स्वातंत्र्या
स्वातंत्र्याच्या उरावर बसून
विकल्या तुम्ही गुलामीच्या चिंध्या
स्वातंत्र्या आता सांग मला
कुठे हरविले आहे माझे स्वातंत्र्य
स्वातंत्र्याचा सूर्य तुम्ही उगवू दिला नाही
सूर्योदयापूर्वी अस्ताला पोहोचले
इथल्या समतेचे वारे
स्वातंत्र्याचे धिंडवडे काढले
तुमच्या कुजलेल्या मानसिकतेने
अखंडतेच्या नावावर पेरला जातीचा विद्रोह
मग काय चुकले त्यांचे जर
त्यांनी नागविल्या तुमच्या वस्त्या
भर रस्त्यात फासावर लटकाविल्या
तुमच्या अंतर्वस्त्राच्या चिंध्या
स्वातंत्र्या तू दिमाखात मिरवू नको
कारण अजून मी स्वतंत्र व्हायचा आहे.
तुझ्या स्वातंत्र्याच्या झेंडयाने अजून
माझ्या अंगावरील कपडे शिवायचे आहे.
स्वातंत्र्या भिकेचा तुकडा फेकून
हे लुटतात स्वातंत्र्याची मलाई
मला भिकेचा तुकडा नको
माझी हक्काची जागा मला पाहिजे आहे.
ढेरपोट्याच्या उरावर लाथ मारून
मला माझ्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकवायचा आहे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर.
सन्दिप्जि खरच खुपच सुन्दर वर्नन केलेय तुम्हि, पण माहित नाही कधी समजेल अपल्या समजाला?
ReplyDelete