Saturday 17 September 2011

दीपेश वानखेडे आणि विजय संसारे : आकांक्षेला लाभले पंख जिद्दीचे

आकांक्षेला लाभले पंख जिद्दीचे


शब्दांकन
दीपध्वज कोसोदे

शब्दांकन
डॉ.जगदीश जाधव

अस्वस्थ वर्तमानाचा आश्‍वासक नायक


दीपेश वानखेडे आणि विजय संसारे ही बहुजन समाजातील उच्च शिक्षणासाठी सातासमुद्रापार गेलेल्या आणि मायभूमीच्या सेवेसाठी परत आलेल्या तरुणाईची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. भोवतालची परिस्थिती आश्‍वासक नसताना, आदर्श आणि मूल्यांची पडझड झालेली असताना ही उदाहरणे रवींद्रनाथांच्या कवितेतील अस्ताला गेलेल्या सूर्याला निवेदन करणार्‍या पणतीसारखी आहेत. प्रबळ इच्छाशक्ती आणि अविरत कष्टाने मार्गक्रमण करणार्‍या आपल्याच जिल्ह्यातल्या तरुणांविषयी.. दीपेश प्रकाशराव वानखेडे हा मुक्ताईनगरसारख्या दुर्गम आणि उपेक्षित भागातला अतिशय जिद्दी विद्यार्थी. दोन वर्षापूर्वी माझी आणि त्याची मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई महाविद्यालयात एका कार्यक्रमात भेट झाली. दिसायला दीपेश तसा सामान्य. तब्येतीने किरकोळ. पण डोळ्यांमध्ये साता-समुद्रापलीकडची स्वप्नं. केवळ स्वप्नं नाही तर ती प्रत्यक्षात सत्यात उतरवण्यासाठी चालवलेली प्रयत्नांची पराकाष्ठा. दहावीत जेमतेम गुण मिळवणारा दीपेश बारावी सायन्सला प्रथर्मशेणी मिळवतो आणि आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने नाइलाजाने बी.ए.(इंग्रजी)ला प्रवेश घेतो अन् शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून शिकताशिकता ते सत्यात उतरवतो. परदेशी शिक्षण घेण्यासाठीच्या सर्व औपचारिकता पाठीशी कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना पूर्ण करतो. मुक्ताईनगर ते मुंबई-पुणे अशी पायपीट करतो. सामाजिक न्याय विभागाचे संचालक इ.झेड. खोब्रागडे, सहसंचालक पी.एस. वानखेडे, सचिव किशोर गजभिये, सहा.सचिव न.मा.शीलवंत आणि तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांना प्रत्यक्ष भेटून परदेशी शिक्षणासाठी शासनाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीचा पाठपुरावा करतो. पुणे येथील ब्रिटिश लायब्ररीने घेतलेल्या आई.ई.एल.टी.एस.ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. यु.के.मधील कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी(लंडन)मध्ये प्रवेश घेतो. हे कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रीनिटी सेंट डेविड अंतर्गत येते. हा सगळा प्रवास थक्क करणारा.
दीपेश लंडनला निघाला तो दिवस होता १६ ऑगस्ट २00९. आदल्या दिवशी मला तो घरी भेटायला आला होता. त्या दिवशीही मी त्याच्या डोळ्यात तीच चमक पाहिली. त्याची एम.बी.ए. करण्याची इच्छा होती. त्याला एम.बी.ए.ला प्रवेश मिळाला होता. लंडनला असताना तो मला आवर्जून फोन करून त्याला मदत करणार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा. लंडनमधील कॉलेजचे वातावरण, तिथले विद्यार्थी, प्राध्यापक आणि लंडनमधलं वातावरण यांच्याबद्दल फोनवर चर्चा व्हायची. लंडनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला प्रथम भेट दिली. या कॉलेजातून डॉ.बाबासाहेबांनी 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा प्रबंध सादर करून डी.एस्सी. ही पदवी मिळविली होती. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्याने शिक्षणाला सुरुवात केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दीपेशचे प्रेरणास्थान आहेत. दीपेश मुक्ताईनगरच्या संत मुक्ताई कॉलेजला असताना विद्यार्थी संघटनेत काम करायचा. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही निवडलं होतं. तो त्या वेळी कविता आणि लेख लिहायचा. कॉलेजच्या अनियतकालिकातून त्याच्या काही कवितांचे दर्शन झाले. आंबेडकरी चळवळीचाही त्याचा अभ्यास दांडगा आहे. आंबेडकरी राजकारण, समाजकारण यावर त्याची काही परखड मते आहेत. एका स्नेहसंमेलनात त्याने आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. संपूर्ण कार्यक्रमावर त्याने स्वत:ची छाप सोडली होती. वक्तृत्व स्पर्धेत त्याने पहिला नंबर पटकावला होता. ज्ञानार्जन करताना एकाचवेळी या सगळ्या उठाठेवी तो कसा काय करू शकतो,असं त्यावेळी वाटलं होतं. दीपेश २२ महिन्यांनी शिक्षण पूर्ण करून मुक्ताईनगर येथे परतला आहे. त्याची धडपड आणि त्याने पूर्ण केलेले शिक्षण खरोखरच समाजाला मार्गदर्शक ठरू शकेल. केवळ आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे म्हणून काही करता येत नाही हा समज जिद्दीच्या बळावर दीपेशने खोटा ठरवला आहे. त्याला पाठबळ देणार्‍या विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, जैन चॅरिटी, माजी सचिव प्रीतमकुमार आठवले, माजी सहकार आयुक्त पी.डब्ल्यू.पाटील, प्राचार्य डॉ.आर.एच. गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते मनोहर खैरनार, प्रा.एम.बी. गवई, प्रा.पी.एम. सोनवणे, प्रा.कच्छवा, प्रा.गायकवाड, प्रा.किशोर वाघ यांचा तो प्रकर्षाने उल्लेख करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाविषयी आणि एकूणच समाजाविषयी पाहिलेल्या स्वप्नांचा एक भाग त्याला व्हायचे आहे.
(लेखक साहित्यिक आहेत) विजय संसारे हा दुष्काळी भागातला, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातला. गरीब आणि दलित -ख्रिश्‍चन कुटुंबातला. घरात आई-बाबा, आजी, पाच भावंडे आणि कुटुंबाकडे फक्त एक एकर जमीन. संधीचा, साधनांचा, परिस्थितीचा अभाव हा प्रत्येक विजेत्यासाठी असतो. विजयसाठी मात्र तो जास्तच होता. विजयची विजिगीषूवृत्ती लहानपणापासून संकटावर मात करीत आलेली आहे. दुष्काळी भागात कार्यरत आणि सेवारत असलेल्या एका ख्रिस्त भगिनीचे विजयकडे लक्ष गेले. या भगिनीने विजयच्या पालकांना विजयच्या शिक्षणाबाबत गळ घातली. दहावी सावेडी गावला, १२ वी लोणावळ्याच्या डॉन बास्कोमध्ये तर पदवीचं शिक्षण धुळ्यातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयामध्ये.
परिस्थितीच्या अभावामुळे विजयचं शिक्षण नेहमीच वसतिगृहात राहून झालं. धुळ्याला शिकताना त्याने शिकवण्या घेतल्या, इंग्रजी संभाषणाचे वर्ग घेतले. स्वावलंबी शिक्षणातून आयुष्याचा पाया रचला, पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना त्याने अफाट वाचन केले. त्यातून त्याला देशात-परदेशात नावाजलेल्या भारताच्या अग्रणी आणि समाजकार्य शिक्षणाचा पाया घातलेल्या टाटा समाज विज्ञान संस्थेची ओळख झाली. याच संस्थेतून त्याने पदव्युत्तर शिक्षण करण्याचा निश्‍चय पहिल्या वर्षाला असताना घेतला. 'टाटा'मध्ये प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया उमेदवाराला तावून-सुलाखून घेणारी असते. अखिल भारतीय स्तरावरच्या ह्या परीक्षेत परदेशी विद्यार्थीही समाविष्ट असतात. तीन वर्षांच्या तयारीतून आणि औपचारिक निवडीच्या प्रक्रियेतून विजयचा 'टाटा'मधला प्रवेश नक्की झाला.
निरोगी शैक्षणिक वातावरण
१९३६ साली संस्था म्हणून स्थापन झालेले आणि आता समाज विज्ञानाचे अभिमत विद्यापीठ असलेले हे विद्यापीठ विजयला खूप काही देऊन गेले. सुसज्ज २४ तास खुले असणारे ग्रंथालय, चर्चेसाठी आणि संवादासाठी सदैव उत्सुक असणारे आणि वादविवाद झाल्यानंतरही 'मैत्र' भाव जपणारे शिक्षक, कुलगुरुपदाचा दर्जा असणारे मात्र विद्यार्थ्यांसोबत सहज वावरणारे प्रो.परशुरामनसर, ज्ञानाबाबत आग्रही मात्र आदरासाठी अनाग्रही असणारे बोधीसरांसारखे अनेक शिक्षकवृंद विजयला समृद्ध करण्यास साहाय्यभूत ठरले.
अमेरिकेला जाण्याची संधी
तिसर्‍या सत्राला शिकत असताना 'विद्यार्थी आदान-प्रदान' कार्यक्रमात विजयला अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्यापेक्षा, विजयने ती मिळवली असे म्हणणे जास्त यथार्थ होईल. या उपक्रमात निवड होण्यासाठी 'स्टेटमेंट ऑफ पर्पज' हा निबंध निवडीसाठी कळीचा असतो. विजयने कतरीना वादळाने उद्ध्वस्त झालेल्या न्यूऑरलन्स शहरातील तुलानी विद्यापीठासोबत काम करण्याचे निश्‍चित केले होते. आपत्ती पुनर्वसनाच्या प्रक्रियेत बहुजन समाजाच्या सहभागाची आणि सक्षमीकरणाची प्रक्रिया हा विजयच्या कामाचा प्रमुख आशय होता. दलित आणि आदिवासी विकास, सामाजिक धोरणे हा विजयच्या चिंतनाचा विषय आहे.
उ.म.वि. व्हाया झाबुआ
विजय पदवी परीक्षेला उ.म.वि. विद्यापीठात पहिला आला होता. टाटा संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर विजय मध्य प्रदेशमध्ये आदिवासीबहुल झाबुआ जिल्ह्यात कामाला गेला. कोणत्याही विद्यापीठाला अथवा चांगल्या संस्थांना गुणी माणसांची कास असते. तत्कालीन कुलगुरू डॉ.के.बी. पाटील यांनी आणि प्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तारसेवा विभागाच्या संचालकांनी विजयची निवड युवा विकास केंद्राच्या समन्वयकपदी केलेली आहे. आज विजय समग्रपणे, सम्यकतेने समष्टीला भिडलेला आहे.
ग्रामीण भागातला, बहुजन समाजातला, एक युवक कोणत्याही विषम परिस्थितीचा बाऊ न करता, उच्चशिक्षित होतो आणि पुन्हा ग्रामीण भागाच्या सेवेला येतो ही गोष्ट आपणा सर्वांसाठीच विलोभनीय आणि अनुकरणीय आहे.
(लेखक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत) शब्दांकन
दीपध्वज कोसोदे शब्दांकन
डॉ.जगदीश जाधव

pls see this link of todays Lokamat.... http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=13

No comments:

Post a Comment