Monday, 11 June 2018

भंडारा गोंदिया लोकसभेला इतिहासातील डाग पुसून काढण्याची संधी...


#Once_Again_Ambedkar
भंडारा गोंदिया लोकसभेला
इतिहासातील डाग पुसून काढण्याची संधी...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १९५४ च्या भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभव हा भारतीय राजकारणाच्या इतिहासात काळा डाग म्हणून अजूनही अजूनही नव्या पिढीला छळतो आहे. देशाचा संविधानकार, जागतिक कीर्तीचा विद्वान देशातल्या तमाम नागरिकांच्या हक्काची सनद कोरून ठेवणारा एक शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भंडारा लोकसभेमध्ये झालेला पराभव अजूनही लाखो लोकांच्या मनावर झालेली जखम आहे व ती जखम आजही कायम आहे. तत्कालीन कॉंग्रेसने नियोजित रीतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केल्याची सल आजही अनेकांच्या मनात घर करून बसलेली आहे. आंबेडकरी अनुयायी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा चाहता वर्ग आजही ती सल घेऊन जगत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आज भंडारा-गोंदिया मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे. आपसी मतभेदात वारंवार या मतदारसंघाने ती संधी गमावली होती व कायम जातीयवादी शक्तींना मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत गेली. परंतु आज २०१८ ची भंडारा–गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक एक संधी म्हणून मिळालेली आहे. देशात जातीय शक्तींनी उच्छाद मांडला असतांना त्यांना दूर सारण्याची ती संधी आहे. या सोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९५४ च्या पराभवाचा मतदारसंघावर लागलेला डाग पुसून काढण्याची संधी देखील मिळालेली आहे.
भाजप-आरएसएस च्या सत्ता शासनाला वैतागून भाजपचे भंडारा-गोंदिया चे खासदार नानाभाऊ पटोले यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. भाजपप्रणीत मोदी शासनाला कंटाळून पटोले यांनी बंडखोरी केली. तेव्हा सर्वप्रथम भाजपच्या मोदी शासनाची घृणित लक्तरे देशासमोर उघडी पडली. भाजपच्या खासदारांनाच सरकारमध्ये काम करता येत नाही. स्वतःच्या मतदारसंघातील नागरिकांना न्याय देता येत नाही. सरकारमध्ये स्वतःची भूमिका मांडता येत नाही. इ. कारणे समोर ठेवून नाना पटोले यांनी राजीनामा दिला. व वर्तमान सरकारचे वस्त्रहरण केले. भाजप व मोदी सरकारसाठी ही घटना त्यांच्या सत्ता मग्रूरीला ठेचणारी होती. संपूर्ण देशातील राजकीय प्रवाहांना दबावाखाली ठेवून राजकारण करणारी भाजप सरकार स्वतःच्याच पक्षाच्या खासदाराने केलेल्या बंडखोरीला तोंड देऊ शकली नाही. त्यामुळे मोदीच्या दबावतंत्राला घाबरणाऱ्या अनेक प्रवाहांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला होता. एकंदरीत मोदी सत्तेलाच पटोले यांचा राजीनामा हे एक आव्हान होते. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ नये म्हणून भाजपा ने कसोशीने प्रयत्न केले. पण भाजपा त्यात यशस्वी झाली नाही. व पोटनिवडणुक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत भाजपा चा पराभव म्हणजे मोदी सरकारची लक्तरे वेशीवर टांगण्याची सुरवात. सोबतच २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-आरएसएस-मोदी च्या मनुवादी शासनाला सत्तेपासून बेदखल करण्याची सुरवात या अर्थाने ही पोटनिवडणुक महत्वाची व देशाच्या भविष्यातील राजकारणात मैलाचा दगड रोवणारी ठरणार आहे.
मोदी सरकारमध्ये सहभागी असून सुद्धा मोदी सरकारला आव्हान ज्या मतदारसंघातून मिळाले त्या मतदारसंघाला या देशातली मनुवादी सरकार उलथवून लावण्याची संधी आहे हे ओळखून मा. प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केलेला आहे. एकंदरीतच संविधानिक कृतिकार्यक्रम की भाजपा-आरएसएस-मोदी प्रत मनुवादी कृतिकार्यक्रम यापैकी कुठलाही एक कृतिकार्यक्रम निवडण्याची संधी या मतदारसंघाला मिळालेली आहे. नाना पटोले यांचा राजीनामा हा मोदी शासनाच्या मनुवादी कृतीकार्यक्रमाचा बहिष्कार होता. भारिप बहुजन महासंघाने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात भाजपा-मोदी शासनाच्या मनुवादी कृतीकार्यक्रमाच्या विरोधात संविधानिक लढा उभा केलेला आहे. देशात होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना ह्या मनुवादी शासन मानसिकतेतून घडतात हे अनेकदा त्यांनी सिद्ध करून दिलेले आहे. संविधान बदलू पाहणारी भाजप-आरएसएस सरकार इथल्या बहुजन वर्गावर सातत्याने अन्याय करीत आहे व त्याविरोधात आज भारिप बहुजन महासंघ व प्रकाश आंबेडकर मोदी सरकार विरोधात लढत आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक ही भारिप बहुजन महासंघ विरुद्ध भाजप सरकार अशीच होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागलेले आहे.
भारिप बहुजन महासंघाने या निवडणुकीत आदिवासी समूहाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. आदिवासी समूहातील प्रसिद्ध साहित्यिक, कवी लटारी कवडू मडावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कायम प्रवाहाच्या बाहेर राहणारा आदिवासी समूह, कायम आरक्षित जागेवर प्रतिनिधित्व करणारा आदिवासी समूह आज पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांच्या सोशल इंजिनीअरिंगमुळे खुल्या प्रवर्गातून राजकीय प्रतिनिधित्वासाठी उतरला आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील आंबेडकरी, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसख्यांक, हलबा व बहुजन वर्गाला सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. ज्यांनी कायम सत्तेसाठी या वर्गाचे शोषण केले त्या पक्षांसोबत जायचे कि ज्यांनी कायम या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिले त्या पक्षासोबत म्हणजेच भारिप बहुजन महासंघासोबत राहायचे याचा निर्णय यावेळेस भंडारा-गोंदिया मतदारसंघातील मतदारांना व मागासवर्गीय बहुजन वर्गाला घ्यायचा आहे. ज्या मनुवादी मानसिकतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला त्या मनुवादी मानसिकतेच्या पक्षांना मदत करायची कि ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय बहुजन वर्गाला मनुवादी छळातून मुक्त करून संविधानिक हक्क बहाल केले व बहुजन वर्गावरील मनुवादी अन्यायाला न्याय मिळवून दिला त्या आंबेडकरी विचारासोबत जायचे याचा निर्णय आम्हाला घायचे आहे.
भंडारा गोंदिया मतदारसंघातील ही निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी+कॉंग्रेस, भारिप अशी तिरंगी वाटत असली तरी शरद पवारांच्या मनुवादी जवळीकतेमुळे राष्ट्रवादीने भाजप च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठीच नाना पटोले यांना कॉंग्रेस ची उमेदवारी मिळू दिली नाही. भाजप सरकारची अन्यायकारी लक्तरे वेशीला टांगणारा व पक्षीय खासदारकीचा राजीनामा देणारा नाना पटोले यांना या मतदारसंघातून उमेदवारी न देणे याचाच अर्थ असा आहे कि शरद पवार यांनी भाजप च्या उमेदवाराला जिंकवून आणण्यासाठी प्रफुल पटेल हे निवडणूक लढतील अशी बतावणी करीत ऐनवेळी राष्ट्रवादीचा कमकुवत उमेदवार मनोहर कुकडे या मतदारसंघात दिलेला आहे. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक ही वरकरणी तिरंगी वाटत असली तरी ती थेट दुहेरी लढत आहे. भाजपा विरुद्ध भारिप अशीच ही लढत होणार यात शंका नाही. त्यामुळे या मतदार संघातील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, आदिवासी व बहुजन वर्गाला या सुवर्णसंधीचे सोने करून घ्यावे लागेल.
देशात दलित, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय अत्याचार टोकाला पोहचलेला आहे. व या सर्व अन्याय अत्याचारांच्या घटनाना सरकारचे पाठबळ आहे. भीमा कोरेगाव ला बहुजन समाजावर नुकताच झालेला हल्ला इथल्या आंबेडकरवाद्यांनी विसरू नये. आज बहुजन वर्गाला प्रकाश आंबेडकरांच्या रुपात खंबीर नेतृत्व प्राप्त झालेले आहे. संविधान मानणारा वर्ग आज मनुवाद्यांपासून या देशाच्या संविधानाला वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ही पोटनिवडणूक उद्याच्या संविधान बचाव आंदोलनातील व मनुवादी सरकारला सत्तेवरून पदच्युत करण्यासाठी महत्वाची असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे संविधानाने बहाल केलेले हक्क अधिकार शाबूत ठेवण्यासाठी दलित, अल्पसख्यांक, मागासवर्गीय, बहुजन वर्गाला प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.
भंडारा-गोंदिया मतदार संघातून उमेदवारी करीत असलेले व आजपर्यंत प्रतिनिधित्व करणारे भाजप असो कि राष्ट्रवादी असो हे दोन्ही पक्ष कायम मनुवादी भूमिका घेऊन वाटचाल करीत राहिलेले आहेत. इथल्या दलित, अप्लसंख्यांक, बहुजन मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारात या पक्षांनी कधीही भूमिका घेतली नाही. किंव्हा या वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा केला नाही. कायम मनुवादी चातुर्वर्ण्य मान्य करून बहुजन वर्गावर आपले अधिराज्य गाजविण्याचा प्रयत्न केला. बहुजन वर्गाच्या मतदानावर निवडून येऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला. कायम राजाच्या भूमिकेत राहून बहुजन वर्गाला गुलाम म्हणून वागविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण केली, जातीय विभाजन करण्याचा प्रयत्न केला, जातीय उच्च नीचता पुढे करून स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा या भंडारा-गोंदिया मतदार संघातून पराभव पत्करावा लागला. आज परत तीच मानसिकता या मतदारसंघातून उभी आहे. व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रकाश आंबेडकर भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आदिवासींचे प्रतिनिधित्व घेऊन उभे आहेत. जी जखम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना या मतदार संघाने दिली ती जखम परत प्रकाश आंबेडकर यांना होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी सर्व संविधानवादी माणसांची आहे.
२०१९ च्या सत्तेचा मार्ग हा भंडारा-गोंदिया च्या पोटनिवडणुकीतून पुढे सरकण्याची चिन्हे आहेत. अश्या परिस्थितीत इथला बहुजन वर्ग परत मनुवादी भाजप सोबत जाणार का ? भाजप शासनाच्या काळात बहुजन समाजावर झालेला अन्याय अत्याचार विसरून बहुजनवर्गाने भाजपाला मतदान करायचे का ? ज्या भाजप व मोदी च्या शासन कारभाराला कंटाळून नाना पटोले यांनी मतदारसंघातील प्रतिनिधित्वाचा राजीनामा दिला. व भाजपा सोडली. त्याच भाजप ला परत या मतदार संघातील नागरिकांनी मतदान करून स्वतःवर अन्याय अत्याचार करण्याचे प्रमाणपत्रच भाजपा ला द्यायचे का ? ज्या शरद पवारांनी कायम मनुवादी मानसिकता बाळगून मागासवर्गीय, आंबेडकरी, अल्पसख्यांक, दलित, बहुजन यांना आपसात लढवीत राहिले व आजही आरएसएस च्या मनुवादी मानसिकतेला चिकटून भाजप ला मदत करणारे राजकारण करणाऱ्या शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठीशी जायचे ? कि संविधान वाचविण्याची, संविधानिक हक्क व अधिकार अबाधित ठेवण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन मनुवादी व्यवस्थेशी व भाजप च्या अन्यायपूर्ण शासन प्रशासनाशी लढणाऱ्या, दलित, अल्पसख्यांक, आदिवासी, मागासवर्गीय, बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहायचे याचा विचार व निर्णय भंडारा-गोंदिया येथील मतदारांना व नागरिकांना घ्यायचा आहे.
आज देशांतर्गत परिस्थिती मानवतावादाच्या विपरीत आहे. ही परिस्थिती निर्माण करण्यास वर्तमानकालीन भाजप सरकार जबाबदार आहे. आज देशात मानवीय वातावरण उरलेले नाही. भारतीय संविधानाने बहाल केलेले स्वातंत्र अबाधित राहिलेले नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले संविधान आज सुरक्षित राहिलेले नाही असे असतांना ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव भंडारा मतदारसंघाने केला होता त्याच भंडारा – गोंदिया मतदारसंघाला आज परत या देशाचे संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या पाठीशी म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून मनुवादी व्यवस्थेला पराभूत करण्याची संधी आलेली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. ती संधी या मतदारसंघातील आंबेडकरी, दलित, बहुजन, अल्पसंख्यांक, आदिवासी या समूहाला आलेली आहे. देशात उद्याची व्यवस्था संविधानिक असावी कि मनुवादी असावी याचा निर्णय घेण्याची संधी या मतदारसंघाला मिळालेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत हा मतदारसंघ मनुवाद्यांच्या पाठीशी उभा राहतो कि संविधानवाद्यांच्या पाठीशी उभा राहतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ज्यामुळे येणाऱ्या काळात देशातील व्यवस्था कुणाच्या ताब्यात जाईल याचे सुतोवाच या निवडणुकीने होणार आहे. तद्वतच इथला बहुजन, मागासवर्गीय व दलित, अल्पसख्यांक पुढच्या भविष्याची मांडणी या निवडणुकीत करतील अशी अपेक्षा आहे. त्यावर या देशाचे उद्याचे राजकारण निर्भर असेल.                                                                                                                             adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.



No comments:

Post a Comment