Tuesday 5 March 2019

२०१९ चा रणसंग्राम : परिवर्तनाच्या महाराष्ट्र भूमीत वंचित बहुजन आघाडीच्या नव्या परिवर्तनाची सुरवात


#Once_Again_Ambedkar
२०१९ चा रणसंग्राम :
परिवर्तनाच्या महाराष्ट्र भूमीत वंचित बहुजन आघाडीच्या नव्या परिवर्तनाची सुरवात
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

२०१९ च्या निवडणुका अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरलेल्या आहेत. मागच्या ५ वर्षाचा काळात देशातील मानवनिर्मित अमानवतावादी संघटनेने (आरएसएस) सत्तेच्या माध्यमातून निर्माण केलेली परिस्थिती इतकी भयावह होती की त्यामुळे देशातला तमाम नागरिक ढवळून निघाला. सत्तेच्या विरोधात रोष व्यक्त करू लागला. छळ सहन करून सत्तेच्या नावाने भंडारा फोडू लागला. फसले गेल्याची जाणीव त्याला होऊ लागली. जातीय अन्याय २१ व्या शतकातही होऊ शकतो अशी न केलेली कल्पनाही त्याच्या प्रत्यक्ष निदर्शनास येऊ लागली. धार्मिक असुरक्षितता बळावत गेली. एकंदरीतच फसव्या व गोलमाल नीतीच्या माध्यमातून सत्तेने सामान्य माणसाचे सामाजिक व सांस्कृतिक नुकसान केलेच पण ही सत्ता तिथेच थांबली नाही तर देशातील नागरिकांचे आर्थिक नुकसानही या सत्तेने केले. माणसांचे दैनंदिन जीवन प्रभावित होईपर्यंत या सत्तेने मजल गाठली. इतकेच नव्हे तर माणसांच्या जैविकतेवर या सत्तेने हल्ले केलेत. मॉब लिन्चींग चा प्रकार देशाने पहिल्यांदा मागच्या ५ वर्षात अनुभवला. सत्तेला इतके अपयश आले असतांना व देशातील जनता विरोधात जातांना पाहून भूलभुलय्याचा खेळ याच सत्तेने केला. याच सत्तेने आपल्या बाजूने जनभावना निर्माण करण्यासाठी म्हणून; अनेकांच्या प्राणांची आहुती दिली. माणसांना मारणारी सत्ता जगात एकमेवाद्वितीय सत्ता म्हणून संपूर्ण जगाने पहिली. कुठे दबक्या आवाजात तर कुठे प्रत्यक्षात सत्तेच्या विरोधात आवाज उचलला गेला. परंतु जेव्हा जेव्हा सत्तेच्या विरोधात आवाज उचलला गेला तो जोरकसपणे सत्तेने साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तो आवाजच चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सहजच परत ही माणसे नकोत. परत ही सत्ता आम्हाला नको. परत ही परिस्थिती नको. असा मतप्रवाह आज संपूर्ण देशात बनू लागला आहे. आणि हा मतप्रवाह स्वतःहून पुढील निवडणुकांच्या सुत्रसंचालनासाठी सज्ज झाला आहे.

२०१९ च्या निवडणुका ह्या सत्ताधारी व सत्ताभोगी विरुद्ध जनता अश्या थेट लढल्या जाणार आहेत. सत्तेने पिळला गेलेला, छळला गेलेला वंचित समूह आज त्या सत्ताधारी विरोधक जनतेचे नेतृत्व करीत आहे. आणि आज ही सुरवात महाराष्ट्रातून झालेली आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ६५ वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केले त्या कॉंग्रेस ला असो; की फक्त ५ वर्षाच्या सत्ताकाळातच देशातला सामन्यातला सामान्य माणूस ज्या सत्तेने त्रस्त झाला त्या भाजप ला असो; परत सत्तेवर येऊ द्यायचे नाही. असा मतप्रवाह देशात निर्माण होऊ लागला आहे. देशात राष्ट्रीय स्तरावरही कॉंग्रेस आणि भाजप मुक्त सरकार निर्माण होऊ शकते. जनतेने ठरविले तर या सत्ताधारी वर्गाला चढलेला सत्तेचा माज उतरविला जाऊ शकतो असा विश्वास आज देशात निर्माण होत आहे. या विश्वासाला जनतेत निर्माण करण्यात महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाचा खारीचा वाटा आहे. जो संदेश आज संपूर्ण देशभर वाऱ्यासमान पसरत चाललेला आहे. देशातच नव्हे तर जगात जिथे जिथे वंचित समूहातील प्रतिनिधी वास्तव्याला आहेत त्या प्रत्येक ठिकाणी या परिवर्तनाच्या लाटा निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात निर्माण झालेले वंचित बहुजन आघाडी नावाचे वादळ इतक्या वेगाने सत्तावंचितांना सोबत घेऊन सत्तेच्या दिशेने आगेकूच करीत आहे कि ज्यामुळे राजकीय धुरंधरापासून ते राजकारणाचे परीवारीकरण करणाऱ्या राज्यकर्त्यांपर्यंत सारेच अचंभित होऊ लागले आहेत.

वंचित बहुजन आघाडीने सामान्य माणसात सत्तेची स्वप्न रंगविली आहेत. सत्तावंचित समाजाला सत्तेचा मार्ग दाखविला आहे. सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी आजपर्यंत दिसणारी कॉंग्रेस-भाजप या दोन रस्त्याऐवजी सत्तेकडे जाणारा एक नवा रस्ता पण निर्माण केला जाऊ शकतो हा विश्वास आज त्यांच्यात दृढ होत चाललेला आहे. कायम ज्या सत्ताधाऱ्यांनी भितीदायक चित्र रंगविले त्या साऱ्याच चित्रांना काळे फासून वंचितांचे हे वादळ राजकीय मैदानात उतरले आहेत. या वादळाला क्षमविण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आखल्या जात आहेत. हे अपेक्षितही आहे. कारण कुठलाच सत्ताधारी स्वतःच्या राजकीय अंतविधीचे चित्र वा चित्रीकरण स्वतः पाहण्यास इच्छुक नसतो. त्यामुळे त्याच्यासमोर निर्माण झालेला स्पर्धक स्पर्धेतून बाद करण्यासाठी तो सातत्याने धडपडत असतो. आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात निर्माण केलेल्या स्पर्धेमुळे नवा स्पर्धक तयार होऊ पाहतो हेच मुळी इथल्या सत्ताधाऱ्यांना नको आहे. असेच एकंदरीत चित्र दिसत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा याला फायदा व त्याला तोटा अशाप्रकारे फायदा तोट्याचे गणित मांडली जात आहेत. यामागे उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे जनतेमध्ये संभ्रम पसरविणे.

वंचित बहुजन आघाडीच्या नव्या राजकीय प्रयोगाने आज चर्चा अशीही रंगली जाते कि वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस मागे पडेल व भाजप ला त्याचा फायदा होईल. तर काही चर्चा अश्याही रंगल्या आहेत कि वंचित बहुजन आघाडीमुळे कॉंग्रेस ला नुकसान होईल. त्या सर्व चर्चांना थांबविण्यासाठी एकच उत्तर पुरेसे ठरेल असे वाटते, ते म्हणजे फायदा किंवा नुकसान अशी चर्चा करण्यासाठी राजकारण हा काही व्यवसाय/धंदा नव्हे. इथे कुठल्या राजकीय पक्षाच्या फायदा किंवा नुकसानीचा प्रश्न नाही तर इथे सत्तेपासून वंचित असलेल्या समूहाला, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी भारतीय संविधानाने दिलेल्या संरक्षणातून इथल्या सत्ताधारी पक्षांनी आजपर्यंत काही केले आहे का ? त्यातून या समाजाचा काही फायदा झालेला आहे का ? झाला नसेल तर त्या समाजाचा उद्धार करण्यासाठी, झालेले नुकसान भरून काढण्यासाठी, व संपूर्ण समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय बनू पाहतो आहे. हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे.

इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे कि, आज वंचित बहुजन आघाडी सोबत जुळलेला, एकत्र आलेला समूह समूह हा नेमका परंपरागत मतदार कुणाचा होता ? किंवा परिस्थितीनुरूप या समूहाने कुणाला मतदान केले ? याचा भूतकालीन आढावा घेतल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकांमध्ये कुणाचा फायदा करेल व कुणाचे नुकसान करेल कि स्वतःहा काहीतरी करून दाखवेल हे लक्षात येणार नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये समाविष्ठ झालेल्या काही मुख्यतः २ समूहाचा आपण अभ्यास केला तर दलित आणि मुस्लीम हा समूह कायम कॉंग्रेस चा परंपरागत मतदार राहिलेला आहे असा सर्वमान्य समज आहे. १९९० च्या दशकापर्यंत कॉंग्रेसच्या सोबत राहिलेला दलित आणि मुस्लीम समूह त्यानंतर हळूहळू कॉंग्रेस पासून दूर गेला आहे. मग तो प्रादेशिक पक्षाचा मतदार झाला किंवा अन्य पक्षाचा मतदार झाला. तरीही साधारणतः ५० टक्के दलित मुस्लीम मतदार हा कॉंग्रेस चा मतदार राहिलेला आहे. व ५० टक्के हा अन्य पक्षांचा मतदार राहिलेला आहे. जो वर्तमानात वंचित बहुजन आघाडीमध्ये जवळपास ८० टक्के एकवटत चाललेला आहे. अश्या परिस्थितीत फक्त कॉंग्रेसचाच मतदार नव्हे तर अन्य प्रादेशिक पक्षांचा मतदार असलेला दलित – मुस्लीम समूह आज त्या सर्वच पक्षांना नुकसान करीत आहे.  कॉंग्रेस कडून ५० टक्के मतदार कमी होत आहे तर अन्य पक्षातून ३० टक्के दलित – मुस्लीम मतदार कमी होत आहे. आज हा मतदार बाळासाहेब आंबेडकर आणि असुउद्दिन ओवेसी याच्या नेतृत्वात संघटीत होऊन नव्या राजकीय प्रवाहाला जन्म देत आहे.

दुसरीकडे आपण हेही लक्षात घेऊ कि, वंचित बहुजन आघाडीत समाविष्ट झालेला अन्य वंचित समूह मग तो धनगर असेल, माळी असेल, ढीवर असेल, नाव्ही, लोहार, सुतार, होलार, शिंपी हा ओ.बी.सी. मधील लहान समूह त्यासोबतच आदिवासी, भटका-विमुक्त हा समूह १९९९ पासून कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात समप्रमाणात वाटला गेला होता. २०१४ च्या निवडणुकीत या समूहातील जवळपास ७५ टक्के मतदारांनी मोदीच्या फसव्या विकासलाटेत स्वार होऊन भाजप ला मतदान केले होते. आज या समूहातील जवळपास ५० ते ६० टक्के समूह हा वंचित बहुजन आघाडीत एकत्र झाला आहे. म्हणजेच या समूहातील मतदार हा २०१४ च्या तुलनेत भाजप ला ५० टक्के तर कॉंग्रेस ला जवळपास १० टक्के नुकसान करून वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात आपले मतदान टाकायला निघालेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पारड्यात जवळपास ९० टक्के जाणारा मराठा समूह मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मुद्द्यांवर, घराणेशाहीच्या राजकारणावरून आज राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून बाहेर पडून ४० टक्के च्या आसपास वंचित बहुजन आघाडीकडे वळत चाललेला आहे. तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरी भागात शिवसेना सारख्या पक्षांचा मतदार असलेला दलित, कोळी, आग्री हा समूह आज शिवसेनेतून जवळपास ६० ते ७० टक्के बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीकडे एकवटत चाललेला आहे. ज्याचा अर्थ असा होतो कि वंचित बहुजन आघाडीकडे शिवसेनेचा मतदार देखील वळत चाललेला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडे आज संपूर्ण महाराष्ट्र एक नवा पर्याय म्हणून पाहत आहे. हेच वरील विवेचनावरून सिद्ध होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात कॉंग्रेस ला नुकसान व भाजप ला फायदा असे काहीही करणार नसून वंचित बहुजन आघाडी कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या सर्वच प्रमुख पक्षांच्या मतदारांची मते घेऊन सर्वच प्रस्थापित पक्षांना नुकसान करणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडी जर सर्वच पक्षांकडून त्यांचे मतदार आपल्याकडे आकर्षित करीत असेल तर या महाराष्ट्रातले हे चारही प्रमुख पक्ष माघारी पडून २०१९ ला या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी शिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रथापित पक्षाची सरकार निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच वंचित बहुजन आघाडी २०१९ च्या महाराष्ट्राच्या सत्तेची प्रमुख दावेदार असल्याचे यावरून सिद्ध होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर परोक्ष-अपरोक्ष टीका करणाऱ्या प्रस्थापितांनी हे लक्षात घ्यावे कि महाराष्ट्रातला वंचित समूह आता जागृत होऊन सत्तेच्या दिशेने आगेकूच करण्यास सरसावला आहे व प्रस्थापितांची माती करून आपल्या वंचिततेचा पै पै हिशोब प्रस्थापितांकडून घेणार आहे.

एकंदर परिवर्तनवादी महाराष्ट्राच्या भूमीत एका नव्या परिवर्तनाला सुरवात झालेली आहे. हे परिवर्तन संपूर्ण देशात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचे सत्तेचे स्वप्न धुळीत मिळवून देशात एक नवा राजकीय अध्याय निर्माण करू शकते याची पुरेपूर जाणीव इथल्या सत्ताधाऱ्यांना झाल्यामुळे राजकीय अज्ञानापोटी समाजासमोर संभ्रम पसरविला जात आहे. वंचित समूहाची जबाबदारी आहे कि अशा कुठल्याही संभ्रमाला बळी न पडता निर्भयतेने समाजाची वंचितता संपविण्यासाठी उचललेल्या पाऊलावर चालत राहावे. वंचित समूहातील जो जो व्यक्ती अजूनही स्वतःच्या लढ्यात सहभागी झालेला नाही त्या प्रत्येक व्यक्तीला या लढ्यात सहभागी करून घेण्याचे सातत्याने प्रयत्न करावेत. वंचित समूह फक्त काही टक्केच नव्हे तर १०० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तेव्हा इथले प्रस्थापित राजकीय पक्ष २ अंकी संख्या सुद्धा गाठू शकणार नाही आणि स्वबळावर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची सत्ता निर्माण होऊ शकेल.

आज काहींना भाजप सारख्या मनुवादी पक्षाला सत्तेपासून दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस सोबत एकत्र येऊन लढावे असे वाटते. याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला होईल कि नाही याची खात्री नाही. मात्र याचा फायदा कॉंग्रेस ला १०० टक्के होईल व कॉंग्रेस पासून दुरावत चाललेला दलित-मुस्लीम हा परंपरागत मतदार कायम टिकून राहील. सोबतच वंचित समूहातील मतदार देखील कॉंग्रेसच्या दावणीला बांधला जाईल. त्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी ही भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे मतदार आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी झाली आहे तर अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाने हेच या येऊ घातलेल्या नव्या राजकीय परिवर्तनची नांदी ठरेल. आणि तेच वंचितांच्या लढ्याचा नवा अध्याय बनून वंचितांना न्याय मिळवून देण्यात सक्षम ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील वंचितांची वंचितता संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रस्थापितांनी त्याच वंचितांचा राजकीय लाभ घेऊन वंचितांना त्यांचे संविधानिक अधिकार मिळू दिले नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्च्यात बाळासाहेब आंबेडकर हे त्याच वंचितांचे नेतृत्व करून परत इथल्या वंचित समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रस्थापितांच्या हातात एकवटलेली सत्ता वंचितांच्या हातात मिळवून देण्यासाठी पुढे आले आहेत. तेव्हा वंचीतांनो, साथ द्या. चला उठा, कामाला लागा. परिवर्तनाच्या महाराष्ट्र भूमीत वंचित बहुजन आघाडीच्या नव्या परिवर्तनाची सुरवात तुमच्या नेतृत्वात करण्यासाठी सज्ज व्हा. एका नव्या महाराष्ट्राच्या निर्मितीला सज्ज व्हा.

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


No comments:

Post a Comment