Friday, 6 July 2012

इथे भविष्यकाळात बुद्ध इतिहास घडेल का ?



इथे भविष्यकाळात बुद्ध इतिहास घडेल का ?

डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५
मानवी सभ्यतेच्या हजारो कपोलकल्पित घटना आमच्यावर बिंबविण्यात आल्या आहेत. विज्ञानवादी इतिहासाला झाकून पारलौकिक इतिहास मानवी मनावर लादण्यात आला आहे. त्यासाठी हेतुपुरस्सर कपोलकल्पित संस्कृतीच्या भिंती आमच्या अवती भवती उभारल्या गेल्या आहेत. हजारो वर्षाची मानवी मनावरची ही मरगळ काढून टाकणे इतके सहज शक्य नाही. कारण संस्कृती नावाची भिंत आजही आमच्यासमोर उभी आहे. ती लांघून पुढे पाऊल टाकणे म्हणजे स्वतःवर अरिष्ठ ओढवून घेणेच होईल. तरीही पारलौकिक संस्कृतीच्या या भिंतींना भेगा पाडून आम्हाला भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागणार आहे. आम्हाला आमचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे असेल तर प्रस्थापित प्रवाहात मिसळून न जाता स्वतंत्र वाटचाल आमच्यासाठी कधीही लाभदायक ठरणारी आहे. तेव्हाच आम्ही नव्या इतिहासाची उभारणी करू शकू.
आज सभ्य व्यवस्थावादी संस्कृतीच्या गप्पा मारल्या जातात त्या पारलौकीकातून किंवा पाश्चिमात्यांकडून आलेल्या नसून बुद्ध काळातल्या सभ्य संस्कृतीतून आलेल्या आहेत. हा खरा इतिहास आज विज्ञानाच्या युगातही दडवून ठेवल्या जात आहे. कारण खोटा इतिहास प्रस्थापित करण्याची साधने आज त्यांच्या हातात आहेत. त्यामुळे हजारो वर्षांचा इतिहास यांनी काही दिवसातच निर्माण केला आहे. मग तो वाल्मिकी-व्यास मुनींनी लिहिलेल्या रामायण महाभारताचा असो की अलीकडच्या रामसेतू-बाबरी मस्जीतीचा इतिहास असो. विज्ञानाने विश्व निर्मितीच्या शोधात अणू रेणूंच्या एक पाऊल पुढे टाकले. मात्र यांच्या ब्रम्हांडाची निर्मिती स्वर्ग-नरकाच्या बाहुपाश्यातच अडकलेली आहे. कारण यांच्या ब्रम्हांड निर्मितीच्या भाकड कथा रोज सकाळी ग्रह नक्षत्राच्या रुपात घरोघरी पोहचत आहेत. यांच्या या ग्रह-नक्षत्रांनी विज्ञानवादी मानवी मेंदूला पूर्णतः जकळून टाकले आहे. पाप-पुण्याचे हे अघोरी चक्र जोपर्यंत मानवी समाजात फिरत आहेत. तोपर्यंत परिवर्तनाच्या प्रवाही नद्या हिमनद्यांसारख्या सतत गोठविल्या जाणार आहेत. 
क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या प्रवाही इतिहासात रूढीवाद्यांनी क्रांतीच्या इतिहासाला पुसून टाकण्याचा सतत प्रयत्न केला आहे. मानवी जीवनाचे विज्ञान मांडणा-या शास्त्रातही चुकीचे लिखाण करून यांनी स्वतःच्या कल्पित पात्रांना उभे केले आहे. समाजशास्त्र, राज्यशात्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र या सर्वच शास्त्रांमधून एका विशिष्ट जातीच्या पात्रांना उभे केले गेले आहे. मग तो कल्पित मनु आणि ब्राम्हण कौटिल्य पासून तर अलीकडच्या गोलवलकर-हेगडेवार ते अरुण शौरीपर्यंत. शाश्वत आणि अशाश्वत तत्वज्ञानाचे हे महायुद्ध सत्य आणि असत्याच्या प्रस्थापनेसाठी आजतागायत लढले जात आहे.
बुद्ध काळ मानवनिर्मितीनंतरच्या विकासातील अतिशय विकसित आणि आधुनिक काळाशी सुसंगती साधणारा काळ होता. आधुनिक विकसित शास्त्रातील जवळपास सर्वच शास्त्रांचा हा निर्मितीकाळच म्हणावा लागेल. परंतु कुठल्याही शास्त्राच्या निर्मिती इतिहासात बुद्धकाळाला स्थान का मिळाले नाही ? या शास्त्रांच्या भारतीय योगदानातही बुद्धकाल उपेक्षित का राहिला ? ज्या शाक्यवंशात कुळांच्या माध्यमातून निवडणुकीद्वारे शाक्य कुळांचा अध्यक्ष ठरविले जायचे. त्या बुद्धकालीन शाक्यकुळांना आधुनिक लोकशाही आणि राज्यशास्त्राचे जनक म्हणून का संबोधले जात नाही ? सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वडील शुद्धोधन राजा हे ८० शाक्य कुळांनी निवडून दिलेले श्याक्य कुळाचे प्रमुख होते. तरी त्यांना लोकशाही राज्याचा पहिला राज्यप्रमुख असण्याचा दर्जा का प्राप्त होत नाही ? रोहिणी नदीने शाक्य आणि कोलिय या दोन कुळ राज्यांची निर्मिती केली होती. बहुतांश आधुनिक राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा निर्धारित करीत असतांना तेच तत्व अंगिकारले गेले असतांना बुद्ध काळ लोकशाहीचा काळ म्हणून का गणला गेला नाही ?
शाक्य कुळाची पंचायत होती. सर्व राज्याचे निर्णय त्या पंचायतीच्या माध्यमातून घेण्यात येत होते. त्या शाक्य पंचायतीची रचना आधुनिक कायदेमंडळासारखी असतांना सुद्धा त्याचा कुठेच उल्लेख का केला जात नाही ?  ज्या सम्राट अशोकाने आपल्या राज्याला ख-या अर्थाने प्रजासत्ताक बनविले त्या सम्राट अशोकाला प्रजासत्ताक राज्यनिर्मितीचा जनक म्हणून का संबोधले जात नाही ? राज्याला आणी राज्यातील जनतेला धनसंपन्न ठेवणारा आणि राज्याच्या कल्याणाकडे जातीने लक्ष घालणारा चक्रवर्ती सम्राट अशोक अर्थशास्त्राचा जनक का होऊ शकत नाही ? बुद्धांचे मानवतावादी विचार मानवी कल्याणासाठी जगभर पेरण्याचा निर्धार केलेला आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणारा सम्राट अशोक मानववंशशास्त्रात का अभ्यासाला जात नाही ? या प्रश्नांचे उत्तर आधुनिक इतिहासात कुठेच का सापडत नाही ? ते आता आम्हाला शोधून काढावे लागणार आहे. इतकेच नाही तर ते आधुनिक इतिहासाच्या पानापानांमधून समाजापर्यंत रुजवावे लागणार आहे.
तथागत बुद्धांच्या महापरीनिर्वानानंतर त्यांच्या विचारांवर तत्कालीन वैदिकांनी आक्रमणे सुरु केली. परंतु अल्पावधीतच वैदिकांच्या आक्रमणांना थोपवून बुद्धांचे विचार जनमानसात पोहचविणारे आणि राहुल आणि यशोधरा सारखी मुले बुद्धांच्या प्रचार आणि प्रसारासाठी जगभरात पाठविणारे सम्राट अशोक आज आमच्या समाजात किती रुजविले गेले आहेत ? बुद्धांचा धम्मचक्र गतिमान करणारे सम्राट अशोक हे ख-या अर्थाने मानवतावादासाठी झटणारे शिल्पकारच होते. सम्राट अशोकापासून तर बृहदत्ताचा खून होईपर्यंतचा बुद्धकाळ अतिशय समृद्ध आणि विज्ञानवादी होता. या काळात वैदिकांच्या प्रतीक्रांतीला न जुमानता क्रांत्या केल्या गेल्या. एक समृद्ध बुद्ध संस्कृती रुजविल्या गेली. या संकृतीची प्रतीके आणि प्रतिमाने स्थापित केली गेली. जगात होणा-या आणि त्यातही प्रामुख्याने आशिया खंडात होणा-या उत्खननात सापडणारी बुद्धकालीन प्रतीके आणि प्रतिमाने ही त्या काळातल्या समृद्ध बुद्ध संकृतीची साक्ष देणारीच आहेत. पण ते जगासमोर आणणारी साधने ही वैदिकांच्या पिलावळीच्या हातात असल्याने समाजापर्यंत तो इतिहास आणि ती समृद्ध संकृती पोहचवली जात नाही.
वैदिकांचे थोतांड, त्यांचे अपौरुषेय तत्वज्ञान मोडीत काढण्याची आणि प्रगल्भ सामाजिक विज्ञान समाजात रुजविण्याची ताकत बुद्धाच्या विचारात होती आणि आजही आहे. त्यामुळे बृहदत्ताचा खून केल्यानंतर अनेक वर्षे वैदिकांची हल्ले फक्त आणि फक्त बुद्ध संस्कृतीवर झाली. आणि त्यात राज्य बळकावण्याच्या नादात मुस्लीम आक्रमणांनी भर घातली. त्यामुळे बुद्ध संस्कृतीच्या विनाशाची आयतीच संधी वैदिकांना मिळाली. बृहदत्ताच्या खुनापासून ते १९५६ पर्यंत बुद्ध संस्कृतीला नष्ट करण्याची संधी वैदिकांनी सोडली नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ती समृद्ध बुद्ध संस्कृती पुनर्जीवित झाली आहे. २५ हजार वर्षानंतर धम्मचक्र गतिमान झाले आहे. ते सतत गतिमान ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी बुद्ध संस्कृती आम्हाला पुनश्च्य या समाजात रुजवायची आहे.
मध्यंतरीच्या काळात बुद्ध विचारात आणि संस्कृतीत वैदिक संस्कृतीची सरमिसळ करण्यात आली. त्यामुळे नित्य आणि अनित्य, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, आत्मा आणि अनात्मा असा स्पष्ट भेद बुद्ध आणि वैदिक संस्कृतीमध्ये असतांनासुद्धा या भेदरेषा नष्ट करण्याचे काम करण्यात आले. जातक कथा आणि त्रिपिटकातून आलेली वैदिकांची गटारगंगा "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोडून काढली. आणि या जगाला शुद्ध “बुद्ध आणि त्यांचा धम्म” बहाल केला. "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,'पारंपारिक बुद्ध धम्म आणि आधुनिक बुद्ध धम्म यात मोठी तफावत आहे. पारंपारिक बुद्ध धम्मावर वैदिकांनी आक्रमणे केल्यामुळे बुद्ध धम्माची मोठ्या प्रमाणात हानी झाली. तर आधुनिक बुद्ध धम्म कालौघात परिस्थितीनुरूप बदलत गेला. परंतु दोन्ही ठिकाणी खरा बुद्ध धम्म हा पडद्याआड राहिलेला आहे. वैदिकांच्या आक्रमणाने बुद्ध धम्मात अनेक छिद्रे पडली. त्या छिद्रातून वैदिकांची घाण बुद्ध धम्मात आली. ज्यामुळे बुद्ध धम्म प्रदूषित झाला होता. परंतु मी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथातून बुद्ध धम्माला पडलेली छिद्रे बुजविण्याचे काम करीत आहे. बुद्ध धम्मात साचलेली वैदिकांची घाण साफ करीत आहे. आणि शुद्ध स्वरूपातला खरा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातून तुमच्यासमोर मांडत आहे.' बाबासाहेबांनी प्रस्थावनेत सुचविलेले हे सूचक अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देऊन जाते. त्यामुळे ख-या बुद्ध आणि त्यांच्या धम्माची ओळख आम्हाला 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातूनच होऊ शकते. बुद्ध आणि त्यांचा धम्म हाच आम्ही प्रमाण ग्रंथ मानला पाहिजे. 
बुद्ध या मातीतून जन्माला आला आहे. बुद्ध धम्म आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारही सर्वप्रथम भारतातूनच झाला आहे. सम्राट अशोकापासून तर बृहदत्त पर्यंतचा इतिहास बुद्ध संस्कृतीच्या लौकिकाचा इतिहास मांडतो आहे. या इतिहासाची पुनर्बांधणी १४ ऑक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीने झाली. हजारो वर्षाच्या गुलामीची बंधने झुगारून बहुसंख्य शोषित-पिडीत-मागास समाज बुद्धाच्या संस्कृतीकडे आकृष्ट झाला. युगानयुगे चाललेली जातीची वर्णव्यवस्था फेकून देऊन मानवतावादी माणूस बुद्धाच्या संस्कृतीकडे स्वगृही परतू लागला. या धम्मक्रांतीने जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद केली. कुठल्याही रक्तपाताशिवाय एक मोठा सामाजिक समूह परिवर्तनाकडे वळला गेला. जे युद्धाने जिंकता आले नाही. ते बुद्धाच्या धम्माने जिंकता आले. त्यामुळे ही धम्मक्रांती मानवी परिवर्तनाच्या विजयाची शिलेदार ठरली. जगात अनेक क्रांत्या घडून आल्या. या क्रांत्यांनी परिवर्तन घडविले. परंतु रक्तपात करून. स्वकीयांना गमावून. मानवी स्वातंत्र्याचा बळी देऊन. अश्या परिस्थितीत बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती एकमेव मानवतावादी क्रांती ठरली.
जगाच्या इतिहासात रक्तपाताने झालेल्या क्रांत्या शिकविल्या जातात. परंतु आधुनिक भारताच्या इतिहासात, समाजशास्त्रात आणि मानववंशशास्त्रात बाबासाहेबांची धम्मक्रांती शिकविली जात नाही. का ? का आजही बाबासाहेबांची धम्मक्रांती अभ्यासक्रमातून, वाहिन्यांमधून, सामाजिक संदेशांमधून जाणीवपूर्वक वगळली जात आहे. आज जगाला युद्ध नको आहे. बुद्ध हवा आहे. मग युद्धाच्या ऐवजी बुद्ध पाहिजे असेल तर समाजमनावर आणि आधुनिक पिढीवर मानवतावादाची रुजवण होणे आवश्यक आहे. जगाला युद्धाने नाही तर बुद्धांच्या विचाराने जिंकता येते. हे जोपर्यंत आधुनिक पिढीच्या मनावर ठासून बिंबविले जात नाही. तोपर्यंत आधुनिक पिढी मोह-माया-श्रद्धा-भक्ती च्या मोहजालातून दूर जाणार नाही. आणि ही शिकवण रुजवणारी साधने शिक्षण, दूरसंचार, इंटरनेट, सिनेमा, टी.व्ही इ. साधनांच्या माध्यमातून होऊ शकते. हा समाज या क्षेत्रांना आणि साधनांना आपल्या हातात केव्हा घेणार आहे ? त्यावरच पुढल्या इतिहासाची दिशा ठरू शकेल. 
आज धम्मक्रांतीवर अनेक प्रतीआक्रमणे सुरु आहेत. आणि ते अव्याहत सुरु राहतील. कारण धर्मसंघर्षाचा इतिहास मोठा आहे. अश्या परिस्थितीत बुद्ध धम्म टिकवून ठेवायचा असेल. आणि बुद्ध धम्माची अपरिहार्यता मानवासमोर उभी करायची असेल. तर आधुनिक प्रचार आणि प्रसाराची साधने आम्ही आमच्या हातात घेणे गरजेचे आहे. आज आमच्या विचारांच्या निष्ठा विभागल्या आहेत. आमची श्रद्धास्थाने दुभंगली आहेत. समान ध्येय आणि उद्धिस्ट राहिलेले नाही. त्यामुळे शत्रूंनी त्याचा लाभ घेऊन आमच्यामध्ये दुही माजविली आहे. सामाजिक कल्याणाच्या इतिहासाची निर्मिती आम्हाला करायची असेल तर आमच्या विभागलेल्या श्रद्धा आणि निष्ठांना पायदळी तुडवून समान निष्ठांवर आम्हाला आग्रही व्हावे लागणार आहे. प्रतिक्रांतीचे शिरच्छेद करायचे असेल. तर आम्हाला आमच्या विचारांच्या तलवारी सदैव धारदार आणि मजबूत ठेवाव्याच लागणार आहेत. समाजापर्यंत बुद्धाची मानवतावादी क्रांती पेरायची असेल तर घराघरात बाबासाहेबांना अपेक्षित बुद्ध आणि त्यांचा धम्म पोहचला पाहिजे. ती पोहचविणारी साधने आम्ही निर्माण केली पाहिजे. खुल्या डोळ्याने दिसणारे विज्ञान विरुद्ध वैदिकांची समाधी या सीमारेषेवरच आम्ही खरा बुद्ध इतिहास समजून घेऊ शकतो. ती सीमारेषा प्रत्येकाने आपल्या जीवनात भिनविण्याचा प्रयत्न केला. तर निश्चितच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुद्ध संस्कृतीच्या इतिहासाला अभिप्रेत भविष्याचा बुद्ध इतिहास इथे घडवू शकू.  
ôôôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५

3 comments:

  1. लेख अतिशय छान आहे. मनापासून आवडला..निश्चितच आपण सर्व मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत बुद्ध संस्कृतीच्या इतिहासाला अभिप्रेत भविष्याचा बुद्ध इतिहास इथे घडवू शकू.

    ReplyDelete
  2. मला लेख मनापासून आवडला .सर्व प्रथम आपले हार्दिक अभिनंदन . बाबासाहेबांचे अधुरे राहिलेले स्वप्न भविष्यात नक्कीच पूर्णत्वाच्या मार्गी लागेल आणि त्यांनी केलेली प्रतिज्ञा मी संपूर्ण भारत बौधामय करील हि पूर्ण होईल गरज आहे ती फक्त विचार परिवर्तनाची ..
    जय भीम ......

    ReplyDelete