Sunday 11 March 2018

आंबेडकरी चळवळ : भ्रम आणि वास्तव


#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळ : भ्रम आणि वास्तव
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          आंबेडकरी चळवळ म्हटली कि सर्वांच्या डोळ्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उभी होते. आणि त्याच वलायाभोवती फिरते. आंबेडकरी विचार, आंबेडकरी तत्वज्ञान, आंबेडकरी कृतिशीलता ते आंबेडकरी मानवतावाद या परिघाभोवती आंबेडकरी चळवळ वावरते असे सर्वांनाच वाटायला लागते. आंबेडकरी चळवळ म्हणजे अन्याय-अत्याचाराविरुद्ध उभे केलेले आंदोलन. आंबेडकरी चळवळ म्हणजे मानवी स्वातंत्राच्या केलेला आग्रह. आंबेडकरी चळवळ म्हणजे मानवतावादी तत्वचिंतनाचा सार. आंबेडकरी चळवळ म्हणजे व्यक्तीस्वातंत्र्यासाठी मानवी उत्थानापासून लढल्या गेलेल्या शृंखलेतील महत्वाचा टप्पा. सर्वसमावेशक भूमिकेतून सर्व अन्यायग्रस्तांना सोबत घेऊन त्यांच्या मानवीय विकासासाठी वाटचाल करणारा निरपेक्ष, प्रामाणिक, नीतिमान माणसांचा समूह म्हणजे आंबेडकरी चळवळ. परंतु आज ज्यांच्या तोंडून आंबेडकरी चळवळ ऐकायला भेटते, ज्यांच्या लिखाणात आंबेडकरी चळवळ वाचायला भेटते, ज्यांच्या कृतीत आंबेडकरी चळवळ असे नामाभिधान असते, ज्यांची वळवळ आंबेडकरी चळवळीत पाहायला भेटते ती मुळातच आंबेडकरी चळवळ नाही असे अतिशय दुःखाने आणि खेदाने म्हणावे लागते.

          इथे मोठ्या गर्वाने आंबेडकरी चळवळीचा उल्लेख केला जातो तो तितकाच नाटकी, विद्रूप, कुचेष्टेचा विषय वाटतो. कुणीही उठावे आणि म्हणावे, मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता; कुणीही यावे आणि म्हणावे, मी आंबेडकरी चळवळीचा नेता; कुणीही काहीही करावे आणि म्हणावे ही आंबेडकरी चळवळ; चार दोन माणसे गोळा करायची आणि आम्ही आंबेडकरी चळवळ करतो असे म्हणायचे; गल्ली बोळात छोटे छोटे संघटन उभे करायचे आम्ही त्याला आंबेडकरी चळवळीचे नाव द्यायचे; वस्त्यावस्त्यात चार दोन दुपट्टाधारी टोळके उभे करायचे आणि त्यांना आंबेडकरी चळवळीचे नेते म्हणायचे; चार दोन प्रसिद्धी पत्रक काढायचे आणि समाजाला सांगायचे आम्ही आंबेडकरी चळवळीचे काम करतो; पाच दहा मस्तकांना एकत्र करून म्हणायचे ही आंबेडकरी चळवळ; आंबेडकरी चळवळीच्या विरोधकांशी हातमिळवणी करायची आणि म्हणायचे आम्ही आंबेडकरी चळवळीचेच; समाजाच्याच विरोधात काम करायचे आणि आंबेडकरी चळवळ सांगायचे; कट्टर धर्मवाद व जातीवाद पाळायचा याला आंबेडकरी चळवळ म्हणायची का ? ही आंबेडकरी चळवळ आहे का ? आंबेडकरी चळवळ यालाच म्हणायचे का ? असे शेकडो प्रश्न आज आपल्यासमोर उभे आहेत. स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या प्रत्येकाला याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या सर्वच घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जातीचे किंवा धर्माचे राजकारण, समाजकारण किंवा अर्थकारण त्यांनी केले नाही. त्यांनी आपल्या आंदोलनाच्या व्याप कायम सर्वसमावेशक ठेवला. सर्वच वर्गाला सोबत घेऊन त्यांच्या उत्थानासाठी कार्य केले. आंदोलने केली. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणविणारांनी त्यांच्या आंदोलनांना संकुचित का केले ? विशिष्ट जाती व धर्मापुरते मर्यादित का केले ? आंबेडकरी चळवळीला धर्मविरोधी, अन्य विचार विरोधी रंग का दिला गेला ? भारतीय संविधानाचे रक्षण करता करता आंबेडकरी चळवळीला भारतातल्या “भारतीय” माणसाला विसरून धर्मविरोधी, हिंदुविरोधी कुणी बनविले ? कुणी घ्यायची जबाबदारी ? कोण आहे याला जबाबदार ? इतकेच नव्हे तर आंबेडकरी चळवळ खरेदी विक्रीचे केंद्र कसे बनली ? आंबेडकरी म्हणविणारा माणूस मनुवादी व्यवस्थेच्या गळाला कसा लागला ? आंबेडकरी चळवळीत फुटीरतावाद कुणी पेरला ? आंबेडकरी चळवळीला नेतृत्वहिनतेकडे कोण घेऊन गेलेत ? आंबेडकरी चळवळीचा लाभार्थी वर्ग चळवळीतून बाहेर कसा पडला ? तो बाहेर कसा फेकला गेला ? आंबेडकरी चळवळी पासून माणसे दूर का जात गेली ? नव शिक्षित तरुण वर्ग चळवळी पासून लांब का राहू लागला ? आंबेडकरी चळवळ तरुणांसाठी आदर्श का बनू शकली नाही ? आंबेडकरी चळवळ नेतृत्व का स्वीकारू शकली नाही ? आंबेडकरी चळवळीला स्वीकारार्ह नेतृत्व का भेटू शकले नाही ? आंबेडकरी चळवळीत नेतृत्वाविषयी अराजक मानसिकता का पसरविण्यात आली ? सर्वमान्य नेतृत्वाला आंबेडकरी चळवळीत बदनाम का करण्यात आले ? हे प्रश्न जितके गंभीर आहेत तितकेच त्याची उत्तरेही माणसांच्या शरीराचे रक्त पिणारी आहेत. आंबेडकरी चळवळीच्या या भ्रमातून जोपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत आंबेडकरी चळवळीच्या वास्तवापर्यंत आम्हाला पोहचता येणार नाही.

          आंबेडकरी चळवळ ही समाजाच्या भावनिकतेचा स्फोटक केंद्रबिंदू असला तरी आज याच आंबेडकरी चळवळीला लोकांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनविलेले आहे. आंबेडकरी चळवळ काही लोकांच्या श्रीमंतीचे माध्यम बनू पाहत आहे. आंबेडकरी चळवळ काही लोकांसाठी आर्थिक स्त्रोत बनू पाहत आहे. आंबेडकरी चळवळ समाजाच्या आर्थिक खच्चीकरणाचा सोपा मार्ग बनू पाहत आहे. आंबेडकरी चळवळ काही लोकांसाठी भांडवल बनू पाहत आहे. यापासून आंबेडकरी चळवळीला वाचविणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी झाली आहे. उद्याच्या पिढीपर्यंत आम्हाला या आंबेडकरी चळवळीला घेऊन जायचे असेल तर आज काही कणखर निर्णय घेणे गरजेचे आहे.

          आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका जातीची चळवळ नाही. आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका धर्माची चळवळ नाही. आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका वर्गाची चळवळ नाही. आंबेडकरी चळवळ ही कुण्या एका विचाराची देखील चळवळ नाही. तसेच आंबेडकर चळवळ ही फक्त सामाजिक नाही. आंबेडकरी चळवळ ही फक्त धार्मिक नाही. आंबेडकरी चळवळ ही फक्त आर्थिक नाही आणि आंबेडकरी चळवळ ही फक्त राजकीयही नाही. तसेच आंबेडकरी चळवळ धर्मविरोधी नाही. आंबेडकरी चळवळ श्रद्धा विरोधी नाही. आंबेडकरी चळवळ कुण्या एका विशिष्ट विचारधारेच्या विरोधातली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार, कृती व आंदोलनातून आलेली चळवळ ही समग्र आहे. ती खंडित नाही. समुच्य मानवमात्रांच्या प्रगतीचा आधार आंबेडकरी चळवळ आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक समानतेची पुरस्कर्ती आंबेडकरी चळवळ आहे. अन्याय-अत्याचार विरहीत समाजनिर्मितीसाठी आंबेडकरी चळवळ आहे. मानवतावादी माणसांचे नेतृत्व करण्यासाठी आंबेडकरी चळवळ आहे. संविधानिक नीती-नियमांचे पालन करण्यासाठी आंबेडकरी चळवळ आहे. सर्वांच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. देशाच्या विकासाची दिशा म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. अंधश्रद्धेला मूठमाती देऊन वैज्ञानिक विचार पेरणारी आंबेडकरी चळवळ आहे. हे लक्षात घेऊन आम्हाला वाटचाल करणे गरजेचे आहे.

          चळवळीची उपरोक्त व्यापकता लक्षात घेतली कि आपल्या लक्षात येईल आपण जी करतो ती चळवळ नसून फक्त वळवळ आहे. जी समाजासाठी घातकच नाही तर समाजाला सर्वनाशाकडे पोहचविणारी आहे. आपण करतो ती चळवळ नसून चळवळीची बदनामी आहे. आपण करतो ती फक्त चळवळीचीच बदनामी नसून ज्या महापुरुषाने आम्हाला माणूसपण बहाल केले त्या दस्तुरखुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीच बदनामी आहे. ती इतके वर्ष आम्ही खपवून घेतली परंतु यानंतर ती खपवून घेतली जाणार नाही याचा प्रण आम्हाला करायचा आहे. या चळवळीला एक खंबीर नेतृत्व आम्हाला बहाल करायचे आहे. आंबेडकरी चळवळीच्या वर मांडलेल्या कसोट्यांवर पडताळून आम्हाला या चळवळीचे नेतृत्व ठरवायचे आहे.

          आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा आंदोलनाचा इतिहास राहिलेला आहे. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर लढण्याचा इतिहास राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळीचा इतिहास एका विशिष्ट जातीसाठी, धर्मासाठी, वर्गासाठी लढण्याचा इतिहास नाही. म्हणून या सर्व आंदोलनात कुणाकडून काय भूमिका घेतली गेली. हे सुद्धा पाहणे तितकेच गरजेचे आहे. तेव्हाच आंबेडकरी चळवळीला नेतृत्व बहाल करता येईल. अन्यथा आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाला काळिमा फासण्यासारखे होईल. दुसरीकडे आंबेडकरी चळवळीला चिन्हांकित आंदोलनाचाही इतिहास राहिलेला आहे. मग ते नामांतराचे आंदोलन असो अथवा पुतळ्यांचे, विहारांचे आंदोलन असो. आंबेडकरी चळवळीची हानी अश्या चिन्हांकित आंदोलनात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तेव्हा अश्या चिन्हांकित आंदोलनाच्या काळात कुणी कुठली भूमिका घेतली आणि समाजाचे व चळवळीचे मोठे नुकसान होण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न कुणी केला. याचाही शोध  या आंबेडकरी चळवळीला आज घेणे गरजेचे आहे. आज जर आम्ही याचा अभ्यास करू शकलो नाही तर आंबेडकरी चळवळ भ्रमातून बाहेर पडून वास्तविकतेकडे वाटचाल करू शकणार नाही. आंबेडकरी चळवळीला परत स्वार्थी, सत्तापिपासू माणसांकडून फसविण्याचा धोका संभवतो आहे.

          आज परिस्थिती झपाट्याने बदलत चाललेली आहे. सत्तेवर असलेली माणसे देशातल्या नागरिकांचे रक्त शोषून घेत आहे. दर दिवशी देशातल्या नागरिकांना रक्तरंजित केले जात आहे. मानवीयता लोप पावून क्रूरता फोफावली जात आहे. अश्या परीस्थितीत आंबेडकरी विचारांना केंद्रबिंदू ठेऊन मा. प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करीत आहे. देशातल्या जनतेला आश्वस्त करीत आहेत. त्यांना त्यांच्या संविधानिक सुरक्षिततेची हमी देत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांच्या आंबेडकरी चळवळीकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. या वाढणाऱ्या अपेक्षांच्या केंद्रस्थानी मा. प्रकाश आंबेडकर हे एकमेव नेतृत्व आहे. आजपर्यंत भ्रमात असलेल्या आंबेडकरी चळवळीला वास्तविकतेच्या सीमारेषेपर्यंत आणून उभे करण्यात त्यांना यश आले आहे. इथून या आंबेडकरी चळवळीला व्यापकता देऊन पुढे रेटण्याची गरज निर्माण झाली असतांना परत काही उपटसुम्भांनी आंबेडकरी चळवळीची सुपारी घेतल्यागत चळवळीत विष कालविणे सुरु केले आहे.

          आम्ही हल्ली बघतो आहोत, कुणीतरी उठतो आणि महानायकातून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कुणीतरी उठतो आणि प्रकाश आंबेडकर कुणाचे नेतृत्व करीत आहेत ? असा प्रश्न करतो. कुणीतरी उठतो आणि रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य का करू नये ? असा प्रश्न उपस्थित करतो. व त्या आधारावर प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन ऐक्याचे विरोधक आहेत असा खोडसाळ प्रचार करायला लागतो. कुणीतरी म्हणतो कि प्रकाश आंबेडकरांनी फक्त महारांचे आणि बौद्धांचेच नेतृत्व करावे. कुणी म्हणतो आंबेडकरी चळवळीने मार्क्स आणि गांधी विचारांना शत्रूस्थानी ठेवावे. कुणी म्हणतो आंबेडकरी चळवळ बौद्धांची आहे त्यामुळे तिने हिंदूंचे नेतृत्व करू नये. कुणी म्हणतो आंबेडकरी चळवळीला इतरांचे काय देणेघेणे नाही. आपण फक्त आपलेच पाहावे. कुणीतरी येतो आणि आंदोलनाचे श्रेय घेण्यासाठी समाजाला प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उभे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करतो. कुणीतरी येतो आणि आंदोलनाच्या नावाखाली समाजाकडून चंदा वसुली करण्याचे काम करतो. कुणीतरी येतो आणि समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे भांडवल करून त्याच अन्याय-अत्याचार पिडीत लोकांकडून पैसा गोळा करून, लढण्याचे सांगून, समाजाला फसवितो. काहींनी तर चळवळ चालविण्याच्या नावाखाली समाजाकडून हप्तावसुली मागच्या अनेक वर्षांपासून केली आहे व आजही करीत आहेत. या सर्वांच्या कृत्यांना, त्यांच्या विचारांना, त्यांच्या व्यवहाराला, त्यांच्या मांडणीला आंबेडकरी चळवळ असे नाव देता येईल का ? हा विचार आंबेडकरी विचार असू शकतो का ? हा विचार आंबेडकरी चळवळीचा विचार होऊ शकतो का ? अश्या सर्वच उपटसुम्भांना आम्ही आंबेडकरी म्हणू शकतो का ? किंवा यांनी चालविलेल्या वळवळीला आंबेडकरी चळवळ म्हणता येईल का ? हे आज आम्हाला ठरवावे लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व मानव समूहाचे नेतृत्व केले असतांना प्रकाश आंबेडकर यांनी ते का करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती समूहाचे, वर्गाचे राजकारण केले ते प्रकाश आंबेडकरांनी का करू नये. सर्व सामाजिक घटकांना सोबत घेऊन आंबेडकरी नेतृत्व त्यांना बहाल करता येत असेल तर ते प्रकाश आंबेडकर यांनी का करू नये. सर्वांना सोबत घेऊन अमानवीय मनुवादी व्यवस्थेशी व तिच्या शिलेदारांशी लढा उभारला जाऊ शकतो तर तो प्रकाश आंबेडकर यांनी का करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या तत्वाज्ञांशी वैचारिक मतभेद ठेवले परंतु विचारांचे शत्रुत्व ठेवले नाही. मग प्रकाश आंबेडकर यांनी तसे विचारधारांचे शत्रुत्व का ठेवावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम हिंदूंमधील मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने व लढे उभारले. मग आज प्रकाश आंबेडकर जर त्याच हिंदूंमधील मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतील तर स्वतःला आंबेडकरी चळवळीचे नकली वारसदार समजणाऱ्याच्या डोळ्यात कुसळ का रुतावी व यांचे डोळे लाल का व्हावे. आज देशभरातला मागास, अल्पसंख्याक, आदिवासी, मार्क्सवादी, गांधीवादी, परिवर्तनवादी, संत परंपरावादी, सुधारणावादी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात भाजप/आरएसएस च्या मनुवादी मानसिकतेविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत असतील तर स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांना, स्वयंघोषित विचारवंत व नेत्यांना, विकावू संघटन बनवून पोटापाण्याची व्यवस्था करणाऱ्या लाचार जोकरांना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात सामील होण्यास अडचण काय आहे ? प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व इतरांना मान्य असतांना स्वतःला आंबेडकरी म्हणविनाऱ्या व स्वतःलाच आंबेडकरी चळवळ संबोधणाऱ्याना का मान्य नाही. याचे एकमात्र कारण आहे कि यांना आंबेडकरी चळवळीला वास्तवात समाजव्यवस्थेत रुजवू द्यायचे नाही. यांचे आंबेडकरी चळवळीच्या नावाने जुळलेले आर्थिक हितसंबंध व आर्थिक स्त्रोत बंद करायचे नाहीत. एकंदरीतच या लोकांचा आंबेडकरी चळवळीशी काहीही संबंध नाही. समाजाच्या भावनिकतेचा व्यापार हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. आंबेडकरी चळवळीतल्या या गिधाडांना रोखल्याशिवाय आंबेडकरी चळवळ वास्तवात येणार नाही हे लक्षात घेऊन समाजाला भविष्याची वाटचाल करणे गरजेचे आहे.   
                                            adv.sandeepnandeshwar@gmail.com

No comments:

Post a Comment