Sunday 11 March 2018

"आंबेडकरवाद" : एक जागतिक तत्वज्ञान


Repost 

#once_again_ambedkar
"आंबेडकरवाद" : एक जागतिक तत्वज्ञान
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

आजकाल एका नव्या विचारमंथनाला  सुरवात झाली आहे. आंबेडकरवाद हा ‘वाद’(इझम) म्हणून संपूर्ण जगाने मान्य केला आहे. तरीही असे दिसून येते कि काही लोकांना अजूनही तो पचनी पडलेला दिसत नाही. आंबेडकरवाद हा इझम आहे कि नाही ?  हे मागील ९० वर्षाच्या काळात स्पष्ट झाला आहे. त्याची आज  नव्याने चर्चा करण्याची गरज नाही. हि चर्चा घडवून आणण्याचे प्रयोजन काहीही असो.  परंतु आंबेडकरवाद याला ‘इझम’ मानण्यात ज्यांना शंका येते. त्यांना त्याचे उत्तर देणे आमचे कर्तव्यच  आहे.

कुठल्याही विचारात “इझम” बनण्याची क्षमता असते असे नाही. किंवा कोणताही विचार ‘इझम’ होतो/होईल असेही नाही. विचार हे तत्कालीन परिस्थितीचे आकलन करणारे असतात.  आणि त्यावरील प्रतिक्रियेच्या रुपात ते प्रकट होत असतात.  मुळात विचाराला ‘इझम’ बनायचे असेल तर ते विचार तत्कालीन परिस्थितीचे निदर्शक असलेच पाहिजे. परंतु त्याचबरोबर भविष्यकालीन परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील भेडसावणा-या समस्यांच्या सोडवणुकीसाठी ते विचार मार्गदर्शक असले पाहिजे. विचारांचे त्रिकालाबाधीत्व त्या विचारांना ‘इझम’ पर्यंत घेऊन जात असतात.

एकंदरीत "आजच्या परिस्थितीचे अवलोकन करून;  भविष्यातल्या समस्यांचा आढावा घेऊन; त्या सोडविण्यासाठी लाभदायक मार्गदर्शक म्हणून जे विचार अस्तित्वात येतात त्या विचारांना  ‘वाद’ किंवा ‘इझम’ म्हणता येईल." अश्याच विचारांना ‘वाद’ किंवा ‘इझम’ चे स्वरूप प्राप्त होते.  आंबेडकरी विचार या सर्व निकषावर तंतोतंत बसतात. भारतातील समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्मव्यवस्था, इथले सामाजीकरण, संस्कृतीकरण, राजकीय सामाजीकरण इ. चा विचार करून त्यावर उपाय सुचविणारे, भविष्यातील उद्भवणा-या समस्यांच्या निराकरणासाठी आंबेडकरी विचार सदैव मार्गदर्शक राहिले आहे. बाबासाहेबांनी शेतकरी-मजूर-अस्पृश्य-पिडीत-मागास वर्गाच्या उद्धारासाठी दिलेला लढा, ते सोडविण्यासाठी सांगितलेले मार्ग, इतकेच नव्हे तर त्याची प्रत्यक्ष सोडवणूक कायद्याच्या माध्यमातून आणि सामाजिक व्यवस्थेतून कशी केली जाऊ शकते;  हे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कारकीर्दीतच दाखवून दिले आहे.

जगातले अनेक विचारवंतांचे विचार इझम बनले आहेत. परंतु प्रत्यक्ष ते विचारवंत अस्तित्वात असतांना त्यांच्या विचारांना इझम चे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. त्यांच्या विचारांना व्यवस्थेचे स्वरूप त्यांच्या मृत्यू नंतरच प्राप्त झाले.  परंतु बाबासाहेबांच्या बाबतीत असे घडले नाही.  बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांच्या विचारांना इझम चे स्वरूप प्राप्त केले होते. भारतीय घटना समितीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भासलेली उणीव. हे त्याचेच निदर्शक आहे. भारतीय सविधानातून ‘राज्य समाजवादाची’ मांडणी करू पाहणारे बाबासाहेब हे स्वतःच एक ‘इझम’ म्हणून जगले आहेत. हजारो वर्षांपासून हिंदू धर्मवादी आणि मनुवादी व्यवस्थेला उलथवून गुलामगिरीत खितपत पडलेल्या व्यवस्थेला त्यातून अलगद बाहेर काढून समानतावादाची पेरणी करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक जिवंत ‘इझम’ होते. हे कुणी नाकारणार आहे का ? त्यांच्या महापरीनिर्वानानंतर त्यांच्या विचारांना धरून त्यांच्या अनुयायांनी दिलेला आजपर्यंतचा या जातीयवादी मानसिकतेविरुद्धचा लढा आंबेडकरवादाशिवाय (इझम शिवाय) दिला गेला नाही. हे वास्तव आम्हाला स्वीकारावे लागेल.

भारतात पराकोटीला गेलेली जातीची मानसिकता आणि जातीची उतरंड नाकारून  मानवाला समानतेच्या सूत्रात बांधणे इतके सहज सोपे नव्हते.  आणि तेही अश्या परिस्थितीत  जिथे समाजाच्या चहुबाजूला धार्मिक, जातीय आणि ब्राम्हणी उच्च-नीच तेने ग्रासलेली  परंपरावादी, प्रतिगामी गुंडांची टोळी तुमच्यावर हल्ले करण्यास सदैव तत्पर आहे. परंतु बाबासाहेबांनी आपल्या तल्लख-कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि विचारांच्या लढाईतून;   जिकिरीच्या परिस्थितीतून  भारतीय समाजाला बाहेर काढले आहे. त्यामुळेच आजही समाजाला आंबेडकरवादाची गरज भासत आहे.

 भारतीय संविधान  संविधानसभेच्या सुपूर्द करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली  भाषणे, तसेच संविधान सभेतील विविध विषयावरील त्यांनी प्रकट केलेली मते लक्षात घेतली. तर आंबेडकरवाद हा ‘इझम’ आहे कि नाही  हे सहज लक्षात येईल. "भारतातील लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर या राजकीय लोकशाहीचे रूपांतरण  सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत करणे गरजेचे आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात."

"भारतीय व्यवस्थेचे यशापयश हि व्यवस्था चालविणाऱ्या लोकांवर अवलंबून राहील."   "जनतेच्या हिताचे आणि कल्याणाचे निर्णय हि व्यवस्था ज्या लोकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहे. त्यांच्यावर निर्भर असणार आहे. त्यात जर व्यवस्था अपयशी ठरली तर या व्यवस्थेला इथली जनताच मूठमाती देईल." "सर्वांना समानतेच्या तत्वावर वागविले जाणे हि व्यवस्थेची जबाबदारी आहे. परंतु राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास ज्या समाजाचा झालेला नाही. किंवा इथल्या जातीवादी व्यवस्थेने होऊ दिला नाही. त्या लोकांच्या उत्थानासाठी व्यवस्थेने काही निर्णय घेणे आवश्यक राहणार आहे. सर्व समाजाला समतेच्या पातळीवर आणण्यासाठी; पिळल्या गेलेल्या मागास वर्गासाठी काही विशेष सवलती शासनाच्या माध्यमातून देण्यात याव्या.  जेणेकरून त्या समाजाला त्यांचा विकास घडवून आणता येईल. हि शासनाची जबाबदारी आहे. यात इतर समाजाने समानतेच्या तत्वाची ढाल करून मागास वर्गाच्या विकासात रोडा आणू नये.  विषमता घालवून समानता प्रस्थापित करायची असेल तर असमान वर्गातील मागास वर्गाला विशेष संधी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर त्यांच्या विकास घडवून आणावा. जेणेकरून विषमता नष्ट होऊन समानता प्रस्थापित होईल." असे बाबासाहेब म्हणतात.
   
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ६४ वर्षाचा काळ लोटत चालला आहे. संविधानाची अंमलबजावणी होऊन ६८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही इथल्या व्यवस्थेने, शासनाने भारतातील मागास वर्गाच्या उत्थानासाठी आवश्यक ती पाऊले उचललेली दिसून येत नाही. आजही पराकोटीची विषमता समाजात टिकून आहे. विषमतेची दरी दिवसेंदिवस रुंदावत आणि खोलावत चालली आहे. विषमता नष्ट न करता ती अजून बळावत जावी. त्यावरच इथल्या प्रथापितांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशी जणू काही परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. आंबेडकरवाद भारताला विकासाच्या मार्गावर नेण्यात पूर्णतः यशस्वी सिद्ध होऊ शकत असला.  तरी इथली पुराणमतवादी जळमटे, जातीची कवाडे इथल्या माणसांच्या मेंदूवर इतकी घट्ट चिकटली गेली आहेत,  कि त्यातून हा परंपरावादी, जातीवादी माणूस बाहेर पडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारायला तयार होत नाही. आंबेडकरवादाने प्रभावित होऊन परिवर्तनवादी चळवळीत काम करणारा माणूस या व्यवस्थेवर नियंत्रण ठेऊन आहे म्हणून इथली लोकशाही निदान टिकून असल्याचा भास होतो. अन्यथा इथल्या व्यवस्थेने बहुसंख्य वर्गाला पुन्हा एकदा गुलामगिरीत लोटले असते. हा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे कि आज थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु समानतेचा मोकळा श्वास इथल्या नागरिकांना घेता येत आहे. व्यवस्थेवरचे नियंत्रण आणि व्यवस्थेला निर्णय घेण्यास भाग पाडणा-या विचारांना ‘इझम’ (वाद) म्हणता येते म्हणून आंबेडकरवाद हा एक ‘इझम’ आहे. यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.

  माणसाला माणूस म्हणून ओळख देणा-या बुद्ध तत्वज्ञानाची साथ आंबेडकरवादाला  आहे. जगात भारतीय लोकशाही यशस्वी लोकशाही म्हणून गणल्या जाते. आंबेडकरी विचार आणि संविधानातून झडकणा-या बुद्ध तत्वाज्ञानामुळे इथले संविधान जगातले सर्वोत्कृष्ठ संविधान मानण्यात आले आहे. अखिल विश्वातील मानवाला समान संधी आणि समान न्याय मिळाला तरच मानवतावाद टिकून राहील. मानवी समाज टिकवून ठेवायचा असेल तर मानवामानवात बंधुत्व टिकून राहणे गरजेचे आहे.  आज जागतिक बंधुत्वाची संकल्पना राबविण्यात येते. मात्र भारतात अजूनही त्याच बंधुत्वाला विरोध होतांना पाहून आंबेडकरवादाची प्रकर्षाने गरज भासू लागली आहे. जागतिक युद्ध आणि लोकशाहीची आंदोलने ही आंबेडकरवादाला पुर्नप्रस्थापित करण्याची गरज आहे. हे दाखवून देत आहे. 

एकीकडे राज्याचे आणि शासनाचे अस्तित्व नाकारून समाजवादाची मांडणी करणारा कार्ल मार्क्स पाच्छात्य व्यवस्थांनी स्वीकारला आहे. गुलामीची एक अवस्था (भांडवलशाही) उद्ध्वस्त करून दुसरी गुलामीची अवस्था (श्रमिकांची हुकुमशाही) समाजात निर्माण करू पाहणारा मार्क्सवाद स्वीकारला गेला. श्रमिक धार्जिणी व्यवस्था सत्तेच्या केंद्रस्थानी बसवून समान व न्यायपूर्ण व्यवस्था आणू पाहणारा मार्क्सवाद स्वीकारून पाश्च्छात्य राष्ट्रांनी आपले मार्गक्रमण केले. परंतु अल्पावधीतच मार्क्सवादाच्या व्यवस्थात्मक मर्यादा ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या राज्य समाजवादाची मदत या राष्ट्रांना घ्यावी लागली. मर्यादित राज्यतंत्र आणि समान न्यायाची कास धरावी लागली. “राज्य समाजवादात” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला समान न्यायाचा पुरस्कार, समान शासकीय वितरण प्रणालीचा पुरस्कार, मुलभूत सेवा पुरविणाऱ्या कारखानदारीचे राष्ट्रीयीकरण, समान सुरक्षिततेची हमी आणि कायद्यात्मक शासकीय प्रक्रियेतून विकासाची संकल्पना व शासनाचे (सरकारचे) महत्व आज आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारले जात आहे. याचा गांभीर्यपूर्वक विचार केला तर आंबेडकरवादाला व्यवस्थात्मक दृष्टीकोनातून स्वीकारल्याशिवाय भारतासारख्या देशाला तरी पर्याय नाही.

आंबेडकरवाद हे एक जागतिक तत्वज्ञान आहे असेही आपल्याला म्हणता येईल. आंबेडकरवादाला बुद्ध तत्वज्ञानाची पार्श्वभूमी आहे. आंबेडकरवादाचा गाभा बुद्ध तत्वज्ञान हेच आहे. बुद्ध तत्वज्ञान हे तत्वज्ञान आहे. असे सिद्ध करण्याची गरज नाही.  परंतु त्याचसोबत आंबेडकरवादाला तत्वज्ञान म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. नव्हे ते एक जागतिक तत्वज्ञानच आहे. तत्वज्ञानाचे क्षेत्र अतिशय व्यापक असते. विश्वातील प्रत्येक गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याचा आणि प्रत्येक बाबींचा वेध घेण्याचा प्रयत्न तत्वज्ञान करते. सत्य संशोधनाचे काम तत्वज्ञान करते. काय आहे ? काय असावे ? कोणता मार्ग अनुसरावा ? याचे दिग्दर्शन तत्वज्ञानातून केले जाते. जीवनाचा अर्थ शोधण्याचे कार्य तत्वज्ञान करते. विवेकबुद्धीचा वापर करून; विश्वातील प्रत्येक बाबींचा शोध घेऊन; अंतिम सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न तत्वज्ञानातून केला जातो. या आधारावर आणि निकषावर आंबेडकरवादाला पळताळून पाहिले. तर बुद्ध तत्वज्ञानाबरोबर आंबेडकरी तत्वज्ञानही आपल्याला दिसून येईल.  जागतिक सत्यान्वेषण हे आंबेडकरी तत्वज्ञानाचे परम निष्कर्षरुपी केंद्र आहे. फ़क़्त भारतीय परिस्थितीवरच आंबेडकरी विचार, आंबेडकरवाद भाष्य करीत नाही. तर त्यापलीकडे जाऊन जागतिक संबंधाचे, जागतिक कल्याणाचे, जागतिक मानवतावादाचे, आंतरराष्ट्रीय संबंधाचे सखोल अध्ययन आंबेडकरी तत्वज्ञानात दिसून येते.  "थाट्स आन पाकीस्थान", "प्रोब्लेम आफ रुपीस" आणि "बुद्ध कि कार्ल मार्क्स" हे आंबेडकरी तत्वज्ञान सिद्ध करणारी काही उदाहरणे आहेत. याचा विचार केला तर आंबेडकरी विचार हे तत्वज्ञानाच्या सर्व शाखा पार करून जागतिक समस्यांचे सत्यान्वेषण करतांना दिसून येते. म्हणून आंबेडकरवाद हा फ़क़्त "वाद" किंवा "इझम"च नाही तर त्यापलीकडील ते एक जागतिक तत्वज्ञान आहे. हे आम्हाला मान्य करावे लागेल.
****
adv.sandeepnandeshwar@gmail.com

आंबेडकरी चळवळ : भ्रम आणि वास्तव


#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळ : भ्रम आणि वास्तव
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          आंबेडकरी चळवळ म्हटली कि सर्वांच्या डोळ्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उभी होते. आणि त्याच वलायाभोवती फिरते. आंबेडकरी विचार, आंबेडकरी तत्वज्ञान, आंबेडकरी कृतिशीलता ते आंबेडकरी मानवतावाद या परिघाभोवती आंबेडकरी चळवळ वावरते असे सर्वांनाच वाटायला लागते. आंबेडकरी चळवळ म्हणजे अन्याय-अत्याचाराविरुद्ध उभे केलेले आंदोलन. आंबेडकरी चळवळ म्हणजे मानवी स्वातंत्राच्या केलेला आग्रह. आंबेडकरी चळवळ म्हणजे मानवतावादी तत्वचिंतनाचा सार. आंबेडकरी चळवळ म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यासाठी मानवी उत्थानापासून लढल्या गेलेल्या शृंखलेतील महत्वाचा टप्पा. सर्वसमावेशक भूमिकेतून सर्व अन्यायग्रस्तांना सोबत घेऊन त्यांच्या मानवीय विकासासाठी वाटचाल करणारा निरपेक्ष, प्रामाणिक, नीतिमान माणसांचा समूह म्हणजे आंबेडकरी चळवळ. परंतु आज ज्यांच्या तोंडून आंबेडकरी चळवळ ऐकायला भेटते, ज्यांच्या लिखाणात आंबेडकरी चळवळ वाचायला भेटते, ज्यांच्या कृतीत आंबेडकरी चळवळ असे नामाभिधान असते, ज्यांची वळवळ आंबेडकरी चळवळीत पाहायला भेटते ती मुळातच आंबेडकरी चळवळ नाही असे अतिशय दुःखाने आणि खेदाने म्हणावे लागते.

          इथे मोठ्या गर्वाने आंबेडकरी चळवळीचा उल्लेख केला जातो तो तितकाच नाटकी, विद्रूप, कुचेष्टेचा विषय वाटतो. कुणीही उठावे आणि म्हणावे, मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता; कुणीही यावे आणि म्हणावे, मी आंबेडकरी चळवळीचा नेता; कुणीही काहीही करावे आणि म्हणावे ही आंबेडकरी चळवळ; चार दोन माणसे गोळा करायची आणि आम्ही आंबेडकरी चळवळ करतो असे म्हणायचे; गल्ली बोळात छोटे छोटे संघटन उभे करायचे आम्ही त्याला आंबेडकरी चळवळीचे नाव द्यायचे; वस्त्यावस्त्यात चार दोन दुपट्टाधारी टोळके उभे करायचे आणि त्यांना आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणायचे; चार दोन प्रसिद्धी पत्रक काढायचे आणि समाजाला सांगायचे आम्ही आंबेडकरी चळवळीचे काम करतो; पाच दहा मस्तकांना एकत्र करून म्हणायचे ही आंबेडकरी चळवळ; आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांशी हातमिळवणी करायची आणि म्हणायचे आम्ही आंबेडकरी चळवळीचेच; समाजाच्याच विरोधात काम करायचे आणि आंबेडकरी चळवळ सांगायचे; कट्टर धर्मवाद व जातीवाद पाळायचा याला आंबेडकरी चळवळ म्हणायची का ? ही आंबेडकरी चळवळ आहे का ? आंबेडकरी चळवळ यालाच म्हणायचे का ? असे शेकडो प्रश्न आज आपल्यासमोर उभे आहेत. स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या प्रत्येकाला याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जातीचे किंवा धर्माचे राजकारण, समाजकारण किंवा अर्थकारण त्यांनी केले नाही. त्यांनी आपल्या आंदोलनाच्या व्याप कायम सर्वसमावेशक ठेवला. सर्वच वर्गाला सोबत घेऊन त्यांच्या उत्थानासाठी कार्य केले. आंदोलने केली. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणविणारांनी त्यांच्या आंदोलनांना संकुचित का केले ? विशिष्ट जाती व धर्मापुरते मर्यादित का केले ? आंबेडकरी चळवळीला धर्मविरोधी, अन्य विचार विरोधी रंग का दिला गेला ? भारतीय संविधानाचे रक्षण करता करता आंबेडकरी चळवळीला भारतातल्या “भारतीय” माणसाला विसरून धर्मविरोधी, हिंदुविरोधी कुणी बनविले ? कुणी घ्यायची जबाबदारी ? कोण आहे याला जबाबदार ? इतकेच नव्हे तर आंबेडकरी चळवळ खरेदी विक्रीचे केंद्र कसे बनली ? आंबेडकरी म्हणविणारा माणूस मनुवादी व्यवस्थेच्या गळाला कसा लागला ? आंबेडकरी चळवळीत फुटीरतावाद कुणी पेरला ? आंबेडकरी चळवळीला नेतृत्वहिनतेकडे कोण घेऊन गेलेत ? आंबेडकरी चळवळीचा लाभार्थी वर्ग चळवळीतून बाहेर कसा पडला ? तो बाहेर कसा फेकला गेला ? आंबेडकरी चळवळी पासून माणसे दूर का जात गेली ? नव शिक्षित तरुण वर्ग चळवळी पासून लांब का राहू लागला ? आंबेडकरी चळवळ तरुणांसाठी आदर्श का बनू शकली नाही ? आंबेडकरी चळवळ नेतृत्व का स्वीकारू शकली नाही ? आंबेडकरी चळवळीला स्वीकारार्ह नेतृत्व का भेटू शकले नाही ? आंबेडकरी चळवळीत नेतृत्वाविषयी अराजक मानसिकता का पसरविण्यात आली ? सर्वमान्य नेतृत्वाला आंबेडकरी चळवळीत बदनाम का करण्यात आले ? हे प्रश्न जितके गंभीर आहेत तितकेच त्याची उत्तरेही माणसांच्या शरीराचे रक्त पिणारी आहेत. आंबेडकरी चळवळीच्या या भ्रमातून जोपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळीच्या वास्तवापर्यंत आम्हाला पोहचता येणार नाही.

          आंबेडकरी चळवळ ही समाजाच्या भावनिकतेचा स्फोटक केंद्रबिंदू असला तरी आज याच आंबेडकरी चळवळीला लोकांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनविलेले आहे. आंबेडकरी चळवळ काही लोकांच्या श्रीमंतीचे माध्यम बनू पाहत आहे. आंबेडकरी चळवळ काही लोकांसाठी आर्थिक स्त्रोत बनू पाहत आहे. आंबेडकरी चळवळ समाजाच्या आर्थिक खच्चीकरणाचा सोपा मार्ग बनू पाहत आहे. आंबेडकरी चळवळ काही लोकांसाठी भांडवल बनू पाहत आहे. यापासून आंबेडकरी चळवळीला वाचविणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी झाली आहे. उद्याच्या पिढीपर्यंत आम्हाला या आंबेडकरी चळवळीला घेऊन जायचे असेल तर आज काही कणखर निर्णय घेणे गरजेचे आहे.

          आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका जातीची चळवळ नाही. आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका धर्माची चळवळ नाही. आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका वर्गाची चळवळ नाही. आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका विचाराची देखील चळवळ नाही. तसेच आंबेडकर चळवळ ही फक्त सामाजिक नाही. आंबेडकरी चळवळ ही फक्त धार्मिक नाही. आंबेडकरी चळवळ ही फक्त आर्थिक नाही आणि आंबेडकरी चळवळ ही फक्त राजकीयही नाही. तसेच आंबेडकरी चळवळ धर्मविरोधी नाही. आंबेडकरी चळवळ श्रद्धा विरोधी नाही. आंबेडकरी चळवळ कुण्या एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधातली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार, कृती व आंदोलनातून आलेली चळवळ ही समग्र आहे. ती खंडित नाही. समुच्य मानवमात्रांच्या प्रगतीचा आधार आंबेडकरी चळवळ आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक समानतेची पुरस्कर्ती आंबेडकरी चळवळ आहे. अन्याय-अत्याचार विरहीत समाजनिर्मितीसाठी आंबेडकरी चळवळ आहे. मानवतावादी माणसांचे नेतृत्व करण्यासाठी आंबेडकरी चळवळ आहे. संविधानिक नीती-नियमांचे पालन करण्यासाठी आंबेडकरी चळवळ आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. देशाच्या विकासाची दिशा म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. अंधश्रद्धेला मूठमाती देऊन वैज्ञानिक विचार पेरणारी आंबेडकरी चळवळ आहे. हे लक्षात घेऊन आम्हाला वाटचाल करणे गरजेचे आहे.

          चळवळीची उपरोक्त व्यापकता लक्षात घेतली कि आपल्या लक्षात येईल आपण जी करतो ती चळवळ नसून फक्त वळवळ आहे. जी समाजासाठी घातकच नाही तर समाजाला सर्वनाशाकडे पोहचविणारी आहे. आपण करतो ती चळवळ नसून चळवळीची बदनामी आहे. आपण करतो ती फक्त चळवळीचीच बदनामी नसून ज्या महापुरुषाने आम्हाला माणूसपण बहाल केले त्या दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच बदनामी आहे. ती इतके वर्ष आम्ही खपवून घेतली परंतु यानंतर ती खपवून घेतली जाणार नाही याचा प्रण आम्हाला करायचा आहे. या चळवळीला एक खंबीर नेतृत्व आम्हाला बहाल करायचे आहे. आंबेडकरी चळवळीच्या वर मांडलेल्या कसोट्यांवर पडताळून आम्हाला या चळवळीचे नेतृत्व ठरवायचे आहे.

          आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा आंदोलनाचा इतिहास राहिलेला आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर लढण्याचा इतिहास राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळीचा इतिहास एका विशिष्ट जातीसाठी, धर्मासाठी, वर्गासाठी लढण्याचा इतिहास नाही. म्हणून या सर्व आंदोलनात कुणाकडून काय भूमिका घेतली गेली. हे सुद्धा पाहणे तितकेच गरजेचे आहे. तेव्हाच आंबेडकरी चळवळीला नेतृत्व बहाल करता येईल. अन्यथा आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाला काळिमा फासण्यासारखे होईल. दुसरीकडे आंबेडकरी चळवळीला चिन्हांकित आंदोलनाचाही इतिहास राहिलेला आहे. मग ते नामांतराचे आंदोलन असो अथवा पुतळ्यांचे, विहारांचे आंदोलन असो. आंबेडकरी चळवळीची हानी अश्या चिन्हांकित आंदोलनात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तेव्हा अश्या चिन्हांकित आंदोलनाच्या काळात कुणी कुठली भूमिका घेतली आणि समाजाचे व चळवळीचे मोठे नुकसान होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न कुणी केला. याचाही शोध  या आंबेडकरी चळवळीला आज घेणे गरजेचे आहे. आज जर आम्ही याचा अभ्यास करू शकलो नाही तर आंबेडकरी चळवळ भ्रमातून बाहेर पडून वास्तविकतेकडे वाटचाल करू शकणार नाही. आंबेडकरी चळवळीला परत स्वार्थी, सत्तापिपासू माणसांकडून फसविण्याचा धोका संभवतो आहे.

          आज परिस्थिती झपाट्याने बदलत चाललेली आहे. सत्तेवर असलेली माणसे देशातल्या नागरिकांचे रक्त शोषून घेत आहे. दर दिवशी देशातल्या नागरिकांना रक्तरंजित केले जात आहे. मानवीयता लोप पावून क्रूरता फोफावली जात आहे. अश्या परीस्थितीत आंबेडकरी विचारांना केंद्रबिंदू ठेऊन मा. प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करीत आहे. देशातल्या जनतेला आश्वस्त करीत आहेत. त्यांना त्यांच्या संविधानिक सुरक्षिततेची हमी देत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांच्या आंबेडकरी चळवळीकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. या वाढणाऱ्या अपेक्षांच्या केंद्रस्थानी मा. प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेतृत्व आहे. आजपर्यंत भ्रमात असलेल्या आंबेडकरी चळवळीला वास्तविकतेच्या सीमारेषेपर्यंत आणून उभे करण्यात त्यांना यश आले आहे. इथून या आंबेडकरी चळवळीला व्यापकता देऊन पुढे रेटण्याची गरज निर्माण झाली असतांना परत काही उपटसुम्भांनी आंबेडकरी चळवळीची सुपारी घेतल्यागत चळवळीत विष कालविणे सुरु केले आहे.

          आम्ही हल्ली बघतो आहोत, कुणीतरी उठतो आणि महानायकातून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कुणीतरी उठतो आणि प्रकाश आंबेडकर कुणाचे नेतृत्व करीत आहेत ? असा प्रश्न करतो. कुणीतरी उठतो आणि रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य का करू नये ? असा प्रश्न उपस्थित करतो. व त्या आधारावर प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्याचे विरोधक आहेत असा खोडसाळ प्रचार करायला लागतो. कुणीतरी म्हणतो कि प्रकाश आंबेडकरांनी फक्त महारांचे आणि बौद्धांचेच नेतृत्व करावे. कुणी म्हणतो आंबेडकरी चळवळीने मार्क्स आणि गांधी विचारांना शत्रूस्थानी ठेवावे. कुणी म्हणतो आंबेडकरी चळवळ बौद्धांची आहे त्यामुळे तिने हिंदूंचे नेतृत्व करू नये. कुणी म्हणतो आंबेडकरी चळवळीला इतरांचे काय देणेघेणे नाही. आपण फक्त आपलेच पाहावे. कुणीतरी येतो आणि आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी समाजाला प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उभे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करतो. कुणीतरी येतो आणि आंदोलनाच्या नावाखाली समाजाकडून चंदा वसुली करण्याचे काम करतो. कुणीतरी येतो आणि समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे भांडवल करून त्याच अन्याय-अत्याचार पिडीत लोकांकडून पैसा गोळा करून, लढण्याचे सांगून, समाजाला फसवितो. काहींनी तर चळवळ चालविण्याच्या नावाखाली समाजाकडून हप्तावसुली मागच्या अनेक वर्षांपासून केली आहे व आजही करीत आहेत. या सर्वांच्या कृत्यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या व्यवहाराला, त्यांच्या मांडणीला आंबेडकरी चळवळ असे नाव देता येईल का ? हा विचार आंबेडकरी विचार असू शकतो का ? हा विचार आंबेडकरी चळवळीचा विचार होऊ शकतो का ? अश्या सर्वच उपटसुम्भांना आम्ही आंबेडकरी म्हणू शकतो का ? किंवा यांनी चालविलेल्या वळवळीला आंबेडकरी चळवळ म्हणता येईल का ? हे आज आम्हाला ठरवावे लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मानव समूहाचे नेतृत्व केले असतांना प्रकाश आंबेडकर यांनी ते का करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती समूहाचे, वर्गाचे राजकारण केले ते प्रकाश आंबेडकरांनी का करू नये. सर्व सामाजिक घटकांना सोबत घेऊन आंबेडकरी नेतृत्व त्यांना बहाल करता येत असेल तर ते प्रकाश आंबेडकर यांनी का करू नये. सर्वांना सोबत घेऊन अमानवीय मनुवादी व्यवस्थेशी व तिच्या शिलेदारांशी लढा उभारला जाऊ शकतो तर तो प्रकाश आंबेडकर यांनी का करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या तत्वाज्ञांशी वैचारिक मतभेद ठेवले परंतु विचारांचे शत्रुत्व ठेवले नाही. मग प्रकाश आंबेडकर यांनी तसे विचारधारांचे शत्रुत्व का ठेवावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम हिंदूंमधील मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने व लढे उभारले. मग आज प्रकाश आंबेडकर जर त्याच हिंदूंमधील मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतील तर स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नकली वारसदार समजणाऱ्याच्या डोळ्यात कुसळ का रुतावी व यांचे डोळे लाल का व्हावे. आज देशभरातला मागास, अल्पसंख्याक, आदिवासी, मार्क्सवादी, गांधीवादी, परिवर्तनवादी, संत परंपरावादी, सुधारणावादी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भाजप/आरएसएस च्या मनुवादी मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत असतील तर स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांना, स्वयंघोषित विचारवंत व नेत्यांना, विकावू संघटन बनवून पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या लाचार जोकरांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सामील होण्यास अडचण काय आहे ? प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व इतरांना मान्य असतांना स्वतःला आंबेडकरी म्हणविनाऱ्या व स्वतःलाच आंबेडकरी चळवळ संबोधणाऱ्याना का मान्य नाही. याचे एकमात्र कारण आहे कि यांना आंबेडकरी चळवळीला वास्तवात समाजव्यवस्थेत रुजवू द्यायचे नाही. यांचे आंबेडकरी चळवळीच्या नावाने जुळलेले आर्थिक हितसंबंध व आर्थिक स्त्रोत बंद करायचे नाहीत. एकंदरीतच या लोकांचा आंबेडकरी चळवळीशी काहीही संबंध नाही. समाजाच्या भावनिकतेचा व्यापार हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. आंबेडकरी चळवळीतल्या या गिधाडांना रोखल्याशिवाय आंबेडकरी चळवळ वास्तवात येणार नाही हे लक्षात घेऊन समाजाला भविष्याची वाटचाल करणे गरजेचे आहे.   
                                            adv.sandeepnandeshwar@gmail.com