Saturday 18 February 2012

लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी


लोकशाही विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थी
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१

व्यवस्थेच्या परिघातून जातांना प्रत्येकालाच अग्निदिव्याचा सामना करावा लागतो. यश किंवा अपयश याशिवाय दुसरे कुठलेही निकाल त्यातून मिळत नाही. भारतीय व्यवस्थेच्या संदर्भाने बोलायचे म्हटले तर मात्र यशापयशाच्या पातळ्या विरघडून पडतात. कारण एकीकडे व्यवस्था यशस्वी ठरली असा जागतिक अनुमान लावला जातो तर दुसरीकडे स्वकियांकडून व्यवस्थाच कोलमडली आहे अशी आगडोंब ठोकली जात आहे. प्रश्न काहीही असो उत्तर एकाच आणि अनेक उत्तरांचा एकाच प्रश्न अशी विचित्र परिस्थिती आज देशांतर्गत हालचालींवरून दिसून येत आहे. संविधानाच्या रूपाने देशांतर्गत व्यवस्थेला नावारूपास आलेला अभ्यासक्रम बहाल करण्यात आला असला तरीही भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यापिठातून कल्याणकारी लोकशाहीचा अभ्यासक्रम चालविला जात नाही हि खरी या देशाची शोकांतिका आहे.
                                                                               
माणूस मोठा व्हावा. माणसांचे कल्याण व्हावे. माणूस म्हणून माणसांची ओळख निर्माण व्हावी. प्रत्येकाला न्याय मिळावा. प्रत्येकाचा सन्मान व्हावा. संधी पासून कुणीही अलिप्त राहू नये. या ध्येय आणि उद्धीष्टांना अनुसरून उभी झालेली भारतीय लोकशाही या विश्वविद्यालयातील अनुतीर्ण विद्यार्थ्यांनी मोडीत काढली आहे. व्यवस्थेचे यशापयश हे ती व्यवस्था चालविण-यांवर अवलंबून असते. व्यवस्थेवर नाही. हे साधे सोपे सूत्र अवगत असतांनाही आम्ही वारंवार लोकशाही विश्वविद्यालयाच्या कल्याणकारी अभ्यासक्रमात अनुतीर्ण का होत आहोत ? याचा शोध आता प्रत्येकाने घ्यायचा आहे.

भारतीय लोकशाही ख-या अर्थाने एक विश्वविद्यालय आहे. परंतु हे विश्वविद्यालय ज्यांच्या माध्यमातून चालविले जाते ते कर्मचारीरूपी भ्रष्टाचारी वर्ग आणि निर्णय निर्धारण प्रक्रियेत सहभागी असणारे उमेदवाररुपी राजकारणाचे ठेकेदार आणि या ठेकेदारांना निविदा काढून निवडून देणारे निवड समितीरुपी भारतीय नागरिक हे कुठल्या आधारावर निवड करत आहेत. याचा गोषवारा घेणे आवश्यक ठरले आहे. जातीचा निकस हा तर यांच्या विषारी रक्ताचाच नमुना आहे. एडस सारखा महाभयंकर विषारी रोग जरी यांच्या रक्तात असला तरी उमेदवार हा जातीचा आहे म्हणून त्याला पहिली पसंती दिली जाईल. इतकी कुबुद्धी भारतीय नागरिकांमध्ये जीवाणू पसरावे तशी यांच्या रक्तातून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात फक्त काही नवे वगळली तर ९९ % विद्यार्थी अनुतीर्णच झालेली आहेत. इथे पास होण्यासाठी वशिला दिला जातो. जात आणि धर्म हा पहिला हप्ता असतो पण ऐन निवडीच्या दिवशी खोके पोहचविले जातात. खोके देणारा देतो घेणारा घेतो. मग खोके देणारा पुढील ५ वर्ष खोके जमा करतो आणि घेणारा गप्प बसतो. इथे शिक्षण, योग्यता, कार्यक्षमता कशाचाच निकष लागत नाही. त्यामुळे अडाणी विद्यार्थी कल्याणकारी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीत प्रवेश करतात आणि होत्याचे नव्हते करून टाकतात.

भारतीय लोकशाहीच्या विश्वविद्यालयात आजपर्यंत प्रत्येकच (अपवाद वगळून) अनुतीर्ण होत आला आहे. असे का होते ? संविधानाच्या रूपातील अभ्यासक्रम पेलविला जात नाही की तो अभ्यासक्रम समजून घेऊन अग्निपरीक्षा देण्याची कुवत आमच्या उमेदवार विद्यार्थ्यांमध्ये नाही. जातीच्या आणि खोक्याच्या निकषाने यांनी यांची कुवतच घालवून टाकली आहे. पण त्यासोबतच मताच्या बीजगणितात आम्ही आमचे सर्व विषय गमावून बसलेलो आहोत. मतांच्या बीजगणितापेक्षा कल्याणाचे भूगोल, संधीचे समाजशास्त्र, समानतेचे भाषाशास्त्र आणि विकासाचा इतिहास आम्ही जास्त लक्षात घेणे गरजेचे होते. परंतु या विषयांकडे इथल्या नागरिकांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे आमचे उमेदवाररुपी विद्यार्थी या विषयापासून वंचितच राहिले आणि मतांच्या बीजगणितात सरस ठरले. त्यामुळे महत्वाचे विषय मागे पडत जाऊन त्यात संपूर्ण समाजच भरडत गेला.

राजकीय पक्षाचे वारूळ आज इतके फोफावत चालले आहे की त्यामुळे लोकशाहीचे शिक्षण घेतले नाही तरी चालेल, संविधानाचे अभ्यासक्रम पूर्ण केले नाही तरी चालेल, मात्र पैसा, जात आणि धर्म या तीन पदव्या ज्यांच्या जवळ आहेत तोच खरा लोकशाही विश्वविद्यालयाचा उमेदवार अशी जणू परंपराच आम्ही निर्माण करून टाकली आहे. भारतीय सामाजिक परिस्थिती आणि एकंदर सामाजिक वातावरण लक्षात घेतले तर ही परंपरा कितपत योग्य आहे ? याचा शोध आणि बोध घेतला जाऊ शकतो. राजकीय पक्षांचे हे बुजगावणे या व्यवस्थेला गिळंकृत करतील अशी पुसटशी कल्पनासुद्धा संविधानकारांनी केली नसावी. स्वतंत्र, स्वयंभू, सर्वसंपन्न, सर्वमान्य, सर्वश्रुत, सार्वकालिक संविधानाची मांडणी करतांना जगातील लोकशाही व्यवस्थांचे हे नंदनवन व्हावे अशी स्वप्ने संविधानकरांनी पाहीली होती. परंतु लोकशाही व्यवस्थेचे हे विश्वविद्यालय अनुतीर्णांचे कारखाने आम्ही कसे बनविले ? याचा विचार करण्याची गरज आता भारतीय नागरिकांवर येऊन पडलेली आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे यश टिकवून ठेवण्याची जबाबदारी जशी इथल्या कर्मचा-यांची आणि सत्ताधा-यांची होती तशीच हे कर्मचारी आणि सत्ताधा-यांची निवड करणा-या इथल्या जनतेची सुद्धा होती. कारण आम्हीच त्यांची निवड केली होती. फक्त या अनाडी आणि अनुतीर्ण सत्ताधा-यांना दोष देऊन चालणार नाही तर अपयशाची नैतिक जबाबदारी ही आम्हाला सुद्धा घ्यावी लागणार आहे. "दाताने ओठ चावला गेला तर दोष कुणाला द्यायचा "? तो दोष आमचा आहे. तो दोष आमच्यात नसलेल्या कुवतीचा आहे. तो दोष आम्ही केलेल्या कृतीचा आहे. तो दोष आमच्यामधल्या अज्ञानाचा आहे. आमच्यामध्ये निवड क्षमता नाही याचा तो दोष आहे. अन्यथा या विश्वविद्यालयातील उमेदवाररुपी प्रत्येकच विद्यार्थी जगाचा आदर्श बनला असता. मागील 60-70 वर्षात काय मिळविले ? आणि काय गमाविले ? याचा मागोवा घेण्यात व्यस्त राहून भविष्याला ताटकळत उभे ठेवण्यात वर्तमानासोबत भविष्यालाही आम्ही संपविणार आहोत. आता गरज आहे की आम्ही आमचे उमेदवार कुठल्या प्रक्रियेद्वारे निवडतो ? कुठल्या निकषावर आम्ही त्यांची निवड करतो ? भारतीय नागरिक म्हणून भारतीय लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार निवड समितीचा सदस्य अशी भूमिका बजावतांना आम्ही कुठली भूमिका घेता आणि कुठले निर्णय घेतो त्यावर आपल्या लोकशाही विश्वविद्यालयाचे भविष्य निर्धारित होणार आहे.

भारतीय लोकशाही विश्वविद्यालयात प्रवेश करून राष्ट्रपती, पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणारे हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देतात. काही उत्तीर्ण होतात तर काही अनुतीर्ण परंतु नैतिक सत्तेच्या परिपाठात सारेच नापास ! कारण निवडीच्या कसोट्या पूर्ण करणारा कधी आम्ही निवडला नाही आणि कुठल्याच कसोटीत न बसणारा  आम्ही कधी निवडीपासून दूर ठेवला नाही. त्यामुळे कुवत असणारा कमकुवत तर झालाच पण त्यासोबत कुवत नसणा-याने आम्हालाही कमकुवत बनवून टाकले आहे. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. आमच्या निवडीचे निर्णय आम्हालाच बदलावे लागणार आहे. "Power corrupt man but absolute power corrupt system" हे आम्हाला चांगल्याने अवगत आहे. त्यामुळेच आम्ही  बंदराच्या हातात कोलीत देऊन आम्ही स्वतःच्या पार्श्वभागावर आग लावून घेतली आहे. म्हणून जळतो कोण ? आणि जळतो कोण ? हे सांगण्याचे धाडसही आमच्यात राहिलेले नाही. त्यापेक्षा Resposibility makes the Acountability and Acountability makes the society याला आम्ही का महत्व देत नाही. आमचे विद्यार्थी हे उत्तरदायी का नाहीत ? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.
 
आज दिवसागणिक भारतीय लोकशाही विश्वविद्यालयाचे वर्गरूपी राजकीय पक्ष निर्माण होत आहेत. बंदरांची पिलावळ रानमेवा सोडून शहरी सुखामेवा खाण्यासाठी इकडून तिकडे वारंवार कोलांडउड्या मारीत आहेत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते परंतु निरंकुश सत्ता व्यवस्थेला भ्रष्ट करते. आम्ही काहींच्या हातात अशीच निरंकुश सत्ता सोपविल्याने संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट बनली. राजकीय शहाणपण आणि राजकीय समज यांच्या अभावाने भारतीय समाज पुरता पोखरला गेला आहे. भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही आणि त्यासाठी करावे लागणारे राजकारण यांची सांगड घालतांना कुठेतरी भारतीय समाज अयशस्वी ठरत आहे. समाजशील राजकारण आणि सत्ताकेंद्री, सत्ताप्रभावी राजकारण यांची योग्य सांगड आणि मांडणी करण्यात सध्याच्या संविधानाच्या अभ्यासकापासून तर राजकारणाच्या सारीपाटाचे  मोहरे चालविणा-या राजकारण्यांपर्यंत सारेच अनुतीर्ण झाले आहेत.

फक्त सत्तावादी राजकारण या समीकरणातून बाहेर पडून सहभागीत्वाचे राजकारण, समाजशील राजकारणाची संकल्पना तळागाळातल्या समाजापर्यंत, माणसांपर्यंत कशी रुजविता येईल याच विचा अजूनही समाजासमोर मांडला जात नाही. तो मांडला गेला पाहिजे. संविधानाने मतदानाचा हक्क दिला म्हणून तो बजावायचा किंवा सत्तेच्या मोहमालेत कुणाला तरी सारथी करून त्या बळावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे ही राजकीय गलथानपणाची मांडणी दूर सारून निवडणुका व त्याचे राजकारण याकडे बघण्याची दृष्टी जोपर्यंत भारतीय माणसाला लागत नाही तोपर्यंत भारतीय लोकशाहीचे हे विश्वविद्यालय आपल्या अंतिम उद्दिष्ठापर्यंत पोहचू शकणार नाही.  भारतीय नागरिक म्हणून आपले हक्क बजावतांना आम्ही कुठल्या आधारावर आपला प्रतिनिधी निवडतो हे सर्वश्रुत आहे. या सर्वश्रुत प्रक्रियेला जोपर्यंत आम्ही बदलणार नाही तोपर्यंत आमच्या लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवार (विद्यार्थी) उत्तीर्ण होण्याच्या सीमारेषेपर्यंत पोहचू शकणार नाही. निवडून येणे म्हणजे उत्तीर्ण होणे. किंवा सत्तेवर येणे म्हणजे सीमारेषा ओलांडणे होत नाही. म्हणून वेळ आपली आहे. वेळ आपल्याच हातात आहे. आणि उद्याचा काळही आपल्याच हातात राहणार आहे. निर्भर आहे की आपण वर्तमानात काय निर्णय घेणार आहोत आणि भविष्याचे मार्ग कसे निश्चित करणार आहोत. लोकशाही विश्वविद्यालयातील उमेदवारांचे (विद्यार्थ्यांचे) भवितव्य त्यावरच निर्भर राहणार आहे.
 
----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर. ८७९३३९७२७५, ९२२६७३४०९१
 






No comments:

Post a Comment