Sunday 4 June 2017

आंबेडकरसदृश्य आंबेडकरी चळवळ २१ व्या शतकाची गरज...

#Once_Again_Ambedkar - Article - 2
आंबेडकरसदृश्य आंबेडकरी चळवळ २१ व्या शतकाची गरज...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविलेल्या मानवतावादी चळवळीने शतक गाठले असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांच्या माध्यमातून चालविल्या गेलेल्या “आंबेडकरी चळवळीने” आता साठी (६० वर्ष) ओलांडली आहेत. या ६० वर्षाचा लेखाजोखा मांडून त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. असे म्हटले जाते कि, “माणसाने साठी (६० वर्ष) ओलांडली की स्थिरता, स्थूलता, थकलेपणा येत असतो. पण याच काळात सामंजस्य आणि पोक्तपणाही माणसांच्या अंगी येतो व अनुभवामुळे तो अधिकच प्रगल्भ व वैचारिक परिपक्व व्हायला लागतो.” त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीने सुद्धा आता प्रगल्भता दाखविणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर वैचारिकरित्या परिपक्व होऊन चळवळीला मार्गक्रमित करणे गरजेचे आहे.
२१ व्या शतकातील पिढी बदलली आहे. २१ व्या शतकाचे सामाजिक संदर्भ बदलले आहेत. दृष्टीकोन बदलला आहे. या बदललेल्या पिढीच्या बदललेल्या सामाजिक संदर्भाचा दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेऊन आम्हाला आंबेडकरी चळवळीची मांडणी करणे गरजेचे आहे. ६० वर्षात चळवळीची झालेली वाटचाल, त्यातील कळीचे मुद्दे व सामाजिक परीवर्तनातील चळवळीचे योगदान, झालेल्या चुकांना बाजूला सारून नव्या पिढीपुढे येणे महत्वाचे आहे. काळ बदलतो तसा व्यावहारिक विचारही बदलतो. बदलत नाही तो मानवी मुल्यांची जडणघडण करणारा विचार. मानवी मुल्याधिष्टीततेचा विचार हा त्रिकालाबाधित असतो. तो सर्व पिढ्यांना बदललेल्या व्यावहारिक नियमावलीत मार्गदर्शन करीत असतो. जसे बुद्धाचे विचार हजारो पिढ्यांना बदललेल्या संदर्भातही मार्गदर्शन करतात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देखील आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील याची खबरदारी आंबेडकरी चळवळीने घ्यायची आहे.
आज भारतीय समाजव्यवस्थेला मूलतत्ववादाकडे घेऊन जाणारी शक्ती राजकीय व्यवस्थेच्या अग्रस्थानी स्थानापन्न झाल्यामुळे आंबेडकरी चळवळीची जबाबदारी वाढलेली आहे. मुलतत्ववादी विचारधारा २१ व्या शतकातील पिढीला आपल्या कवेत घेण्यासाठी अनेक षडयंत्र रचतांना दिसत आहे. संवैधानिक अधिकाराचे जबाबदारीपूर्ण निर्वहन न करता जातीय व धार्मिक मानसिकतेतून बाहेर पडू पाहणाऱ्या २१ व्या शतकातील तरुण पिढीला आरक्षण व शिष्यवृत्ती सारख्या संवैधानिक अधिकाराच्या विरोधात उभी करण्याची खेळी खेळली जात आहे.  आरक्षण व शिष्यवृत्तीसारख्या संवैधानिक व शासनाच्या जबाबदारीला चुकीच्या पद्धतीने संविधानासमोरील व शासनासमोरील कमकुवत दूवा म्हणून प्रसारित केल्या जात आहे. याचे दूरगामी परिणाम आरक्षित वर्गावर (अ.जा., अ.ज., इ.मा.प्र., महिला व अल्पसंख्यांक) होण्याआधी आंबेडकरी चळवळीने या वर्गाला त्यांच्या संवैधानिक अधिकारासाठी आश्वस्थ करण्यासाठी मार्गक्रमित होणे गरजेचे आहे.
आंबेडकरी चळवळ सातत्याने वर्तमान प्रश्नांवर लढत आलेली आहे. आंबेडकरी चळवळीचा भूतकाळ या सामाजिक लढायांनी व्यापला आहे. परंतु तरीही आंबेडकरी चळवळ इप्सित ध्येयापर्यंत पोहचू न शकल्याचे शल्य अनेकांना अस्वस्थ करणारे आहे. कारण कुठल्याही चळवळीला यश हे सहज प्राप्त होत नाही. त्यामुळे सहज यशस्वीही होता येत नाही. यशस्वी होण्यासाठी त्याग करावा लागतो. श्रम करावे लागते. अनेक हालअपेष्ठा सहन कराव्या लागतात. अपमानीत व्हावे लागते. अपयश पचवून फिनिक्स भरारी घ्यावी लागते. कधीकधी स्वतःच्या यशापेक्षा इतरांच्या यशात आपले यश शोधावे लागते. यशाला शार्टकट नसतो. कधीकधी जवळ असलेले भांडवल गमवावे लागते. तरीही यशाची अपेक्षा सोडायची नसते. कुठल्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय यशस्वीततेमागे भूतकाळात केलेला त्याग, श्रम, हालअपेष्टा, अपमान सहन करण्याची क्षमता व सातत्य या गोष्टी महत्वाच्या असतात. आंबेडकरी चळवळ या सर्व प्रक्रियातून पुढे गेलेली आहे. यापुढील काळात देखील ती सातत्याने पुढे जात राहील यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आज आंबेडकरी चळवळीत माणसे व्यक्तीगत रित्या यशस्वी झालीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे भांडवल वापरून प्रगती केली. परंतु चळवळीच्या यशाकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेले. आम्ही समाज म्हणून चळवळीच्या ध्येय्याप्रत पोहचण्यात अपयशी झालोत. कारण एकच "आंबेडकरी चळवळीच्या यशस्वीततेपेक्षा व्यक्तीगत यशस्वीतता महत्वाची मानली गेली." त्यामुळे चळवळीला यशस्वी करण्यासाठी करावा लागणारा त्याग, श्रम, हालअपेष्ठा, अपमान सहन करण्यात आपण सर्वच मागे राहीलोत. ‘चळवळीचा अपमान झाला तरी चालेल पण स्वतःचा (व्यक्तिगत) अपमान होऊ नये याची खबरदारी घेत आलोत.’ स्वतःच्या व्यक्तीगत यशाच्या पलिकडे जाऊन चळवळीला सामाजिक व राजकीयदृष्ट्या यशस्वी करण्यासाठी त्याग करण्याची, श्रम घेण्याची, हालअपेष्टा सहन करण्याची व प्रसंगी अपमान सहन करून घेण्याची क्षमता तयारच केली गेली नाही. त्यामुळे "जितकी माणसे उंच उंच वाढत गेली तितकी चळवळ ठेंगणी (बुटकी/दुबळी) होत गेली." आंबेडकरी विचारातून भारतीय समाजव्यवस्थेत व सांसदीय व्यवस्थेत आलेल्या संवैधानिक मुल्यांचा लाभ घेऊन व्यक्ती-माणस-कुटुंब प्रगतीपथावर आलीत. परंतु समूह म्हणून सांसदीय व्यवस्थेत आम्ही अपयशी ठरलोत हे निर्विवाद मान्य करावेच लागेल.
व्यक्तिगत स्वार्थापोटी आज आंबेडकरी चळवळ सध्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत आहे. चळवळीच्या जहाजाला छिद्रे केव्हाचीच पडली आहेत. भेगा पडलेल्या आहेत. चळवळीचे जहाज वादळात सापडलेय. पण त्या छिद्रांना बुजविण्याऐवजी नविन नविन कल्पना मांडून चळवळीचे जहाज बूडतेय याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. मात्र प्रत्येकजण चळवळीच्या जहाजाचे होकायंत्र स्वतःला बनवू पहात आहे. वादळात सापडलेल्या चळवळीच्या जहाजाला तडा जाण्याआधी संघटीत होऊन हेलकावे घेणाऱ्या जहाजाला सावरण्याचे, पडलेल्या भेगांना सुधारण्याचे, झालेल्या छिद्रांना बुजविण्याचे काम जहाजावर राहूनच करा. समुद्रात उड्या मारून किनाऱ्यावर पोहचून बुडणाऱ्या चळवळीच्या जहाजासाठी दुरूस्त्या सुचवू नका. तुम्ही त्या जहाजावरच रहा. चळवळीचे जहाज काहीही झाले तरी बूडू देणार नाही या आत्मविश्वासासह. पण असे होतांना दिसून येत नाही.
आंबेडकरी चळवळ आज व्यक्तीद्वेषात, व्यक्तीप्रतिष्ठेत सापडली आहे. त्याचे कारण आहे की, आम्ही या आंबेडकरी चळवळीचा योग्य तो सेनापतीच निवडला नाही.  "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" व “आंबेडकरी चळवळ” नावाचे भांडवल स्वतःसाठी न वापरता चळवळीच्या सामाजिक, राजकीय विकासासाठी वापरण्याची गरज असतांना, आम्ही स्वतःसाठीच त्याचे भांडवल करायला निघालेलो आहोत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, ‘स्वतःची झोपडी (संघटन, संघटना, पक्ष, संस्था) शाबूत ठेवा. इतरांच्या आक्रमणापासून तिला सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज रहा.’ आम्ही मात्र या संदेशाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून स्वताच्या झोपडीचे शकलं पाडलीत. कुणी या झोपडीवरचे गवत घेऊन घेले व स्वतःच्या शरीराला उर्जा मिळावी यासाठी जाळून टाकले. कुणी या झोपडीचे कवेलू घेऊन गेलेत व स्वतःच्या निवाऱ्यासाठी त्याचा वापर करू लागलेत. कुणी या झोपडीचे दरवाजे काढून नेलेत व स्वतःच्या सुरक्षिततेची तजवीज केली. तर कुणी या झोपडीच्या छतावर लागलेले लाकूड फाटेही चोरून नेऊन सुताराकडे (कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना) नेऊन त्यांचे लचके तोडलीत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या “स्वतःच्या झोपडीच्या” शिल्लक उरल्या त्या भणंग भिंती. ज्या २१ व्या शतकातल्या पिढीला नव्याने परत एकदा स्वाभिमानाने उभे होण्याची साद घालीत आहेत.
आज स्वतःला आंबेडकरी म्हणविणाऱ्या काहींनी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या झोपडीला (आंबेडकरी चळवळ) नावे ठेवून, हिणवून किंवा क्वचितप्रसंगी त्याचेच नाव घेऊन इतरांच्या ‘महालावर’ उड्या मारायला लागलीत. त्यातल्या काहींनी इतरांच्या ‘महालावर’ छतावरची जबाबदारी पार पाडली तर काहींनी इमानेइतबारे ‘महालाच्या’ दरवाज्यावर गळ्यात पट्टा बांधून घेऊन महालाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. व एवढे सर्व करूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या भिंती आजतागायत ज्यांनी खंबीर व स्वाभिमानाने उभ्या ठेवल्यात त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून बौद्धिक दिवाळखोरीचा कळसच गाठला. पराकोटीची कृतघ्नता बाळगून आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बेईमान झालोत. परंतु स्वतःची बेईमानी झाकण्यासाठी “आंबेडकर” नावालाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. आंबेडकरी चळवळीसाठी हे अतिशय घातक आहे.  ‘आंबेडकर’ नावाने (भैय्यासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर, मीराताई आंबेडकर, बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर) आंबेडकरी चळवळीचे स्वभिमानित्वच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वव्यापी विचारांना तडा जाऊ नये याची सातत्याने काळजी घेतली आहे.  ‘आंबेडकर’ हे नावच आजपर्यंत आंबेडकरी चळवळीचे खरे उर्जास्थान राहिलेले आहे. ‘आंबेडकर’ या नावानेच आंबेडकरी चळवळीची प्रामाणिकता टिकवून ठेवली आहे.  आज आंबेडकरी चळवळीवर भारतीय माणसांचा जो काही विश्वास उरलेला आहे तो ‘आंबेडकर’ या नावामुळेच आहे. तो विश्वास आम्हाला सार्थकी लावायचा आहे. जे सोबत येतील त्यांच्यासह, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय.
हे करीत असतांना स्वतःच्या वैचारिक मर्यादांना चळवळीच्या मर्यादा बनविता येणार नाही. संसदेकडे बोट दाखवून चालतांना जातीअंताकडे डोळेझाक करता येणार नाही. मानवतावादाचा उच्चार करतांना धार्मिक कट्टरतावाद पाळता येणार नाही. बौद्धमय भारताकडे वाटचाल करतांना अ-बौद्धांचा द्वेष करता येणार नाही.  ‘समाज’ म्हणून नावारूपास येतांना ‘समूह’ भावनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राजकीय वाटचाल करतांना यशाच्या नावाखाली व पद-प्रतिष्ठेसाठी वैचारिक मूल्यतत्वांचा नायनाट करता येणार नाही. ‘भारतीयत्वाची ओळख’ निर्माण करतांना ‘जातीय ओळख’ कायम ठेवून चालणार नाही.  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांचे’ अनुयायी बनतांना ‘हिंदुत्वद्वेषी’ वा अन्य ‘धर्मद्वेषी’ बनता येणार नाही. ‘आंबेडकरी विचारांची’ उभारणी व मांडणी करतांना ‘इतर मानवतावादी विचारांना’ कमी लेखून चालणार नाही.  ‘आंबेडकरी विचारांना’ स्वीकारतांना जगातल्या ‘अन्य मानवी विचारांना’ नाकारता येणार नाही. एकंदरीतच आंबेडकरी चळवळ चालवितांना ‘अतिविशिष्ट जातीसमूह’ न बनता ‘सर्वव्यापी मानव समूह’ बनविणारा आंबेडकरी विचार प्रवाह व्हावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीचे व आंबेडकरी विचारांचे हे मर्मगर्भ आम्ही समजून घेतले पाहिजे.
आजपर्यंत पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असणारा संघर्ष आज प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी असा परावर्तीत झालेला आहे.  आज प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी असणाऱ्या संघर्षाची अस्पष्ट भेदरेषा २०२० पर्यंत स्पष्ट संघर्षात बदलणारी आहे.  २१ व्या शतकाला प्रतिगामी शक्तींच्या उन्मादापासून वाचविण्यासाठी व २१ व्या शतकातील पिढीचे प्रतिगामी शक्तीच्या उन्मादी मूलतत्ववादी कारवाया पासून होणाऱ्या नुकसानीला थांबविण्यासाठी आंबेडकरी चळवळ ‘आंबेडकर’ नावाच्या विश्वासू व व्यापक वलयाभोवती स्थिरावणे गरजेचे आहे.  आजपर्यंतच्या सर्व कसोट्या पार करून आंबेडकरी चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या ‘आंबेडकर’ नेतृत्वाच्या नेतृत्वातच २१ व्या शतकातील प्रतिगामी शक्ती विरोधातली लढाई आम्हाला लढता येईल हे अलीकडच्या २ वर्षातील झालेल्या संघर्षात (रोहित वेमुला, कनैय्या कुमार, दलित अत्याचार, अल्पसंख्यांक समाजावरी अत्याचारात) सिद्धही झालेले आहे. एकंदरीतच आंबेडकरसदृश्य आंबेडकरी चळवळीची २१ व्या शतकाला गरज आहे. हे आपण ओळखले पाहिजे व त्यादृष्टीने चळवळीतील आपली वाटचाल निर्धारित केली पाहिजे. तेव्हाच आम्हाला २१ व्या शतकातील आमच्या पिढ्यांना सुरक्षितता प्रदान करता येईल. हे लक्षात घेतले पाहिजे.

¤¤¤
#Once_Again_Ambedkar
 डॉ. संदीप नंदेश्वर,
नागपूर.

8793397275, 9226734091, 9518388849

No comments:

Post a Comment