Saturday 1 September 2012

उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे.


उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे.

आंबेडकरी चळवळीला समजून घेतांना आमची काहीतरी गल्लत होत आहे. आणि आजपर्यंत ती झाली आहे. त्यामुळे या चळवळीला निश्चित असा मार्ग पकडता आला नाही. किंवा त्या मार्गावर संचलित होता आले नाही. राजकारण हेच अंतिम ध्येय गृहीत पकडून आम्ही मार्गक्रमण करू शकत नाही. आणि तसा उद्देश घेऊन आम्ही चळवळीला मार्गक्रमित केले तर समाज विनाकारण भरडला जातो. हे आतापर्यंतच्या वाटचालीवरून अनुभवायला आले आहे. आंबेडकरी चळवळीचे अंतिम ध्येय हे सत्ता होऊच शकत नाही. शिवाय ज्या तत्वज्ञानावर ही चळवळ उभी आहे त्या तत्वज्ञानाचा सत्तेशी तिळमात्र संबंध येत नाही. जेव्हा जेव्हा आंबेडकरी चळवळीला राजकारणाच्या ध्येय आणि उद्धीष्ठात गोवल्या गेले तेव्हा तेव्हा समाजात दुफळी माजली. फाटाफूट घडून आली. आपल्याच समाजबांधवांमध्ये वितुष्ठ निर्माण झाले. अगदी पराकोटीच्या टोकाला जाण्याइतपत...

बहिष्कृत समाजाचा प्रश्न हा सामाजिक आहे तितकाच तो मानव्यिक आहे. आर्थिकता हे त्याच्या पायथ्याशी असले तेरी समाजातला उच्चनीच भाव या समाजाला छळतो आहे. त्यामुळे सामाजिक ध्येय घेऊन मानवी कल्याणासाठी लढा उभारणे आम्हाला क्रमप्राप्त आहे. हे आंबेडकरी चळवळीचे सूत्र आम्ही अंगीकारणे कधीही लाभदायकच ठरेल. कायद्याने मिळेल तेवढे घेऊन समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नरत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी सत्ता असो अथवा नसो कल्याणकारी जगणे हेच आमचे मुलभूत अधिकार आहे. आणि तशी परिस्थिती निर्माण करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आज भारतीय समाजात प्रत्येकच समाजाजवळ सत्ता आहे. असे कुणीही व्यवस्थावादी माणूस म्हणू शकणार नाही. सत्ता आणि व्यवस्थेचा अभ्यास करणारे अभ्यासकही आमच्या मताशी सहमती दर्शवतील. व्यवस्थेतील "सह्भागीत्व" आणि "सत्ता" या दोहोंत मोठी तफावत आहे. सहभागीत्वाची संकल्पना ही लोकशाहीला बळकटी प्रदान करते. तर "सत्ता" ही संकल्पना हुकुमशाहीला, अराजकतेला आमंत्रण देते. आंबेडकरी समूहाने आतातरी याचा नीट विचार करणे आत्यंतिक गरजेचे आहे.

आज ज्या समस्यांना आंबेडकरी समूहाला सामोरे जावे लागत आहे. त्या समस्या इतर समाजाला भेडसावतांना दिसत नाही. कारण इतर समाजाने व्यवस्थेतील सहभागीत्वाला महत्व दिले. आणि तत्कालीन आंबेडकरवादी (मुळात आंबेडकरी नसलेले) नेत्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानाची स्वप्ने बघितली. त्याला बळी पडून काही आंबेडकरी नेत्यांनीसुद्धा मंत्रिपद आणि तत्सम खुर्चीचे स्वप्न उराशी बाळगले. त्यांच्या या कृतीने समाजाची व चळवळीची वाताहत होत आहे. हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. १९८० च्या दशकानंतर मानवी कल्याणासाठी लढणारी आंबेडकरी चळवळ "सत्ता" संकल्पनेभोवतीच मर्यादित झाली. आंबेडकरी चळवळीने आपला मोर्चा "सत्तेकडे" वळविल्याने समाज सर्वच पातळ्यांवर माघारू लागला. यावर सद्सदविवेक बुद्धीने चिंतन आणि मनन होणे आज गरजेचे आहे.

समाज एकसंघ राहील; नेते संघटीत राहीतील अश्या परिस्थितीत मानवी कल्याणाची निदान समाधानकारक पातळी गाठता आली तरी सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहचता येईल. याचा विचारच कधी झाला नाही. सर्व गणिते व्यक्तिगत मान-सन्मान आणि सत्तेच्या लालसेनेच मांडल्या गेले. त्यामुळे सामाजिक समीकरणे कधी सोडवलीच गेली नाही. आज एक आशेचा किरण दिसतो आहे. निदान या "सत्तावादी" स्वप्नवलयातून काही उच्चशिक्षित तरुण बाहेर पडू लागली आहेत. आणि चळवळीच्या मुळाशी असणा-या तत्वज्ञानाच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अश्या या आंबेडकरी नवतरुण पिढीने तरी आंबेडकरी चळवळीतील मानवी कल्याणाचे ध्येय उराशी बाळगून असले पाहिजे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या चळवळीच्या अंगांना बळकटी प्रदान करण्यासाठी काम केले पाहिजे. आणि तद्सोबतच अलीकडे आलेल्या धम्मातील प्रदूषणाला दूर करून बुद्ध तत्वज्ञानाला आंबेडकरी परिप्रेक्षातून पुर्नगठीत केले पाहिजे.

सत्ता ही तत्कालिक असते. ती कायम हातात राहील हे जगातल्या कुठल्याही समूहासाठी शक्य नाही. परंतु एकदा सत्ता हातून गेली की माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही. सत्तेच्या ऐश्वर्यासाठी नेते अश्लाघ्य, तत्वशून्य, स्वाभिमानशून्य तडजोडी करायला लागतात. आणि वेळप्रसंगी समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात. पण मानवी कल्याण हे चिरंतन असते. समाजाच्या हिताचे असते. मानव्यिक विकासाला पूरक असते. या सर्व घटना घडामोडीचा अनुभव आंबेडकरी चळवळीने घेतला आहे. या सर्व अनुभव संपन्नतेच्या बळावरच आम्हाला सद्यकालीन आंबेडकरी चळवळीची आचारसंहिता बनवावी लागणार आहे. हे आम्ही करू शकलो तर उद्याचा चळवळीचा चेहरा वेगळा असणार आहे. आंबेडकरी चळवळीतील ध्येय आणि उद्धिष्टांची पूर्ती नव नेतृत्वाच्या बळावर होणार आहे. यात तिळमात्र शंका नाही.

कल धरती और सूरज के बिच चाँद आया था !
पर काफिला कभी रुका नहीं !
आज न वो चाँद आएगा न अँधेरा तुम्हारे बिच में,
ये उस बाबासाहब जैसे विचारसूर्य का काफिला है !
जो अँधेरे को चीरकर रोशनी से कभी छुपा नहीं !

----डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

1 comment: