Saturday, 4 June 2011

बदलती रिपब्लिकन पक्षाची वाटचाल...

बदलती रिपब्लिकन पक्षाची वाटचाल...

भारतीय राजकारणाने १९९२ पासून वेगळ्या राजकीय प्रवाहाला जन्म दिला आहे. एक नवीन राजकीय संस्कृतीचा जन्म झाला आहे. १९९२-९३ ला झालेल्या  ९३ आणि ९४ व्या घटनादुरुस्तीने  भारतीय लोकशाहीचे  विकेंद्रीकरण मोठ्या प्रमाणात घडून आले. असे राजकीय अभ्यासकांच्या माध्यमातून मांडले जाते. या ९३ आणि ९४ व्या घटनादुरुस्तीमुळे  स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकांमध्ये झालेल्या व्यापक राजकीय बदलाने मोठे परिवर्तन देश  पातळीवरील राजकारणावर  घडवून आणले.   भारतातील लोकशाही मजबूत झाली...? अनेक वर्षे चाललेल्या एकछत्री राजकीय सत्तेला खिळ बसली. १९७८ आणि १९८९ ही दोन पण अल्पकालिन उदाहरणे वगळता सत्ता  कुठेतरी एकाच पक्षाच्या हातात  एकवटते आहे. असाच भारतीयांचा  अनुभव होता. याच  कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय  राजकारणातील बदलाचा आणि काळानुरूप बदलत जाणा-या व्यवस्थात्मक मुलभूत  बदलाचा परिणामही भारतीय राजकारणावर घडून आला. त्यातच १९९२ ला तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी स्वीकारलेले  खाउजा चे धोरणही जबाबदार ठरले.

१९८९ पासून केंद्रात कुठल्याही पक्षाला बहुमत प्राप्त होऊ शकले नाही. १९९६ ला तर भारतातील बदलणा-या राजकारणाचे अगदी चित्रच स्पष्ट झाले. १९९६ ते १९९९ या काळात भारताने आणि भारतीयांनी अनुभवलेली राजकीय अस्थिरता एक इतिहास घडवून गेलीस्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका ते केंद्रीय सत्ता अशी निर्माण झालेली राजकीय उतरंड आपले वेगळे अस्तित्व आणि वेगळे राजकारण घेऊन समोर आली. स्थानिक  स्वराज्य संस्थेच्या बळावर राज्यातली सत्ता हस्तगत करता येत नाही. तसेच राज्यातील सत्तेच्या बळावर केंद्रीय सत्ता हस्तगत करता येत नाही. हे स्पष्ट झाले. त्यातच राज्याराज्यांमध्ये नव्याने उदयास आलेल्या प्रादेशिक पक्षांच्या गाजरगवताने राष्ट्रीय पक्षांना सक्षम पर्याय उभे केले. आता हे चित्र बदलणार नाही. निदान काही काळ तरी याच बदलणा-या राजकीय प्रवाही अग्निदिव्यातून भारतीय राजकारणाला जावे लागणार आहे. म्हणून नव्या  समीकरणांना, नव्या संस्कृतीला, नव्या तडजोडींना, नव्या राजकीय धोरणांना, नव्या पक्षीय राजकारणाला सुरवात झाली.

येणारा काळ हा केंद्रात आघाडीचेच सरकार घेऊन येणार आहेमात्र नुकत्याच झालेल्या काही राज्यांमधील विधानसभांच्या निवडणुकांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने  समोर आलीती म्हणजे राज्यांमध्ये  प्रादेशिक पक्ष बहुमतातील सत्ता स्थापन करीत चालले आहेततामिळनाडू, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल या देशातील महत्वाच्या  आणि मोठ्या राज्यांमध्ये बहुमतातील सरकार स्थापन झालेले आहे. म्हणजेच  राज्यातील राजकारणाचा ओघ प्रादेशिक पक्षांकडे वाढत  चाललेला  आहे. त्यातही  स्थिर सरकारला  प्राधान्य देण्यात येताना दिसून येत आहे. स्थानिक विकासाला प्राधान्य देऊन राजकीय जनमत  निर्धारित होत आहे. बदलणा-या राजकीय प्रवाहाची ही नांदी आहे. राजकीय विचार, तत्व, सिद्धांत यावर राजकीय सत्ता आणि राजकीय सत्तेचे महत्व प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच राजकीय तडजोडीराजकीय घडामोडीराजकीय उत्तरदायित्व आणि राजकीय संस्कृती याला वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. परंपरागत राजकीय निष्कर्षांना  तिलांजली देऊन नवनवीन राजकीय समीकरणे बनतांना  आणि बिघडतांना दिसून येत आहेत.

इथल्या मार्क्सवादी समूहाने आपली राजकारणातील सैद्धांतिक ओळख गमावलेली आहे. बसपा निर्मितीपासूनच सैद्धांतिक राजकारण करू शकली नाही. शिवसेना-भाजपा हिंदुत्ववादाचे बोट धरून चालले आहेत. रिपब्लिकन पक्ष या देशात जातीवादी आणि हिंदुत्ववादी समूहाच्या विरुद्ध उभा राहण्यासाठी सतत कॉंग्रेसशी सौख्य करून राहिला. राज्याराज्यात राष्ट्रीय पक्षातून बाहेर पडून असंतुष्टांनी प्रादेशिक पक्ष स्थापन केले. त्यांनी राज्यांच्या राजकारणावर आपला ताबा मिळविला. बहुतेक राज्यातून राष्ट्रीय पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता बदलणा-या राजकीय प्रवाहात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकच सैद्धांतिक जोड असणारे पक्ष सिद्धांताच्या परिघाबाहेर जाऊन निर्णय घ्यायला लागले आहेत. विळ्या-भोपळ्याचे संबंध असणारे पक्षही एकत्र येतांना पाहून याची प्रचिती येत आहे. महाराष्ट्रात घडून आलेले शिवसेना-भाजपा-रिपब्लिकन (आठवले) यांचे गठबंधन सर्वच राजकीय संकेतांना  बुचकळ्यात टाकणारे आहे.

शिवसेना-भाजपा-रिपब्लिकन (आठवले) या राजकीय युतीची धडकी आतापासूनच इतर पक्षांनी घेणे सुरु केले आहे. या युतीला शरद पवारांनी जास्तच मनावर घेतले आहे. असे दिसून येते. आजपर्यंत शरद पवारांनी रामदास आठवलेंचा मतासाठी वापर करून घेतला. रिपब्लिकन मतदारांना भावनिक मुद्यांच्या आधारे भडकावून सदैव त्यांचा वापर करून घेतला. नामांतर आंदोलन १७ वर्षे सतत पेटत ठेऊन त्याचे राजकारण केले. आता रामदास आठवले त्यांचे बोट सोडून विरोधकांच्या घरचे पाहुणे बनल्याने दादर रेल्वे स्टेशन ला चैत्यभूमी नाव देण्यात यावे म्हणून शरद पवार राजकारण करीत चालले आहेत. दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली. मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर राज ठाकरेंच्या मनसे ने प्रभाव निर्माण केला आहे. मोठ्या प्रमाणातील आंबेडकरी युवा समूह राज ठाकरेच्या मनसेच्या राजकारणात मुंबई आसपासच्या परिसरातून जुडू लागला आहे. आठवलेंच्या युतीमुळे सर्व समीकरणे मोडू लागली आहेत. आता मनसे सोबत जुडलेला आंबेडकरी युवा वर्ग रामदास आठवलेमुळे शिवसेनेसोबत जोडला गेला तर मनसेच्या राजकारणाला खिळ बसू शकते. हे ओळखून राज ठाकरे हे सुद्धा थोडे विचलित झाले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने केलेल्या चैत्यभूमी नामांतराच्या राजकारणाला आणि दुसरीकडे आठवलेंच्या राजकीय धोरणाला शह देण्याचा दुहेरी लढा  मनसेला द्यावा लागत आहे.  अश्या परिस्थितीत राज ठाकरे आणि रिपब्लिकन पक्षाचे इतर नेते प्रकाश  आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांच्याकडून कोणती रणनीती  आखली  जाणार आहे. त्यावरही महाराष्ट्रातील पुढील राजकारण बरेच निर्भर राहणार आहे.

रिपब्लिकन राजकारण आता प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय धोरणाकडे लक्ष वेधून आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या राजकारणावर प्रकाश आंबेडकर यांचा दबदबा आहे. शिवाय रिपब्लिकन पक्षाचे यश त्यांनाच आतापर्यंत प्राप्त करता आले आहे. इतर नेत्यांनी केलेले रिपब्लिकन पक्षाचे राजकारण यशस्वी ठरलेले नाही. परंतु प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व रिपब्लिकन पक्षात यशस्वी ठरले आहे. त्यामुळे निदान महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाची समीकरणे मोठ्या प्रमाणात प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय वाटचालीवर अवलंबून राहिलेली आहेत. मागील सार्वत्रिक निवडणुकी मध्ये निर्माण झालेल्या तिस-या आघाडीत प्रकाश आंबेडकर सहभागी झाल्याने या आघाडीला यश येऊ शकले नाही. प्रकाश आंबेडकरांचे राजकीय महत्व त्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आठवलेंच्या शिवसेना भाजप सोबतच्या युतीनंतर पुन्हा एकदा आंबेडकरी समूहाची नजर प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वळली आहे. कारण आंबेडकरी समूहाने आठवलेंच्या या गठबंधनाला पाहिजे तितके मनावर लावून घेतलेले नाही. मुळात आंबेडकरी मन या पक्षांना स्विकारू शकत नाही. हेही त्यामागील एक वास्तवच आहे. परंतु काही लोकांनी वेगळा प्रयत्न  म्हणून या युतीकडे सकारात्मक  धोरणातून पाहणे सुरु केले आहे. त्यामुळे अशा वर्गाची भूमिकाही या युतीच्या यशापयशात महत्वाची ठरणार आहे.

राजकारणात काय स्वीकारावे आणि काय स्विकारू नये. यातून अजूनही आंबेडकरी समूह बाहेर पडलेला नाही. परंतु आता या समूहातून विचारमंथनाला सुरवात झाली आहे. आंबेडकरी समूहाच्या राजकीय संस्कृतीकरणासाठी हे विचारमंथन लाभदायक ठरेल असा आशावाद व्यक्त केला जाऊ शकतोपारंपारिक राजकारणातून बाहेर पडून नव्या प्रयोगांना आता या समूहातील लोकांनी सहजरित्या  स्विकारायची तय्यारी दर्शविली आहे. त्यामुळे कदाचित या समूहातील नव्या राजकीय वाटचालीला  सुरवात होऊ शकते. परतू हे सर्व अंदाज आहेत. वास्तव यापेक्षाही काही वेगळे असू शकते. कारण ज्या समूहात सामाजिक आणि राजकीय एकोपा दिसून येत नाही. त्या समूहाची राजकीय वाटचाल सदैव संशयास्पद नजरेतूनच बघितली जातेआज  आंबेडकरी समूहाच्या बाबतीतही असेच काहीसे दिसून येत आहे.  आंबेडकरी समूहात एकोपा राहिलेला नाही. राजकीय एकोपा तर नाहीच परंतु सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक एकोपाही या समूहात दिसून येत नाही. सर्वच स्तरातून आंबेडकरी समूहावर प्रतिआक्रमणे सुरु झाली आहेत. समाज संभ्रमावस्थेत आहे. तर काही घरभेद्यांनी राजकीय स्वप्नात या समाजाला इतके गोवले आहे कि त्यामुळे काहींनी सरळ सरळ घरातच सुरुंग  लावायला सुरवात केली आहे. या सर्व परिस्थितीतून आंबेडकरी समूह जोपर्यंत बाहेर पडत नाही. तोपर्यंत या समूहाची आणि रिपब्लिकन पक्षाची कोणतीही राजकीय वाटचाल यशस्वी होईल असे वाटत नाही.  मुळात हा पक्ष जरी  अखिल भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारा असला तरी आंबेडकरी समूह हाच प्रातिनिधिक  मतदार आहेहे आतापर्यंतच्या पक्षाच्या वाटचालीवरून आणि नेत्यांच्या वाटचालीवरून दिसून येत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी पक्षाच्या याच मान्यतेला छेद देऊन सर्वसमावेशक राजकारणाकडे वाटचाल केली आहे. आज मोठ्या प्रमाणात बहुजन समाज आणि प्रामुख्याने राजकीय प्रवाहातून जाणीवपूर्वक बाहेर ठेवण्यात आलेल्या समूहाला हाताशी घेऊन प्रकाश आंबेडकर रिपब्लिकन पक्षाचा लढा देत आहेत. ते त्यात यशस्वीही झाले आहेत. मुळातला आंबेडकरी समूह आणि आंबेडकरी विचारांनी प्रभावित समूहाने मात्र त्यांच्याकडे अद्यापही पाठ फिरवलेली दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल प्रतीगाम्यांनी  केलेल्या दुष्प्रभावामुळे आणि बदनामीमुळे हे सर्व होत आहेबाबासाहेबांच्या घराण्याशी इथल्या  प्रतीगाम्यांनी दाखविलेली उदासीनता तर लक्षात येते. परंतु असा समूह जो बाबासाहेबांच्या परीसस्पर्शाने  हजारो वर्षाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक गुलामगिरीतून मुक्त झाला. अश्या आंबेडकरी समूहानेही आंबेडकरी घराण्याविषयी दाखविलेली उदासीनता या समूहाच्या कृतघ्नतेलाच प्रदर्शित करीत आहे. प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या समूहाच्या अश्या कृतघ्नतेविषयी फारच अस्वस्थ आहेत. आंबेडकरी राजकारणाची दुरावस्था पाहून ते सुद्धा अस्वस्थ आहेत. परंतु समाजाने आंबेडकरी विचारांच्या राजकारणाकडे फिरविलेली पाठ त्यांच्या अस्वस्थतेत आणखीच भर घालत आहे.

आतातरी पुन्हा एकदा राजकीय परिस्थिती आंबेडकरी समूहाच्या पारड्यात आलेली आहे. प्रकाश आंबेडकर या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून समाजाने आपल्या राजकीय क्रयशक्तीत वाढ घडवून आणण्याची गरज आहे. रामदास आठवले किती लोकांना सोबत घेऊन गेले. हे अद्याप कुणालाही सांगता येत नाही. इतकेच काय तर ज्यांनी त्यांच्याशी सलोखा केला ते सुद्धा शाशंक आहेत. त्यामुळे खूप काळपर्यंत ही युती टिकून राहील अशी चिन्हे दिसून येत नाही. टिकले तरी शिवसेना आणि भाजप त्यातून आपला राजकीय लाभ घडवून आणण्याचे षड्यंत्र आखतील. आंबेडकरी समूहाने सुद्धा याचाच लाभ घेऊन राजकीय लाभ उठवावा. तो लाभ करून घेतांना काही गोष्टी जाणीवपूर्वक आम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. रिपब्लिकन पक्षांच्या इतर नेत्यांना संघटीत करण्यावर भर देऊन आपल्या तडजोडीच्या आणि प्रतिनिधित्वाच्या शक्तीत वाढ करावी लागणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय दुसरे सक्षम रिपब्लिकन नेतृत्व म्हणून अद्यापतरी महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत नाही. त्यामुळे बाबासाहेबांप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेतून तरी हा समूह प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी उभा होणे गरजेचे आहे. सत्ता रिपब्लिकन पक्षाच्या हातात यायला उशीर लागणार नाही.
---प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment