#Once_Again_Ambedkar
आम्ही का
अडकतो मनुवादी बाहुपाशात ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
मनुवाद ही
एक कल्पना आहे. जी माणसाला माणूस न समजता रानटी अवस्थेकडे घेऊन जाते. मनुवाद ही एक
मानसिकता आहे. अशी मानसिकता जी स्वतंत्र विचार करण्याची मुभा देत नाही. मनुवाद एक
क्रूर विचार आहे. ज्या विचाराने मानवता संपवून अविचारी व अमानवी रूढी, प्रथा,
परंपरा, संस्कृती निर्माण केली. या कल्पनाविलासी मानसिकतेतून निर्माण झालेल्या
क्रूर विचारांनी एक व्यवस्था निर्माण केली जी मनुवादी व्यवस्था म्हणून आपल्या
सर्वांना परिचित आहे. इ.स. ४ थ्या शतकात लिहिल्या गेलेल्या मनुस्मृती नावाच्या
ग्रंथातून निर्माण झालेली वर्णवर्चस्ववादी व्यवस्था विशिष्ट समूहाच्या हितासाठी
समाजावर लादण्यात आली. ज्यामुळे भारतीय समाजाचीच नव्हे तर मानवी जीवनाची
स्वतंत्रता अवरुद्ध झाली. माणसाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाला मनुवादाने
बंधने घातलीच परंतु त्यासोबतच माणसांच्या माणूसपणाला देखील बंधनात बांधून ठेवले.
१७ व्या व १८ व्या शतकातील पेशवाई हा मनुवादी व्यवस्थेचा
उच्चांक होता. या मनुवादी जोखडातून माणूसपणाला मुक्त करण्याची पहिली सुरवात इ.स.
१८१८ ला भीमा कोरेगाव च्या युद्धाने झाली. या युद्धात मनुवादी पेशवाई माणूसपणासाठी
लढणाऱ्या शूर सैनिकांसमोर नतमस्तक झाली. मनुवादी व्यवस्थेला पहिला तडा भीमा
कोरेगाव च्या युद्धाने दिला. त्यानंतर राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती, महात्मा
जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मनुवादी रूढी, प्रथा, परंपरा व
संस्कृतीविरोधात लढा उभा करून मनुवादाने नाकारलेले माणूसपण परत समाजातील प्रत्येक
घटकाला मिळवून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. शेवटी शाहू महाराज आणि डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजात विळखा मारून बसलेल्या मनुवादी व्यवस्थेला कायमचे
हद्दपार करण्यासाठी निकराची झुंज दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय
संविधानाच्या माध्यमातून इथली मनुवादी व्यवस्था संपवून लोकराज्य स्थापित केले. व
माणूसपण नाकारलेल्या समाजाला हक्काचे माणूसपण बहाल केले. परंतु मनुवादी व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून हद्दपार केली असली तरी
मनुवादी मानसिकता मात्र काहींच्या डोक्यातून गेली नाही. मनुवादाचे गर्भाशय
असलेल्या आरएसएस या संघटनेने मनुवादी मानसिकता कायम टिकवून ठेवण्याचा कसोशीने
प्रयत्न केला. भारतीय संविधानाला नाकारून, सांसदीय व्यवस्थेला नाकारून, भारतीय
तिरंगा नाकारून, हिंदूंच्या नावाने धर्मराज्याच्या बुरख्याआड मनुवादी मानसिकता
कायम वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न आरएसएस ने केला. हिंदू धर्म बुरख्याआड माणसांचे
मानसिक वशीकरण केले. ज्यामुळे हिंदू रक्षणाच्या नावाखाली हिंदूच हिंदूंचे भक्षक बनले.
धर्माच्या बुरख्याआड हिंदू संरक्षणाच्या नावाखाली अल्पसंख्यांक हिंदूंनी
बहुसंख्यांक हिंदूंचे मानसिक शोषण केले. ‘जात’ ही त्या मानसिक शोषणाच्या
केंद्रस्थानी राहिली. आज त्याच वशीकरणाच्या बळावर परत सत्ता काबीज करून मनुवादी व्यवस्था
निर्मितीकडे पाऊले टाकायला सुरवात झाली आहे.
मनुवादी व्यवस्था व मनुवादी सत्ता ही तेव्हापर्यतच टिकून
राहते जोपर्यंत बहुसंख्यांक हिंदू मानसिक वशीकरणाच्या प्रभावात वावरतात. जेव्हा
बहुसंख्यांक हिंदू या मानसिक वशीकरणातून बाहेर पडू लागतात, तेव्हा मनुवादी
व्यवस्था व मनुवादी सामाजिक -राजकीय सत्तेची पाळेमुळे खिळखिळी व्हायला लागतात. डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी हे चांगल्याने ओळखले होते. धर्माच्या नावाने, जातीय श्रेष्ठत्वाच्या
नावाने, अधिकाराच्या नावाने, हक्काच्या नावाने, परंपरेच्या नावाने केले जाणारे
वशीकरण तोडायचे असेल तर बहुसंख्यांक हिंदुंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा
फोडणे गरजेचे आहे. त्याशिवाय समाज मानसिक वशीकरणातून बाहेर पडणार नाही. म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड
करून उठेल.’ माणसां-माणसांमधील जातीय श्रेष्ठत्वाची दरी संपविली पाहिजे. माणसां-माणसांमधील
हक्क व अधिकाराच्या बाबतीतली दरी संपविली पाहिजे. तेव्हाच मनुवादी अव्यवहारी
मनोरचना कोलमडून पडेल. जातींचे केंद्रस्थान उध्वस्त केल्याशिवाय समानतेची भिंत उभी
करता येणार नाही. ती समानतेची भिंत भारतीय संविधानाने उभारली आहे. त्यामुळे
मनुवादी व्यवस्था पुनःश्च्य या देशात लादली जाणार नाही यासाठी भारतीय संविधानाने
निर्माण केलेली समानतेची व्यवस्था हे एकमेव पर्याय आज आपल्यापुढे असल्याचे दिसून
येते.
मनुवादी व्यवस्थेला पुनःश्च्य या देशावर आपले राज्य कायम
करायचे असेल तर हिंदुप्रणीत मानसिक वशीकरण करणे गरजेचे आहे हे आज आरएसएस ला
चांगल्याने अवगत झालेले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचे हिंदुकरण करायला त्यांनी
सुरवात केलेली आहे. २०१४ पासून भाजपा-आरएसएस ने देशात केलेले बदल, महत्वाच्या
संस्थांमध्ये केलेले बदल, भारतीय संविधानाच्या प्रस्थावनेत केलेले बदल, भारतीय
संविधानाचे सोयीनुसार केलेले विश्लेषण, भारतीय संविधानाच्या उद्धीष्ठांचे महत्वाचे
अंग असलेले आरक्षण व त्याविषयी समाजात निर्माण केल्या गेलेल्या गैरसमजुती,
त्याआधारावर न्यायप्रणालीत केली जाणारी आरक्षणाची व्याख्या, कल्याणकारी व्यवस्थेचा
विकासाच्या पडद्याआड सोयीनुसार बदलेला अर्थ हे सर्व बदल भारतीय संविधानाच्या
हिंदूकरणाचे पथदर्शक आहे. व हे सर्व मनुवादी हिंदू मानसिक वशीकरणातून चाललेले आहे.
आज भारतीय न्यायप्रणाली सुद्धा मनुवादी हिंदू मानसिक वशीकरणाला बळी पडलेली आहे असे
म्हटले तर वावगे ठरणार नाही. अश्याचप्रकारे मनुवादी हिंदू मानसिक वशीकरणातून जनमत
तयार होऊ लागले व त्या आधारे संविधानाचे अर्थ निघायला लागले तर हे सर्व भारतासाठीच
नव्हे तर स्वतःला भारतीय म्हणवून घेणाऱ्या संपूर्ण मानव समूहासाठी धोक्याचे आहे.
वशीकरणाला बळी पडणारी प्रवृत्ती ही एकतर कमकुवत मानसिकतेची
व परावलंबी असते. आज भारतीय समाजात निर्माण केली गेलेली विषमतेची दरी माणसांना
परावलंबी बनवीत आहे. ज्यामुळे आर्थिक परावलंबित्व, राजकीय परावलंबीत्व, सामाजिक
परावलंबीत्व वाढीस लागले आहे. या परावलंबीत्वामुळे माणसांची मानसिकता कमकुवत होऊ
लागली आहे. ज्याचा लाभ घेऊन आरएसएस माणसांचे मनुवादी मानसिक वशीकरण करीत आहे.
आरएसएस ने टाकलेल्या मनुवादी जाळात माणसे अडकायला लागली आहेत. फक्त माणसेच नाही तर
समूह मानसिकता, संघटना, पक्ष हे सुद्धा मनुवादी जाळात अडकायला लागली आहेत.
त्यामुळे मनुवादाची पाळेमुळे आणखीनच घट्ट होऊ लागली आहेत. आरएसएस ने टाकलेल्या
मनुवादी जाळ्यात माणसे अडकायला लागली आहेत म्हणून आपणही तेच जाळे टाकले पाहिजे ही
मानसिकता घेऊन आम्ही वाटचाल करणार असू तर आपणही आरएसएस च्या मनुवादी जाळ्यात अडकत
चाललो आहोत याचे ते लक्षण समजावे लागेल. आरएसएस च्या मनुवादी वशीकरणाचे आपणही बळी
ठरत आहोत हे ओळखावे लागेल. आरएसएस च्या मानसिकीकरणाचे आपणही शिकार व्हायला लागलो
आहोत हे निश्चित होत आहे.
नोव्हेंबर २०१४ पासून भाजपा व आरएसएस ने भारतीय
संविधानाच्या प्रस्ताविकेत पंथनिरपेक्षता शब्द जाणीवपूर्वक व पूर्वनियोजित
पद्धतीने घालणे सुरु केले आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत पंथनिरपेक्षता हा
शब्द घालणे म्हणजेच भारतीय संविधानाचे हिंदुकरण करणे होय. धर्मनिरपेक्षतेचे
पंथनिरपेक्षतेत परिवर्तन करतांना या दोन्ही शब्दातील भिन्न अर्थ भारतीय जनतेच्या लक्षातही
आले नाही. जनतेच्याच काय तर मनुवाद विरोधी म्हणवून घेणाऱ्या कुठल्याही विरोधी
पक्षाच्या लक्षात हे सर्व न येणे याचा अर्थ काय होतो ? एकतर तर त्या विरोधी
पक्षांना मनुवादी हिंदुत्व मान्य आहे. किंवा मनुवादी हिंदुत्वाच्या विरोधात उभे
राहण्याची हिम्मत स्वतःला मनुवादी विरोधी म्हणवून घेणारांकडे राहिलेली नाही हे
सिद्ध होते. आम्ही नकळत मनुवादी बाहुपाशात अडकत चाललेलो आहोत हे शक्य तितक्या लवकर
लक्षात घेणे त्यादृष्टीने गरजेचे आहे.
धर्मनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कुठलाही धर्म असणार नाही. राज्यकारभार
आणि व्यक्तिगत श्रद्धा यांच्यात धर्म आड येणार नाही. देशाचा राज्यकारभार कुठल्याही
एका धर्माच्या मान्यतेनुसार चालविता येणार नाही. एकंदरीतच व्यक्तिगत धर्माला
मान्यता देऊन राज्याचा कुठलाही एक धर्म राहणार नाही. विविध धर्म असलेल्या देशात
कुठल्याही एका धर्माला महत्व दिले जाणार नाही हा धर्मनिरपेक्षतेमागील गर्भिथार्थ
आहे. तर याउलट पंथनिरपेक्षता म्हणजे राज्याचा कुठलाही एकच धर्म आहे. आणि त्या एकाच
धर्मातील विविध पंथात भेद करता येणार नाही. किंवा राज्याच्या धर्मात असणाऱ्या
विविध संप्रदायातील (पंथातील) कुठल्याही एका संप्रदायाला घेऊन राज्यकारभार करता
येणार नाही. किंवा एका संप्रदायाला (पंथाला) महत्व दिले जाणार नाही. एकंदर विविध
संप्रदाय (पंथ) असलेल्या धर्मात (धर्मराज्यात) कुठल्याही एका संप्रदायाला (पंथाला)
महत्व दिले जाणार नाही हा पंथनिरपेक्षतेमागील गर्भितार्थ आहे. आता धर्मनिरपेक्षता
आणि पंथनिरपेक्षता या दोन्ही शब्दामागील अर्थ लक्षात घेतला तर २०१४ ला भाजप-आरएसएस
ची सरकार देशाच्या सत्तेवर येताच त्यांनी या देशाचा एकच धर्म आहे हे त्यांनी घोषित
करून टाकलेले आहे असेच लक्षात येते. म्हणजेच दुसऱ्या अर्थाने भाजप-आरएसएस ने या
देशातील अन्य धर्म नाकारले आहेत. किंवा हिंदू राष्ट्राची घोषणा त्यांनी भारतीय
संविधानाच्या प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाऐवजी ‘पंथनिरपेक्षता’ हा शब्द
घालून केलेली आहे असे म्हणण्यास वाव मिळतो. ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाऐवजी
‘पंथनिरपेक्षता’ करणे म्हणजे या देशाच्या संविधानाचा आत्माच काढून घेण्यासारखे
आहे. परंतु इतक्या मोठ्या बदलाच्या दिशेने भाजप-आरएसएस वाटचाल करीत असतांना या
विषयी कुठलीही प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून न येणे म्हणजे मनुवादी विळख्याने
आपली पकड घट्ट केली आहे असे म्हणण्यास वाव आहे. इतकेच नव्हे तर स्वतःला
धर्मनिरपेक्षतावादी म्हणवून घेणारे सुद्धा पंथनिरपेक्ष हा शब्द वापरू लागले आहेत
किंवा स्वीकारू लागले आहेत.
२ महिन्या अगोदर दिल्ली येथे सर्व धर्मनिरपेक्षतावादी व
मनुवादी आरएसएस-भाजप विरोधी पक्षांची ‘सांझी विरासत संमेलन’ पार पडले. या
संमेलनातून आरएसएस च्या धार्मिक उन्मादी व्यवहारावर व भाजप सरकारच्या अतिरेकी
वाटचालीवर सर्वच पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी टीका केली. परंतु याच संमेलनाच्या
स्टेज वर मागे लावण्यात आलेल्या ब्यानर वर संविधानाची प्रास्ताविक छापण्यात आली
होती व त्या प्रास्ताविकेत धर्मनिरपेक्षता या शब्दाऐवजी पंथनिरपेक्षता असाच
शब्दप्रयोग करण्यात आला होता. परंतु त्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. किंवा कुणीच
त्याकडे लक्ष दिले नाही. किंवा लक्ष असूनही डोळेझाक केली गेली. किंवा जाणीवपूर्वक
तो शब्दप्रयोग केला गेला. हे त्या संमेलनाच्या आयोजकांनाच माहिती असेल. परंतु
यावरून हे सिद्ध होते की, आज देश मनुवादी मानसिक वशीकरणात अडकत चाललेला आहे.
गुजरात निवडणुकांचे निकाल हाती आले. संपूर्ण देशाचे लक्ष या
गुजरातच्या निवडणुकीकडे लागलेले होते. भाजप सरकारची मागच्या ३ वर्षातील वाटचाल व
त्यामुळे त्रस्त झालेला गुजराती व्यापाऱ्यांचा वर्ग व मागासवर्गीय वर्गात निर्माण
झालेली असुरक्षिततेची भावना, याशिवाय गुजरात मध्ये मागच्या ३ वर्षात झालेली
वेगवेगळ्या जाती समूहांची आंदोलने यामुळे भाजप गुजरात मध्ये मागे पडतांनाचे चित्र
उभे झाले होते. परंतु भाजपा ला पर्याय म्हणून कॉंग्रेस त्याठिकाणी विरोधी
पक्षाच्या रुपात एकमेव पर्याय म्हणून उभा होता. असे असतांना गुजरात परत एकदा भाजप
कडे का गेले ? कारण भाजप ला पर्याय देतांना कॉंग्रेस ने केलेला सौम्य मनुवादी
हिंदुत्वाचा प्रचार होय. भाजप-आरएसएस च्या माध्यमातून प्रखर हिंदुत्वाचा प्रचार हे
नेहमीचे धोरण राहिलेले आहे. त्यामुळे भाजप ला टक्कर देतांना कॉंग्रेस ने आखलेली
प्रचार रणनीती (वेगवेगळ्या हिंदू मंदिरांना भेटी, जानवेधारी राहुल गांधी) भाजपा ला
लाभ देऊन गेली. कारण दोन्ही पर्यायी पक्षात मनुवादी हिंदुत्व हाच धागा जर असेल आणि
भाजप प्रखर व अतिरेकी हिंदुत्ववादी आहेत परंतु आम्ही सौम्य हिंदुत्ववादी आहोत असा
जर कॉंग्रेस प्रचार करीत असेल तर नक्कीच जनता ज्या पक्षाने इतर पक्षांच्या
अजेंड्यावर हिंदुत्व घ्यायला भाग पाडले त्याच पक्षाकडे झुकणार आहेत. दोन्ही पक्ष
जर हिंदुत्व हाच अजेंडा घेऊन जनतेसमोर जात असतील तर त्यांच्या समोर प्रखर
हिंदुत्ववादी पक्ष हाच पर्याय शिल्लक उरतो. बहुसंख्य वर्गाचे गाजरगवत चविष्ठ
पद्धतीने वेगवेगळ्या व्यंजनांच्या माध्यमातून आम्ही खाणार असू तर हा देश उद्ध्वस्त
व असुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही.
आज भाजपा-आरएसएस सत्तेवर आल्यापासून कोण किती व कोणता पक्ष
हिंदुत्वाचा जास्त कैवारी आहे. हे सांगण्याची स्पर्धाच जणू लागलेली आहे. मनुवादी
हिंदुत्व ही भाजप-आरएसएस ची ओळखच आहे. परंतु या स्पर्धेत स्वतःला धर्मनिरपेक्ष
म्हणविणारे अन्य पक्षही सहभागी झालेले आहेत याचे आश्चर्य आहे. अगदी आरएसएस-भाजप ला
अपेक्षित व मनुवादी व्यवस्थेला अभिप्रेत वाटचाल आज स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून
घेणारांची सुद्धा सुरु झालेली आहे. ज्यामुळे मनुवादी हिंदुत्वाने व त्यांच्या
शोषणाने पिडीत असलेला इथला सामान्य हिंदू (मागासवर्गीय), इथला मुस्लीम, इथला
बौद्ध, इथला जैन, इथला ख्रिश्चन, इथला शीख आपले संवैधानिक अस्तित्व गमावू पाहतो
आहे. हा देश त्यांचा आहे की नाही ? या देशात त्यांचे स्थान आहे की नाही ? हा देश
त्यांच्या धर्माला मान्यता देतो की नाही ? असा प्रश्न आज देशासमोर उपस्थित झालेला
आहे. अशा परिस्थितीत भाजप-आरएसएस ला या देशाच्या सत्तेपासून दूर ठेवायचे असेल आणि
मनुवादी व्यवस्था या देशात निर्माण होऊ द्यायची नसेल तर आम्ही प्रखर मनुवादी हिंदू
की सौम्य मनुवादी हिंदू हे प्रदर्शित करण्याच्या स्पर्धेत न उतरता आम्हाला एका
धर्माचे नव्हे तर संविधानाचे राज्य हवे आहे. हे ठणकावून सांगावे लागणार आहे. इथले
मागासवर्गीय (मनुवादी हिंदुत्व पिडीत), इथले मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख
यांनी स्वतःला सतर्क ठेवून व भारतीय संविधानाच्या तत्वपालनासाठी एकत्र येऊन या
देशाला मनुवादी बाहुपाशात जाण्यापासून थांबवावे लागणार आहे. नव्या मनुवादी
पेशवाईला मनुवादी व्यवस्था निर्माण करण्यापासून थांबवावे लागणार आहे. इथल्या
मनुवादी मानसिक वशीकरणाला बळी पडलेल्या कॉंग्रेस सारख्या तत्सम राजकीय पक्षांपासून
सावध राहून या देशातल्या धार्मिक अल्पसंख्यांकांनी इथल्या मनुवादी हिंदुत्वाने
पिडीत असलेल्या हिंदू मागासवर्गीयांना सोबत घेऊन देशाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी
आपल्या खांद्यावर घेणे गरजेचे आहे. मनुवादी बाहुपाशात या देशाला जाण्यापासून रोखून
मनुवादी मानसिक वशीकरण तोडणे गरजेचे आहे. तेव्हाच हा देश संविधानिक पायावर उभा
राहील अन्यथा मनुवादी व्यवस्था अटल आहे. हे लक्षात घ्यावे.
¤¤¤
डॉ. संदीप
नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment