#Once_Again_Ambedkar
२०१९ चा सूर्य उजाळतांना...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
लोकशाहीत राजकीय स्थित्यंतरे
होतील व होत राहतील. सत्ता बदलेल तसा विचारही बदलेल. आणि सत्तेचा विचार बदलला तर
लोकशाही संचालनाची कुसही बदलेल. व्यवस्थेला हाताळण्याची पद्धती बदलेल. सामाजिक,
आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक दृष्टीकोण सुद्धा बदलेल. हा बदल म्हणजे मानवी
व्यवहाराच्या प्रगतीचे ते लक्षण आहे. विचारशिलतेचे ते लक्षण आहे. त्यामुळे राज्य
व्यवस्था सांभाळणारी मानसिकता बदलली म्हणून भीती बाळगण्याचे कारण नाही. हे
सूर्यप्रकाशाइतके सत्य व अटळ आहे. परंतु जर एखादा विचार, एखादी मानसिकता वर्तमान
राज्य व्यवस्था ताब्यात घेऊन त्या व्यवस्थेला गिळंकृत करू पाहत असेल, त्या
व्यवस्थेलाच बदलू पाहत असेल तर हिटलर चा जन्म झालाय व हिटलरशाही सत्ता जन्माला
आलीय या जागतिक निष्कर्षापर्यंत यायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज भासत नाही.
समाज स्वतःच त्या निष्कर्षापर्यंत येतो. व तिथून देशांतर्गत भीतीचे वातावरण
निर्माण व्हायला लागते. समाजातील नागरिकांमध्ये निर्माण झालेले हे भीतीचे वातावरण
स्वतःच व्यवस्थेच्या उद्ध्वस्तीकरणाला पोषक तत्व निर्माण करून कारणीभूत ठरते.
अनियंत्रित सत्ता देशातील नागरिकांच्या व्यवहारात, वर्तनात, विचारात राक्षसी बदल
घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असते. व एकदा का तो राक्षसी बदल व्हायला सुरवात झाली
की गुलामीची व्यवस्था निर्माण करणे सोपे असते. आज भारतात भाजपा-आरएसएस सरकार त्याच
मार्गक्रमणातून जात आहे. आज देशातील अशांतता, असुरक्षितता, सामाजिक तेढ, जातीय
द्वेष, अमानुष हल्ले, अमानवी समूह झुंडशाही भारतीय लोकशाहीचे लचके तोडू पाहत
असतांना परत या देशाच्या व्यवस्थेला भाजपा-आरएसएस प्रणीत विषारी मानसिकतेच्या
हातात २०१९ ला होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सोपवायचे की २०१९ चा सूर्य
उजाळतांना आम्ही भारतीय म्हणून काही वेगळा निर्णय घ्यायचा याचा विचार करणे क्रमप्राप्त
आहे.
कालपरवा पर्यंत भारतातील
बहुतांश जनता विकासाचे स्वप्न उराशी बाळगून होती. परंतु भाजपा च्या ४ वर्षाच्या
सत्ताकाळाची सांगता होतांना सर्वांचाच भ्रमनिराश होतांना दिसून येत आहे. जनता
त्रस्त आहे. अर्थव्यवस्था खिळखिळी आहे. प्रशासन सुस्त आहे. आणि राज्यकर्ते
हिंदुत्वाच्या शेकोट्या पेटवून सामन्यांचे हात भाजण्यात मग्न आहेत. कुठेच कशाचा
ताळमेळ होतांना दिसून येत नाही. सामान्य माणसांचे रक्त शोषून देश लुटला जातोय.
करोडो-अब्जो रुपयांचे कर्ज बुडवून काही माणसे राज्यकर्त्यांच्या संरक्षणात देशातून
पलायन करीत आहेत. तर दुसरीकडे फक्त हजार रुपयांमध्ये असलेले कर्ज न फेडू शकणारा
शेतकरी राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा फास गळ्याला लावून आत्महत्या करीत आहे. तेव्हा
त्याला दारुड्या, व्यसनी असल्याची पावती देऊन शेतकरी कर्जमाफीचा नाटकी उदोउदो केला
जातो. परंतु मोठमोठ्या उद्योगपती व त्यांच्यावरील असलेल्या करोडो-अब्जो रुपयांचे
कर्ज रातोरात माफ केले जाते तेव्हा राज्यकर्त्यांच्या नाकावरील माशी सुद्धा हलत
नाही. देशातील सामान्य नागरिकाला तर त्याची माहिती सुद्धा होऊ दिली जात नाही. हजार
रुपयांमध्ये दिली जाणारी सबसिडी, कर्जमाफी करतांना सरकार सामान्य माणसांवर उपकार
करीत असल्याची जाणीव सातत्याने करून देत असते परंतु करोडो रुपयांचे कर्ज विनाअट
माफ करतांना ती सरकारची जबाबदारी आहे असे भासविते. तेव्हा या देशातले उद्योगपती हे
या सरकारचे जावई आहेत का ? असा प्रश्न प्रत्येक सामान्य माणूस विचारतो आहे.
विशिष्ट माणसांसाठी लोकशाही
चालविली जाऊ शकत नाही. लोकशाही ही देशातल्या प्रत्येक नागरिकांचा विचार करणारी
एकमेव व्यवस्था आहे. परंतु आज भारताच्या लोकशाहीला भाजपा नावाचे ग्रहण लागले आहे.
आरएसएस नावाचे विषारी संघटन लोकशाहीला दमनशाहीत बदलण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील
आहे. देशातला सामान्य माणूस, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक भाजपा-आरएसएस च्या
दमनशाहीचा शिकार होत आहे. भारतीय संविधान आणि
व्यवस्थेच्या संबंधाने काही असामाजिक तत्वांकडून समाजात दुषित वातावरण निर्माण केले
जात आहे.
या असामाजिक तत्वांचा त्यामागचा हेतू (षड्यंत्र)
काय आहे हे आता हळूहळू प्रत्यक्षात दिसून येत आहे. समाजात अंतर्गत यादवी निर्माण व्हावी यासाठी काही असामाजिक तत्वांकडून संघर्षाची
ठिणगी टाकली जात आहे. ज्यामुळे देशातील नागरिकांची सुरक्षितता
आणि देशातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येत आहे. देश आज अराजकतेच्या
ज्वालामुखीवर उभा आहे.
भावनिकतेच्या
बळावर केलेले राज्य विचारांच्या राज्याला मात करून पुढे जाते हे जेव्हा हळूहळू सिद्ध
व्हायला लागते तेव्हा धाकाच्या बळावर मिळालेले हृदयावरचे अधिराज्य अधिकच प्रखर आणि
कणखर बनत जाते. कंचे आणि गिल्ली-दांडू खेळतांना पळवापळवी खूप झाली. जाम थकलेलो आहोत आता.
हातात फक्त दंडूच उरला आहे. आता याच दांडूने चामडी
सोलेपर्यंत हाणले तरी कुत्र्यांच्या हातात असलेली लगाम योग्य मार्गावर जाईल असे समजायला
हरकत नाही. पण गरज आहे की हातातला दांडू चालविण्याची.
योग्य शिकवण आम्ही घेतली आहे की नाही हे समजण्याची. अन्यथा चालवायचा कुठे आणि लागायचा
कुठे. सोलायला
भलतेच गेलो आणि भलतेच सोलले गेले. ही साधार भीती निर्माण
होण्याची शक्यता अधिक आहे.
इथे
एक रोग पसरलेला आहे. ब्रेन ट्युमर ने डोके
फाटत चालले. विचारांना तर जागाच नाही. राजेशाहीचा
थाट मात्र सतत सोबत ठेवला जातो. अगदी चीतेवरही. आता या ट्युमर भरलेल्या डोक्यातून रस्त्यावर उभ्या होतील मातीच्या चित्रविचित्र
रंगीबेरंगी गळ्यात गंडे धागे दो-यात लटकविलेल्या मण्यांच्या माळेसोबत
ढिसूळ भिंती. व्हा
रे माझ्या भारत देशा ! लायकी
नसणा-यांना पैदा केलास सत्तेच्या खुर्च्या झिजविण्यासाठी. हा
दोष तुझा नाही. तुझी माती ज्या सांडपाण्याने हजारो वर्षे भिजली
होती त्या सांडपाण्याच्या संसर्गाने उगविना-या पिकाच्या मशागतीची
आहे. विचारांच्या शुद्ध पाण्याची मशागत होऊ न देण्याची शपथच घेतली
गेली आहे. त्यात तुझा काय दोष असणार आहे. देशहितासाठी बरबाद झालेले समाजातूनही बरबाद झाले. आणि
स्व:ताच्या राजकीय पोळी शेकण्यासाठी जगलेले समाजासाठी हृदयसम्राट
झाले. बदललेल्या मानसिकतेची आणि बदललेल्या पिढीची कदाचित हीच
चाहूल समजावी. आता राजकीय भडवेगिरी सुरु झाली आहे.
दगडांच्या
प्रदेशातून दगड गायब करता
येऊ शकतात. अहो निसर्गाचा नियम आहे.
दगड भरलेल्या पहाडावरदेखील पावसाळा आणि हिवाळ्याच्या ऋतूमध्ये दगड हद्दपार
होतात. आणि नजरेला दिसतो तो हिरवागार मोहक निसर्ग, हिरवागार गालीचा.
दगड तेव्हाच बाहेर पडतात जेव्हा सुका पडलेला असतो.
पायाला ठोकर लागण्यासाठी दगड रस्त्यावर उघडी पडतात जेव्हा निसर्गातला
गारवा नष्ट होतो. निसर्गनियमाला आम्ही मान्य जर करीत असू तर दगडांना
हद्दपार करायला वेळ लागणार नाही. गरज आहे समाजातला आणि माणसांमाणसांमधला
गारवा टिकवून ठेवण्याची. दगडांच्या प्रदेश हद्दपार होऊ शकतो एवढा
विश्वास मात्र निर्धाराने पाळा.
हल्ली
महापुरुष जन्माला येत नाही. १९ व्या आणि २० व्या
शतकाच्या सुरवातीच्या काळातच महापुरुष जन्माला येण्याला निसर्गाची साथ होती का
? मानवी संयोगाचा तोच एक सुवर्णकाळ होता का ज्यामुळे अनेक महापुरुष जन्माला
घातले गेले ? मग आताच्या मानवी संयोगात काही विघ्नसंतोषी दोष
निर्माण झाले आहेत का ? महापुरुषांच्या व्याख्या बदललेल्या आहेत
का ? महापुरुषत्वाच्या पात्रता आणि अटी बदललेल्या आहेत का
? प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. आधुनिक
पिढीच्या उत्कर्षातील कालसापेक्ष बदल नको त्या दिशेने जाणीवपूर्वक वळवला जातो आहे.
आपल्याला ते माहित आहे का ? महापुरुष जन्म घेत नाही.
महापुरुष उत्कर्ष पावतो. भट्टीवर मातीच्या विटेला
तापवून जशी कणखर आणि मजबूत केली जाते. तशीच सामाजिक परिस्थितीत
सामाजिक जाणीवेने महापुरुष निर्मितीचा आरंभ सुरु होतो. पण हल्ली
ती सामाजिक परिस्थिती राहिली नाही का ? त्या सामाजिक जाणीव मृतप्राय
झाल्या आहेत का ? मानवी संवेदना बोथट झाल्या आहेत का
? यापैकीही काहीच झालेले नाही. तर महापुरुष निर्मितीची
सामाजिक प्रक्रिया लोप पावली आहे. सामाजिक परीवेशातून उदयास येणारे
महापुरुषत्व आता राजकीय परीवेशातून हस्तांतरित होऊ लागले आहे. लादले गेलेले महापुरुषत्व आणि समाजमान्य स्वयंप्रकाशित महापुरुषत्व यात मोठे
महदंतर आहे. हस्तांतरित महापुरुषत्वाचे तुम्ही बळी ठरत आहात का
?
आज या देशाला वाचवायला कुठलाही महापुरुष येणार नाही. या
देशाच्या विकासाची गुढी उभारायला कुठला तत्वज्ञानी जन्म घेणार नाही. अशा
परिस्थितीत या देशाला मानवतेच्या मार्गावर मार्गस्त करायचे असेल तर माणसांची मने
जोडणारा नेता आम्हाला शोधावा लागेल. माणसांसाठी लढणारा, या देशाचे मुल्यगर्भ
जपणारा नेता आम्हाला निवडावा लागेल. बहुसंख्य बहुजन वर्गाचे सामाजिक कल्याण
केंद्रस्थानी ठेवून सत्तेशी लढा देणारे नेतृत्व आम्हाला स्वीकारावे लागेल. आज बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे फक्त निवडणुकांचे राजकारण
करीत नाही. जे काही राजकारण करतात ते सामाजिक परिस्थितीचा आणि बहुजन समाजाचा विचार
करून करतात. बाळासाहेबांना देखील महाराष्ट्राच्या 288 जागा लढविता येतात.
बाळासाहेबांना देखील लोकसभेच्या ५४८ जागा लढविता येतात. पण हा नेता मतदानाची
संख्या वाढवत नाही. हा नेता समविचारी / समदुःखी माणसांची मने जोडतो. समाजासमाजात
प्रेम व सद्भाव वाढवितो. देशातील राजकारणावर सदैव चिंतन करून कल्याणकारी
राजकारणाची कास धरतो. माणसांच्या कल्याणाचे लढे उभारतो. मा. बाळासाहेब आंबेडकर हे नेते
म्हणून वावरत असतांना सदैव वर्तमान आणि भविष्याच्या राजकीय आणि सामाजिक,
सांस्कृतिक, धार्मिक आक्रमणापासून बहुजन समाजाला कसे वाचविता येईल याचा विचार
करतात. राजकीय पदाची लालसा बाळासाहेब आंबेडकरांनी कधीच बाळगली नाही. सर्व राजकीय
पदे उपभोगण्याची संधी असतांना व तशी कुवत असतांना देखील राजकीय पदासाठी मा.
बाळासाहेब आंबेडकरांनी समाजाचा लिलाव केला नाही. मतांचा व्यवसाय केला नाही.
त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीत याआधी किती
मते मिळाली. किंवा भविष्यात किती मते मिळणार आहेत. याचे गणित करण्यापेक्षा त्यांनी
किती मने जोडली ? याचे गणित समाजाने आणि कार्यकर्त्यांनी करावे. याचा विचार बहुजन
समाजातील राजकीय व्यवसाय चालविणाऱ्या लोकांनी करावा. आजच्या तरुण पिढीने करावा.
तेव्हा नक्कीच मा. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात हा बहुजन समाज आपल्या इप्सित
ध्येयापर्यंत पोहचू शकेल.
अलीकडे एकत्रीकरणाच्या भावनिक
गप्पांना जोम चढला आहे. २०१९ च्या
निवडणुका पाहून राजकीय इच्छाशक्ती वाढलेले कार्यकर्ते एकत्रीकरणाच्या कामाला
जोमाने लागले आहेत. काही तर सवळ मिळेल तिथे एकत्रीकरण झाले पाहिजे म्हणून बोंबा ठोकून मोकळे होतात. एकत्रीकरण झाले
पाहिजे असे म्हटले कि त्यांची जबाबदारी संपली. खर तर इतिहास एकत्रीकरणासाठी पोषक
नाही. आणि हल्लीचे वातावरणही
पोषक नाही. अश्या परिस्थितीत रिपब्लिकन पक्षांचे आणि नेत्यांचे एकत्रीकरण करण्याचा
अट्टाहास करणे म्हणजे चळवळीला आणि समाजाला २० वर्षे मागे टाकणे आहे. खरच आम्ही
कुठल्या दिशेने विचार करीत आहोत ? मुळात
राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या एकत्रीकरणाचीच आठवण का होते ? जिथे समाजच एकत्र नव्हता तिथे नेते एकत्र येऊन काय करतील ? आज समाज
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात एकत्र येत आहे. त्यामुळे राजकीय एकत्रीकरणापेक्षा राजकीय
पर्यायाची निवड होणे
हीच काळाची गरज आहे. राजकीय एकत्रीकरणापेक्षा सामाजिक एकत्रीकरण होणे महत्वाचे
आहे. दुभंगलेला समाज जोडणे गरजेचे आहे. सामाजिक संस्था संघटनांचे एकत्रीकरण होणे
गरजेचे आहे. समाज,
सामाजिक संस्था-संघटना आणि तरुण शिक्षित-उच्चशिक्षित पिढी यांच्या
एकत्रीकरणातूनच सशक्त राजकीय पर्याय उभा होऊ शकतो. यावर गांभीर्याने विचार व्हावा. भाजपा आणि
आरएसएस च्या उधाणलेल्या घोड्यांना २०१९ पर्यंत रोखायचे असेल तर २०१९ च्या सूर्य
उजळण्याआधी भारतीयत्व टिकवू पाहणाऱ्या, संवैधानिक नितीमुल्य संवर्धित करू
पाहणाऱ्या सर्व भारतीयांनी एकत्रितपणे लढा उभारणे गरजेचे आहे. तेव्हाच या देशातली
लोकशाही भाजपा/आरएसएस च्या तावडीतून वाचविता येईल.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
No comments:
Post a Comment