Wednesday 15 August 2012

मी आणि माझी चळवळ



मी आणि माझी चळवळ
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५

एखाद्या पामराने किंवा एखाद्या पणतीने सूर्याला कवेत घ्यावे. अथवा तशी तुलना करावी. असा खोडकरपणा मी करतो आहे. असे समजण्याचे कारण नाही. उलट सूर्याच्या तेजोमय प्रकाशात प्रत्येकालाच जीवनाची वाट प्राप्त होत असते. सूर्याच्या उर्जेने जीवन प्राप्त होत असते. नव्हे ती निसर्ग नियमाची एक शास्त्रशुद्ध मांडणीच आहे. त्यातलाच मी एक पामर. मलाही सूर्याच्या किरणांनी जीवन बहाल केले. मलाही जीवनाची वाट सूर्याच्या तेजोमय प्रकाशातूनच लाभली. फरक फक्त एवढाच की तो आकाशातील सूर्य नसून विचारातील सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. मी जन्मलो याच विचारसुर्याच्या सावलीत. वाढलोही याच विचारसुर्याच्या सानिध्यात. आणि आता जगतोही याच विचारसुर्याच्या विश्वात. त्याच्याच साक्षीने. पण या तिन्ही कालखंडाचे संदर्भ आणि जाणीवा मात्र वेगळ्या होत्या. ते दिवस, ते क्षण आठवायला गेलो की हाथ थरथरायला लागतात. उर दाटून येतो. त्यामुळे हे विचार, ही साक्ष आणि माझ्यातले परिवर्तन सूक्ष्मपणे मांडत गेलो. तर कदाचित कादंबरी लिहिली जाईल. दुःख, दारिद्र्याचा लेखाजोगा मांडत बसलो. तर क्रमित कादंब-या बाजारात येतील. आणि मग माझ्यातला व्यवसाय जागा होऊन दुःखी जीवनाचे भांडवल कार्पोरेट जगण्याचा आधार बनेल. म्हणून शक्यतो माझ्यात झालेले परिवर्तन अगदी सुसाट वेगाने मांडण्याचा प्रयत्न या लेखातून करीत आहे.

तुम्ही भोगलेले दुःख, यातना, दारिद्र्य सर्व वंचितांच्या वाट्याला आलेले आहे. हे गृहीतक समोर ठेवून जगण्यातल्या परीस्थितीय बदलाला ग्राह्य धरून ही मांडणी होत आहे. जन्मापासून तर आतापर्यंतचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. माझा जन्म जरी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित कुटुंबात नव्हे वंशात झाला असला तरी आजूबाजूची परिस्थिती पूरक नव्हती. मी वाढलो असलो जरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारसुर्याच्या-क्रांतीसुर्याच्या सानिध्यात; तरी साधने पूरक नव्हती. संसाधनांची जुळवाजुळव करता करता गरीबीचे, दारिद्र्याचे चटके इतके बसत गेले की वय वर्ष मोजण्याची संधीच कधी मिळाली नाही. परंतु दुःखाच्या सानिध्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक सुखाने कधी हिम्मत हारू दिली नाही. १४ एप्रिल, कोजागिरी पौर्णिमा, विजयादशमी (दसरा) आणि ६ डिसेंबर एवढेच काय ते माहित व्हायचे. या दिवसांनी आपण एका महासुर्याचे अनुयायी आहोत. याची पुरेपूर जाणीव मात्र करून दिली. लहानपणापासून या दिवसांमध्ये ऐकू येणारे बाबासाहेबांचे गीत कानावर पडले की अंगात दारिद्र्यावर मात करण्याची ताकत तयार व्हायची. लढण्याची जिद्द आणि जगण्याची उमेद देऊन जायची. एका दिवसासाठी, काही कालावधीसाठी, काही वेळासाठी, काही क्षणासाठी. पण नंतरचे तेच रटाळवाणे जगणे. दिवस उजाडला की पोटाच्या आकांताने धावत सुटणे. नाही सापडले तर कट्ट्यावरच्या गप्पा आणि टवाळखोरी फावल्या वेळेतली.

झोपडपट्टीचे जीवन माझ्या आयुष्यात अगदी लहानपणापासूनच आले. कुळा-मातीच्या घरात, साफ-विंचू अश्या जीवघेण्या साथीदारांच्या सहवासात मी राहिलो. त्यामुळे गावात चालणा-या सर्वच     ब-या-वाईट घटना-घडामोडीचा मी एक भाग. थोडाथोडका नव्हे तर तब्बल वयाच्या २२ वर्षापर्यंत मी त्याचाच एक भाग होतो. आईने कितीही सांगितले की, तुला खूप शिकायचे आहे. परिवारात कुणीही नौकारीवर नाही. मला शिकू दिले नाही. पण तुम्ही शिका ! आणि नौकरी करा. आईचे हे उपदेश कानावर नेहमी पडत असले तरी गावातल्या वातावरणाने सर्वच भावंडांना घेरले होते. त्यामुळे कुणीच १० वी च्या पुढे जाऊ शकले नाही. त्यामुळे घरच्यांच्या अपेक्षा निश्चितच माझ्याकडून वाढलेल्या होत्या. घरात कुणीही पहिल्या प्रयत्नात १० वी पास केली नाही. पण मी पहिल्याच प्रयत्नात १० वी पास केली. अभ्यासाचा ताण कमी झाला. म्हणून पुढील २ वर्षे नानाविध कारनामे करून दाखविले. अगदी झोपडपट्टीच्या जीवनाला साजेसे असेच. आणि अनपेक्षित १२ वी ला सर्व स्वप्नांची राखरांगोळी केली. नापास असा शिक्का आयुष्यावर मारून बसलो. आणि पुढील एक वर्ष मानसिक तणावात अगदी जगत राहिलो. अनेकदा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण हिम्मत झाली नाही. हार का मानायची ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातच पुढील प्रवासाला सुरवात केली.

पदवीचे शिक्षण शहरात जाऊन घ्यावे अशी अपेक्षा असतांना घरच्या परिस्थितीने परवानगी नाकारली. 'आहे तितके शिक्षण इथेच घेणे' हे बीजगणित आयुष्याशी जुळले. पण प्रवाही जगाशी साधर्म्य साधू पाहणारी माझी वृत्ती गावातल्या वातावरणात मला अस्वस्थ करीत होती. पर्याय नव्हता. जे मिळेल ते घेणे. जे जमेल ते करणे. आणि आपली वाट आपण तयार करणे. याशिवाय तरणोपाय नव्हता. पण अस्वस्थ आणि परिस्थितीने बांधले गेल्याची सल मनाला बोचतांना सरळ मार्गावर चालतांनाही आडवळणावर तोल जाणे शक्यच होते. जाणीवपूर्वक तोल जाणे. आणि त्यानंतरचे परिणाम भोगणे. हे आता माझ्या जीवनाचे सूत्रच बनले होते. स्वतःहून बिळात हात घालणे आणि डंक बसला की स्वतःला सावरणे. हा विळ्या भोपड्याचा खेळ सुरु असतांनाच मानसिक अस्वस्थता बोलून दाखविण्याचे कुठलेही साधन मिळत नव्हते. म्हणून स्वतःला महाविद्यालयाच्या सक्रीय चक्रव्युहात झोकून दिले. इतके की प्रध्यापकांसोबतच्या झकापकी पर्यंत. ठरवून टाकले होते की, आता यानंतर कुणासमोरही झुकायचे नाही. मनाला पटत नसेल तर होकारार्थी मान हलवायची नाही. मग तो कुणीही असो. पण सोबतच माझी परिस्थिती आणि बाहेरच्या जगाच्या घटना घडामोडी बेचैन करून सोडत होत्या. मनातली ही घालमेल कुणासमोर तरी मांडावी म्हणून अगदी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतांना लिहायला लागलो. बोलायला लागलो. अनेक चर्चासत्रे, व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, काव्यचर्चा, कविसंमेलने पालथी घालायला लागलो. स्वतःत इतके वर्ष दडवून ठेवलेली अंगार ओकू लागलो. आणि एका वादळी आयुष्याला सुरवात केली.

मी लिहायला लागलो ती सुरवातही अगदी मजेदार. मी महाविद्यालयाच्या गच्चीवर बसलो होतो. बाहेर पाऊस सुरु होता. मी मनातून अस्वस्थ होतो. पदवीचे शेवटचे वर्ष असल्याने तारुण्यातले गुण-दोष अनुभवायला आले होते. मी स्वतःलाही त्या प्रक्रियेत झोकून दिले होते. बाहेरचे वातावरण पोषक होते. आतील वातावरण सूचक होते. समोरच होती ती...डोक्यात विचारांचे चक्रीवादळ उठले होते. पण पुढील भविष्याच्या चिंतेने मला चक्रावून सोडले होते. काय करावे सुचत नव्हते. अशात पेन कागद हातात आले. कविता लिहायला बसलो. अगदी स्वतःवरच. अनेकांच्या लिखाणाला ज्या विषयाने सुरवात झाली तोच विषय माझ्याही लिखाणाच्या सुरवातीचा विषय होऊ शकला असता. पण ते झाले नाही. रंजलेल्या, गांजलेल्या माणसांना अधिकारच नसतो ते विलासी मायावादी जीवन जगण्याचा. अधिकारही नसतो 'प्रेम' करण्याचा. मग अश्यात स्वतःच्या जीवनानुभवाशिवाय दुसरे काय सुचणार. 'जीवन' हाच विषय प्रथमदर्शनी आला. आणि अचानक पेन पावसाच्या वेगाने मुसळधार बरसायला लागला. जीवनातील अनुभवाची क्षितिजे ओलेचिंब करू लागला.... धो...धो...धो...करत पेन सुटला....

जीवनाच्या महासागरात

जगत असा आहे.

ध्येय आहे प्रगतीचे

लढत तसा आहे.....

 

सागराच्या लाटांनी

घेरले असे आहे.

त्यातून सुटण्याचा

फक्त मार्ग शोधत आहे......

 

हे शब्द कसे धाऊन आले. कळलेच नाही. जीवनाचे आणि जगण्याचे गणित सोडवून गेले. आजही तेच शब्द सोबत आहेत. हेच माझ्या जगण्याचे आणि जीवनाचे वास्तव मी स्वीकारले आणि पुढील वाटचालीसाठी मार्गस्त झालो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक ज्वलंत निखारा आहे. माणुसकी हरविलेल्या समाजात निखळ आणि स्वच्छंद वाहणारा विचारांचा निर्झर झरा आहे. प्रत्येकच माणसाच्या जीवनाला विशाल, महाकाय विकासाचे स्वरूप देणारा महासागर आहे. आणि विचारांच्याच बळावर शरीरात सकारात्मक उर्जा निर्माण करणारा महासूर्य आहे. हा महासुर्य प्रत्येकालाच सहज उपलब्ध आहे. आज तर भारतीय समाजात हा विचारांचा तडपता महासूर्य संविधान आणि मानवाधिकाराच्या लढ्यातून प्रत्येकालाच जगण्याची प्रज्ञा शिकवीत आहे. परिवर्तन चळवळीच्या सर्वच अनुयायांच्या जीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने परिवर्तन घडून आले आहे. मानव्याची ओळखही याच महापुरुशामुळे आम्हाला प्राप्त झाली आहे. मानवी परिवर्तनाचा हा वाटसरू माझ्याही जीवनात आला आहे. माझ्या जीवनातले आमुलाग्र परिवर्तन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारविश्वामुळेच झाले आहे.

आयुष्याच्या रुपेरी पडद्यावर जीवनाचे स्वप्न पाहण्याचा अधिकार गमावून बसलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व करणा-या कुटुंबात माझा जन्म झाला असल्याने जातीचे हिमालय माझ्याभोवती उभे राहणे साहजिकच होते. ते केवळ छळतच नव्हते तर अंगावरची चामडीसुद्धा सोलत होते. अश्या परिस्थितीत मी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नागपूरला आलो. नागपूर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू असल्याने निश्चितच चळवळीच्या संपर्कात राहण्याची संधी मिळाली. त्यातही नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर वसतिगृह म्हणजे चळवळीची कार्यशाळाच. त्यामुळे माझ्यातल्या आंबेडकरी बाण्याला इथे वाव मिळाला. परंतु शेवटी कितीही म्हटले तरी 'ज्यांच्या हातात सत्ता तेच शहाणे' ही म्हण वसतीगृहातल्या जीवनातही प्रत्यक्ष अनुभवता आली. पण माझ्यातला कुठल्याही परीस्थित कुणाही समोर न झुकणारा बाणा वसतीगृहातल्या अनेकांना मनस्ताप देऊन गेला. मी मात्र कणखरपणे लढलो. इथेही स्पर्धा होतीच. कौण कुणाआधी जिंकेल ? यासाठी शर्यती चालायच्या. आणि सर्वच शर्यती माझ्या विरुद्ध दिशेने असायच्या. वस्तीगृहातला एक एक क्षण मी एक एक जीवन म्हणून जगलो आहे. वसतिगृहात राहत असतांना परीस्थीतीपोटी मी केलेल्या उपोषणाची (१ महिन्यांचा उपवास कुणालाही न सांगता जेवण करण्याइतपत पैसे नसल्याने) आधुनिक उपोषण करणा-यांशी तुलनाच होऊ शकत नाही. उपाशी, अर्धपोटी, एक वेळ असे करून काढलेले जीवन मला अतिशय स्फूर्तीदायक वाटतात. आजही त्या जीवनाची प्रेरणा मला मिळत आहे. मी केलेले कष्ट, भोगलेल्या यातना बाबासाहेबांनी सोसलेल्या दुःखासमोर नगण्य आहेत. याची जाणीव झाल्याने आणखी दुःख सहन करण्याची शक्ती सहजच प्राप्त होते.

२००४-२००५ हे माझ्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष ठरले. २००४ मध्ये मी पदव्युत्तर परीक्षा आणि नेट परीक्षा दोन्ही पास केल्या. कुणालाही विश्वास बसत नव्हता. परंतु माझा माझ्या जिद्दीवर आणि कर्तुत्वावर निस्सीम विश्वास होता. वसतीगृहातल्या सर्व विरोधकांची तोंडे बंद झाली होती. लगेच मी जानेवारी २००५ ला नागपूर विद्यापीठात पी.एच.डी साठी नामांकन दाखल केले. तोपर्यंत नागपूर मध्ये घालविलेल्या ३ वर्षाच्या काळात अनेक चर्चासत्र आणि व्याख्यानांमधून आंबेडकरी चळवळीत चाललेली अंतर्गत संघर्षाची झळ बुद्धीच्या पटलावर पोहचली होती. त्यामुळे पी. एच. डी. साठी विषय निवडतांना अडचण गेली नाही. याच पार्श्वभूमीवर विषय डोक्यात घट्ट बसला. "आंबेडकरी चळवळ आणि बहुजन समाज पार्टी : सहसंबंधाचा एक चिकित्सक अभ्यास" या विषयावरच पी. एच. डी. करायचे ठाम करून मी त्याचा प्रारूप तयार केला. अनेकांना मार्गदर्शक म्हणून विनवणी केली. काहींनी विषय नाकारला. काहींनी नकार दिला. मी मात्र माझ्या विषयावर ठाम होतो. शेवटी माझे पी. एच. डी. मार्गदर्शक डॉ. मोरे यांनी मला होकार दिला. आणि इतका विश्वासही दाखविला की "हा विषय तुझ्या डोक्यातून आला आहे. त्यामुळे यावर तू जास्त चांगल्याने काम करू शकतो. तू संशोधनाचे काम सुरु कर ! आणि मला कुठे सही करायची तेवढे मात्र सांग !" त्यांनी दाखविलेल्या विश्वासाने माझा आनंद द्विगुणीत झाला. आणि मी माझ्या संशोधन कार्याला सुरवात केली. एक एक पान उलगडत गेलो. बाबासाहेब शब्दाशब्दात सापडत गेले. बाहेर बाजारभूनग्यांनी चळवळीची केलेली वाताहत. भाषणातून पेरलेले बाबासाहेब आणि त्यांच्या लिखाणातून सापडणारे बाबासाहेब. वास्तवातले/पुस्तकातले/ खंडातले बाबासाहेब काही निराळेच होते. आणि यांनी मोठ्यामोठ्या बढाया मारून भाषणातून पेरून ठेवलेले बाबासाहेब काही वेगळेच सापडले. आणि संशोधनातील आवड आणखीनच वाढत गेली. आणि इथूनच माझ्या ख-या आंबेडकरी चळवळीतील प्रवेशाची सुरवात झाली. 

२००५ ला एका कॅडर कॅम्प ला जाण्याची संधी मिळाली. कॅडर कॅम्प म्हटल्यानंतर बी एस पी आणि बामसेफ हे समीकरणच होते. आणि या सर्व संघटना/पक्षांविषयी चांगल्याने जाणून होतो. थोडाफार अभ्यासही केला होता. घरी आईने बी एस पी च्या चिन्हांवर स्थानिक निवडणूक लढविली होती. त्यामुळे बराच संबंध आला होता. कॅडर कॅम्पला वसतिगृहातील बरेच विध्यार्थी असल्याने आणि पी. एच. डी. संशोधनासाठी मदत होईल या दृष्टीने मी त्यात सहभागी झालो. मुख्यतः त्या कॅडर कॅम्पचे मुख्य आयोजक/मार्गदर्शक विजन मानकर होते. आंबेडकरी अभ्यासक म्हणून, उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात कॅडर कॅम्पचा फायदा मला निश्चितच झाला. बाबासाहेबांच्या विचारांना सत्तावादी राजकारणाकडे घेऊन जाण्यासाठी कश्याप्रकारे पोस्टमार्टम केले जाते हे पाहायला, शिकायला आणी अनुभवायला मिळाले. शेवटी प्रत्येक कॅडरसाठी त्या कॅम्प मधील एकूणच निरीक्षणावरून केले जाणारे भाकीत माझ्यासाठी जरा जास्तच लाभदायक ठरले. मी कॅडर कॅम्प मध्ये सांगण्यात येणा-या प्रत्येकच गोष्टीकडे चिकित्सक बुद्धीने पाहत होतो. अनेक प्रश्नांची सरबत्ती आणि माझ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी व समाधानासाठी प्रशिक्षकांची उडणारी भंबेरी पाहून विजय मानकरांनी मला "भविष्यातील बुद्धिवादी" असे बिरूद लावले होते. माझ्या व्यक्तीमत्वासमोर लावलेले "भविष्यातील बुद्धिवादी" हे बिरूद माझे जीवन बदलविणारे ठरले. आता जबाबदारी वाढली होती. बाबासाहेबांना समजून घेतांना; बाबासाहेब वाचतांना; बाबासाहेब लिहितांना अतिशय सावधगिरी बाळगणे. वर्तमानातल्या बाबासाहेबांच्या विधानांचे मूळ शोधतांना अनेक चकित करणा-या गोष्टी हाती लागल्या. मी आणखीनच आंबेडकरी चळवळीच्या, बाबासाहेबांच्या विचारांच्या जवळ ओढला गेलो.

२००५ ला लग्न झाल्याने वसतीगृहातल्या जीवनातून थेट सामाजिक जीवनात प्रवेश केला. तेव्हा अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या आणी नेत्यांच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली. सामाजिक प्रश्नांवर आंबेडकरी परिप्रेक्षातून विविध वर्तमानपत्रातून मी लिखाण करायला लागलो. त्यामुळे निश्चितच आंबेडकरी चळवळीने मला आपल्याकडे ओढून घेतले. समाजाच्या विविध कार्यक्रमातील आणि आंदोलनातील प्रत्यक्ष सहभाग वाढत गेला. परिचय वाढत गेला. माझ्यातली अभ्यासू शैली, माझ्यातली वक्तृत्व शैली अनेकांना आपलेसे करून गेली. चळवळीने आपुलकी दिली. समाजाने मान-सन्मान दिला. आणि अतिशय कमी वयातच माझ्यात सामाजिक प्रौढपणा निर्माण केला. परंतु वयाच्या बंधनांमुळे चळवळीतल्या अनेकांशी वादही वाढतच गेले. मुळात ते वैचारिक असतीलही. अनुभवाच्या पातळीवरचे असतीलही. पण चळवळीला मी चालतो. माझा आंबेडकरी दृष्टीकोन, माझ्यातला आक्रमकपणा चालत नाही. म्हणून चळवळीतल्या अनेकांनी माझ्याविषयी दुषित मानसिकता बाळगली होती.

अनेकदा मी चुकतही गेलो. त्यात आंबेडकरी चळवळीतले धगधगते पँथर राजा ढाले यांचा एका चर्चासत्रात माझ्याकडे संचालनाचे काम असतांना मी त्यांचा केलेला अपमान आजही विसरलेलो नाही. “मी माझी चिकित्सा करू नये. माझे विचार मांडू नये.” अशी सूचना अध्यक्षपदावरून राजा ढाले यांनी करताक्षणी मी संचालन करणे सोडून खाली प्रेक्षकांच्या रांगेत येऊन बसलो. आणि मग त्या ठिकाणी उडालेली तारांबळ...सर्व काही अनपेक्षितपणे. कुणी कल्पनाही केली नसेल. मी असे वागू शकतो याची. पण आजही मी चुकलो की नाही ? याचा उलगडा होऊ शकलेला नाही. चळवळीत काम करीत असतांना तरुणांनी त्यांचे विचार, त्यांचा दृष्टीकोन का मांडू नये ? आणि त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना का थांबविल्या जाते ? हे प्रश्न मला आजही विचलित करतात. तरीही जर मी चुकलो असेल तर चळवळीतल्या अनेक गणमान्य माणसांनी माझ्या चुका दुरुस्त करण्यास हातभार लावला. परंतु सर्वात जास्त हातभार लावला तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांच्या लेखन व भाषण खंडानी. मी कुठे चुकलो ? काय चुकलो ? हे तपासून पाहिल्याशिवाय मी स्वस्थ बसत नव्हतो. त्यामुळे सहजच बाबासाहेबांचे लिखाण, त्यांचे विचार डोळ्यासमोरून थेट डोक्यापर्यंत पोहचू लागले.

संशोधन करीत असल्यामुळे प्रत्येक विचाराला, वाक्याला, संदर्भाला तपासून पाहण्याची सवय लागली. संशोधनाचा विषयही तितकाच गंभीर असल्याने तथ्यांची काटेकोर तपासणी करणे भाग होते. माझा विषय हा आंबेडकरी चळवळीच्या जिव्हाळ्याचा विषय होता. बी एस पी ने आंबेडकरी चळवळीत शिरकाव करून ब-यापैकी जनमत आपल्या बाजूने करून घेतले होते. सत्ता त्यांच्या हातात होती म्हणून समाज त्यांच्याविषयी ब्र सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. समाज कांशीराम यांना बाबासाहेबांच्या तुलनेत बसवू लागला होता. एका निरीक्षकाने तर इतके म्हटले होते की, "तुमचे संशोधन आणि त्यातून येणारे निष्कर्ष यातून एकतर समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. किंवा तुमच्या घरावर दगडे मारेल." त्यांचे म्हणणे खरे होते. काहींनी तर असे म्हटले की, "तुमचे निष्कर्ष काहीही निघाले तरी तुम्हाला फार मोठ्या विरोधाचा सामना करावा लागेल." यांचेही म्हणणे खरे होते. दोन गट, दोन प्रवाह. एक बाबासाहेबांच्या त्यांच्या संकल्पनेतल्या आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था संघटनांमध्ये काम करणारा होता. तर दुसरा गट या सर्वांना सोडून नवीनच बाबासाहेब मांडणारा आणि सत्तेची स्वप्ने दाखविणारा होता. यात मात्र चळवळीची वाताहत होत होती. मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापणारी आंबेडकरी चळवळ मागे पडत होती.

जबाबदारीचे भान ठेऊन माझे संशोधन अधिकच खोलात जाऊ लागले होते. इतक्यात 'द प्रोब्लेम ऑफ रुपी' हा बाबासाहेबांचा ग्रंथ वाचण्यात आला. बाबासाहेबांचे हे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठाने नाकारायचे ठरविले होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "मी अतिशय मेहनतीने हे संशोधन केलेले आहे. मी मांडलेल्या निष्कर्षाला तुम्ही अमान्य करून ते सप्रमाण सिद्ध करून दाखवा. अन्यथा मी हे संशोधन माझ्या देशात जाऊन प्रकाशित करेन. आणि त्यानंतर होणा-या परिणामांना सर्वस्वी ब्रिटीश सरकार जबाबदार राहील." संशोधानाप्रती बाबासाहेबांचा असणारा हा विश्वास आणि कुठल्याही परिस्थितीत न डगमगता त्यांनी केलेले संशोधन मला बरेच काही सांगून गेले. त्यामुळे मी डगमगलो नाही. अतिशय चिकित्सक बुद्धीने संशोधन होत गेले. वाचन होत गेले. लिखाण होत गेले. आणि संशोधनासोबतच माझ्यातला एक एक पैलू उलगडू लागला.

मानवी जीवन अनेक पैलूंनी जकडलेले असते. मानवी समस्या व सामाजिक प्रश्न जाणून घ्यायचे असेल तर त्या प्रत्येक पैलूंची उकल करत जावे लागते. अस्पृश्यता निवारणाची लढाई, गरिबी व शोषणाविरुद्धची लढाई कायदेशीर मार्गाने जिंकण्याचे कसब बाबासाहेबांनी कसे मिळविले ? विपरीत परिस्थितीत आजूबाजूचे वातावरण अनुकूल नसतांना एकहाती लढा कसा जिंकून दाखविला ? या प्रश्नाच्या शोधात मी पडलो. तेव्हा उत्तर मिळाले की बाबासाहेबांनी मानवी समाजाच्या सर्व अंगांना व्यापणा-या विषयांचे सखोल अध्ययन केले. तेव्हाच त्यांना या परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. बाबासाहेबांच्या चिंतनावर, लेखनावर, कार्यावर आणि विचारांवर त्यांनी विविध पाश्चात्य देशातील विद्यापीठांतून घेतलेल्या शिक्षणाचा प्रभाव दिसून येतो. म्हणूनच बाबासाहेबांची तथ्ये खोडून काढण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती. याच अध्ययन आणि चिंतनाच्या बळावर बाबासाहेब जगातल्या सर्व शोषित-पिढीत समाजाला त्यांच्या उद्धाराचा मार्ग देऊ शकले.

आजही समाजात अनेक प्रश्न नव्या संदर्भाने उपस्थित झाले आहेत. ते समजून त्यावर उपाय शोधून काढायचे असेल तर एकशास्त्रीय अभ्यास करून त्याची उकल होणार नाही. मानवी सामाजिक जीवनातील विविध समस्यांचे उकल हे सखोल अध्ययन आणि चिंतनाशिवाय होऊ शकत नाही. यावर दृढ विश्वास बसला. २००४ ला राज्यशास्त्र विषयात एम. ए. आणि नेट परीक्षा पास करून मी प्राध्यापक म्हणून काम करीत असतांना असे लक्षात आले की, मानव्यशास्त्र एका विषयाच्या अध्ययनातून समजून घेणे शक्य नाही. सामाजिक शास्त्र हे मानवी जीवनाच्या विविध अंगांशी जुडलेले आहे. त्यामुळे मी माझे पुढील शिक्षण थांबविले नाही. आंदोलन, चळवळ, परिवार सर्वच स्तरावर काम करीत असतांना शिक्षणात खंड पडू दिला नाही. अनेक विषयांचा अभ्यास होत गेला. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, आंबेडकर विचारधारा, इतिहास इ. विषयातून एम. ए. पूर्ण केले. आणि सर्वच विषयांच्या नेट परीक्षा पास केल्या. सोबतच कायद्याचे ज्ञान असावे. म्हणून एल एल बी केले. हे सर्व बाबासाहेबांच्या प्रेरणेतून घडून आले. आंबेडकरी विचारातून घडून आले. आंबेडकरी चळवळीने पुरविलेल्या सकारात्मकतेतून घडून आले. जातीवादी समाजाने केलेल्या छळातून मिळालेल्या दाहकतेतून घडून आले. गरिबी आणि दारिद्र्याच्या परिस्थितीने शिकविलेल्या जगण्यातून घडून आले आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. आणि कलम ही तलवारीच्या धारेपेक्षाही तेज आहे. यांना साधन म्हणून जी व्यक्ती आपल्या जीवनात वापरते. ती व्यक्ती स्वतःसोबतच समाजाचाही उद्धार करीत असते. बाबासाहेबांचा हा संदेश जीवनात मौलिक बदल घडवून आणतो. याच प्रेरणेतून मी शिक्षण घेत आलो. आणि पुढेही घेत राहणार आहे. तलवारीपेक्षा लिखाणाची ताकत समाजात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणू शकते. हे बाबासाहेबांनी सप्रमाण सिद्ध केले. त्याच प्रेरणेने मी वयाच्या २० व्या वर्षापासून लिहित आलो. आणि अव्याहतपणे लिहित आहे. सामाजिक प्रश्नांसाठी लढतांना स्वकीयांची पर्वा न करता लढणे आम्हाला बाबासाहेबांनीच शिकविलेले आहे. त्याच प्रेरणेतून आज सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनातील सहभागापासून तर समाजाला भेडसावणा-या समस्यांच्या निवारणासाठी आंदोलने उभी करण्यापर्यंत मजल मारता आली. आंबेडकरी परिप्रेक्षातून सामाजिक परिवर्तन घडून आले पाहिजे. इथल्या संविधानातील शोषित-पिडीत-वंचित समाजाचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजे. यासाठीचा संघर्ष सुरु आहे. आणि भविष्यातही तो सुरु राहील. आंबेडकरी राजकारणापासून, समाजकारण, अर्थकारण, संस्कृतीकरण आणि शिक्षणापर्यंत सर्वच पातळ्यांवर या समूहाची पीछेहाट होणार नाही. याची दक्षता घेऊन सदैव जागृत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक विकृती निर्माण करण्या-यांवर तुटून पडणे, अन्यायाविरुद्ध लढणे. हे आज नित्याचेच बनले आहे. 

ôôô  डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५ ôôô

No comments:

Post a Comment