रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष…
---डॉ. संदीप नंदेश्वर.
अविचाराने विचार संपतात पण विचाराने विचार प्रगल्भ होतात. वैचारिक आंदोलनाच्या नावाने अविचाराने काही संस्था संघटनांनी अन्य (ओबीसी) समाजापर्यंत विचार पोहविणे गरजेचे आहे असे सांगून विचारात संभ्रम निर्माण केला. आणि आजही काही संस्था संघटना अश्याच प्रकारची बतावणी करून अविचाराने विचार संपविण्याच्या प्रयत्नात आहे. काहींनी तर स्वतःला विकून आपली दुकाने(राजकीय पक्ष) मांडली. काहींची दुकाने चालली आणि काहींची बंद पडली. तर काहींना ग्राहक भेटत नाही अशी अवस्था निर्माण झाली. ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली त्यांनी तर स्वतःला विचारांचा कारखानाच बनवून टाकला. ग्राहकांची वर्गवारी करून त्यांना खुश करण्यासाठी विचारांचे वेगवेगळे विकावू साहित्य आणि विचारांचे जन्मदाते निर्माण केले. असे म्हणा कि त्यांचे नामकरण यांनीच केले. आणि ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली नाही त्यांनी आपल्या जुन्याच वस्तू (एकच विचार) वेगवेगळ्या बाजारात नेऊन भाव वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही प्रकारची दुकाने आणि दुकानदार विचारांना अपेक्षित कृती कार्यक्रम देऊ न शकल्याने सामाजिक आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत अयशस्वी ठरलेत.
ज्यांची दुकाने (राजकीय पक्ष) चालली त्यांनी तर ज्या विचारांवर आपली दुकान थाटली आहे अशी बतावणी केली होती ते विचार बाजूला सारून सत्तेच्या सारीपाटात नवनव्या वस्तू वाटाव्या तसे नवनव्या विचारांचा धंदा करू लागले. हे विचार मांडणारे (पोखरून काढलेले) तर यांच्यासाठी भांडवलच बनले. निदान ज्यांचे दुकान चालले नाही त्यांनी तरी "जुने ते सोने" म्हणून एकाच विचारांना धरून राहिले. जरी त्यांचे बाजार बदलत राहिले असले तरी. म्हणून त्यांचे धन्यवादच मानावे लागतील. पण धन्यवाद मानून त्यांना मोकळे सोडता येणार नाही तर आता त्यांच्या अंगावरची गेंड्याची साल सोलून आपल्या विचारांना साजेशी दुकान सजवून, थाटामाटाने बदललेल्या बजारात उतरावे लागणार आहे.
विचारांच्या शुद्ध कृतीकार्यक्रमातून विचारांना जे बळ प्राप्त होते ते बळ ज्यांनी वैचारिक आंदोलने चालवली आणि नंतर त्याचीच दुकाने बनविली त्यांच्या वैचारिक आंदोलनाला कधीच आले नाही. कुठलेही विचार तोपर्यंतच दीर्घायुषी ठरत नाही जोपर्यंत त्या विचारांना साजेशी आणि पूरक वैचारिक कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात येत नाही. मात्र यांच्या अविचारी वैचारिक आंदोलनात वेळ वाया गेला. शक्ती वाया गेली. पैसा वाया गेला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ३ ते ४ पिढ्या वाया गेल्या. चक्क बरबाद झाल्या. तरीही आश्चर्य हे आहे कि आजच्या आधुनिक जगातल्या काही पिढ्यासुद्धा त्याच अविचारी वैचारिक आंदोलनात बरबाद होऊ पाहत आहेत. आणखी किती बरबाद व्हायचे आणि किती बरबाद करायचे ? हा प्रश्न तुमच्या आमच्यावर येऊन पडला आहे. निव्वळ विचार पेरून परिवर्तन होईल कि त्यासाठी काही कृती कार्यक्रमाची आखणी करावी लागेल ? निव्वळ विचार पेरून, विचार सांगून भूक भागेल का ? विचार जगण्याचा आधार जरी असला तरी सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या विचारांच्या आधारावर जीवनाच्या दैनंदिन गरजा भागविणारी साधने उपलब्ध झाली पाहिजे. निदान सर्वसामान्य माणसांपर्यंत ती साधने पोहचविण्याची यंत्रणा तरी उभी झाली पाहिजे. आणि त्यासाठीच कृती कार्यक्रमाची आखणी होणे गरजेचे आहे.
आधुनिक पिढी विचारांच्या कृती कार्यक्रमावर कितपत अंमलबजावणी करते त्यावरच आंबेडकरी विचाराची घरेलू बाजारपेठ निर्भर राहणार आहे. कारण परदेशी बाजारपेठेत आंबेडकरी विचार अनमोल आहेत. हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. अमेरिका, इंग्लंड सारख्या विकसित देश्यात आंबेडकरी विचार विद्यापीठीय स्तरावरून शिकले आणि शिकविले जातात. यापेक्षा दुसरा पुरावा त्यासाठी द्यावा लागू नये. आम्हाला आमची विस्कटलेली घरेलू बाजारपेठ सावरावी लागणार आहे. थाटलेली आपापली दुकाने बंद पाडून त्याऐवजी शॉपिंग माल उभे करावे लागणार आहे. जिथे आंबेडकरी विचारांना, आंबेडकरी विचारांच्या कारखान्यात तयार होणारे वेगवेगळे प्रोडक्ट अगदी सहजरीत्या ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. जग बदललेले आहे. पिढी बदलली आहे. यंत्रणा बदलली आहे. प्रक्रिया बदलली आहे. वेळ बदलला. काळ बदलला. मात्र परिस्थिती आणि गरज जशीच्या तशीच आहे. याच परिस्थितीच्या आणि गरजेच्या पोटी आंबेडकरी विचारांचा ग्राहक प्रोडक्ट मिळविण्यासाठी भटकत आहे. कधी या दुकानात तर कधी त्या दुकानात.
इथे फक्त ग्राहकच भटकत नाही तर आंबेडकरी विचारांची दुकान चालविणारेसुद्धा भटकत आहेत. कधी या बाजारपेठेत तर कधी त्या बाजारपेठेत. त्यांची ही पायपीट मुलभूत आहे. त्याला ती करावीच लागणार आहे. कारण आंबेडकरी विचारांच्या प्रोडक्ट शिवाय तो जगूच शकत नाही. याला त्याची लाचारी म्हणायची ? की ती त्याची निकड ? त्यापेक्षा आंबेडकरी विचारांचे शॉपिंग माल का उभारले जात नाही.
अगदी अवकळा आलेल्या दुकानासारखी परिस्थिती झालेली आहे. अशी टीका मी करणार नाही आणि तशी टीका करण्याचा अधिकार तुम्हालाही नाही. इतकेच काय कुणालाच नाही. दुकान कसे चालवायचे, ते कसे सुशोभित करायचे हा व्यक्तिगत मुद्दा असू शकतो. परंतु आंबेडकरी विचार जिथेही आहेत तिथे मात्र परिवर्तन आहे. तिथे विकास आहे. तिथे जीवनाच्या संघर्षावर मात करण्याची ताकत आहे. नव्या उमेदीने अपयशाला पायदळी तुडवून नव्या यशाच्या शिखरावर चढण्याची जिद्द आहे. नवी वाट आहे. नवी पहाट आहे. नवा सूर्य आहे. नवा प्रकाश आहे. जीवनाचा यशस्वी मार्ग म्हणजे आंबेडकरी विचार आहे. इथे फार निराश होण्यासारखी परिस्थिती नाही. उमेदीने थकून जाऊन पायात बेड्या अडकविण्याची वेळ नाही. हात बांधून यशाकडे पाठ फिरविण्याची वेळ नाही. वेळ आहे ती पायात जखडलेल्या बेड्या तोडून टाकण्याची. वेळ आहे हाताला सैल करून यशाला कवटाळण्याची. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीला आपल्या बाजूने वाकविण्याची. अंगातल्या बळापेक्षा तुमच्या शिर्षभागावरील मेंदूत साठवून ठेवलेल्या आंबेडकरी विचारांना कृतीत उतरविण्याची. सर्वसामान्य, दीनदुबळ्या, गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी एक विकासवेल फुलविण्याची. पालन पोषण करून ठरविलेल्या आराखड्यात उपलब्ध साधने आणि संसाधनाचा वापर करून मानवी कल्याणाचा बगीचा फुलविण्याची.
आंबेडकरी विचार इथल्या बाजारपेठेच्या नेहमीच शिर्षस्थानावर राहिलेले आहेत. आंबेडकरी विचारांचे भांडवलदार, दलाल आणि व्यापारीसुद्धा नेहमीच वरचढ ठरले आहेत. कारण या विचारांचे ग्राहक (गरजू , उपभोक्ते, समाज) इतके आहेत की कितीही दुकाने उघडली (राजकीय पक्ष), कितीही व्यापारी आले (नेते), कितीही दलाल आले (कार्यकर्ते), कितीही भांडवलदार आले (राष्ट्रीय नेते), कितीही बाजारपेठा (व्यवस्था) नव्याने उघडल्या तरी आंबेडकरी विचारांची मागणी कमी होणार नाही. आणि पुरवठाही कमी होणार नाही. उलट जसाजसा काळ बदलत जाईल, वेळ बदलत जाईल, समस्या बदलत जातील तसतशी आंबेडकरी विचारांची मागणीही वाढत जाईल. हेच आंबेडकरी विचारांचे सामर्थ्य आहे. कारण हे विचार बुद्धाच्या मजबूत पायावर (base) उभे आहेत.
भांडवलदार, व्यापारी आणि दलाल यांच्यातल्या स्पर्धेने सर्वसामान्य आंबेडकरी विचारांचा उपभोक्ता हवालदिल झाला आहे. त्यात काहींनी तर कहरच केला आहे. आम्ही सांगतो तेच आंबेडकरी विचार. आम्ही करतो तेच समाजकार्य. आम्ही करतो तीच कल्याणकारी आंदोलने. आणि आम्ही करतो तेच यशस्वी राजकारण. विचार असले काय आणि नसले काय ? त्याचे या लोकांना काहीही देणेघेणे नाही. सत्ता असली की सर्व सोयी सुविधा विकत घेता येतील. माणसांच्या भावनिक व वैचारिक गरजा भागविता येतील. सत्तेने धम्म गतिमान होईल. माफ करा यांच्या डोक्यात धम्म कधीच येत नाही. यांचा धर्म सत्तेशिवाय गतीमानच होत नाही. बरे सत्ता मिळाली तरी ती त्यांना अमर्याद सत्ता हवी आहे. थोड्याश्या सत्तेने यांचे भागत नाही. बाजारात मंदी भरल्याशिवाय जसे भाव उतरत नाही. तसेच अवास्तव, अमर्याद सत्ता मिळाल्याशिवाय यांना धर्म आठवतच नाही आणि आठवणार नाही. इतकेच नाही तर आंबेडकरी विचारांच्या आधारावर कल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे भरण पोषणाचे टानिक बुद्धाच्या धम्माला यांना मुळात अन्गीकारायचे नाही. यांना बुद्ध आणि बाबासाहेबांच्या नावाने आपली दुकानदारी चालवायची आहे. भांडवल तयार करायचे आहे. बाजार्पेठेचेसुद्धा काही नियम असतात. सिद्धांत असतात. तत्व असतात. परंतु यांच्या राजकारणाचे कुठलेही तत्व नाही. सिद्धांत नाही. आणि नियमही नाही. कारण यांना राजकारणाच्या नावाने सत्तेसाठी सर्वसामान्न्यांना धारेवर धरून विचारांसाठी ताटकळत ठेवायचे आहे.
आंबेडकरी विचार जे देश्याच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रभागी आहेत. जे विचार अंगीकारण्यासाठी व्यवस्था आतुरलेल्या आहेत. आधुनिक जगाची मांडणी करतांना ज्यांना आंबेडकरी विचारांना किनारा (overtake) करता येत नाही. नवनिर्मितीच्या, मानवी कल्याणाच्या योजना आंबेडकरी परीदृश्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याच आंबेडकरी विचारांची स्वगृही होणारी घुसमट आणि स्वगृही आंबेडकरी विचारांची दिवसेंदिवस घसरत जाणारी किंमत आधुनिक पिढीला कशी पाहवली जात आहे ? हाच माझ्या पिढीचा प्रश्न आहे ? आंबेडकरी विचारांचा आम्ही आणखी किती बाजार करणार आहोत ? आणखी किती बाजार मांडणार आहोत ? विचारांसाठी आंबेडकरी माणसांना आणखी किती पायपीट करायला लावणार आहोत ? एकच आंबेडकरी विचार आम्ही आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भावात आणखी किती विक्रीला मांडणार आहोत ? गारद झालेल्या पिढीकडून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा नाही परंतु माझ्या पिढीच्या, यापुढे आंबेडकरी विचार ज्यांच्या खांद्यावर विसावणार आहे. त्यांना या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागणार आहे.
इथे चिंता आंबेडकरी विचारांना विक्रीस काढणा-या भांडवलदार, व्यापारी, दलाल यांची नाही. चिंता आहे ती आंबेडकरी विचार प्रमाण मानणा-या माणसांची, आंबेडकरी राजकारणाच्या वाताहतीत हवालदिल झालेल्या ख-या भारतीय नागरिकांची, रिपब्लिक नावाच्या बिग बाजाराची, आणि रिपब्लिकन नावाच्या ग्राहकाची. आम्ही आजही आमची एकच दुकान (शॉपिंग माल) रिपब्लिक नावाने का बनवू शकत नाही ? रिपब्लिकन म्हणून खरे भारतीय असण्याचा स्वाभिमान जागृत करून आंबेडकरी विचारांच्या सर्व स्वगृही बाजारपेठा बंद पडण्यासाठी ताळेबंद, हरताळ का पुकारला जात नाही ? दर ५ वर्षांनी ग्रामपंचायत पासून तर दिल्लीच्या तख्तासाठी आठवडी बाजार भरतो तेव्हा रिपब्लिक नावाचा ग्राहक वेगवेगळ्या दुकानात (राजकीय पक्षात) आंबेडकरी विचार मिळेल, न्यायाचा, कल्याणाचा मार्ग मिळेल. या आशेने ओढला जात असतो. त्या रिपब्लिकन ग्राहकाने आता कुठल्याही एका रिपब्लिकन दुकानाकडे (राजकीय पक्षाकडे) वळण्याची गरज आहे.
एकच व्यापारी, एकच वस्तू, एकच सिद्धांत आणि एकच विचार जेव्हा बाजारपेठेत असतो तेव्हा ग्राहक कुठे इतरत्र भटकत नाही. स्पर्धेचा तिथे अभाव असतो. या बाजार नियमाप्रमाणे आंबेडकरी विचार आम्ही का पुरवीत नाही. इथे कुठल्याही अनुषंगाने वस्तूच्या बाजारपेठेचा नियम लावला जाणार नाही व तसा प्रयत्न मी करणार नाही आणि तुम्हीही करू नका ! आंबेडकरी विचारांच्या कल्याणकारी नितीनियमासाठी आम्ही आता एकत्र येणे काळाची गरज आहे. रिपब्लिक नावाचा राजकीय बोधिवृक्ष आम्ही फुलाविणार आहोत की नाही ? या प्रश्नाच्या उत्तरावरच उद्याच्या बाजारपेठेतील आंबेडकरी विचारांची मागणी, पुरवठा अवलंबून राहणार आहे. माझ्या पिढीच्या, आधुनिक जगाशी नाळ ठेऊन जागतिक स्पर्धेचा सामना करणा-यांच्या आंबेडकरी कृती कार्यक्रमावर उद्याचे भवितव्य ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका आणि काही राज्याच्या विधिमंडळाच्या बाजारपेठा तुमची खरेदी विक्री करायला सज्ज झालेल्या आहेत. तुम्ही विकणार आहात की स्वाभिमानाने रिपब्लिक बोधीवृक्ष्याच्या छत्रछायेखाली विसावणार आहात यावर आंबेडकरी माणसांचा उद्याचा दर ठरणार आहे. आता विचार तुम्हाला करायचा आहे.
---डॉ. संदीप नंदेश्वर.
No comments:
Post a Comment