Wednesday, 21 December 2011

एकत्रीकरण नेत्यांचे की समाजाचे

एकत्रीकरण नेत्यांचे की समाजाचे
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

आंबेडकरी चळवळ आज एका अभिनिवेशातून जात आहे. या चळवळीतला प्रत्येकच माणूस हवालदिल झाला आहे. प्रत्येकाला येणा-या भविष्याची चिंता सतावत आहे. कौन, कधी, कुठे जाऊन बसेल याचे काहीच तारतम्य उरले नाही. अश्या परिस्थितीत समाज एकाकी पडतो. सामाजिक प्रश्नांवर ही चळवळ नेहमी आपले अस्तित्व दाखवून देत आहे. चळवळ जिवंत असण्याचे आणि प्रवाहित असण्याचे हे लक्षण आहे. त्यामुळे या चळवळीवर नितांत प्रेम करणा-या, आंदोलन आणि लढ्यांविषयी आदर असणा-या माणसांना आजही ही चळवळ या देशाचे भविष्य बदलवू शकते यावर विश्वास आहे. परंतु नेतृत्व स्पर्धेने आणि चळवळीत इतरांनी चालविलेल्या किल्विषाने भावाभावात द्वेष तयार होत आहे. त्यातही शुद्ध आणि प्रक्षुब्द्ध अश्या आततायी पणात चळवळीतली माणसे एकमेकांपासून दुरावत चालली आहेत. त्यामुळे अनेकदा चळवळीतील कार्यकर्त्यांकडून चळवळीवर प्रखर अशी टीका केली जातांना दिसून येते. 

आंबेडकरी चळवळीविषयी अत्यंत आदर असलेल्या सच्च्या कार्यकर्त्याच्या मनातील ही घुसमट आहे. आतापर्यंतच्या इतिहासाने हा त्रस्त आहे. त्यामुळे दोन पिढीतील लोकांमध्ये चळवळीविषयी वेगवेगळी मतमतांतरे दिसून येतात. आताच्या पिढीच्या प्रक्रिया आणि पद्धत्ती यातही फरक आहे. ही पीढी आधीच्या पिढीच्या तुलनेत सक्षम दिसत नसली तरी या पिढीजवळ असलेली उर्जा तीळमात्रही कमी नाही. आंबेडकरी चळवळीसाठी ही उर्जा निश्चितच लाभदायी ठरणारी आहे. थोडासा संयम या पिढीने आपल्या अंगी बाळगून आणि आततायीपणा सोडून सम्यक मार्गाने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.  अनुल्लेखानेही कुणाला दुखावता येणार नाही याची खबरदारी या पिढीने घ्यायला हवी. निश्चितच नेत्यांचे मार्ग पटणारे नाहीत. परंतु त्यांनी ही चळवळ तुमच्यापर्यंत आणून पोहचविली हेही या पिढीला विसरता येणार नाही. आतातरी चळवळीवर आणि नेत्यांवर टीका करीत असतांना या पिढीने आम्ही काय करू शकतो हे दाखवून द्यावे लागणार आहे. आता या तरुण पिढीला चळवळीसाठी काहीतरी नवीन प्रोग्राम द्यावा लागणार आहे. समाज त्याची अजूनही वाट पाहत आहे. नेते आपल्या मार्गावर तेव्हाच येऊ शकतात. अन्यथा यांना कितीही शिव्या मारल्या तरी काहीही निष्पन्न होणार नाही एवढेच ! म्हणून कामाला लागून आधी या पिढीला स्वतःमधले मतभेद विसरून संघटीत तरुण शक्तीचा उत्कृष्ट नमुना समाजासमोर मांडावा लागणार आहे. जो वर्तमानातील चळवळीला पोषक असेल आणि समाजाला संघटीत करणारा असेल..

इथे प्रत्येकच स्वतःला नेता मानायला लागला आहे. आणि न कळताही इतरांवर टीका करायला लागला आहे. आतातरी हे बंद व्हायला पाहिजे. टीका करतांना आम्ही समाजासाठी काय करू शकतो हे आपल्या कार्यातून आणि कृतीतून सिद्ध करून दाखविले पाहिजे.  तेव्हाच ते चळवळीसाठी पोषक राहील. अन्यथा आम्ही दुसरे तिसरे काहीही करीत नसून पुन्हा एकदा आतापर्यंत आंबेडकरी चळवळीत घडून गेलेल्या इतिहासालाच दोहरावत आहोत. खूप झाले आता...समाजाला संभ्रमित करणे सोडून एकत्र करण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी कुणावरही टीका न करता स्वतःच्या कृतीतून आणि तरुण आंबेडकरवाद्यांच्या जोरावर आता आम्हाला समाजात जाऊन किल्ला लढवावा लागणार आहे. आता आम्हाला समाजासमोर कृती कार्यक्रम देण्याची वेळ आलेली आहे. जरा याचा नीट विचार करा. विरोध केल्याने चळवळ पुढे नेता येईल की, कृती कार्यक्रम दिल्याने आपसातील मतभेद मिटवून सहकार्याच्या भावनेतून चळवळ पुढे जाईल याचा आता प्रत्येक आंबेडकरवाद्यांनी विचार करावा..

आजपर्यंत आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात आंबेडकरी नेत्यांना एकत्र करण्याचे अनेक प्रयत्न झाले. जणू आंबेडकरी चळवळ ही फक्त राजकीय चळवळ आहे अश्या आविर्भावात काहींनी दिशाभूल केली आहे. सध्या मात्र अजूनही समाजाच्या हातात काहीच लागलेले नाही. ना कधी नेते एकत्र आहे. आणि ना कधी राजकीय चळवळ चालविणा-यांनी समाजहितासाठी काही केले. भारतात आंबेडकरी समूह असा एकमात्र समूह आहे ज्या समूहाला आपल्या समाजहिताचे प्रत्येकच कार्य एकतर लढून वा आंदोलनाच्या मार्गातूनच पूर्ण करून घ्यावे लागले आहे. शेवटी किती दिवस आम्ही समाजाची शक्ती वाया घालविणार आहोत ? किती दिवस या आंबेडकरी समूहाला संघर्षच करावा लागणार आहे ? असे प्रश्न चळवळीतल्या जाणकारांकडून येऊ लागले आहेत. परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की परिवर्तनवादी समाजाला नेहमी संघर्षच करावा लागत असतो. संघर्षाशिवाय या समाजाला काहीच मिळत नाही. आणि सतत संघर्षरत असणे हेच चळवळीचे घोषवाक्यही आहे. शेवटी मानवी जीवन दुसरे तिसरे काही नसून संघर्षाचेच दुसरे नाव आहे. म्हणून संघर्षाला या समूहाचा कमीपणा न मानता त्यालाच तुमच्या चळवळीचे ब्रीदवाक्य करावे लागणार आहे.

आजची पीढी संघर्षाला तयार आहे. संघर्षाची उर्मी कमी नाही. कमी आहे ती एकोप्याची. मात्र या एकोप्याची योग्य चिकित्सा केली जात नाही. जेव्हा कधी समाजाच्या एकोप्याचा उद्दा उपस्थित केला जातो. तेव्हा हवसे, नवसे, गवसे नेत्यांना दोष द्यायला समोर येतात. मात्र स्वतःच्या कर्तव्यदक्षतेची साक्ष देत नाही. नेत्यांनी राजकारण केले हे मान्य आहे. नेत्यांचे काम राजकारण करणे हेच असते. ते समाजहिताचे झाले नाहीत याला जबाबदार नेते नाहीत तर समाज आहे. नेत्यांची सत्तास्पर्धा मान्य केली जाऊ शकते मात्र समाजही जेव्हा नेत्यांच्या या सत्तास्पर्धेत खांद्याला खांदा लाऊन चालू लागतो तेव्हा समाजाचे दुभंगणे हे ठरलेलेच असते. स्वयंघोषित नेता कधीही नेता बनत नाही. समाजमान्यता म्हणा की काही लोकांची मान्यता नेत्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो नेता होऊ शकत नाही. हा निकष आंबेडकरी चळवळीतील नेत्यांवर लावला गेला तर कुठल्याही नेत्याला दोषी ठरविण्याचा आपला अधिकारही आपण गमावून बसतो. रिपाईचे इतके तुकडे झाले ते नेत्यांनी केले नाही ते समाजानी केले आहे. नेतृत्वामध्ये सत्तालोलुपता आणि स्वार्थ आपल्या अंतिम पातळीला पोहचला असतांना अश्या नेत्यांना समाजाने (समाजातल्या काहींनी) पाठीशी घालून त्याला नेता बनण्याची संधी दिली. ही माणसे त्या नेत्याच्या पाठीशी गेली नसती आणि नेतृत्वगुण ओळखून एकाच नेतृत्वाच्या पाठीशी उभी झाली असती तर इतके तुकडे आज आपल्याला दिसले नसते. कोणत्याही समाजाचे नेतृत्व करणारा एक नेता जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्या समाजाचा संघटीत लढा यशस्वी होणे दुरापास्त आहे. 

नेमके इथेच या समूहाने कात टाकली आहे. १०० लोकांचे टोळके घेऊन चालणारही स्वतःला नेता समजतो. तो त्या १०० च्या भरोश्यावर. पण ही १०० लोक त्या नेत्याच्या पाठीशी राहून काय सध्या करून घेतात ? याचे उत्तर शोधले तर काहीअंशी स्वहित आणि स्वार्थ पण बहुतांशतः यांच्या वाट्याला काहीच येत नाही. तरीही मालक धर्म म्हणून ही माणसे त्याच नेत्याला चिकटून असतात. एखादवेळी त्यातल्या एखाद्या माणसाशी मतभेद झाले की तो त्या नेतृत्वाला दुषणे देत त्यातीलच काही माणसे घेऊन बाहेर पडतो. आश्चर्य असे की त्या टोळीतील काही माणसेही त्याच्यासोबत जातात आणि मग पुन्हा एक नेता एक गट तयार होतो. या सर्व प्रक्रियेत समाज नावाचे मोठे संघटन जे निवडणुकीच्या गर्दीत सहभागी होते. ते कुठेच नसते. नेमकी हीच स्थिती आंबेडकरी चळवळीतील राजकारणाची झाली आहे. निवडणुकीतील संख्याबळावर बोलणारा, नेत्यांना शिव्या घालणारा वर्ग मात्र नेत्यांच्या फुटीरपणाला आळा घालण्यासाठी कधीही येत नाही. 

या सर्व विवेचनातून आधुनिक पिढीला बोध घ्यायचा आहे. समाज विघटीत झाला आहे. नेत्यांच्या मागे, समाजद्रोहिंच्या मागे, समाजकंठकांच्या मागे. त्या समाजाला संघटीत करण्याची आज नितांत गरज आहे. एक नेतृत्व स्वीकारण्याची आणि त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपली संघटीत शक्ती उभी करण्याची गरज आहे. नेते एकत्र कधी येणार नाही. आणि त्यांच्या एकत्रीकरणासाठी आपली शक्ती खर्च घालून काहीही सध्या होणार नाही. नेता जेव्हा एकाकी पडेल तेव्हा काही न करता त्याचे नेतृत्व संपेल आणि समाज संघटीत राहील. लढा संघटीत राहील. आंदोलनाला बळ मिळेल. समाजहिताला प्राधान्य येईल. "नाचता येईना; आंगण वाकडे" अशी आजच्या नेत्यांची स्थिती झाली आहे. त्यामुळे एक नेतृत्व स्वीकारतांना काही बाबींचेही आम्हाला तंतोतंत पालन करावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळ हे एक वैचारिक आंदोलन आहे. विचारांशी तडजोड म्हणजे चळवळ संपविणे होईल. म्हणून विचारांना प्रामाणिक असलेला, सिद्धांतात बसणारा, लढवय्या, सामाजिक प्रश्नांची जाण असणारा आणि संसदीय प्रणालीतून लोकशाही मूल्यांशी समाजाची जवळीक निर्माण करणारा नेता आता समाजाने शोधला पाहिजे. ही जबाबदारी आता समाजाने स्वीकारून नेत्यांना घरचा आहेर दाखविण्याची गरज आहे. आणि आधीनिक पिढीने अश्या समाजाला एकत्रित करून समाजाच्या संघटीत शक्तीला प्रदर्शित करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे.  

आपण आंबेडकरी घराण्यातील नेत्यांविषयी कृतघ्न आहोत असे तुम्हाला वाटत नाही का ? अद्यापही बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याची योग्य शहानिशा कुणीही केलेली दिसत नाही. मात्र त्यांच्या वक्तव्याचा गदारोड करून सर्वच त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नसतात. प्रत्येक गोष्टीत प्रकाश आंबेडकर जबाबदार आहेत अशी भूमिका घेणा-यांनी स्वतःच्याही भूमिकेचा नीट विचार करावा. चळवळीचे हे हाल झाले असतांनाही एक दिशादर्शक नेतृत्व समाजाने अद्यापही स्वीकारले नाही. उलटपक्षी दोषारोप ठेऊन माकडांच्या हातात कोलीत आणि दुश्मनांना संधी उपलब्ध करून दिली आहे. आतातरी समाजाने अंतर्मुख होऊन नीट विचार करावा.... इतकी पराकोटीची कृतघ्नता आम्ही दाखवली आहे. म्हणूनच ही वेळ आली. आतातरी या कृतघ्नतेतून बाहेर पडा आणि सच्च्या नेत्याविषयी कृतज्ञ बना...!

नेत्यांच्या शोधात हा समाज संभ्रमित झाला आहे. हे अलीकडच्या एका आंदोलनाच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. ते आंदोलन होते मुंबई चैत्यभूमी वरील इंदू मिल ची १२.५ एकर जागा शासनाच्या ताब्यातून मिळविण्याचे. मागील कित्तेक वर्षापासून हे आंदोलन सुरु आहे. पण आताच्या आंदोलनाला बळ मिळाले तेही मा. आनंदराज आंबेडकर यांच्या आंदोलनाने. या आंदोनावर अनेक मतमतांतरे झाली पण समाजाने  इथे आपल्या संघटीत शक्तीचा नमुना प्रदर्शित केला. मा. आनंदराज यांच्या आंदोलनावर जे चुटक्या फुट्क्यांनी मतमतांतरे चालविली होती त्यांना चोप देऊन समाजाने त्याला पाठींबा दिला. त्यामुळे नाईलाजाने सर्वच नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना समाजाच्या सुरात सूर मिळवून समर्थन दिले. श्रेयाच्या लढाईत समाजाच्या पाठींब्याने आंदोलनाला बळ दिले. रिपाईच्या एकत्रीकरणासाठीही असाच पाठींबा समाजाने घेऊन आपला एक नेता निवडणे गरजेचे आहे. आणि या नेता निवडीच्या आंदोलनाची जबाबदारी आधुनिक पिढीने आपल्या खांद्यावर घेऊन त्याला समाजाचा पाठींबा घेतला तर निश्चितच आंबेडकरी चळवळीचा भविष्यकाळ सुवर्णयुग आपल्यासोबत घेऊन येईल.  

चैत्यभूमिवरील स्मारक हा संपूर्ण भारतीयांसाठी आदरणीय असला तरी तो बाबासाहेबांचे महापरिनिर्वान स्थळ असल्याने आंबेडकरी समूहाच्या तो जिव्हाळ्याचा आहे. तसाच आंबेडकरी राजकारण हाही आपल्या जिव्हाळ्याचा मुद्दा समजून आता समाजाने या आंदोलनाची तयारी केली पाहिजे. समाजरेटा हा कधीच अयशस्वी होत नाही. समाजशक्तीपुढे, समाजाच्या एकोप्यापुढे सर्वच गौण ठरत असते. हे जर सत्य असेल तर नेत्यांना एका विचारपिठावर, एका छत्रछायेखाली, एका संघटनेखाली आणणे समाजासाठी कठीण नाही.  त्यामुळे आता आम्हाला काही शहाणपणा अंगी भिनवावा लागणार आहे. इतरांना दुषणे देतांना आपली जबाबदारी ओळखावी लागेल. नेत्यांचे नाही तर समाजाचे एकत्रीकरण करावे लागेल.

---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

2 comments:

  1. अगदी बरोबर संदीपजी, नेत्यांना एकत्र आणण्यात वेळ वाया घालवण्या पेक्षा बरेच चांगले कार्यकर्ते आपल्या समाजात आहेत फेस बुक च्या माद्यमातून अश्या सर्वांना एकत्र करून एक नवीन पक्ष स्थापन करायला हवा, जो सर्व समावेशक असेल मिडिया जरी आपल्याला प्रसिद्धी देत नसेल तर फेस बुक च्या माध्यमातून आपण पूर्ण देशभर प्रसिद्धी देवू शकतो जर पैश्याचा प्रश्न असेल तर तो हि वर्गणीच्या माध्यमातून गोळा करू शकतो उदा.बौद्ध किंवा आंबेडकरी विचारांचे अंदाजे कमीत कमी १५ करोड लोकसंख्या जरी पकडली व प्रत्येकाने दिवसाला १ रुपया असे ३० दिवसाचे ३० रुपये दान केले तरी फार मोठी वर्गणी गोळा होऊ शकते फक्त नवीन चेहेरे निवडतांना ते सच्चे आंबेडकरी विचारांचे असले पाहिजे, एकदा या विषयावर मिटिंग घेवून जर सुरुवात केली तरी थोडा वेळ जरूर जाईल पण त्यातून नक्कीच काहीतरी निष्पन्न होईल.

    ReplyDelete
  2. सच्चा आंबेडकरवादी कार्यकर्ता कोण ?
    मी त्यालाच खरा आंबेडकर वादी कार्यकर्ता म्हणतो जो अन्न्यायावर तुटून पडणारा धगधगता अंगार असतो, ज्याच्या हातातून कर्तुत्वाचे झरे झुळझुळत असतात, ज्याने आपला 'मी' बर्फासारखा विरघळून टाकून जो "आम्ही" लाच प्रमाण मानतो, जो स्वताचा अहंकार विहारात जातांना जशी पायताणे बाहेर ठेवतात तसा समाजात वावरतांना आपला अहंकार बाहेर ठेवून वावरत असतो, असा कार्यकर्ता नेहमी जागल्याच्या भूमिकेत असतो. मी त्यालाच खरा आंबेडकरी कार्यकता म्हणतो जो अत्यंत मेहनतीने मोक्याचा जागेवर जावून बसत असतो आणि आंबेडकरी विचारला जागून समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी झटत असतो, झगडत असतो.

    ReplyDelete