Saturday, 23 March 2019

आता लढूनच जिंकायचे...


#Once_Again_Ambedkar
आता लढूनच जिंकायचे
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
           
२०१९ च्या लोकसभेची आचारसंहिता सुरु झाली. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. राजकीय पक्षांच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. देशात पुन्हा भाजप कि कॉंग्रेस अशीच चर्चा रंगविली जात आहे. काही चर्चा विकत घेऊन चालविल्या जात आहेत तर काही चर्चा जाणीवपूर्वक द्विपक्षीय लोकशाहीकडेच देशाला ठेवण्यासाठी केल्या जात आहेत. नरेंद्र मोदी कि राहुल गांधी असे दोनच चेहरे पुढे ठेवून १३५ करोड जनतेच्या देशाला व ९० करोड मतदारांना हुकुमशहा कि घराणेशाही एवढ्याच परिघात बांधण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. फक्त २ शहाण्यांच्या देशात ९० करोड मतदारांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान रचले जात आहे. नक्कीच येणाऱ्या काळात देश कुणाच्या हातात जाणार आहे. हे लवकरच कळेल. परंतु त्या दरम्यानच्या काळात देशातला ९० करोड मतदार कुठल्या संम्मोहनाला बळी पडून स्वतःच आत्मघात करून घेईल हे निश्चित सांगता येणार नाही. नाण्याला दोन बाजू असतात तशी गत भारतीय लोकशाहीची झालेली आहे. कॉंग्रेस कि भाजप आणि आता भाजप कि कॉंग्रेस इतक्यातच देशाची लोकशाही संपत असेल तर आम्ही लोकशाहीत राहतो हे विसरलेले बरे. लोकशाही नाण्याच्या दोन बाजूसारखी चालू शकत नाही. लोकशाहीच्या नाण्याला अनेक बाजू असायला हव्यात आणि त्या सर्व बाजू थेट ९० करोड मतदारांच्या पुढे असायला हव्यात. परंतु या देशाचा मिडिया या देशातल्या लोकशाहीच्या अन्य बाजू जनतेपुढे घेऊन जायला तयार नाही. अश्या विपरीत परिस्थितीत २०१९ ची निवडणूक होत आहे. तेव्हा आपण लोकशाही नाण्याच्या तिसऱ्या बाजूने जाऊन या निवडणुकीकडे बघण्याची मानसिकता ९० करोड मतदारांपर्यंत पोहोचवायची आहे.

आज देश द्विपक्षीय राजकारणात अडकू पाहतो आहे. मक्तेदारीच्या राजकारणात विसावतो आहे. परंतु याच राजकारणात बळी जातोय तो म्हणजे या देशाचा सामान्य नागरिक व मतदार जो लोकशाहीत आपली जीवनमूल्ये व सुरक्षितता शोधतो आहे. या सामान्य नागरिकांच्या व मतदारांच्या मनात भीती घालून देण्यात आली आहे कि, घराणेशाहीकडे गेला नाहीत तर हुकुमशहा निवडून येतो व हुकुमशहा कडे गेला नाहीत तर घराणेशाही निवडून येते. दोन्हींचे रंग सारखेच. दोन्हींचा व्यवहार सारखाच. सामान्य नागरिकांची व जनतेची गळचेपी दोन्हींकडे ठरलेलीच आहे. परंतु हुकुमशहा व घराणेशाही दोन्ही नाकारून इथला सामान्य नागरिक व मतदार जो लोकशाहीत आपली जीवनमूल्ये व सुरक्षितता शोधतो त्या माणसाला तिसरा कुठला पर्याय उपलब्ध आहे किंवा निर्माण झाला आहे याची जाणीवही होऊ दिली जात नाही. माध्यमांना तर त्यासाठी मोठी रसदही पोहचली असेल यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे या काळात जाहिरातीतून, माध्यमांतून जे काही पेरले जाईल त्यात महाराष्ट्रात निर्माण झालेला व आज महाराष्ट्राच्या जनमानसात पोहोचलेला वंचित बहुजन आघाडीचा झंजावात कुठेही दिसणार नाही. जनमत चाचण्यात त्याचा उल्लेख केला जाणार नाही. जिंकण्याच्या शर्यतीतून लढाईच्या आधीच आम्हाला बाद ठरविले जाईल. याची जाणीव ठेवून वंचित बहुजन समाजाने पुढच्या निवडणूक काळाला सामोरे जायचे आहे.

 आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने निर्णायक आघाडी घेतलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत भाजप व कॉंग्रेस ला मागे टाकून जनमानसात घट्ट स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राची निर्णायक मते वंचित बहुजन आघाडीकडे येऊन भाजप - कॉंग्रेस ला मात खावी लागणार आहे. हे चित्र डोळ्यापुढे ठेवून जाणीवपूर्वक समाजात संभ्रम पसरविला जात आहे. तो एक सत्ताधाऱ्यांच्या कटाचा एक भाग आहे. त्यात प्रामुख्याने १) वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवावी. २) वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा भाजप - शिवसेनेला होईल. ३) वंचित बहुजन आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजप-सेनेला होईल. ४) वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लाखोंची गर्दी होते परंतु त्याचे मतात रुपांतर होणार नाही. ५) भाजपला परत सत्तेवर येऊ द्यायचे नसेल तर वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत समझोता करून / आघाडी करून निवडणूक लढवावी. अशा प्रकारची मानसिकता आज समाजात वायरल केली जात आहे. ज्याला सुशिक्षित माणसांपासून ते अडाणी माणसांपर्यंत सर्वच बळी पडत आहेत. अश्या अवस्थेत जिंकण्याची उम्मीद हरवून बसलेला समाज लढाईत उतरत नाही. आणि लढाईत उतरायचे असेल तर जिंकण्याची मानसिकता बाळगल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हाच आम्ही लढू शकतो व जिंकूही शकतो. न लढताच हरण्याच्या मानसिकतेतून आम्ही जात असू तर लढाईत उतरायचेच कशाला ? हे साधे सूत्र आज वंचितांना त्यांच्या राजकारणात वापरायचे आहे. असे असले तरी आम्हाला प्रस्थापितांनी समाजात निर्माण केलेल्या या संभ्रमाला उत्तर द्यावे लागेल व समाजाचा संभ्रम दूर करावा लागेल.

पहिला संभ्रम असा पसरविला जातो कि वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवावी. वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडीत सहभागी होऊन निवडणूक का लढवावी ? असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर कुणाकडेही सापडत नाही. जे काही उत्तरे येतात ते असेच कि भाजप ला थांबवायचे असेल तर आपण कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करून भाजप ला हरविले पाहिजे. म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी ला फक्त जिंकविण्यासाठी आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करायची का ? वंचित समूहाची आजची बांधलेली मोट ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी ला जिंकविण्यासाठी आहे कि वंचित समूहाचे हिरावले गेलेले अधिकार परत मिळविण्यासाठी आहे ? मग वंचित बहुजन समाजाचे अधिकार मिळवून देण्यासाठी निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी व त्यासाठी एकत्र आलेला अठरापगड जात समूह हा स्वाभिमानाने आपल्या अधिकारासाठी का लढू नये. कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करून गेल्याने वंचित समूहाचा काहीच लाभ होणार नसेल तर आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी आघाडीच्या नादात न पडता स्वतंत्र राजकीय मोट निर्माण केल्यास त्याचा वंचित समुहालाच लाभ होणारा आहे. परंतु जाणीवपूर्वक कॉंग्रेस-राष्ट्रवादी ला लाभ व्हावा व त्यांच्याच हातात परत सत्ता जावी म्हणून आज एकत्र आलेल्या वंचित समूहात संभ्रम तयार केला जात आहे. या संभ्रमाला फेकून देऊन आम्ही आमची वंचित बहुजन आघाडीची वाटचाल केली पाहिजे.

दुसरा संभ्रम असा पसरविला जातो कि, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर त्याचा फायदा भाजप - शिवसेनेला होईल. कसा फायदा होईल असा प्रतिप्रश्न केला तर त्याचेही उत्तर नाही. एक उत्तर थातुरमातुर दिले जाते ते असे कि, आम्ही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. व वंचित बहुजन आघाडी ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचेच मते कमी करेल व त्यामुळे भाजप-सेना निवडून येईल. राजकीय अभ्यासाच्या दृष्टीने हे उत्तर निरर्थकच नाही तर तकलादू सुद्धा आहे. आज वंचित बहुजन आघाडीची घट्ट झालेली सामाजिक समूहांची ताकत फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादी मधूनच आलेली नाही तर भाजप-सेनेला फाट्यावर मारून त्यांना सोडून देखील आलेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हि फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचीच मते कमी करीत नाही तर भाजप-सेनेची मते सुद्धा कमी करीत आहे. याचे सविस्तर उत्तर मी माझ्या मागच्या लेखात दिलेले आहे. आज देशातल्या व राज्यातल्या परंपरागत युती व आघाडीला फोडून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात उभी झालेली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कुणाचे नुकसान व कुणाचा फायदा वगैरे करणार नसून दोन्ही परंपरागत युती-आघाडीला धोबीपछाड देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात आपला स्वतंत्र झेंडा रोवणार आहे. त्यामुळे या संभ्रमातून बाहेर पडावे.

तिसरा संभ्रम असा पसरविला जातो कि, वंचित बहुजन आघाडीमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ भाजप-सेनेला होईल. आता हा लाभ फक्त भाजप-सेनेलाच कसा होईल याचे उत्तर देतांना काही म्हणतात कि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होईल. असे उत्तर देणाऱ्यांना मला वाटते कि राजकारणाची बाराखडी माहित नसावी. धर्मनिरपेक्ष मते कुठली ? हे निश्चित असे कुणीच सांगू शकत नाही. तसेच कुणी असाही दावा करू शकत नाही कि धर्मनिरपेक्ष मते भाजप-सेनेला पडत नाही. मुळात वंचित बहुजन आघाडीमुळे धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण वंचित बहुजन आघाडीत झालेले आहे. इथला दलित, आदिवासी, मुस्लीम आणि मागासवर्गीय समूहातला वंचित घटक आज वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाला आहे. व त्याचा प्रत्यय वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रात झालेल्या सभांमधून आलेला आहे. असे असतांना आज भाजप-सेनेकडे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडे जो उरला आहे तो इथला प्रतिगामीच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी किती धर्मनिरपेक्ष आहे याचा प्रत्यय त्यांच्या सत्ताकाळात डोकावून पाहिल्यास नक्कीच कळेल. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष मतांचे एकत्रीकरण कुठे झाले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीत मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात झालेले आहे. तेव्हा धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आज मतांची विभागणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व वंचित बहुजन आघाडी यांच्यात होऊन भाजप-सेनेची मते शाबूत आहेत असे कुणी म्हणत असेल तर माझ्या दृष्टीने तो एक तर मूर्ख असेल किंवा राजकीय नर्सरीत वावरणारा बाळ तरी असेल. आज खरी मतांची विभागणी भाजप-सेना युती व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात होत आहे. व त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे. हे आपण सर्व धर्मनिरपेक्ष मतदारांनी व वंचित समूहातील सदस्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तेव्हाच हा पेरला गेलेला संभ्रम दूर होईल.

चौथा संभ्रम असा पसरविला जातो कि, वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लाखोंची गर्दी होते परंतु त्याचे मतात रुपांतर होणार नाही. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती ही कि, महाराष्ट्रात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा प्रचार आणि प्रसार खूप झाला होता असे नाही. किंवा या सभांवर खूप खर्च केला गेला असेही नाही. गाड्या भरून रोजंदारीवर माणसे सभेला आणली गेली असेही नाही. मग तरी सभांची मैदाने लाखोंच्या गर्दीने भरून अपुरी का पडली ? तर याचे थेट उत्तर आहे कि आज वंचित बहुजन आघाडी ही एक फक्त राजकीय लढाई पुरती मर्यादित राहिलेली नसून वंचित बहुजन आघाडीने आज जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. व ज्या जनआंदोलनात माणसे, समाज, समूह स्वयंस्फूर्तीने एकत्र व्हायला लागतात ते जनआंदोलन आपले इप्सित ध्येय सध्या केल्याशिवाय थांबत नाही असा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या या जनआंदोलनाला आता कुणीही रोखू शकणार नाही. या गर्दीचे रुपांतर दुपटीने मतदानात होणार आहे. कारण आजचा वंचित समूह त्याचे अधिकार मिळविण्यासाठी ध्येयाने झपाटलेला आहे. व प्रस्थापित भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी च्या राजकारणाला कंटाळून पेटून उठला आहे. मतपेट्यामधून ते लवकरच दिसून येईल.

तसेच पाचवा संभ्रम असा आहे कि, भाजपला परत सत्तेवर येऊ द्यायचे नसेल तर वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत समझोता करून / आघाडी करून निवडणूक लढवावी. वंचित बहुजन आघाडीचा उद्देश फक्त आणि फक्त भाजप ला सत्तेवरून खाली खेचणे एवढाच नसून तो फक्त एक उद्देश आहे. परंतु वंचितांचे राजकीय सह्भागीत्व वाढवून त्यांचे हिरावले गेलेले अधिकार परत मिळवून देणे हा देखील एक उद्देश आहे. नेहमीच भाजप सत्तेवर येण्याची भीती दाखवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने वंचित समूहाला आपला राजकीय सालगडी बनवून ठेवले. व अश्याप्रकारचा संभ्रम तयार करून वंचित समूहाच्या मतदानाच्या बळावर सत्ता उपभोगली आहे. परंतु त्यांच्या या संभ्रम पसरविणाऱ्या दुष्प्रचाराला बळी पडून आपलाही माणूस कॉंग्रेस च्या दिशेने जातांना पाहून वेदनाच नाही तर आंतरिक चीढ निर्माण होते. जे जे असे म्हणतात कि भाजप सत्तेवर येऊ नये म्हणून कॉंग्रेस सोबत आम्ही जायला पाहिजे त्या त्या सर्व महाभागांना माझा एकच प्रश्न आहे कि मग अश्या अवस्थेत जिथे भाजप ला सत्तेपासून थांबविण्यासाठी आपल्याला कॉंग्रेस सोबत जावे लागते तेव्हा आपण निवडणुका न लढलेल्याच बरे नाही का ? आपण निवडणुकच लढू नये व कॉंग्रेस ला समर्थन जाहीर करून टाकावे ? “गळा कापला आणि खोकला गेला.” या म्हणीप्रमाणे कायमचे कॉंग्रेस चे मांडलिकत्व पत्करून घेऊन वंचित बहुजनांच्या स्वतंत्र राजकारणाला तिलांजली देऊन राजकीय श्रद्धांजली चा कार्यक्रम घेऊन राजकीय सन्यास घेण्यास काय हरकत आहे ? मिळेल का या प्रश्नाचे उत्तर आपल्याला. नक्कीच मिळणार नाही. हे सर्व सुडो राजकारण्यांचा प्रकार आहे. ज्यांना स्वतंत्र राजकारणाच्या ऐवजी पोटभरू मांडलिकत्वाचे राजकारण प्रिय आहे अश्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला प्रचार आहे हे आपण लक्षात घेऊन समाजात त्या संदर्भाने जागरूकता निर्माण करावी.

आज महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या परंपरागत युती-आघाडीला छेद देऊन स्वतंत्र, मजबूत, व स्वाभिमानी वंचित बहुजनांचे राजकारण उभे करीत आहे. त्यात AIMIM च्या असौउद्दिन ओवेसी यांची मजबूत साथ मिळाल्याने मुस्लीम समुदाय वंचित बहुजनांच्या सोबत आलेला आहे. मागच्या ७० वर्षात कधीच एका नेतृत्वात एकत्र न आलेला आंबेडकरी समूह आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ९० % टक्के एकत्र होऊन वंचित बहुजन आघाडीत वंचित बहुजन व मुस्लीम समुदाय यांच्यात सहभागी झालेला आहे. म्हणजेच आज वंचित बहुजन आघाडीत एकत्र आलेला समूह यापूर्वी असा कधी एकत्र आलेला नव्हताच. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आपल्या जिंकण्यासाठी लागणाऱ्या निर्णायक मतदानाकडे वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे भाजप-सेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या कडील मतदार फुटून वंचित बहुजन आघाडीत आल्याने दोन्ही युती-आघाड्यांचे निर्णायक मतदान कमी झालेले आहे. म्हणजेच आज महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील थेट लढाई ही वंचित बहुजन आघाडी विरुद्ध भाजप-सेना युती, किंवा वंचित बहुजन आघाडी विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशीच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन समूहाला आव्हान आहे कि, प्रस्थापितांनी व विकाऊ मिडीयाने पेरलेल्या संभ्रमातून बाहेर पडून आज वंचित बहुजन आघाडीने घेतलेली निर्णायक आघाडी आणखी वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून वंचित बहुजन आघाडीच्या जिंकण्याचा रेशो हा आणखी वाढेल व वंचितांचे कायम खच्चीकरण करणाऱ्या भाजप-सेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र निर्माण होईल. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने जबाबदारी घेऊन काम करावे. येणाऱ्या काळात अनेक संभ्रम वंचित बहुजन आघाडीत सहभागी झालेल्या समूहात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्या प्रयत्नांना हाणून पाडून सत्तेच्या दिशेने वंचित बहुजन आघाडीने टाकलेले पाऊल सत्ता स्थापन करेपर्यंत थांबू द्यायचे नाही. व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. असा प्रण घेऊन वंचीतांनो कामाला लागा. उद्या महाराष्ट्राची सत्ता तुमची आहे. हा विश्वास मी तुम्हाला देतो. हे कायम आपल्या काळजावर कोरून ठेवा.

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


No comments:

Post a Comment