Friday, 23 June 2017

आंबेडकरी चळवळ ही आमची सामुदायिक जबाबदारी

#Once_Again_Ambedkar
आंबेडकरी चळवळ ही आमची सामुदायिक जबाबदारी
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक सूत्र आहे. आणि सूत्राला खंडित करून आम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर उत्तर नक्कीच चुकीचे येईल. एखाद्या प्रश्नाचे उत्तर जसे सूत्र लावूनच मिळविता येते तसेच आज आंबेडकरी चळवळीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सूत्र लावूनच उत्तर शोधता येईल. आजपर्यंत सूत्राला खंडित करून उत्तर काढण्याचा प्रयत्न केला गेला. तो प्रयोग आता आम्हाला थांबवावा लागणार आहे. त्यासाठी आंबेडकरी चळवळीला विचारप्रवृत्त व्हावे लागणार आहे.
"वैयक्तिक कर्तबगारी ही आदरणीय असते, पण पुष्कळ वेळा ती अनुकरणीय नसते; व म्हणूनच वैयक्तिक कर्तबगारी व सामुदायिक कर्तबगारी यांच्यात तुलना करता सामुदायिक कर्तबगारी शेकडो पटींनी श्रेयस्कर ठरते. वैयक्तिक कर्तबगारी आकाशाएवढी उंच असली तरी साधारण उंचीच्या सामुदायिक कर्तबगारीच्या पासंगालाही ती पुरणार नाही." (अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. १ फेब्रुवारी १९२९, खंड - २० - पान न. ३५) बाबासाहेबांवर होणा-या टीकेला उत्तर देण्यासाठी हा लेख तेव्हाच्या बहिष्कृत भारतात संपादकांनी लिहिला होता.
अतिशय बोध घ्यावी अशी काही वाक्य मी इथे दिलेली आहेत. कारण हल्ली इथे मात्र वैयक्तिक कर्तबगारीने रान माजविले आहे. प्रत्येकाला मी किती श्रेष्ठ आणि किती समाजाचा उद्धारक हे सिद्ध करायचे आहे. ज्यांनी साधा दगडही कधी फोडला नाही. त्यांनी समाजाचे आम्हीच उद्धारक म्हणून बुद्धिभेद केला आहे. आणि मेंढरांची जमात त्याला बळी पडून वैयक्तिक कर्तबगारीचा उदोउदो करीत सुटले आहे. १९७२ नंतर ज्यांनी समाजासाठी त्याग केला ते आज समाजापासून तुटले आहेत. आणि ज्यांनी समाजाला विकून (जाती जोडो आणि वैचारिक आंदोलनाच्या नावाखाली) स्वतःची पोळी भाजून घेतली. ते आता महापुरुषांच्या रांगेत बसू लागली आहेत. सायकल वरून फिरायची लायकी नसणारे, बुद्धीने दिवाळखोर असणारे, समाजालाच वाडीत टाकायला निघालेत. आणि जे समाजासाठी झटले, लढले, मेले, आणि आताही तडपत आहेत. ते आजच्या या तरुण पिढीसमोर कुठेच नाहीत. हे सर्व आम्ही मेंढरांची जमात बनल्यामुळे झाले आहे. जर आम्ही वैयक्तिक आणि सामुदायिक कर्तबगारी ओळखली असती, तर आज ही परिस्थिती पाहायला मिळाली नसतीत्यामूळे येणाऱ्या काळात सामूदायिक कर्तबगारी लक्षात घेऊन वाटचाल करावी लागणार आहे.
मानवी जिवनातील व्यक्तीगत मर्यादा ओळखता आल्या की सामाजिक परिस्थितीवर मात करण्याची कला अवगत होते. प्रबोधन/सुधारणावादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या व्यक्तीगत मर्यादांना बलस्थान समजून तेच सामाजिक परिवेशात उतरविण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे सामूहीक उर्जा असूनही या चळवळी सातत्याने अपयशी ठरत आहेत. हे अपयश आता आम्हाला सामुदायिक कर्तबगारीतून मोडून काढावे लागणार आहे. व्यक्तीवादाच्या आम्ही घातलेल्या मर्यादा बाजूला सारून व्यवस्थात्मक जिवनाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास कूठल्याच गोष्टींचा तिटकारा येत नाही. व सामाजिक कार्यसिद्धीला मदत होते. फक्त सामाजिक, फक्त राजकीय, फक्त धार्मिक म्हणणे ही व्यवस्थेपासून पळवाट आहेव्यक्तिगत मर्यादा निदर्शक होय. ते सामाजिक अपंगत्वाचे लक्षण होय. प्रबोधन/सुधारणावादी चळवळीसमोरचा हा सर्वात महत्वाचा धोका लक्षात घेऊन चळवळीला वाटचाल करावी लागेल. तरच चळवळीला विजयाच्या अपेक्षा करता येतील.
व्यवस्थात्मक जिवनात सामाजिक कार्य तळीस न्यायचे असेल तर व्यक्तीला प्राप्त झालेले सामाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक, साहीत्यिक याम स्विकारावे लागते. त्यांचा अंगीकार करून वाटचाल करावी लागते. कारण हे सामाजिक व्यक्तीत्वाचे मूलभूत अंग आहे. जसे शरिराचे सर्व भाग कार्यरत असले तर शरिर सुदृढ राहून व्यक्ती विकासात पोषक ठरतो. शरिराच एक भाग जरी निकामी किंवा अकार्यरत असला तर त्याला अपंगत्व बहाल होते. तसेच समाजिक व्यक्तीत्वाचे आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक यापैकी एकाचा जरी आपण तिटकारा करीत असू किंवा अस्विकार करीत असू तर सामाजिक व्यक्तीत्व अपंग, पंगू बनते. त्यामूळेच समाजही अपंगत्वाकडे वळायला लागते. व अपंग समाज चळवळ चालवू शकत नाही.
परंतु अलीकडे बिजेपी व आरएसएस किंवा तत्सम संघटनांशी जूळलेले व आंबेडकरी बुरखा पांघरलेली माणसे म्हणतात, नेता नको, नेते कशाला पाहिजे? नेतृत्व कशाला पाहीजे ? इ. प्रकारचा समाजात नेत्यांविषयी संभ्रम पसरवून त्यांच्याविषयी बदनामीकारक लिहीणारे, बोलणारे हल्ली मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. काही महाभाग सामाजिक कार्याच्या नावाखाली धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून राजकारणाविषयी समाजात द्वेष पसरवितात. साहीत्यिक व धार्मिक प्रदूषण पसरविणारेही अनेक आहेत. काही काँग्रेस व तत्सम संघटनांशी जूळलेले म्हणतात, आम्ही आमचे प्रतिनिधी निवडून आणू शकत नाही. लोकशाही टिकून ठेवायची असेल तर संविधानविरोधी पक्ष सत्तेवर येऊ नये. हिंदूत्ववादी पक्ष सत्तेत आल्यास देशाला धोका आहे म्हणून तूमच्या मतांचे विभाजन करु नका. त्यामुळे कॉंग्रेसच्या सोबत समाजाने गेले पाहिजे असे सांगणारेही अनेक आहेत. निवडणुकांच्या काळात हे महाभाग गल्लोगल्ली पाहायला मिळतात. मार्क्सवादी व तत्सम डाव्या विचाराशी जूळलेले काही सुजाण परिवर्तनवादी तर चक्क संविधानाने, कायद्याने काही होणार नाही असे म्हणून जशास तसेची भाषा बोलतात. जातीची ओळख टिकवू ठेवून, धर्माची ओळख टिकवून ठेवून फक्त भांडवलशाहीविरूद्ध रस्ते रंगविणारे प्रसंगी संविधान काय कामाचे ? असे म्हणून आपली बौद्धिक दिवाळखोरीही दाखवून देतात.
बिएसपी, बामसेफ व तत्सम संघटनांशी जूळलेले सत्ता आल्यावर आम्ही सर्व काही करू. सत्ता आवश्यक आहे. दलित पंतप्रधान, मूख्यमंत्री बनल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. सामाजिक अन्याय अत्याचार प्रसंगी सत्ता पाहीजेचा नारा लावणारे, आंदोलनांवर विश्वास न दाखविणारे, बाबासाहेबांना कमी करून जातीय महापूरूष उभे करतांना आम्ही चक्क बाबासाहेबांना प्रश्नांकीत करतो हे यांच्या कधी ध्यानातच आले नाही. अशा सर्वच घरभेदी लोकांपासून व संघटनांपासून आंबेडकरी चळवळीला सुरक्षित करावे लागणार आहे.
जात संपविणे हे आमचे ध्येय असायला हवे होते. पण आपण जात न संपविता जातीतच वर्गाची निर्मिती केली. तर दूसरीकडे वर्ग संपविणे ज्यांची जबाबदारी होती त्यांनी वर्ग न संपविता वर्गातच जातीची निर्मिती केली. पूरोगामी विचार नेमका इथेच माघारला. एकसंघ समाज निर्मिती हे पहीले ध्येय असावे. तेव्हाच आम्ही सर्व पातळ्यांवर लढू शकतो अन्यथा सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.
चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या संदर्भाने पसरविण्यात येत असलेले आंबेडकरी विचार ख-या अर्थाने आंबेडकरी चळवळीसाठी धोक्याचे ठरले आहे. भाषणातून लोकांनी सांगितलेले बाबासाहेब समाजाने प्रमाण मानले असल्याने, खरे बाबासाहेब मांडणा-यांना त्रास होणार आहे. तो त्रास घेण्याची तयारी जर काहींनी आपल्या खांद्यावर घेतली तर दुकानदा-या चालविण्यासाठी आणि आपापसात फाटाफूट पाडण्यासाठी थाटण्यात आलेले संघटनरुपी दुकाने बंद होतील. आणि एक नवीन प्रवाह या चळवळीसाठी तयार करता येईल. अभ्यासू, तरुण आणि तात्त्विक विचारांची बैठक असणारी माणसे एकत्र करून आंबेडकरी चळवळीला उभारी देण्याची गरज आहे. काहीच्या भावनिक आंदोलनाला बळी पडलेल्या तरुण वर्गाला त्या भावनिक संमोहनातून बाहेर काढावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील तरुणांची कल्पनाशक्ती आणि तार्किक बुद्धी वेठीस धरण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणांना योग्य काय आणि अयोग्य काय हे आंबेडकरी विचारांच्या आधारे तपासून पाहताच येत नाही. त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आम्हाला पुन्हा एकदा या तरुण वर्गाचा विश्वास संपादन करावे लागणार आहे. कधी प्रखर होऊन तर कधी सौम्य मार्गाने. कारण यांनी स्वतः कधी बाबासाहेबाच्या विचारांचे वाचन केलेले नाही. पण कॅडर च्या माध्यमातून ऐकलेल्या बाबासाहेबांना यांनी इतके प्रचलित केले की जणू यांच्या मुखातूनच बाबासाहेब बोलत आहेत. हा प्रतीक्रांतीचा पहिला मजलाच आम्हाला उडवावा लागणार आहे. बाकीचे मजले असेच धराशाही होतील.
दुसरा एक तरुणांचा वर्ग आहे जो आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी चळवळीपासून अलिप्त आहे. तो आर्थिक व्यवहाराच्या जगात घर आणि नौकरीमध्ये व्यस्त झालेला आहे. ज्याला वाटते की आता कुठे समाजात भेदाभेद आहे ? तो स्वतःला सुरक्षित समझतो आहे. तो चळवळीतील आंदोलनाला निरर्थक संबोधतो आहे. तो चळवळीपासून दूर जातो आहे. तो रोजगाराच्या विवंचनेत, आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत विचार व चळवळीसोबत जुळत नाही. अश्या तरुण वर्गाला सोबत घेण्यासाठी काही आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्त्रोतांची निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे. या चळवळीतील काहींच्या हातात सद्यस्थितीत ब-यापैकी साधन संसाधने एकवटली आहेत. या संसाधनांचा वापर उद्याच्या पिढीसाठी स्त्रोतांची निर्मिती करण्यासाठी करावा लागणार आहे. तेव्हाच या चळवळीत हा तरुण वर्ग स्वतःला सुरक्षित समजेल. तेव्हाच समाजाची एकजूट त्यातून साध्य होईल. अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी ही या चळवळीत काम करणा-या तरुण-सुशिक्षित-विचारवंत-आर्थिक संपन्नता मिळविलेल्या लोकांची आहे. त्यांची एकजूट झाली तर समाजाला एकत्र करायला वेळ लागणार नाही.
परंतु हे सर्व करीत असतांना, “तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करा.” असे म्हणण्याची वेळ आज चळवळीपुढे आलेली आहे. स्वयंकेन्द्री माणसे आणि स्वयंकेन्द्री समाज कधीच परिवर्तन घडवू शकत नाही. २१ व्या शतकाची नाडी आता वेगाने बदलाकडे वळत चालली आहे. त्यामुळे पारंपारिकतेचा त्याग हाच एकमेव पर्याय आधुनिक पिढीसमोर आहे. तर दुसरीकडे नेतृत्वाच्या भुकेचे डोहाळे लागलेले दिल्लीकडे तोंड करून ढेकर देतांना दिसून येत आहेत. दिल्लीतली मेजवानी गल्लीतल्या नेत्यांची भूक भागवेल अशी अपेक्षा असेल तर ते केवळ स्वप्नरंजन ठरेल. अजूनही दिल्लीतल्या साहेबांना गल्लीपर्यंत पोहचविणारी साधने तुमच्याकडे नाहीत हे लक्षात घ्यावे लागेल. परिवर्तनवादी युवकांनी आता लक्षात घेतले पाहीजे की, “तुमचा उद्धार तुमचा कबिला खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा करण्यातच आहे.” तेव्हाच दिल्लीतले परिवर्तन गल्लीत पाहायला मिळतील. आंबेडकरी चळवळीचा कबिला दिल्लीच्या तख्तावर पोहोचवायचा असेल तर आंबेडकरी चळवळ ही आमची सामुदायिक जबाबदारी समजून “एक आंबेडकर” हे करू शकतो यावर विश्वास ठेवून “परत एकदा आंबेडकर” हे एक आंदोलन म्हणून स्वीकारावे लागेल. तुमच्या आमच्यासाठीच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्हाला हे करावे लागणार आहे.

¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.
8793397275, 9226734091, 9518388849


No comments:

Post a Comment