शिवशक्ती - भीमशक्ती : पुढे काय ?
महाराष्ट्रात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शिवशक्ती - भीमशक्ती असे त्याला गोंडस नावही प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक राजकीय बदल घडून आले. परंतु आताचा अनुभव हा काही वेगळाच असल्याचे दिसून येते. शिवशक्ती - भीमशक्ती हा पहिला प्रयोग आहे असेही नाही. याआधीही असा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु तेव्हाचा प्रयोग फसला. आताच्या प्रयोगाला मात्र जोम चढले आहे. संपूर्ण महाराष्ट्रीय समाजमन या राजकीय बदलाच्या प्रवाहित प्रयोगाने ढवळून निघाले आहे. अनेक तर्क-वितर्कांना, प्रश्न-उत्तरांना, यश-अपयशांना, शक्य-अशक्य याला उधान आले आहे. कुणी सकारात्मक तर कुणी नकारात्मक मानसिकतेने याचे विश्लेषण करण्यात गुंग झाला आहे. जिवंत समाजाचे ते एक लक्षण समजावे. यात काही शंका नाही. परंतु जितके राजकारणाचे विश्लेषण केले जाते; तितके समाजकारणाचे आणि अर्थकारणाचे जोडीला संस्कृतीकरणाचे विश्लेषण व्हायला पाहिजे. ते होतांना दिसून येत नाही.
आजपर्यंत रिपब्लिकन नेत्यांनी कॉंग्रेस ला समर्थन देण्यात धन्यता मानली होती. शरद पवारांचा नवीन कंपू तंबू बांधून राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या रुपात महाराष्ट्रात उभा झाला. तेव्हा त्या तंबू चा आसरा घेऊन काही रिपब्लिकन नेत्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली. १९८९, १९९२ आणि १९९६ ला भारतात झालेल्या उलथापालथीने संपूर्ण राजकारणाचे संदर्भ बदलून गेले. बहुमतातून सत्ता मिळविणे दुरापास्त झाल्याने आघाडी, गठबंधनाच्या राजकारणाला सुरवात झाली. तुकड्यांमध्ये विभागलेला रिपब्लिकन पक्ष आणि नेते स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कंपुंची वाट धरू लागले. कधी तत्कालीन मुद्द्यावर तर कधी राजकीय खेळी म्हणून. परंतु विचार आणि सामाजिक निष्ठा कायम ठेवण्याचा कायम प्रयत्न केला. यामुळे धर्मनिरपेक्षतेचे, लोकशाहीचे पांघरून घेतलेल्या कॉंग्रेस पक्षालाच पसंत केले. शरद पवारांची राष्ट्रवादी त्यात आलीच. त्यामुळे राष्ट्रवादी काय आणि कॉंग्रेस काय अशी धारणा बनायला सुरवात झाली. शरद पवार पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहून कॉंग्रेस मधून वेगळी चूल थाटली. महाराष्ट्रात सत्तेची चव चाखली आणि सतत कॉंग्रेस चे बोट धरून केंद्रातील मंत्रीपदाची चव चाखली. मात्र रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांना या प्रवाहातून बाहेरच राहावे लागले. समाजात मतांचे राजकारण केले जाऊ लागले. समाज वीखरू लागला. नेते देशोधडीला लागले. पक्ष विस्कळीत झाला. जनता हैराण झाली. आणि अश्याच परिस्थितीत कोल्हया-कुत्र्यांनी डाव साधला.
प्रस्थापित पक्षांच्या नेत्यांनी मग कॉंग्रेस पासून तर नंतरच्या काळात असतीत्वात आलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रिपब्लिकन नेतृत्वात संघर्ष निर्माण करून रिपब्लिकन पक्षाचे विघटन घडवून आणले. त्यासाठी कधी भावनिक मुद्द्यांचे भांडवल करण्यात आले. तर कधी वैचारिक मुद्यालाच भांडवल बनविले गेले. नामांतर आंदोलन ते रिडल्स इन हिदुइझम चे आंदोलन हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. परंतु या सर्वात नेतृत्वाला देण्यात आले पद आणि प्रतिष्ठेची लालूच ही सुद्धा तितकीच कारणीभूत होती. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष संगठीत राहूच शकला नाही. ज्यांनी भावनिक आणि वैचारिक मुद्याला सकारात्मकता दर्शविली त्याकडे रिपब्लिकन नेतृत्व आकर्षित होऊ लागले. यांना आकर्षित करण्यात कॉंग्रेस पटाईत होती. ज्यांनी भावनिक आणि वैचारिक आंदोलनाला विरोध केला. कधीकाळी सामाजिक संघर्षाची ठिणगी पडली. दंगली घडविल्या त्यांच्यापासून रिपब्लिकन पक्ष दोन हात दूर राहू लागला. याचा लाभ घेऊन कॉंग्रेस ने रिपब्लिकन पक्ष व नेतृत्वाचे खच्चीकरण केले. इतकेच नाही तर ज्या समाजाने त्यांना सदैव सत्तेत राहण्यासाठी आपला पाठींबा दर्शविला त्याच समाजाच्या सामाजिक, आर्थिक उत्थानासाठी उदासीनता दर्शविली.
रिपब्लिक पक्षाची ताकत निर्मितीपासूनच लक्षवेधी राहिली आहे. रिपब्लिकन पक्षाचा मतदारही सत्तेचा प्रमुख दावेदार राहिलेला आहे. हा मतदार निवडणुकीमध्ये ज्या पक्षांच्या पाठीशी उभा राहतो. त्या पक्षाला सत्तेपासून दूर राहता येणार नाही. हे अतूट सत्य आज सर्वांच्याच लक्षात आले आहे. पण असे दिसते की रिपब्लिकन नेत्यांनाच त्याचा साक्षात्कार झाला नाही. कॉंग्रेस सोबत गठबंधन करतांना रिपब्लिकन नेतृत्व एकत्र येऊन राजकारण केले असते तर आजची परिस्थिती काही वेगळीच दिसून आली असती. आज महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस ज्या प्रकारे सत्तेची चव चाखीत आहे. तीच सत्ता रिपब्लिकन पक्षाला केव्हाच महाराष्ट्रात स्थापन करता आली असती. १९९९ ला रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन नंतर केलेल्या युतीने महाराष्ट्रातून या पक्षाला ४ खासदार लोकसभेवर निवडून आणता आले होते. परंतु बहुमाताभावी केंद्रातील सरकार फार काळ टिकू शकली नाही. आणि नेत्यांना आपले प्रतिनिधित्व गमवावे लागले. निदान ५ वर्षे जरी या नेत्यांना त्या काळात संसदेचे प्रतिनिधित्व करता आले असते तरी परिस्थितीत मोठा बदल घडून आला असता. भविष्यातील रिपब्लिकन पक्षाचा चेहरामोहरा बदलला असता. नंतर मात्र पुन्हा फाटाफूट झाली. जी पुन्हा कधी एकत्र येऊ शकली नाही. निर्णायक मतदार रिपब्लिकन पक्षाजवळ असतांना त्याचा योग्य वापर करता न आल्याने रिपब्लिकन पक्षावर ही परिस्थिती ओढवलेली आहे. प्रत्येकच नेत्यांनी आपापली वेगळी चूल मांडून ठेवण्यात धन्यता मानली. त्यासाठी कुणी राष्ट्रवादीच्या मागे तर कुणी कॉंग्रेस च्या मागे लागला. एकाचा आघाडीतील सहकारी पक्षांशी रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांनी वेगवेगळे संधान बांधल्याने रिपब्लिकन पक्ष शक्तीचा पुरेपूर वापर या नेत्यांना करता आला नाही.
राजकारणातील विरोध आणि मैत्री ही कायमची राहत नाही. राजकारण मूल्य आणि तत्वांवर चालत असले; वैचारिकता, निष्ठा राजकारणाच्या मुळाशी वास्तव्य करीत असले; तरी तत्कालीन परिस्थिती आणि राजकीय सत्तेचे महत्व याला अधिक प्राधान्य प्राप्त होते. प्रत्येक पक्षाला त्या पक्षाची आणि त्या पक्षाच्या मतदारांची राजकीय क्रयशक्ती सतत टिकवून ठेवायची असते. राजकीय प्रवाहात पक्ष आणि पक्ष कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवण्यासाठी जी धडपड केली जाते. कदाचित आज अस्तित्वात आलेली शिवशक्ती -भीमशक्ती हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. आजपर्यंत रिपब्लिकन पक्षाला आंबेडकरी विचारांच्या परीघातूनच बघितल्या गेले. त्यातून आंबेडकरी विचारांचेही राजकीयीकरण करण्यात आले. मुळात आंबेडकरी विचार राजकीय परिघातून पाहिले जाऊ शकत नाही. संस्कृतीकरण आणि सामाजिक, आर्थिक उत्थान हे आंबेडकरी विचारांच्या केंद्रस्थानी आहेत. समता, न्याय, स्वातंत्र्य ही मुल्यव्यवस्था समाजात रुजविण्याचे आग्रही प्रतिपादन आंबेडकरी विचारांत आहे.
ज्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन नेत्यांना केराची टोपली दाखविली ते आजपर्यंत याच भ्रमात असावे की, आंबेडकरी विचारांवर अधिष्ठित रिपब्लिकन पक्ष हा हिदुत्ववादी आणि मुलतत्ववादी भूमिका घेणा-या पक्षांशी संधान साधणार नाही. तो भ्रम तोडून रामदास आठवले विरोधी गोटात जाऊन बसले. त्यामुळे रिपब्लिकन मतदारांच्या भरोश्यावर सत्तेची चव चाखणा-या पक्षांच्या पायाखालून जमीन सरकू लागली. परंतु इथेही काही खूप मोठे परिवर्तन घडून येण्याची चिन्हे तरी अद्याप दिसून येत नाही. रामदास आठवले म्हणजे काही संपूर्ण रिपब्लिकन मतदार नव्हे. रामदास आठवले एकटे जाऊन बसले म्हणून समाजाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलेल ही भविष्यवाणी अशक्यप्राय आहे. ज्यांनी रिपब्लिकन नेत्यांना महत्व दिले नाही त्यांना धडा शिकविणे हा एक उद्देश असू शकतो. परंतु संपूर्ण समाजाची व विचारांची युती होऊ शकत नाही. सत्तेसाठी केला गेलेला खेळ होऊ शकतो. सामाजिक अभिसरण नाही. सत्तेचा खेळही रिपब्लिकन पक्षाच्या एकजुटीशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. रामदास आठवलेंनी सत्तेच्या मोहापाई आपली वैचारिक क्षमता मातोश्रीवर गहाण ठेवलेली दिसून येत आहे. रिपब्लिकन नेतृत्व एक येऊ शकत नाही. तसे अनेक प्रयत्न करून झाले. परंतु त्यात यश आले नाही हे त्यांचे वक्तव्य अतिशय हास्यास्पद वाटते. स्वतःला कमजोर ठेऊन कोणते राजकीय परिवर्तन ते घडवून आणणार आहेत ? हे अनाकलनीय आहे.
बदलणारे प्रादेशिक राजकारण लक्षात घेतले तर रिपब्लिकन पक्ष सत्तेचा भागीदार होऊ शकतो. त्यासाठी त्याला आधी आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. यात जनतेची भूमिका जास्त महत्वपूर्ण राहणार आहे. कुणाशी संधान साधावे आणि कुणाशी साधू नये हे आता राजकारणाच्या क्षेत्रातून हद्दपार झाले आहे. वैचारिकता त्याच्या आड येऊ नये. सामाजिक समानता आणि सर्वस्वी कल्याणकारी धोरण हे कुठल्याही परिस्थितीत राजकीय गठबंधनाच्या परिघाबाहेर जाऊ नये. निदान रिपब्लिकन पक्षासाठी तरी. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर सद्यस्थितीत रिपब्लिकन पक्षासाठी महत्वाचे आहेत. जोगेंद्र कवाडे हे सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यात आठवलेंची लहरी कृती हीच यांना एकत्र येऊ देत नाही. रिपब्लिकन पक्षाच्या एकत्रीकरणाच्या प्रयत्नांना रामदास आठवले यांच्यामुळे अनेकदा खिळ पडली आहे. आतातरी त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन सत्तेसाठीचे राजकारण केले नाही. तर समाज पुन्हा एकदा विखुरल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत या समाजाच्या मतावर कॉंग्रेसनी सत्ता उपभोगली. आता शिवसेना आणि भाजप उपभोगेल. समाजाला त्यातून काहीही मिळणार नाही. गठबंधन ही काळाची गरज आहे. ते नाकारण्याचे काहीही कारण नाही. मात्र हे गठबंधन जनतेच्या पाठींब्यावर व्हावे. पक्ष शक्तीच्या मजबुतीवर व्हावे. नेत्यांच्या लहरी कृतीवर नाही. याचा विचार तरी निदान केला जाने महत्वाचे आहे.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ९२२६७३४०९१
No comments:
Post a Comment