#Once_Again_Ambedkar
मनुवादी
चौकीदारांचे आकांडतांडव आणि मानवतावादी क्रांती
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
सामाजिक
कल्याणाचे भान नसेल आणि डोक्यात समतेचा सुगंध जन्मापासून दरवळू दिला जात नसेल तर
मात्र श्रेष्ठत्वाचे उंच मनोरे उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. राज्यसत्ता
मिळविल्याची गर्मी अंगात भिनली की आम्ही काहीही करू शकतो असा गोड गैरसमज मनाशी
बाळगला जातो. या गैरसमजातून फक्त माणूसच
(फक्त एक माणूस) नव्हे तर माणसांचा समूह सुद्धा मारू शकतो असा आत्मविश्वास बाळगून
श्रेष्ठत्वाच्या शिखरावरून वाघांच्या समूहावर शेळ्या मेंढ्यांचा कळप सोडण्याचा
प्रयत्न केला जातो. मानवी समूहाला वाट्टेल त्या पद्धतीने वागवू शकतो, त्यांच्यावर
अन्याय करू शकतो, त्यांना दडपू शकतो, त्यांचे शोषण करू शकतो, त्यांचा छळ करू शकतो
असा अमानवी आत्मविश्वास बाळगणे हा जानवेधारी श्रेष्ठत्वाचा इतिहास राहिलेला आहे.
म्हणूनच जानवेधारी श्रेष्ठत्व बाळगणाऱ्या समूहात न्यायिकता व राजकीय शहाणपण नाही
हे इतिहासाने सुद्धा सिद्ध केले होते. आज सत्तेवर असलेला त्यांचा वर्तमानसुद्धा
तेच सिद्ध करीत आहे. यांचा इतिहास जितका काळा आहे तितकाच यांचा वर्तमान देखील काळा
आहे. सुशासन आणि सर्वसमावेशक धोरण हे यांच्या नैतिक अधिष्ठानात नाही. त्यामुळे
मनुवादी चौकीदारांचे आकांडतांडव सुरु झाले आहे.
१ जानेवारी
२०१८ ला भीमा कोरेगाव च्या युद्धाला २०० वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे विजयस्तंभाला
अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून बहुजन व मानवतावादी
समाज भीमा कोरेगाव या ठिकाणी आलेला होता. परंतु इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्या
मनुवाद्यांनी पूर्वनियोजित कट करून त्या मानवतावादी निशस्त्र समूहावर हल्ला
चढविला. व त्याला दंगलीचे स्वरूप बहाल केले. व लगेच मराठा विरुद्ध महार अशी जातीय
संघर्षाची ठिणगी पेटविली. १ जानेवारी १८१८ ला महार बटालियनने मराठा सैन्यांविरुद्ध
लढाई केली असा चुकीचा प्रचार व प्रसार करून काही मनुवादी माथी भडकविली. व
त्यांच्या माध्यमातून पूर्वनियोजित हल्ला केला. व त्याला महाराष्ट्र सरकारने
संपूर्ण सहकार्य केले. त्याआधी भिमाकोरेगाव जवळ असलेल्या वढू (बु) येथील संभाजी
महाराजांच्या समाधीसमोरील गोविंद महार यांच्या समाधीवरील शेड काही समाजकंठकांनी
तोडला. त्यामुळे पूर्वनियोजित संघर्षाची ठिणगी पडली. गोविंद महार यांच्या
संदर्भातील आख्यायिका व इतिहास इतके वर्ष सुखरूप असतांना आताच अचानक गोविंद महार व
संभाजी महाराज यांच्या संबंधाविषयीचा इतिहास खोटा असल्याचा जावईशोध मनुवादी
चौकीदार भिडे-एकबोटे आणि सहकाऱ्यांना कसा काय झाला ? तर हा सर्व पूर्वनियोजित
षड्यंत्राचा भाग होता असे आपल्या लक्षात येईल.
दुसऱ्या
बाजीराव पेशव्याचा कालखंड म्हणजे मनुस्मृतीचा परमोच्च बिंदू होता. या दुसऱ्या
बाजीराव पेशव्याच्या काळातच शुद्र व अस्पृश्यांवर समाजात अनेक बंधने लादली गेली.
त्यांचा अतोनात छळ केला गेला. दुसऱ्या बाजीराव पेशवाच्या काळात पेशवाईने
मनुस्मृतीची काटेकोर अंमलबजावणी करून मनुस्मृती समाजावर लादली होती. दुसऱ्या
बाजीराव पेशवा हा न्यायी नव्हता. स्वतःच स्वतःच्या राज्यातील नागरिकांवर अन्याय
करीत होता. अतिशय विलासी व अय्याशीचे जीवन जगणाऱ्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याविषयी
त्याच्याच राज्यात व समाजात तीव्र असंतोष होता. इकडे इस्ट इंडिया कंपनी आपले
साम्राज्य वाढवून अनेक राज्यांना आपल्या अंकित करून घेत होते. दुसऱ्या बाजीराव
पेशव्याच्या राज्यात माजलेल्या असंतोषाचा लाभ घेत इस्ट इंडिया कंपनीने दुसऱ्या
बाजीराव पेशव्याच्या साम्राज्यावर आक्रमणाची तयारी चालविलेली होती. शिवाजी
महाराजांच्या काळापासून मराठी साम्राज्यात महार सैन्यांचा व महार बटालियन चा
समावेश होता. ज्यात समाजातल्या खालच्या वर्गातील शूर सैनिकांचा समावेश होता.
ज्याचे नेतृत्व महार सैनिक करीत होते त्यामुळे त्याला महार बटालियन असे नाव पडले.
पुढे हेच सैनिक पेशवाईत सुद्धा मराठी साम्राज्याचा एक भाग राहिलेले होते. परंतु पेशवाईच्या
सैन्यात असलेली महार बटालियन ज्यात प्रामुख्याने शुद्र व अस्पृश्य गणल्या गेलेल्या
समाजातील शूर सैनिकांचा समावेश होता. त्या सैनिकांमध्ये सुद्धा दुसऱ्या बाजीराव
पेशव्याच्या काळात समाजावर वाढत चाललेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र असंतोष होता.
त्यामुळे महार बटालियनचे नेतृत्व करणारा सेनापती सिदनाक महार हे दुसऱ्या बाजीराव
पेशव्याकडे शुद्र व अस्पृश्य समाजावर वाढत चाललेल्या अन्याय अत्याचाराला
थांबविण्याची विनंती करायला गेले. तेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशवा याने त्यांची
विनंती धुडकावून लावीत महार बटालियन च्या सैन्याचा अपमान केला. याचा लाभ घेऊन ब्रिटीश
इस्ट इंडिया कंपनीने दुसऱ्या बाजीराव पेशव्याचे साम्राज्य खालसा करण्यासाठी महार बटालियन
ला आपल्या सैन्यात सामावून घेतले.
३० डिसेम्बर १८१७ ला ब्रिटीश सेनापती स्टाटन च्या नेतृत्वात
ब्रिटीश सैन्य पुण्याच्या दिशेने आगेकूच करायला निघाले होते. सोबतीला महार बटालियन
ची एक तुकडी सिदनाक महार यांच्या नेतृत्वात सोबतीला होती. ३१ डिसेम्बर ला हे सैन्य
भीमा नदीच्या काठावरील परिसरात पोहचले तेव्हा पेशव्याचे २८,००० सैन्य नदीच्या
दुसऱ्या काठावर पाहून ब्रिटीश सेनापती स्टाटन घाबरला. व त्याने युद्ध न करता
परतण्याचा निर्णय घेतला. मात्र महार बटालियन मागे परतण्यास तयार नव्हती. कारण
पेशवाई विरुद्धची लढाई ही इंग्रज विरुद्ध पेशवे अशी नसून आमच्या सामाजिक
अस्तित्वाची व न्यायाची लढाई आहे. त्यामुळे आम्ही ती लढलीच पाहिजे असे सिदनाक महार
च्या नेतृत्वातील महार बटालियनला वाटत होते. त्यामुळे त्या ठिकाणाहून मागे
परतण्यास महार बटालियन तयार नव्हती. म्हणून इंग्रज सेनापती स्टाटनने मागे परततांना
पेशवे सैन्य मागून चाल करून येतील या भीतीने महार बटालियन ची सिदनाक महार यांच्या
नेतृत्वातील तुकडीला पेशव्याच्या सैन्याला थोपवून धरण्याची जबाबदारी दिली. आणि
सिदनाक महार यांनी ती जबाबदारी स्वीकारून पेशव्याच्या २८००० सैन्याला रोखून धरले.
परंतु ३१ डिसेम्बर १८१७ च्या रात्री पेशव्या सैन्याने महार बटालियनच्या तुकडीवर
रात्रीच्या अंधाराचा लाभ घेत चाल केली. त्या युद्धात महार बटालियन च्या सैन्याने
पेशवाई सैन्याला निकराची झुंज दिली. ३१ डिसेम्बर १८१७ व १ जानेवारी १८१८ च्या
रात्रभर हे युद्ध चालले. शेवटी १ जानेवारी १८१८ चा सूर्य उजाळतांना पेशवाई
सैन्याने माघार घेऊन माघारी परतले व महार बटालियनच्या सैनाचा विजय झाला. फक्त ५००
महार बटालियनच्या सैन्याने २८००० पेशवाई सैन्यावर विजय मिळविला. या युद्धात महार
सैन्यांसोबतच काही मराठा, राजपूत सैन्य देखील महार बटालियनचे शहीद झाले. व दुसऱ्या
बाजीराव पेशव्याचे अमानवीय, अत्याचाराचे साम्राज्य उद्धवस्त होऊन दुसरा बाजीराव
पेशवा इस्ट इंडिया कंपनी च्या अंकित आला. ही बातमी जेव्हा ब्रिटीश सेनापतीला कळली
तेव्हा त्यांनी त्या शूर सैनिकांच्या पराक्रमाचा इतिहास म्हणून भीमा कोरेगाव येथे
विजय स्थंभ उभारला. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने इतिहासात अनेक लढाया जिंकल्या
परंतु इतिहासात नोंद राहावी म्हणून एकाही युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ विजय
स्थंभ उभारला नाही. मग फक्त भीमा कोरेगाव येथील युद्धाच्या स्मरणार्थच विजय स्तंभ
इंग्रजाद्वारे का उभारला गेला ? या प्रशाचे उत्तर शोधले तर आपल्या लक्षात येईल की
महार बटालियनचे सैनिक हे दुसऱ्या बाजीराव पेशव्याने लादलेल्या अन्यायपूर्ण सामाजिक
बंधनाने त्रस्त होते. व त्यामुळे पेशवाई सैन्यासोबत जीवाची पर्वा न करता शुद्र व
अस्पृश्य समाजाच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी पेशवाई सोबत लढले. ज्यामुळे पेशवाई
संपुष्टात येऊन सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली. व पेशवाईच्या कालखंडात अन्याय सहन
करणारा शुद्र व अस्पृश्य समाज सामाजिक स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊ लागला.
या सामाजिक स्वातंत्र्य संग्रामाला २०० वर्ष पूर्ण होत
असतांना आज परत देशावर नवी पेशवाई सत्तेवर येऊन समाजावर मनुस्मृतीयुक्त सामाजिक
बंधने लादून अन्याय अत्याचार वाढीस लागले होते. मद्रास आयआयटी व्हाया रोहित वेमुला
ते उणा पर्यंतच्या घटना व नरेंद्र दाभोलकर व्हाया कलबुर्गी, पानसरे ते गौरी लंकेश
या पुरोगामी विचारवंतांच्या कट्टर हिंदू आतंकवादी संघटनांनी केलेल्या हत्त्या ह्या
नव्या पेशवाई च्या अन्यायपूर्ण राजकारणाचे द्योतक होत्या. ज्यामुळे आज भारतीय
समाजात असंतोष होता. त्यामुळे ३१ डिसेम्बर २०१७ ला पुण्याच्या शनिवारवाड्यावर या
असंतोषाविरुद्ध एल्गार परिषद भरविण्यात आली होती. ज्याचे नेतृत्व बाळासाहेब उर्फ
प्रकाश आंबेडकरांसोबत देशभरातल्या २०० मानवतावादी सर्व समाज संघटनांनी केले. परंतु
अपेक्षेप्रमाणे आरएसएस ने आपल्या अंकित अतिरेकी हिंदू संघटनांच्या माध्यमातून या
परिषदेला विरोध दर्शविला. व आपल्या सत्तेवर बसलेल्या भाजप या राजकीय संघटनेच्या
माध्यमातून पोलीस प्रशासनावर नियंत्रण मिळवून, षड्यंत्र व कटकारस्थान रचून २९
तारखेला वढू (बु) चे प्रकरण घडवून १ तारखेला भीमा कोरेगाव येथे सामाजिक
स्वातंत्र्याच्या युद्धातील आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी आलेल्या
तेव्हाच्या शुद्र व अस्पृश्य आणि आताच्या ओबीसी व मागासवर्गीय मानवतावादी समूहावर
हल्ला चढविला. आणि या हल्ल्याला पूर्वनियोजित षडयंत्राप्रमाणे ३१ तारखेच्या शनिवार
वाड्यावर पार पडलेल्या एल्गार परिषदेला जबाबदार धरून मराठा विरुद्ध दलित अशी जातीय
मांडणी करण्यास सुरवात केली. परंतु मनुवादी चौकीदारांनी आकांडतांडव करण्याआधी हे
लक्षात घ्यावे की, हा लढा जातीचा नसून हा लढा न्याय व अन्यायाविरुद्धचा लढा आहे.
हा लढा धर्माचा नसून हा लढा मनुस्मृतीविरुद्ध आत्मसन्मानाचा लढा आहे. हा लढा
माणसांचा माणसांविरुद्ध नसून हा लढा मनुवादी अतिरेकी हिंदू चौकीदारांनी देशात
चालविलेल्या हल्ल्यांच्या विरोधात मानवतावादी क्रांतीचा लढा आहे.
यातले काही फौजदार या आंदोलनाला व पर्यायाने प्रकाश
आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यातले पहिले एबीपी माझा चे सिनियर
प्रोड्युसर प्रसन्न जोशी यांनी दिव्य मराठीच्या रसिक या पुरवणीत “वणवा पेट घेत
आहे...” असा लेख लिहून या आंदोलनावर व प्रकाश आंबेडकर यांच्यावर ताशेरे ओढलेले
आहे. ‘दलित चळवळ यशस्वी होऊ लागली कि डावे त्यावर वरचष्मा राखण्याचा प्रयत्न
करतात’ यातून प्रसन्न जोशी यांना दलित चळवळ कळली नसावी किंवा डावी चळवळ सुद्धा
समजली नसावी. तसेच डावे व माओवादी या दोघातील अंतरही कदाचित प्रसन्न जोशी यांना
अंगावर जानवे असल्यामुळे कळू दिला गेला नसावा असेच त्यांच्या लिखाणावरून दिसून
येते. भीमा कोरेगाव चे कट्टर मनुवादी हिंदुत्ववाद्यांकडून उभे केले गेलेले आंदोलन
शांततेत पार पडावे मात्र सरकार चे डोके भानावर येईल अश्या स्वरूपाचे व्हावे यासाठी
प्रकाश आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेतली. परंतु त्यावर प्रसन्न जोशी मौन
बाळगतात. तर दुसरीकडे सैराट, नितीन आगे, अट्रोसीटी प्रकरणावरून सवर्ण ब्राम्हणेतर
म्हणून मराठा समाजाला दलित विरोधी दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. एकंदर
संपूर्ण प्रकरणावर ब्राम्हणी पडदा टाकता यावा म्हणून जोशी महोदय गोविंद महार ऐवजी
शिर्के मंडळी असा इतिहासाचा जावईशोधही लावतात. परत मागील २ वर्षापासून नक्षलवादी
हे भीमा-कोरेगाव प्रकरण या दिशेने नेण्यासाठी प्रयत्नात होते असा शोध एका
पुण्यातल्या वरिष्ठ पत्रकाराच्या हवाल्यातून मांडतात. पण यापलीकडे जाऊन महत्वाचे
ते काय लिहितात की, “३ तारखेच्या महाराष्ट्र बंद मध्ये ‘रमाबाई आंबेडकर’ घडवल जाव
अशीही संबंधितांची इच्छा असावी. मात्र असा अनास्था प्रसंग ओढवला नाही.” एकूणच
प्रसन्न जोशी यांनी महाराष्ट्र सरकारला कट्टर हिंदुत्ववादी मनुवादी संघटना ज्यांनी
भीमा-कोरेगाव येथे नियोजित षडयंत्रपूर्वक हल्ला केला त्या हल्लेखोरांना निर्दोष
सिद्ध करण्यासाठी व भीमा-कोरेगाव प्रकरणात ज्यांच्यावर हल्ला झाला म्हणून त्यांनी
प्रतिक्रिया नोंदविली त्याच लोकांना अपराधी दोषी ठरविण्यासाठी भक्कम पुरावे
देतांना दिसून येतात.
दुसरे आरएसएस च्या हिंदी विवेक या मासिक पत्रिकेत
“प्रकाशजी, जवाब तो आपही को खोजना होगा.” या लेखात आरएसएस चे स्वयंसेवक रमेश पतंगे
लिहितात, ‘मराठी राज्याचा अंताचा दिवस शौर्य दिवस म्हणून आंबेडकरी जनता साजरी
करते. हा दिवस आजपर्यंत लोकांना माहिती नव्हता परंतु २ तारखेची दगडफेक आणि ३
तारखेच्या बंद मुळे हे सर्वांना माहिती झाले.’ पतंगे याठिकाणी १ तारखेचा हल्ला व
दगफेक जाणीवपूर्वक का विसरतात ? तर दुसरीकडे पतंगे हे मान्यही करतात की, उत्तर
पेशवाई ब्राम्हणशाहीत परावर्तीत झाली. आम्हाला इतिहास फारसा कळलेला नाही आम्ही
फक्त साधा सोपा इतिहास जाणतो अशी शेकी मिरवितांना हे मान्य का करीत नाही कि ते
स्वतः व त्यांची आरएसएस संघटना फक्त ब्राम्हणशाहीला पूरक इतिहास तेवढा फक्त
वाचतात, सांगतात व मांडतात. मग पतंगे यांना प्रकाश आंबेडकर त्या पेशवाई
ब्राम्हणशाही ला विरोध करतांना जातीवादी आणि हिंसावादी कसे काय वाटतात ? अन्यायाचा
प्रतिकार करणे हे मनुस्मृतीत लिहिले नसले किंवा मनुस्मृतीला मान्य नसले तरी मानव
निर्मित कायद्याने अन्यायाचा प्रतिकार करणे हे कायदेशीर आहे याचे ज्ञान बहुतेक
पतंगे यांना नसावे. किंवा त्या मानव निर्मित कायद्याचे ज्ञान घेण्याची परवानगी
पतंगे यांना मनुस्मृतीने दिलेली नसावी. पतंगे यांच्या संपूर्ण लेखातून त्यांनी दोन
समूहाची स्पष्ट विभागणी केलेली दिसते. एक समूह जो मनुस्मृतीने ब्राम्हणशाहीचे
नेतृत्व मानतो आणि दुसरा जो मनुस्मृतीतील जातीवाद व ब्राम्हणशाहीचा विरोध करतो.
याचा अर्थच असा होतो कि मनुस्मृतीतील ब्राम्हणशाहीचा विरोध करणाऱ्या भीमा-कोरेगाव
येथील समूहावर मनुस्मृतीतील ब्राम्हणशाहीचे नेतृत्व मान्य करणाऱ्या समूहाने
नियोजित हल्ला केला हे पतंगे यांना माहिती होते व माहिती आहे. त्यामुळे पतंगे
यांनी हे लक्षात घ्यावे कि, याचे उत्तर आता प्रकाश आंबेडकर यांना नव्हे तर याचे
उत्तर आता तुमच्या मनुस्मृतीयुक्त ब्राम्हणशाहीला इथल्या वाढत चाललेल्या
हिंसाचाराचे, अत्याचाराचे, अन्यायाचे, हल्ल्याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
या दोन्ही मनुवादी फौजदारांच्या लेखांतून हे स्पष्ट दिसून
येते कि, भीमा-कोरेगाव येथे यांच्या मनुवादी चौकीदारांनी मानवतावादी समूहावर
केलेला हल्ला मान्य आहे. परंतु त्याला प्रतिकार म्हणून मानवतावादी बहुजन समाजाने
दिलेली प्रतिक्रिया यांना अजिबात आवडलेली नाही. कारण मनुस्मृतीत शुद्रांवर
झालेल्या अन्यायाला दाद मागण्याची किंवा त्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार शूद्रांना
नाही. हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न आज या मनुवादी फौजदारांच्या माध्यमातून
मनुवादी चौकीदारांना हाताशी घेऊन केला जात आहे. व मनुवादाने पिळल्या गेलेल्या
अन्यायग्रस्त समूहाला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना
बदनाम करून त्यांनाच जातीवादी ठरविण्याची चाललेली ब्राम्हणशाही धडपड निकट भविष्यात
आरएसएस व त्यांच्या मनुवादी फौजदार, चौकीदारांच्या अंगलट येणार आहे. हे निश्चित. ३
जानेवारीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनात ‘रमाबाई आंबेडकर’ घटनेची पुनरावृत्ती
होण्याची शक्यता होती हा प्रसन्न जोशी यांचा शोध अगदी खराच असावा. फरक फक्त एवढाच
कि तो बंद च्या आंदोलनात उतरलेल्या जनतेकडून नव्हे तर परत त्याच पेशवाई सरकारकडून
त्या घटनेची पुनरावृत्ती होणार होती याचे पुरावे नक्कीच प्रसन्न जोशी यांच्याकडे
असावेत. परंतु त्या घटनेवेळी प्रसन्न जोशी नाबालिक असण्याची शक्यता असल्याने त्या
घटनेचा योग्य तो संदर्भ त्यांना इथे जमला नाही. रमाबाई आंबेडकर घटना
आंदोलनकाऱ्याकडून झालेली नव्हती तर त्या वेळच्या हिंदुत्ववादी शिवसेना-भाजप
सरकारच्या पोलिसी प्रशासनाकडून घडवून आणली गेली होती. व तेच सरकार आज २०१८ ला परत
सत्तेवर असल्याने ३ जानेवारी २०१८ च्या आंदोलनात हे सरकार ‘रमाबाई आंबेडकर’ घटनेची
पुनरावृत्ती करणार होते हे प्रसन्न जोशी यांच्या लिखाणावरून सिद्ध होत आहे. परंतु
प्रकाश आंबेडकर यांनी दाखविलेल्या सामंजस्यामुळे, आंदोलनाचे केलेल्या शांतीपूर्ण
नेतृत्व संचलनामुळे पेशवाई सरकारला ‘रमाबाई आंबेडकर’ घटनेची पुनरावृत्ती झाली नाही
याचे श्रेय प्रसन्न जोशी आणि रमेश पतंगे यांनी प्रकाश आंबेडकर यांना द्यावे.
अन्यथा पेशवाईचे काय झाले असते ? हे नव्याने सांगावे लागू नये.
आज संपूर्ण देशातील दलित आंदोलन भाजप सरकारच्या वाढत्या
अन्यायपूर्ण सत्ताकाळात प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती केंद्रित होत असतांना
मनुवादी चौकीदार मिडिया अपरिपक्व नेतृत्वांना तरुण दलित नेतृत्वांच्या नावाने
प्रोजेक्ट करण्यात धन्यता मानीत आहे. हा सुद्धा मनुवादी षड्यंत्राचाच एक भाग आहे.
प्रकाश आंबेडकर आजपर्यंत अकोल्याच्या बाहेर पडले नाहीत. प्रकाश आंबेडकरांना दलित
राजकारणावर प्रभाव पाडता आला नाही अश्या प्रकारच्या वावटळी उठवून या मनुवादी
फौजदार व चौकीदारांनी प्रकाश आंबेडकरांना मर्यादित केले नाही तर एका “आंबेडकर
पर्वाला” मर्यादित केले. ‘आंबेडकर पर्व’ भारतीय राजकारणात व समाजकारणात येणे
म्हणजे इथल्या प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेला हादरे बसने अपरिहार्य असल्या कारणाने
प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने देशाच्या राजकारणात व समाजकारणात येऊ पाहणाऱ्या
‘आंबेडकर पर्वाला’ या मनुवादी मिडीयाने ग्रहण लावले. आपल्याला आठवत असेल १९९० च्या
दशकात देखील प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून ‘आंबेडकर पर्व’ भारतीय राजकारणात
येऊ पाहत असतांना कांशीराम, मायावती यासारखे अपरिपक्व दलित नेतृत्व म्हणून
मिडीयाने व खास करून आरएसएस-भाजप ने पुढे केले. त्यांना प्रोत्साहन देऊन
आरएसएस-भाजप विरोधात प्रतिमा बनवून मोठे केले गेले व योग्य वेळ आली तेव्हा लगेच
कांशीराम-मायावती यांना समर्थन देऊन सत्तेवर देखील बसविल्या गेले. व आज सोयीनुसार
बसपा ला संपवून उत्तरप्रदेशावर स्वतःचे मनुवादी राज्य आरएसएस-भाजप ला बसविता आले.
यापुढच्या निकटच्या भविष्यात देखील आरएसएस-भाजप आपल्या
मनुवादी फौजदार व चौकीदारांच्या माध्यमातून नवीन अपरिपक्व दलित नेतृत्वांना दलित
नेतृत्वाचा नवा चेहरा म्हणून पुढे आणण्याची शक्यता बळावलेली आहे. वैचारिक
अपरिपक्वतेने हे आजचे तरुण दलित नेतृत्व उद्याचे आरएसएस व भाजप च्या मनुवादी
सारीपाटाचे मोहरे होतील. व परत एकदा मनुवादी राज्यसत्तेचा मार्ग आरएसएस साठी सुकर
होईल. हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे. रामदास आठवले, सुलेखा कुंभारे, जोगेंद्र
कवाडे यांना देखील एकेकाळी तरुण दलित नेतृत्व म्हणून मोठे केले गेले व आज ते सर्व
आरएसएस-भाजप च्या गळाला लागून बसले आहेत. हे सर्व फक्त एवढ्यासाठीच केले गेले
जेणेकरून वैचारिक परिपक्व दलित नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने समाजासमोर
येऊ नये. ही सर्व उठाठेव जी कालही मनुवाद्यांकडून सुरु होती व आजही सुरु आहे ती
फक्त आणि फक्त आंबेडकरी वैचारिक वारसा लाभलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वैचारिक
नेतृत्वाला व्यापक भारतीय राजकारण व समाजकारणातून दूर ठेवण्यासाठी व त्यांना बदनाम
करून त्यांचे कर्तुत्व झाकोळून ‘परत एकदा आंबेडकर पर्व’ या देशावर येणार नाही याची
खबरदारी घेण्यासाठी चाललेली मनुवाद्यांची ही उठाठेव आपण वेळीच ओळखली पाहिजे.
भीमा-कोरेगाव च्या प्रकरणाने परत एकदा प्रकाश आंबेडकरांचे
बहुजन चळवळीतील, बहुजन राजकारणातील स्थान पक्के होण्यासोबतच दलित राजकारण
त्यांच्या नेतृत्वाभोवती एकवटू लागलेले आहे. प्रकाश आंबेडकरांचे हे मनुवादी नव्या
पेशवाई विरोधात उभे केलेले सर्वव्यापी आव्हान आरएसएस-भाजप च्या मनुवादी पिलावळीतील
फौजदार व चौकीदारांना पेलाविणारे नाही म्हणून ३ जानेवारी २०१८ ला महाराष्ट्रात
झालेला मानवतावादी उठाव, मानवतावादी क्रांती ला बदनाम करण्याची कुठलीच संधी
मनुवाद्यांना सोडायची नाही. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात व जवळपास २०० अन्य
मानवतावादी संघटनांच्या सहकार्यातून ३ जानेवारी २०१८ ला झालेले आंदोलन हे
चळवळीच्या दृष्टीने फक्त आंदोलन नसून तो बहुजन समाजाने केलेला मानवतावादी
क्रांतीचा उठाव होता. ज्यामुळे इथली नवी पेशवाई व तिचा विद्रूप चेहरा देशासमोर व
जगासमोर आला. नव्या पेशवाईच्या सत्तेला तडे गेले. त्यामुळे ही नवी पेशवाई आपल्या
मनुवादी चौकीदारांकरवी या क्रांतीला बदनाम करण्यासाठी आसुसलेली आहे. प्रकाश
आंबेडकरांना वेठीस धरण्याची संधी शोधत आहे. अश्या परिस्थितीत मनुवादी अन्यायाला
कंटाळलेल्या समूहाने प्रकाश आंबेडकर यांच्या प्रगल्भ नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे
उभे राहून नव्या पेशवाईचे साम्राज्य संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा
करावी. आजपर्यंत या देशाला ज्या आंबेडकर पर्वाची प्रतीक्षा होती ते ‘आंबेडकर पर्व’
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधानातील कल्याणकारीत्व, धर्मनिरपेक्षता,
समानता, जातीअंत घेऊन पेशवाई निर्मित मनुवादी व्यवस्था संपुष्ठात आणण्यासाठी पुढे
येत. या ‘आंबेडकर पर्वात’ आपण सर्व सहभागी होण्याचा प्रण करूयात व मनुस्मृतीला
हद्दपार करण्यासाठी कटिबद्ध होऊयात.
¤¤¤
डॉ. संदीप
नंदेश्वर, नागपूर.
No comments:
Post a Comment