Thursday, 11 April 2019

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची विजयाच्या दिशेने वाटचाल


#Once_Again_Ambedkar
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीची विजयाच्या दिशेने वाटचाल.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
           
२०१९ ची निवडणूक खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची निवडणूक ठरू पाहते आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. भाजप आणि कॉंग्रेस असे दोन दिग्गज पक्ष मैदानात असतांना महाराष्ट्र दोन्ही दिग्गज पक्षांना लाथाडून वंचित बहुजन आघाडीमध्ये एकत्रित होतांना पाहून अनेक राजकीय विश्लेषकांची भंबेरी उडलेली आहे. २०१४ ची मोदी लाट आणि आजची महाराष्ट्रातील वंचितांची लाट दोन्ही सारख्याच दिसतात असे अनेकांच्या तोंडून निघतांना भाजप आणि कॉंग्रेस चे शिपेसालर घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. वंचित घटकांचा, समूहाचा पक्ष व आंबेडकरी नितृत्व हे ऐतिहासिक समिकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. त्याच अर्थाने ही निवडणूक ऐतिहासिक महत्व निर्माण करणारी आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेतृत्व करणारे बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापूर आणि अकोला अशा दोन मतदार संघातून लढत देत आहेत. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दोन मतदारसंघाकडे लागलेले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांना २०१९ च्या निवडणुकीत संसदेत जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. हे आता जवळपास निश्चित झाले आहे. सोलापूरकर यांनी दाखविलेली दिलेरी, बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर दाखविलेला विश्वास, त्यांच्यासाठी राजकीय लोभांचा व पदांचा केलेला त्याग संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे. विरोधक सुद्धा आजच छातीठोकपणे बाळासाहेब आंबेडकर हे सोलापूर मधून नक्कीच निवडून येणार असे सांगत आहेत. अकोला मतदारसंघातील चित्र अद्याप महाराष्ट्राच्या मनात अस्पष्ट आहे. परंतु सोलापूरचा निकाल आजच लागल्याची धडकी सुद्धा विरोधकांनी घेतलेली आहे. त्यामुळे सामान्य चर्चेत भाजप आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते वंचित, दलित, बहुजन कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना जाणीवपूर्वक चर्चा या दोन मतदार संघावर घेऊन जातात व त्याआडून महाराष्ट्रातील इतर मतदार संघांना मगरीसारखे गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रती चित्र स्पष्ट असले तरी वंचित बहुजन आघाडीने काही धोके ओळखून पुढील वाटचाल या निवडणूक काळात करणे गरजेचे आहे. विरोधक जाणीवपूर्वक काही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पेरून लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातल्या त्यात बी. जी. कोळसे पाटील हा सध्याचा विरोधकांनी आणि त्यातही काँग्रेसी विरोधकांनी वंचित, बहुजन, दलित समूहात चर्चेला आणलेला मुद्दा आहे. यामागचा उद्देश एकच आहे की, लक्ष विचलित करणे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. सोबतच वंचित आघाडीमुळे भाजप ला फायदा होईल, मत वाया जाईल, पुन्हा भाजप निवडून येईल, अश्या प्रकारच्या संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा पेरणे हे आता विरोधकांनी लक्ष केलेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना योग्य ते उत्तर देता आले तर चर्चेत सहभागी होण्यास हरकत नाही. परंतु उत्तर देता येत नसेल तर चर्चेतून माघार घेऊन परत आपल्या प्रचारकार्याला लागणे जास्त गरजेचे आहे. निवडणुकांच्या काळात हे हातखंडे वापरून विरोधी गोटात असमंजस व अविश्वासी वातावरण निर्माण करून एकत्र आलेल्या समूहाला सैरावैरा करणे हा परंपरागत निवडणूक प्रचाराचा एक भाग झालेला आहे. त्यामुळे शक्य झाले तर अशा चर्चेत न रंगता, सामान्य मतदारांच्या संपर्कात जाने हेच योग्य राहील.

त्याचप्रमाणे अनेक प्रश्न आज उपस्थित केले जात आहेत. प्रश्नांची एक मालिकाच निर्माण केली गेली आहे असेही म्हणता येईल. वंचित बहुजन आघाडी जितकी भक्कम होत आहे तितकाच प्रश्नांचा भडीमार वाढतांना दिसून येत आहे. यात सामान्य मनोविज्ञान दडलेले आहे. वंचित बहुजन आघाडीला भाजप ने ५०० करोड रु. निवडणुकीसाठी दिले त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे हेलिकॉप्टर ने महाराष्ट्रात प्रचार दौरे सुरु केले आहेत. व महाराष्ट्रात ४८ लोकसभेच्या जागा लढत आहेत.  हा हल्ली आपल्याभोवती निर्माण केला गेलेला प्रश्न आहे. संशय निर्माण करण्याखेरीज यामागे दुसरा कुठलाही हेतू नाही. ज्या समूहाने भाजप च्या मागच्या ५ वर्षाच्या सत्ताकाळात हालअपेष्ठा सहन केल्या, वेळप्रसंगी अन्याय अत्याचाराला बळी पडला, ज्या समूहाने धार्मिकतेच्या अतिरेकामुळे मार खाल्ला, जो समूह व नेता सातत्याने मागच्या ५ वर्षाच्या काळात भाजप च्या अन्यायकारी धोरणाविरोधात लढत राहिला. व देशाला आरएसएस ने निर्माण केलेला देशापुढील धोका अधोरेखित करीत राहिला तो समूह व नेता भाजपला परत सत्तेवर बसविणार नाही. सत्तेच्या या मृगजळात सापडलेल्या प्रस्थापित पक्षांनी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर पाहून आजच मैदानातून माघार घेतल्याचे हे निदर्शक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले लक्ष विचलित न करता ज्या ध्येयाने वंचित समूह पेटून उठला आहे त्या ध्येयाप्रती समर्पित होऊन कार्य करणे तितकेच गरजेचे आहे. जितक्या प्रश्नांचे वलय विरोधकांकडून उभे केले जाईल तितका आपला विजय आणखीच दृष्टीपथात येईल. हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

कुठलाही समूह १०० % कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही. प्रत्येकच समूहात काही टक्के लोक स्वार्थी, खिसेभरू, व समाजद्रोही असतातच. कारण त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून असते. काहीच इतिहास तर काहींचा वर्तमान त्यांना हे करण्यास भाग पाडतो. एकंदरीतच वंचीतातील अशा वर्गाची ती अपरिहार्यता असते. त्यामुळे आपल्यातील अस्थिनीतले साप आपण वेळीच ओळखून घेऊन समाजाला यांच्यापासून सजग कसे करून घेता येईल यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

आज महाराष्ट्रात भाजप - सेना युती आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी दोन्ही पक्ष आपसात मतांच्या विभाजनासाठी लढतांना, भांडतांना, झगडतांना दिसून येत आहेत. आपआपले कधीकाळीचे यांनी निर्माण केलेले बालेकिल्ले वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी भांडत आहेत. एकंदरीतच यांचे भांडण वंचित बहुजन आघाडीने एकवटलेल्या ६० टक्के मतांसाठी नसून उर्वरित ४० टक्के मतांसाठी दोन्ही युती आघाडी लढत आहे. त्या ४० टक्के मतांमधून जास्तीत जास्त मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी भांडणे चाललेली आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील ६० टक्के मतांना सोबत घेऊन आगेकूच करीत आहे. त्यामुळे या ६० टक्के मतांमध्ये काही वाटा मिळतो का याची चाचपणी घेण्यासाठी दोन्हीकडून वंचित बहुजन आघाडीवर टीकांचा भडीमार सुरु झालेला आहे. हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. मुळात इथल्या पारिवारिक राजकारणावर वंचित बहुजन आघाडीने केलेला घणाघात प्रस्थापित राजकीय पक्षांना स्वस्थ बसू देत नाही. येनकेनप्रकारे सत्ता ही ठराविक कुटुंबाच्या हातात राहील यासाठी चाललेली ही तजवीज आहे.

एकेकाळी देशाच्या सत्तेवर कायम अधिराज्य गाजविणारी कॉंग्रेस आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भाजप मध्ये जाण्यापासून रोखू शकत नाही. तर दुसरीकडे स्थानिक पक्षांच्या एकजुटीने भाजप ला आपला पराभव दृष्टीपथात दिसत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ला ‘बी’ टीम म्हणून हिणविण्याचा प्रकारही जोरात सुरु झालेला आहे. निवडणूक काळात धर्मनिरपेक्ष मतांचा जोगवा मागायचा आणि निवडणुका संपल्या कि धर्मनिरपेक्षतेला बासनात गुंडाळून असंहीष्णूतावादी बनायचे हे इथल्या प्रस्थापितांचे कायमचे सोंग झालेले आहे. जनतेने व मतदारांनी हे आता ओळखून घेतले आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कॉंग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आल्याचे सोंग घेते. आणि तिकडे राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा सुजय विखे पाटील भाजप मध्ये प्रवेश घेऊन भाजप ची उमेदवारी मिळवितो व त्याला राष्ट्रवादी पाठींबा देते. मराठ्यांच्या जीवावर राजकारण करणारे मराठ्यांनाच पायदळी तुडवून सत्तेसाठी तडजोडी करतात. महाराष्ट्रात मतांचे ध्रुवीकरण होऊ नये. धर्मनिरपेक्ष मते विभागली जाऊ नये म्हणून कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडी बनते आणि तिकडे गुजरात सारख्या राज्यात, ज्या राज्याला असंहीष्णूतेच्या वातावरण निर्मितीचे माहेरघर समजले जाते त्याच्या गुजरातेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस ला सोडून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेते. यातच यांच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटतो. गुजरातेत धर्मनिरपेक्ष मते नाहीत का ? गुजरातेत धर्मनिरपेक्षतेला मानणारा समूह नाही का ? गुजरातेत धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होण्याचा धोका नाही का ? गुजरातेत राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढल्याने भाजप ला फायदा होणार नाही का ? या प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी आता स्वतःच्या पारिवारिक पक्षाला विचारायचा कि नाही ? वरून धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घेऊन मतदारांना फसवायचे आणि आतून भाजप - आरएसएस ला सहाय्य करून देशात असंहीष्णूता निर्माण करणाऱ्यांना सत्तेवर बसविण्यासाठी धडपडायचे. या नीतीला महाराष्ट्रातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे.

२०१९ ला दिल्लीच्या तख्तावर बिगर भाजप, बिगर कॉंग्रेस ची सरकार बसण्याच्या दिशेने वाटचाल चाललेली आहे. महाराष्ट्रात देखील वंचित बहुजन आघाडी या शक्यतेला अधिकच बळ देत आहे. त्यामुळे उद्याच्या दिल्लीच्या तख्तावर वंचितांची सरकार बसण्याचीही शक्यता बळावते आहे. पण यासाठी प्रत्येकच कार्यकर्त्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. एकटे बाळासाहेब आंबेडकर संसदेत जावून होणार नाही तर सोबत २० - २५ खासदार घेऊन संसदेत गेले तर या देशाला बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात स्थिर सरकार मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघाकडे देखील वंचित बहुजन समाजाने लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. आपले मत हे कुणाला सत्तेवर बसविण्यासाठी किंवा कुणाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी नसून आपले मत दिल्लीची सत्ताच आपल्या हातात घेण्यासाठी आहे. दलित, आदिवासी, मुस्लीम, वंचित, बहुजन समाजाला सत्तेचा एक मंच उभा करून देण्यासाठी आहे. व संविधानाने या समूहाला दिलेले अधिकार कुणाच्या कृपेवर नाही तर स्वतःच स्वतःच्या प्रतिनिधी मार्फत मिळविण्यासाठी आम्ही वाटचाल करीत आहोत यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.

आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येकच उमेदवार १ लाख मताच्या पुढे आहे. काही ठिकाणी हा आकडा ५ लाख मतांच्या पुढे जाणारा आहे. ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आकडा ५ लाख मतांच्या पुढे आहे त्या मतदार संघात तो आकडा वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नाही तरी चालेल परंतु तो कमी होणार नाही याची खबरदारी प्रत्येक कार्यकर्त्यांना घेणे गरजेचे आहे. लक्षात असू द्या कि आपली लढाई बलाढ्य शत्रूशी आहे. आणि बलाढ्य शत्रूशी लढतांना मनाची पक्की तयारी, जिद्दीची कसोटी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी निर्धार बलाढ्य ठेवणे गरजेचे आहे. ज्या मतदार संघात २ ते ३ लाखांच्या घरात मतदान वंचित बहुजन आघाडी घेणार आहे त्या मतदार संघात आम्ही तो आकडा जिंकण्याच्या आकड्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे व त्यादृष्टीने मेहनत घेणे गरजेचे आहे. तेव्हाच आम्ही महाराष्ट्रातून निदान २० ते २५ खासदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून आणू शकू. त्यासाठी उमेद्वारांसोबतच कार्यकर्त्यांनाही त्यादृष्टीने तयार करणे गरजेचे आहे. २१ व्या शतकातील राजकारण झपाट्याने बदलत आहे. परंपरागत राजकारणाचे सर्व गृहीतके मोडीत काढून नव्या व्यवस्थापिकीय संकल्पनांनी राजकारणाचा ठाव घेतलेला आहे. निवडणुकांचे व्यवस्थापन पेलून धरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सज्ज होणे गरजेचे आहे. सोबतच कार्यकर्त्यांनी देखील त्या व्यवस्थापिकीय मुद्द्यांना लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण आजचे हेच व्यवस्थापन आम्हाला सत्तेपर्यंत घेऊन जाणारे आहे. सत्तेचा घास आज तोंडापुढे येऊन थांबलेला आहे. तो पुन्हा हिरावला जाणार नाही यासाठी सर्वांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.

आज महाराष्ट्रात चेतना निर्माण झालेली आहे. ही चेतना इतक्या वर्षांच्या काळात पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मनात आज वंचित बहुजन आघाडीचा झंजावात घर करून बसला आहे. कालपर्यंतचे उपरेही आता स्वकीय झालेले आहेत. कालपर्यंतचे विरोधकही आज समर्थक झालेले आहेत. सत्तेचे भागीदार होण्याची चेतना जागृत झालेली आहे. कालपर्यंत न दिसणारा पर्याय आज जनतेला दिसू लागला आहे. ही वंचित बहुजन आघाडीसाठी जमेची बाजू आहे. कालचा अराजकीय माणूस आजचा राजकीय प्रचारक बनून वंचित बहुजन आघाडीचा प्रचारक बनलेला आहे. कुणाचीही वाट न पाहता तो त्याच्या क्षेत्रात प्रचाराला लागलेला आहे. एकंदरीत राजकीय चेतना निर्माण करणारे वातावरण तयार झालेले आहे. पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीने वंचितांच्या राजकीय उठावाचे स्वरूप धारण केलेले आहे. हा राजकीय उठाव क्षमविणे आता अशक्यप्राय झालेले आहे. त्यामुळे याला बळकटी देणे गरजेचे आहे. इथून माघारी फिरायचे नाही. इथून माघार घ्यायची नाही. आता हे राजकीय मैदान सोडून पळ काढायचे नाही. कारण आता महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. विजयीपथावर आरूढ झालेल्या वंचिताला सत्तेवर बसविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. हे प्रण घेऊन वंचीतांनो आगेकूच करा. दिल्लीची सत्ता वंचितांच्या स्वागताला सज्ज आहे. हा विश्वास ढळू देऊ नका. विजय नक्कीच होणार आहे.   


§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


No comments:

Post a Comment