Monday 7 September 2015

"बघ तुला माझा आभास होतो का "?

आज नागपूरात थोड्याच वेळापूर्वी विजगर्जनेसह आलेल्या पावसाने माझ्याही लेखणीची विज कडाडली. आणि प्रस्तावित "बघ तुला माझा आभास होतो का "? या प्रस्तावित महाकाव्याला बंध मिळाला. तो तुमच्याशी लगेच शेअर करतोय...प्रतिक्रीया जरूर कळवाव्या ही विनंती,

आज अचानक विजा व पावसानी हल्ला सुरु केला
वादळासवे पाऊस अचानक सुरु झाला
विजांचा कडकडाट असह्य झालाय
तु पाऊस आणि मी विज...
चल बरसुया त्या महालातल्या वाड्यावर,
जिथे जिंदगीचा धिंगाणा घालून
मानवतेच्या खूनाचा कट रचला जात आहे
नंग्या साधूंच्या विक्षीप्त शरिरावर कपडे घालून बसलेत सर्व...
शासकीय महालातून तुझ्या माझ्या ऑनर किलींग चे फतवे काढण्यासाठी,
तु आणि मी झिजून पेरलेल्या आरक्षीत जागेवर बसण्यासाठी...
त्यांच्यावर कोसळायचे आहे विजेसह
आणि
तुला बरसायचे आहे गोदावरीला पूर येईपर्यंत
अगं...
विचार का करतेस एवढा ?
मी आहे ना तुझ्यासोबत...
ऐरवी मी कडकडायला सुरवात केली की तु बरसायला सुरवात करतेस...
आज मी नागपूरातून कडकडतोय
तु नाशिक मधून बरसायला  सुरवात कर...
फार विचार करू नकोस
देव-इंद्र, नर-इंद्र तुला आणि मलाही पुजतील
फक्त विश्वास ठेव माझ्या कडाडण्यावर
आणि तुझ्या बरसण्यावर...
अगदी तसाच...
जसा तू पुण्याच्या शनिवारवाड्यावर बरसली होतीस
आणि मी पेशवाईवर कडाडलो होतो
तु गरिबीवर बरसली होतीस
आणि मी कडाडलो अस्पृश्यतेवर
सखे !
जसे...
तुझ्या माझ्या संयोगाशिवाय ईथे शक्यच नाही जलधारा बरसने व विजांचा कडकडाट होने...
तसेच...
आज तुझी माझी गरज आहे वाड्यावरचा काळा झेंडा उतरविण्यासाठी...
तू बरसणार...
आणि मी कडाडणार...
या माणसांच्या डोक्यावर-उरावर साचलेले काळे ढग मिटविण्यासाठी...
तु चल तयारीला लाग !
तोच शनिवारवाडा, पेशवाई, गरिबी, अस्पृश्यता तुला मला खुणावतेय...
छळतेय...
आता तुझ्या माझ्या मिलनाची वेळ जवळ आली...
घट्ट मिठी मारून...
मिलनकथेची आतुरता घेऊन बाहेर ये...
तुला बाहेरच दिसेल...
तु आणि मी मिळून केलेला हल्ला...
आक्रमणsssss....
असे शब्द कानावर पडतांना...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
आपलाच...
डॉ. संदीप नंदेश्वर...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रतिक्रीया जरूर द्या !

No comments:

Post a Comment