Saturday 7 October 2017

आंबेडकरी चळवळीने सेनापती निवडावा.

#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळीने सेनापती निवडावा.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
आंबेडकरी चळवळीतील लोकांनी एका महत्वाच्या मुद्द्यावर आत्मचिंतन करावे. आज आंबेडकरी चळवळ विरोधाची चळवळ म्हणून समोर येऊ लागली आहे. जशी ती इतर संस्था / संघटना / पक्ष विरोधी होऊ लागली आहे. तशीच ती स्व संघटना / पक्ष / नेते आणि कार्यकर्ते विरोधी पण बनत चालली आहे. आंबेडकरी चळवळीत आज प्रत्येकाला स्व:कथनाची सवय लागली आहे. सामुहिक प्रश्नांना बगल देऊन व्यक्तीवादाकडे आंबेडकरी चळवळीचा कल झुकतांना दिसून येत आहे. स्व: ला सुखावण्यासाठी, स्व: ला मोठे करण्यासाठी, स्व: ला सिद्ध करण्यासाठी आणि स्व:त्वाचा तोरा मिरविण्यासाठी इतरांना दुषणे देत आम्ही फिरू लागलो आहोत. एखादा मुद्दा चळवळीसाठी, सामुहिक हितासाठी महत्वाचा असला तरी त्याची सुरवात इतरांनी केली असेल, त्याचे नेतृत्व जर दुसऱ्याने केले असेल तर आम्ही त्याला विरोध करतो. ही भूमिका आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत घातक आहे. आज चळवळीत सामंजस्य उरलेले नाही. सहकार्य उरलेले नाही. मी आणि माझा कंपू यात आंबेडकरी चळवळ बंधिस्त होऊ पाहत आहे. त्यामुळे चळवळीचे शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखायला उशीर होत आहे. आंबेडकरी चळवळीचे भविष्य टिकवून ठेवायचे असेल तर यातून बाहेर पडावे लागेल.
एखाद्यावर टीका करून आपण मोठे होत नाही. आणि चळवळही मोठी होत नाही. टीका तत्वांवर आणि विचारांच्या दांभिकपणावर व्हावी. आंबेडकरी चळवळ व्यक्तिगत द्वेषापोटी किंवा व्यक्तिगत स्वार्थासाठी विरोधाची चळवळ बनू नये. आंबेडकरी चळवळ या देशात सामंजस्याची चळवळ बनावी. समदुःखी माणसांना एकत्र करणारी बनावी. सर्व समविचारी माणसांना सोबत घेऊन चालणारी बनावी. चळवळीची व्यापक भूमिका आपण स्वीकारली असती तर चळवळ गतिमान करता आली असती.  पण इथे कुणी व्यापक भूमिका घेतांना दिसूनच येत नाही. मी काम करीत असलेले क्षेत्र म्हणजेच चळवळीचे क्षेत्र. असे समजण्यातून चळवळ लयास चालली आहे. आपली अजूनही कुठलीही राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक अशी भूमिका तयार झालेली नाही. किंवा त्या भूमिकेतून आंबेडकरी चळवळ काम करतांना दिसून येत नाही. याउलट जी माणसे / संस्था / संघटना राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक भूमिका घेतात अश्यांना पाठींबा देण्याऐवजी त्यांच्याच अवतीभवती प्रश्नांची वादळ उठविणे आता आम्ही बंद केले पाहिजे.
मी करतो तीच चळवळ असे म्हणणारे चळवळीचे नसतातच. त्यांचा उद्देश चळवळ नसून त्यांचा उद्देश स्वार्थ आहे. स्व:त्व सुखावण्यासाठी, स्वतःला मोठे करण्यासाठी माणसे असा अश्लाघ्य प्रकार करतात. त्या माणसांना चळवळीच्या सामुहिक हिताचे काही एक देणे घेणे नसते. हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. निर्विकार आणि अपेक्षेपेक्षा जास्त अधिकार / स्वातंत्र्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मिळवून दिले आहे. त्यामुळे हे सर्व घडते आहे. यातून बाहेर पडावे लागेल. कळप करून राहणे हा मानवी समूह जीवनाचा एक अविभाज्य अंग आहे. परंतु समविचाराच्या सामाजिक आंदोलनात आपण या विचारला कुठे स्थान दिलेले दिसून येत नाही. परिवर्तनवादी आंदोलन एकसंघ जोपर्यंत लढत नाही. तोपर्यंत आंदोलनाला यशाची अपेक्षा करता येत नाही. सामाजिक चळवळीत माणसे एककल्ली विचार करीत असतील, एकच अंग घेऊन काम करीत असतील, एकच भूमिका घेऊन चळवळीचा दावा करीत असतील, तर अश्या लोकांच्या विद्वत्तेलासुद्धा काही एक किंमत राहत नाही.
आपल्या मताप्रमाणेच समोरची सर्व माणसे वागली पाहिजे अश्या अट्टाहासापोटी चळवळीची एकरूपता विस्कटली आहे. मत मांडण्याचा, प्रदर्शित करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. परंतु तीच मते स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा अधिकारही प्रत्येकालाच आहे. मानवी संबंधाचे गणित इथेच कुठेतरी बिघडले आहे. एक ध्येय, एक उद्धिष्ट घेऊन एकत्र आलेली माणसे फक्त स्व: ला सुखावण्यासाठी इतरांच्या विचार व मतांना नाकारताच मैत्रीक संबंधातून दूर जातात. ज्यामुळे चळवळीचे ध्येय व उद्धीष्ट्ये मागे पडत जातात. मानववंशशास्त्रात मानवी संघर्षाचे आणि त्यांच्या विकासाचे अनेक सिद्धांत मांडले आहेत. परंतु माझ्या मते "मानवी विचार, मत, दृष्टीकोन, आकलन यांच्यातील वैविध्यपूर्ण वेगळेपणामुळे देखील मानवी संबंध जुळले आणि तुटले. या मतभिन्नतेमुळे अनेकदा मानवी संघर्ष घडून आला. तोच मानवी संघर्षाचा इतिहास आजच्या आधुनिक विकासशील समाजाचा मुलभूत पाया आहे." सामाजिक हिताचे विचार हे कुठल्यातरी वैश्विक तत्वज्ञानाच्या प्रभावातून आलेले असतात. कदाचित त्यात परिस्थितीनुरूप बदलाची शक्यता असते. त्यामुळे त्यात मतभेद करणे म्हणजे बुद्धिभेद होईल. पण माणसे व्यक्तिगत मतापोटी दूर जातात. इतरांच्या मतांचा जेव्हा सन्मान केला जात नाही तेव्हा समजून घ्यावे कि माणसांनी विचार आणि मतांसाठी देखील दर्जाचे गृहीतक मांडले आहे.
अलीकडे एक ध्येय, एक उद्धिष्ट घेऊन एकत्र येणारी आणि आंदोलनाच्या नावाने हजारोंवर प्रभाव पडणारी माणसे वैचारिक आणि व्यक्तिगत मतभिन्नता व आकलनाच्या वैविध्यामुळे दूर जातात आणि काळाच्या पडद्याआड लुप्त होतात. परिवर्तन क्रांती अश्या गोंडस नावाने झालेली हि गर्भधारणा अल्पावधीतच गर्भपाताला समोर का जाते ? या चिंतनातून आधुनिक काळाच्या परिवर्तनवादी क्रांतीच्या कोनशीला उभारल्या जाऊ शकतात. क्रांतीचे रणशिंग फुंकताना वैचारिक एकरूपता अत्यंत महत्वाची असते. आणि ती वैचारिक एकरूपता टिकवून ठेवण्यासाठी क्रांतीच्या विचारांचा गाभा स्वीकारावा लागतो. आंदोलनासाठी झालेली गर्दी आणि क्रांतीसाठी आखलेली व्यूहरचना यांच्यात वैचारिक पातळीवरच फरक जाणवतो. त्यामुळेच आंदोलन तात्कालिक म्हणून संबोधल्या जाते. आणि क्रांती वैश्विक रूप धारण करते.
          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कोटेशन, त्यांच्या संस्था, संघटना उरबूडवून सांगणारे पायलीचे पन्नास सापडतील. बेंबीच्या देठापासून सांगतील. जसेकाही आंबेडकरी चळवळ दुसरे कुणीच नाही तर हेच चालवितात. पण विचारधारेच्या आधारावर यांची आंबेडकरी सामाजिक, आर्थिक, राजकीय भूमिका विचारली तर कॉग्रेस, बिजेपी ला मतदान करतील किंवा त्याच पक्षांना मदत करतील. हीच त्यांची राजकीय भूमिका व त्यातून आपली आर्थिक बाजू भक्कम करतील. फेसबूक, वॉट्सअॅप वर लिहून, एखादवेळेस कुठेतरी गुडग्यातली अक्कल भाषणात पाजळून यांची सामाजिक भूक भागते. मात्र वास्तवाकडे व भविष्यातील पिढीच्या संस्काराकडे कायम आंधळेपणा.
आंबेडकर स्विकारायचा असेल तर आंबेडकरी विचार, विचारधारा अंगिकारावी लागते. आंबेडकरी विचारधारेचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व धार्मिक अशा सर्व अंगांना स्विकारावे लागते. आंबेडकर फक्त सामाजिक, फक्त आर्थिक, फक्त राजकीय किंवा फक्त धार्मिक असे स्विकारता येत नाही. तुकड्यातला आंबेडकर स्विकारणाऱ्यांनो सर्वव्यापी आंबेडकर स्विकारायला लागा. त्यासाठी आंबेडकरी विचारांचे राजकीय नेतृत्व स्विकारण्याची मानसिकता ठेवा. कारण राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातूनच सामाजिक व आर्थिक विचारांची अंमलबजावणीचे लढे उभारता येतात. फक्त फुसक्या सामाजिक आंबेडकरवाद्यांकडून, फुसक्या आर्थिक आंबेडकरवाद्याकडून, फुसक्या धार्मिक आंबेडकरवाद्यांना सर्वव्यापी आंबेडकरांचा लढा लढता येणार नाही. चळवळीला नेतृत्व लागते. व नेतृत्वधारी चळवळच सर्वव्यापक विचारधारेचा लढा सर्व समान पातळ्यांवर एकाच वेळेस लढू शकते. याची जाण व भान असू द्या. तुकड्यातले आंबेडकरी न बनता सर्वव्यापी आंबेडकरी बना !
कुठल्याही विचारधारेला नेतृत्वाची गरज असते. त्या विचारधारेवर चालणाऱ्या राजकीय पक्षाला ते नेतृत्व लिड करते. रिपब्लिकन विचारधारा व पक्षाला मानणाऱ्यांनो एक नेतृत्व निवडा तरच रिपब्लिकन विचारधारा जनमानसात रूजेल व रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त होईल. आज नेतृत्वहिनतेने व नेतृत्वाच्या अस्विकार्यतेमुळे चळवळीचे व समाजाचे फार मोठे नुकसान केलेले आहे.  गल्लीबोळातली नेतृत्वाचा आव आणणारी टोळकी एकाच विचारधारेचा व पक्षाचा दावा करणारी जमा केली तर तो समाज बाजारभुणग्यांचा जथ्था होईल. व विचारधारा मागे पडत जाईल. एक नेतृत्व स्विकारतांना आम्ही व्यक्तीपुजक होत नाही. कारण आम्ही व्यक्तीपेक्षा समाजाच्या व चळवळीच्या भल्याचा विचार करणारी माणसे आहोतचळवळीला व समाजाला नेतृत्वाची गरज असते. ती नेतृत्व क्षमता मा. बाळासाहेब आंबेडकरांत दिसते. वैचारिक व सामाजिक नेतृत्वाच्या रूपात. व्यक्ती म्हणून त्यांचा स्विकार करण्यापेक्षा नेतृत्व म्हणून विचार केला व स्विकारायला लागलो तर चळवळीचे, समाजाचे व रिपब्लिकन पक्षाचे हीत समोर येईल. नेतृत्व ही माझी गरज नाही. ती समाजाची, चळवळीची व भविष्याची गरज आहे. येणाऱ्या पिढीची ती गरज आहे. म्हणून आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहोत. आज चळवळीने व समाजाने नेतृत्व स्विकारले नाही तर भविष्यातही समाज नेतृत्वहीन राहण्याची भिती आहे.
चळवळीचा व समाजाचा तसेच रिपब्लिकन राजकीय इतिहासाचा अभ्यास केला तर बाळासाहेब आंबेडकर यांचेच नेतृत्व उजवे दिसते. आंबेडकरी चळवळीचा व रिपाईचा अभ्यास केला तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढलेल्या लढ्यांनीच यश संपादन केले आहे. व त्याचा लाभ प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या समाजाला मिळाला आहे. म्हणून बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांना व्यक्ती म्हणून नव्हे तर नेतृत्व म्हणून आम्ही स्विकारले पाहीजे. तेव्हाच रिपब्लिकन पक्षाला, समाजाला व चळवळीला गतवैभव प्राप्त होईल. भविष्यातील पिढीवर योग्य ते सामाजिक, राजकीय, व चळवळीचे संस्कार होतील. अन्यथा तुम्ही केलेला नेतृत्व अस्विकारतेचा करंटेपणा भविष्यातील तुमच्या पिढीसाठी विषाहूनही जहरी ठरेल. नेतृत्वहीन चळवळ फार काळ तग धरून राहू शकत नाही.
एका आंबेडकरांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) इतिहास बदलला तर दुसरा आंबेडकर (अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडर) भविष्य घडवेल या भितीपोटी प्रकाश आंबेडकरांच्या सभोवताल टिका, विरोध, संशय इ. चे वलय उभे केले गेले. आपल्यातलेच विरोधक उभे करून प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व समाजाला स्विकारू दिले नाही. त्यांना बदनाम केले गेले. त्यांचे नेतृत्व समाज स्विकारणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे एका वैचारिक, खंबीर व स्वाभिमानी  नेतृत्वापासून समाज वंचित राहीला. तरीही प्रकाश आंबेडकर हे सातत्याने सामाजिक लढे लढत राहीले. प्रकाश आंबेडकरांच्याच शब्दात सांगायचे तर, "तुम्ही बाबासाहेब विकू शकलात, पण मी तोही विकू शकत नाही. कारण नातू आहे." या एका वाक्यात ते खूप काही सांगून जातात.
बाळासाहेबांचे विरोधक जेवढे स्वतःला आंबेडकरी म्हणणारे आहेत तेवढेच प्रस्तापितही आहेत. कारण बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचे प्रस्थापित होणे म्हणजे व्यवस्थेला हादरे बसने निश्चित आहे. एक आंबेडकर इथल्या प्रस्थापितांना पेलवता आला नाही तर दुसरा आंबेडकर यांना सळो की पळो करेल. या भितीने बाळासाहेबांचे विरोधक अधिक तयार झाले. त्याचा लाभ घेऊन प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा राजकीय लाभ घेत आलेत. समाजातले मोहरे हेरून त्यांनाच प्रकाश आंबेडकरांचे विरोधक म्हणून प्रेसेंट करून समाज विस्कळीत केला गेला. दलित मतांचा आज मांडलेला बाजार हा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात समाजात पेरल्या गेलेल्या संशयाचा परिणाम आहे. अन्यथा आज दलित मतांचा बाजार करण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, बिजेपी ला दलित मतदार भेटला नसता. आंबेडकरी-दलित समुह हे लक्षात घेणार आहे का ? समाज जितक्या लवकर हे ओळखेल तेव्हाच समाजाला प्रकाश आंबेडकरांच्या रूपात वैचारिक, प्रबळ, खंबिर, विद्वान व स्वाभिमानी नेतृत्व मिळेल. व दलित मतांचा प्रस्थापितांकडून होणारा बाजार थांबेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुरूप आंबेडकरी चळवळीचे लढे अॅड. प्रकाश आंबेडकर विरोधकांच्या भाऊगर्दीतही तितक्याच स्वाभिमानाने लढत आहेत. व पुढेही लढत राहतील. आज तुम्हाला निर्णय घ्यायची वेळ आली आहे. विनंती हीच की साधकबाधक विचार न करता नेतृत्वाचा विचार गांभिर्यपुर्वक व्हावा. मा. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचे वैचारिक नेतृत्व या समाजाला, चळवळीला व रिपब्लिकन पक्षाला गरजेचे आहे. कुणा एका व्यक्तीला वा कार्यकर्त्याला नाही. हा व्यापक विचार व्हावा हीच अपेक्षा !
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,Top of Form



No comments:

Post a Comment