनतेचे कल्याणकारीत्व उद्धृत्त करते. भेदाभेद संपवून
समतेचे राज्य प्रस्थापित करते. बुद्ध तत्वज्ञानात ही लोकशाही कशी व कुठून आली ?
याचे विवेचन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ‘बुद्ध आणि त्यांचा
धम्म’ हा ग्रंथ किंवा मूळ बुद्ध चरित्र आपल्याला हे सांगते की मुळात बुद्धाची
निर्मिती हीच लोकशाहीतून झालेली आहे. समतेच्या आग्रहातून झालेली आहे.
अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यातून झालेली आहे. कल्याणकारी तत्वांचा राज्यांनी
अंगीकार करावा या भूमिका मांडणीतून झालेली आहे. शाक्य पंचायतीत न्यायाची भूमिका
मांडण्यातून बुद्ध निर्माण झाला आहे. रोहिणी नदीच्या पाणी संघर्षातून बुद्ध
निर्माण झालेला आहे. एकंदरीतच बुद्धाच्या निर्मितीला राजकारण, राजकीय व्यवस्था,
गणपंचायत जबाबदार आहे हे आपल्याला बुद्ध चरित्रातून सापडते. त्यामुळे बुद्ध आणि
राजकारण हे वेगवेगळे करता येणार नाही किंवा ते वेगवेगळे राहू शकत नाही. राजकारणाला
बुद्ध हा नेहमीच मार्गदर्शक राहील, संदेश देणारा विचार राहील. त्यामुळे जो जो
लोकशाहीला मानतो तो तो राजकारणापासून बुद्धाला अलिप्त ठेवू शकत नाही. राजकारण हा
बुद्धाचा अविभाज्य अंग आहे, तो स्वीकारावा लागेल आणि राजकीय भूमिका घ्यावीच लागेल.
परत एक उदाहरण बुद्धाच्या राजकीय प्रगल्भतेचा आणि राजकारणाच्या मर्मगर्भाचा
आपल्याला लक्षात घ्यावाच लागेल. ते उदाहरण म्हणजे मगध चा राजा अजातशत्रू चे आहे.
अजातशत्रू हा मगधचा राजा होता. परंतु बुद्धाच्या विचारांना प्रभावित होऊन,
अजातशत्रूने बुद्धाला शरण जाऊन धम्माचा अंगीकार केला. व राज्यकारभार करू लागला.
बुद्ध धम्मातील अहिंसा तत्वाचा अंगीकार करून शस्त्राने नव्हे तर शांती व अहिंसेचा
स्विकार करून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करू लागला. राज्यातील जनताही राज्याचा कारभार
शांती व अहिंसेच्या मार्गाने चालतांना पाहून खुश होती. परंतु शेजारील राज्याकडून
मगध साम्राज्यावर आक्रमणे होऊ लागली. सीमावर्ती भागात शत्रूंनी धुमाकूळ घातला.
मगधचे राज्य लुटले जाऊ लागले. मगधची जनता असुरक्षित झाली. अजातशत्रू ला प्रश्न
पडला की मी बुद्धाचा धम्म, बुद्धाचा मार्ग स्वीकारून देखील माझे राज्य असुरक्षित
होऊ लागले. राज्य मी सुरक्षित ठेवू शकत नाही. राज्यातील जनतेला सुरक्षितता देऊ शकत
नाही. परकीय आक्रमणांना थांबवू शकत नाही. अशा अनेक प्रश्नांनी अजातशत्रू ला घेरले
होते. या प्रश्नांच्या समाधानासाठी अजातशत्रू बुद्धाकडे गेला. आणि बुद्धाला मगध
साम्राज्यात चाललेली वास्तविकता सांगितली. मी तलवार टाकली आणि धम्म स्वीकारला.
तेव्हा बुद्धाने अजातशत्रू ला जो संदेश दिला तो अतिशय महत्वपूर्ण होता. बुद्ध
म्हणतात, “हे अजातशत्रू ! मी तुला धम्म दिला तो तुझ्या व्यवहार नीतीत बदल करणारा
आहे. तुझ्या व्यक्तिगत जीवनात परिवर्तन करणारा आहे. तो तुला समतेने व न्यायाने
वागायला शिकवेल. माझा धम्म तुला शांती प्रस्थापित करायला बाध्य करेल. अहिंसेपासून
तुला परावृत्त करेल. राज्याला कल्याणाच्या मार्गावर नेण्यास मार्गदर्शन करेल.
परंतु हे करीत असतांना अजातशत्रू हे लक्षात ठेव की तू या मगध साम्राज्याचा राजा
आहेस. आणि राजाचे प्रथम कर्तव्य हे आहे की, त्याने आपले राज्य सुरक्षित ठेवले
पाहिजे. परकीय आक्रमणापासून जनतेला सुरक्षित ठेवले पाहिजे. स्व साम्राज्याचे रक्षण
करतांना तुला तलवार हातात घेऊन शत्रूंशी लढावेच लागेल तेव्हाच तुझे राज्य व
राज्यातील जनता सुरक्षित राहील. आणि राज्य व राज्यातील जनता सुरक्षित राहिली तर
तुला समतेचे, न्यायाचे व कल्याणाचे राज्य आपल्या राज्यातील जनतेसाठी करता येईल.
माझा धम्म तुला तू राजा आहेस हे विसरण्यासाठी नव्हे तर तू राजा आहेस तर त्या
राज्याचे कर्तव्य काय हे सांगण्यासाठी आहे. राजाने आपल्या प्रजेसाठी काय करावे हे
सांगण्यासाठी माझा धम्म आहे. तू राजा आहेस हे विसरू नको. राज्याच्या व प्रजेच्या
सुरक्षिततेसाठी तुला शस्त्र उचलावे लागतील तेव्हा माझा धम्म तुला तिथे अडविणार
नाही.” बुद्धांचा हा संदेश ऐकून अजातशत्रूला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
मिळाली. बुद्धांची अशी अनेक राजकीय उदाहरणे देता येतील व अभ्यासायला मिळतील.
आधुनिक भारतात अजातशत्रू च्या रुपात दिसणाऱ्या (राजे नसले तरी) अनुयायांना
बुद्धांच्या या संदेशातील राजकारण, राजकीय नीती किती कळली ? हा प्रश्न आहे. किंवा
किती कळेल याची चिंता आहे. धम्माला राजाश्रय मिळाला म्हणून धम्माचा प्रचार व
प्रसार झाला हे कुणीच नाकारू शकत नाही. तसेच कुठल्याही धर्माच्या सुरक्षिततेसाठी
राजाश्रय हवाच असतो. इतिहासात तो राजाश्रय प्रत्येकच धर्माला मिळत गेला. नव्हे
राजाश्रयातुनच धर्म फलद्रूप झाले. परंतु आधुनिक लोकशाहीत केवळ एका धर्माला
राजाश्रय दिला जाऊ शकत नाही. राजेशाही संपून आता लोकशाही आलेली आहे. त्यामुळे या
लोकशाहीत प्रत्येकच धर्माला समान राजाश्रय मिळणे आवश्यकच आहे. एकांगी धर्माला
राजाश्रय मिळत गेला तर काय परिस्थिती उद्भवू शकते हे भारताने २०१४ ते २०१९ या ५
वर्षाच्या भाजप-आरएसएस च्या सत्ताकाळात अनुभवलेले आहे. त्यामुळे लोकशाहीत
प्रत्येकच धर्माचे अनुयायी निदान धर्मसंरक्षणासाठी तरी संसदेत निवडून गेले पाहिजे.
हा इतकाच साधा विचार जरी आम्ही करू शकलो, तर भारताची राजकीय परिस्थिती व बौद्ध
धर्मीयांची राजकीय अवस्था बदलल्याशिवाय राहणार नाही. व या परिस्थितीत बदल करायचा
असेल तर धम्म संदेश देणाऱ्या विहारातून या राजकारणाची सुरवात होणे गरजेचे आहे.
हिंदूचे राजकारण मंदिरातून चालते. मुस्लिमांचे राजकारण दर्गाह व मशिदीतून चालते.
शिखांचे राजकारण गुरुद्वारातून चालते. मग बौद्धांचेच राजकारण विहारातून का चालत
नाही. याचा विचार बौद्ध अनुयायी म्हणविणाऱ्या सर्वांनी करणे गरजेचे आहे. बुद्ध व
बाबासाहेब यांना मानणारा वर्ग जो विहारातून राजकारणाला हद्दपार करून, बुद्ध व
बाबासाहेब या दोन्ही महान विचार पुरुषांची अवहेलना करून बसलेला आहे, त्याने बुद्ध
व बाबासाहेब यांचे राजकीय विचार व त्याला अनुसरून चालणारे राजकारण लक्षात घेऊन
आपल्या भूमाकांमध्ये बदल घडवून आणणे क्रमप्राप्त आहे. तेव्हाच बौद्धांना राजकीय
मरगळ झुगारून बुद्ध व बाबासाहेब यांना अपेक्षित भारतीय लोकशाही या देशात निर्माण
करता येईल.
ही परिस्थिती महाराष्ट्रात व येथील विहारातच आहे असे नाही. जवळपास भारतभरात
सर्वच बौद्ध विहारात हीच राजकीय मरगळ लागलेली आहे. निवडणुका आल्या की विरोधकांच्या
कच्छपी लागून आम्ही ‘विहारातून राजकारण नको’ असे ओरडायला लागतो. व स्वतःचे राजकारण
स्वतःच संपवून बसतो. याचा अनुभव आम्ही मागच्या ७० वर्षांपासून घेत आहोत. आतातरी
तथागत बुद्धाचे राजकारण समजून घेऊन धम्माचे व धम्म अनुयायांचे राजकीय मार्गक्रमण
करण्यास सुरवात करूया.
महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी ने
जनमानस ढवळून काढलेले आहे. बुद्धांनी सांगितलेली समतेची, न्यायाची, कल्याणाची
लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या लोकशाहीला ज्या संविधानात मांडले, ते
संविधान वाचविण्यासाठी सर्व मागास, वंचित व ब्राम्हणेत्तरांना सोबत घेऊन २०१९ ची
लोकसभा लढविली आहे. येणाऱ्या ४-५ महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. या
विधानसभा निवडणुकी पर्यंत बुद्ध, बाबासाहेब मानणाऱ्या बौद्ध धम्मियांनी व
अनुयायांनी विहारातून बुद्धांचे व बाबासाहेबांचे राजकारण निदान समजून घेतले,
त्यावर चर्चा केली, तरी येणारी विधानसभा व महाराष्ट्राची सत्ता बौद्धांना व
आंबेडकरी अनुयायांना आपल्या ताब्यात घेता येईल. २०१९ च्या लोकसभेपर्यंत आलेला
विहारांचा अनुभव विधानसभेपर्यंत बदलता आला तर खऱ्या अर्थाने आम्ही बुद्ध जयंती
साजरी केली व बुद्ध खऱ्या अर्थाने समजून स्विकारला असे होईल. अन्यथा आधुनिक
पुष्यमित्र शुंग तुमचा सामाजिक, धार्मिक व राजकीय वध करायला टपून बसलेले आहेत.
बुद्ध व बाबासाहेब फक्त तोंडात राहून उपयोग नाही तर त्यांना बुद्धी, उक्ती व कृतीत
उतरविता आले तरच धम्म टिकेल, बुद्ध टिकेल, बाबासाहेब टिकतील व तुम्ही आम्ही टिकू
शकू. त्यामुळे ही बुद्धजयंती साजरी करीत असतांना आपल्यातले विहारात दडून बसलेले
पुष्यमित्र शुंग ओळखा. बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वध करू पाहणारे
चातुर्वर्णी ओळखा. बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय तत्वज्ञानाला व
त्यांच्या हयातीत त्यांनी केलेल्या राजकारणाचा अभ्यास करून, या बुद्ध जयंतीला
‘राजकीय बुद्ध जयंती’ म्हणून साजरी करण्याचा निर्धार करून, महाराष्ट्राच्या
विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समतेचे, न्यायाचे, कल्याणाचे व
लोकशाहीचे चक्र गतिमान करण्यासाठी सज्ज होऊयात.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप
नंदेश्वर-
8793397275
No comments:
Post a Comment