Monday 21 January 2013

जाती अंताची लढाई : प्रकाश आंबेडकर विरुद्ध 'जात'




जाती अंताची लढाई : प्रकाश आंबेडकर विरुद्ध 'जात'
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.....८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

कुठलाही क्रांतिकारी विचार समाजव्यवस्थेत रुजवत असतांना वाद-प्रतीवादाच्या कसोटयातूनच जात असतो. क्रांतिकारी विचाराला सुरवातीच्या काळात विरोध केला जातो. परंतु जेव्हा परिस्थिती सापेक्ष बदल येणा-या काळात नवीन पिढीसमोर येतात तेव्हा नाकारला गेलेला तोच क्रांतिकारी विचार ती पिढी स्वीकारायला तयार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत असेच घडले होते. सुरवातीला त्यांच्या क्रांतिकारी विचारांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. ज्या समाजासाठी/ माणसांच्या उत्थानासाठी ते विचार होते. त्याच माणसांकडून त्यांचे विचार नाकारले जात होते. परंतु शेवटी त्यांच्या विचारांचा स्वीकार करूनच हजारो वर्षे जातीय, वर्णीय, सामाजिक गुलामगिरीत काढलेल्या वर्गाने केला.  आणि समाजात एक आमुलाग्र बदल/परिवर्तन घडून आले. आज 'शाळेच्या दाखल्यावरून जात काढून टाकावी.' असा क्रांतिकारी विचार मांडून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी सामाजिक विरोध पत्करून घेतला आहे. आरक्षण आणि जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाच्या आहारी गेलेल्या समाजाला या विचाराने बोलते केले आहे. त्यांना विचारप्रवृत्त केले आहे. परंतु हा विचार या समाजात स्वीकाराच्या पातळीपर्यंत येण्यास वेळ जावा लागेल. हा विचार सहज स्वीकारला जाणार नाही. म्हणून तो अमान्य होतो असेही नाही. या विचाराचा पर्याय म्हणून स्वीकार येणा-या काळात परिस्थिती सापेक्ष बदलासवे केला जाईल. हे निश्चित.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांनी समाजात एका वैचारिक चर्चेला सुरवात केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. हा मुद्दा जाती अंताच्या लढाईतील पहिले पाऊल आहे. पण अंतिम नाही. हे आधी लक्षात घ्यावे. आजपर्यंत अनेक प्रयोग आम्ही करून पाहिले परंतु सर्व अपयशी ठरले. मग जर हा प्रयोग केला तर त्यात काय वाईट ? शेवटी बाळासाहेब आंबेडकरांनी हे सुद्धा म्हटले आहे कि हे करीत असतांना आम्हाला पर्याय द्यावे लागतील. त्यावर चर्चाच होत नाही. आमची लढाई जातीअंताची आहे कि जाती टिकवून ठेवण्याची आहे ? हे आधी स्पष्ट होणे गरजेचे आहे. माझ्या मते आपली लढाई जातीअंताची आहे. मग त्यासाठी आम्ही प्रयोगाला तयार असले पाहिजे. व त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला सोडविण्यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपली विद्वत्त शक्ती खर्च केली पाहिजे.

शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. या मुद्द्यावरून आज भारतीय आंबेडकरी समाजात ३ वर्ग निर्माण झाले आहेत. एक वर्ग १. सुशिक्षित आंबेडकरी वर्ग (चळवळीची जाण असणारा वैचारिक वर्ग) आहे. जो या भूमिकेचे स्वागत करतो आहे. कारण जातीअंताची लढाई कुठून तरी सुरु झाली पाहिजे. हा वर्ग जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाची पर्व करतांना दिसून येत नाही. तो या वर्गाला नवीन पर्यायी लाभाची व्यवस्था पुरविण्यासाठी काय करता येईल यावर विचारमंथन करायला लागला आहे. दुसरा वर्ग २. सुशिक्षित आंबेडकरी वर्ग (चळवळीपासून अलिप्त असणारा आणि जातीचे लाभ घेऊ पाहणारा वर्ग) जो या भूमिकेचा विरोध करीत आहे. कारण त्याला भीती आहे कि जातीच्या आधारावर मागील ६३ वर्षापासून मिळणारे लाभ हिसकावले जातील अशी त्याला भीती वाटत आहे. हा वर्ग एकीकडे जातीअंताच्या बाबासाहेबांच्या भूमिकेशी स्वतःला चिटकून ठेवू पाहतो पण जाती अंतासाठी पाऊल उचलू पाहत नाही. असा हा संभ्रमावस्थेत असलेला वर्ग आहे. तिसरा वर्ग ३. अशिक्षित व चळवळ, आंबेडकरी विचारांपासून अलिप्त असणारा वर्ग (जातीच्या खाईत जगणारा वर्ग) जो स्वतःची ठाम अशी भूमिकाच घेऊ शकत नाही. जात गेली तर मला मिळणारे लाभही जातील या भीतीने तो या भूमिकेला विरोध करीत आहे. आणि हा वर्ग संखेने मोठा आहे. पण तो वरील २ वर्गाच्या भूमिकेची वाट बघत आहे. अशा परिस्थितीत आज सामाजिक द्विधा मनस्थितीचे विश्लेषण आम्ही केले पाहिजे.

शैक्षणिक दाखल्यावरून जात वगळावी. या भूमिकेने आंबेडकरी समूहाच्या बाहेरही गैर आंबेडकरी समाजात प्रतिक्रिया निर्माण केलेल्या आहेत. त्यातही ३ वर्ग पडलेले आहेत. पहिला वर्ग १. परिवर्तनवादी विचारांनी प्रभावित झालेला सुशिक्षित वर्ग. जो जातीव्यवस्थेने प्रभावित झालेला आहे. तो जात मोडू पाहत आहे. जात संपली पाहिजे व जातीच्या बाहेर जाऊन त्यांची एक ओळख निर्माण झाली पाहिजे असे म्हणतो आहे. मानवतावादी आणि भारतीयत्व आपली ओळख म्हणून स्वीकारू पाहतो आहे. हा वर्ग बाळासाहेबांच्या या भूमिकेला समर्थन करीत आहे. व या भूमिकेचे स्वागत करीत आहे. दुसरा वर्ग २. हिंदू धर्मातील आरक्षण विरोधी वर्ग. जो वर्ग इथल्या संविधानाने मागासवर्ग व अनुसूचित जाती-जमाती ला दिलेले आरक्षण व सवलतीला विरोध करतो आहे. त्याला असे वाटते कि जात दाखल्यावरून नष्ट झाली तर यांना मिळालेले आरक्षण व सवलती पण नष्ट होतील. हा वर्ग दाखल्यावरून जात संपविण्याच्या भूमिकेला समर्थन करीत आहे. तिसरा वर्ग ३. तटस्थ प्रतिगामी मुलतत्ववादी हिंदू वर्ग. हा वर्ग या मुद्द्यावर आपली सावध भूमिका घेत आहे. तो समर्थनही करीत नाही आणि विरोधासाठीही समोर येत नाही. कारण त्याची या भूमिकेने कोंडी होणार आहे. जात संपविण्याच्या मुद्द्याला समर्थन केले तर त्यांचा मुलतत्ववाद संपुष्टात येउन एकूणच हिंदू व्यवस्था व धर्म कोलमडून पडतो. आणि विरोध केला तर जातीच्या आधारावर शोषण करणारे म्हणून चेहरे समोर येतील. व समाजातून एका मोठ्या विरोधाला समोर जावे लागेल. त्यामुळे या वर्गाची परिस्थिती "इकडे आड तिकडे विहीर" अशी झाली आहे. एकूणच या सर्व भूमिकेतून दाखल्यावरील जात संपुष्टात आणण्याच्या भूमिकेला समाजातून स्वागतच आहे. परिस्थितीने समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणले आहे हे त्याचे प्रतिक आहे असे समजायला हरकत नाही.

 एक गोष्ट आधी आपण लक्षात घेतली पाहिजे. कि जातीचा नष्ट करण्याचा मुद्दा बुद्ध धम्माशी निगडीत नाही. तो पूर्णतः हिंदू धर्माशीच निगडीत आहे. त्यामुळे जातीअंताची सुरवात हि आजही जे हिंदू आहेत त्यांच्यासाठीच आहे. भारतीय संविधानाने बौद्ध धम्माला अल्पसंख्यांक दर्जा दिलेला आहे. त्यांचे अधिकारही वेगळे आहेत. त्यांच्या सवलतीही वेगळ्या आहेत. त्यामुळे जे हिंदू आहेत पण ते जातीच्या विषारी पायाखाली तुडविले जात आहे. त्यांनी निदान आपली जात संपवून मानवतावाद स्वीकारावा. भारतीयत्व स्वीकारावे यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला गेला आहे. या मुद्द्याला उगाच बौद्ध धम्माशी जोडून आम्ही आपली फसवणूक करून घेऊ नये. हा मुद्दा पूर्णतः हिंदूंशी निगडीत आहे.

जातीच्या दलदलीत सापडलेल्या हिंदूंना किंवा मुलाच्या नागवंशीयांना जातीच्या आधारावर मिळालेले अधिकार हिरावले जाणार नाही यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. पण जाती टिकवून ठेऊन किंवा ते आज न उद्या बौद्ध होणार आहेत या आशेवर राहून जातीअंताच्या या लढ्याला विरोध करणे कुठेही तार्किक नाही. मुळात त्यांची जात नष्ट करून (दाखल्यावरून) त्यांना नवीन पर्याय देणे गरजेचे आहे. हे साधे तर्क आम्ही जातीअंतासाठी लढणा-या माणसांनी लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेबांनी जातीवर आधारित आरक्षण दिलेले नाहीत. तर ज्या कुठल्या पूर्वापार जाती होत्या ज्या विकासाच्या प्रक्रियेपासून हजारो वर्ष दूर ठेवल्या गेल्या होत्या त्यांना अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), भटक्या विमुक्त (NT & VJ), इतर मागासवर्गीय (OBC) अश्या वर्गात टाकण्यात आले आहे. त्यांनी जातींना गोंजारले नाही. जातींचा एक वर्ग तयार केला. परंतु संविधानाच्या ६३ वर्षाच्या अंमलबजावणीनंतरही जर हि बाबासाहेबांची भूमिका आम्ही समजून घेत नसू तर तो बाबासाहेबांचा अपमान होईल. जगातल्या महान घटनाकाराचा अपमान होईल.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या "शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करावी." या मुद्द्यावरून बरेच रणकंदन माजले आहे. पण जातीव्यवस्था मोडकळीस आणण्यासाठी एक वैचारिक चर्चा या अनुषंगाने सुरु झाली आहे. जातीव्यवस्था संपविण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल समजावे. परंतु या भूमिकेवरून (मुद्द्यांवरून) अनेक नवीन तथ्य आणि वास्तव समोर येणार आहे. बाळासाहेबांनी आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित करता बरोबर भारतीय समाजातील ३ घटकांमध्ये हलचल सुरु झाली. वैचारिक आणि सामाजिक रणकंदन माजले आहे. त्यातले पहिला घटक १. आंबेडकरी समाज, दुसरा घटक २. हिंदू समाज आणि तिसरा घटक ३. परिवर्तनवादी समाज. यातला पहिला समाज जो स्वतःला आंबेडकरी समाज संबोधतो. जो मुळात जाती निर्मुलनासाठी इतक्या वर्षापासून लढा देत आहे. त्या समाजातले अनेक वास्तव उघड होत आहेत. ते येणेप्रमाणे- १) आंबेडकरी समाज जो सदैव स्वतःला बौद्ध म्हणवून घेतो तो ख-या अर्थाने बौद्ध आहेत कि नाही ? हे समोर येईल. २) दाखल्यावरून जात नष्ट व्हावी या भूमिकेच्या विरोधात गेलेला आंबेडकरी समाज हा बौद्ध नाही तर तो स्वतःची जात टिकवून ठेऊन हिंदू धर्मातच वास्तव्य करीत आहे हे लक्षात येईल. ३) जे आंबेडकरी बौद्ध झाले आहेत ते या भूमिकेला विरोध करणार नाहीत. कारण बौद्ध धम्माचा आणि जातीचा कुठलाही तिळमात्र संबंध नाही. बौद्ध धम्म अल्पसंख्यांक आहे.  त्यामुळे या भूमिकेमुळे त्याच्यावर कुठलाही परिणाम होणारा नाही. एकूणच बौद्ध कौण ? आणि हिंदू आंबेडकरी कौण ? हे यावरून ओळखता येणार आहे. ४) बौद्धांना अनुसूचित जातीच्या देखील सुविधा मिळत आहेत. (पहा - MPSC च्या भरतीतील आरक्षणाचे कॉलम) तरीही ते स्वतःच्या अधिकाराबद्दल जागृत नाहीत हे सिद्ध होईल. ५) जात हि आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय होऊ शकत नाही. उलट जाती नष्ट करणे हाच त्यांचा एकसूत्री कार्यक्रम आहे. तरीही जे जाती टिकविण्याची धडपड करतात. म्हणजेच ते आंबेडकरी नाहीत हे सिद्ध होईल. एकूणच “एका दगडात अनेक पक्षी मारल्यासारखे” झाले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाची मानसिकता अभ्यासण्याच्या दृष्टीने जाती अंताचा हा नवीन पवित्रा (भूमिका) कामात येणार आहे.

दाखल्यावरून जात काढल्याने जातीव्यवस्था जाणार नाही. एवढे न समजण्याइतके दुधखुळे बाळासाहेब आंबेडकर नक्कीच नाहीत. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेला समर्थन करणारे सुद्धा काही दुधखुळे नाहीत. यामागची भूमिका व्यापक आहे. अगदी तुमच्या शैक्षणिक प्रगतीवरही जर तुमची जात तुमचा पिच्छा पुरवीत असेल तर आम्ही त्या जातीला गोंजारत का बसायचे ? नक्कीच मानवी विकास आणि संधीची समानता मानणा-या वर्गाने तरी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची ओळख हि जात विरहीत सिद्ध करावी. अशीच त्यामागची भूमिका असावी. परंतु जातीच्या आधारावर मिळणा-या लाभाच्या हव्यासापोटी आम्ही जात टिकून राहावी असे म्हणत असू तर स्व-चिंतनाची गरज आहे. याच मानसिकतेतून जर हा समाज सतत जात राहिला तर हजारो वर्षे हि जातीव्यवस्था तशीच टिकून राहील. मनुवादी मानसिकतेने शोषणासाठी/ काही वर्गाच्या गुलामिसाठी/ मोजक्या लोकांच्या हातात सत्ता टिकवून ठेवण्यासाठी निर्माण केलेली जातीव्यवस्था आज आधुनिक काळात संविधानातून जातीच्या आधारावर मिळणा-या लाभासाठी टिकवून ठेवली जात आहे. तेही अनेक वर्ष पर्यंत टिकून राहील. कारण कधीही कुठल्याही काळात जातीच्या आधारावर मिळणारे लाभ तसेच मिळत राहावे. यासाठी आरक्षणाचा लाभ घेणारा वर्ग जातीव्यवस्था मोडायला तयार होणार नाही. आणि मग अश्या परिस्थितीत भारतीय समाजाला जातीव्यवस्था हि शाप आहे असे म्हणना-यांचे खरे चेहरे उघड पडतील. त्यांना जातिव्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकारही राहणार नाही.

हा मुद्दा हाताळतांना खेदाची बाब अशी वाटते कि, जातीव्यवस्था टिकवून ठेवणे हा ज्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे ते ब्राम्हणवादी, मनुवादी, जातीवादी मुग गिळून चूप बसले आहेत. आणि जातिव्यवस्थेच्या विरुद्ध गरळ ओकणारे आंबेडकरी जे स्वतःला बेंबीच्या देठापासून बौद्ध म्हणतात (फक्त भाषणात प्रत्यक्षात नाही) ते दाखल्यावरून जात काढावी या भूमिकेचा विरोध करीत आहेत. जातीव्यवस्था मोडकळीस यावी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Annhilation of Caste चा दाखला देऊन) असे म्हणणारे कुठल्या स्वप्नाळू जगात जगत आहेत ? किती वर्षांनी ते जातीव्यवस्था संपविण्यासाठी पाऊल उचलणार आहेत ? सुरवात कशी करणार आहेत ? या प्रश्नांचे उत्तरही त्यांच्याकडे नाही. एकंदरीतच त्यांचा मुद्दा जातीचे संवैधानिक फायदे लाटण्यापुरताच मर्यादित झाला आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव घेऊन भावनिक आंदोलन उभारण्यापुरतेच ते मर्यादित झाले आहेत असे म्हणावे लागेल. प्रत्यक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित व्यवस्था निर्माण करण्यात त्यांना काहीही स्वारस्य वाटत नाही. असे खेदाने म्हणावे लागेल.

बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या दाखल्यावरून जात काढावी या भूमिकेच्या विरोधात जाणारा एक वर्ग हा राजकारण्यांचा आहे. जो प्रत्यक्षात सत्तेच्या बाहेरच आहे. समाजाचा राजकीय सौदा करून राजकीय पक्ष चालविणा-यांचा वर्ग आहे. मुळात स्वतःला आंबेडकरवादी राजकीय पक्ष म्हणविना-यांचा वर्ग आहे. जो सदैव बाळासाहेबांच्या विरोधात उभा राहिला. असा तो वर्ग आहे. आणि हाच वर्ग आज समाजात बाळासाहेबांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी संभ्रम पसरवित आहे. परंतु हे स्पष्ट करावे लागेल कि बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेला जाती अंताचा हा मुद्दा कुठेही राजकीय आहे असे दिसून येत नाही. हि भूमिका सामाजिक आहे. वैचारिक आहे. एका नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठीची आहे. राजकीय लाभ या भूमिकेतून कुठलाही दिसून येत नाही. उलट जातीचे लाभ घेणा-या एका मोठ्या वर्गाच्या विरोधाला सामोरे जावे लागल्याने राजकीय गणिते बाळासाहेब आंबेडकरांच्या (भारिप बहुजन महासंघाच्या) विरोधात जाऊ शकतात. म्हणून या भूमिकेकडे राजकीय दृष्टीने न बघता, त्याचे राजकारण न बनविता एका नव्या समाजव्यवस्थेच्या निर्मितीसाठी टाकलेले ते पाऊल आहे. या दृष्टीने त्यांच्या भूमिकेकडे बघितले गेले पाहिजे. तेव्हाच हा महत्वाचा मुद्दा हाताळला जाऊ शकतो. 

जाती नष्ट करण्यासाठी, जाती निर्मुलनासाठी टाकलेले पाऊल म्हणजे मनुवाद्यांचे काम करणे असा युक्तिवाद करणे किती हास्यास्पद वाटते. मनुवाद्यांना कसे काय जात नष्ट करण्याचा पुळका येतो ? हेच कळत नाही. संपूर्ण आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातिव्यवस्थेच्या विरुद्ध लढत राहिले. जातिनिर्मूलन हे उद्धिष्ट घेऊन ज्या जातीव्यवस्थेने आर्थिक, सामाजिक, राजकीय शोषण केले त्या जातीव्यवस्थेला मोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. बौद्ध धम्माचा स्वीकार हा जातीनिर्मुलानातलाच एक पर्याय म्हणूनही त्यांनी निवडला. बाबासाहेबांच्या पश्च्यात गेली ५६ वर्षे म्हणण्यासारखे बौद्ध धम्माचा स्वीकार झालेला नाही. त्यामुळे जातीनिर्मुलनाचा मुद्दा तिथेही मागेच पडला. सामाजिक स्तरावर आणि शासकीय स्तरावरही जातीनिर्मुलनासाठी पाहिजे तसे प्रयत्न केले गेले नाही. आज जातिव्यवस्थेच्या विरुद्ध बोलणारा (गैर आंबेडकरी-बुद्धिस्ट) एक मोठा वर्ग तयार झाला आहे. तो वर्ग बुद्धिझमकडे वळू पाहतो. तर त्यातलेच काही अजूनही बुद्धिझम पासून लांबच आहे. त्यामुळे अश्या परिस्थितीत एक वैचारिक, सामाजिक आणि राजकीय नेतृत्व म्हणून प्रकाश आंबेडकर जातीनिर्मूलनाची एक ठिणगी टाकू पाहत आहेत. तर त्याचा विरोध न करता समर्थन केले जाणेच अपेक्षित होते. ज्यांना जात नको पण परिस्थिती सापेक्ष शासकीय लाभ हवे आहेत त्यांनी बुद्धिझम कडे वळावे. आणि ज्यांना तेही नको त्यांनी मानवतावादाची कास धरावी. शेवटी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेतच.

शाळेच्या दाखल्यावरून जात गेल्याने आरक्षण संपुष्टात येईल किंवा मिळणारे शासकीय लाभ बंद होतील हे म्हणणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. आज अस्तित्वात असलेले नियम जरी लक्षात घेतले तरी हे दिसून येईल कि आरक्षणाच्या लाभार्थी असलेल्या परिवारातील मुलांना आरक्षण मिळतेच. फक्त त्यात ज्यांचे आर्थिक उत्पन्न ५ लाख रुपयापेक्षा अधिक आहे अश्या कुटुंबातील सदस्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. याचाच अर्थ असा कि आरक्षण हे ज्या कुटुंबात जन्म झाला त्यातून पुढे सुरु ठेवता येईल. दाखल्यावर जात असली काय आणि नसली काय ? जो समाज अनेक वर्षापासून वंचित आहे त्या वर्गाला आरक्षणाचा व अन्य लाभाचा फायदा झाला पाहिजे असे वाटते तर ते सद्यकाळात आरक्षणाच्या कक्षेत असणा-या कुटुंबासाठी पुढील आणखी काही वर्षे आपल्याला सुरु ठेवता येऊ शकते. त्यासाठी दाखल्यावर जात असलीच पाहिजे हे जरुरीचे नाही. आरक्षित वर्गाचे कौटुंबिक रेकार्ड तयार करून आम्ही त्यांना आज मिळत असलेले अधिकार पुढील काळातही मिळवून देऊ शकतो. हासुद्धा एक पर्याय दाखल्यावरून जात काढल्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीला सोडविण्यासाठी होऊ शकतो यावरही विचार होणे गरजेचे आहे. पण जात टिकून राहील तरच आरक्षण मिळेल किंवा टिकून राहील असे म्हणणे म्हणजे मानवतावादी समाजाला पुन्हा एका प्रतिगामी अवस्थेकडे घेऊन जाणे आहे.  

जाती अंताची हि भूमिका म्हणजे परिपूर्ण जातीव्यवस्थेचे उच्चाटन आहे असे समजून घेण्याचे काहीच कारण नाही. जातीव्यवस्था हा हिंदू धर्माचा श्वास आहे. हिंदू धर्माचा तो प्राण आहे. त्यामुळे जातींचे संपूर्ण उच्चाटन होणे शक्य नाही. आणि त्यामुळे हिंदू धर्म पण संपुष्टात येणार नाही. जगातला कुठलाच धर्म संपुष्टात येणार नाही. अश्या परिस्थितीत जातीव्यवस्थेतून बाहेर पडून जातीव्यवस्था कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान तशी संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. किंवा जातीव्यवस्थेचे चटके सहन करणा-यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर धर्माचा स्वीकार किंवा स्वतःपासून सुरवात असे दोनच मार्ग आहेत. ज्यांना जातीव्यवस्थेने छळले आहे त्यांना इतर धर्मात जाऊ द्या ! व ज्यांना इतर धर्माचा स्वीकार करायचा नाही पण जातीव्यवस्थेला नाकारायचे आहे. त्यांना तसेही करू द्या ! मग त्यांच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला पर्याय योग्यच ठरतो. व्यक्ती जेव्हा स्वतःपासून एखादा क्रांतिकारी निर्णय घ्यायला बाध्य होतो तेव्हा ते क्रांतिकारी पाऊल समाज परिवर्तनात महत्वाची भूमिका बजावते. शेवटी जातीव्यवस्थेला कंटाळून अन्य धर्माचा स्वीकार करा किंवा जातीचा उल्लेख करणे / जातीचा रकाना भरने बंद करा. दोन्ही पर्याय मानवतावादी आणि परिवर्तनवादी विचाराला पूरक आहेत.          

3 comments:

  1. mala aase vatate ki ramdas athavle he ankhi jatichya bandhnath adakkle ahet , tyani aajun Mahar jaat sodli nahi ,
    saheb aapan jaat sodun BUDDHIST kadhi honar...........manje jati cha problem ha rahnar nahi.........
    JAI BUDDHA........ JAI BHIM..........JAI BHARAT.............

    ReplyDelete
  2. mala aase vatate ki ramdas athavle he ankhi jatichya bandhnath adakkle ahet , tyani aajun Mahar jaat sodli nahi ,
    saheb aapan jaat sodun BUDDHIST kadhi honar...........manje jati cha problem ha rahnar nahi.........
    JAI BUDDHA........ JAI BHIM..........JAI BHARAT.............

    ReplyDelete