Thursday, 3 May 2012

आंबेडकरी मानसिकतेचे अपहरण


आंबेडकरी मानसिकतेचे अपहरण
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५

क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या महायुद्धात अनेक सामाजिक घटकांमध्ये बदल घडून येत असते. विचार, संस्कृती, मानसिकता यांचे ध्रुवीकरण होतांना समाज आमुलाग्र परिवर्तनाचा साक्षीदार ठरत असतो. कधी माणूस बदलतो तर कधी मानसिकता बदलते. क्रांतीच्या काळात माणूस बदलतो तर प्रतीक्रांतीच्या काळात षडयंत्रकारी नीतीच्या माध्यमातून समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणल्या जातो. क्रांती उघड स्वरुपात समाजात बदल घडवून आणते. तर प्रतिक्रांती छुप्या पद्धतीने प्रस्थापित मूल्यांना पारंपारिकतेकडे घेऊन जात असते. हे घडत असतांना माणूस स्व-वलयाभोवती गुरफटलेला असतो. तर समाज मात्र या सर्व प्रक्रियेपासून अनभिज्ञ राहतो. आज २०१२ ला अशीच काहीशी परिस्थिती भारतीय समाजामध्ये दिसून येत आहे. प्रतीक्रांतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र माणसे स्वतःच्या विश्वात सामाजिक अस्थिरतेबद्दल रुक्ष झालेली आहेत. प्रतिक्रांती आपली विषारी पावले समाजाच्या आधुनिक प्रगतीवर वार करीत आहेत. समाज मात्र प्रतीक्रांतीच्या काळाची ही अमानवीय प्रक्रिया ओळखण्यात अपयशी ठरत आहे.
आंबेडकरी क्रांतीने भारतातील मानवीय क्रांतीला पुनर्प्रस्थापित केले होते. बुद्धाच्या मानवीय तत्वज्ञानाला हजारो वर्षाच्या प्रतीक्रांतीच्या गर्तेतून बाहेर काढून सम्यक समतावादी समाजाच्या स्थापनेसाठी संचारित केले. संविधान आणि कायद्याच्या रुपात बुद्ध तत्वज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या जागतिक मानवतावादी सम्यक क्रांतीने हजारो वर्षांचे हरविलेले मानवी स्वातंत्र्य बहाल केले. इतकेच नाही तर येणा-या काळाची पावले ओळखून संविधानाच्या रुपात भविष्यकालीन मानवी विकासाचा आणि अबाधित स्वातंत्र्याच्या पाया रचला. त्यामुळेच बुद्ध तत्वज्ञानाला प्रेरित आंबेडकरी क्रांती ही जगातील एकमेव समतावादी सम्यक क्रांती ठरली. ज्या क्रांतीने कुठल्याही ध्रुवीकरणाला थारा न देता सकल मानवी विकासाची मुहूर्तमेढ रोवली. इतिहासाच्या सर्व परंपरागत प्राक्तनांना पायदळी तुडवून मानवी कल्याणाची संहिता आंबेडकरी क्रांतीने दिली. हजारो वर्ष गुलामीत जगणा-या समाजाच्या मस्तीष्कावर चढलेली मरगळ झटकून या क्रांतीने आंबेडकरी मानसिकतेचे बीजारोपण शोषित-पिडीत-वंचीतांमध्ये केले होते.
समतावादी विचार, कल्याणकारी नीती, मानवीय संस्कृती, कायद्याचे राज्य, सर्वसमावेशक न्यायाची प्रस्थापना, सम्यक संबोधि वातावरण, सकारात्मक परिवर्तन, अन्यायाचा प्रतिकार, सम्यक कृती व आचरण, सामाजिक भान आणि स्वत्वाच्या स्वीकारातून स्वार्थाचा त्याग इ. सर्व आंबेडकरी मानसिकतेचे प्रारंभिक मर्म होय. अधिकारविहीन समाजाला अधिकाराची ग्यारंटी, स्वातंत्र्यविहीन समाजाला स्वातंत्र्याची हमी, असमान व्यवस्थेत समानतेचा संकल्प, अन्यायाच्या इतिहासाला कल्याणाचा मंत्र हे आंबेडकरी मानसिकतेचे आधारस्तंभ आहेत. कल्याणकारी व्यवस्था आणि राज्य समाजवादाची शासनव्यवस्था ही आंबेडकरी मानसिकतेची ध्येय उराशी बाळगून जगणारा समाज निर्माण करणे हेच अंतिम साध्य आहे. आंबेडकरी विचार्क्रांतीचा लढा आजही त्यासाठीच सुरु आहे. आणि मानवी जीवनाच्या अस्तित्वापर्यंत तो सुरु राहणार आहे. परंतु काळाच्या ओघात प्रतीक्रांतीने समाजातील आंबेडकरी मानसिकतेचे अपहरण करून त्याऐवजी स्वार्थी, अन्यायकारी आणि पराकोटीच्या दाम्भिकतेने भरलेली स्वहिताची मानसिकता रूढ केली आहे.
आज आंबेडकरी मानसिकता प्रतीक्रांतीच्या विषारी बिजारोपणाने प्रदूषित केली आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी आंबेडकरी क्रांती शिथिल झाली आहे. "जागते रहो" चा निनाद करीत सामाजिक विकृतीवर डोळ्यात तेल घालून अहोरात्र पहारा देणारी आंबेडकरी मानसिकता घरात बसून "हाताची घडी, तोंडावर बोट" ठेवल्यागत दडून बसली आहे की काय ? अशी शंका यायला लागली आहे. शंकाच नव्हे तर तशी वास्तवताही दिसू लागली आहे. परिवर्तनाची शिलेदार आणि मानवी कल्याणाची पहारेदार असणारी आंबेडकरी मानसिकता इतक्या लवकर परिस्थितीच्या गर्तेत अडकणे शक्य नव्हते. मुद्दाम ती अडकविल्या गेली आहे का ? की आंदोलनाची धार आता बोथड झाली आहे ? याचा शोध आता आम्हाला घ्यावा लागणार आहे.
प्रतिक्रांती छुप्या पावलांनी नेहमीच आपले मार्गक्रमण करीत राहते. कारण प्रतीक्रांतीला प्रस्थापितांच्या हातात व्यवस्थेची सूत्रे सोपवायची असतात. गळून पडलेली प्रस्थापिथांची प्रत त्यांना पुन्हा मिळवून द्यायची असते. परंतु क्रांती ही कालातीत आणि तात्कालिक असते. सदासर्वकाल क्रांती टिकून राहत नाही. कारण क्रांतीचे शिलेदार क्रांतीतून मिळालेल्या हक्क आणि अधिकाराच्या भावविश्वात इतके गुंतून पडतात कि त्यांना त्या क्रांतीने दिलेली व्यवस्था टिकवून ठेवता येत नाही. क्रांती टिकून राहत नाही असे याठिकाणी मला म्हणता येणार नाही. परंतु क्रांतीचे टिकून राहणे आणि क्रांतीचे भविष्य हे त्या क्रांतीच्या शिलेदारांच्या वर्तमानकालीन सामाजिक वर्तणुकीवर अवलंबून असते. समाज एकदा का स्थितप्रज्ञ झाला तर क्रांती चा आवाज दाबला जातो. माणसाला मिळालेल्या नव समाजरचनेतून त्याच्यावरील अन्यायाची तीव्रता आणि तीक्षणता कमी होते. हे सर्व क्रांतीमुळे मिळाले आहे हेही तो विसरून जातो त्यामुळे क्रांतीला टिकवून ठेवण्यात सपशेल अपयशी ठरून प्रतीक्रांतीच्या आक्रमणांना मोकळी वाट करून देतो. इतिहासातील क्रांतीच्या अवलोकानातूनही हेच सिद्ध झाले आहे. ज्या माणसांनी आणि समाजानी क्रांतीची चिंगारी सतत ठेवत ठेवली त्याठिकाणी परिवर्तनवादी व्यवस्था टिकून राहिली.
आधुनिक भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने परिवर्तनवादी व्यवस्था निर्माण केली. हजारो वर्षे ज्यांनी गुलामीचे राज्य केले; अश्या प्रतीक्रांतीवाद्यांना बुद्धाच्या समतेच्या धाग्यात बांधून एका क्षणार्धात संपूर्ण पौराणिक पांडित्य आणि त्याचा इतिहास कोलमडून पाडला. समाजात एक चेतना निर्माण केली. जगण्याचे खरे रूप समाजाला अवगत करून दिले. मृतप्राय झालेल्या माणसांना जगण्याचा नवा श्वास दिला. काळ्या इतिहासाची पाने पुसून काढून क्रांतीचा सम्यक संबुद्ध इतिहास रचला. समाजामध्ये विचाररुपी जोम भरला. कल्याणाचा मंत्र आणि उद्धाराचा नवा मार्ग समाजाला दिला. यातून पिडीत-शोषित-वंचित समाजात एका क्रांतिकारी मानसिकतेचे बीजारोपण झाले. जी आंबेडकरी मानसिकता म्हणून ओळखली गेली.
आज ही क्रांतिकारी मानसिकता लोप पावत चालली आहे. क्रांतीचे रणशिंग फुंकणारा आंबेडकरी मानसिकतेचा माणूस चार भिंतीच्या आत व्यवस्थेच्या बंधनात अडकून पडला आहे. मी ज्या व्यवस्थेत जगतो ती व्यवस्था बाबासाहेबांमुळे निर्माण झाली हे माहित असतांनासुद्धा ती माझ्या माणसाच्या हातात नाही. आणि ती माझ्या माणसाच्या हातात नाही. म्हणून मला त्या व्यवस्थेत काम करीत असतांना स्वाभिमान विकून काम करावे लागणार आहे. अश्या नकारात्मक मानसिकतेतून तो जात असतांना त्याच्याकडून प्रस्थापितांविरुद्ध बंद करून उठण्याची शक्यता ही धूसर होत चालली आहे. त्याच्यावर कल्याणाच्या व्यवस्थेचे अस्तित्व असतांनासुद्धा अन्याय करणारी माणसे त्या व्यवस्थेला आपल्या हातात बळकावून बसल्यामुळे तो त्यांच्याविर्रुद्ध पेटून उठणार नाही. कारण पोटाची भूक शमविण्यासाठी क्रांती करावी लागत असली; तरी मिळत असलेल्या भाकरीला लाथ मरून उपाशी पोटी क्रांतीच्या पावलावर मार्गक्रमण करण्याची त्याची तयारी नाही. आणि हे सर्व अतिशय शिस्तबद्धपणे त्याच्या मस्तकावर बिंबविण्यात आले आहे. त्याच्या शरीरातील क्रांतीची उर्मी ही त्याच्या जगण्यासाठी लागणा-या साधनांच्या पूर्तीसाठी तडजोडी करण्यातच खर्ची घातली जात आहे. आणि इथेच आंबेडकरी क्रांती कात टाकीत आहे. विश्व जिंकण्याचे मनोधैर्य असणारी आंबेडकरी मानसिकतेचे अपहरण होणे इथूनच सुरु झाले आहे.
आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी क्रांती ज्या डळमळीत खांद्यावर इथपर्यंत येऊन पोहचली आहे. त्या खांद्यावरील समाजाचा डळमळीत विश्वास सुद्धा आंबेडकरी मानसिकतेचे अपहरण करण्याला कारणीभूत ठरला आहे. या खांद्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केलेल्या वायफळ तडजोडी समाजाच्या विजयी मानसिकतेचे पराजयी मानसिकतेत परिवर्तन करण्याला कारणीभूत ठरल्या आहेत. कुणाचाही कुणावर विश्वास राहिलेला नाही. कुणीही कुणाच्या नेतृत्वात काम करू पाहत नाही. त्यामुळे ज्या भक्कम नेतृत्वाच्या खांद्यावर आंबेडकरी क्रांतीने पुढील मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. ते मार्गक्रमण अद्यापही सुरु होऊ शकलेले नाही. जेव्हा कधी अशी भक्कम खांदे समोर येतात त्यांच्यावर अविश्वासाची आणि "कळपात लंगडी गाय शहाणी" अशी पेरणी करून त्यांचे खांदेच सोलून टाकण्याची प्रवृत्ती आज प्रस्थापित आंबेडकरी मानसिकतेची बनली आहे. काळ बदलला की सर्व काही बदलते हे निसर्गचक्र आहे. पण विचारांच्या भक्कम पायावर उभी असणारी इमारत सदासर्वकाळ डौलाने उभी असते. कितीही आक्रमणे व प्रतीआक्रमणे झाली तरी त्या इमारतीच्या सौंदर्यात तसूभरही फरक पडत नाही. आंबेडकरी विचार हा त्या इमारतीचा भक्कम पाया आहे. पण खंत एकाच आहे की या विचाराच्या मजबूत पायावर आम्ही आतापर्यंत इमारतच उभी करू शकलो नाही.
आपली जबाबदारी झिडकारून आंदोलनाची धार कमी झाली आहे असा सपशेल आरोप करणे कधीही मनाला न पटणारे असावे. आता आंदोलने होत नाही. माणसे घरातून बाहेर निघत नाही. माणसांना घरातून बाहेर काढणे सोपे नाही. आंबेडकरी चळवळीशी लोकांनी फारकत घेतलेली आहे आणि प्रस्थापितांच्या व्यवस्थेत शामिल होऊ पाहत आहेत. कार्यकर्ते नाहीत. विचारांची वानवा आहे. नेत्यांची मात्र काहीच कमी नाही. सर्वत्र नेत्यांचाच सूळसुळाट आहे. अश्या प्रकारची वाक्ये वारंवार ऐकायला येणे हेच आंबेडकरी मानसिकतेच्या अपहरणाचे द्योतक आहे. जिंकणारा समाज इतका हरलेल्या मानसिकतेने का जगतो आहे ? आंबेडकरी विचारांचा माणूस इतका निराशावादी आणि इतका पराभूत राहूच शकत नाही. मी आंदोलन करेन, समाजाचे एकत्र मजबूत संघटन उभारेन, माझी जबाबदारी मी पार पाडत असतांना इतरांची जबाबदारी पण मी माझ्या समर्थ खांद्यावर पेलून धरेन. समाजाच्या कल्याणाची आणि आंबेडकरी क्रांतीची मशाल मी माझ्या प्रयत्नातून सतत तेवत ठेवेन. अशी म्हणणारी मानसिकता ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीचे भविष्य निर्धारित करू शकते.
अजूनही आंबेडकरी समूहामध्ये काही माणसे शिल्लक आहेत. ज्यांच्या मानसिकतेचे  अपहरण केले जाऊ शकत नाही. जी आजही या समाजाला कल्याणाच्या अंतिम टोकापर्यंत पोहचण्यासाठी सतत लढत राहतील. समाजाने चोखंदळ दृष्टीने अश्या माणसांकडे बघण्याची गरज आहे. आणि अश्या माणसांचा स्वीकार करून त्यांच्या समर्थ खांद्यावर समाजाच्या भविष्याची निर्मिती करावी. आधुनिक पिढी नव्या संदर्भानिशी नव्या आव्हानांना घेऊन नव्या साधनांचा वापर करून आंबेडकरी क्रांतीची मशाल बुलंद करण्याची ताकत ठेवते. समाजाने आणि खास करून कोमेजलेल्या खांद्यांनी या आधुनिक युवापिढीकडे विश्वासाच्या नजरेने बघण्याची गरज आहे. कधीकाळी सावरून घेऊन, बेगनी लावून या पिढीला लढण्याची ताकत देण्याचे काम करावे. परंतु त्यांचे नामोहरण करू नये. उत्साहविच्छेद करू नये. मानसिक खच्चीकरण करू नये. या अपेक्षांसह अपहरण झालेल्या आंबेडकरी मानसिकतेला परत मिळविण्याची कसब या पिढीमध्ये पेरता येईल. आणि आंबेडकरी क्रांतीला आलेली ग्लानी घालवून नव्या युगाची, नव्या समाजाची, आधुनिक विकासाची पहाट उगविता येईल.
ôôôôôôô

No comments:

Post a Comment