Monday 11 June 2018

बर्फाने पेट घेतलाय...


#Once_Again_Ambedkar
बर्फाने पेट घेतलाय...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          लाचार ते जगणे जे पोटासाठी जगले जाते...भावनाशुन्य विश्वातून पराकोटीची दांभिकता आणि स्वार्थ पुढे केला जातो... अश्या या दांभिकतेला आणि स्वार्थी वृत्तीला चाबकाचे फटके मारले तरी कातडी सोलली जात नाही...कारण गेंड्यांची कातडी घातलेले हे मानवी जनावरे स्वतःच्या बापाचे कधी झाले नाहीत तर समाजाचे होतील अशी अपेक्षा करणे फाजील आहे...इतिहास कधीच या माणसांचा नव्हता...आणि राहणार पण नाही...वर्तमानातल्या अन्यायाला सहन करतांना ज्यांच्या शिरा ताणल्या जात नाही...त्यांना मानव नावाची उपाधी देऊन गौरविण्यात काहीही अर्थ नाही...ते मानव कधी नव्हतेच...ते मानव कधी बनलेच नाही...बनणारही नाही...ते मानव आहेत अशी अपेक्षा करणे हे ख-या माणसाचा अपमान करण्याइतका मानवद्रोह आहे...मानवांच्या वस्तीत जनावराचे गुणधर्म घेऊन आलेले मानवी वेषातील चेहरे कधीही इतिहासाच्या पानावर आले नाहीत...या वास्तवाला ज्याने स्वीकारले तो या काळावर मात करून वर्तमानाला पाहिजे त्या दिशेने झुकविल्याशिवाय राहणार नाही...इतका मात्र  विश्वास आहे...तद्वतच भविष्यातील वर्तमानाच्या सोनेरी इतिहासावर या माणसाचे नाव कोरल्याशिवाय राहणार नाही...असा दावा आहे...

समाज नावाची सोनेरी संकल्पना कधीचीच काळाच्या पडद्याआड झालेली आहे...इथे फ़क़्त माणूस नावाचा स्वैर विश्वात जगणार आणि पोट, ऐष, ऐश्वर्य, पैसा, संसार अश्या भिकारी नंदनवनात जगणारा पिशाच्छ पैदा झाला आहे...जो माणूस म्हणून जगू पाहतो...त्याला हा पिशाच्छ आपल्या काळ्या छायेतूनच बघू पाहत आहे...ज्याला अजूनही आपण पैदा कसे होतो ? आणि पैदा कसे झालो ? कश्यासाठी झालो ? हेच कळले नाही...त्याला समाज काय ? समाजाचे दुःख काय ? सामाजिक कर्तव्य काय ?  हे असे कळणार...आपण अजूनही निरर्थक आशेत जगत आहोत...आपल्या आजू बाजूला जगत असलेली भेड-बक-यांची पिलावळ ज्यांच्या साठी आपण अहोरात्र झटत आहोत...आयुष्याची राख रांगोळी करून मरू आणि मारु पाहत आहोत...आपल्यावर झालेला हमला परतवून लावतांना ही पिलावळ आपल्या पाठीशी उभी राहील अशी आशा बाळगत आहोत...पण हे सुखचैनीत महाराजा सोफ्यावर झुलणारे...हवेत तरंगतांना शरीराच्या नसा तुटेपर्यंत सोफा सोडणार नाहीत...क्रांतीच्या मशाली यांच्या रक्ताने कधीच पेटल्या नाही...आणि भविष्यात पेटणारही नाही...जगण्यासाठी माती खाणारे शरीरावर गोळी झेलतील असे आम्ही समजून घेऊ नये...आम्हाला आमचीच छाती पोलादी बनवावी लागणार आहे...आमच्यावर झालेला हमला आम्हालाच परतवून लावायचा आहे...वीर योद्धा तोच बनतो जो सहका-यांच्या ताकतीपेक्षा स्वतःच्या ताकतीवर विश्वास ठेवून संपूर्ण ताकतीनिशी शत्रूंवर तुटून पडतो...भेकडांची जमात तुमच्या सहकार्याला येऊ शकणार नाही...तुमचे संरक्षणही करू शकणार नाही...ती कधीच येणार नाहीत...

संविधानाच्या गुफेमध्ये हे स्वतःला इतके सुरक्षित समजत आहेत की हौशी जनावरांची वारी यांच्या गुफेला सुरुंग लावून तोंडाला मडके आणि कमरेला फडा बांधून गावभर फिरविण्याच्या तयारीला लागले आहेत...हे यांना अध्यापही कळून आलेले नाही...जोपर्यत यांच्या शिखरावरचा संविधानरूपी कळस कोलमडून पडणार नाही तोपर्यंत या झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग येणार नाही...इथे तुम्ही आणि आम्ही लढतो आहोत...विजयाच्या घटका न घटका मोजतो आहोत...बेदरकार, बिनधास्त, पाण्याला आग लावतो आहोत...म्हणून हे वावरतात तुमच्या आमच्या आजू बाजूला...आंदोलन करतांना तुमच्या आमच्या शरीरावर पडलेल्या जखमांच्या भरोश्यावर हे सुरक्षित आहेत...अन्यथा यांच्या रक्तवाहिन्या केव्हाच्याच गोठून मृतप्राण झाल्या असत्या...

वेदनेच्या बळावरच आमचे आयुष्य उभे आहे...आंदोलनाने काय होणार ? या प्रश्नावरच जगाच्या शिखरावर आमचे नाव कोरले आहे...हजारो वर्षाच्या अन्यायाला या एकाच जन्मात आम्ही धुळीस मिळविले आहे...ज्यांना हजारो वर्षे लागली ते काम आम्ही या एकाच जन्मी केले आहे...इतक्या लवकर ते आम्हाला विसरता येणार नाही...तसा प्रयत्नही कुणी करू नये...प्रश्नाच्या वलयांकित कूपमंडूकात जगणा-यांनी जगावे बेदरकार...कफल्लक बनून बिळात तोंड खुपसून जगावे हरामखोरांसारखे ...आम्ही तसे जगणार नाही...आमच्या हक्कांसाठी नाही तर तुमच्याच हक्कासाठी रस्त्यावर धारातीर्थी पडलो तरी चालेल...पण तुमच्या बिछान्यावरची झोप आमच्या गेल्याने तुमच्या रक्षणासाठी जेव्हा तुम्हाला छळेल...तेव्हा तुमच्या परतीच्या मार्गावर काळोखाचीच साथ असेल...एवढे मात्र निश्च्छित !

आज जो लढा आम्ही उभारला आहे तो आमच्यासाठीच नाही तर या वर्तमानाला अमानवी पाशवी बलप्रयोगापासून वाचविण्यासाठी आहे...विजयी होणार...की पराजय पत्करावा लागणार...हे तुम्ही आजच ठरवू नका !... तसा चुकून लाजीरवाणा प्रयत्नही करू नका !...कारण इतिहासाच्या अनेक लढाया आम्हीच जिंकल्या आहेत...आम्ही जिंकतांना तर नेहमी जिंकतच असतो...पण हरतांनाही आम्हीच जिंकतो...हे अजून तुम्हाला माहित नाही...आमचे घोडे उधाणलेले आहेत...पण तितक्याच शिस्तीने वार झेलून शत्रूंच्या कंपूत घुसून त्यांना धूळकावून लावण्याची कसबही आमच्यात आहे...अरे तुम्ही घरातच बसून अकलेचे तारे तोडता...आम्ही मैदानातून तुमच्या दांभिकतेला फाडून फेकतो...लढ्यात  उतरतांना घराच्या वेशीला काटेरी कुंपणाचा कळस बसवितो...रक्तबंबाळ होतांनाही तुमच्याच संरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढतो...आम्ही आमच्या रक्ताला रक्त समजत नाही...पाण्यासारखे वाहिले तरी शत्रूंना शरण जात नाही...ही आमची ओळख जगाने अनुभवली आहे...भेकड जातीचे लबाड प्राणी म्हणून घरातल्या खाटाही मात्र तुम्हालाच हिणवीत आहेत...

आम्ही तयार आहोत तुमचे वार झेलण्यासाठी, पेलण्यासाठी...शत्रुंसवे स्वकीयांच्या लाजिरवाण्या नजरेला चिरा देऊन उद्याच्या नव्या भविष्याची पहाट उगविण्यासाठी...आम्हाला दिलेल्या वेदना कुरवाळीत बसणारे आम्ही नाही...त्याच वेदनेतून आमचा लढा सूर्याच्या तेजाने या क्षितिजावरच्या तुमच्यासारख्या प्रत्येकालाच खाक करू पाहात आहे...येणा-या पिढीच्या चेह-यावर आम्हाला तेज निर्माण करायचे आहे...स्वाभिमानाने जगणे शिकवायचे आहे...तुमच्या चेह-यावरील भीतीचे सावट भविष्यावर पडू नये...म्हणून तुम्ही शेवटचा श्वास घेण्याआधी भविष्याच्या नजरेतून तुम्हाला तुमच्या निरर्थक जीवनाचे चित्र दाखवायचे आहे...तुमच्या लाचारीच्या वेदना आमच्या उद्याच्या भविष्यातून दाखवायचे आहे...तुम्ही षंड होता...हे भविष्याच्या गर्भारपणातून...तुम्ही या जगाचा निरोप घेण्याआधी तुम्हाला जाणवून द्यायचा आहे...तुमच्या नाकर्तेपणाचे शल्य तुमच्या चेहऱ्यावर तुम्हीच ओरबाळतांना पाहायचे आहे...एकदा जाता जाता स्वतःसाठी जगतांना स्वतःच बरबाद झालो हे तुमच्याच तोंडून वदवून घ्यायचे आहे...

उद्याचा सूर्योदय आमच्यासाठी उजाडेल की नाही ?...माहित नाही...पण सूर्यास्ताच्या आधी आम्ही जगल्याचा आनंद घेत असतो...इतरांसाठी हा सूर्य आमच्या कर्तुत्वाने पुन्हा उजाडेल...त्याला उजाडावेच लागेल अशी तंबीही देऊन ठेवतो...तुम्ही मात्र निराश वाणीने उद्याच्या सूर्योदयाची वाटच पाहत बसता...सुखाच्या झोपेसाठी जीवनातला प्रकाश गोठवून अंधाराचा आसरा शोधता...तो प्रकाशही तुम्हाला जाता जाता शिव्याच देऊन जातो...अंधारही वारंवार तुम्हालाच छळतो...केविलवाण्या चेह-याने तुम्हीच स्वतःला विचारता...चामडी बचाव आंदोलन कुणासाठी ? कश्यासाठी ?

अरे प्रश्नांच्या चक्रव्युहात जगणा-यांनो...त्यातून बाहेर पडण्याच्या मार्ग जाणून घेण्याच्या आधीच तुम्ही तुमच्या भोवती चक्रव्यूह तयार केला आहे...आम्ही प्रश्न करतो स्वतःलाही, तुम्हालाही, इतरांनाही, इथल्या प्रत्येकालाही...आमचे बिनधास्त जगणे जिव्हारी येत असेल तर नाक खुपसू नका !...आमचे बेधडक आंदोलने पेलवत नसतील तर मुकाट्याने डोळ्यावर काळी पट्टी बांधून जगत राहा !...आमची समाजसेवा तुम्ही  समाजासाठी काहीच केले नाही...याची  आठवण  करून  देत  असेल तर स्वतःच्या  जगण्याचा धिक्कार करणे आजच सुरु करा  !...हे सगळे जमत नसेल...तर हात पुढे करा !...मी तुम्हाला विश्वास देतो...इथल्या गोठलेल्या बर्फाला आग लावण्याची ताकत या पिढीच्या शिलेदारांमध्ये आहे...आता बर्फाने पेट घेतला आहे...न थांबता, न डगमगता, बंधनांचे शिवारे तोडून अविरत न्यायासाठी लढा उभारायला...माथेफिरूंच्या काळजाला चिरून धडक मोर्चा निघाला आहे...सम्यक आंदोलनाच्या वाटेने...बर्फाला आग लावणारे हे ज्वालाग्राही जरी विद्रोही असले...माथा भडकला तर तुटून पडणारे असले...तरी ध्येयाने प्रेरित हा ज्वाला आता आपल्या अंतिम ध्येयाच्या वाटेने सर्वांना चिरडून नव्या मानवतावादी क्रांतीच्या दिशेने झेपावत चालला आहे...सोबतीला विचारांचा न संपणारा मोठा शिधा घेऊन हा निघाला आहे...त्यामुळे भ्रमात जगणा-यांनो सावधान !...तुमची गरज पडेल...तुमच्याशिवाय हा यशस्वी होणार नाही...या गोड भ्रमात राहू नका !...चक्क तुमच्याशिवाय तो लढतो आहे आता...पुढेही लढायची ताकत तुम्हीच त्याच्यात निर्माण करीत आहात...जितके तुम्ही त्याला प्रश्नाच्या भोव-यात अडकवायचा प्रयत्न कराल तितकाच तो कणखर होईल...तितकाच तो मजबूत होईल...लढत राहील...शेवटपर्यंत...तुमच्यासोबत...तुमच्याशिवाय...किंवा तुमच्यासह !

आता तुम्हीच विचार करा !...सोबत यायचे की आमच्या वाटेतील रोडा बनायचे...चिरडणे इथेही आहे...आणि तिथेही...सोबत राहून चिरडले गेले तर अमरत्व तुम्हालाच आहे...वाटेतला रोडा बनून चिरडले गेल्यास कोल्हया-कुत्र्यापेक्षा वेगळेपण काहीच नाही...मी धर्माभिमानी नाही...असायला पाहिजे होतो...पण इथे मला धर्मच नाही...मी जगतो विचारांच्या विश्वात...मी वावरतो तत्वाच्या गोतावळ्यात...बांधून घेतो स्वतःला मानवतावादी तत्वज्ञानाच्या साखळदंडात...त्यामुळे कुठलाही  रक्तपात माझ्या मेंदूच्या कक्षेत येत नाही...समाजसेवेचे व्रत घेणा-यांच्या...मानवतावादाची उभारणी करणा-यांच्या...सम्यक आंदोलनाची परंपरा चालविणा-यांच्या...न्याय, समता, बंधूतेच्या रक्षणासाठी लढणा-यांच्या...प्रतीक्रांतीवाद्यांशी समोरासमोर लढणा-यांच्या वाटेतील निराशावादी रोडे तुम्ही ठरू नये इतकीच अपेक्षा...

जगता आले तर जगा...त्यांच्यासारखेच...स्वतःसोबत इतरांच्या दुःखातही सोबत  करण्यासाठी... लढता  आले तर लढा...भीमा कोरेगाव च्या स्तंभावर नाव  कोरण्यासाठी... आता चार भिंतीच्या आत जगण्याचे दिवस संपले आहे...आज जर स्वतःच बांधलेल्या भिंतीच्या आत स्वतःच कैदी म्हणून जगले तर तुमच्यासारखा भविष्यातील खरा कैदी तुम्हीच बनणार आहात...उद्याची सुवर्ण पहाट पाहण्याचे स्वप्न तुम्हाला पाहता येणार नाही...मात्र आम्ही ती निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही...आमची सुवर्ण पहाट आम्हीच आणायची...सूर्याला आमच्याच दिशेने वळविण्याचे प्रण आम्ही घेतले आहे...कारण आता या तारुण्यसुलभ विचाररूपी बर्फाने पेट घेतलाय...
                                                                           adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

सूचना

“हा लेख मी दि. ११/१०/२०११ ला लिहिलेला लेख आहे. हा लेख याआधी कुठल्या नियतकालिकात प्रकाशित केला गेला हे नक्की आठवीत नाही. परंतु हा लेख प्रबुद्ध भारत च्या २६ व्या अंकात पुनर्प्रकाशित करण्यात आला. 

आपला विश्वासू
डॉ. संदीप नंदेश्वर नागपूर.


No comments:

Post a Comment