मनु गर्भातून डोकावतो...
या पृथ्वीवर प्रत्येकच माणूस आईच्या उदरातून जन्म घेतो. निसर्गाचे निर्विवाद सत्य हेच आहे. परंतु काही प्रवृत्तींना जन्म घेण्यासाठी आईच्या उदराची गरज पडत नाही. भारतीय पुरातन साहित्य संस्कृतीचा अभ्यास केला तर हे प्रकर्षाने दिसून येईल. इ.स. ६-७ व्या शतकात मनु नावाची अशीच एक प्रवृत्ती वैदिकांनी जन्माला घातली. ज्यात निसर्ग नियमाच्या विरुद्ध मानवी जन्माची कहाणी कथन करण्यात आली. संपूर्ण समाजाची चार वर्णात विभागणी करण्यात येऊन समाजाला विभागण्यात आले. मनुने सांगितले कि माणूस आईच्या उदरातून नाही तर कुण्या एका दैवी (ब्रम्ह) शक्तीच्या डोक्यातून, बाहुतून, मांडीतून आणि पायातून जन्म घेतो. तेही केव्हा ठरवायचे. तर त्याचा जन्म झाल्यानंतर की तो कुठून पैदा झाला. गुलामीची व्यवस्था अश्याप्रकारे निर्माण करून हजारो वर्षे इथल्या लोकांना (ज्यांना बहुजन म्हणतात) गुलाम करण्यात आले. डोक्यातून पैदा झालेल्यांनाच डोके चालविण्याचा अधिकार, विचार करण्याचा अधिकार, बाकी मात्र दिवाळखोर. या मनुने भारतीय समाजावर हजारो वर्षे वैदिकांच्या पुण्याईने राज्य केले. समाजाला छळले, समाजाला लुटले, जनावरांपेक्षाही हिनत्वाचा दर्जा माणसाला देण्यात आला. ही सर्व मनुची करणी, मनूचा उपद्व्याप, मनुचाच कायदा, मनुचीच नीती होती.
२० व्या शतकापर्यंत बाबासाहेबांशिवाय मनूच्या या विलासी आणि गुलामीच्या सत्तेला कुणी आव्हानच दिले नाही. आजही भारतीय समाजाला फसविण्यात येते की, भारत इंग्रजांचा गुलाम होता. कोण म्हणते भारत इंग्रजांचा गुलाम होता ? भारत ख-या अर्थाने मनूचा, इथल्या वर्णव्यवस्थेचा गुलाम होता. इंग्रजांना या देशात पाय रोऊ देणारा पेशवाई ब्राम्हणांचाच काळ होता. मुस्लीम राजवटीला पराभूत करून भारतीय समाजावरील अनैसर्गिक राज्य मनूच्या वारसदारांना चालवायचे होते. म्हणून इंग्रजांची मदत घेऊन यांनी आपली सत्ता मुस्लिमांच्या ताब्यातून सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु इंग्रजांनी यांच्यावरच गुलामी लादण्याचा प्रयत्न केला. म्हणून भारतीय समाजाला इंग्रजांविरुद्ध भावनिक भडकविण्याचा या पेशव्यांनी प्रयत्न केला. इंग्रज लोकशाहीचे, गणराज्याचे पुरस्कर्ते होते. विज्ञानवादी होते. इंग्रजांच्या काळात भारतीय समाज (बहुजन म्हणवून घेणारा) सुरक्षित होता. हा समाज गुलामीतून मुक्त होऊ पाहत होता. अनेक आंदोलने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध उभी राहू पाहत होती. हा धोका होता मनूच्या सत्तेला, मनूच्या वारस पुत्रांना. ज्यांनी स्वतःचा जन्म आईच्या उदरातून झाला. हे मान्यच केले नव्हते. ही इंग्रजांची समानतावादी, पुनरुत्थानवादी, परिवर्तनवादी व्यवस्था मोडून काढायसाठी परकीय गुलामी हा भावनिक मुद्दा यांनी नीट षड्यंत्र आखून भारतीय समाजावर लादला. एकीकडे सुधारणावादी इंग्रजी राजवट तर दुसरीकडे छळवादी, भोगवादी, गुलामीची व्यवस्थावादी राजवट मनूच्या नितीनियामातून भारतीय समाजात एकाच वेळी सुरु होती.
बाबासाहेबांनी भारतीय समाजाची ही कोंडी फोडून सर्वप्रथम मनूच्या व्यवस्थेला समाजासमोर उघडे पाडले. मनुस्मृतीचे दहन करून मनूच्या गुलाम व्यवस्थेला पायदळी तुडविले. भारतीय समाजाला मनूच्या जोखडातून मुक्त करून परिवर्तनवादी इंग्रजांच्या माध्यमातून कायदेशीर सामाजिक स्वातंत्र्य भारतीय समाजाला मिळवून देण्याचा लढा उभारला. विचार, बुद्धी, तर्कज्ञान गमावून बसलेल्या समाजाला लख्ख विद्वत्तेचा आरसा बहाल केला. जंग चढलेल्या डोक्यांना विज्ञान व तर्कशास्त्राच्या कानसावर घासून धारदार बनविले. झोपलेली डोके खळबळून जागी झाली. हजारो वर्षे ज्यांनी विचारच करू दिला नाही. त्यांच्यावर तुटून पडली. संविधानाने मनूच्या व्यवस्थेला चिरडून समता, स्वातंत्र्य, न्यायाची लोकशाही, गणराज्य व्यवस्था निर्माण केली. मनूचा खात्मा व्यवस्थेतून, कायद्यातून, समाजातून झाला. परंतु मनूच्या वारस पुत्रांच्या डोक्यातून मनु काही गेला नव्हता. कायद्याच्या बडग्याने काही दिवस मुग गिळून चूप बसण्याशिवाय पर्याय नव्हता. समाज परिवर्तनाच्या, विज्ञानाच्या कक्षेत सामावू लागला होता. या विज्ञानवादी माणसाला, समाजाला पुन्हा मनूच्या व्यवस्थेत लोटण्यासाठी देवाच्या नावाने देवळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात आले. म्हणून कधीही आईच्या उदरातून जन्म न घेतलेल्या प्रवृत्तींना देवळात मांडून ठेवण्यात आले. तेव्हाच दुसरा मनु उदरात सामावला गेला.
आज तोच मनु जगासमोर आपले नवीन रुपात (बाबा, बुवा, साधू, अण्णा च्या रुपात) पैदा होऊ पाहत आहे. जिथे सर्वसामान्यांचे विचार, बुद्धी, तर्क गहाण ठेऊन आम्ही म्हणतो तेच या देशाचे भाग्य अशी मांडणी केली जात आहे. मागील ५० वर्षे उदरात नाही तर डोक्यात वाढणारा हा मनु आज प्रसुतीच्या मार्गावर आहे. देशातील जनतेला भावनिकरित्या भडकविण्यात येत आहे. लोकांचा भ्रष्टाचार, काळा पैसा अश्या भावनिक मुद्यांवर बुद्धिभ्रंश केला जात आहे. संविधानाला अपयशी ठरवून मनुची नीती या देशात पुन्हा आणायची आहे. स्वतंत्र भारतीय समाजाला पुन्हा एकदा गुलामीत लोटायचे आहे. सर्वसामान्य माणूस देव, साधू, बुवा अश्या लोकांच्या पाठीशी लागून विचार करणे बंद करतो. हा आजपर्यंतचा अनुभव यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच अण्णा, रामदेव ही मंडळी मनुचे दुसरे रूप आहेत. संविधानात भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक उपाय आहेत. ते काटेकोर राबविले गेले तर या देशातला भ्रष्टाचार नाहीसा होऊ शकतो. ही भ्रष्टाचार रोकणारी कलमे कठोरतेने राबविण्याचे सोडून यांच्या मताप्रमाणे कायदे बनावे असा यांचा आग्रह आहे. ही मनुचीच नीती आहे. तुम्ही विचार करू नका. आम्ही सांगतो त्यावर विश्वास ठेवा. आम्ही बनवू तो कायदाच तुमच्या भल्याचा आहे. अशी ही मंडळी सांगत सुटली आहेत. मग लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे काय काम ? या देशाची चिंता करायला, भारतीयांची काळजी घ्यायला अण्णा, रामदेव सारखी मंडळी आहेत ना ? आम्ही म्हणतो तेच फ़क़्त हो म्हणा ! अशा भावनिकतेच्या गळाला आज भारतीय माणूस लागलेला आहे.
देशात भ्रष्टाचार आणि काळा पैसा हा ऐरणीचा मुद्धा आहे. हे नाकारता येत नाही. परंतु ही समस्या सोडविण्यासाठी करण्यात येणारी लोकशाहीच्या नावावरील जनआंदोलने ही संविधान विरोधी अशीच आहेत. हे इथल्या भारतीयांनी का विसरावे. अण्णा यांनी आमरण उपोषण केले भ्रष्टाचारासाठी, लोकपाल विधेयकासाठी हे वरवरचे सत्य आहे. त्या उपोशानामागे संविधान बाह्य कायदा निर्माण करण्याची परंपरा या देशात आणायची आहे. संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत अण्णा सारख्या (आणि ते म्हणतील त्या मंडळींचा) मंडळींना सहभाग पाहिजे आहे. इथल्या संसदेचे, संविधानाचे सार्वभौमत्व धोक्यात आणून विशिष्ट लोकांचा कायदा निर्मितीत सहभाग करवून घेणे. किंवा त्यासाठी सरकारवर दबाव आणणे. ही कुठली लोकशाही आहे ? जरा भारतीयांना कळेल का ? जी मंडळी काही विशिष्ठ वर्गाचे प्रतिनिधित्व करतात ते देशासाठी कायदे करतील अशी तरतूद लोकशाहीत मान्य होऊ शकते का ? सर्वच भारतीयांना या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे.
रामदेव बाबा ने अण्णांचा धागा पकडून काळ्या पैशासाठी उपोषण केले. देशात हिंदू दहशतवाद फोफावत आहे. हे मागील काही वर्षातील घटनांवरून सिद्ध झाले होते. अनेक हिंदू साधू, संत, महात्मे (आधुनिक काळातील मंदिरातील अब्जाधीश लुटारू) देशात घडलेल्या काही दहशतवादी कारवायांमध्ये सापडले होते. त्यांची ही प्रतिमा लोकांच्या डोक्यातून घालविण्यासाठी दुसरा लुटारू (बाबा रामदेव) काळा पैसा घेऊन धाऊन आला. उपोषण मार्गदर्शक असावे. लोकशाहीत प्रत्येकालाच जनतेचा लढा देण्याचा अधिकार आहे. परंतु उपोषणाच्या नावावर जनभावना भडकविण्याचा अधिकार यांना कुणी दिला. बाबा रामदेव उपोषणावर बसल्यानंतर ते जनतेला ज्या पद्धतीने भडकावीत होते, त्याने देशातली शांतता आणि सुव्यवस्था भंग होत होती. हे सत्य नाही का ? मग असे आंदोलन दडपण्याचा अधिकार सरकारला लोकशाहीमध्ये जनतेनेच दिलेला आहे. मग लोकशाहीच्या विरुद्ध केलेली ही दडपशाही आहे. हे कसे काय मान्य करायचे ? (आंदोलन दडपण्याचा मार्ग, वेळ, पद्धत्ती चुकीची असू शकते.) परंतु त्यामुळे सरकारने लोकशाही विरुद्ध कृती केली हे सिद्ध होत नाही.
मुळात महत्वाचा मुद्दा असा आहे की, अज्बो रुपये काळा पैसा म्हणून विदेशी बँकेमध्ये असला तरी त्याला भारतात परत आणण्यात अनेक समस्या आहेत. हे वास्तव आहे. त्या देशातून आपल्या देशात इतकी मोठी संपत्ती परत मिळविणे म्हणजे काही विट्टी दांडूचा खेळ नाही. समजा ती संपत्ती परत आणली तरी त्या पैशाचा विनिवेश करतांना अनेक अर्थशास्त्रीय समस्या उद्भवू शकतात. कारण त्या पैशाचे तारण मूल्य देशात कुठून निर्माण करायचे हा प्रश्न आहे. अर्थशास्त्रीय नियम असा सांगतो की, सरकार १०० रुपयाची नोट जरी चलनात आणत असेल तर त्या शंभर रुपयांचे तारण मूल्य सरकारला देशात सुरक्षित ठेवावे लागते. तेव्हाच त्या पैशाला मूल्य प्राप्त होते. अश्या परिस्थितीत हा काळा पैसा देशात आला तर तो एकतर सेवा क्षेत्रात गुंतवून काही मुलभूत सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. परंतु इथेही या पैशाची गुंतवणूक होणारच आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये हा पैसा येणार. आणि अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे तारण मूल्य उपलब्ध नाही. अश्या परिस्थितीत संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस येऊ शकते. हे सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. परंतु सुशिक्षित आणि विद्वानांनी (जे अण्णा, रामदेव च्या गळाला लागले आहेत त्यांना) तरी याचे विश्लेषण न करणे म्हणजे देशासोबत केलेला देशद्रोहच ठरेल.
यावरून हे सहज स्पष्ट होते आहे की, भारतात चालणारी आंदोलने देशासाठी, भारतीयांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी, उत्थानासाठी नसून काही विशिष्ट षड्यंत्र आखून भारतीयांसोबत करण्यात येणारी धोकाधडी आहे. प्रत्येक मुद्द्याला राजकारणाच्या चष्म्यातून बघण्याची वाईट सवय भारतीयांना जडली आहे. मुळात या आंदोलनांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अंगाने विचार करून धर्मवादी जातवादी व्यवस्थेच्या मुळाशी तपासावे लागणार आहे. हे राजकारण नाही. हे समाजाला गुलामगिरीत टाकणारे, समाजाची बुद्धी भ्रष्ट करून देशाचे गुलामिकरण करणारे आहे. मनुची प्रसूती २१ व्या शतकात करण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करण्याचे हे षड्यंत्र आहे. भारतीयांना (बहुजन म्हणना-या समाजाला) गुलाम करण्यासाठी चालणारी ही आंदोलने आहेत. हे वेळीच ओळखण्याची गरज आहे. देशात मूल्यव्यवस्था निर्माण करून निष्ठावान माणूस घडविणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा ही समस्या त्यातूनच सुटू शकते. बाबा, बुवा, अण्णा च्या नादी लागून देशातले हे महारोग जाणार नाही. हे लक्षात घ्या. घरात नवीन प्रसूतीची चाहूल लागली की जी धावपड चालते. तशीच देशात आज असलेली अस्थिरता, आंदोलने ही धावपळ मनूच्या प्रसूतीसाठीच चाललेली आहे. यांच्या विषारी डोक्यात वाढणा-या मनुची प्रसूती पुन्हा या देशाच्या मातीवर होऊ द्यायची नसेल तर सावध व्हा ! यांच्या डोक्यातील मनु गर्भातून प्रसूतीसाठी डोकावतो आहे. या देशात लोकशाही आहे, ती राहणार ! जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत लोकशाही शाबूत आहे. बाबा, बुवा च्या नादी लागून देशाची सुरक्षितता धोक्यात आणू नका. संविधान प्रत्येक माणसाच्या डोक्यापर्यंत पोहचावा. हा देश पुन्हा सुजलाम सुफलाम होईल.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१
No comments:
Post a Comment