Thursday 23 August 2012

विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती


विपश्यनेची मानसिक गुलामगिरी : एक प्रतिक्रांती
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५


अलीकडे जीवन हरवून बसलेल्या माणसांचा लोंढा अध्यात्माच्या पायथ्याशी शरण जाऊ लागला आहे. माणूसपण मिळविण्यासाठी धडपडणारी माणसे जीवनाच्या चक्रव्युहात माणूसपण हरवून बसतात. भौतिक सुखाच्या अमानवीय तृप्तीसाठी चाललेली स्पर्धा जीवनात अशांतता आणि अस्थिरता निर्माण करते. जगण्याचा अर्थच समजून घेता न आल्याने सामाजिक जीवनातून अलिप्ततेची भावना बळावत जाते. मग मानवी प्रवास देव, आत्मा, परमात्मा यांच्या दिशेने मार्गक्रमित होऊन अध्यात्माच्या मानसिकतेला शरण जातो. आणि इथूनच मानवी जीवनाच्या अपरिमित -हासाला सुरवात होते.

मानवी उत्क्रांतीचा काळ हा संघर्षाचा होता. विकसनशील माणूस संघर्षातून घडला. अमानवियतेविरुद्धच्या क्रांत्या संघर्ष्यातूनच झाल्या. मानवतावादाची उत्क्रांतीही संघर्षातून झाली. आज मानवी जीवनाला माणूस नावाची ओळख प्राप्त होण्यात या संपूर्ण संघर्षकाळाचा मोठा वाटा राहिलेला आहे. संघर्षाने केलेली क्रांती ही संघर्षातून उलथवून लावता येत नाही. म्हणून आजपर्यंतच्या इतिहासात ज्या काही प्रतीक्रांत्या झाल्या त्या मानवाच्या मानसिकतेवर हल्ला करून, त्यांच्या भावनिक मानसिकतेची शिकार करून झालेल्या आहेत. क्रांती-प्रतीक्रांतीचा हा  संपूर्ण इतिहास संघर्ष विरुद्ध मानसिक हल्ला असाच राहिलेला आहे. 

इ.स.पूर्व ४ थ्या शतकात मानसिक स्वातंत्र्य गमावलेल्या माणसाला मानसिक गुलामीतून तथागत बुद्धांनी बाहेर काढले. अष्टांगिक मार्गाच्या रूपाने जगण्याचा मार्ग बहाल केला. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी पंचशील प्रदान केले. आणि सामाजिक अस्तित्व टिकविण्यासाठी त्रिशरण प्रचलित केले. जीवनातील संघर्षाला तोंड देण्यासाठी १० पारमिता घालून दिल्या. वैदिकांनी मानवी समाजावर घालून दिलेल्या चिरेबंद मानसिक गुलामीच्या कळ्या बुद्धांच्या या सिद्धांतांनी मोकळ्या होऊ लागल्या.  प्रत्युत्तसमुत्पाताच्या सिद्धांताने व्यवहारातील कार्यकारण भाव चिंतन आणि मननाच्या पातळीवर आणून मानवी समाजावरील बौद्धिक झापडबंद कवाडे मोकळी केली. मानवी विज्ञानाला प्रस्थापित केले. अदृश्य शक्तीची चिरेबंदी मानवी व्यवहारवादी तत्वज्ञानातून मोडकळीस आणली. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाची रुजवण समाजात केली. कर्मकांड, आत्मा, पुर्नजन्म मोडीत काढून ख-या मानवी विकासाचा पाया रचला. जो आजतागायत जगाला मार्गदर्शक आहे.

बुद्धाची ही क्रांती वैदिकांची व्यवस्था मोडीत काढणारी असल्याने तथागतांच्या महापरीनिर्वानानंतर बुद्ध तत्वज्ञानाला प्रदूषित करण्यासाठी वैदिकांनी आपली विषारी पाऊले पसरायला सुरवात केली. इ.स. ४ थ्या शतकात म्हणजे बुद्धाच्या महापरीनिर्वानानंतर जवळपास ८०० वर्षांनी बुद्ध तत्वज्ञानाची मांडणी लिखित स्वरुपात होऊ लागली. तोपर्यंत बरीच सरमिसळ बुद्ध तत्वज्ञानामध्ये झालेली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथातून हे स्पष्ट होते. वैदिकांनी केलेल्या घुसखोरीला मोडीत काढून बुद्धाच्या सामाजिक संदेशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्ध स्वरुपात जगासमोर आणले. विखुरलेल्या आणि प्रदूषित झालेल्या बुद्धाच्या तत्वज्ञानाला शुद्ध स्वरुपात सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचविता यावे म्हणून २२ प्रतिज्ञा दिल्या. २२ प्रतिज्ञा या दुसरे तिसरे काहीही नसून बुद्ध तत्वज्ञानाचे अगदी सोपे व संक्षिप्त रूप आहे. ज्यामुळे हजारो वर्षे वैदिकांच्या वंशावळीने लादलेली गुलामी पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेबांच्या धम्मचक्रप्रवर्तन क्रांतीने मोडीत काढली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केलेल्या धम्मचक्र क्रांतीला त्यांच्या महापरीनिर्वानानंतर पुन्हा मानसिक हल्ल्यातून प्रतीक्रांतीवाद्यांनी रोखून धरले. आज तर बुद्ध आणि आंबेडकरी तत्वज्ञानाला विपश्यना आणि समाधीच्या काटेरी कुंपणात गुंफून नष्ट करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञानाने प्रेरित झालेल्या माणसांना मानसिक गुलाम केले जात आहे. विपश्यना आणि समाधी बुद्धाच्या नावावर खपवून काही मानसिक रोगी समाजाला पंगु बनवू पाहत आहेत. वैदिकांनी बुद्ध धम्मात सोडलेले काही बहुरूपी बुद्ध-आंबेडकरी समाजाला चार भिंतीच्या आत बंधिस्त करीत आहेत. डोळे बंद करवून, समाधिस्त बसवून बुद्ध-आंबेडकरांच्या क्रांतीला थंड करीत आहेत. प्रतीक्रांतीची ही मानसिक विषारी पाऊले किती भयंकर सामाजिक गुलामगिरीला आमंत्रण देत आहेत. हे पाहणे आधुनिक समाजाला क्रमप्राप्त आहे.

आज बुद्ध तत्वज्ञान हे आंबेडकरी चष्म्यातूनच बघितले गेले पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘आधुनिक बुद्ध’ आहेत. इतकेच नाही तर ते ‘महाबुद्ध’ आहेत. परंतु समाजाने बुद्ध तत्वज्ञानाला बाबासाहेबांच्या चष्म्यातून बघू नये, म्हणून विपश्यना बुद्धांनी सांगितली आहे; समाधी बुद्ध तत्वज्ञानाचाच भाग आहे; अश्या प्रकारची पेरणी करून माणसांची मानसिकता दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण हयातीत कधीही समाधी वा विपश्यना केली नाही. उलट "बुद्ध आणी त्यांचा धम्म" या ग्रंथाच्या पान. क्र. २२५ वर समाधी, विपश्यनेला नाकारून बुद्धाने सामाजिक संदेश दिला नाही का ? असा प्रश्न विचारून बुद्धाने सामाजिक संदेशालाच अधिक महत्व दिले आहे. असे उत्तरही दिले आहे. तसेच मिलिंद कॉलेज च्या भूमिपूजनाच्या वेळी, देहूरोड येथील बुद्ध मूर्तीच्या स्थापनेच्या वेळी समाधिस्त बुद्धाला नाकारून उघड्या डोळ्यांचा आणि मार्गस्त बुद्ध प्रमाण मानला. रंगून येथील भाषणात तर बाबासाहेबांनी स्पष्टपणे 'विपश्यना आणि समाधीमुळे भारतात बुद्ध तत्वज्ञान प्रदूषित झाले आहे' असे म्हटले.

मुळात बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, बुद्धांनी व्यक्तीसापेक्ष संदेशाला सामाजिक परीवेशामध्ये मांडलेले आहे. याचे कारणही तितकेच मानव्यिक आहे. कारण माणसाची खरी ओळख ही त्याला त्याच्या समाजातूनच प्राप्त होत असते. समाजाच्या बाहेर राहून माणसाचे अस्तित्व निर्माण होत नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नांना व सामाजिक परिस्थितीला जुळवून घेतांना मानवी कार्यकारणभावाला बुद्धाने प्रमाण मानले. मानवी वर्तनापासून तर मानवी प्रगतीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते. जिच्या कार्यकारणभावातून व्यक्ती जीवन घडत जाते. विपश्यना आणी समाधीने याच कार्यकारणभावाला मोडीत काढून व्यक्तीला एकलकोंडे, स्वार्थी, सामाजिक प्रश्नांपासून दूर व सामाजिक परिस्थितीपासून अलिप्त बनविले जात आहे.

ज्या गोयंका गुरुजी ने विपश्यनेचे भूत भारतात पसरविले ते स्वतः २००७ च्या दीक्षाभूमी येथील भाषणात म्हणतात, "बुद्ध धर्मातील तत्वे अतिशय चांगली आहेत. ज्यामुळे बुद्ध धर्म जगात स्वीकारला गेला. परंतु ही सर्व तत्वे आमच्या वैदिक संस्कृतीतून घेतली गेली आहेत." आता या गोयकांच्या वक्तव्याला कश्याप्रकारे समजून घ्यायचे ? याचाच अर्थ असा होतो की विपश्यना / समाधी हे वैदिकांच्या संस्कृतीचे बांडगुळ आहे. आणि स्वतः गोयंका हे सुद्धा वैदिकच आहेत. एक वैदिक माणूस बुद्ध धम्म देशात कसा काय पसरवू शकणार आहे ? निदान याचा तरी विचार गोयंका गुरुजीच्या पायाशी लोळणा-यांनी करावा.

मुळात विपश्यना माणसाला आत्मिक समाधानासाठी एकाग्रचित्त व्हायला सांगते. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार केला तर आत्मिक समाधान त्या माणसाला हवे असते. ज्या व्यक्तीला सर्व भौतिक सुखाची प्राप्ती झाली आहे. पण भौतिक सुख मिळविण्याच्या नादात त्याला गमवावे लागलेले स्वत्व आणि करावे लागलेले अमानवीय कृत्य, ज्याची अनुभूती सर्व भौतिक सुख मिळाले असतांनाही समाधानाची अंतिम पातळी गाठू शकत नाही. भ्रष्टाचारी, श्रीमंत, नौकरदार(अवैध मार्गाने भौतिक सुखाच्या मार्गाला लागलेले) आणि समाजाचा विसर पडून स्वतः च्या विश्वात जगणा-या माणसांनाच विपश्यना किंवा समाधी मानसिक समाधान प्राप्त करून देऊ शकते. पण याने नैतिक समाजाची निर्मिती होणार आहे का ? याउलट जी माणसे समाजात वावरतात; जी समाजाच्या परिस्थितीशी समरस असतात; जी सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सदैव अग्रेसर असतात; अश्या माणसांना त्यांचे कर्तुत्व अंतिम आत्मिक समाधान मिळवून देत असते. अश्या माणसांना कधीच विपश्यना वा समाधी करण्याची गरज भासत नाही.  बुद्ध तत्वज्ञानातील नैतिक समाजाच्या निर्मितीची मांडणी यावरच केली गेली आहे.  

धम्म फक्त मानसिक समाधान देतो. आणि त्यामुळे धम्माकडे आकृष्ट झाले पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल किंवा तुमचे म्हणणे असेल तर मला वाटते की ती नाण्याची एकच बाजू होईल. ती पण अपूर्ण. धम्म जगणे शिकवितो. धम्म वागणे शिकवितो. धम्म माणसाला माणसाची ओळख देतो. धम्म भटकलेल्यांना मार्ग देतो. धम्म व्यक्तिमत्व बहाल करतो. धम्म विकासाला चालना देतो. मानवी जीवनातील यशापर्यंत धम्म घेऊन जातो. आणि जेव्हा धम्मामुळे हे सर्व मिळते तेव्हा भौतिक सुखाची अपेक्षा मानवी जीवनात राहत नाही. आवश्यक त्या सर्वच गरजांची पूर्तता मानवी यशाच्या परिभाषेत सामावलेली असते. त्यामुळे धम्माला फक्त मानसिक समाधानापुरते बंधिस्त करता येणार नाही. आणि तसा दृष्टीकोन पण धम्मासाठी घातक आहे. जगतांना भेडसावणा-या सर्व सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, जातीय, शैक्षणिक, राजकीय प्रश्नाची सोडवणूक धम्मात आहे. असे मला वाटते. आणि हे सर्व विपश्यना किंवा समाधीतून होऊ शकत नाही.

डोळे बंद करून एकाग्रचित्त होणे, आत्मिक विहार करणे, श्वासावर नियंत्रण ठेवणे, शारीरिक गरजांना (लोभ, माया) विसरणे हे कुठल्या माणसांची लक्षणे आहेत ? जी माणसे समाजासाठी झटतात; जी समाजासाठी जगतात ती या सर्वच पातळ्यांच्या फार उंच पातळीवर पोहोचलेली असतात. एकंदरीत बुद्धाचा संदेशही मानवाला सामाजिक बनविणे आहे. प्रज्ञा, मैत्री, दान इ. माध्यमातून समाजासाठी धावून जाण्याची प्रवृत्ती बुद्ध निर्माण करतात. ज्यामुळे बुद्धांनी विपश्यना वा समाधीसारख्या साधनांना नाकारून "चरक भिकव्वे चारीकम, बहुजन हिताय, बहुजन सुखाय" चा संदेश दिला. तो कुठल्याच विपश्यनेमध्ये किंवा समाधीच्या अवस्थेत बसत नाही.

मुळात बुद्ध स्वीकारत असतांना आम्ही कुठला बुद्ध स्वीकारतो हेसुद्धा जास्त महत्वाचे आहे. सुजाताने दिलेली खीर बुद्धांनी प्राशन केल्यानंतर मार्गस्त झालेले बुद्ध स्वीकारायचे ? की, गृहराज्य त्याग केल्यानंतर सप्तऋषींच्या आश्रमात अघोरी विद्याग्रहण करूनही सत्याची ओळख न पटलेले बुद्ध स्वीकारायचे ? सप्तऋषींच्या आश्रमात बुद्धांनी विपश्यना / समाधी केली. परंतु सत्याचा मार्ग सापडला नाही. अश्याच ध्यानस्त मुद्रेत शरीराला क्लेश देऊन समाधी करीत बुद्ध बसले असतांना सुजाता ने त्यांना खीर दिली. ती खीर प्राशन करून बुद्धांच्या शरीरात चैतन्य संचारले. तेव्हा त्यांना प्रचीती झाली की, मी आतापर्यंत शरीराला क्लेश देऊन केलेली साधना व्यर्थ होती. त्यातून मला कुठलेही ज्ञान प्राप्त होऊ शकले नाही. म्हणून ती खीर प्राशन केल्यानंतर ते सामाजिक समूहाच्या (गावाच्या) दिशेने मार्गस्त होतात. आणी त्यानंतर समाजाच्या सानिध्यात राहून चिंतन आणि मननाने सामाजिक दुःखाकडे बघतात. तेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती होते. खरे बुद्ध हे सुजाताने दिलेली खीर प्राशन केल्यानंतर सापडतात. निदान याचा तात्त्विक आणि सैद्धांतिक विचार तरी विपश्यना आणि समाधी करणा-यांनी किंवा त्याचा पुरस्कार करणा-यांनी करावा.

आज माणसांना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांनी वेढलेले आहे. क्षणाक्षणाला व्यवस्थेविरुद्ध मानवी स्वातंत्र्यासाठी लढावे लागते. इतकेच काय तर बौद्धिक स्वातंत्र्यासाठीही लढावे लागते. याचे उत्तर विपश्यना किंवा समाधीत नसून उघड्या डोळ्याने घडणा-या घटनांची चिकित्सक मांडणी करून बुद्धाच्या प्रत्युत्तसमुद्त्पाताच्या सिद्धांतात आहे. विपश्यना किंवा समाधी संघर्षाची उर्मी संपविते. आज व्यवस्था कुठल्याच परिस्थितीत वंचित समूहाच्या हिताची नाही. अश्यापरिस्थितीत व्यवस्थेशी दोन हात करूनच आपले हक्क व अधिकार मिळवावे लागत असतील, तर ते विपश्यनेच्या डोळे बंद अवस्थेतून मिळविता येतील का ? मानवी न्यायाची मुहूर्तमेढ व्यवस्थेच्या माध्यमातून करायची असेल, तर माणूस सतत बाह्य वातावरणाशी संघर्षरत राहणे गरजेचे आहे. परंतु तो संघर्षरत राहू नये यासाठीच विपश्यनेचे भूत समाजात पेरले जात आहे. ज्यामुळे आज ज्यांच्या हातात व्यवस्था आहे; ती त्यांच्याच हातात राहील. आणि क्रांती करणारा समाज पुन्हा मानसिक गुलामीत लोटला जाईल. क्रांतीला प्रेरणा देणारे बुद्ध-आंबेडकरी तत्वज्ञान प्रदूषित होईल. आणि त्यामुळे क्रांतीला जळामुळापासून उपटून फेकता येईल. असे हे या विपश्य्यी वैदिकांचे षड्यंत्र आहे.

मानसशास्त्र सांगते की, माणूस जेव्हा समाधिस्त असतो तेव्हा तो त्याच्या आजूबाजूला घडणा-या घटना / घडामोडींपासून अलिप्त असतो. अश्या परिस्थितीत तो मोठ्या प्रमाणात बाह्य वातावरणापासून असुरक्षित असतो. बाह्य वातावरणाचा धोका समाधिस्त माणूस हाणून पाडू शकत नाही. मानवी जीविताला सर्वात अधिक धोका हा समाधिस्त अवस्थेतच जास्त असतो. शिवाय शारीरिक क्लेश आहेच. मानसशास्त्र हे सर्व व्यक्तीसाठी सांगते. 

तसेच मानव्यशास्त्राचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की, जेव्हा जेव्हा समाज समाधी अवस्थेमध्ये होता; बाहेरच्या वातावरणापासून किंवा घडणाऱ्या घटना / घडामोडींपासून अलिप्त राहिला; तेव्हा तेव्हा समाज आपले स्वातंत्र्य गमावून बसला. आणि गुलामीच्या अवस्थेत लोटला गेला. वैदिकांनी इथे हजारो वर्षे गुलामी लादली आणि राज्य केले ते समाजाला अश्याच प्रकारे भ्रमिष्ट करून केलेले आहे. तीच अवस्था समाजावर या विपश्यनेच्या विषारी समाधी अवस्थेने आधुनिक काळात लादायचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे विपश्यनेची ही विषारी पाऊले समाजाने ओळखणे गरजेचे आहे. बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी कधीही विपश्यना सांगितलेली नाही. बुद्धांचा आणि बाबासाहेबांचा संदेश हा व्यक्तीच्या सामाजिक अस्तिवाला प्राप्त करण्यासाठी होता. बाह्य सामाजिक वातावरणाच्या प्रभावाने निर्माण होणा-या सामाजिक गुण दोषांना संतुलित करून मानवी स्वातंत्र्य बहाल करणारी क्रांती बुद्ध आणि बाबासाहेबांनी केली आहे. परंतु आज सामाजिक प्रश्नांपासून, सामाजिक अन्यायापासून विचलित करण्यासाठी माणसांना विपश्यनेच्या दावणीला बांधले जात आहे. विपश्यनेचे हे वैदिक गाजर गवत आताच नष्ट केले नाही. तर प्राचीन काळातील गुलामगिरीची अवस्था समाजावर पुनश्च्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या परिस्थितीत माणसे मानसिक स्वातंत्र्य गमावून बसलेले असल्यामुळे गुलामीच्या विरुद्ध बंद करून उठणार नाहीत. डोळे बंद करून गुलामगिरीला आमंत्रण देण्यापेक्षा डोळे सताळ उघडे ठेऊन प्रतीक्रांतीला हाणून पाडा ! त्यातच तुमचा विजय आहे. बुद्ध धम्म आणि आंबेडकरी चळवळीला क्रांतीचीच आज खरी गरज आहे.
ôôôôôôôô
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
९२२६७३४०९१, ८७९३३९७२७५ 

9 comments:

  1. Dear Dr. Sandeep,

    Have you personally undergone a 10 Days prg at Igatpuri?

    Anil Yadavrao Gaikwad
    9321141819

    ReplyDelete
  2. kahi garaj nahi tyachi anil jiiiiiiii....
    great sandip sirrrrrrrrr keep it onnnnnnnn

    ReplyDelete
  3. वॉशिंग्टन - मृत्यूनंतर जीवनाची शक्यता फेटाळून लावणारे प्रसिद्ध न्यूरोसर्जन (मज्जातंतूतज्ञ) डॉ. एबन अलेक्झांडर यांनी त्यांच्या भूमिकेत आता पालट केला आहे. स्वतः मृत्यूशय्येवर असतांना त्यांनी मृत्यूनंतरचे जीवन अनुभवले. त्यामुळे आता ‘मृत्यूनंतरही जीवन असते’, असे त्यांचे ठाम मत झाले आहे. (पुनर्जन्म न मानणारे बुद्धीप्रामाण्यवादी आणि अंनिसवाले यांना ही चपराकच आहे ! स्वतःला मोठे विज्ञानवादी संबोधणार्‍या अंनिसवाले डॉ. एबन आलेक्झांडर यांना आव्हान देण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? - संपादक)
    २००८ मध्ये डॉ. एबन अलेक्झांडर यांना ‘मेनिंनडायटीस’ (मेंदूचा एक विकार) झाला होता. या आजारामुळे ते सात दिवस ‘कोमा’त गेले होते. या आजाराच्या वेळी त्यांच्या मेंदूतील विचार आणि भावना यांवर नियंत्रण ठेवणारा भाग काम करेनासा झाला होता. त्या वेळी अतिशय गहन अशी एक अनुभूती त्यांना आली. या अनुभूतीनंतरच ‘मृत्यूनंतर जीवन असते, हे मी मान्य केले’, असे डॉ. अलेक्झांडर यांनी अमेरिकेतील ‘न्यूजविक’ या नियतकालिकामध्ये लिहिलेल्या निबंधामध्ये म्हटले आहे. (पाश्चात्त्यांनी एखादी गोष्ट मान्य केल्यावर ती मान्य करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ‘आत्मा अमर असतो’, हे हिंदु धर्मशास्त्रात सांगितले आहे; मात्र हल्ली असे सांगणार्‍यांची टिंगलटवाळी केली जाते. एका प्रसिद्ध अमेरिकी तज्ञाने असे सांगितल्यावर तरी भारतीय हे मान्य करणार का ? - संपादक)
    अलेक्झांडर यांच्या ‘प्रूफ ऑफ हेवन’ या पुस्तकाच्या प्रचारार्थ हा निबंध प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात ते म्हणतात...
    १. कोमात असतांना मी वर वर जात होतो. एका सुंदर निळ्या डोळ्यांच्या महिलेशी माझी ढगांमध्ये भेट झाली. ‘पक्षी, देवदूत यांच्याविषयी अनेक आठवणी मी पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत; मात्र हे शब्द मी ज्यांना पाहिले आहे, त्या व्यक्तीरेखांना न्याय देऊ शकत नाहीत. शब्दांत त्या व्यक्तीरेखा बद्ध करणे कठीण आहे.
    २. मी अशी माणसे पृथ्वीवर पाहिलेली नाहीत. पृथ्वीपेक्षा ते जग वेगळेच होते. ते जास्त प्रगतीशील होते.
    ३. पूर्वी मी तपासत असलेल्या काही रुग्णांनाही असे अनुभव आले होते. ते याविषयी मला सांगत; मात्र ‘ते दिवास्वप्न आहे’, असे मी त्यांना सांगत असे. आता मी स्वतः त्या गोष्टी अनुभवल्याने त्या गोष्टी सत्य होत्या, हे मला पटले आहे.
    ४. माझ्याबाबतीत जे घडले होते, ते समजून सांगण्याच्या पलीकडचे होते. ते सत्य होते. माझ्या जीवनात घडलेल्या इतर घटनांपेक्षाही ते अधिक सत्य होते.
    ५. मी अमेरिकेच्या प्रतिष्ठित अशा वैद्यकीय संस्थांमध्ये न्यूरोसर्जन म्हणून काही दशके काम केले आहे. त्या काळामध्ये मी इतर डॉक्टरांप्रमाणे भावना, श्रद्धा यांविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मला जेव्हा मृत्यूनंतरच्या जीवनाचा अनुभव घेतला, तेव्हा पूर्वीची माझी धारणा नष्ट झाली.

    ReplyDelete
  4. http://www.misalpav.com/node/23604

    ह्या ठिकाणी जाऊन आपलेच बांधव काय करत आहेत ते जरा बघा! तुम्ही तुमचे हे विचार अशा ठिकाणी जाऊन मांडणे जास्त गरजेचे आहे. चांगले विचार लोकांपर्यंत पोचले तरच चळवळ निर्माण होते. तुमचे प्रयत्न चांगले आहेत पण ते कमी पडत आहेत. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. dharma na madir main mile , dharm na hath bikay, dharma na grantho main mile , JO DHARE SO PAYE!!
    Growth of teachings Of Acharya S N Goenka proved the Non-secterian nature of Dharma , Pls dont waste precious time in 'Bhudhi-Vilas'...!! Good News(2013) :- Now vipassana made compulsory in in ALL Govt schools across the Maharashtra Because its UNIVERSAL technique NOT Monopoly of any religion..B Happy...!(any way its really sad to see so may 'Anonymous' comments above ..!)

    ReplyDelete
  6. ना बाबासाहेब कळले, ना बुद्ध कळला. जर .बुद्धाची शिकवणच कळली नाही तर धम्म कळण खूपच लांबची गोष्ट झाली.

    >> बुद्धांनी कधीही विपश्यना सांगितलेली नाही.
    महासतीपठ्ठाण सुत्ताचा थोडा अभ्यासा केल्यास गौतम बुद्ध विपश्यना कशी उलगडून सांगतो ते स्पष्ट होत.

    ReplyDelete