सावधान ! धोका संभवतो आहे.
क्रांती आणि प्रतिक्रांती या काळाच्या इतिहासावर कोरलेल्या दोन सहज आणि परस्पर विरोधी अश्या घटना आहेत. मानवी समाजजीवनात एक दुस-यावर मात करण्याची परंपरा ही नैसर्गिकच म्हणावी लागेल. समूहजीवनाच्या उत्क्रांतीपासून हे सतत घडत आले आहे. समूह जीवनाने माणसाला एका विशिष्ट संस्कृतीकडे वाटचाल करायला भाग पडले. तत्व, नियम, सिद्धांत मूल्य ही त्यातूनच जन्माला आली. व याच आधारावर इतरांवर नियंत्रण आणि साम्राज्यशाहीचा जन्म झाला. तो इतका विकोपाला गेला की प्रत्येक समूह दुस-या समूहावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू लागला. काळाच्या ओघात काही नव्या संदर्भांचा वापर सुरु झाला. माणसाच्या भावनिकतेला केंद्रबिंदू बनवून शक्तीच्या बळापेक्षा युक्तीचा वापर झाला. माणूस मुळातच स्वार्थी आणि नैसर्गिक हुकुमशहा असल्याने इतरांचे वर्चस्व तो मान्य करणार नाही. ही प्रवृत्ती घालविण्याचे नाही कुठले औषध वा टॉनिक आजपर्यंत तयार झालेले नाही. इतरांना नामोहरण करून स्वतःचा विजय साजरा करण्यातला आनंद माणसाला काही औरच आनंद देऊन जातो. मानवी विकासाच्या प्रक्रियेत यातूनच क्रांती आणि प्रतीक्रांतीचा जन्म झाला आहे. बुद्धाने सर्वप्रथम ही कोंडी फोडून माणसाला जीवनाच्या सत्याकडे आकर्षित केले. तत्वहीन आणि अस्तित्वहीन गोष्टींचा त्याग करून सत्याचा आणि वास्तवातल्या गोष्टींकडे जीवनाचा कल वळविला. वैदिकांनी निर्माण केलेल्या अवास्तव सिद्धांतांना नाकारून वास्तववादी जीवनाचे दर्शन घडविले. अलौकिकाचा त्याग करून इहवादी तत्वज्ञान जगासमोर मांडले. मानवी जीवन वास्तववादी दर्शनातून घडविले. मानवाला जीवनाच्या संघर्षातून मुक्त केले. स्वतंत्र आणि मौलिक जीवन माणसाला प्रदान केले. जीवनाचे विज्ञान भौगोलिक आणि नैसर्गिक विज्ञानाशी जोडले. 'माणूसच प्रथम आणि माणूसच अंतिम' हे विज्ञानवादी दर्शन त्यांनी घडविले.
बुद्धाच्या या क्रांतिकारी आणि विज्ञानवादी तत्वज्ञानाने वैदिकांनी निर्माण केलेल्या दिव्यवलयी कैवल्यवादाला पायदळी तुडविले. मानवी समूह भ्रमातून बाहेर पडू लागला. मानवी इतिहासातील ही मोठी विज्ञानवादी क्रांती बुद्धाने सर्वप्रथम घडवून आणली. त्यामुळे या क्रांतीला रोखणे वैदिकांच्या चैतन्यवादाला टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक होते. म्हणून बुद्धांच्या महापरीनिर्वानानंतर त्यांच्या संघात जाणीवपूर्वक घुसखोरी केली. बुद्धांचा संदेश आणि तत्वज्ञान मुळात नष्ट करणे शक्य नव्हते. शक्य होते ते त्यांच्या तत्वज्ञानात घोड निर्माण करून त्याला वैदिक धर्माची जोड देणे. तसा प्रयत्न सुरु केला गेला. परंतु सम्राट अशोकाने बुद्धाच्या धम्माला पुनःप्रवर्तित केले. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाने बुद्धांचा स्वीकार केला. असा प्रचार जो केला जातो. तो सरासर निखालस खोटा प्रचार आहे. सम्राट अशोक मुळातच बुद्धांच्या विचाराने प्रभावित होते. तेव्हाच त्यांनी त्यांच्या राज्यात जनतेचा राजा म्हणून स्थान मिळविले होते. बुद्धाच्या विचारांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा आणि बुद्धांच्या संदेशाचा खरा शोध सम्राट अशोकाने इ.स. पूर्व ३ -या शतकातच लावला होता. तो शोध संग्रहित केला. आणि संपूर्ण भारतभरच नव्हे तर संपूर्ण जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्याच आधारावर इ.स. च्या १ ल्या शतकात कनिष्काने बुद्धाची प्रतिकृती तयार केली. त्याला सम्राट अशोकाने केलेल्या क्रांतीचा आणि साठवून ठेवलेल्या पुराव्याचा आधार होता. सम्राट कनिष्काने हजारो लाखो बुद्ध मुर्त्या बनवून त्या वितरीत केल्या. संपूर्ण भारतभर आणि जगात त्या वितरीत झाल्याने बुद्धाचा संदेश झपाट्याने जगभर पोहचू लागला. कुठलीही अलौकिकता नाही. कुठलाही दैववाद नाही. कोणतीही अवास्तवता नाही. माणूसच सर्व तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी. कुठल्याही अवास्तवदर्शी शक्तीचा प्रभाव नसून प्रत्येक घडणा-या घटनांना कार्यकारण भाव आहे असा प्रत्युत्त समुत्पाताचा सिद्धांत जगाला दिला.
वैदिकांना धुळीस मिळवून केलीली ही क्रांती इ.स. ना पर्यंत जगावर आपला प्रभाव पाडून होती. म्हणून वैदिकांनी रामायण, महाभारत, वेद-व्यासांच्या मुखातून वदवून घेतले. बुद्ध धम्म व संस्कृतीवर आक्रमणे केली. मनूच्या रुपात भाकड व्यवस्था मनुस्मृतीतून निर्माण केली गेली. माणसाच्या जन्म आणि कर्माला विलासाची, कैवल्यवादाची, चैतन्यवादाची जोड दिली. कुठलीही गोष्ट अदृश्य आदिशक्तीच्या मर्जीशिवाय घडून येत नाही म्हणून मानवी शक्तीला आणि कृतीलाच नष्ट केले गेले. गुलामीची खरी व्यवस्था यातूनच जन्माला आली. राजकीय गुलामी ही अलीकडच्या काळातील आहे. सुरवातीला धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीचीच सुरवात यांनी घालून दिली. खरी लोकशाहीची राज्ये ही तर बुद्ध सम्राटांच्याच काळात अस्तित्वात होती. मग त्यात सम्राट अशोक असो की, सम्राट हर्षवर्धन किंवा त्यानंतरचे सम्राट बुध्गुप्त आणि राजा मिलिंद हे सर्व बुद्ध राजे अनभिषिक्त लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि जन कल्याणकारी राजे होते. बुद्धाने तत्वज्ञानातून निर्माण झालेल्या या लोकशाही राज्यांवर वैदिकांनी षड्यंत्रपूर्वक आक्रमणे केली. आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था समाजावर लादली. माणसाला जातीत आणि चातुर्वर्ण्यात गुलाम करून शोषण केले. ही प्रतीक्रांतीच होती. बुद्धाच्या तत्वज्ञानाला विद्रूप करण्यासाठी जातक कथा जाणीवपूर्वक वैदिकांकडून लिहिण्यात आल्या. नंतरच्या काळात साम्राज्यशाहीची आक्रमणे झाली. संपूर्ण भारतात पसरलेल्या बुद्ध धम्माला, संस्कृतीला आणि शिलालेख व नालंदा, तक्षशीला सारख्या विद्यापीठांना नस्तनाबूत करण्यात आले. ही आक्रमणे फ़क़्त मुसलमानांनीच केले असे नाही. हिंदू सम्राटांनीही बुद्ध धम्मावर आक्रमणे केली आहेत.
२० व्या शतकात बाबासाहेबांनी बुद्ध धम्माचा अभ्यासच केला नाही तर त्याचा स्वीकार करून बुद्धाच्या धम्माला पुनःप्रवर्तित केले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, 'पारंपारिक बुद्ध धम्मात काही त्रुटी राहिल्या होत्या. ज्या जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्या होत्या. प्रतीक्रांतीच्या काळात बुद्धाच्या धम्मात घुसळण्यात आलेल्या त्रुटी दूर करून मी शुद्ध रूपातील बुद्ध धम्म या पुस्तकातून तुमच्या पुढे मांडीत आहे.' प्रतीक्रांतीवर केलेली बाबासाहेबांची क्रांती या देशाला पुनः बुद्धमय भारतात रुपांतरीत करणारी अशीच होती. परंतु बाबासाहेबांच्या महापारीनिर्वानानंतर लगेच इथली जातीवाद्यांनी, मनुवाद्यांनी बाबासाहेबांनी केलेल्या बुद्धाच्या क्रांतीला रोखण्याचे षड्यंत्र आखले. जे ओशो, रजनीश, गोयकाच्या रुपात १९७० ते १९८० च्या दशकात प्रकर्षाने समोर आले. आणि पुन्हा एकदा पारंपारिक बुद्ध धम्माचा, वैदिकांना, जातिवाद्यांना, मनुवाद्यांना अपेक्षित बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सुरु झाला.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वप्रथम लोकशाही राज्यव्यवस्थेतील राजकारणात हजारो वर्षे गुलाम म्हणून जगणा-यांना सहभाग नोंदविण्याची समान संधी उपलब्ध झाली. बाबासाहेबांच्या अतूट प्रयत्नांनी या देशात समानता निर्माण होऊन राज्यव्यवस्थेतही समान प्रतिनिधित्व प्राप्त झाले. त्यामुळे हा समाज राजकारणाकडे जास्त आकर्षित झाला. भारतीय लोकशाहीला मजबुती देण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची जोड दिली. कारण नैतिक मुल्यांशिवाय केले गेलेले लोकशाहीचे राजकारण यशस्वी ठरू शकणार नाही. यावर बाबासाहेबांचा विश्वास होता. परंतु बहुजन समाजाने आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी राजकारणालाच प्राधान्य देऊन धम्माकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे राजकारणातही यश मिळविता आले नाही. आणि आणि धम्मालाही गती देता आली नाही. आज तर अशी परिस्थिती झाली आहे की राजकारणातही शून्य आणि धम्मकारणातही शून्य.
सुरवातीला प्रस्थापितांनी तुमचे राजकारणातून खच्चीकरण केले. तुकडे आणि गटातटात विभागलेले राजकारण घरातच इतक्या टोकाच्या विरोधाला पोहोचले की त्यामुळे विरोधकांनी त्याचा लाभ घेऊन तुमच्यात त्यांचे म्होरके शिरविले. बहुजन समाज पार्टी हे त्याचे उत्कृष्ट आणि जिवंत उदाहरण आहे. (जर त्यांच्या एकूणच वाटचालीचा आणि कार्यप्रणालीचा निट अभ्यास केला तर). राजकारणात आलेले अपयश भरून काढण्यासाठी हा समाज इतका व्यस्त झाला की त्याला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि महत्वाचे म्हणजे धार्मिक उत्थानाकडे लक्षच देता आले नाही. आजही तरुण आणि स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारी मंडळी राजकारणाची बाराखडीही न समजता सत्तेच्या गोष्टी करायला लागली आहेत. ज्यांच्या डोक्यात फ़क़्त सत्ता भरली आहे ते जिवंतपणीच धम्मासाठी मेलेले आहेत. (याचे हे लक्षण समजावे.) आज बुद्धाला काल्पनिक ठरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुद्धांविषयी काहीतरी कलह निर्माण करणारे प्रश्न उपस्थित करून समाजाचा बुद्धिभ्रंश केला जात आहे. कुणाचेही त्याकडे लक्ष नाही. मात्र सत्तेच्या मोहात पडून अशक्य गोष्टींसाठी वर्षो न वर्षे चातकासारखी सत्तेची वाट पाहत आम्ही बसलो आहोत. त्यामुळे सर्व स्तरातून आमचे खच्चीकरण केले जात आहे. ‘विज्ञानवादी बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐवजी ‘पारंपारिक आणि काल्पनिक बुद्ध’ पेरला जात आहे. ही प्रतिक्रांती मागील ४० वर्षांपासून सुरु झाली आहे. ज्याचा उल्लेख मी वर केलेला आहे. परंतु त्याचा प्रकर्षाने प्रभाव आता दिसू लागला आहे. मागील ५० वर्षांच्या काळात भारतात बौद्धांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढतांना दिसून येत नाही. हे त्याचेच द्योतक आहे.
ही प्रतिक्रांती आम्हाला थोपवावी लागणार आहे. राजकारणाच्या स्वप्नातून बाहेर पडून आम्हाला आमची सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक बाजू मजबूत आणि घट्ट करावी लागणार आहे. जीवन राजकारणाने सुखमय होणार नाही. जोपर्यंत तुमच्या वरील बाबी मजबूत व कणखर बनत नाहीत तोपर्यत सामाजिक जीवन सुरक्षित आणि सुखमय करता येणार नाही. या बाबी एकदा का आम्ही मजबूत करू शकलो तर आम्हाला राजकारण आणि सत्ता प्राप्त करणे कठीण जाणार नाही. आजच्या परिस्थितीत आणि बदलना-या राजकीय संदर्भात ते सहज शक्य आहे. आता तरी जागे व्हा ! वेळ आलेली आहे. प्रतीक्रांतीने तुम्हाला उध्वस्थ केले आहे. धम्म टिकून राहील तर तुम्ही आणि हा समाज टिकून राहील. जीवन टिकून राहील. सत्ता नसली तरी कल्याण मात्र तुमचेच राहील. सत्ता नसली तर माणूस जगू शकणार नाही. असे होत नाही. परंतु धम्म नसेल तर आमचे अस्तित्वही राहणार नाही हे लक्षात घ्या !
सतत डोक्यात राजकारण ठेवण्यापेक्षा धम्म डोक्यात ठेवा ! संविधान जो पर्यंत शाबूत आहे. तोपर्यंत तुमचे अधिकार, हक्क, स्वातंत्र्य शाबूत आहे. तुमचे राजकीय प्रतीनिधीत्वही शाबूत आहे. म्हणून स्वतःचे जीवन शाबूत ठेवायचे असेल तर धम्मक्रांतीवर घोंगावणारी प्रतिक्रांती हाणून पाडा ! बुद्धाच्या तत्वज्ञानावर आणि एकूणच वास्तवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणा-यांना वेळीच उत्तरे द्या ! काळाच्या ओघात तुमच्यावर प्राचीन गुलामीची स्थिती पुन्हा येऊ द्यायची नसेल तर तुमच्या अवती भवती तुम्हाला घेरून असलेल्या प्रतीक्रांतीच्या वादळाला वेळीच ओळखा ! तुमचे भविष्याचे कल्याण त्यावर अवलंबून असणार आहे. अन्यथा राजकारणाच्या वावटळीत गुरफटत जाऊन "धोबी का कुत्ता, ना घर का, ना घात का !" अशी परिस्थिती स्वतःवर ओढवून घेऊ नका ! काळ तुम्हाला माफ करणार नाही. आजच्या पिढीने उद्याच्या भविष्याची उभारणी करायची आहे. उद्याच्या पिढीचे भविष्य घडविणारी परिस्थिती आज तुम्हाला निर्माण करून ठेवावी लागणार आहे. धम्म तुम्हाला जतन करून ठेवावा लागणार आहे. "बुद्ध आणि त्यांचा धम्म" हाच तुमचा आधारग्रंथ मानून विज्ञानवादी धम्माला जगाच्या सानिध्यात ठेवावे लागणार आहे. अन्यथा एक दिवस ही वैदिकांची क्रांती तुमच्या बुद्धाला आणि धम्माला त्यांचाच प्रतिरूप म्हणून सिद्ध करायच्या मार्गावर लागली आहे. धम्मक्रांती थोपविण्याच्या मार्गावर लागली आहे. धम्म वाचवा, तुम्ही वाचाल ! समाज वाचवा, तुम्ही वाचाल ! परिस्थिती ओळखा, भविष्य वाचेल ! डोळ्यात तेल घालून सतर्क होऊन विरोधकांवर पहारा ठेवा, भविष्य सुरक्षित होईल ! जगातल्या विज्ञानाचे, लोकशाहीचे, मानवतावादाचे तुम्ही बुद्धाचे वारसदार आहात ! हे लक्षात ठेवा ! सत्ता नसली तरी धम्म टिकवून ठेवणे गरजेचे आहे. हे ओळखा ! जागे व्हा रे माझ्या निळ्या पाखरांनो ! सावधान ! धोका संभवतो आहे.
----प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५
No comments:
Post a Comment