#Once_Again_Ambedkar
चला भारतीय बनूया...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
आम्ही भारतीय म्हणून आम्हाला गर्व आहे. अभिमान आहे. पण भारतीय म्हणून
घेण्याआधी आम्ही आमची ओळख काहीतरी वेगळीच बनवीत चाललेलो आहोत. देशाभिमान बाजूला
टाकून आम्ही धर्माभिमानी होत आहोत. आम्ही सारे भारतीय कधी जातीने विभागले गेलो, तर
कधी धर्माने विभागले गेलो. कधी पंथाने विभागले गेलो, तर कधी प्रथांमध्ये अडकून
पडलो. कधीकधी तर देवाच्या नावानेही विभागले गेलो. कधी मंदिरात, कधी मस्जिद, कधी
चर्च, कधी गुरुद्वारा, तर कधी विहारात बंधिस्त झालोत. कधी पदाने, कधी कामाने, तर
कधी सवयींनी विभागले गेलो. आम्ही भारतीय कधी कधी वस्त्यांनीही विभागले गेलो. एवढेच
काय तर ज्या संत, महापुरुषांनी या देशाला एकसुत्रात बांधण्याचा प्रयत्न केला, या
देशाला धर्मनिरपेक्ष, पंथनिरपेक्ष, जातीविहीन भारतीयत्वाची ओळख देण्याचा प्रयत्न
केला त्या संत, महापुरुषांच्या नावानेही विभाजित होत गेलो. त्यांचे विचार मागे
टाकून एक नवा जात समूह निर्माण करीत गेलो. कधी सत्तेसाठी विभागले गेलो, तर कधी
सत्तेने विभागले गेलो. कधी न्यायाने विभागले गेलो, तर कधी न्यायासाठी विभागले
गेलो. भारतीय म्हणून हा देश, हा समाज एकसंघ, एकजूट, एकमुठ होऊ शकला नाही याचे शल्य
घेऊन पुढची पिढी भविष्याचे मार्गक्रमण करू शकत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर
आम्हाला आमचा धर्म, जात व त्यातून निर्माण झालेली ओळख पुसून काढून भारतीय
बनण्याच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे.
काही
धर्माभिमानी राष्ट्रांना वगळता पाश्चात्य देशांनी कधीही आपल्या जाती, धर्माचा
अट्टहास धरला नाही. त्यांनी त्यांची ओळख विशिष्ट देशाचे नागरिक अशीच जगभर पसरविली.
आणि म्हणून पाश्चात्य राष्ट्र जगात महासत्ता म्हणून उदयास आलेत. पण आजही आम्ही
आमची ओळख जगभरात भारतीय म्हणून नाही तर हिंदू म्हणून करून घेत असू व जगभरात
हिंदुत्वाचा प्रचार करीत असू, आम्ही जगभर हिंदुत्व पोहचविले असे अभिव्यक्तीतून
मांडत असू तर भारताची भारत म्हणून ओळख पुसावी लागेल. व भारतीयांना भारतीय अशी
ओळखही पुसून टाकावी लागेल. भारतीयत्वाकडून हा देश हिंदुत्वाकडे का वळत चालला ?
भारत व भारतीयत्वाची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न कोण करतोय ? का करतोय ?
धर्मनिरपेक्ष भारताला धर्माधिष्ठित एकधर्मीय राष्ट्र बनविण्याची धडपड का चाललीय ?
जातीय अवधारणा बळकट करून माणुसकी पुसून टाकण्याचा कट कोण रचतोय ? हे शक्य तितक्या
लवकर ओळखून वेळीच सावरावे लागणार आहे. भारत आणि भारतीय टिकवून ठेवण्याचे व ते
दिवसेंदिवस वृद्धिंगत करण्याचे अभिवचन आम्ही भारतीय संविधानाच्या रुपात दिलेले
आहे. त्या अभिवचनाचे काटेकोर व नियोजित पालन करण्याची जबाबदारी आमची आहे.
जातीय व
धार्मिक अस्मिता हे मानवी मेंदूला लागलेली कीड आहे. धर्म संस्कृती हा व्यक्तिगत
अनुपालनाचा मार्ग आहे. परंतु धर्माचे हे व्यक्तिगत अनुपालन सामाजिक अभिव्यक्तीचे
रूप घेता कामा नये. धर्म सामाजिक अभिव्यक्तीमध्ये उतरला तर त्यातून सामाजिक संघर्ष
अटल आहे. भविष्यातील हा सामाजिक संघर्ष टाळता यावा म्हणूनच संविधान सभेने धर्म
स्वातंत्र्य व्यक्तिगत मुलभूत स्वातंत्र्यात संविधानाच्या भाग ३ मध्ये अंतर्भूत
केले. कारण धर्मस्वातंत्र्य हे देशहिताच्या आड येऊ नये. अन्यथा संविधानाच्या भाग १
किंवा २ मध्ये सुद्धा त्याला अंतर्भूत करता आले असते. देशात विशिष्ट धर्माला
प्रस्थापित करण्याचा हेतू संविधान निर्मात्यांचा असता तर संविधानाच्या भाग ४ मध्ये
शासन नितीनिर्देशात त्याचा अंतर्भाव केला गेला असता. परंतु तसे न करता धर्माला
व्यक्तीपर्यंत सीमित करून राष्ट्राला कल्याणकारी बनविण्याचा प्रयत्न संविधान सभेने
केला. मात्र संविधान सभेच्या या उद्दात्त हेतूला बाजूला सारून आजचे राज्यकर्ते
धार्मिक राज्याचा व धर्म शासनाच्या मार्गाने राज्यकारभार करण्यात धन्यता मानीत
असतील तर धर्मयुद्ध अटल आहे. भारतीयत्व धोक्यात आहे. देशाला धर्मतत्वाच्या अणुरेणु
वर उद्ध्वस्त करण्याची तयारी चालविली जात आहे. जी तुम्हा आम्हा सर्वांसाठी
धोक्याची घंटा आहे.
‘धर्म ही
अफूची गोळी आहे.’ असे मार्क्स का म्हणायचा ? याचे प्रत्यय आज यायला लागले आहे. आज देशात भाजपा च्या माध्यमातून चालविले जाणारे
शासन लक्षात घेतले तर मार्क्सच्या दूरदृष्टीत भाजपा-आरएसएस सारखे धर्माभिमानी राज्यकर्ते
धर्माच्या आधारावर राज्य उद्ध्वस्त करू शकतात हे मार्क्सने तेव्हाच ओळखले होते.
राज्याला (शासनाला/सत्तेला) धर्म नसावा अन्यथा शासन देशातील जनतेला न्याय देऊ
शकणार नाही. हे तत्व भारतीय संविधानात काटेकोर पाळण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा
मार्क्स संविधान सभेच्या दृष्टीक्षेपात होता की नाही हा वादातीत विषय होईल. परंतु
मार्क्सवादी पक्ष व मार्क्सवादी विचार संविधान सभेत होता हे तितकेच वास्तव आहे.
त्यामुळेच भारताचे संविधान हे धर्माचे कडबोळे न बनता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची
आचारसंहिता बनू शकले. धर्मसंस्कृती फार फार तर मानवी व्यवहाराला नियंत्रित करू
शकते. परंतु हीच धर्मसंस्कृती शासन व्यवहाराला नियंत्रित करायला लागली तर काय
परिस्थिती उद्भवू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा भारत व भारतात तयार
झालेली सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थिती आहे. त्यामुळे भारतीय शासन
व्यवहारावर आलेले धर्मसंस्कृतीचे नियंत्रण संपुष्टात आणून भारताला संविधानिक
संस्कृतीकडे घेऊन जाण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे.
‘जातीव्यवस्था
ही भारताला व भारतीय समाजाला लागलेली कीड आहे.’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
म्हणायचे. जातीव्यवस्था कायम ठेवून हा देश प्रगतीपथावर जावू शकत नाही.
जातीव्यवस्था संपविल्याशिवाय भारताला कल्याणकारी राज्य बनविता येणार नाही. यावर
त्यांचा ठाम विश्वास होता. आज देशात जातीय अस्मिता परमोच्च टोकाकडे चाललेली आहे.
वाढत चाललेले जातीय आंदोलनाचे लोन संपूर्ण मानव जातीला व मानवियतेला संपवू पाहत
आहेत. विकासाची संकल्पनाही एकजातीय, एकपंथीय होऊ पाहत आहे. जातीय समूहाचे
ध्रुवीकरण होत आहे. व भारतीयांचे पृथ्थकरण होत आहे. हे या देशाचे दुर्दैव आहे. राजकारण
पेशवाईच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे. न्याय व अन्यायाच्या अवधारणा जात आणि
धर्माच्या दिशानिर्देशनावर मांडल्या जात आहेत. मानवी सुरक्षितता व असुरक्षितता ही
सुद्धा त्याच आधारावर निर्धारित केली जात आहे. विभाजन आणि अमर्याद नियंत्रण हाच
एकमेव उद्देश त्यामागचा आहे. या उद्देशांच्या मागे भारतीयांचा बळी दिला जात आहे व
बळी घेतला जात आहे.
भारतीय
संविधानाने आम्हाला नवी ओळख दिली. आम्ही भारतीय ही एकमेव ओळख पुरेशी ठरावी.
सर्वांना आपुलकीने एकसुत्रात बांधण्याची शक्ती त्यात आहे. देशाला एकसंघ ठेवण्याची
किमया त्यात आहे. जाती व धर्मश्रेष्ठता बाजूला टाकून समानतेचा धागा सर्व
नागरिकांमध्ये गुंफण्याची ताकत त्यात आहे. असे असतांना आम्ही निरर्थक प्रश्नांवर
जातीय कठडे निर्माण करून देशहिताला मागे टाकत आहोत. ज्यामुळे दोन समूहात, दोन
वर्गात विभाजन होत आहे. भारतीय म्हणून देश पुढे आला व नागरिक पुढे आले तर ते
संविधानिक संस्कृतीला महत्व देतील. समानता पास्थापित होईल. न्यायाची व्यवस्था
निर्माण होईल. अन्यायाला मूठमाती मिळेल. जातीय व धार्मिक श्रेष्ठत्व गळून पडेल. धर्माची
मनुवादी व्यवस्था कोसळेल. या भीतीने आरएसएस देशाला अस्थिर बनविण्याचा सातत्याने
प्रयत्न करीत आली आहे. आज सत्तेवर बसून भाजपा च्या मदतीने धर्मव्यवस्था परत
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या या संकल्पित ध्येयाला मोडून
काढायचे असेल तर आम्हाला भारतीय बनावे लागेल. भारतीय बनूनच आम्ही आरएसएस ची
धर्मव्यवस्था, सांस्कृतिक राष्ट्रवाद, हिंदुत्व मोडून काढू शकतो.
भारतीय
बनत असतांना आम्ही आमच्याच निर्माण केलेल्या वस्त्यादेखील उद्ध्वस्त कराव्या
लागतील. दलित वस्ती, चांभार वस्ती, धनगर वस्ती, मांगवाडा, महारवाडा, चांभारवाडा,
तेली मोहल्ला, कुंभार मोहल्ला, आदिवासी पाडा अश्या प्रकारच्या वस्त्या, वाडे,
मोहल्ला, पाडे आम्हाला पुसून काढावे लागतील. भारतीय बनण्याच्या प्रक्रियेत अडथळा
निर्माण करणारी ही साधने आहेत. जातीची ओळख निर्माण करणारे व जातीची निदर्शक असणारी
सारीच दृश्य - अदृश्य प्रतीके नष्ट करू तेव्हाच आम्ही भारतीय बनायला सुरवात करू
शकणार आहोत.
त्यासोबतच
धर्मभावना ही भारतीय बनण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. आमच्या आस्था, श्रद्धा,
उपासना प्रचंड कणखर आणि टोकाच्या आहेत. आज देशात सामाजिक वातावरण कलुषित करण्यात
धर्मभावना प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. भारतीय बनण्याच्या प्रक्रियेत
आम्हाला या धर्मभावनांना देखील मूठमाती द्यावी लागणार आहे. आमची धार्मिक स्थळे ही
प्रेम, आपुलकी, स्नेह, मैत्रीभाव निर्माण करणारी असावीत. द्वेष, तिरस्कार,
शत्रुत्व, भेदाभेद निर्माण करणारी धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही
भारतीय म्हणून पुढे येऊ शकणार नाही. धार्मिक स्थळांचा वापर व्यक्तिगत श्रद्धेसाठी
झाला व त्यातून अंतर्बाह्य व्यवहारात मानव्यता निर्माण झाली तरी समाज
भारतीयत्वाकडे वळेल. परंतु याच धार्मिक स्थळांचा वापर करून काहींनी देशात अशांतता
माजविली आहे. धार्मिक स्थळांचा वापर करून देशात अशांतता माजविणाऱ्या प्रवृत्तींना
ठेचून काढणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.
भारतीय
ही ओळख म्हणजे कुणी एक हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई, बौध्द, जैन असे नव्हे. भारतीय
म्हणजे मानवतेचे प्रतिक आहे. भारतीय म्हणजे जगात मानवता पेरणाऱ्या विचारांचे
माहेरघर आहे. भारतीय म्हणजे न्यायाचे न्यायपीठ आहे. भारतीय म्हणजे अन्यायाचा
सर्वनाश आहे. भारतीय म्हणजे विविधतेतील एकता व एकात्मता आहे. भारतीय म्हणजे
धर्मनिरपेक्षता आहे. व भारतीय माणूस हा त्याचा पुरस्कर्ताच नव्हे तर प्रचारक देखील
आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी भारतीय हीच सर्वश्रेष्ठ ओळख ठरते.
देशाच्या
सीमेबाहेर पडल्यानंतर आमची जात व धर्म ओळखपत्र म्हणून सोबत घेता येत नाही. म्हणजेच
जात व धर्माच्या ओळखपत्राला बंधने आहेत. एका मर्यादित सिमितेच जाती-धर्माचे कार्ड
वापरता येईल. परंतु भारतीय हे ओळखपत्र वैश्विक आहे. ज्याला मर्यादा नाही. ज्याला
कुठलेही बंधन नाही. सीमेच्या आत असो की सीमेच्या बाहेर भारतीय हेच ओळखपत्र आमच्या
मदतीला धावून येऊ शकते. आम्हाला वैश्विक व्हायचे असेल, देशाला वैश्विक बनवायचे
असेल तर भारतीयत्व हाच एकमेव पर्याय आहे. याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे उपलब्ध
नाही. त्यामुळे आमच्या जातीय-धार्मिक गदारोळात भारतीयत्वाचा विसर आम्हाला पडू नये.
‘मी
प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या या ५ शब्दातील राष्ट्रवादाला आम्ही कुठल्या पारड्यात
मापायचे. कुठल्या धर्मात तोलायचे. कुठल्या जातीत मोडायचे. जाज्वल्य देशभक्तीचा हा
राष्ट्रवाद धर्म आणि जातीत अडकून प्राप्त करता येणार नाही. यासाठी धर्म आणि जात
सोडून मानव्यतेच्या नजरेतूनच या राष्ट्रवादाकडे आम्हाला पाहता येईल. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी या ५ शब्दात मांडलेला हा विचार वैश्विक आहे. जो प्रत्येक भारतीयांनी
आपल्या आचरण व व्यवहारात आणणे गरजेचे आहे. कुठल्याही परीस्थित आम्ही आमचे
भारतीयत्व धोक्यात येऊ देणार नाही. धर्म व जात धोक्यात आली तरी भारतीय या
वैश्विकतेने आम्हाला जगता येईल. परंतु भारतीयत्व धोक्यात आले तर धर्म व जात घेऊन
आम्हाला चार पाऊले देखील पुढे टाकता येणार नाही.
आम्ही
जोपर्यंत भारतीय बनत नाही तोपर्यंत या देशातील गरिबी, वंचीतता, अस्पृश्यता,
उच्च-नीचता, भेदाभेद संपत नाही. आम्ही जोपर्यंत भारतीय बनत नाही तोपर्यंत या
देशातला धार्मिक उच्छाद संपत नाही. देशात निर्माण होणारी विषारी जातीय-धार्मिक
व्यवस्था तोडून काढण्यासाठी आम्ही भारतीय बनणे गरजेचे आहे. या देशाच्या
भविष्यासाठी; देशाच्या भविष्यातील पिढीसाठी; देशाच्या विकासासाठी; मानवी
उद्धारासाठी; मानवी कल्याणासाठी; प्रेम, आपुलकी, सद्भाव निर्मितीसाठी; एकच प्रण
करूया. चला भारतीय बनूया ! ‘प्रथमतः भारतीय व अंतिमतः भारतीय’ बनूया !
adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment