Tuesday 21 November 2017

धर्मसत्ता / धर्मराज्य उलथवून लावण्यासाठी मानवतावाद्यांनो एक व्हा !

#Once_Again_Ambedkar
धर्मसत्ता / धर्मराज्य उलथवून लावण्यासाठी
मानवतावाद्यांनो एक व्हा !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक, दलितोद्धारक, घटनातज्ञ म्हणूनच प्रचारित व प्रसारित केले गेले. फार फार क्वचितप्रसंगी तर अर्थतज्ञ, मानवतावादी यापलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊ दिले गेले नाही. यात आंबेडकर विरोधकांची संख्या जितकी होती त्यापेक्षा जास्त स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या आंबेडकरवाद्यांचीही संख्या अधिक होती. या देशाला सांसदीय प्रणाली बहाल करणारे, या देशाला लोकशाही प्रदान करणारे, या देशात थेट जनतेचे सह्भागीत्व व्यवस्थेमध्ये मिळवून देणारे राजकीय बाबासाहेब पडद्यामागे ठेवून आंबेडकरी चळवळीची संकल्पना रुजविता येणार नाही. मजूरमंत्री, कायदेमंत्री, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य नजरेआड करून, त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली राजनीती व अंगीकारलेल्या राजकीय संस्कृतीकडे डोळेझाक करून २१ व्या शतकात आंबेडकरी चळवळीला राजकीय वाटचाल करता येणार नाही. त्यांनी निर्माण केलेल्या स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्टस फेडरेशन या पक्षांचा राजकीय इतिहास व अंगीकारलेली राजकीय मुल्ये आजच्या पिढीने लक्षात घेणे गरजेचे आहे. समग्र बाबासाहेब डोळ्यापुढे ठेवत असतांनाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली राजकीय संस्कृती व त्यांच्या प्रत्यक्ष कृती कार्यक्रमातून आपल्यापुढे येणारी राजकीय संस्कृती; स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्यानी किंवा मानवतावाद्यांनी पुढे न रुजविल्यामुळे आज धर्मसत्ता/धर्मराज्य डोके वर काढू पाहत आहे. याचे चिंतन करणे गरजेचे आहे.

          २१ व्या शतकात आज भारतात रुजविली जाणारी राजकीय संस्कृती १९३० च्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे सुद्धा होती. फरक फक्त एवढाच की, तेव्हाच्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व तत्कालीन कॉंग्रेस करीत होती तर आजच्या राजकीय संस्कृतीचे नेतृत्व RSS-BJP करीत आहे. तेव्हासुद्धा एकपक्षीय प्रघात, राजकीय हुकुमशाही कॉंग्रेस कडून राबविली जात होती आता तीच परंपरा RSS-BJP राबवीत आहे. परंतु या राजकीय संस्कृतीत फक्त काही वर्गाचे हित सामावलेले होते. आणि एक मोठा वर्ग आपल्या राजकीय हितसंरक्षणापासून वंचित राहत होता. त्यामुळे तो वर्ग अन्याय अत्याचाराचा बळी पडून शोषणाचा बळी ठरत होता. म्हणून मध्यंतरीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बहुसंख्य वर्गाच्या हितसंरक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. कॉंग्रेस ची एकपक्षीय राजकीय हुकुमशाही व त्यातून निर्माण होणारी सामाजिक शोषणाची व्यवस्था मोडीत काढून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. गोलमेज परिषदेने चालून आलेली संधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या संधीचे केलेले सोने यामुळे भारतात सर्वव्यापी राजकीय संस्कृतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना व या पक्षाला मिळालेले यश हे त्या सर्वसमावेशक राजकीय संस्कृतीच्या उदयाची चिन्हे होती. पुढे जाऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसहभागीत्वाची राजकीय संस्कृती या देशाला दिली. व धर्मसत्ता/धर्मराज्य रुजवू पाहणाऱ्या राजकीय संस्कृतीला देशातून हद्दपार केले.

देशाचे व्यापक हित संवर्धन प्रसंगी क्वचित मतभेद असतांना देखील वैचारिक सहकार्य करण्याची क्षमता त्याकाळच्या राजकीय पक्षात आणि राजकीय नेतृत्वात होती. वैचारिक मतभेद असतांना देखील देशाच्या एकसंघ उभारणीच्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेली राजकीय सामंजस्यता निर्विवाद होती. त्यामुळे त्याकाळचे मार्क्सवादी, समाजवादी, उदारमतवादी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन देशाच्या भविष्यासाठी एकत्र येत होते. त्याकाळच्या कॉंग्रेस ला कुठे सहकार्य करायचे व कुठे कॉंग्रेसच्या विरोधात उभे राहायचे याचे सूत्र ठरलेले असायचे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५४ ला त्यांच्या संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीसाठी समाजवादी, मार्क्सवादी व उदारमतवादी नेत्यांसोबत केलेला पत्रव्यवहार महत्वाचा ठरतो. अर्ध हिंदुत्ववादी व अर्ध भांडवलवादी कॉंग्रेस भविष्यात देशातील सामान्य जनतेला न्याय देऊ शकणार नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यामुळे कॉंग्रेस समोर एक सशक्त पर्याय उभा केल्याशिवाय या देशाच्या संविधानात निहित कल्याणकारीत्व, देशाची एकसंघता, संविधानाने निहित केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता भारतीय समाजात निर्माण करता येणार नाही. जोपर्यंत सांसदीय लोकशाहीत सशक्त विरोधी पक्ष निर्माण होत नाही तोपर्यंत संविधानाने अपेक्षिलेली देशाची जडणघडण व प्रगती होणार नाही. एकपक्षीय हुकुमशाही मोडीत काढल्याशिवाय देशातील विषमतेला समानतेत परिवर्तीत करता येणार नाही. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले होते.

राजकीय समानतेच्या बळावर सामाजिक व आर्थिक विषमता संपविता येईल पण त्यासाठी राजकीय समानतेतून मिळालेल्या प्रतिनिधित्वाच्या बळावर हे कार्य पूर्णत्वास जाणारे आहे. कारण सामाजिक व आर्थिक विषमता संपविण्याचे ध्येय संविधानात राहून चालत नाही तर त्या ध्येयांच्या ध्येयपूर्तीसाठी सत्ताधारी पक्षाला बाध्य करणारा विरोधी पक्ष किंवा राजकीय प्रतिनिधी तितकाच सक्षम असला पाहिजे. तेव्हाच भारतीय संविधानाचा उद्देश सफल करण्यासाठी तो सत्ताधारी पक्षावर दबाव निर्माण करू शकतो. परंतु या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात कुणीही कार्य केले नाही. त्यामुळे संविधानातील निहित मानवतावादी तत्वांच्या पूर्ततेसाठी काम करणारा मानवतावादी विचार समूह एकत्र येऊ शकला नाही. उलट मानवतावादी तत्वे रुजविण्यासाठी झटणारा, सर्व प्रकारच्या विषमतेला नाकारणारा, सर्व प्रकारच्या अन्याय-अत्याचाराला झुगारणारा मानवतावादी विचार समूह (आंबेडकरवादी, मार्क्सवादी, समाजवादी) समन्वयाच्या भूमिकेत न राहता स्वतंत्रपणे लढत राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेला प्रमाण मानून रिपब्लिकन पक्षाने या समूहात समन्वय निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते. परंतु तसे न होता आपसी विसंवादाने विषमतावाद्यांविरुद्ध लढणारा एक मोठा समूह वैचारिक विरोधात सापडून कायमचा दूर गेला. त्याचा लाभ कॉंग्रेस ने घेतला. व या स्वतंत्रपणे लढणाऱ्या विचार समूहाच्या पक्षात दुफळी माजवून कमकुवत बनविले. कार्यकर्ते व नेते गळाला लावून सक्षम विरोधी पक्ष कॉंग्रेस ने निर्माण होऊ दिला नाही व या देशावर ६० वर्ष राज्य केले. जनसंघ व्हाया जनता पार्टी मधून निर्माण झालेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा भारतीय जनता पार्टी आज तेच सूत्र वापरून देशात सक्षम विरोधी पक्ष तयार होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घेत आहे. फरक फक्त इतकाच आहे की, कॉंग्रेस ने धर्मराज्य निर्मितीचा आग्रह न धरता सत्ता चालविली. तर भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित मनुवादी धर्मसत्ता व धर्मराज्य निर्मितीसाठी आग्रही आहे.

भारतीय संविधानाने हद्दपार केलेली धर्मसत्ता व धर्मराज्य परत या देशावर लादले जाण्याचा आग्रह भाजपा/आरएसएस कडून धरला जात असतांना मानवतावादी विचार प्रवाह स्वतंत्र वाटचाल करण्याचा आग्रह धरत असतील, आपसी समन्वय निर्माण न करता वैचारिक मतभेद कायम ठेऊन राजकीय वाटचाल करणार असतील किंवा सर्व शक्तीनिशी एकत्र येऊन भाजपा/आरएसएस च्या धर्मसत्ता/धर्मराज्य ला विरोध करणार नसतील तर स्वतःच स्वतःच्या तिरडीची व्यवस्था करण्यात मानवतावादी विचार समूह (आंबेडकरवादी, मार्क्सवादी, समाजवादी) गुंतले आहेत असेच म्हणावे लागेल. हा आपसी मतभेदाचा व स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय मानवतावादाला संपविण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणारा ठरेल. एकच ध्येय व उद्धिष्ट घेऊन कार्यरत असणारा समूह वैचारिक श्रेष्ठत्वाची बेगडी संकल्पना पुढे करून आंबेडकरी विचार विरुद्ध मार्क्सवादी विचार असा प्रवाह निर्माण करीत असतील तर ते पुरोगामी बुरखा पांघरून प्रतिगामी मनुवाद्यांचे मानवतावादी चळवळीतील गुप्तहेर आहेत असेच म्हणावे लागेल. त्यामुळे अशा पुरोगामी बुरख्यातील प्रतिगामी चेहऱ्यांना मानवतावादी चळवळीत वैचारिक श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची मांडणी करून वैचारिक दुफळी निर्माण करण्याआधी वेळीच थांबविणे गरजेचे आहे.

या देशात महात्मा गांधींची हत्त्या धर्मसत्ता/धर्मराज्याच्या आग्रही मानसिकतेनेच केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचे नेतृत्व केले. हे निर्विवाद सत्य आहे. आजही दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही हत्त्या धर्मसत्ता/धर्माराज्याच्या आग्रही मानसिकतेनेच केली आहे. व आजही त्याचे नेतृत्व आरएसएस नेच केले आहे. त्यामुळे धर्मसत्ता/धर्मराज्य निर्माण करू पाहणाऱ्या शक्तीविरुद्ध लढतांना मानवतावादी चळवळीला धर्मसत्ता/धर्मराज्य नाकारणाऱ्या सर्वांना सोबत घ्यावेच लागणार आहे. धर्मनिरपेक्ष मानवतावाद्यांची मोट बांधून धर्मसत्तेच्या ठेकेदारांविरुद्ध लढावे लागणार आहे. ही लढाई कुण्या एका आंबेडकरवाद्याची नाही, किंवा कुण्या एका मार्क्सवाद्याची नाही किंवा कुणी एका पुरोगामी म्हणविणाऱ्याची नाही. धर्मसत्तेविरुद्धची लढाई ही थेट मानवतावाद्यांनी धर्मसत्तेविरुद्ध पुकारलेले बंड आहे. त्यामुळे त्या बंडखोरांना फक्त आंबेडकरी, किंवा फक्त मार्क्सवादी किंवा फक्त पुरोगामी असे लेबल लावता येणार नाही. व अशा लेबल लावण्यातून धर्मसत्तेविरुद्धची लढाई जिंकताही येणार नाही. ज्यांना ज्यांना विषमता मान्य नाही; मग ती कुठल्याही प्रकारची विषमता असो अशा सर्वांना या लढाईत आपल्या बाजूने घ्यावे लागणार आहे. ज्यांना ज्यांना असमानता, अन्याय-अत्याचार, गुलामी मान्य नाही अशा सर्वांचे नेतृत्व आम्हाला करायचे आहे. तेव्हाच आरएसएस/भाजपा च्या धर्मसत्ता/धर्मराज्याच्या स्थापनेच्या हालचाली उधळवून लावता येतील.

एकदा का देशातील सर्व मानवतावादी एकत्र आले की धर्मसत्तेचे राज्य या देशात राहणार नाही किंवा या देशाला धर्मराज्य बनविता येणार नाही हे आरएसएस जाणून आहे. त्यामुळे या मानवतावाद्यांमध्ये वैचारिक भेद पसरविण्याचे षडयंत्र ते सातत्याने करीत असतात. वैचारिक श्रेष्ठत्वाची नशा चढलेले अर्धज्ञानी हे नेमके या षडयंत्राला बळी पडतात. व तिथून सुरु होतो आंबेडकरी विरुद्ध मार्क्सवाद्यांचा मतभेद, आंबेडकरी विरुद्ध गांधीवाद्यांचे मतभेद, आंबेडकरी विरुद्ध समाजवाद्यांचे मतभेद, आंबेडकरी विरुद्ध पुरोगामी हिंदूंचे मतभेद. समाज किंवा चळवळ म्हणजे डिग्री पास करण्यासाठी घ्यावी लागणारी परीक्षा व त्या परीक्षेचा पेपर नव्हे. जिथे तुम्ही असे लिहाल तरच उत्तर बरोबर किंवा तरच पूर्ण मार्क्स मिळतील. समाज किंवा चळवळ काटेकोर उत्तर मिळावे किंवा चांगले मार्क्स मिळावे म्हणून सोडविलेला पेपर नव्हे. समाज किंवा चळवळ ही समान विचारांच्या दुव्यांना हाताशी धरून मानवी जीवनमुल्यांची जपणूक करून मानवी विकासाला पोषक वातावरण निर्मिती करून ते वातावरण समाजजीवनात कायम टिकवून ठेवण्यासाठी चाललेली धडपड होय. या धडपडीत विषमतावाद्यांकडून कायम चळवळी समोर अडथळे निर्माण केले जातात. त्या अडथळ्यांना पार करून संघर्षातून मानवी मुल्यांची जपणूक करण्याचे ध्येय मानवतावाद्यांनी बाळगले पाहिजे.

समान ध्येय बाळगणारा विचार हा कायम शत्रूस्थानी किंवा मतभेदाचा कायम पुरस्कर्ता असू शकत नाही हे इथल्या अर्धज्ञानी आंबेडकरवाद्यांनी किंवा तसा विचार बाळगणाऱ्यानी कायम लक्षात ठेवावे. आणीबाणीच्या किंवा अटीतटीच्या परिस्थितीत एक हात दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे करावाच लागतो व दुसऱ्याला तिसऱ्याच्या मदतीसाठी हात पुढे करावाच लागतो. तेव्हाच एक शृंखला तयार होऊन सर्वांच्या सुखरूपतेची शाश्वती मिळते. व तेव्हाच त्या परिस्थितीशी सामुहिक सामना करून सर्वांना सुखरूप धोक्यातून बाहेर पडता येते. अन्यथा आणीबाणीच्या परिस्थितीतही ‘एकला चलो’ चा नारा देऊन स्वतःला वाचविण्यासाठी केली गेलेली धडपड निष्काम व असफल ठरते. इतकेच नाही तर स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्याला धोक्यात टाकते. समाज जीवनाचे हे त्रिकालाबाधित सूत्र मानवतावादाची आधारशीला आहे. त्या आधारशिलेची प्रताडणा करून आम्ही स्वतःला मानवतावादी म्हणू शकत नाही. धर्मसत्तेविरुद्ध लढतांना आम्हाला वेगवेगळ्या विचार प्रवाहांमधील मानवतावाद्यांची शृंखला निर्माण करावीच लागणार आहे. तेव्हाच आम्ही मानवी मूल्याला पोषक सामाजिक वातावरण टिकवून ठेऊ शकू. हे सर्व मानवतावाद्यांनी आपल्या मस्तिष्कावर कोरून ठेवावे.

समान उद्धीष्टांच्या पूर्ततेसाठी भारतीय संविधानातील मानवी मूल्य संवर्धित करण्यासाठी मानवतावादी विचार प्रवाह बाळगणाऱ्यानी एकत्र येऊन राजकीय वाटचाल करावी अशी संकल्पित इच्छा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बाळगलेली होती. आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐवजी बाळासाहेब आंबेडकर त्या संकल्पित इच्छापुर्ततेसाठी धडपड करीत आहेत. व सर्व मानवतावादी विचार प्रवाहांना सोबत घेऊन आरएसएस/ भाजप च्या संकल्पित धर्मसत्ता व धर्मराज्यापुढे आव्हान उभे करीत आहेत. त्यांच्या या लढाईला जवळपास सर्वच मानवतावादी विचार प्रवाह सहकार्य करीत आहेत. परंतु त्यांच्या या समन्वयात्मक मानवतावादी लढाईत अर्धज्ञानी, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या मानसिकतेने ग्रासलेले आंबेडकरी अडथळा निर्माण करीत आहेत. त्यातले काही मनुवादी धर्मसत्तेच्या मांडीवर बसून आहेत. तर काही मनुवादी मानसिकतेने ग्रासित होऊन डोक्यावर आपटलेले आहेत. त्यामुळे धर्मसत्तेचे धुमाकूळ माजले असतांनाही टोकाचा वैचारिक मतभेद बाळगून स्वतःच धर्मसत्तेचा मार्ग सुकर करीत आहेत. या बिनडोक मानवतावादी माणसांच्या वैचारिक मतभेदाचे टोक मोडून मतपरिवर्तन झाले तर त्यांना सोबत घेऊन आणि नाही झाले तर यांच्याव्यतिरिक्त धर्मसत्तेविरुद्धचा लढा मानवतावाद्यांना एकदुसऱ्यांच्या हातात हात घालून लढावा लागणार आहे. एकदा का सर्व मानवतावादी विचार प्रवाह एकत्र आले, तर धर्मसत्ते विरुद्ध असणारे गांधीवादीसुद्धा सोबत येण्यास बाध्य होतील. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. २०१९ ची लोकसभा ही या देशात धर्मसत्ता हवी की मानवी मूल्य वृद्धिंगत करणारी लोकशाही हवी ? यावर केंद्रित होणार आहे. धर्मसत्तेला पुन्हा पराभूत करण्याची संधी आपल्यापुढे आहे. मानवतावाद्यांचे राजकीय स्थान घट्ट करण्याची संधी आहे. त्यामुळे मानवतावादी विचार प्रवाहामधील वैचारिक मतभेदाला दूर सारून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात धर्मसत्तेच्या जोखडातून लोकशाहीला वाचविणारा राजकीय प्रवाह उभा होत आहे. त्या प्रवाहात सहभागी होऊन धर्मवाद्यांचे धर्मराज्य उलथवून लावण्यासाठी मानवतावाद्यांनो एक व्हा !
¤¤¤
#Once_Again_Ambedkar

 डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

No comments:

Post a Comment