Tuesday 5 March 2019

आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट.


#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

स्वजातीय, स्वपंथीय चळवळ सत्तेपर्यंत जाऊ शकत नाही. एकजूट, एकसंघता, खंबीर नेतृत्व व नैसर्गिक मित्रांची साथ या आधारशिलेवरच आम्हाला सत्तेची सुत्र मांडता येतील. समाजाचा सौदा करून मिळालेली सत्ता अल्पकालीन असतेच पण अल्पसमाधानी व समाजाच्या विनाशाकडे वाटचाल करणारी ठरते. मा. प्रकाश आंबेडकर या चक्रव्युहातून बाहेर पडून चळवळ उभारीत आहेत. त्याचे स्वागत झाले पाहीजे. अगदी दोन्ही बाजूने. आंबेडकरी चळवळीच्या बाजूने व नैसर्गिक मित्रांच्याही बाजूने.

चळवळीत प्रत्येकाचे योगदान कालसापेक्ष असते. त्या योगदानाला कालातिथ बनविता येणार नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य ती टेस्ट चळवळीला घ्यावीच लागणार आहे. आंबेडकरी चळवळीची शक्ले पाडणारी संपण्याच्या मार्गावर आहेत. शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांना पुन्हा जिवंत करायचे की नव्याने चळवळीत येणाऱ्यांना (नविन पक्ष, संघटना नाही.) चळवळीत सक्रीय करून त्यांना भविष्यासाठी तयार करायचे हा महत्वाचा प्रश्न आपल्यापुढे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, पहिले उदाहरण असे की, एका घरात म्हातारा व तरूण दोघेही आहेत. दोघांनाही दुर्धर आजाराने ग्रासले आहे. दोघेही मरणासंन्न अवस्थेत पोहचलेत. परिवाराकडे या दोघांच्याही इलाजासाठी साधने मर्यादीत आहेत. इतके मर्यादीत की दोघांपैकी कुणी तरी एकालाच ते वाचवू शकतात. किंवा त्याच्यावर खर्च करू शकतात. म्हातारा परिवाराला आणखी ५ वर्ष सेवा देऊ शकतो. तर तरूण कुटूंबाला पुढील ५० वर्षे सेवा देऊन सांभाळ करू शकतो. अशा परिस्थितीत कुटूंबाने किंवा कुटूंब प्रमुखाने कुणावर खर्च करायचा. म्हाताऱ्यावर कि तरूणावर ? याचे व्यावहारीत उत्तर हा नक्कीच तरूण असेल. आणि दुसरे उदाहरण असे की, आपण एक गोष्ट नेहमी ऐकली असेल. "नदीला पुर असतो. बंदर व त्याच्या पिलाला तो पुर पार करून पलिकडे जायचे असते. पुराचे पाणी कमी असते तोपर्यंत बंदर (माकड) आपल्या पिलाला खांद्यावर घेऊन चालत असते. परंतु पाण्याची पातळी वाढून माकड बुडायला लागते हे पाहून बंदर आपल्या पिलाला खांद्यावरून खाली खेचते. आणि आपल्याच पिलाला पाण्याखाली ठेऊन त्याच्या डोक्यावर उभे राहून स्वतःचे प्राण वाचविते." आंबेडकरी चळवळीतही काहींनी ही माकडचेष्टा केलेली आहे. समाजाला खाईत लोटून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला या माकडांचे पिल्ले व्हायचे आहे का ? की समाजाने सदैव दुर्लक्ष केले असतांनाही, स्वतःला धोक्यात टाकून, सिद्ध करून, चळवळीला प्राधान्य देऊन, ज्या आंबेडकरांनी व आंबेडकरवाद्यांनी समाजाला व चळवळीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वात तुम्हाला या चळवळीचे भविष्यातील शिलेदार व्हायचे आहे ? याचेही उत्तर आम्हाला शोधावे लागणार आहे.

निवडणूक प्रचारसभेतून आम्ही जोपर्यंत समाजाला वर्तमान व भविष्याची स्वप्ने दिले जात नाही तोपर्यंत निवडणूका जिंकता येणार नाही किंवा उमेदवार निवडूणही आणता येणार नाही. बाबासाहेब वाचून वा सांगून निवडणुका जिंकता येत नाही. समाजाला, कार्यकर्त्यांना राजकीय प्रशिक्षित केल्याशिवाय अपेक्षीत राजकीय यश प्राप्त करता येणार नाही. आंबेडकरी समाज व कार्यकर्ते राजकीय दृष्ट्या अडाणी आहेत हे सत्य पचवायला शिका. आपला उमेदवार किंवा आपण निवडूण येवो अथवा न येवो परंतु आपण आपले मतदान विकू नये हा शहाणपणा जोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये येत नाही तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकत नाही किंवा उमेदवार निवडूणही आणू शकत नाही. पैसे घेऊन मतदान करणाऱ्या सामान्य दलितांपासून ते विहार, स्मारकांच्या नादी लागून प्रस्तापीत पक्षांच्या व सत्ताधाऱ्यांच्या नादी लागलेल्या स्मारकप्रिय कार्यकर्त्यांकडून; थेट "दगडापेक्षा विट मऊ" म्हणून कॉग्रेस, भाजप च्या गळाला लागलेल्या उच्चशिक्षित नोकरदारांच्या कैचीतून आंबेडकरी चळवळीला बाहेर काढल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाही किंवा आपले उमेदवार निवडूण आणता येणार नाही. गावभर चळवळीच्या, बाबासाहेबांच्या चर्चा करीत फिरणाऱ्या व निवडणुकीत मतदान करतांना बिगर आंबेडकरी पक्षांना मतदान करणाऱ्यांना कधी तरी सद्यस्थितीतील आंबेडकरी राजकारण व चळवळीसमोरील आव्हाणे यावर चर्चा करून एक नेतृत्व, एक पक्ष, एक उमेदवार व समाजाची एकगठ्ठा मतदान एकाच पक्षाच्या पाठीशी अशी राजकीय चर्चा करता आली तर निवडणुका जिंकता येतील व उमेदवारही निवडूण आणता येतील. निवडणुकीत आपण उमेदवाराला मतदान करीत नसून, तो ज्या पक्षाच्या तिकीटावर ऩिवडणुक लढवितो; त्या पक्षाच्या विचारधारेला मतदान करीत असतो. सत्तेवर कोणती विचारधारा यावी यासाठी केले गेलेले ते मतदान असते. पक्षाला मिळालेले मतदान म्हणजे त्या पक्षाच्या विचारधारेला मिळालेले मतदान असते. हे जोपर्यंत आम्ही लक्षात घेणार नाही, एवढा शहाणपणा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण निवडणुका जिंकु शकणार नाही किंवा उमेदवार निवडूण आणु शकणार नाही.

आंबेडकरी जनतेने आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. शत्रु दारात येऊन रात्री-बेरात्री तुम्हाला उध्वस्त करायला टपून बसला आहे. शत्रुंच्या छावण्या तुमच्या घरावर कब्जा करून बसलेल्या असतांना आम्हाला गाफिल राहून चालणार नाही. आपसातील हेवेदावे, संघर्ष बाजूला सारून आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट आपल्यावरच वापरून एका नेतृत्वाच्या दिशानिर्देशाने मार्गक्रमण करावे लागणार आहे. तेव्हाच आंबेडकरी चळवळीची लिटमस टेस्ट यशस्वी होईल. व मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळ अखंड भारतासाठी मार्गक्रमण करू शकेल. सम्राट अशोकाचे अखंड भारताचे स्वप्न वैश्विक करण्यास राहूल कामात आला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखिल भारताचे स्वप्न पुर्ण करण्यास अॅड. प्रकाश आंबेडकर हेच योग्य ठरतील.

आज महाराष्ट्रातला तमाम बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एकवटत चाललेला आहे. पहिल्यांदा त्यांच्यात राजकीय सत्ता हस्तगत करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. आपला आजपर्यंत निवडणुकांमध्ये वापर केला गेला याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे. आजपर्यंत झालेला मतांचा वापर यापुढे होऊ द्यायचा नाही अशी प्रतिज्ञा घेऊन हा समूह २०१९ च्या निवडणुकांकडे बघतो आहे. आंबेडकरी नेतृवावर विश्वास ठेवून हा समूह मार्गस्त झालेला आहे. या समूहाचा विश्वासघात होणार नाही याची काळजी आंबेडकरी चळवळीला आणि स्वतःला आंबेडकरी म्हणणाऱ्या प्रत्येकाला घ्यायची आहे. अनेक वर्षाच्या वाटचालीनंतर आलेली ही संधी हातून निसटून जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.  प्रस्थापित पक्षांच्या हाताखाली बाहुले बनून आजपर्यंत राहिलेला समूह आता कॉंग्रेस / भाजप / राष्ट्रवादी / शिवसेना यांच्यापासून दूर जाण्यासाठी सरसावला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीने त्याला वाट मोकळी करून दिली आहे. ती वाट परत रोखली जाणार नाही याची खबरदारी आम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळीला २०१९ ला मोठी परीक्षा द्यावी लागणार आहे.

राजकीय अवसायनात सापडलेली माणसे / समूह आता बंडाचा झेंडा रोवण्यास तयार झाले आहेत. अघोषित आणीबाणी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हे मोठे कारण त्यामागे आहे. बहुजन समाज सदैव अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून अलिप्त राहिलेला आहे. कारण बहुजन वर्गाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून प्रस्थापितांना प्रश्नांकित केले कि प्रस्थापितांचे साम्राज्यच धोक्यात यायला लागते. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून व होणाऱ्या सभांमधून बहुजन समाजातील माणसे बोलायला लागली आहेत. अभिव्यक्तीचा वापर करून सत्तेला धारेवर धरीत आहेत. सामाजिक प्रश्नांना जनतेसमोर मांडून सरकारला हादरा देत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या बाहेर आजही बहुजन वर्गाची मुस्कटदाबी चाललेली आहे. कालपरवाच अभिनेते अमोल पालेकर यांना सरकारविरोधात बोलण्यापासून थांबविण्यात आले. जे जे सरकारविरोधात बोलतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या देशात चाललेला आहे. यात बहुजनांची संख्या मोठी आहे. आज हा बहुजन समूह या सरकारी दडपशाही ला कंटाळून भाजप सरकार विरोधात दंड थोपटून उभा झालेला आहे. या सर्व समूहाला आधार देऊन त्यांची वज्रमुठ बांधण्यासाठी आंबेडकरी चळवळीला झटावे लागणार आहे. लढावे लागणार आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्यात स्वतःविषयी विश्वास निर्माण करावा लागणार आहे.

आताची लढाई ही विचारधारेची लढाई आहे. जी २०१९ च्या निवडणुकीत त्याच वैचारिक आधारावर लढली जाणार आहे. ज्या लढाईचा केंद्रबिंदू आंबेडकरी विचार, संविधानिक संस्कृती, मानवतावादी परंपरा आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे असणार आहे. अश्या परिस्थितीत आंबेडकरी समूह एकसंघ होऊन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा होणे अगत्याचेच नाही तर बंधनकारक आहे. आज आलेली परिस्थिती पुन्हा भविष्यात येईल कि नाही हे निश्चित सांगता येणार नाही परंतु आज आलेली संधी घालविली तर परत ही संधी दारात पण उभी राहणार नाही. त्यामुळे आंबेडकरी समूहाने कॉंग्रेसविरहित, भाजपविरहीत विचार करायला शिकले पाहिजे. आंबेडकरी चळवळीने स्वतःच एक राजकीय पर्याय म्हणून कॉंग्रेसविरहित, भाजपविरहित मानसिकतेचे नेतृत्व केले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आज तसे नेतृत्व करतांना दिसते तेव्हा किंतुपरंतु चा विचार न करता आंबेडकरी चळवळीने वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी एकदिलाने एकसंघ होऊन कामाला लागले पाहिजे. हीच खरी आज आंबेडकरी चळवळीची लीटमस टेस्ट आहे. आंबेडकरी चळवळ यात यशस्वी होईल कि अपयशी हे येणाऱ्या निवडणुका ठरवतील. यशस्वी झालोत तर पुढच्या अनेक पिढ्यांचे यशस्वी संचालन होऊ शकेल व त्या पिढ्यांचे भविष्य सुकर होईल. अपयशी ठरलोत तर भविष्याच्या पिढ्या आजच आम्ही संपवतो आहोत हे सिद्ध होईल. तेव्हा यशस्वी व्हायचे कि अपयशी व्हायचे हे प्रत्येक आंबेडकरी माणसाला ठरवायचे आहे. आपसातले सारेच मतभेद, हेवेदावे, स्वार्थ, अपेक्षा, हित इ. बाजूला सारून काहीवेळ चळवळीच्या बाजूने उभे राहायचे आहे. जे उभे राहत नसतील त्यांना दुर्लक्षित करून, विरोध पत्करून, बाजूला सारून चळवळीची एकसंघता दाखवून द्यायची आहे.

येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी समूहाच्या स्वाभिमानाची लिटमस टेस्ट आंबेडकरी चळवळीला यशस्वी करायची आहे. ही टेस्ट चळवळीच्या दृष्टीने, नेतृत्वाच्या दृष्टीने, कार्यकर्त्यांच्या दृष्टीने, आंबेडकरी विचारवंत, नौकरदार व समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. चळवळीने ही टेस्ट पास केली तर चळवळ, नेतृत्व, विचार, समाज, समूह सारेच सिद्ध होणारे आहेत. परंतु थोडीशी चूक जरी झाली तरी ती चूक चळवळीच्या अंगलट येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ज्यामुळे भविष्यात चळवळ, नेतृत्व, विचार, समाज, समूह सारेच निरर्थक होऊन बसण्याची व उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. एक मोठा वैचारिक पराभव आमच्यातील पुढे उभे राहण्याची शक्ती हिसकावून घेण्याची शक्यता आहे. तेव्हा आंबेडकरी समूहाला जो आंबेडकरी चळवळीचा अविभाज्य अंग आहे त्या सर्व समूहाला नम्र विनंती आहे की, एकसंघतेच्या शक्तीने आम्हाला ही लिटमस टेस्ट जिंकायची आहे, यशस्वी करायची आहे. हरण्याच्या मानसिकतेतून नव्हे तर जिंकण्याच्या मानसिकतेतून ही टेस्ट द्यायची आहे. ‘मानवतेच्या शत्रूसंगे, जिंकू किंवा मरू.’ या अभिवचनाला कायमचे ध्यानात ठेवून पुढचे ६ महिने आम्हाला वाटचाल करायची आहे. पुढचा काळ कुणाचा असेल हे त्यावर अवलंबून राहील. मानवतेला जगवायचे कि अमानवीयतेला पोसायचे याचा निर्णय घेण्याचा निर्णयात्मक काळ आपल्यापुढे येणार आहे. तेव्हा आंबेडकरी चळवळीच्या शिलेदारांनो सज्ज व्हा, भविष्य घडविण्यासाठी !

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


No comments:

Post a Comment