Sunday 13 November 2011

आंबेडकरी चळवळीचा कणा : आंबेडकरी तरुणाई

आंबेडकरी चळवळीचा कणा : आंबेडकरी तरुणाई

मी पाहिलेला, समजलेला, उमगलेला, जगलेला हाच तो देश...माझा भारत देश...महान, सर्वोच्च, सुजलाम, सुफलाम, असा माझा भारत देश...म्हणून "मी सर्वप्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच"...हे माझ्या मुखातून सहजच बाहेर पडते...का नाही ? स्वतंत्र अश्या सार्वभौम देशाचा नागरिक म्हणून मला अभिमान आहे...भारतीय नागरिक म्हणून माझी छाती गर्वाने फुलून येत आहे...जगाच्या पाठीवर महात्म्यांचा देश म्हणून माझ्या भारत देशाचा जेव्हा गौरव केला जातो...तेव्हा तीच खुणगाठ मनाशी बांधून माझ्या नसानसातून देशाभिमान विजेच्या वेगाने प्रवाहित होतो...पण त्यापेक्षाही या देशात शांती, समता, बंधुत्व आणि न्यायाची मांडणी करणारे जागतिक तत्वज्ञान या मातीतून जन्मले...बुद्धाच्या वाणीतून उद्गमले...हे जगप्रसिद्ध होते तेव्हा मी फ़क़्त माझ्या देशाचाच राहत नाही...मी त्या जगाच्या पाठीवर असणा-या सर्व मानव जातीच्या मुक्तीचा प्रवर्तक बनतो...तेव्हा माझ्या बुद्धीच्या कक्षेत देशाभिमान जसा संचारतो...तसाच जगाच्या मानव मुक्तीच्या तत्वज्ञानाचा पाईक म्हणून मी जगाचा आदर्श बनू इच्छितो...या आदर्शाला मी जगू इच्छितो...इतिहासातील मांडणीच्या चिंध्या भस्म करून मी ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने जाहीर केलेल्या "मेकर्स औफ़ यूनिवर्स"च्या यादीला त्रिवार वंदन करतो...

जन आंदोलनाच्या नावाने तरुणाईला झिंगवून राष्ट्रप्रेम दाखविला जातो...तरुणाईचा उन्माद पुढे करून स्वार्थांध-सत्तालोलुप माणसांकडून विज्ञानाच्या युगातले महात्मा बनण्याचा प्रयत्न केला जातो...तेव्हा हा देश रडतो...इथली माती बंजर होते...या देशाच्या मातीची कूस वांझोटी होते...ज्या मातीने बुद्धाला जन्म दिला...ज्या मातीने बाबासाहेबांसारखा राष्ट्रभक्त देऊन सर्व भारतीयांना कायदा आणि अधिकाराच्या एकसुत्रात बांधले...ती कूस वांझोटी होऊ देण्याची जबाबदारी आपली आहे...आजचा वर्तमान फसवा आहे...भविष्य चतुर आहे...भूतकाळाच्या अग्नीला विझवून इलेक्ट्रोनिक फ्रीज मध्ये वर्तमानातल्या तरुणाईला गोठवले जात आहे...आधुनिकतेच्या नावाने त्यांच्यामधील जाज्वल्य देशाभिमान स्पर्धेच्या अवकाशयानाने समाजविश्वाबाहेर  मानवतावादाच्या गुरुत्वाकर्षनापासून दूर  टांगविला जात  आहे...सत्तेच्या रिंगणात बसून जातीवादाची बुलेटप्रुफ जाकेट मानवी मनावर अंथरली जात आहे...धर्माच्या नावाने नैतिक मूल्याच्या आड अनुबाम्ब हाताहातात पेरला जात आहे...मानवी मनात उगवणा-या बोधीवृक्षापेक्षा...ओसाड मानवी वाळवंटी जंगलात बाभळीचे काटेरी वृक्ष प्रत्येक  तरुणाईच्या रुपात उगवले जात आहे...आणि इथेच कुठेतरी हा देश पुन्हा एकदा मानवी सद्भावना, जाज्वल्य राष्ट्राभिमान आणि समतेचे बीज रोवणा-या आंबेडकरी तरुणाईच्या हातात येण्यासाठी लोटांगण घालीत आहे...आज तो अदृश्य असला तरी येणा-या काळात हा देश तुमच्या कवेत येण्यासाठी खुले आव्हान तुम्हाला देणार आहे...समतेचे, देशाभिमानाचे, मानवतेचे बीज या देशाच्या तरुणाईच्या तळहातावर हा आंबेडकरी नवतरुणच पेरणार आहे... त्यासाठी तुम्हाला घ्याव्या लागणा-या  भविष्यकालीन सतर्कतेसाठीच  हा  पत्रप्रपंच....:-

वैचारिक आणि ज्ञानाच्या पातळीवरील आंबेडकरी समूहाचा उच्चांक जगाने मान्य केला आहेमानवमुक्तीचा नारा ज्या समूहाने दिला असा बुद्धिवादी बौद्ध समूह  जगाने अनुभवला आहेआंबेडकरी विचारविश्व आणि बुद्ध तत्वज्ञान अनुभवाच्या पातळीवरच थांबलेले नाही तर वर्तमानातल्या  हाडामासाच्या  मानवी  वस्त्यांवर होणा-या हल्ल्यावर आणि  अमानवतावादी कृत्यांवर एकमेवभीमबाण म्हणून सप्रमाण सिद्ध झाले आहे. अश्या विचारविश्वाचे आपण शिलेदार आहोत. तेव्हा भविष्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर अधिकचीच पडली आहेती जबाबदारी आपल्याला पेलावी  लागणार आहेही जबाबदारी पेलण्याचे  बळही आपल्याच मनगटात आहे हे विसरून चालणार नाहीविचारप्रेमतत्वप्रेममानवप्रेम आणि देशप्रेम एकाच वेळी जेव्हा आपल्या धमन्यातून वाहत  असतो... तेव्हा फसव्या  देशप्रेमाच्या उर बुडवून वाहणा-या कोरड्या नद्या मानवी कल्याणाच्या पात्राला कोरड्याच  सोडून जातात.

मानवी विकासाची किनारे अश्या फसव्या देशप्रेमाच्या पुरात कोरडीच असतात... तेव्हा  मानवतावादी मने हात उंचावून मानवी कल्याणाच्या शिखराकडे बोट दाखवणा-या माझ्या बाबासाहेबांच्या स्मृतीकडे आशाळभूत नजरेने बघत असतात...त्या आशाळभूत नजरांना समाधानाची हमी देण्याचे काम आम्हाला करायचे आहेपरिस्थिती तशी अनुकूल नाहीवाटेत काटेरी गालीच्याचीच साथ आहेधमन्यातील रक्त शोषून घेणारे किडे सदैव तुमच्या मागावर आहेतत्या काटेरी गालीच्यांना आणि धमन्यातील रक्त शोषून घेणा-या किड्यांना पायदळी तुडवून आम्हाला भविष्याची वाटचाल  करायची आहे. ती काटेरी गालिचे कोणती ? आणि ते रक्त शोषणारे किडे कोणते ? हे स्पष्ट झाल्याशिवाय  आम्ही भविष्याचा मार्ग निर्धारित करू शकणार नाही हे लक्षात घ्या... 

धम्म हा फक्त जीवनमार्ग नाही...तर समाज संवर्धनाची मानवतावादी संहिता आहे. धम्म गतिमान असावा. प्रवाहित असावा. डबक्यात साचून ठेवलेल्या हिंदू संहीतांनी आणि स्मृतींनी मनुवादी जहराला जन्म दिला. त्याला प्रवाहित होऊ दिले नाही. तसे बौद्ध धर्माच्या बाबतीत होऊ नये म्हणून बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" आम्हाला दिला आहे. तोच आपल्यासाठी महत्वाचा आहे. पारंपारिक बौद्ध धम्म आणि बुद्धांचा खरा संदेश याचा शोध घेतांना बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्थावणेतून स्पष्ट केले आहे. परंतु आजही भारतात अनेक ठिकाणी पारंपारिक बौद्ध धम्माचे वारे गतिमान करण्यात येत आहेत. समूहवादी बौद्ध तत्वज्ञानाला अंतर्मनातील विकृतीपर्यंत सीमित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी तर हिंदू पद परंपरांचा शिरकाव बौद्ध धम्मात केला जात आहे. मानवी विकृतीचा शोध या नावाखाली बौद्धांना समूह समस्यांच्या वैज्ञानिक निराकरनापासून दूर नेऊन संकुचित व्यक्तीवादात गुंडाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. बुद्धाचे-बाबासाहेबांचे नाव घेऊन बुद्ध  तत्वज्ञानाला अध्यात्माची  झालर देण्याचा प्रयत्न केला जात आहे. बौद्ध धम्म प्रचार व प्रसाराचे उद्देश समोर करून अनेक नव्या धार्मिक  संघटना जन्म  घेऊ लागल्या आहेत. हिंदू कट्टरपंथीयांकडून यांना अदृश्य प्रोत्साहनही दिल्या जात आहे.  मात्र बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी  बाबासाहेबांनी स्थापन  केलेल्या "भारतीय बौद्ध महासभा" या संस्थेकडून  जाणीवपूर्वक आंबेडकरी समूहाचे लक्ष विचलित केले जात आहे.  या सर्व प्रकाराला आम्ही बळी न पडता सर्वकष बौद्ध तत्वज्ञान आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे.

नव्या परिवेशात आम्हाला आमची नवी संस्कृती रुजवावी लागणार आहे. डीजे आणि पाश्चात्य संगीताच्या तालावर झिंग आलेली आधुनिक पिढी बुद्धाच्या तत्वज्ञानाकडे ओढायची असेल तर आम्हाला नव्या सांस्कृतिक प्रवाहाला गती द्यावी लागणार आहे. आंबेडकरी साहित्याने एक आदर्शवत उंची गाठली आहे. यात यत्किंचितही शंका नाही. परंतु साहित्यात्मक प्रदुषनेही तितकीच वाढलेली आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या खंडांना प्रमाण मानावे लागणार आहे. आणि त्याच आधारावर एक नवी वैचारिक रुजवण आधुनिक पिढीमध्ये करावी लागणार आहे. आंबेडकरी संगीत हा एक प्रवाह तितकाच लक्षात घेण्याजोगा आहे. संगीत, नाट्य, एकपात्री अभिनय आणि पथनाट्य या क्षेत्रात ब-यापैकी आंबेडकरी नवतरुणांनी आपली छाप निर्माण केली आहे. आंबेडकरी संगीत तर आज घराघरात पोहचला आहे. या संगीतात इतकी ताकत आहे की ते ऐकतांना शरीरात एक नवा रक्तप्रवाह नवनिर्मितीच्या दिशेने संचारतो. या संगीताच्या तालावर नवतरुण ताल धरीत असतील. तर त्याचे स्वागत आधीच्या पिढीने करायलाच हवे. कमीत कमी उन्मादाची नश्या येऊन जीवनाची मुठमाथी करणा-या संगीतापासून तर त्यांना बाहेर खेचून आणता येईल. शिवाय त्या रूपाने आंबेडकरी चळवळीपासून  दूर जाणा-या तरुणाईत आंबेडकरी विचारांचे नवचैतन्य निर्माण करता येईल. या नव संस्कृती मूल्यांचे स्वागत आम्ही करायचे आहे.

सोबतच आपल्याला अतिदक्षता घ्यायची आहे ती आपल्याच परिवेशात आपल्यात वैफल्य निर्माण करणा-या हितशत्रूंच्या कारवायांची. आपले लोक भावनिक आहेत हे यांना चांगल्याने माहित आहे. त्याचाच हे फायदा घेत आहेत. बाबासाहेबांचे नाव घ्या आणि लोकांना आपल्या कडे आकर्षित करा !  हाच यांचा धंदा झालेला आहे. म्हणून लोकांना पुस्तकातले खरे बाबासाहेब वाचायला द्यावे लागणार आहे. भाषणातून बाबासाहेब  ऐकवून या मुर्खांनी समाजाला महामूर्ख बनविले आहे. आता आपल्याला हे थांबवावे लागणार आहे....यात भाषणातून बाबासाहेब ऐकणा-या आपल्या त्या भोळ्याभाबड्या लोकांचा दोष नाही. बाबासाहेबांवर असलेल्या असीम प्रेमापोटी ते सर्व या मूर्खांच्या नादी लागले. चुकीचे बाबासाहेब भाषणातून पेरून सत्तेची लालूच दाखविण्यात आलीरिपब्लिकन पक्ष यांच्या पायाखालची जमीन सरकविणार  आहे. हे यांना चांगले माहित होते. म्हणून या पक्षाला आंबेडकरी परिवेशात येऊन बदनाम करण्यात आले. जो सच्चा भारतीय आहे...जो सच्चा आंबेडकरी आहे. तो आजही रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासाला नमन करतो आणि या पक्षाने आतापर्यंत केलेल्या कार्याला सलाम करून, आजही या पक्षासाठी जगतो आहे. आंबेडकरी युवा समूहाने तरी अश्या भंकपबाजांना बळी पडू नये.

सत्तेचा भुकेला आणि लैंगिक समागमासाठी आतुर झालेला यात काहीच फरक नसतो...सत्तेचा कुत्रा कुणाच्याही दारात जाऊन...कुणाच्याही दावणीला बांधून आपली हौस भागवून घेतो...आणि लैंगिक समागमासाठी पिसाळलेला कुत्रा कुठलेही तारतम्य बघता कुणावरही तुटून पडायचा प्रयत्न करतो...शेवटी हेच सिद्ध होते कि दोन्ही परिस्थितीत वावरणारे डोक्याने खाली आणि बुद्धीने निर्बुद्ध असतात...सत्तेने, पुतळे उभारल्याने, स्मारक बांधल्याने, नाव बदलल्याने कधी सामाजिक आणि मानवी विचार परिवर्तन झाले आहे का ? यामुळे लोकांचे पोटापाण्याचे, रोजीरोटीचे आणि सामाजिक अन्यायाचे प्रश्न सुटले आहेत का ? बेरोजगारी आणि सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावला गेला आहे का ? असे जर झाले असते तर आज जगातले सर्वात श्रीमंत आणि मानवी कल्याणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून . प्र. जगाच्या कानाकोप-यात ओळखला गेला असता. पण याउलट सामाजिक अन्याय, विषमता, गरिबी, बेरोजगारी आणि हिंदू बुवा बाजीचे एकमात्र उदाहरण .प्र. का बनत चालला आहे. ? म्हणून सत्तेनीच सर्व काही प्राप्त होते. अश्या पोकळ वल्गना करणे आता थांबले पाहिजे. असे असते तर बाबासाहेबांकडे कुटलीही सत्ता नसतांना जागतिक मानवी कल्याणाचा लढा त्यांनी एकहाती कसा जिंकला.?  त्याचे उत्तर आहे  सत्तेने नाही विचाराने, स्वाभिमानाने, विद्वत्तेने, अधिकाराने, नैतिकतेने, खंबीरतेणे आणि तत्वज्ञानाच्या स्वीकारणे. तत्वज्ञानाच्या स्वीकाराशिवाय कुटलीही सत्ता, व्यवस्था आणि पक्ष आमुलाग्र सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकत नाही. हे बाबासाहेबांच्या कृतीतून आतातरी शिकून घ्या ! सत्तेसाठी लोकांना मूर्ख बनविणे, फसविणे आणि मानवी कल्याणाच्या बौद्ध तत्त्वज्ञानापासून त्यांना दूर नेणे, यापेक्षा मोठा गुन्हा ठरू शकत नाही. आता तरी विचार करा ! आणि सत्तेच्या वावटळीतून बाहेर पडून सामाजिक न्यायाच्या दिशेने...मानवी कल्याणाच्या वाटेने झेप घ्या !

आज परिस्थिती फार विचित्र येऊन ठेपली आहेआमचा लढा जसा परकीयांशी(विचाराविरुद्धआहे तसाच तो आपल्यातीलच प्रच्छन्न आंबेडकरवाद्यांशी सुद्धा आहेआंबेडकरी नवतरुणांना अनेक  पातळ्यांवर एकाच वेळी लढा द्यावा लागत आहेदेशातील विकोपाला गेलेला  जातीवादधार्मिक   कट्टरवादाने जन्माला घातलेला आतंकवाद, दहशतवाद ; दिवसेंदिवस घसरत चाललेली राजकीय नैतिकता, त्यातून निर्माण झालेली राजकीय अराजकता; अनैतिक राजकीय मूल्यांचे नेतृत्वात होत चाललेले संक्रमण आणि त्यातून परिस्थितीच्या विरोधाभासात निर्माण होणारी राजकीय वास्तवता सावरण्याची जबाबदारी आंबेडकरवाद्यांची आहे. संविधान निर्मिती नंतरच्या भारतीय व्यवस्थेला आंबेडकरवाद्यांनीच इथपर्यंत सुरक्षितरित्या आणून ठेवले आहे. आज मुळात भारतीय व्यवस्थेत आणि भारतीय राजकारणात समानतावादी, धर्मनिरपेक्षवादी आणि लोकशाहीची जी नैतिक मुल्ये थोड्याफार प्रमाणात टिकून आहेत. त्याचे पूर्ण श्रेय आंबेडकरवाद्यांना आहे. रिपब्लिकन पक्षाच्या तुकड्याही प्रस्थापित व्यवस्थेला नियंत्रित ठेवण्यात समाजातील संघटीततेच्या बळावर यशस्वी ठरल्या आहेत. हे आम्हाला विसरून चालणार नाही. परंतु यानंतरची जबाबदारी आंबेडकरी नवतरुणांची  राहणार आहे. सद्यस्थितीत हे नियंत्रण थोड्याफार प्रमाणात कमी होतांना दिसून येत आहे. याचे कारणही १९८० ते १९९० च्या दशकात आंबेडकरी राजकारणात निर्माण करण्यात आलेला विद्रोह हाच आहे. अवसरवादी, संधिसाधू, आणि जातींचे गणितीय राजकारण हे आजच्या अनैतिक राजकीय वास्तवाला तितकेच कारणीभूत ठरलेले आहे. आधुनिक पिढीच्या मनात रिपब्लिकन पक्षाच्या विरुद्ध पेरण्यात आलेले जहर हे त्याचेच एकमेव  उदाहरण आहे. अश्या विविध पातळ्यावरची आम्हा नवतरुण आंबेडकरी तरुणांची लढाई इथेच संपत नाही. ही तर आम्ही भारतीय असण्याची लढाई आहे. भारतीयतेचा नारा या देशात आमच्याच  खांद्यावर टिकून राहू शकतो. हे त्यामागील वास्तव आहे.

पण दुसरीकडे आम्हाला लढावे लागत आहे. ते आप्तस्वकीयांशी सुद्धा. ही लढाई वर्चस्वाची नाही. ही लढाई श्रेष्ठत्वाची नाही. ही लढाई आहे विचारांच्या सुव्यवस्थित संचालनाचीव्यक्तीवर्चस्वाचीनेतृत्ववर्चस्वाची लढाई आम्ही समजू शकतो. परंतु आज आंबेडकरी समूहामध्ये ही लढाई गौण ठरलेली आहे. आज वास्तवताः जी लढाई आमची आप्तस्वकीयांशी आहे.  ती एकाच विचारांत, एकाच तत्वज्ञानात त्याच्या सूत्रबद्ध संचालनाची. "अत्त दीप भवं: स्वयं दीप हो:" हा संदेश आम्ही आमच्या मनी इतका रुजविला आहे. की व्यक्ती तितके वैचारिक चळवळीच्या संचालनाचे विचारपीठ बनले आहेत. आम्हाला समजला तोच बाबासाहेब खरा ! अश्या आविर्भावात जगणा-यांनी बाबासाहेबांची उंची खुजी करण्यासाठी चालविलेला हा सर्व वर्चस्ववादी प्रपंच आहे. त्यामुळेच कुणी पक्षाचे बारा वाजवितो, तर कुणी वैचारिक आंदोलनाच्या नावाने समाजाची शक्ती आणि पैसा लुटून नेतो.

आता तर आरपार ची लढाई म्हणून कुणीतरी खरे मूळ भारतीय आणि कुणीतरी निर्वासित  भारतीय हे दाखवून देण्याच्या नावाखाली  अराजकतावाद आंबेडकरी समूहात पर्यायाने आंबेडकरी  नवतरुण पिढीमध्ये पेरत सुटला आहे.  कोण  कुणाचा दुश्मन ? आणि कोण कुणाचा मित्रहे  सांगण्याच्या नादात बाबासाहेबांनी दिलेले "प्रथमतः  भारतीय आणि अंतिमतः भारतीयहे सूत्रच विसरत चाललेला आहेसंविधानाच्या  अंमलबजावणीनंतर  पारंपारिक लढ्याची सूत्रे बाबासाहेबांनी  टाकून देऊन संविधानिक लढ्याचे अस्त्रे उगारले होते. हे  यांच्याकडून जाणीवपूर्वक विसरले जात आहेत्यातूनच बामसेफ, मूलनिवासीएम्बसभारत मुक्तीलेणी संवर्धनबौद्ध संस्कार संवर्धन अशी  वेगवेगळ्या संघटनेचे पिक दिवसागणिक घेतले जात आहे. या  संघटनेच्या पिकात अंतिमतः लाभ हा समाजाला  मिळता  फुटीरतावाद्यांच्या घश्यात मलाई ओतली जात आहेसमाज याने लाभान्वित  होणार नाही. आणि सुरक्षितही होणार नाही. हे आम्ही नवतरुण आंबेडकरी  पिढीने लवकरात  लवकर ओळखून घेणे गरजेचे आहे.

आणखी किती दिवस आम्ही आमच्यात राजकीय, वैचारिक आणि समूहनिष्ठ शहाणपणा  आणण्यासाठी घालविणार आहोत ? याचे उत्तर प्रत्येक  आंबेडकरवाद्यांना द्यावेच लागणार आहे.  याचे उत्तर या पिढीच्या आंबेडकरी तरुणांजवळ आहेसंसाधने जरी तोटकी असलीसूत्रसंचालनाचा वर्षगणितीय  अनुभवाचा अभाव असला, तरी आंबेडकरी बाणा या पिढीमध्ये पराकोटीचा आहेचळवळ पेलण्याची  ताकद आहेसमूह कल्याणाचा भार वाहून नेण्यासाठी  यांचे खांदे मजबूत आहेतगरज आहे ती  बाबासाहेबांच्या स्वच्छ प्रेरणा आणि विचार यांच्यापर्यंत पोहचविण्याचीभविष्यकालीन आंबेडकरी  चळवळीचे  सूत्रसंचालन करतांना  देशाला कल्याणाच्या वाटेवर, समतेच्या सूत्रात, न्यायाच्या बंधनात आणि बंधूतेच्या नियंत्रणात बांधण्यासाठी आंबेडकरी होकायंत्राला प्रत्येक आंबेडकरी नवतरुणात स्वयंचलित करण्याची.  

त्यासाठी आम्हाला काही नियम स्वतःमध्ये भिनवून घ्यावे लागतील. पहिले असे की, (आम्ही आंबेडकरी आहोत हे नाकारता येत नाही. परंतु त्यासोबतच आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत असा नारा बुलंद करण्याची :-  हे जर आम्ही करू शकलो तर या देशातला प्रत्येक माणूस तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनाही सर्वप्रथम भारतीयत्व अपेक्षित होते. दुसरे असे की, (भाषणातून बाबासाहेब ऐकून स्वतःची चळवळीविषयक मानसिकता बनविण्यापेक्षा खरे बाबासाहेब पुस्तकातून वाचून वास्तवतेशी संलग्नित करण्याची :- यामुळे स्वार्थासाठी  अनेकांनी भाषणातून आंबेडकरी विचारांना कसे विद्रूप केले आहे. हे समजून घेण्यास मदत होईलआणि भविष्यकालीन मानवी  कल्याणाचे लढे उभारतांना  संभ्रमाऐवजी वैचारिक सुदृढता त्या आंदोलनाला प्राप्त होईल.  तिसरे असे की, (व्यक्तीद्वेष, नेतृत्वद्वेष झुगारून बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या संस्था संघटनांना मजबूत करण्याची, स्वतः या संस्था संघटनांमध्ये सहभागी होऊन निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदविण्याची :- अन्यथा आज सर्वत्र बाबासाहेबांच्या नावाने नवतरुण आंबेडकरवाद्यांच्या बळावर, त्यांच्याच शक्तीच्या जोरावर चळवळीतले  स्वयंघोषित महापुरुष बनण्याची जणू स्पर्धाच सुरु झाली आहे. महापुरुष बनविण्यापेक्षा आपल्या महापुरुष्याच्या विचाराला जपण्याचे शौर्य जरी आम्ही आमच्यात बाळगले तरी येणा-या भविष्याचे चित्रकार तुम्ही ठरू शकता. इतकी ताकत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे.

आजच्या युवा आंबेडकरी पिढीने इतके जरी केले. तरी चळवळीसाठी ते पोषकच ठरणार आहे. आधीच्या पिढीने केलेल्या चुकांचे पुनरावलोकन टाळून आम्हाला याच पिढीच्या आधाराने नवनिर्मितीच्या मार्गावर जावे लागणार आहे.  आधीच्या पिढीने आंबेडकरी चळवळ इथपर्यंत आणण्यासाठी दाखविलेले शौर्य मान्य केल्याशिवाय तुमची चळवळीविषयक प्रगल्भता वाढणार नाहीआंबेडकरी चळवळ काळाच्या मर्यादेत बसणारी नाहीजोपर्यंत माणूस म्हणून माणसाचे अस्तित्व कायम आहे. जोपर्यंत मानवी  जीवनातला संघर्ष कायम आहेतोपर्यंत ही चळवळ कायम राहणार आहेत्यामुळे अश्या अनेक पिढ्या या चळवळीमध्ये येतील आणि जातील. परंतु तीच पिढी इतिहासाच्या पानावर आपले अस्तित्व कोरून जाईल. जी या चळवळीला मानवी कल्याणाच्या परमोच्च बिंदूवर जाती, धर्माच्या पलीकडे नेऊन पोहोचवेल. या आंबेडकरी चळवळीत येणा-यांनी यावे. त्यांचे स्वागत आहे. जाणा-यांनी जावे. चळवळीचा भार या पिढीच्या खांद्यावर हलके करूनआम्ही कृतज्ञ आहोत त्याच्या कार्यापुढे...आम्ही नतमस्तक आहोत त्यांच्या शौर्यापुढे... निश्चिंत व्हा...कारण इथला आंबेडकरी निखारा सदैव तेवत होता. तेवत राहील. मानवी अस्तित्वाच्या अंतापर्यंत. देशाच्या सर्वकष कल्याणापर्यंत...आंबेडकरी चळवळ लढत राहील...प्रत्येक पिढीच्या अस्तित्वापर्यंत...नवनिर्मितीच्या प्रत्येक सूर्योदयाला आंबेडकरी चळवळीच्या निखा-यातूनच जावे लागेल...आंबेडकरी बाणा असलेली तरुण पिढी असेपर्यंत...इथे अंत नव्हेच...प्रत्येक पिढीतून जन्म घेतेय आंबेडकरी चळवळीचे होकायंत्र...
-----प्रा. संदीप नंदेश्वर, नागपूर, ८७९३३९७२७५

No comments:

Post a Comment