Saturday 7 October 2017

मनुवादी सारीपाटाचे मोहरे होऊन आरएसएस पराभूत कसा होईल ?

#Once_Again_Ambedkar
मनुवादी सारीपाटाचे मोहरे होऊन
आरएसएस पराभूत कसा होईल ?
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.


          २१ व्या शतकात जगाच्या पटलावर कुठल्याही एका विचारसरणीचा, एका विचारधारेचा, एकाच धर्म संस्कृतीचा देश उभा केला जाऊ शकत नाही. किंवा निर्माणही होऊ शकत नाही. भारताच्या दृष्टीने तर असा विचार करणेही अशक्यप्राय आहे. इथे कुठलाही अतिरेकी विचार नव्या भारताची निर्मिती करू शकणार नाही. इथली भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती लक्षात घेतली तर या देशाचे संविधान हे एकमेव साधन आहे ज्या आधारे हा देश आज जगाच्या पटलावर उभा आहे. देशाचे संविधान हेच या देशाला एकसुत्रात बांधून ठेवू शकते. या दृष्टीने विचार करता या देशाच्या सत्तेवर येणारे सत्ताधारी हे फक्त निमित्तमात्र आहेत. “कावळा बसावा आणि फांदी तुटावी.” या अंधश्रद्धाळू म्हणी प्रमाणे एखादा विचार सत्तेच्या केंद्रस्थानी आला किंवा अतिरेकी धार्मिक विचाराची माणसे सत्तेवर विराजमान झाली म्हणजे क्षणार्धात भारताचे संविधान व त्यातून आलेली धार्मिक स्वतंत्रता किंवा नव संविधानिक संस्कृती, लोकतंत्र, समता, बंधुता कालबाह्य  ठरविता येत नाही. किंवा सत्ताधाऱ्यांना तश्या स्वरूपाचा मनमानी कारभार चालविता येणार नाही. देश सत्ताधाऱ्यांच्या मनमानीने नव्हे तर संविधानिक तरतुदीने चालेल. व तसा आग्रह या देशातल्या प्रत्येक नागरिकांचा आहे.
          परंतु आरएसएस च्या अतिरेकी हिंदू विचारधारेतून निर्माण झालेला भाजपा आज देशाच्या सत्तेवरून मनमानी कारभार करू पाहत आहे. देशावर मनुवादी विचारधारा लादू पाहत आहे. आरएसएस ने आखलेल्या अतिरेकी मार्गाचा सारीपाट सर्वत्र पसरवून देशातील जनतेला त्या सारीपाटाचे मोहरे बनवू पाहत आहे. जी भीती इथल्या संविधानकारांना होती ती साधार भीती आज परत देशासमोर उभी आहे. महत्प्रयासाने उभारलेली संविधानाची तटबंदी तोडून देश मनुवादी व्यवस्थेकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. व हे सर्व कुणाच्या बळावर केले जात आहे. तर ज्या लोकांना या देशाच्या संविधानाने स्वतंत्र पायावर उभे केले त्याच लोकांच्या बळावर त्यांना अंधारात ठेवून, त्यांचे मानसिकीकरण करून केले जात आहे.  आरएसएस ताकतवान आहे, बुद्धिवान आहे असे म्हणताच येत नाही पण ते चतुर आहेत. मानसिकीकरणात पारंगत आहेत. त्याच आधारावर समाजाची मनोरचना निर्माण करण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. व त्या मनोरचनेला सामान्य भारतीय जनता बळी पडत आहे.
आरएसएस भाजप या आपल्या राजकीय शाखेच्या माध्यमातून देशावर अधिराज्य गाजवीत आहे. आरएसएस चे हे अधिराज्य देशातील सर्वच नागरिकांना किंवा सर्वच हिंदूंना मान्य आहे असेही नाही. परंतु आरएसएस चे हे अधिराज्य उलथवून लावण्यासाठी लागणारे संघटीत बळ इतरांमध्ये दिसून येत नाही. किंवा त्या दृष्टीने प्रयत्न होतांना दिसून येत नाही. आरएसएस च्या मनोरचनेला तोडून बाहेर पडायला भाग पाडणारा कृतिकार्यक्रम, कृतीआराखडा तयार होतांना दिसून येत नाही. आरएसएस ने आखलेल्या हिंदुत्व संमोहनाला तोडता येते. त्यावर इलाज आहे. परंतु त्यासाठी खंबीर भूमिका घेऊन लढाईत उतरावे लागेल. ही लढाई जरी शस्त्राची नसली तरी शास्त्राची मात्र नक्की आहे. आणि लढाईत केवळ दोनच परस्पर विरोधी शत्रू असतात. परंतु दुर्भाग्य असे की, आज आरएसएस चा परस्पर विरोधी गट विविध गटात (खेम्यात) विखुरला गेला आहे. त्यामुळे विरोधकांची विखुरलेली ताकत आरएसएस ला भक्कम बनवीत आहे. आरएसएस ने आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारतीय समाज प्रवाहात सातत्याने दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व त्यात आज आरएसएस सफल झाली आहे. त्यामुळे भारतीय समाज प्रवाह व त्यांच्यात निर्माण केली गेलेली दुफळी समजून घेतल्याशिवाय आरएसएस चा पाया कमकुवत करता येणार नाही.
          भारतीय समाजात मुख्यत्वेकरून चार प्रवाह सातत्याने दिसून आले. १) मनुवादी विचारधारेला घेऊन काम करणारा आरएसएस चा प्रवाह, २) आंबेडकरी विचारधारेला घेऊन वावरणारा दलित, मागासवर्गीय आंबेडकरी प्रवाह, ३) मार्क्सवादी विचारधारेला घेऊन काम करणारा श्रमिक, मजुरांसाठी भांडवलदारी विरोधात उभा राहिलेला मार्क्सवादी प्रवाह, आणि ४) धार्मिक वेगळेपण जपून ठेऊन वाटचाल करणारा मुस्लीम प्रवाह. आरएसएस ने उर्वरित तीनही प्रवाहांना वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीने नामोहरण केले. सुरवातीला आंबेडकरी विचार प्रवाहाला तोडण्याचे काम आरएसएस ने केले. कारण आंबेडकरी विचारप्रवाह हा एकमेव विचारप्रवाह असा होता जो थेट आरएसएस ला टक्कर देऊ पाहत होता व आरएसएस च्या संकल्पित ध्येयात अडथळा ठरू पाहत होता. म्हणून १९७० च्या दशकापासून अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरवाद्यांना आक्रमक करण्यापासून ते नामांतर आंदोलनाच्या उत्सवप्रियतेपर्यत आंबेडकरवाद्यांना पेटवित ठेवले. रा.सु.गवई, जोगेंद्र कवाडे, कांशीराम, मायावती ते रामदास आठवले पर्यंत अनेक आंबेडकरी मासे गळाला लागले. ज्यामुळे आंबेडकरी विरुद्ध हिंदू, आंबेडकरी विरुद्ध मार्क्सवादी, आंबेडकरी विरुद्ध गांधीवादी, दलित विरुद्ध हिंदू अशी मनोरचना निर्माण करण्यात आरएसएस यशस्वी ठरली. आंबेडकर विरोधाची मानसिकता अन्य हिंदूंमध्ये पेरण्यात ते यशस्वी झाले. ज्यामुळे आंबेडकरवादी तुष्टीकरणात सापडत गेले.
          १९९० नंतर आरएसएस ने मोर्चा वळविला तो मार्क्सवादी व मुस्लीम प्रवाहाविरोधात. मार्क्सवाद्यांवर नक्षलवादाचा ठपका ठेऊन नागरी समाज मानसिकता त्यांच्या विरोधात तयार करण्यात आली. तर दुसरीकडे १९९२ ला लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात झालेला बाबरी मस्जीत विध्वंस व आताचे प्रधानमंत्री व तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरात मध्ये २००२ ला झालेली मुस्लीम विरोधी दंगल करून मुस्लीम विरुद्ध हिंदू अशी मनोरचना तयार केली गेली. या सर्वात एक समान धागा होता तो असा कि, तिन्ही प्रवाहात उमटणारी प्रतिक्रिया ही हिंदू विरोधी कशी उमटेल याची काटेकोर दक्षता घेण्यात आली. व भारतीय समाजातले ३ मुख्य प्रवाह अश्या पद्धतीने हिंदू विरुद्ध दाखवून निव्वळ प्रतिक्रियेच्या बळावर हिंदूंचे ध्रुवीकरण करून त्यांना आरएसएस च्या माध्यमातून भाजपच्या मागे उभे करण्यात ते सफल ठरलेत. त्यामुळे मुस्लीम सुरक्षितता शोधण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी कॉंग्रेस सोबत घटस्फोट घ्यायला तयार झाला नाही. तर दुसरीकडे मार्क्सवादी नक्षलवादाचा शिक्का पुसून काढण्यात व्यस्त झाले. आंबेडकरी मात्र सत्तेसाठी लोटांगणे टाकण्यात व्यस्त राहून सामाजिक आंदोलनांकडे दुर्लक्ष करून धर्मद्वेषी आंबेडकर, हिंदुद्वेषी आंबेडकर, मार्क्सद्वेषी आंबेडकर, गांधीद्वेषी आंबेडकर असा आरएसएस ला लाभदायक प्रचार प्रसार करण्यात गुंग झाले. त्यामुळे देशात आरएसएस च्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या मनुवादी मानसिकतेविरुद्ध वातावरण निर्मिती होऊ शकली नाही.
राज्यसत्तेची घाई न करता सामाजिक बंधुता तोडण्याचा, धार्मिक तुष्टीकरण करून हिंदू ध्रुवीकरण करण्याचा व प्रसंगी रोष ओढवून घेण्याचेही काम आरएसएस ने केले. कारण सत्तेत असलेला मुखवटाधारी गांधीवादी काँग्रेसी व संतपरंपरा जपणारा वारकरी हिंदुत्व सोडून उर्वरित समाज प्रवाहात सामिल होणार नाही याची खात्री करूनच आरएसएस ने भारतीय समाजात आपल्या सारीपाटाचा खेळ सुरु ठेवला. त्यासाठी कॉंग्रेस चा अपेक्षित फायदा आरएसएस ला झाला. कॉंग्रेस सत्तेवर असतांना आरएसएस च्या देशविघातक कारवाया भारतीय जनतेसमोर उघडे पाडण्याची संधी अनेकदा आली. परंतु सत्तेच्या मोहजाळात अडकून आपली प्रतिमा सांभाळण्यात कॉंग्रेस व्यस्त राहिली. कॉंग्रेस सत्तेवर असतांना आरएसएस च्या माध्यमातून चालणाऱ्या देशविघातक कृत्यांना व घडामोडींना आळा घातला जायला पाहिजे होता तो घातला गेला नाही. अगदी शेवटच्या काळात सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असतांना “आरएसएस आतंकवादी कारवायात व्यस्त आहे. व आरएसएस च्या माध्यमातून आतंकवादी प्रशिक्षण देशात दिले जात आहे.” असे विधान केले होते. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पुढे त्या विधानाचे काय झाले कुणालाच कळले नाही. देशाच्या तत्कालीन गृहमंत्र्याने जबाबदारीने केलेल्या या विधानात सत्यता असतांना देखील देशाला अंधारात का ठेवल्या गेले ? याचा सुजाण भारतीयांनी विचार करावा.
जनआंदोलनातून जगाच्या पटलावर सत्तापरिवर्तन होत असतांना प्रतिक्रियेच्या बळावर आरएसएस ने २०१४ ला भारतात निर्विवाद सत्ता हस्तगत केली. अण्णा हजारे व रामदेव बाबा यांना मोहरे बनवून प्रतिक्रियेच्या बळावर सत्तेत आलेली भाजपा जगातले एकमेव उदाहरण आहे असेही म्हणता येईल. देशातल्या काही मोजक्या भांडवलदार घराण्यांना सोबत घेऊन, निष्ठुर व हुकुमशाही मानसिकता बाळगणाऱ्या माणसाला प्रधानमंत्री पदाचा उमेदवार घोषित करून, संघ स्वयंसेवक अशी प्रतिमा निर्माण करून, जगातल्या १००० सॉफ्टवेअर इंजीनियर ची टीम सोबत घेऊन, देशातला मिडिया विकत घेऊन भाजपा/आरएसएस ने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. विकास, भ्रष्टाचार, काळा पैसा या त्रिसूत्रीचे भावनिक संमोहन देशातल्या जनतेवर टाकण्यात आले. विकासाच्या नावाने स्वच्छ भारत व भ्रष्टाचार, काळा पैश्याच्या नावाने नोटाबंदी चालविली गेली. परंतु दोन्ही योजना सपशेल अपयशी ठरल्यात. परंतु सरकारचे अपयश झाकण्यासाठी “गायीला” पुढे करून परत आरएसएस चे परंपरागत धार्मिक अस्त्र वापरल्या गेले. व आजही वापरल्या जात आहे. राममंदिर, कलम ३७०, लव्ह जिहाद, गोरक्षा, काश्मिरातील घुसखोरी, वंदेमातरम् सारखे विषय हाताशी घेऊन धार्मिक प्रतिक्रियेच्या बळावर मानसिकीकरण केले जात आहे. व सत्तेच्या मागे हिंदू मानसिकतेला उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्याच्या २०१९ च्या निवडणुकांत व त्यानंतरच्या संविधानबदलाच्या मोठ्या लढाईत हेच अस्त्र आरएसएस ला कामात येणार आहे. हे आपण शक्य तितक्या लवकर ओळखले पाहिजे.
आरएसएस ने निर्माण केलेल्या मनोरचनात्मक संमोहनाला तोडल्याशिवाय मनुवादी घोडदौड थांबविता येणार नाही. हे देशातील अन्य प्रवाहांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. कौटिल्य त्याच्या राजकीय सिद्धांतात म्हणतो त्याप्रमाणे ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ व ‘शत्रूचा मित्र तो आपला शत्रू’ या न्यायाने मनुवादीविरोधी सर्व मानसिकतेला, संघटनांना, पक्षांना सोबत घेऊन आरएसएस च्या मनुवादी षडयंत्राचा सामना करावा लागणार आहे. राजकारणात कायम शत्रुत्व व कायम मित्रत्व हा नियम केव्हाच मोडीत निघाला आहे. असे असतांनाही अमानवी शक्तीविरुद्ध मानवतावादी अशी बांधणी करता आली पाहिजे. धार्मिक आणि जातीय कट्टरता ही २१ व्या शतकाची आधारशीला होऊ शकत नाही. त्यामुळे धार्मिक कट्टरतावादी विरुद्ध धर्मनिरपेक्षवादी अशी संघटनात्मक मनोरचना मनुवादविरोधकांना निर्माण करावी लागणार आहे. ब्राम्हणहितैषी विरुद्ध बहुजनहितैषी, मनुवादी विरुद्ध भारतीय अश्या थेट लढाईसाठी विरोधकांना सामंजस्य करार करता आला पाहिजे. प्रतिगामी हिंदू मनुवाद्यांना पुरोगामी हिंदूचे त्यांच्या बाजूने ध्रुवीकरण करण्याची संधी मिळणार नाही. याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी निदान पुरोगामी हिंदू आपल्या कुठल्याही कृतीने दुखावला जाणार नाही याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे. तरच आरएसएस ला पराभूत करणे सहज सोपे जाईल.
          आज भाजपा/आरएसएस च्या गोटात गेलेल्या मोहऱ्यांना त्या त्या समाजाने वेठीस धरून उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे गरजेचे आहे. तेव्हाच खा. अमर साबळे, खा. रामदास आठवले इ. सारखे समाजद्रोही मनुवाद्यांच्या मांडीवर बसून समाज व विचारांचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. आरएसएस ने मांडलेल्या सारीपाटात ज्यांना मोहरे म्हणून उभे केले आहे, त्या मोहऱ्यांचा वापर त्या त्या समाजाची मनोरचना निर्माण करण्यासाठी केला जात आहे. अमर साबळे म्हणजे संपूर्ण दलित समाज नव्हे. किंवा आठवले म्हणजे संपूर्ण आंबेडकरी समाज नव्हे. मुख्तार अब्बास नकवी म्हणजे संपूर्ण मुस्लीम समाज नव्हे. हे सर्व मनुवाद्यांचे प्यादे/मोहरे आहेत. जे संपूर्ण समाजाला मनुवाद्यांच्या दावणीला बांधायला निघालेले आहेत. मनुवाद्यांचे मोहरे बनून काम करणाऱ्या प्रत्येक संस्था, संघटना, नेते, कार्यकर्ते, जातीय संघटनांचे प्रतिनिधी यांचे सामाजिक प्रतिनिधित्व नाकारुनच आरएसएस ला मात देता येईल. मनुवादी आरएसएस विरोधी समाज प्रवाहांनी या कणखर भूमिकेपर्यंत आता आपल्या समाज समूहाला घेऊन जावे लागणार आहे. आरएसएस ने आखलेल्या मनोरचनेविरोधात प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा क्रीयावादी होता आले तर आरएसएस ची तुष्टीकरण व धृवीकरणाची प्रक्रिया थांबविता येईल. आणि आरएसएस चा मनोरचनात्मक फुगा फोडून आरएसएस व मनुवादी मानसिकतेवर मात करता येईल.
          आज भाजपा/आरएसएस च्या उधाणलेल्या मनुवादी घोड्याला लगाम घालण्यासाठी मा. प्रकाश आंबेडकर हे संपूर्ण भारतात काही लोकांना सोबत घेऊन लढतांना दिसून येत आहेत. देशांतर्गत अन्य समाज घटकांकडून त्यांच्या या लढ्याला प्रतिसादही भेटत आहे. मार्क्सवादी प्रवाह त्यांच्या सोबत आहे. वारकरी व पुरोगामी हिंदू संस्था, संघटना त्यांच्या सोबत आहेत. एकेकाळी हाच मनुवाद विरोधी लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढला होता. देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्था कायमची हद्दपार करण्यासाठी तत्कालीन कॉंग्रेस ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच आधार घ्यावा लागला होता. आजही भाजपा/आरएसएस ने देशावर लादलेल्या मनुवादी व्यवस्थेला सत्तेवरून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस ला परत एकदा आंबेडकरांचीच मदत घ्यावी लागणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की, तेव्हाचे नेतृत्व “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांनी केले होते व आजचे नेतृत्व त्याच आंबेडकरी विचारातून “मा. प्रकाश आंबेडकर” करणार आहेत. देशात मनुवाद जेव्हा जेव्हा डोके वर काढेल तेव्हा तेव्हा ‘आंबेडकर’ हे या देशासाठी अपरिहार्य ठरणार आहेत. संयोगवश आजचे नेतृत्व हे सुद्धा ‘आंबेडकर’ या नावाचेच आहेत. तेव्हा मनुवादी सारीपाटाचे मोहरे न बनता आंबेडकरी नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनुवादी आरएसएस च्या मनोविज्ञानाला ओळखून आरएसएस ला पराभूत करता येणे शक्य आहे.
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,Top of Form


No comments:

Post a Comment