Thursday, 21 December 2017

तरुण पिढीने नीतिमान राजकारण हाती घ्यावे.

#Once_Again_Ambedkar
अनीतिमान राजकीय संस्कृतीच्या काळात
तरुण पिढीने नीतिमान राजकारण हाती घ्यावे.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          देश झपाट्याने बदलतो आहे. त्यासोबतच इथली लोकशाही सुद्धा झपाट्याने आपली कूस बदलते आहे. जनतेच्या दरबारात विसावणारी लोकशाही व्यक्तीवलयी राजकीय प्रवाहात प्रभावशाली नेतृत्वाच्या हातातील बाहुले बनू पाहत आहे. सामुहिक जबाबदारी व्यक्तिगत निर्णयापुढे प्रभावहीन होऊन नतमस्तक होत आहे. मूल्य, तत्वे, प्रामाणिकता, गुणवत्ता, सभ्यता या संकल्पना बाजूला ठेऊन व्यक्तीदिव्य, व्यक्तीश्रेष्ठत्व, भुरळ घालणारे भाषणकौशल्य, जुमलेबाजी, भौतिक साधनांचा वापर करण्याचे कौशल्य राजकीय क्षेत्रात अधिक प्रभावशाली बनू लागली आहे. ज्यामुळे हा देश समाजसापेक्ष उभा होण्याऐवजी व्यक्तीसापेक्ष उभा होऊ पाहत आहे. मूल्यांच्या ऐवजी भौतिक साधनांचा वापर वाढलेला आहे. प्रामाणिकतेची जागा फसवणुकीने घेतलेली आहे. गुणवत्ते ऐवजी फसव्या व पोकळ आश्वासनांची भुरळ समाजावर पडायला लागली आहे. सभ्यतेला केराची टोपली दाखवून असभ्यतेचा मुकुट अधिक विलोभनीय बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकंदरीतच सभ्य राजकीय संस्कृतीवर राजकीय दंडुकेशाहीने मात केलेली आहे. राजकीय सभ्यता व नितीमुल्ये धुळीस मिळवून राजकीय हुजुरेगिरी सुरु झाली आहे. व्यक्तीवलय हा आजच्या राजकारणाचा पाया बनत चालला आहे. वैचारिकतेवर मात करून भपकेगीरीवर राजकीय पाठबळ मिळविणारी परंपरा सुरु झाली आहे.  जातीय व धार्मिक ध्रुवीकरण सोबतीला घेऊन आक्रमक राजकीय संस्कृती झपाट्याने फोफावते आहे. नितीमत्ता नसली तरी मालमत्ता पाहिजे हे आजच्या राजकारणाचे गणित बनत चालले आहे. खर तर हे देशासाठी, समाजासाठी, माणसांसाठी धोक्याचे ठरत असले तरी त्यात बदलाची मानसिकता न जोपासता जो तो मालमत्तेच्या राजकारणाकडे वळत चालला आहे. व्यक्तिविशेष केंद्रबिंदू असलेल्या राजकारणाची भक्कम पायाभरणी देशात झालेली आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या राजकारणाचा महत्वाचा घटक असलेला तरुण राजकारणात कुठे आहे ? यावर आधुनिक राजकारणाचे चिंतन होणे गरजेचे आहे.

भौतिक साधनांच्या सहाय्याने निर्माण झालेल्या बाजारू व्यवस्थेत तरुण पिढी मुल्यधीष्ठीतता, नितीमत्ता, तत्त्वनिष्ठता यापासून दूर चालली आहे. त्यामुळे प्रामाणिकता, गुणवत्ता, सभ्यता ही नव्या पिढीला न पचणारी व न पटणारी धारणा बनत चालली आहे. यातून समाजाला किंवा देशालाच नव्हे तर माणसांनाही बाहेर काढून नव्या भारताच्या निर्मितीकडे परत आम्हाला पाऊले टाकावी लागणार आहेत. ती पाऊले टाकत असतांना भारतीय राजकारणाच्या इतिहासाची उजाळणी घेणे हे सुद्धा गरजेचे आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या तत्कालीन राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तिविशेषी व्यक्तीवलयी राजकीय इतिहासाचे संदर्भही लक्षात घ्यावे लागणार आहेत. जसे कॉंग्रेस चे राजकारण महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या काळात त्यांच्या व्यक्तीवलयाच्या केंद्राभोवती फिरणारे होते. त्यामुळे ते स्थिरही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात दलित राजकारण त्यांच्या व्यक्तिकेंद्रित वलयाभोवती फिरत होते त्यामुळे ते यशस्वीही झाले. कारण या सर्व व्यक्तीवलयाला नैतिकता होती. मूल्य होती. नितीमत्ता होती. प्रामाणिकता होती. सभ्यता होती. आणि महत्वाचे म्हणजे सामाजिक सचोटी होती. तर आज नरेंद्र मोदी या व्यक्तिकेंद्रित वलयाभोवती फिरणाऱ्या राजकारणाला नैतिकतेची जोड नाही. नितीमत्तेची जोड नाही. प्रामाणिकतेची जोड नाही. सभ्यतेची जोड नाही. आणि सामाजिक सचोटीचे राजकारण तर मुळात नाहीच आहे. हा दोन कालखंडातला व्यक्तीकेंद्रित राजकारणात पडलेला फरक लक्षात घेऊन भविष्यातील देशातल्या राजकारणाचा बदलता प्रवाह आपल्या लक्षात येईल.

भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा व्यक्तिकेंद्रित वलयाचे राजकारण संपुष्टात आले तेव्हातेव्हा अस्थिर आणि जोडमंतर राजकीय तडजोडी होऊन अस्थिर राजकीय पार्श्वभूमी असलेली सत्ता देशावर राहिली. २०१४ ला नरेंद्र मोदी नावाचे व्यक्तीवलय आरएसएस च्या माध्यमातून देशाच्या पुढे केले गेले. व त्या माध्यमातून बहुमतापर्यंत भाजप ला पोहचता आले. आजही मागच्या ३ वर्षात नरेंद्र मोदी या नावाच्या व्यक्तीवलयाभोवती शासनाच्या अपयशाला झाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. व त्यात बऱ्यापैकी भाजपा व आरएसएस ला यशही प्राप्त होत आहे. त्या तुलनेत विरोधकांकडे नरेंद्र मोदी या उभ्या केलेल्या व्यक्तीवलयाला तोडण्यासाठी दुसरा चेहरा सापडत नाही. विरोधी पक्षांकडे जे चेहरे आहेत त्यांचे व्यक्तिमत्व खच्चीकरण केले जात आहे. ज्यामुळे मुल्यवर्धी नीतिमान राजकीय चेहरा देशापुढे येत नाही. हे सरळ सूत्र पुढील सत्तेच्या सुलभीकरणासाठी आरएसएस व भाजप च्या माध्यमातून आखले गेले आहे. लोकशाहीच्या योग्य सूत्रसंचालनासाठी भक्कम नेतृत्व असणे गरजेचे आहे. पण ते नरेंद्र मोदी सारखे विद्वेषी, अनीतिमान, तत्वहीन, व्यक्तिकेंद्री, सामाजिक भान नसणारे, सांसदीय प्रणालीवर विश्वास नसणारे, धार्मिक व जातीय द्वेष निर्माण करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे, ज्यामुळे इथली लोकशाही धोक्यात येईल असे अयोग्य नेतृत्व नकोय. याकडे या देशाचे लक्ष वळविणे आज गरजेचे ठरत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज देशात काही उच्च शिक्षित तरुण उभे होत आहेत. संघटन कौशल्य आणि भाषण कौशल्य याच्या जोरावर या तरुणांच्या सभोवताल व्यक्तीवलय निर्माण होऊ पाहत आहे. समाजावर होणारा अन्याय-अत्याचार व त्यातून मुक्तीची घोषणा, विद्वेषी राजकारणा विषयीची चीढ आणि सामाजिक मुल्यांची जपणूक या त्रिसूत्रीवर आखलेल्या आंदोलनातून या तरुणांचे राजकीय व्यक्तीवलय उभे होत आहे. थोडीफार तत्त्वनिष्ठता व हाती घेतलेल्या आंदोलनात दाखविलेली प्रामाणिकता हे त्यांचे व्यक्तीवलय उभे होण्यासाठी महत्वाचे ठरत आहे. जिथे प्रस्थापित राजकीय पक्षांना नरेंद्र मोदी च्या व्यक्तीवलयाला तोडता येत नाही तिथे कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे तरुण संपूर्ण देशात नरेंद्र मोदी च्या व्यक्तीवलयाला तोडण्यात काही प्रमाणात यशस्वी होत आहेत. जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर यांनी गुजरातेत दंड थोपटले आहे. तर चंद्रशेखर आझाद यांनी उत्तरप्रदेशात दंड थोपटले आहे. कन्हैय्या कुमार यांनी थेट दिल्लीवर स्वारी करून आता संपूर्ण देशभर स्वतःचे व्यक्तिमत्व तेही थेट नरेंद्र मोदींना टक्कर म्हणून उभे केले आहे. महाराष्ट्रातही असे अनेक तरुण पुढे येत आहेत. अनेक राज्यात असे तरुण उभे होत आहेत. काहींना प्रसिद्धी मिळाली तर काही अजूनही प्रसिद्धीपासून दूर ठेवले गेले आहेत. एक जमेची बाजू अशीही आहे कि, या तरुणांमध्ये विद्वेषी भाव किंवा तत्वहीनता दिसून येत नाही. सामाजिक ध्येय आणि उद्धिष्ट यांच्याप्रती समर्पित राहून सरकारच्या विद्वेषी नितीविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य या तरुणांमध्ये दिसून येते. परंतु या सर्वांमध्ये एक धागा महत्वाचे आहे तो असा कि, हे सर्व तरुण देशाच्या संविधानाप्रती समर्पित व नितांत विश्वास ठेवणारे आहेत. जी भविष्यातील देशातील राजकारणासाठी जमेची बाजू असणार आहे. परंतु या तरुण नेतृत्वांना सुद्धा एक खंबीर राजकीय भूमिका घेऊन पुढे येणे गरजेचे आहे. या वर्तमान तरुण पिढीने नवीन राजकीय पक्ष वा संघटन उभे न करता हितसंबंधी विचारधारेच्या प्रस्थापित राजकीय पक्षात सामील होऊन, आपल्या पाठीशी राजकीय पाठबळ उभे करून, अन्याय अत्याचाराविरोधात लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे.

देशात असे तरुण राजकारणात उभे होणे म्हणजे नरेंद्र मोदीच्या अनीतिमान व विद्वेषी राजकीय सत्तेला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला, एकंदरीत त्यांच्या राजकारणाला व राजकीय खुर्चीला तडे जाणे होय. म्हणून येनकेन प्रकारे या तरुणांभोवती सत्तेचे शक्तीप्रदर्शन करून, प्रशासकीय दडपशाहीतून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. कधी गुन्हे दाखल करून तर कधी चारित्र्य हनन करून या तरुणाईचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नरेंद्र मोदी किंवा तत्सम प्रवृत्ती विरुद्ध पर्याय उभा होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. हे तरुण आज स्वबळावर उभे होत असले तरी हे स्वबळावर फार काळ उभे राहू शकणार नाही. किंवा स्वबळावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला तरी एका मर्यादित समूहाभोवती गुरफटून राहतील. या त्यांच्या व्यक्तिगत मर्यादा नसल्या तरी साधन संपन्नतेच्या व व्यापक सहकार्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे देशपातळीवर आज ज्या राजकीय व्यक्तिमत्वाची गरज आहे, ते राजकीय व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून उभे होऊ शकणार नाही. परिणामस्वरूप नरेंद्र मोदी प्रवृत्ती ही कायम सत्तेवर टिकून राहील. हे इथल्या भाजप व आरएसएस ला कळून चुकले आहे. त्यामुळे तरुणांचा आवाज दाबणे व त्यांचा आवाज नाही दाबता आला तर त्यांचे भरारी घेणारे पंख छाटून त्यांना मर्यादित करणे या एकमेव धोरणातून सध्या भाजप व आरएसएस या देशात वाटचाल करीत आहे. याचे गांभीर्य इथल्या विरोधी पक्षांनी ओळखले पाहिजे. सोबतच देशातल्या तरुणांनी सुद्धा याकडे डोळेझाक न करता उद्याच्या भारताची राजकीय सूत्र हाती घेण्यासाठी सज्ज असले पाहिजे. विकासाच्या नावाने उभ्या केल्या गेलेल्या संम्मोहनाचे बळी न ठरता आज देशातील तरुणांपुढे असलेल्या समस्यांना पुढे करून विकासाचे वेडेपण दूर करणे गरजेचे आहे.

आज भारतात कॉंग्रेस विरोधी पक्ष म्हणून उभा असला व नरेंद्र मोदी प्रवृत्तीवर मात करून उद्याच्या सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत असला तरी कॉंग्रेसकडे मागच्या ६० वर्षाच्या सत्ताकाळात तरुण नेतृत्व उभे न करता आल्याचे शल्य कायम आहे. राहुल गांधी हे एकमेव तरुण नेतृत्व कॉंग्रेसने दृष्टीक्षेपात ठेवून स्वतःच स्वतःच घात करून घेतला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी प्रवृत्ती विरोधात राहुल गांधी हा पर्यायी चेहरा किंवा व्यक्तिमत्व म्हणून उभे करण्यात व त्यातून यश मिळविण्यात कॉंग्रेस ला भविष्यात कितपत यश मिळेल हे पाहणे ओत्सुक्याचे ठरेल. याखेरीज आज अन्य विरोधी पक्षांमध्ये कणखर व भक्कम असे तरुण नेतृत्व उभे होत आहेत. मग ते नरेंद्र मोदी प्रवृत्तीवर मात करण्याच्या गरजेतून उभे झालेले असोत अथवा नरेंद्र मोदी प्रवृत्तीतून आरएसएस ने निर्माण केलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उभे झालेले असोत. कारण काहीही असले तरी तरुण व्यक्तिमत्व उभे होत आहेत. जे उद्याच्या नरेंद्र मोदी प्रवृत्तीला देशाच्या सत्तेपासून थांबविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात. परंतु गरज आहे त्या तरुण नेतृत्वाच्या पाठीशी प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली शक्ती उभी करण्याची. 

लोकशाहीत सत्तेवर येणाऱ्या प्रवृत्ती लक्षात घेणे लोकशाहीच्या सुदृढतेसाठी आवश्यक ठरते. कारण ही लोकशाही संविधानातून आलेली आहे. ही लोकशाही जनतेतून संवर्धित झालेली आहे. त्यामुळे संविधानाला हानी न पोहचविता लोकशाहीचे जतन होणे गरजेचे आहे. संविधानकारांनी संविधानाच्या माध्यमातून तयार केलेल्या संवैधानिक संस्कृतीचे पालन पोषण करून त्यातून समाजातल्या सर्व घटकाचा विकास, समाजाचे कल्याण आणि देशाची एकात्मता निर्धारित करणे हे इथल्या लोकशाहीचे मुख्य उद्धिष्ट आहे. परंतु आरएसएस च्या मुशीत तयार झालेल्या नरेंद्र मोदी प्रवृत्तीला इथली संवैधानिक संस्कृती व लोकशाही नको आहे. याची प्रचिती त्यांच्या वर्तणुकीतून वारंवार अनुभवायला मिळते. ही परिस्थिती बदलायची असेल तर तरुणांच्या पाठीशी समाजाने उभे होणे गरजेचे आहे. भाजप आरएसएस ने उभ्या केलेल्या नरेंद्र मोदी प्रवृत्तीने पिडीत असलेल्या सर्वांनीच आता निर्धारित राजकीय भूमिका घेण्याची गरज आहे. नव्या पिढीच्या तरुण नेतृत्वांना पुढे करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे.

          मागच्या ३ वर्षाच्या कालखंडात भाजप सरकारची नरेंद्र मोदी प्रवृत्तीतून झालेली वाटचाल पुढच्या भाजप सरकारच्या वाटचालीची पथदर्शक आहे. हीच भाजप सरकारची प्रतिमा आहे व तीच भाजप सरकारची विचारधारा आहे. जनकल्याणाऐवजी विशिष्ट वर्गकल्याण हाच या सरकारचा अजेंडा आहे. सामाजिक व आर्थिक विषमता कायम वृद्धिंगत करून जनसामान्यावर दडपण निर्माण करून ठेवणे हीच नरेंद्र मोदी प्रवृत्ती आहे. जातीय व धार्मिक धृविकरणातून बहुजन व धार्मिक अल्संख्यांक वर्गावर धाक व भीती निर्माण करणारी प्रवृत्ती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती आहे. पोकळ फुग्यात हवा भरून त्याच्या बाह्यरूपाला आकर्षक करून काटेरी वनात सोडणारे व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. लोकशाही ऐवजी नियंत्रित हुकुमशाही व दडपशाही निर्माण करून त्यावर वर्चस्व गाजविणारी मानसिकता म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. राष्ट्रभक्तीच्या नावाखाली धर्मभक्तीचे पोषण करणारी प्रवृत्ती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती. राष्ट्रवादाच्या नावाखाली धार्मिक दहशतवाद पसरविणारी संस्कृती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती. ‘सबका साथ, सबका विकास’ च्या गोंडस नावाखाली ‘सबकी लुट, किसी एक का विकास’ करणारी नीती राबविणारी प्रवृत्ती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. ऑक्सिजन विना माणसे मारून ‘होय, हे माझे सरकार’ म्हणायला लावणारी अमानवी वृत्ती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. संवैधानिक हक्क, संरक्षण, अधिकार मोडीत काढून ‘ये देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है’ असे ढोल पिटणारी असंवेदनशील वृत्ती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. ‘मानवी सुरक्षा’ धोक्यात घालून ‘गो-सुरक्षा’ करणारी रानटी वृत्ती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. शिक्षित तरुणांना बेरोजगार बनवून भांडवलशाही वृद्धिंगत करणारी नीती म्हणजे नरेंद्र मोदी प्रवृत्ती होय. व या नरेंद्र मोदी प्रवृत्तीला घडविणारा कारखाना म्हणजे आरएसएस होय. या कारखान्याचे होकायंत्र म्हणजे मनुवाद होय.

या सर्व अनीतिमान राजकीय प्रवृत्तीची नाकेबंदी करणे हे आजच्या तरुण पिढीसमोरील पहिली जबाबदारी आहे. त्यासाठी आधुनिक तरुण पिढीने नीतिमान राजकारणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन अनीतिमान राजकारणाची उभारणी करणाऱ्या संस्कृती व प्रवृत्तीला वेळीस थांबविले पाहिजे. तेव्हाच या देशाचे भविष्य सुरक्षित राहील व वर्तमान तरुण पिढीचे भविष्य वृद्धिंगत होईल.

                                                        ¤¤¤
#Once_Again_Ambedkar

 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment