Friday, 20 April 2018

मनुवादी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?


#Once_Again_Ambedkar
मनुवादी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?
                                         ---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.            

          
मा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९७ मध्ये त्यांच्या केसरीमधून “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” या शीर्षकाखाली अग्रलेख लिहिला होता. या अग्रलेखाचा संदर्भ आजही पाठ्यपुस्तकातून अभ्यासायला मिळतो. इंग्रज सरकारच्या जुलमी, अन्यायी कारभाराविषयी आणि कारवाई विषयी भाष्य करणारा हा लेख होता. हा लेख लिहण्यामागची भूमिका वरकरणी राष्ट्रवादाची वाटत असली तरी ती राष्ट्रवादी भूमिका नसून जात्यांद्धिक भूमिका होती. कारण जातीय ब्राम्हणी वर्चस्व नाकारणाऱ्या इंग्रजांनी आपल्या प्रशासन काळात भारतातील जातीय श्रेष्ठत्वाला गौणत्व देवून राज्यकारभार केला. १८९७ मध्ये मुंबई-पुणे प्रांतात प्लेग ची साथ सुरु झाली होती. प्लेग ची साथ नियंत्रणात यावी व ती पसरू नये यासाठी चार्ल्स रँड यांनी प्लेग च्या रोग्यांना वेगळ्या छावणीत ठेवण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर ज्यांना प्लेग ची लागण झाली आहे अशा संशयितांना देखील त्याच छावणीत ठेवण्याचा निर्णय घेतला. सोबतच ज्या उंदरांमुळे हा रोग पसरला होता ते उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरु केली. याला पुणेकरांचा विरोध होता. प्रत्येक घरात घुसून फवारणी केली जात होती. साथीचा फैलाव होऊ नये म्हणून घरातील कपडे, समान जाळून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पुणे प्रांतात चार्ल्स रँड यांच्या कार्यप्रणाली विरुद्ध मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळू लागला होता. चार्ल्स रँड यांच्या या निर्णयाने दुखावल्यामुळे मा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्या केसरीतून रँड यांच्या फवारणी मोहिमेच्या विरोधात “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला. या लेखात टिळक लिहितात, “रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.” या लेखामुळे कमिशनर रँड याच्या विरोधात असंतोष निर्माण होण्यास वाव मिळाला. या असंतोषाचा परिणाम असा झाला की, पुण्याचे चाफेकर बंधू यांनी कमिशनर रँड व त्यांचे सहकारी आयरेस्ट यांची गोळ्या घालून हत्त्या केली. जीवघेण्या प्लेगसारख्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रिटीश सरकारने घेतलेल्या निर्णयाने इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेचे दैवत दुखावले जात होते म्हणून सरकारला धारेवर धरणारी टिळकांची लेखणी व त्यातून ब्रिटीश कमिशनर चार्लस रँड यांची झालेली हत्त्या जर समाज पटलावर मान्यता मिळवून देणारी असेल तर आज त्याच टिळकांची आठवण करून टिळकांना आपले आराध्य वैचारिक दैवत मानून सत्तेवर आलेल्या भाजपा-आरएसएस सरकारच्या माध्यमातून देशात माजवल्या जाणाऱ्या सांप्रदायिक अराजकतेविरोधात इथल्या भारतीय माणसाने या “मनुवादी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” असे का विचारू नये.

          राज्यकर्ते तुघलकी निर्णय घेत असतील तर त्यांच्या तुघलकी निर्णयाचा विरोध करण्याचा अधिकार इथल्या नागरिकांना या देशाच्या संविधानाने दिला आहे. ब्रिटीशांचे राज्य म्हणजे परकीयांचे राज्य. त्यामुळे परकीयांनी अन्याय अत्याचार केले तर एकदाचे मान्य करून घेता येईल. परंतु जेव्हा स्वकीय सत्तेवर येऊन स्वकीयांच्या विरोधातच अन्याय अत्याचारी राज्य करीत असतील तर अश्या स्वकीय सत्तेला आम्ही लोकशाहीत जनतेने निवडून दिलेली प्रजासत्ताक सत्ता कसे म्हणायचे ? ज्या कालखंडात देश विज्ञानाची कास धरून, माणुसकीला धर्म समजून वाटचाल करू पाहतो आहे. त्याच कालखंडात देशावर आलेली मनुवादी विचारांची भाजपा सरकार पुरस्कृत जातीय व धार्मिक दंगली देशात घडवून आणीत आहे. जातीच्या व धर्माच्या आधारे देशाला विभाजित करीत आहे. पोलिसी बळाचा वापर करून निरपराध लोकांवर खटले दाखल करीत आहे. आता तर ही मनुवादी सरकार आरएसएस ने तयार केलेल्या असामाजिक तत्वांना व पोलिसांना हाताशी धरून कायदेशीर व शांततापूर्ण मार्गाने सरकारच्या धोरणांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात शिरून आंदोलकांना वेठीस धरीत आहे. मनुवादी भाजप सरकारचे लोक आता आमच्या घरात शिरून आमच्या स्वयंपाक घरातल्या भांड्यांमध्ये काय शिजले आहे ? हे पाहायला लागले आहे. त्यावरून हत्त्या केल्या जाऊ लागल्या आहेत. आज देशातले सामाजिक व राजकीय वातावरण जणू काही रणांगण झालेले आहे. ही मनुवादी भाजपा व आरएसएस ची माणसे देशाची सत्ता चालवायला निघाले आहेत की देशातील जनतेसोबत युद्ध करायला निघालेले आहेत ? याचे उत्तर आज प्रत्येक भारतीय या सरकारला विचारीत आहे.

          भाजपच्या मनुवादी सरकारचा एकमेव उद्देश या देशाचे जातीय व सामाजिक ध्रुवीकरण करणे आहे. त्यामुळे सरकारची प्रत्येक कृती ही त्याच दिशेने वाटचाल करतांना दिसून येत आहे. भाजपच्या मनुवादी सरकारची मागच्या ४ वर्षातील सरकारी जाहिरातींचा ओघ आणि आशय बघितला तर असे दिसून येईल की, सरकारला या देशात योजना राबवायच्या नसून फक्त जाहिरातींमधून दोन समाजात, दोन विचारांत, दोन समूहात द्वेष प्रसारित करायचा आहे. आदिवासींच्या नावाने केलेल्या जाहिरातीत “या माओवाद्यांनी आमची विकासाची वाट रोखून धरली आहे.” अशा प्रकारचा आशय देऊन आदिवासींना भ्रमित केले जात आहे. तर दुसरीकडे देशाच्या अन्य भागात असलेल्या आदिवासींच्या विकासाची वाट कुणी रोखून धरली ? देशातल्या अन्य भागातल्या आदिवासींच्या विकासाची वाट रोखून धरणारे माओवादी आहेत की मनुवादी ? हा इथल्या आदिवासींचा इथल्या मनुवादी सरकारला प्रश्न आहे. एकीकडे देशात मेरीट च्या नावाखाली आरक्षणा विरोधात जाणीवपूर्वक द्वेष पसरविला जात आहे. तर दुसरीकडे अल्पसंख्याक वर्गाला दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे ढोल पिटतांना ही मनुवादी सरकार शिष्यवृत्ती आणि मेरीट चा संबंध जोडतांना दिसते. अलीकडे अल्पसंख्यांक वर्गासाठी दिली जाणारी शिष्यवृत्तीची सरकारी जाहिरात रेडिओ व दूरध्वनीवर सुरु आहे. त्या जाहिरातीत एका निरागस मुलीच्या व तिच्या वडिलांच्या तोंडी या भाजपच्या मनुवादी सरकारने ”सरकारच्या अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीमुळे मी मेरीट मध्ये आली.” असे घातले. मेरीट चा संबंध हा बुद्धिमत्तेशी येतो. व शिष्यवृत्तीचा संबंध हा आर्थिक कमकुवतपणा व सामाजिक मागासलेपणाशी येतो. शिष्यवृत्ती ही सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला दिली जाते. त्यामुळे एखादा शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी हा मेरीट मध्ये आला असला तरी तो शिष्यवृत्तीमुळे आला असे म्हणता येत नाही. एवढेच म्हणता येईल की, शिष्यवृत्तीने त्याला शिक्षणाची संधी दिली परंतु त्याच्या बुद्धिमत्तेने त्याला मेरीट मिळवून दिले. मग शिष्यवृत्तीचा व मेरीट चा संबंध येतो कुठे ? परंतु सरकारला जाणीवपूर्वक या देशात आरक्षण व शिष्यवृत्ती विरोधात मानसिकता तयार करायची आहे. व तथाकथित जन्मजात मेरीट चे ढोल पिटणाऱ्या समूहाला चिथावणी देऊन समाजा-समाजात संघर्ष उभा करायचा आहे. ही सरकार आहे की माणसांचे युद्ध लावणारी यंत्रणा आहे ? आता आमच्या बुद्धिमत्तेला तुमच्या दीडदमडीच्या शिष्यवृत्तीची किनार लावून परत आमच्या बुद्धिमत्तेला जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न खुद्द सरकार करीत आहे. याचा निषेध आम्ही भारतीय नागरिकांनी का करू नये ?

          यापुढे जाऊन या देशातील मनुवादी सरकार जो विचार इथल्या मनुवादी मानसिकतेला तोडू पाहतो त्या विचाराला बदनाम करण्याचे षड्यंत्र करीत आहे. आंबेडकरी विचारांना नक्षलवादी संबोधण्यापासून ते शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याला भिडे व एकबोटे सारख्या आरएसएस-मनुवादी विचारांच्या लोकांना हाताशी घेऊन महाराजाच्या रयतेच्या राज्याला ब्राम्हणी राज्यात बदलू पाहत आहे. ब्राम्हणी मनुवादी राज्यनीर्मितीच्या मोहात पडून भिडे-एकबोटे च्या माध्यमातून बहुजन हिंदू समाजावर हल्ला चढविला जात आहे. व त्याच भिडे-एकबोटे यांना निरपराध घोषित करण्यासाठी संपूर्ण सत्ता व सरकारी यंत्रणा कामाला लावली जात आहे. परंतु जेव्हा हाच बहुजन हिंदू रस्त्यावर येऊन भिडे-एकबोटे च्या विरोधात आवाज उठवितो. तेव्हा रत्यावर उतरणाऱ्या बहुजन तरुणाला त्याच्या घरात घुसून, त्याच्या घराची तोडफोड करून, घरातल्या माणसांवर दंडुके चालवून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेल मध्ये टाकण्यापर्यंत व त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करेपर्यंत कमालीची अमानवीयता ही मनुवादी सरकार दाखवीत आहे. कायम सामाजिक अन्याय अत्याचाराला बळी पडलेल्या समूहाला सुरक्षा प्रदान करता यावी म्हणून आलेल्या अ‍ॅट्रॉसिटी सारख्या कायद्याला निरस्त करून, परत त्या उपेक्षित अनुसूचित जाती-जमाती समाजाला अन्याय व अत्याचाराच्या खाईत लोटू पाहणाऱ्या या मनुवादी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? हे या देशातल्या जनतेने या मनुवादी सरकारला विचारू नये का ?

          विकासाच्या नावाचे शाब्दिक फुगे फोडता फोडता इथे “शौचालय का होल” विकण्याची सरकारी जाहिरात केली जात असेल तर सरकार संसदेतून सत्ता चालविते की टॉयलेटच्या सीट वर बसून सत्ता चालविते ? याचा खुलासा सरकारने करावा. देशातल्या अन्य समस्या संपून फक्त टॉयलेट हीच एक समस्या उरलेली आहे अशा आविर्भावात सरकार मागच्या चार वर्षापासून “शौचासिंग व लौटासिंग” ची जाहिरात करीत आहे. टॉयलेट च्या समस्येने जणू काही देशात प्लेग ची समस्या येणार आहे. असेच देशाला वाटायला लागले आहे. शरीरातील घाण कुठे व कशी बाहेर काढायची हे देशातल्या नागरिकांना सांगणारी मनुवादी सरकार दुसरीकडे देशातल्या नागरिकांच्या डोक्याच्या मस्तीष्कातील जातीय व धार्मिक श्रेष्ठत्वाची घाण मात्र दिवसेंदिवस वाढवत चालली आहे. त्यामुळे चार्लस रँड यांच्या पावलांवर पाऊले ठेवून नरेंद्र मोदी घराघरात फक्त टॉयलेट बांधायला निघालेले आहेत. परंतु त्या घरातला तरुण या मनुवादी सरकारच्या कार्यकाळात बेरोजगार बनत चालला आहे. त्याच घरातला शेतकरी सरकारच्या कृषीविरोधी धोरणाने आत्महत्या करीत आहे. त्याच घरातली म्हातारी पायाचे चामडे सोलेपर्यंत झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मंत्रालयापर्यंत पायी चालत येत आहे. त्याच घरातली तरुणी/महिला जातीच्या नावाने बलात्काराची शिकार होत आहे. सरकारने रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्याने त्याच घरातल्या धान्याचे डबे धान्यावाचून उघडे पडलेले आहेत. त्याच घरातील निरागस बालके सरकारच्या निष्क्रिय शैक्षणिक धोरणाने व शिक्षणाच्या व्यापारीकरणाने शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अंतर्मनातली मानवीयता हेलावून टाकणाऱ्या या महत्वपूर्ण वास्तविकता ज्या सरकारला दिसत नाही ती आंधळ्यांची सरकार म्हणायची कि डोळ्यावर मनुवादी पट्टी बांधून जातीय श्रेष्ठत्वासाठी आंधळी झालेली मनुवादी सरकार म्हणायची ?

          विकासाच्या नावाखाली २०१४-१५ या वर्षात उद्योगपत्यांचे करोडो-अब्जो रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. मिडीयावरचे अब्जो रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. व जाहिरातींवर करोडो-अब्जो रूपये खर्च करण्यात आले. विकासाच्या नावाखाली नोटाबंदी लादून काही मोजक्या राजकारणी व उद्योगपती यांच्या जवळील काळा पैसा पांढरा करण्यात आला. विकासाच्या नावाखाली जीएसटी लादून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढविण्यात आल्या. याचा हिशोब या देशातल्या नागरिकांनी सरकारकडून घ्यायचा की नाही ? विकासाच्या नावाखालीच चोरपावलांनी विजय मल्ल्या, निरव मोदी, चोक्सी सारख्यांना देशाचे करोडो-अब्जो रूपये बुडवून विदेशात पाठविण्यात आले. परंतु ही सरकार त्या विरोधात ब्र काढायला सुद्धा तयार नाही. हा पैसा या देशातल्या जनतेचा नव्हता का ? मात्र दुसरीकडे पोटापाण्यासाठी शहरात स्थलांतरित झालेल्या गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोजर चालवून सरकारी जमिनी बिल्डरांच्या घशात घालणारी सरकार भारतीयांनी निवडून दिलेली आहे की, चंद्रावरून निवडून आलेली आहे ? नरेंद्र मोदी चंद्रावर बसून जमिनीवर असलेल्या भारताची चौकीदारी करीत आहेत ? की, संघ मुख्यालयात मोहन भागवतांच्या मांडीवर बसून मनुवादाची चौकीदारी करीत आहेत ? की देशाच्या संसदेत बसून भारतीय नागरिकांची चौकीदारी करीत आहेत ? नेमकी ही मनुवादी सरकार कुणाची चौकीदारी करीत आहे ? नरेंद्र मोदी या देशाच्या विकासाचे स्वप्न कमी परंतु अंबानींच्या ‘जिओ’ चे स्वप्न पाहण्यात अधिक मग्न आहेत. या देशाचा खुद्द प्रधानमंत्री अंबानीच्या खाजगी कंपनीची जाहिरात कुठल्या देशहीतातून करतात ? नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान म्हणून या देशाच्या राष्ट्रगीतावर कमी पण ‘जिओ धन धणा धन’ च्या तालावर अधिक नाचतांना पाहून भारतीयांची मान शरमेने खाली झुकायला लागली आहे. भाजप-मोदी सरकारने मनुवादी जहरी विचार प्राशन केल्याने डोक्यातली सत्तेची नशा घुटण्यात आली असेल. परंतु देशातल्या जनतेने अजूनही ही लोकशाही त्यांच्या डोक्यातच शाबूत ठेवली आहे. हे सरकारने विसरू नये. सांप्रदायिकतेचे वातावरण तयार करून, जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करून, देशात दंगे घडवून आणून राज्य करता येईल अशा भ्रमातून मनुवादी मोदी-भाजप-आरएसएस सरकारने बाहेर पडावे. मनमानी राज्यकारभार करून देशातल्या जनतेला मूर्ख बनविणे या सरकारने बंद करावे.

          २०१४ ला देशाच्या सत्तेवर आलेली भाजप-आरएसएस-मोदी मनुवादी सरकार सुरवातीला देशातील जनतेला न्याय देईल असे ज्यांना ज्यांना वाटले होते त्यांचाही आता भ्रमनिराश झालेला आहे. त्यामुळे २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येतांना पाहून सरकारने सामाजिक धृवीकरणाला, सांप्रदायिकतेला, अंतर्गत कलहाला, समाजात जातीय व धार्मिक संघर्षाला चालना देण्याचे काम सुरु केले आहे. देशातल्या बेरोजगार युवकांची माथी भडकावून दंगली घडविण्याचा कट ही मनुवादी सरकार रचू पाहत आहे. अनावश्यक असलेल्या विषयांवर चर्चा उत्पन्न करून सरकारच्या कमकुवतपणावर देशातील जनतेचे दुर्लक्ष करू पाहत आहे. देशातील संविधानाला पायदळी तुडवून मनुवादी संविधान लादू पाहत आहे. तेव्हा टिळकांनी चार्लस रँड च्या माध्यमातून ब्रिटिशांना विचारले होते की, “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” तेच आज देशातली जनता नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मनुवाद्यांना विचारत आहे. टिळकांचा आदर्श घेऊन राज्यकारभार करणाऱ्या मोदींच्या भाजप-आरएसएस मनुवादी सरकारच्या विरोधात आज देशातील जनतेचा असंतोष वाढत चालला आहे. भारतीयांची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आली आहे. बंधुभाव धोक्यात आला आहे. सामाजिक वातावरण अमानवीय बनत चालले आहे. भारतीयांचे नैसर्गिक जीवन सरकारच्या मनुवादी कट-कारस्थानाने हिरावून घेतले आहे. अशा परिस्थितीत देशातला प्रत्येक नागरिक टिळक किंवा चाफेकर बनून नव्हे तर आंबेडकर आणि भगतसिंग बनून विचारायला लागला आहे या “मनुवादी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?” देशहितासाठी या सरकारलाच ठिकाणावर आणणे आता प्रत्येक भारतीयांचे नैतिक कर्तव्य बनले आहे.

                                                                           adv.sandeepnandeshwar@gmail.com
¤¤¤
#Once_Again_Ambedkar

No comments:

Post a Comment