Thursday, 26 May 2011

हा देश कुणाचा ?


हा देश कुणाचा  ?

हा देश कुणाचा ? असा प्रश्न आज मला तुम्हाला विचारावासा वाटतो. या प्रश्नाने मी पूर्णतः अंतर्बाह्य हादरून गेलो आहे. दर दिवशी सकाळी वर्तमान पत्र हातात पडले कि देशातील घडलेल्या घडामोडींकडे लक्ष जाण्याआधी वर्तमानपत्रातून झळकणा-या जाहिरातींवरच नजर जाते. त्यातही संताप तेव्हा येतो  जेव्हा  दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या चुटक्या फुटक्या नेत्यांचे  वाढदिवसाचे शुभेच्छा  संदेश  पान भरून भरून येतात. अगदी तडपायाची आग मस्तकात जाते. वर्तमानपत्रे देशात घडणा-या चालू घडामोडी आणि आतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचविणारे साधन आहे.? कि रोज नवीन घडणा-या नेत्यांना घराघरात पोहचविण्याचे साधन आहे.?  विचारमंथनाचे व्यासपीठ आहे ? कि नेता सांगणारे भागभांडवल ? माहिती प्रसारणाचे केंद्र आहे ? कि नेता प्रसारण केंद्र ? अजूनही सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. हि कोंडी काही केल्या अजूनही फोडली जात नाही. उटसुट कोणीही स्वतःला नेता म्हणून घोषित करतो आणि आपल्या वाढदिवसाचे फोटो वर्तमानपत्रातून कार्यकर्त्याच्या  (त्यांनीच  ठरविलेले-प्रत्यक्षात असतात कि नाही माहित नाही) मुखात शुभेच्छासंदेश घालून छापून आणतो. आजही तेच घडले. मान्य केले कि हे नेते गल्लीतील नसून दिल्लीतील आहेत. भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष  नितीन गडकरी यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा संदेशाने अख्खे  वर्तमानपत्र भरभरून आले आहेत. करोडो रुपये खर्च केले गेले आहेत. आणि ते दररोज होत आहेतयालाच म्हणायची का आमच्या देशाची लोकशाही ?

देश दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे. (प्रत्यक्ष आकडेवारीनुसार - प्रत्यक्षात नाही) देशातली गरिबी एकीकडे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे श्रीमंतीही वाढत चालली आहे. कमालीची विषमता पाहायला मिळत आहे. नेते-उद्योगपती जगातील श्रीमंतीच्या सूचित स्थान मिळवीत आहेत. तर दुसरीकडे इथला सर्वसामान्य, गरीब जगाच्या गरिबीच्या सूचित अगदी पहिले स्थान मिळवीत आहे. आम्ही अजूनही झोपेत कसे आहोत ? कि आम्ही झोपेचे सोंग घेतले आहे ? उत्तर मिळाले तर मला नक्कीच कळवा. नेत्यांकडील संपत्तीत दिवसेंदिवस वाढ आणि इथला शेतकरी, गरीब दिवसेंदिवस हवालदिल होत चालला आहे. हाताला काम नाही आणि पोटात भाकर नाही. इतकी हेलावून सोडणारी परिस्थिती का निर्माण झाली आहे ? संपत्तीचे केंद्रीकरण होतच चालले आहे. आणि गरीबच लुटला जात आहे. ज्या देशात करोडो, अब्जो रुपये धिंगाणा मस्ती करण्यात घालविले जातात. मुला मुलीचे लग्न करण्यात घालविले जातात. वाढदिवस साजरे करण्यावर घालविले जातात. तर दुसरीकडे मुलीचे लग्न करू शकत नाही. म्हणून आमचा बळीराजा गळ्याभोवती फास लावून घेत आहे. गरीब पैसा नाही म्हणून आपल्या मुलीला विकत आहेत. (स्वाभिमानही त्यांच्यातच आहे. पण अगदीच  मागासलेला आणि गरिबीने त्रस्त असणाराअनेकांना तर त्यांचा जन्म केव्हा, कधी, कसा आणि कशासाठी झाला हेही माहित नाही. कुठे उधळणार पैसा. कसे साजरे करणार वाढदिवस. कुठून आणणार पैसा. कारण तो तर या हरामखोर नेत्यांनी लुटून नेला आहे.
अगदी कमालीच्या बाहेरची उदासीनता नेत्याकडून दाखविली जात आहे. जितका पैसा (करोडो अब्जो रुपये) या शुभेच्छा संदेशावर खर्च होतो. तो पैसा काही मुलभूत गोष्टींवर खर्च केला गेला तर इथली परिस्थिती बदलणार नाही का ? परंतु त्यांच्याकडून तशी अपेक्षाही का करावी ? कारण जनताच नेत्यांचा उदोउदो करण्यात व्यस्त असते. जनतेचेच नियंत्रण नेत्यांवर नाही. अगदी मोकाट कुत्र्यांसारखे जनतेने नेत्यांना वा-यावर सोडले आहे. त्याला भूंकण्यासाठी आम्हीच प्राचारण करतो. तुम्ही आम्हाला चावा म्हणून आम्हीच आपले हात त्यांना देतो. नेता कसा मस्तावणार नाही. त्याला माहित आहे जनतेच्या डोळ्यावर काळी पट्टी कशी बांधायची ते... कार्यकर्ता म्हणून एखाद्याला खुश करायचे. त्याच्यासोबत असणारे सर्वच सुखावतात. आणि मग नेत्याच्या नावाने चांगभल. वा रे माझ्या भारत देशा ! वा रे माझ्या भारतीय माणसा ! केव्हा होईल तुझी निद्र भंग ! केव्हा घडवशील तू लोकनेता ! तुझ्या -या लोकशाहीचा पुरस्कर्ता !

दर दिवशी वर्तमान पत्रातून होणा-या अशा शुभेच्छा संदेशावरील खर्चाची गोळाबेरीज केली तर या देशातील ६० % गरीब दर दिवसाला जगण्यासाठी जितका खर्च करतात त्यापेक्षाही अधिक होईल. यालाच तुमची लोकशाही म्हणाल का ? हा देश -या अर्थाने तुमचा आहे का ? कि या नेत्यांचा आहे? इथल्या ढोंगी पंडितांचा आहे ? कि दाढी आणि केस वाढवून जनतेला फसविणा-या, त्यांना लुटणा-यांचा आहे ? ही भारतीय जनता हा देश केव्हा आपल्या हातात घेणार आहे. आज संपूर्ण देशात अनेक जीवनावश्यक  गोष्टीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात नितीन गडकरी संपूर्ण भारतातील  वर्तमान पात्रांच्या पानापानावर झळकत आहेत. फुकट छापल्या गेलेत का हे शुभेच्छा संदेश ? म्हणजे निदान आज तरी  गरिबांच्या श्रमाचा  अब्जो रुपया  नितीन गडकरीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी वर्तमानपत्रवाल्यांवर  लुटविला गेला. या देशात का हेच पैदा झाले आहेतबाकीचे ११० करोड  जनता कुठे गेली ? बोटावर मोजण्याइतकी नेते मंडळींनाच या देशात पैदा होण्याचा गौरव वाटतो का ? बाकीच्यांना तो गौरव नाही. तो त्यांचा अधिकार नाही का ?

हा प्रश्न फ़क़्त नितीन गडकरी याच्याच वाढदिवसाचा नाही तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत पैशाची उधळण करणा-या सर्वच नेत्यांसाठी आहे. मागील १७ मे ला मायावती सरकारने बुद्ध जयंतीच्या निमित्ताने देशाला शुभेच्छा संदेश देण्यासाठी जवळपास देशातील प्रत्येकच मुख्य वर्तमानपत्रातून जाहिरात दिली. त्यात सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख केला गेला. त्यावरही अब्जो रुपये खर्च केले गेले. अश्या राज्याची सरकार ज्या राज्यात गरिबी, भूकमरी, बेरोजगारी, शोषण, अत्याचार मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ते सरकार स्वतःला पुरोगामी विचारांची सरकार म्हणवून घेते. स्वतःला आंबेडकरी विचारांची पाईक म्हणून सांगते. त्या मायावतीला दलितांचे प्रश्न, त्यांना हवा असणारा रोजगार, त्यांची गरिबी यावर तो पैसा खर्च करण्यापेक्षा वर्तमान पत्रातून जाहिराती देऊन वर्तमानपत्रवाल्यांवर उधळवसा वाटतो. ही किती मोठी शोकांतिका आहे. दलितांचे प्रतिनिधित्व करणा-यांनी तरी याचा निदान विचार करावा. आहे का कुणी असा नेता जो साधेपणाचे जीवन जगत आहे ? मग तो कुठलेही आणि कुणाचेही प्रतिनिधित्व करणारा असो !

नितीन गडकरीजी , मायावती ताई  तुमच्या सारख्या समस्त भारतात गल्लीपासून  दिल्लीपर्यंत पैदा झालेल्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही तुमच्या मौज मजेसाठी  उधळणारा पैसा जरा जनतेच्या विकासासाठी लावा ! गरिबांना अन्न, वस्त्र, निवारा मिळवून देण्यात लावा ! या देशातल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लावा ! तुम्ही खरे जनतेचे नेता असाल तर तुमचे नेतृत्व निच्छितच जनतेपर्यंत पोहचेल. त्यासाठी लाखो, करोड, अब्जो रुपये खर्च करण्याची गरज नाहीनिदान याचा तरी विचार करा कि या दिखाऊपणासाठी तुम्ही केलेल्या खर्चातून किती बेरोजगारांना स्वयंरोजगार टाकून देण्यासाठी मदत करता आली असतीकितीतरी गरिबांना ज्याच्या  डोक्यावर  छत नाही त्यांना निवारा बांधून देता आला असताज्याच्या अंगावर कपडे नाही त्यांचे अंग  झाकता आले असतेजिथे मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाही तिथे वीज, रस्ते उपलब्ध करून देता आले असते. तुम्ही तुमच्या प्रचारासाठी उधळलेला पैसा कुठल्या अर्थव्यवस्थेत समान वितरणाच्या कक्षेत येतो ? याचे तरी उत्तर द्या !

या देशात समान वितरणाची व्यवस्था असावी असा संविधानाचा मानस आहे. ती समान वितरणाची व्यवस्था कुठे आहे ? आर्थिक विषमता भारतीयांची हत्त्या करीत आहे. आणि तुम्ही त्याला जबाबदार आहात. मग सांगा तुम्हाला कुठल्या फासावर लटकवायचे ? जनतेच्या पैशातून चालणारी तुमची अय्याशी आम्ही किती दिवस सहन करायची ? आणखी किती दिवस तुम्ही जनतेच्या डोळ्यात धूळ झोकणार आहात ? आणखी किती आम्हाला  लुटणार आहात ? याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागणार आहे.

आज २७ मे ला माता रमाई आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. ज्या माता रमाईने आपल्या त्यागातून या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपात संविधानकार दिले. या देशाचे भाग्यविधाता दिले. या देशातील गोरगरीब-मागास-असृश्य-हीन-दीनांचे कैवारी त्यांचे मुक्तिदाता एकंदरीतच या संपूर्ण भारतीयांच्या उज्ज्वल भविष्याचा भाग्यविधाता दिला. त्या माता रमाईला अभिवादन करण्यास इथले  प्रसार माध्यम विसरले का ?(काही अपवाद असू शकतात)  मात्र नितीन गडकरीला विसरले नाही. ही तुमची वर्णव्यवस्था, जातीभेद, भेदाभेद केव्हापर्यंत चालणार आहे ? आणखी किती वर्षे या समाजाला पूर्ण स्वातंत्र्य आणि समानता मिळविण्यासाठी जाऊ द्यावे लागणार आहे ? याचे उत्तर मिळेल का ? या देशात आजही काही मंडळी आदर्श ठरावी अशी आहेत. 10 मे ला प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला गेला. तेही या देशातले बहुजन समाजातले एक नेता आहेत. तेही अश्याच प्रकारे स्वतःचा उदोउदो करू शकले असते. परंतु त्यांना इथल्या परिस्थितीची जाण आहे. ज्या देशाचे ते प्रतिनिधित्व करतात त्या देशातल्या समस्या ते जाणून आहेत. त्यांच्यासारखे आणखीही काही नेते आहेत. (त्या सर्वांचाच उल्लेख करता येणार नाही) त्यांचा आदर्श या समाजाने का घेऊ नये ? त्यांना तुम्ही का विसरता ?

आज बहुजन समाजाने डोळे उघडण्याची गरज आहे. नेत्यांची ही अय्याशी म्हणजे इथल्या बहुजन समाजाच्या जखमेवर चोळलेले नमक आहे. तुम्हाला वाकुल्या दाखवून तुम्हाला लुटणारी ही कृती आहे. याचा निषेध व्हावा ! कार्यकर्त्यांनी तरी आपल्या नेत्यांवर अश्याप्रकारे लुटवून  लावता  समाजाच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावेएक समानांतर अर्थव्यवस्था या देशात तुम्हाला लुटण्यासाठी सुरु आहे. ज्याचा कुठलाही हिशोब  तुमच्यापर्यंत पोहचत नाही. देश २०२० ला जगात महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ते फ़क़्त तुमच्या आमच्या डोळ्यात धूळ झोकून. वास्तव चित्र  यांनाच  माहित आहे कि हा देश जगात महाशक्ती कधीच होऊ शकणार नाही. जिथे गरिबांच्या, जनतेच्या पैश्यावर काही लोकांकडून अय्याशी केली जाते. आतातरी स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात या ! देशात या काही बोटावर मोजता येणा-या महाभागांकडून चालणा-या लुटसत्राला नजरेआड करू नका. लिबिया, लेबनान, इजिप्त सारख्या देश्यात हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आंदोलने उभी झाली आहेत. भारतातही नेत्यांच्या अश्या हुकुमशाहीविरुद्ध जोपर्यंत  लोकांची आंदोलने उभी होत नाही. तो पर्यत हा देश आपली खरी लोकशाही परत मिळवू शकणार नाही. हा देश जगातली महाशक्ती होऊ शकणार नाही. याचा विचार आता भारतीयांनी करायचा आहे. देशाचे भविष्य त्यावरच निर्भर असणार आहे.
---प्रासंदीप नंदेश्वर, नागपूर८७९३३९७२७५    

No comments:

Post a Comment