रिपब्लिकन नेत्याचे बारसे (नामकरण) करा रे...
आईच्या गर्भात मुल सामावण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते...कौमार्याची चाहूल संपत नाही तोच नवा जन्म देण्यासाठी नवा जन्म घ्यावा लागतो... जीवनातला जगण्याचा संघर्ष उरावर घेऊन कोरावा लागतो उद्याचा बीजांकुर...वेळ, काळ, परिस्थितीही लक्षात घ्यावी लागते...नवा जन्म, नवी उमेद, नवे बळ, नवा अनुभव, नवा संकल्प, नवी दिशा...सर्वकाही नवीनच घडत जाते...जीवनात येणारी नवी पालवी एक नवा समाज घडवीत असते...तेव्हा आईच्या भावना, प्रक्रियेतील कष्ट, सोसावा लागणारा त्रास आणि अंतर्मनातल्या हळवेपणाने पाहुण्यासाठी तयार केलेले नवे घर...सर्व कसे घडतच जाते... एका प्रक्रियेतून, एका आवेगातून, एका स्थितीतून, एका आयुष्यातून दुस-यात कुणाचा तरी प्रवेश अचानक बदल घडवून आणतो...तो भास नवा, आभास नवा, चीत्कारलेल्या आयुष्याचा खेळ नवा...नवा डाव, नवा राज, नवा खेळ तोही त्या जिवंत माणसाच्या जीवंत प्रक्रियेचाच एक भाग... हो कि नाही ?
माझे दु:ख तुझे सुख, तुझे दु:ख माझे सुख म्हणता म्हणता तुझे तेच माझे अवचित घडून येते...जगायचेच असते म्हणून कि काय फ़क़्त पुरावेच जपून ठेवावे लागतात...खेळता खेळता तारा तुटला...मागायचे काय ते मागून सुटतो...मिळायचे काय ते पाहतच बसतो...इतके काही अचानक सर्व काही घडत नाही...माणूस म्हणून जन्मलो तर सहज काहीच घडत नाही...पण..."हा खेळ सावल्यांचा" आम्हीच चालविला... "देगा हरी खाटल्यावरी"... कमावलो नाही तरी चढीन बोहल्यावरी...सांगा ! खरेच असे होईल का ?..."भातुकलीच्या खेळामधली राजा राणी" होईल का ?...झाली तरी मध्यभागी चालणारे हितभर पोट तरी भरणार का ?...शेवटी प्रारब्धाच्या कुशीतूनच डोकावत असतो उषःकाल...हे म्हणल्याशिवाय राहवले जाईल का ?
जमीन कसण्यासाठी मशागत करावी हेही काही नवीन नाही...न कसता मशागतही करता येणार नाही...दुस-याच्या इमल्यावर इमले बांधले म्हणजे संरक्षण होत नाही...बापाची झोपडी इमला झाली तर दुस-याच्या इमल्याची गरज पडत नाही..
.
संदेश इथे तुम्हाला भूतकाळ सांगतो...नव्या प्रक्रियेची जाणीव करून देतो... काळ थांबत नाही... वेळ थांबत नाही... जन्म थांबत नाही... मृत्यूही थांबत नाही... मग नेता बनण्याची प्रक्रिया का थांबली आहे ? याचे उत्तर मिळत नाही... जमीन कसदार आहे... बाबासाहेब आंबेडकर असे त्या विश्वाचे नाव आहे... आंबेडकरी चळवळ या विस्तीर्ण विश्वात सामावलेली येणा-या प्रत्येक भविष्याची निर्मिती करणारी जननी आहे... अशा सुपीक जमिनीवर... विश्व शान्तिदुताच्या मळ्यावर, बाबासाहेब नावाच्या महासागरावर निर्मितीची प्रक्रिया कशी काय थांबू शकते...
नाही मित्रांनो निर्मितीची प्रक्रिया थांबलेली नाही...दिवसागणिक क्षणागणिक आंबेडकरी चळवळीतील आईच्या गर्भात एक एक आंबेडकर सामावीत आहे...तोच येणा-या काळाचा नेताही होणार आहे...तोच बाबांचा शिपाई पण होणार आहे...आंबेडकरी चळवळीचे भविष्यही तोच आहे...हि आईची कूस इतकी वांझोटी नाही रे...इथे प्रत्येकच आंबेडकर पैदा होतो मित्रांनो... त्याला नेता होऊ द्या...अनेक सुपीक डोके याच आईच्या गर्भातून जन्मले आहेत...तर काही प्रसुतीच्या मार्गावर आहेत...ओळख लवकर त्याला...आंबेडकरी आईची कूस वांझोटी होण्याआधी कुण्यातरी नेत्याचे नामकरण करा रे...कुणी तुमचे नामकरण करायला तयार नसेल तर बाबासाहेबांच्या वाटेवर स्वतःचे नामकरण करा ? परंतु नामकरण विधीला सर्वांना बोलवून, एकत्र करून होऊ द्या उद्याच्या लढाईची सुरवात एका नव्या खांद्यापासून ...म्हाता-या बैलाचे खांदे शेकण्यापेक्षा तरुण तुर्क गो-याचे खांदे मजबूत करा रे...हि विनंती आहे माझी तुम्हाला एक नेता पैदा करा रे...जो या समाजाला तरुण नेईल...
मित्रांनो परिस्थिती बदलली आहे असा आव आणू नका...परिस्थिती तीच आहे हे लक्षात घ्या ! एक उदाहरण तुम्हाला देतो...आजची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती बाबासाहेबांच्या काळातही होती... तरीही बाबासाहेब एक नेता म्हणून पुढे आले कि नाही...बघा बाबासाहेब स्वतः मे १९२४ च्या भाषणात काय म्हणतात ... "आज आमची स्थिती अशी आहे कि ज्याला ज्याला म्हणून र त फ करता येते त्याला आपण पुढारी आहो असे वाटून आपले नाव पुढे यावे असे वाटते. इतकेच नव्हे तर कोणी संस्थेमार्फत काम करावयास तयारच नसतात. कारण संस्थेत राहिल्याने त्यांचे नाव पुढे येत नाही. आशयामुळे आमच्यात बाराभाईची नगरी होऊन बसली आहे.'' (संदर्भ :- लेखन व भाषण खंड १८ भाग १, पान क्र. २२)... मिळाले का तुम्हाला तुमचे उत्तर... परिस्थितीत बदल झाला असे म्हणना-या माणसाने याचा विचार करावा...रिपब्लिकन ची अनेक शकले झाली... असे म्हणाना-यांनीही विचार करावा. आणि अनेक नेते, अनेक गट तयार झाले म्हणाना-या महाभागांनीही याचा विचार करावा.
परिस्थिती तिळमात्रही बदलली नाही... मनुष्यगुण शेवटी... त्याग करण्याची तयारी असली पाहिजे... नेते तुम्हाला नेता बनू देणार नाही...हे वास्तव जरी असले तरी तुम्हाला नेता बनण्यापासून कुणी रोखू शकणार नाही हे सत्य आहे. म्हणून नेत्याचे सर्व गुण अंगी असणारी मंडळी जन्मली आहेत. परंतु निराशावादाने त्यांना पछाडले आहे. हा निराशावाद आम्हाला फेकून देऊन समर्पण करावे लागेल. बाबासाहेबांच्या चळवळीसाठी झिजावे लागेल. जनकल्याणासाठी लढावे लागेल. बापाच्या झोपडीला महाल बनवितांना जेव्हा घामाच्या धारांची आठवण होते तो क्षण मित्रांनो प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. झोपडी बनवितांना हातावरचे ओरफडे जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात तेव्हाचा बापाचा आदर तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. बापाने झोपडे बनविले नसेल पण हक्काच्या जागेवर झोपडी बनविता बनविता...तसे स्वप्न पाहता पाहता जेव्हा त्यांचे महापरिनिर्वान होते. तेव्हा त्याच जागेवर झोपडी असेल किव्हा महाल असेल पण तो आमच्यासाठी हक्काचा असेल...
तशी झोपडी तयार झाली होती. आता त्या झोपडीला ५५ वर्षे लोटून गेली आहेत. ती मोडकळीस आलेली आहे... आमच्या बांधवांनी त्या झोपडीचे दर्शन आम्हाला घडवून देण्यासाठी टिकवून ठेवले त्यातच आम्ही त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे... झोपडीचे रक्षण करता करता आमचे बांधव थकले असतील...आता जरा त्यांना विश्रांती द्या...आणि त्या झोपडीचे संरक्षक वारसदार लवकर शोधा रे...माझ्या रिपब्लिकन झोपडीचा रखवालदार शोधा रे...लवकरात लवकर रिपब्लिकन नेत्याचे नामकरण करा रे...
आता जबाबदारी आपली आहे. पडक्या झोपडीला आधार देण्याची पाळी आपली आहे. झोपडीचे महाल बनवायचे कि पुन्हा झोपडीतच राहायचे हेही आपल्यालाच ठरवायचे आहे. शेवटी झोपडी असो वा महाल बापाची ओळख आहे ती... आमच्या अस्तित्वाची ओळख आहे ती...आजपर्यंत झोपडीतील कुड्या कच-यात आम्ही आनंदाची झोप घेतली...आता शत्रूंच्या महालात फोम च्या बिछान्यावर झोप लागेल का रे...नाही लागणार...सकाळी सकाळी उठून अंग दुखायला लागले कि आपसूकच तू तुझ्या बापाच्या झोपडीकडे झेपावशील...सुखाची, आनंदाची, हक्काची, पूर्ण स्वातंत्र्याची झोप घेण्यासाठी या रे माझ्या पाखरांनो घरट्याकडे परत फिरा रे......!
No comments:
Post a Comment