Saturday, 18 April 2020

बाबासाहेब* : *एक दगड माराच

*बाबासाहेब* : *एक दगड माराच*
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर



बाबासाहेब... अहो बाबासाहेब...
एक दगड उचला हातात
आणि फेकून मारा ...
होssss....
तुम्ही बरोबर च ऐकलं...
एक दगड फेकूनच मारा आमच्यावर...

तुम्हाला सांगतो !
कुणीच तक्रार करणार नाही तुमच्या विरोधात...
उलट तुम्हालाच म्हणतीलsss...
आम्ही चुकलो... आम्हाला माफ करा...
आणखी एक दगड उचला आणि घाला आमच्या डोक्यात...
पण बाबासाहेब आमच्यावर नाराज होऊ नका !

बाबासाहेब तुमच्या दगडानी झालेली जखम भरेपर्यंत शांत बसतील...
आणि परत हातात तुमचा फोटो घेऊन...
तर कधी तोंडाने जय भीम चा नारा देऊन...
परत निघतील तोच पुर्ववत बाजार मांडायला ...
जोपर्यंत तुमचा दुसरा दगड डोकं फोडत नाही तोपर्यंत...

बाबासाहेब...
तुम्ही फेकून मारलेला दगड चुकून मोदींना लागला... तर
मोदीजी तुम्हाला साष्टांग दंडवत घालून...
'मन की बात' च्या स्टुडिओत शिरतील... आणि लगेच...
"मित्रोंहsss ! मुझे बडे अफसोस के साथ कहना पड रहा है ! की...
डॉ. भिमराव आंबेडकर जी के सपनों का भारत बनाने में...
हम पिछले ६० सालों में असफल रहे है !...
लेकिन मैं उसे जल्द से जल्द पुरा करने की कोशिश करूंगा !
हमारी सरकार जल्द ही बाबासाहाब डॉ. भिमराव आंबेडकर जी के सपनो को पुरा करेगी !"
तिकडे संसद वाऱ्यावर... संसदेतील चर्चा वाऱ्यावर...
सरकारने घेतलेल्या संसदेबाहेरील निर्णयाचे संसदेच्या पटलावरील निवेदन वाऱ्यावर...
सारेच सांसदीय व्यवस्थेचे मुल्य वाऱ्यावर सोडून...
बाबासाहेब...
तुम्ही पाहीलेले भारताचे स्वप्न...
'मन की बात' मधून धुळीस मिळतांना दिसतील...
पण बाबासाहेब...
तूमचे स्वप्न तोडतांना नावही तुमचेच घेतील...

बाबासाहेब...
तुमचा फेकून मारलेला दगड...
जर मोहन भागवतांना लागला... तर
मोहन भागवत ही तुमच्या पाया पडून घेतील...
आणि गर्वाने सांगतील...
बाबासाहेब... संघाचा प्रत्येक स्वयंसेवक...
प्रांतकालीन आणि सायंकालीन संघशिक्षा वर्गात,
तुमचे स्मरण करून, तुम्हाला नतमस्तक होतो...
आज प्रत्येक स्वयंसेवक हिंदूला तुमची महती पटली आहे...
बाबासाहेब...
तुम्ही आज आरएसएसवादी हिंदुंचे गर्व आणि अभिमान बनला आहात...
बघितलं बाबासाहेब...
तुम्ही मारलेल्या दगडाचा परिणाम...
बाबासाहेब... तुम्ही फक्त काही क्षणांसाठी डोळे बंद करा..
भगवाधारी टोळके... "बन के रहेगा हिंदुस्थान..."
चे नारे लावीत जातीय आणि धार्मिक दंगली उफाळलेल्या दिसतील...
बाबासाहेब... हाच आहे तुमचा संघीय सन्मान...

बाबासाहेब...
तुम्ही फेकून मारलेला दगड सोनिया गांधीजींना जरी लागला...
तरी... त्या म्हणतील...
बाबासाहेब... असाच एक एक दगड...
हाणा... या प्रत्येक कॉंग्रेसी नेत्यांच्या डोक्यात...
कित्येक दगडं तुम्ही नेहरूजींच्या, गांधीजींच्या डोक्यात हाणले होते...
तरीही त्यांनी कायम तुमचा सन्मानच केला...
इतकेच काय ! तर तुमच्याशिवाय...
या देशाचे संविधान देखील बनू दिले नाही...
आणि कायम तुम्हाला संसदेच्या पटलावर ठेवले...
बाबासाहेब...तुमच्या पश्च्यात...
तुमच्या अनुयायांनी व नेत्यांनी देखील...
आमच्यासोबत राहून... कायम आम्हाला सत्तेत बसविले...
पण हे कॉग्रेसी नेते कायम...
तुम्ही दिलेला संदेश व धोके विसरत आले...
अन् घालवून बसले सत्ता...
हिंदुत्ववादी, मनुवाद्यांच्या हातात...
आता तुम्हीच यांचे डोके फोडून...
डोके ठिकाणावर आणा बाबासाहेब...
बाबासाहेबsss...
बघितले का कॉंग्रेसजनांचे तुमच्याप्रती असलेले निर्मळ...
आणि तितकेच निर्लाज्य प्रेम...

बाबासाहेब...
आता अशी दगडं भिरकावून मारा...की
इथल्या प्रत्येक दलित नेता डोकं फुटून रक्तबंबाळ झाला पाहिजे...
जे तुमचे अनुयायी, विचार वारस, घराणं वारस सांगून...
बेगडीचे, ठीगळीचे, दमडीचे राजकारण करतात...
तुम्हाला सांगतो बाबासाहेब...
हे लोटांगण घालीत तुमच्याजवळ येतील...
अन् सांडलेल्या रक्तातून बाबासाहेब कसे कणाकणातून सांगताहेत...
हे दाखवण्याचा प्रयत्न करतील...
आमचे हृदयही एकदा चिरूनच बघा बाबासाहेब...
म्हणून तुम्हाला विनवण्या करतील...
हृदयात यांच्या यांचे हृदय नसून...
खुद्द बाबासाहेब... तुम्हीच हृदय बनून धडकता...
बाबासाहेब... तुम्ही यांचे लोटांगण, रक्त, हृदय बघून
गदगदीत झाले असाल...
आता पलटून यांच्या पाठीमागे डोकावून बघा !
कुणाच्या पाठीवर कॉंग्रेस चा...
कुणाच्या पाठीवर भाजपा चा...
तर कुणाच्या पाठीवर निव्वळच स्वाभिमानाचा...
शिक्का कोरलेला दिसेल...
इतकेच नाही हो बाबासाहेब...
काहींच्या पाठीवर काहीच दिसणार नाही...अगदी कोऱ्या..
माहितेय यांच्या पाठा कोऱ्या का आहेत...
बाबासाहेब...त्या कोऱ्या इतक्यासाठीच की,
वेळप्रसंगी कुणाचाही तात्पुरता शिक्का पाठीवर मारून फिरता यावे म्हणून...
बाबासाहेब... एवढेच काय...
तर काहींचा आर एस एस, मनुवादी, पेशवाई सरकार विरोधाच्या आड...
"संविधान धोक्यात आहे!"...
हा भावनिक धंदा जोरात चाललाय बरं का !
परंतु बाबासाहेब...
संसदेत, विधिमंडळात जाऊन, किंवा प्रतिनिधित्व करण्यासाठी नव्हे बरं का !
हे सर्व चाललेय फक्त बाहेरूनच...
बघा बाबासाहेब...
किती महान नेते आहेत आपले...
तुमच्यापेक्षाही धुरंदर...
तुम्हाला करता आले असते का मनुवादी व्यवस्थेला हद्दपार...
संसदेच्या बाहेर राहून...
तुम्हाला स्थापन करता आली असती का समता, न्याय, बंधूता...
घटनासमितीच्या बाहेर राहून...
बाबासाहेब...
जे तुम्हाला जमले नाही...
ते महान कार्य हे करीत आहेत...
कुणी बाहेर राहून...तर कुणी आत राहून...

बाबासाहेब...
आता काही दगडं या समाजावर देखील फेकून मारा...
तुम्ही दगड मारला म्हणून...
हे इतका मोठा जुलूस 'जय भिम !' चा नारा देऊन काढतील...
की सारेच जागतिक विक्रम मोडीत निघतील...
कुणी म्हणेल दगड तुम्ही कॉग्रेसी गोटातून मारला...
कुणी म्हणेल दगड तुम्ही हिदुत्व गोटातून मारला...
कुणी म्हणेल दगड तुम्ही भाजपाई गोटातून मारला...
कुणी म्हणेल दगड तुम्ही वंचिताई गोटातून मारला...
पण सारेच तुम्ही मारलेल्या दगडाचे स्वागत करून...
तुमची जयंती 'भीम जयंती' म्हणून एकत्र हर्षोल्हासात साजरी करतील...
बाबासाहेब....
एकदा डोकावून बघा दारात...
जात तुम्हाला अगदी दारावरच दिसेल...
माणुस मात्र त्यानंतरच सापडेल...
बाबासाहेब...
डोळे एकदा वर करून, कळसाकडे बघा...
धर्म तुम्हाला शिखरावर दिसेल...
माणूस मात्र तुमच्या पायाखाल दारिद्र्यात खितपत पडलेला दिसेल.
बाबासाहेब...
कुणी तुम्हाला नौकरीत दिसेल, कुणी खुर्चीत दिसेल...
कुणी बंगल्यात दिसेल, कुणी महालात दिसेल...
कुणी पालावर दिसेल, कुणी उघड्यावर दिसेल...
कुणी न्यायात दिसेल, कुणी अन्यायात दिसेल...
बाबासाहेब...
तुम्ही सोडून गेलेला भारत...
आज तुम्हाला तसाच दिसेल...
कुणी तुमचा विरोधक, तर कुणी तुमचा समर्थक दिसेल...
बाबासाहेब... हा भारत देश तुम्हाला तसाच दिसेल...

बाबासाहेब...
आता शेवटचा एक दगड संविधानाला फेकून मारा..
संविधानच तुम्हाला वास्तव सांगेल...
तुमच्याजवळ येऊन सलामी ठोकेल...
तुम्हाला 'Guard of Honor" देण्यासाठी...
जिवाचा आटापिटा करेल.
संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये नेऊन बसवेल...
आणि म्हणेल बाबासाहेब...
आता माझी जागा तुम्हीच घ्या...
मी थकलोय या पुस्तकात कोंडून कोंडून...
इथे रोजच लावतात मला फाशी...
फुलांनी सजवून देतात श्रद्धांजली...
आणि परत एखादं दिवशी...
मला बाहेर काढून...
नागरी सत्कारही करून घेतात...
बाबासाहेब तुम्हाला सांगतो...
महत्प्रयासाने तुम्ही मला बनविण्यासाठी घेतलेली मेहनत...
या नाकर्ते राज्यकर्त्यांनी पायदळी तुडविली..
संविधानाचे राज्य कमी आणि
जाती, धर्माचेच राज्य जास्त केले...
अस्पृश्यतेने अन्यायाच्या पोरीशी लग्न केले...
अन् ...
भेदाभेद जन्माला येऊ नये म्हणून...
न्यायाचा न्यायालयाच्या पायरीवरच खून करण्यात आला...
'समते'ने शहरात पळून जाऊन स्पर्धेशी प्रेमविवाह केला...
पण... वस्तीत शिरल्याक्षणी 'समते'चा गर्भपात झाला...
बाबासाहेब लक्षात घ्या...
इथे 'बंधूता' थाटात कधी मंदीर मस्जीत फिरत राहीली...
पण गोमातेने बंधूतेला दाव्याने बांधून...
कधी अर्धनग्न, कधी पुर्णनग्न करून मारले...
तर कधी अखलाख हकनाक जिवानीशी मारले...
बाबासाहेब...
हल्ली या संसद भवनात चर्चा कमी होतात...
टि.व्ही वरच्या कार्यक्रमातून मात्र...
कायदेपंडित रंगतात...
बाबासाहेब...
हल्ली निर्णय संसद घेत नाही...तर
धर्म, मिडीया आणि धर्मगुरू मिळून निर्णय घेतले जातात.
संघीय बौद्धिकाचा कायदा होतो आणि
प्रधानमंत्र्याचा विचार हा शासकीय आदेश होतो...
बाबासाहेब...
हल्ली आंतरराष्ट्रीय संबंधावरील नीति कमी आणि
राज्यांमधील सरकारं पाडायची नीति अधिक ठरविली जाते.
शत्रुंना कमी आणि विरोधी पक्षांना जास्त ठोकले जाते...
कायद्याचे गुन्हेगार शिक्षा भोगतात आणि
सामाजिक, धार्मिक, राजकीय, पक्षिय गुन्हेगार शिक्षा ठोठावतात...
अहो बाबासाहेब...
इथे सारेच ईश्वर साक्षीने खरे-खोटे चाललेय...
कायद्याच्या पुस्तकांनी भंगाराशी सौदा केलाय...
संविधान नावाचे काही आहे...
हे आता हळूहळू विस्मरनात चाललेय...
'मोदी है तो, मुमकीन है!' च्या नाऱ्याने...
गगनभेदी उच्चांक गाठलाय...
बाबासाहेब...
एकतर माझ्यावर चढलेली, चढवलेली...
धुळ तरी बाजूला करा...
नाही तर या उन्मादी सत्तेच्या वारूळावर...
एक दगड फेकून मारून उध्वस्त करा...
आधुनिक मनुवादी व्यवस्थेचा हा उन्मादी डोलारा...
परत एकदा दगडांनी ठेचून काढा...
बाबासाहेब...
परत इथल्या दगडांना कोरून... समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि एकतेचा जाहीरनामा कोरा...
परत या देशाच्या मस्तकावर 'भारतीय संविधान' कोरा...
बाबासाहेब...
तुम्हीच एकदा भारतीय लोकशाहीचा नारा बुलंद करा...
तुम्हीच एकदा भारतीय लोकशाहीचा नारा बुलंद करा...
✍🏻___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर

Friday, 31 May 2019

कोणता झेंडा घेऊ हाती ! ही कोंडी फुटली.


#Once_Again_Ambedkar
कोणता झेंडा घेऊ हाती ! ही कोंडी फुटली.
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              प्रबुद्ध भारत पाक्षिकातील ‘परत एकदा आंबेडकर’ या सदरातील हा ५० वा लेख आहे. मागील २ वर्षात सातत्याने हे सदर लिहितांना एक नवी उर्जा या महाराष्ट्रातील दलित, वंचित, बहुजन समाजामध्ये निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. मात्र हे सदर लिहितांना स्वप्नरंजन किंवा कल्पनाविलास टाळण्याचा नेहमी प्रयत्न केला. या सदरात नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक व राजकीय लढ्याचा, त्यातून पुढे आलेल्या आंबेडकरी तत्वज्ञानाचा वर्तमान परिप्रेक्षात मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या सामाजिक व राजकीय लढ्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांच्या संपर्कातून, गावातल्या परिस्थितीचा, शहरातील वातावरणाचा जवळून अभ्यास करून आणि सामाजिक, राजकीय वातावरणात रोजच्या येणाऱ्या अनुभवातून जे दृष्टीक्षेपात येत होते तेच या सदरातील सर्व लेखांमध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला. हेच या सदराचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच या सदरातील लेखांनी सामान्य माणसांच्या मनाचा ठाव घेतला. जे प्रश्न चळवळीतल्या सामान्य माणसांच्या डोक्यात घोंगावत होते. त्या प्रश्नांना घेऊन त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या सदराने केलेला आहे. सोबतच त्या प्रश्नांच्या सोडवणुकीचे नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर वर्तमानात कशा पद्धतीने करीत आहेत याचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला गेला. त्याला यश आले कि अपयश आले हे वाचकांनी ठरवायचे.
या मालिकेतला ५० वा हा लेख लिहितांना विशेषार्थाने काही गोष्टी पुढे आल्या आहेत. एक तर लोकसभेच्या निवडणुका संपून निकाल हाती आले आहेत. तर दुसरीकडे मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ‘वंचित बहुजन आघाडी’ने महाराष्ट्रात दखलपात्र मजल मारीत बहुतांश दलित, वंचित, बहुजन समाजाला राजकीय दृष्ट्या एकत्र केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे वर्तमान आणि भविष्यकालीन चित्र संपूर्णरीत्या बदलविले आहे. निकालात निवडून येण्यात औरंगाबाद वगळता वंचित बहुजन आघाडी थोडीफार अपयशी ठरली असेल परंतु ४१ लाखांच्या वर मते घेऊन सर्वच प्रस्थापितांना चिंतेत पाडले आहे. प्रस्थापितांची त्यातही प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची चिंता चिता होण्याची भीती त्यांना सतावित आहे. त्यांची ही चिंता कायम ठेऊन वंचितांच्या या राजकीय उठावाला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात काय रणनीती आखणार आहोत ? या पार्श्वभूमीवर आम्ही पुढचे चिंतन करणे गरजेचे आहे.
          २०१९ ची देशाची सार्वत्रिक निवडणूक समाजाला राजकीय वातावरणात ढवळून काढणारी ठरली. कधी नव्हे ती या निवडणुकीत अनेक मुद्द्यांची राजकीय चर्चा समाजात होतांना पाहायला मिळाली. त्या सर्व चर्चांचा ओघ हा भाजप ने देशामध्ये निर्माण केलेल्या अस्वस्थतेच्या विरोधातला होता. भाजप आणि मोदी सरकारने दिलेल्या स्वप्नवत आश्वासनांनी निराशा केल्याचा तो सूर होता. परत या देशावर भाजप व मोदीची सत्ता येणार नाही यासंदर्भात गल्लीबोळात ते चावडी पर्यंत याच चर्चांचे फड रंगले व रंगविले जात होते. तर दुसरीकडे मोदी यांची रंगविली गेलेली (Shadow Image) नेतृत्वाची सावली आणि त्याच्या तुलनेत कुठल्याच पक्षात दिसून न येणारे नेतृत्व किंवा खुजे नेतृत्व असा भासविला जाणारा मानसिक प्रचार हा या निवडणुकीत महत्वाचा ठरला. देशाचे लोकतंत्र मोदींच्या नेतृत्वात सुरक्षित नाही ही भावना असल्यामुळे मोदींना सत्ताच्युत करण्यासाठी पर्यायाच्या शोधात मतदार होता. परंतु शेवटपर्यंत मतदारांना तो पर्याय भेटू शकला नाही. किंवा दुसऱ्या अर्थाने असेही म्हणता येईल की, तो पर्याय उभाच होऊ दिला गेला नाही. त्यामुळे परत एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात बहुमतातली भाजप ची सरकार निवडून आली. आणि पुढील ५ वर्ष या सरकारचा अनाकलनीय राज्यकारभार सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय आता भारतीय जनतेसमोर उरलेला नाही.
          महाराष्ट्रात मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने भाजपच्या धार्मिक धृविकरणाविरोधात राजकीय उठाव करण्याचा प्रयत्न केला. हा उठाव आज बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला. राजकीय प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने हा उठाव पाहिजे तसा यशस्वी झाला नसला तरी राजकीय मानसिकतेच्या संकलीकरणाच्या दृष्टीने या उठावाला शतप्रतिशत यश आले आहे असे म्हणता येईल. याच सदरातील मागच्या एका लेखात मी वंचित बहुजन आघाडी ची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ च्या काळात ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन करून केलेल्या राजकीय उठावाशी केला होता. वंचित बहुजन आघाडीला आज भेटलेले राजकीय यश हे निश्चितच तेव्हा स्वतंत्र मजूर पक्षाला मिळालेल्या राजकीय यशाशी तुलना करण्यास पात्र आहे. दलित, वंचित, बहुजन समाजाची राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्नच जवळपास वंचित बहुजन आघाडीने केलेला आहे. आंबेडकरी समाजासमोर एक सक्षम राजकीय मंच उभा केला गेला. आणि मा. बाळासाहेब आंबेडकर यांचे एक विश्वासार्ह नेतृत्व समाजात प्रस्थापित झाले. याच आधारावर पुढील काळात दलित, वंचित, बहुजन आणि अल्पसंख्याक मुस्लीम समाजाची राजकीय वाटचाल निर्धारित होणार आहे.
          कालपर्यंत ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी अवस्था दलित राजकारणाची होती. दलित समाजात राजकीय नेतृत्वावरील अविश्वासाची परत इतकी मोठी होती की ती तोडून एक विश्वासार्ह नेतृत्व आणि राजकीय मंच या समाजासमोर उभा करणे काळाची गरज होती ती गरज आज बऱ्याचप्रमाणात मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाने आणि वंचित बहुजन आघाडीने भरून काढली. तर दुसरीकडे वंचित, बहुजन व मुस्लीम अल्पसंख्यांक समुदाय हा प्रस्थापित पक्षांच्या गळी लागला होता. त्यातून तो बाहेर पडू पाहत नव्हता. आश्वासक अन्य नेतृत्वाच्या अभावाने तो त्या प्रस्थापित पक्षांना सोडून बाहेर पडायला तयार नव्हता. तर दुसरीकडे मुस्लीम समुदायात असुरक्षितता हे त्याचे मोठे एक कारण होते. ज्यामुळे हा समुदाय प्रस्थापित कॉंग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार म्हणून फरफटत जात होता. वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही समाजाला एक आश्वासक नेतृत्व आणि राजकीय मंच उपलब्ध करून दिल्याने तो प्रस्थापित पक्षांनी केलेली कोंडी फोडून बाहेर येण्यास तयार झाला आहे. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत मिळालेले मतदान हे सुद्धा त्याला त्यातून बाहेर पडून एका नव्या पर्यायाशी जुळायला बाध्य करीत आहे.
          असे असले तरीही २०१९ च्या निवडणुकीत सर्वच दलित समुदाय हा वंचित बहुजन आघाडीच्या सोबत होता असे म्हणता येत नाही. जवळपास महाराष्ट्रातील फक्त २५ टक्के दलित समुदाय वंचित बहुजन आघाडीसोबत आला. याचे कारण हे होते की, या निवडणुकीत भाजप ला सत्तेपासून दूर केल्याशिवाय दलितांवरील भाजप शासन काळातील वाढलेले अन्याय अत्याचार कमी होणार नाही. त्यासाठी ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ या द्विधामनस्थितीत हा समाज होता. वंचित बहुजन आघाडी आश्वासक वाटत असली तरी निर्णयात्मक राहील की नाही याविषयी संभ्रम पसरविला गेला होता. त्यामुळे कॉंग्रेस सोबत जाण्यात दलित समुदायाने धन्यता मानली. परंतु त्यांची ती अपेक्षा सपशेल अपयशी ठरली. कॉंग्रेस ला या निवडणुकीत पाहिजे ते यश मिळविता आले नाही. व वंचित बहुजन आघाडीने पहिल्याच निवडणुकीत आश्वासक मतदान मिळविले. त्यामुळे पुढच्या काळात द्विधामनस्थितीत असलेला दलित समुदाय जो यावेळेस कॉंग्रेस सोबत होता तो परत वंचित बहुजन आघाडीकडे वळेल अशी अपेक्षा आहे.
          यासोबतच वंचित बहुजन समुदायामध्ये सुद्धा द्विधामनस्थिती पाहायला मिळत होती. जातवार उमेदवारी बहाल केल्याने जातीच्या उमेदवारासोबत काही समुदाय उभा झाला. परंतु तोच समुदाय इतर मतदार क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीसोबत होता असे निश्चित म्हणता येत नाही. तरीही जवळपास १० % वंचित बहुजन समाजाची मते वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पाडून घेण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु आज वंचित बहुजन समाजातील वंचित बहुजन आघाडीने उभ्या केलेल्या उमेदवारांना मिळालेली मते व त्या उमेदवाराच्या पाठीशी उभा झालेला इथला पूर्वाश्रमीचा दलित व आजचा आंबेडकरी समूह, त्यामुळे त्या उमेदवारांना मिळालेली भरघोस मते ही सर्व जमेची बाजू म्हणून वंचित बहुजन आघाडीसाठी महत्वाची ठरणार आहे. येणाऱ्या काळात हा वंचित बहुजन समाज परत एकदा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीसोबत जुळायला तयार होईल. येणाऱ्या विधानसभेपर्यंत निदान ४० ते ५० टक्के वंचित बहुजन समाज वंचित बहुजन आघाडीसोबत आला तरीही या समुदायाची जवळपास ५० आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून जातील. अशी अपेक्षा आहे.
          वारंवार हिंदू अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायात असुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. कट्टर हिंदुत्वाला पुरस्कृत करून मुस्लीम समुदायावर अन्याय देखील केल्याच्या अनेक घटना या देशात घडलेल्या आहेत. त्यामुळे मुस्लीम समुदायाने या निवडणुकीत देखील कट्टर हिंदुत्वाला पुरस्कृत करणाऱ्या भाजपा ला सत्तेतून दूर करण्यासाठी मृदू हिंदुत्ववादी कॉंग्रेस सोबत जाण्यात धन्यता मानली. वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम समुदायाला आपल्या राजकीय मंचावर समसमान स्थान दिले असतांना देखील व एमआयएम सारखा पक्ष व असुओद्दिन ओवैसी सारखे आश्वासक नेतृत्व सोबत घेऊन देखील मुस्लीम समुदाय सर्वच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत आल्याचे चित्र दिसले नाही. परंतु औरंगाबाद लोकसभेची एकमेव जागा वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात आल्याने व तिथून इम्तियाज जलील सारखे तरुण नेतृत्व दलित वंचित समुदायाच्या पाठींब्याने निवडून आल्याने मुस्लीम समुदायात चैतन्याचे वातावरण आहे. वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थाने मुस्लीम समुदायाला प्रतिनिधित्व देऊ शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये या निवडणुकीच्या निकालाने निर्माण झाला. त्यामुळे हा समुदाय देखील येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीसोबत विश्वासाने उभा होईल. अशी अपेक्षा आहे.
          एक गोष्ट यात महत्वाची आहे ती अशी की, लोकसभेच्या निकालानंतर एकदुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप सोशल मिडियातून होऊ लागलेत. वंचित बहुजन आघाडीने बांधलेली वंचित, बहुजन, अल्पसंख्याक समुदायाची एकमुठ तोडण्यासाठी हे कारणीभूत राहू शकते. पहिल्याच निवडणुकीत सर्वच समुदाय सर्वच ठिकाणी आपल्या सोबत राहील अशी राजकारणात अपेक्षा करणे अतिरेकी ठरू शकते. कुठल्याही सामाजिक परिवर्तनाला वेळ द्यावा लागतो. एका दिवसात, रातोरात किंवा अगदी काही दिवसात सामाजिक परिवर्तन होत नसते. किंवा तशी अपेक्षा देखील केली जाऊ शकत नाही. कारण कुठलेही सामाजिक परिवर्तन हे सुक्ष्मतेतून व्यापकतेकडे वाटचाल करणारे असते. लगेच व्यापक सामाजिक परिवर्तन कधीच होत नसते. इतिहासातही असे सामाजिक परिवर्तन घडून आलेले नाही. आणि तशी अपेक्षा वर्तमानातून किंवा भविष्यात देखील करता येणारी नाही. वंचित बहुजन आघाडीचा आज लागलेला निकाल व मिळालेले यश हे सूक्ष्म सामाजिक परिवर्तन आहे. या सूक्ष्म सामाजिक परिवर्तनाला लक्षात घेऊन आता याची धग व्यापक सामाजिक परिवर्तनाकडे घेऊन जाणारी आहे. आणि येणाऱ्या विधानसभेत या सामाजिक परिवर्तनाचे व्यापक रूप निश्चितच पाहायला मिळणार आहे.
          राजकारण हे एक प्रकारचे मायाजाळ आहे. या मायाजाळात अनेक लोक वाहवत जावून सामाजिक परिवर्तनाचे राजकारण विसरून स्व हिताने झपाटले जावून राजकारणाच्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयात अडथळा निर्माण करू शकतात. सत्ता व संपत्तीने परिपूर्ण राजकारणात ही माणसे दुर्लक्षित केली जातात. परंतु समाज परिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून उभे केलेल्या साधनहीन राजकारणात व राजकीय पक्षात ही माणसे अतिशय धोकादायक असतात. ती फक्त धोकादायकच नव्हे तर वंचितांच्या एकूणच राजकीय ध्येयाला मोडीत काढणारे ठरू शकतात. अश्या लोकांना वंचितांच्या राजकारणात स्थान असू नये. कारण त्यांच्या नसण्याने सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाला काहीही फरक पडत नाही. परंतु त्यांच्या असण्याने सामाजिक परिवर्तनाचे राजकारण अल्पावधीत मोडीत निघून आज एकत्र आलेला वंचित, बहुजन, अल्पसंख्यांक समुदाय उद्या विभक्त होऊ शकतो. आज निर्माण झालेला त्यांचा विश्वास उद्या अविश्वासात परावर्तीत होऊ शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने पुढील वाटचाल करणे गरजेचे राहील. तेव्हाच वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाला यश प्राप्त होईल.
          आज वंचित, बहुजन, दलित व अल्पसंख्यांक समुदायात असलेली ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ ही कोंडी फुटलेली आहे. वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आज त्यांच्या पुढे उभा आहे. त्या पर्यायाला अंगीकारून हा समुदाय पुढील काळात वंचित बहुजन आघाडीला भक्कम साथ देईल असा विश्वास आहे. कालपर्यंतच नव्हे तर या २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत जो वंचित, बहुजन, दलित, अल्पसंख्यांक समुदायातील वर्ग कॉंग्रेस सोबत गेला तो मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळेल. इम्तियाज जलील च्या रूपाने वंचित बहुजन आघाडीचा एकमेव मुस्लीम समुदायातील एक तरुण खासदार संसदेत प्रतिनिधित्व करीत असल्याने मुस्लीम समुदायात एक नवचैतन्य निर्माण होऊन येणाऱ्या विधानसभेत २५ ते ३० मुस्लीम समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार निवडून येऊ शकतात हा विश्वास मुस्लीम समुदायात निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळे निदान येणाऱ्या निवडणुकीत ५० ते ६० टक्के मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीसोबत राहील असे म्हणता येईल.
          एकंदरीतच महाराष्ट्रातील वंचित, बहुजन, दलित, अल्पसंख्यांक समुदायाला वंचित बहुजन आघाडीचा झेंडा खांद्यावर घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेशाचा मार्ग सापडलेला आहे. फक्त मतदार म्हणून आजपर्यंत आपला वापर झाला. आता आपल्याच मतांच्या बळावर आपल्याला अपेक्षित राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकते, हा विश्वास वंचित बहुजन आघाडीने दलित, धनगर, मुस्लीम व अन्य वंचित समुदायात निर्माण केला. हेच वंचित बहुजन आघाडीचे मोठे यश आहे असे म्हणण्यास हरकत नाही. वंचित बहुजन आघाडीची सुरवात चांगली आहे तर अंतिम उद्देशही लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी सामाजिक परिवर्तनाच्या राजकारणाचे उद्धिष्ट उराशी बाळगून कटिबद्ध होऊया.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275

Tuesday, 28 May 2019

गिरीश कुबेर यांना वंचित बहूजन आघाडीचा झेंडू बाम

गिरीश कुबेर यांना वंचित बहूजन आघाडीचा झेंडू बाम*

प्रति,
          मा. गिरीश कुबेर
          संपादक, दै. लोकसत्ता
महोदय,
           आपल्या पत्रकारितेबद्दल आम्हाला अभिमान आहे. आपल्यात थोडीफार शिल्लक असलेली धर्मनिरपेक्षता व पुरोगामित्व दाखवून आपण पत्रकारिता करता. कधीकधी ती पत्रकारिता तुमच्यावर असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला बळी पडून पटरी सोडून जातांना आम्ही अनेकदा पाहीलेली आहे. खासकरून जेव्हा जेव्हा आंबेडकरी, वंचित, बहूजन, अल्पसंख्याक समुदायाच्या अस्मितापुर्ण राजकारणाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा तुमच्यातली उच्चवर्णीय (उच्चपक्षीय) सांस्कृतिकता हावी होऊन तुम्ही उच्चवर्णिय कंपूच्या तंबूत बसून पत्रकारिता करीत असता. हा प्रश्न फक्त तुमचाच नाही तर महाराष्ट्रात व देशात पुरोगामित्वाची, धर्मनिरपेक्षतेची झूल पांघरूण असलेल्या सर्वच पत्रकारांची जवळपास तीच अवस्था आहे. याला कारण देखील तसेच आहे. आज तर वंचित बहूजन आघाडीने सर्वांचीच डोकेदुखी वाढविली आहे. त्यामुळे वंचितांनी वाढवलेली राजकीय डोकेदुखी इतकी असह्य झाली की तुम्हाला लोकसत्ताच्या संपादकीय 'वंचित संचित' लेखात व्यक्त व्हावे लागले. तुम्ही वंचित बहूजन आघाडीची हवा काढून घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. व वंचित बहूजन आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. कुबेर साहेब तुमच्यासारख्या व वागळे सारख्या अनेकांना व्यक्त होण्यास वंचित बहूजन आघाडीने बाध्य केले यातच वंचित बहूजन आघाडीचे यश आहे. असे आम्ही समजतो. तुमच्या टिकांना वंचित बहूजन समाजाने अतिशय सकारात्मक घेऊन त्याच संवेगाने पुढे जाण्याचा प्रण घेतला आहे. त्याबद्दल तुमचे आभारच.

आता तुमच्या 'वंचित संचित' ला आम्ही उत्तररूपी झेंडू बाम पाठविल्याशिवाय तुमची डोकेदुखी काहीकेल्या थांबणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. शेवटी तुमच्यासारख्या पत्रकारांना आम्ही गमावू इच्छित नाही. कारण आम्ही तुम्हाला मित्र विरोधकांच्या यादीत ठेवतो. त्यासाठी आम्ही वंचितांचा झेंडू बाम तयार केला आहे. येणाऱ्या काळात ज्यांची डोकेदुखी वंचित बहूजन आघाडीमुळे वाढणार आहे त्यांना त्यांना हे वंचित बाम पाठविण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

कुबेर साहेब तुम्ही प्रमोद महाजनांचे उदाहरण देऊन अतिशय चाणाक्ष पद्धतीने भाजपची चाणक्यनीती मांडण्याचा प्रयत्न केला. भारिपला तर तुम्ही आधीच भाजपच्या बाजूने करून टाकलात. परंतु त्यासोबतच वंचित बहूजन आघाडी हा नवा रुपही भाजपच्या बाजूने दाखविण्याचा प्रयत्न केलात. आता कुबेर साहेब मला स्वाभिमानी व स्वतंत्र राजकारण करणारे म्हणजे भाजपच्या बाजूचे असे म्हणणे असेल तर कॉग्रेस, शिवसेना, जनता दल, भाजप, राष्ट्रवादी स्वतंत्र पायावर उभी होत असतांना हे सर्व पक्ष कुणाच्या बाजूचे होतात. की त्यांचे राजकारण हे कुणाच्या बाजुचे राहत नसून सत्तास्थापनेचे राजकारण असते. मात्र सत्तेपासून वंचित असलेल्या समुहांनी स्वतंत्र राजकारण उभा करण्याचा प्रयत्न केला तर ते कुणाच्यातरी बाजुचेच असते हे तुमचे म्हणणे कुठल्या जगातल्या राजकीय तत्त्वज्ञान व सिद्धांताला धरून आहे हे जरा स्पष्ट कराल का ? तुम्ही ज्या प्रमोद महाजनांचे उदाहरण देऊन मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय वाटचालीला प्रश्नार्थक करता. तर तुम्हाला हे माहित असेलच की जेव्हा प्रमोद महाजन यांचे राजकीय पटलावर फारसे परिचित चाणक्य नव्हते तेव्हा १९८९ ला मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हि.पी. सिंग यांना केंद्राच्या सत्तेत बसवून ओबिसींच्या प्रलंबित मंडल आयोगाला लागू करवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सत्ताही गमावली व मंत्रीपद देखील नाकारले. परंतु ओबिसींच्या अधिकार प्राप्तीच्या ध्येयापासून तसूभरही ढळले नाही. तेव्हाही बाळासाहेब आंबेडकरांनी कॉग्रेस-भाजप व्यतिरिक्त स्वतंत्र राजकारण केले. याचाच अर्थ बाळासाहेब आंबेडकरांचा अगदी सुरुवातीपासूनच स्वतंत्र राजकारणाचा पिंड राहीलेला आहे. याचा अभ्यास करण्यात तुम्ही थोडेसे मागे राहीलात किंवा जाणिवपूर्वक ते तुमच्या डोक्याच्या विशिष्ट कप्प्यात बंधिस्त करुन ठेवलात. मध्यंतरीच्या काळात ज्याप्रमाणे बाबरी मस्जिद, रिडल्स, गोध्रा यासारख्या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी डोके वर काढत होते तेव्हा जनमत लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकर कॉंग्रेस सोबत गेलेत. पण कॉग्रेसने त्याही काळात निराशाच केली त्यामुळे २००४ पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी परत एकदा स्वतंत्र राजकारणाची कास धरली ती आजतागायत कायम आहे. परंतु तुमची पत्रकारीता २००४, २००९, २०१४ या काळात बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र राजकारणावर बोलायला तयार झाली नव्हती. कारण तुमच्या उच्चवर्णीय पक्षांना तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा पाहिजे तसा फटका बसत नव्हता. म्हणून तुम्ही उच्चवर्णिय राजकीय पक्षांच्या सत्ताखुर्चिवर बसून आंबेडकरी राजकारणाची हेटाळणीयुक्त टेहाळणी करीत होतात. तुम्हाला राजकीय मालकपणाचा भास कायम होता. व वंचित बहूजन समाज हा तुमचा मतदाररूपी गुलाम होता तोपर्यंत तुम्ही अगदी मजेत गुण्यागोविंदाने होतात. पण २०१९ ला त्याच बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वतंत्र राजकारणाचा फटका तुमच्या उच्चवर्णिय राजकीय पक्षांना (कॉंग्रेस-भाजप व सहकारी) बसणार आहे, असे दिसताच तुमची बि.पि., श्युगर, पित्ताची लेवल वाढली आणि तुमच्यातला सुप्तावस्थेतील उच्चवर्णिय खडबडून जागा झाला व वंचितांच्या स्वतंत्र राजकारणाला घरगडी बनविण्याचा प्रयत्न करू लागला. कुबेर साहेब वंचित बहूजन समाजाचे राजकीय आज्ञेत राहायचे दिवस आता संपलेत हे निदान वंचित बहूजन समाजातील तरूणांकडे व त्यांचा वंचित बहूजन आघाडीत असलेल्या सहभागाकडे पाहून तरी निदान लक्षात घ्या.

कुबेर साहेब पुढे तुम्ही असेही म्हणता की, वंचित बहूजन आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्या १० जागा पराभूत झाल्यात. वंचित बहूजन आघाडीने विरोधकांची म्हणजे (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) यांची मते खाल्लीत व त्यामुळे भाजपला १० जागांचा फायदा झाला. हा तुमचा तर्क इतका तकलादू व तथ्यहीन आहे की त्यावरून असे लक्षात येते की तुम्हाला राजकारण अद्याप कळलेले नाही. कुबेर साहेब मला सांगा, ज्या १० जागा वंचित बहूजन आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी हल्ली असे तुम्ही म्हणता त्या १० जागांवर वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार नसते तर ज्या मतदारांनी वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांना मत दिली त्या मतदारांनी हमखास कॉंग्रेस-राष्ट्रवादी च्या उमेदवारांनाच मतदान केले असते असे कशाच्या आधारावर म्हणता ? कुठल्या आधारावर गृहीत धरता मतदारांना ? कुठले मोजमाप व कुठली मोजपट्टी लावता तुम्ही वंचित बहूजन आघाडीला मतदान दिलेल्या मतदारांसाठी ? हा तर्क लावतांना तुम्ही कोणत्या राजकीय एजन्सीचा आधार घेता ? एकीकडे राजकारणात कुणीच कुणाचा परमानंट (कायमचा) मतदार नसतो हे जागतिक राजकारणात सिद्ध झाले असतांना तुम्ही सरसकट वंचित बहूजन आघाडीला मतदान करणाऱ्या मतदारांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा मतदार गृहीत धरता यावरून तुमची राजकीय बुद्धीची कुवत लक्षात येते. *कुबेर साहेब लोकसत्ताच्या वातानुकूलित खोलीतून बाहेर पडा व गावात, वस्तीत खेड्यात येऊन अगदी पहील्यांदा मतदान करणाऱ्या १८ वर्षाच्या मतदाराला विचारा की 'तु तुझे मतदान कुणाला दिले ?' तर तो नवमतदार देखील म्हणतो की, 'मी कुणाला मतदान दिले हे गुप्त आहे. मी तुला का सांगू.' आणि कुबेर साहेब तुम्हाला वंचित बहूजन आघाडीला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांनी येऊन सांगितले की त्या १० जागांवर वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार नसते तर आम्ही सर्वच मतदारांनी फक्त आणि फक्त कॉंग्रेस-राष्ट्रवादी च्या उमेदवारांनाच मतदान केले असते.* कुबेर साहेब खरंच तुमचा राजकीय अभ्यास जरा कच्चा दिसतो.

चला तुमच्या राजकीय ज्ञानात भर घालण्यासाठी एक उदाहरण देतो. याच २०१९ च्या नागपूर लोकसभेचे उदाहरण देतो. नाना पटोले हे भाजप चे बंडखोर यावेळी कॉग्रेस च्या तिकीटावर नागपूरातून गडकरी यांच्या विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या रिंगणात होते. यावेळेस नागपूरातील वंचित बहूजन आघाडीचा उमेदवार लोकांच्या पसंतीस उतरला नाही. बसपा व अन्य तत्सम पक्षाकडे वळल्यास भाजप पुन्हा निवडून येते अशा गैरसमजुतीमुळे नागपूरातील आंबेडकरी, ललित, मुस्लिम मतदार जवळपास ९०% कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभा झाला. जवळपास ४ लाखांच्या आसपास असलेला हा वंचित बहूजन आघाडीचा मतदार निदान ३ ते ३.५ लाखांच्या आसपास कॉंग्रेसकडे वळता झाला. परंतु तुमचाच उच्चवर्णिय कॉग्रेसी मतदार ज्यांच्या बळावर पटोलेंची भिस्त होती तोच कॉंग्रेसकडून पाय काढून घेऊन भाजपकडे वळला. व तुमच्या उच्चवर्णिय कॉंग्रेस-राष्ट्रवादी चा उमेदवार नानाभाऊ पटोले नागपूरातून सपाटून पडला. त्याला कुणी पाडले तर तुमच्याच उच्चवर्णीय कॉंग्रेस-राष्ट्रवादी मतदारांनी पाडले. वंचित बहूजन आघाडीच्या मतदारांनी नाही पाडले. तोच कित्ता रामटेक लोकसभा मतदारसंघातही गिरवला गेला. याचा अभ्यास करून तुम्ही विश्लेषण केले असते. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कामी आले असते. त्यामुळे कुबेर साहेब फक्त १० जागांचा अभ्यास न करता ४१ जागांचा अभ्यास करा जीथून भाजप-सेनेचे उमेदवार निवडून आले आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या उच्चवर्णिय राजकारणाचे वास्तव चित्रण डोळ्यात भरेल. पण आम्हाला माहीती आहे तसे तुम्ही करणार नाही म्हणून. कारण तसे तुम्हाला तो उच्चवर्णीय मतदार करू देणार नाही. मात्र वंचित बहूजन मतदाराला तुमचा तुम्ही गुलाम समजता त्यामुळे तो थोडाजरी इकडेतिकडे सरकला की तुमच्या सत्ताखुर्चीच्या बुडाखालून धूर निघायला सुरवात होते. व तुम्ही त्या मतदारांना परत गुलामीची जाणीव करून द्यायला सदा तत्पर असता. पण कूबेर साहेब वंचित बहूजन मतदारांनी राजकीय गूलामी झिडकारली हे तुमच्या लक्षात कसे येत नाही.

कुबेर साहेब तुम्ही म्हणता की महाराष्ट्रातील दलित, आदिवासी, मागासांची चळवळ आधी कॉग्रेस आणि नंतर भाजप यांच्या आश्रयाने वाढली. इथेही तुमचा अभ्यास जरा कमीच पडलेला दिसतो. इतक्या मोठ्या दैनिकाचे संपादक त्यातही नावात गिरीश कुबेर म्हणजे विचारांचा, अभ्यासाचा, इतिहासाचा कुबेर तुमच्यात अपेक्षित होता. परंतु त्या सर्व़च अपेक्षांवर तुम्ही सपशेल अपयशी ठरतांना दिसतात. कुबेर साहेब दलित, आदिवासी, मागासांची चळवळ कॉग्रेस, भाजप च्या आश्रयाने वाढली नाही तर जेव्हा जेव्हा या चळवळीने स्वतंत्र स्वाभिमानी वाटचाल केली तेव्हा तेव्हा ही चळवळ वाढली व जेव्हा जेव्हा ही चळवळ कॉग्रेस-भाजप च्या आश्रयाला गेली तेव्हा तेव्हा ही चळवळ संपली असाच इतिहास आहे. जरा इतिहासाची पाने पलटून बघा. १९६९ पर्यंत दलितांची चळवळ स्वतंत्र पायावर होती तेव्हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष होती. परंतू १९६९ नंतर कॉग्रेसच्या आश्रयाला जाऊन संपली. मा. बाळासाहेब आंबेडकरांनी १९८९ ला परत या चळवळीला कॉग्रेसच्या आश्रमातून बाहेर काढले तर मंडल कमिशन लागू झाला. आणि आज परत मनुवाद डोकं वर काढतांना, देशाचे संविधान धोक्यात असतांना कॉग्रेस-भाजपच्या आश्रमातून या चळवळीला बाहेर काढून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहूजन आघाडीचा सक्षम राजकीय पर्याय या चळवळीचा म्हणून स्वत:च्या भक्कम पायावर उभा केला. कुबेर साहेब तुम्ही वंचित बहूजन मतदारांना गृहीत धरून आपल्याकडे वळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहात पण यात तुमचीच फसगत होऊन पाणी नसलेल्या हौदात तैराकीचे धडे घेण्यासारखी आपल्या उच्चवर्णीय राजकारणाची अवस्था झालेली आहे.

कुबेर साहेब तुम्ही पुढे म्हणता की, वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवारांनी लाख लाख मते घेतल्याने किंवा वंचितांच्या नेतृत्वांकडे थोडीफार साधनसंपत्ती आल्याने वंचितांच्या या राजकारणाने मागासांचे नक्की काय भले झाले किंवा होईल. या राजकारणाने समाज किती पुढे जाईल ? असे प्रश्न उभे करून परत तुम्ही तुमच्या ज्ञानाची दिवाळखोरी दाखविली असे तुम्हाला नाही का वाटत ? कुबेर साहेब सामाजिक परिवर्तन, लाभ, तोटा ह्या काय रातोरात चमत्कारिक रित्या घडणाऱ्या गोष्टी आहेत का हो ? आणि हे आम्हाला न कळण्याइतपत आम्ही दुधखुळे पण नाही. कुबेर साहेब भारताच्या स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेस १८८५ ला स्थापन झाली. तेव्हा लगेच या देशाला स्वातंत्र्य मिळाले का ? हिंदु रक्षणासाठी १९२५ ला आर एस एस स्थापन झाली व १९८४ ला भाजप ची स्थापना झाली. लगेच हिंदूंचे रक्षण झाले का ? व आज तरी होत आहे का ? मराठी माणसांच्या व महाराष्ट्राच्या भल्यासाठी १९६१ ला शिवसेना स्थापन झाली. लगेच मराठी माणसांचे व महाराष्ट्राचे भले झाले का ? निदान शिवाजींच्या मावळ्यांचे तरी भले झाले का ? सोनिया गांधींच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा समोर करून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना १९९९ ला केली. लगेच सोनिया गांधी विदेशी ठरून देशाचे काही भले झाले का ? निदान मराठ्यांचे तरी भले झाले का ? बिचारे इतक्या वर्षानंतरही मराठा आरक्षणासाठी दारोदार भटकत का आहेत ? कुबेर साहेब वंचितांना विचारलेले तुमचे प्रश्न कधी तरी तुमच्या या उच्चवर्णीय राजकीय सवंगड्यांना विचारलेत का ? तुम्ही विचारूच शकत नाही. कारण मनुस्मृतीत उच्चवर्णियांना प्रश्न विचारता येत नाही कींवा तशी मुभाच दिली गेलेली नाही. उच्चवर्णीय नेहमीच प्रश्नांकीत वलयाच्या बाहेर राहीले आहेत. मात्र इथला वंचित बहूजन त्याच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न केल्यास उत्तर देण्यास बाध्यच आहे. त्यांची प्रत्येक कृती ही प्रश्नांकीतच आहे. हेच मनुस्मृतीने शिकविले आहे. बरोबर ना कुबेर साहेब. अहो पहिल्या ४ महिन्याच्या वंचित बहूजन आघाडीला मिळालेल्या ४१ लाखांच्या मतांवर तुम्ही इतके प्रश्न करायला लागलात याचा अर्थच असा आहे की वंचित बहूजन आघाडी येणाऱ्या काळात प्रस्तापित तुमच्या उच्चवर्णिय राजकीय सवंगड्यांना रिप्लेस करणार आहे याची चाहूल तुम्हाला लागली आहे. कुबेर साहेब मागासांचे भले होईल का ? समाज किती पुढे जाईल ? याची फार काळजी घेण्याची तसदी आपण घेऊ नये. कुबेर साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या वंचित बहूजन आघाडीचे घोषवाक्य आहे, 'स्वत:च्या अधिकारासाठी, स्वत:चे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च्या हातात सत्ता घ्या. व स्वत:चे प्रश्न स्वत:च संविधानाच्या माध्यमातून सोडवून घ्या.' वंचित बहूजन आघाडीचा व वंचित समाजाचा थोडासा अभ्यास / गृहपाठ करून घेतला असता तर प्रश्न पडले नसते व वंचित समुहाला प्रश्न विचारण्याची तसदी घ्यावी लागली नसती. *'आपली वंचित बहूजन आघाडी'* आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्याचा पुर्ण अधिकार आहे. शब्दांकडे लक्ष असू द्या. अन्यथा मनुस्मृतीने तुम्हाला वर उल्लेख केलेल्या कुठल्याच तुमच्या उच्चवर्णिय राजकीय सवंगड्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार देखील दिलेला नाही.

शेवटी कुबेर साहेब ज्या भिमा कोरेगाव प्रकरणाचा तुम्ही उल्लेख करता त्या भिमा कोरेगाव प्रकरणात बाळासाहेब आंबेडकरांनी सामंजस्याची भुमिका घेतली नसती तर महाराष्ट्रात आज जी शांतता आहे ती दिसली नसती. तुम्ही सूद्धा हा लोकसत्ताचा संपादकीय आज लिहू शकला नसता. *आंबेडकर हे सामंजस्याचे प्रतिक आहे.* हे तुमच्यासारख्यांनी विसरून चालणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, त्याच भीमा कोरेगाव प्रकरणाने वंचित बहूजन आघाडीची निर्मिती केलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महाराष्ट्रातील वंचित समुहाने भिमा कोरेगाव प्रकरण लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. निदान हा सामाजिक कल तरी लक्षात घ्यावा. इथेच सर्वकाही सापडते. याव्यतिरिक्त तुम्हाला किंवा मला अधिक भाष्य करण्यात अर्थ नाही. म्हणून समाजाने प्रस्थापितांना लाथाडण्याचा प्रयत्न केला परंतु तुमच्याच य. दु. जोशी यांच्या संकल्पनेतील सॉफ्ट हिंदुत्वाची (नावापुरती/सत्तेपुरती) कास धरणारी कॉंग्रेस व हार्ड हिंदूत्वाची कास धरणारी भाजप यांनी मिळून छे ! संगनमताने हार्ड / अतिरेकी हिंदुत्व लादणारी भाजप सत्तेवर बसविली आहे. कारण आलटून पालटून सत्ता कुणाचीही बसली तरी तुमच्या उच्चवर्णिय सवंगड्यांना त्याचा काही फरक पडणार नाही. मात्र वंचित, बहूजन, मागास, दलित, अल्पसंख्यांक, मुस्लिम समुदायाच्या सामाजिक परिप्रेक्षावर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे तोंडदेखले का होईना पण तुम्ही भाजपच्या सत्तेवर येण्याचे खापर महाराष्ट्रातील वंचित बहूजनांनी स्थापण केलेल्या 'वंचित बहूजन आघाडीवर फोडायला तयार बसलेला आहात. परंतू संपुर्ण देशातून कॉंग्रेस हद्दपार केली गेली, नाकारली गेली त्याची कारणमिमांसा व त्यावर चिकार शब्दही बोलायला तयार नाहीत. यातच सर्व तुमचा खटाटोप कशासाठी आहे हे दिसून येते.

सरतेशेवटी कुबेर साहेब, वंचितांचे हे राजकारण दिवसेंदिवस अधिक घट्ट होईल. तुमच्यासारख्यांची डोकेदुखी अधिक वाढून दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल. त्यासाठी वंचित बहूजन आघाडीच्या राजकारणाचे हे झेंडू बाम एकदाचे कपाळावर लावून चोळून घ्या. व कायमची डोकेदुखी बंद करून वंचितांच्या राजकारणाच्या बाजूने थोडे सकारात्मकतेने पाहून त्यावरही दोन शब्द वंचितांचा राजकीय उत्साह वाढविणारे लिहीण्यास सुरवात करा. निदान तुमच्या मिडीया स्वतंत्रतेला वंचितांचे राजकारण पोषकच राहील. मिडीयाची राजकीय गुलामगिरी व वंचितत्व दूर करण्यास वंचितांच्या राजकारणाचा तुम्हाला लाभ होईल ही बाब विस्मरणात जाऊ देऊ नका ही विनंती.

कळावे लोभ असावा.
सा.न.वि.वि.

आपलाच
अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर,
वंचित बहूजन आघाडी, महाराष्ट्र.

Thursday, 16 May 2019

बौद्ध धम्मात आणि बौद्ध धर्मियांत राजकारणाचे महत्व


#Once_Again_Ambedkar
बौद्ध धम्मात आणि बौद्ध धर्मियांत राजकारणाचे महत्व
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              १८ मे २०१९ ला संपूर्ण जगात बुद्ध जयंती मोठ्या थाटामाटात साजरी होईल. तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाईल. एक दिवस त्यांच्या तत्वज्ञानाच्या अनुपालनाचा बागुलबुवा उभा केला जाईल. बुद्ध जयंती जशी जगात साजरी केली जाईल. तशीच ती बुद्धाच्या गृह्क्षेत्रात म्हणजेच भारतातही तितक्याच थाटामाटात साजरी होईल. प्रत्येक बुद्धविहारात जयंतीचे कार्यक्रम साजरे होतील. कुणी बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेईल. कुणी खिरदान कार्यक्रम करतील. कुणी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतील. तर कुणी बुद्ध चरित्रावर व्याख्यानांचे कार्यक्रम घेतील. बुद्ध भीम गीत गाणाऱ्यांना मानधन मिळेल. प्रबोधनकारांना रग्गड मानधन मिळेल. बुद्ध चरित्रावर व्याख्यान देणाऱ्या भाषणकारांना देखील योग्य तो मोबदला मिळेल. एकंदरीतच सर्वांचा व्यवसाय संपूर्ण आठवडा मस्त पैकी भरभराटीला आलेला असेल. पण या सर्वात बुद्ध जनमानसात पोहचेल की नाही ? बुद्ध जनमानसात रुजेल की नाही ? खरा बुद्ध जनतेपुढे मांडला जाईल की नाही ? या प्रश्नांची उत्तरे मात्र देता येणार नाही. बुद्ध जयंती संपली की त्यानंतर काय चालते हे आपण सर्वांना माहिती आहे.
त्रिशरण, पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना याच्या पुढे बुद्ध जाणार की नाही ? याची चिंता मला वयाच्या चाळीशीत लागलेली आहे. तशीच ती माझ्या पिढीच्या अनेकांना लागली असेल व मागेपुढे लागेलही. भविष्यातही हे प्रश्न पडतील. कधीतरी या प्रश्नांचे समाधान करावेच लागणार आहे. बुद्ध फक्त इतकाच आहे का ? बुद्ध फक्त विहारातच आहे का ? बुद्ध फक्त भिक्षूंच्या वाणीतून येतो तेवढाच आहे का ? बुद्ध फक्त विहारातून जितका कानावर पडतो तितकाच आहे का ? स्वतःला बौद्ध, बुद्धिस्ट म्हटले की तिथेच बुद्ध संपतो का ? बुद्ध गीतांतून ऐकायला येणारा बुद्धच तेवढा घ्यायचा का ? प्रबोधनातून मांडला जाणारा बुद्ध तेवढाच मर्यादित आहे का ? भाषणातून सांगला जाणारा बुद्ध हाच खरा बुद्ध आहे का ? त्याच्याही पुढे मालिका आणि चित्रपटातून दाखविला जाणारा बुद्ध हेच बुद्धाचे चरित्र आहे का ? धम्म म्हणजेच बुद्ध की बुद्ध म्हणजेच धम्म ? हे कोडेही सोडवावे लागणार आहे कि नाही. धम्माच्या पुढेही कुठेतरी बुद्ध असेल किंवा बुद्धाच्या परिमित सीमेत बुद्ध बांधला जातो का ? बुद्ध मानवी जीवनाला माणुसकीत बांधणारा धम्म देतो, मानवतावाद देतो म्हणून फक्त धार्मिकतेत बुद्ध थांबत नाही. तो तिथेच न थांबता, बुद्ध सामाजिकता देतो. बुद्ध आर्थिकताही देतो. बुद्ध राजकारणाचा आदर्शही देतो. एकंदरीतच बुद्ध मानवीयतेच्या सर्व अंगांना स्पर्श करतो. परंतु बुद्धांची सर्वव्यापकता विसरली गेली. दुर्लक्षित केली गेली. त्यात सर्वात दुर्लक्षित जर काही केले गेले असेल तर ते म्हणजे बुद्धांची राजकीयता व राजकारणाचा आदर्श. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धांची हीच सर्वव्यापकता ओळखली होती. म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्धांच्या प्रत्येक तात्त्विक व बौद्धिक अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या लेखात फक्त बुद्धांचे राजकीय तत्वज्ञान, आणि बौद्धांचे राजकारण एवढाच विचार आपण केला तर पुढील अनेक पिढ्यांच्या प्रश्नांचे समाधान आपण करू शकू.
नुकतेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात देखील चार टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत स्वतःला बुद्धिस्ट म्हणविणारा पांढरपेशी जो स्थानिक बुद्धविहारात आपले साम्राज्य राखून आहे. विहाराचा प्रमुख आहे. विहार कमिटीचा सदस्य आहे. तो कुठे होता ? त्याची भूमिका काय होती ? काही अपवाद असतील असे गृहीत धरुयात. परंतु ‘धम्म आणि राजकारणात गफलत होऊ नये.’, ‘धम्मात राजकारण येऊ नये.’, ‘विहारातून राजकारण केले जाऊ नये.’ हे नेहमी कानावर पडणारे वाक्य याही निवडणुकीत कानावर पडले नसतील तर नवलच. अशी वाक्ये ज्या ज्या मुखातून द्रवतात, त्या त्या बुद्धीला बुद्ध, धम्म, विहार आणि राजकारण कळले आहे का ? हा प्रश्न पुढे येतो. यावर्षीची बुद्ध जयंती साजरी करीत असतांना बुद्ध, धम्म, विहार आणि राजकारण यांच्यात मेळ घालून पुढे गेलोत, तर काहीतरी भविष्याला दिशा देता येईल हे आपण लक्षात घ्यावे.
१७ मे १९४१ ला बुद्धजयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जनता’ या साप्ताहिकातून एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचे शीर्षक होते ‘बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व.’ या लेखात त्यांनी जातक कथेतील बुद्ध चरित्र थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. व त्यानंतर भारतीय सामाजिक व राजकीय परिप्रेक्षात बुद्ध व त्यांचे तत्वज्ञान किती महत्वाचे आहे, आवश्यक आहे. हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सोबतच इथली ब्राम्हणी व्यवस्था, चातुर्वर्ण्य, जात, ब्राम्हण, ब्राम्हणेत्तर इ. चे सामाजिक अधिष्ठान, संघर्ष, सत्ता, पिळवणूक भारतीय समाजकारणात व राजकारणात वास्तवात कसे मांडले जाते याचे विविध दाखले देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. लोकशाही आणि बुद्ध यातील संतुलन साधतांना बुद्ध जयंतीला कसे राजकीय महत्व आहे. हे समजावून सांगण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. या लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ब्राम्हणी धर्म आणि लोकशाही ह्या परस्परविरोधी, एकमेकांस विरोधी गोष्टी आहेत. लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण्य नाहीसे झाले पाहिजे. हे चातुर्वर्ण्य जंतू काढून टाकण्याकरिता बुद्धाच्या तत्वज्ञानासारखे मारक रसायन नाही, असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही म्हणतो की, राजकारणाची रक्तशुद्धी करण्याकरिता बुद्धजयंती सर्व हिंदूंनी साजरी करणे हितावह व आवश्यक आहे....” त्याच लेखात पुढे म्हणतात, “हिंदूंची रक्तशुद्धी रामाची जयंती करून होणार नाही, कृष्णाची जयंती करून होणार नाही किंवा गांधींची जयंती करून होणार नाही. राम, कृष्ण, गांधी हे ब्राम्हणी धर्माचे उपासक आहेत. लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेला त्यांचा काही उपयोग होणार नाही. उपयोग झाला तर एका बुद्धाचाच होऊ शकेल त्याची आठवण घेणे आणि त्याचीच मात्र घेणे हाच एक हिंदुमात्राच्या राजकीय व सामाजिक रक्तशुद्धीचा उपाय आहे, असे आम्हास निःसंशय वाटते.” (संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता १९२९ ते १९५६, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड २०, पान क्र. ३३५) एकंदर लोकशाहीचे प्रचलित व संचालित रूप बुद्ध तत्वज्ञानात मांडण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. लोकशाहीनेच हा देश पुढे जाऊ शकतो. लोकशाहीनेच इथला सामाजिक संघर्षाचा डोलारा उद्ध्वस्त होऊ शकतो. लोकशाहीनेच इथली जुलमी व अन्यायकारी व्यवस्था उलथवून टाकता येऊ शकते. म्हणून लोकशाहीच्या सुसूत्रीकरणासाठी आणि ब्राम्हणी राजकारणाच्या रक्तशुद्धीसाठी बुद्ध तत्वज्ञान महत्वाचे आहे. व त्यासाठी बुद्ध जयंतीला राजकीय महत्व आहे. व ती हिंदूंनी देखील लोकशाहीच्या संरक्षणासाठी साजरी केली पाहिजे इतकाच उद्दात्त हेतू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे होता.
बुद्ध तत्वज्ञान लोकशाही मांडते. लोकशाहीचे समर्थन करते. अन्यायाला टाळून न्यायाचे राज्य मांडते. जनतेचे कल्याणकारीत्व उद्धृत्त करते. भेदाभेद संपवून समतेचे राज्य प्रस्थापित करते. बुद्ध तत्वज्ञानात ही लोकशाही कशी व कुठून आली ? याचे विवेचन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ किंवा मूळ बुद्ध चरित्र आपल्याला हे सांगते की मुळात बुद्धाची निर्मिती हीच लोकशाहीतून झालेली आहे. समतेच्या आग्रहातून झालेली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यातून झालेली आहे. कल्याणकारी तत्वांचा राज्यांनी अंगीकार करावा या भूमिका मांडणीतून झालेली आहे. शाक्य पंचायतीत न्यायाची भूमिका मांडण्यातून बुद्ध निर्माण झाला आहे. रोहिणी नदीच्या पाणी संघर्षातून बुद्ध निर्माण झालेला आहे. एकंदरीतच बुद्धाच्या निर्मितीला राजकारण, राजकीय व्यवस्था, गणपंचायत जबाबदार आहे हे आपल्याला बुद्ध चरित्रातून सापडते. त्यामुळे बुद्ध आणि राजकारण हे वेगवेगळे करता येणार नाही किंवा ते वेगवेगळे राहू शकत नाही. राजकारणाला बुद्ध हा नेहमीच मार्गदर्शक राहील, संदेश देणारा विचार राहील. त्यामुळे जो जो लोकशाहीला मानतो तो तो राजकारणापासून बुद्धाला अलिप्त ठेवू शकत नाही. राजकारण हा बुद्धाचा अविभाज्य अंग आहे, तो स्वीकारावा लागेल आणि राजकीय भूमिका घ्यावीच लागेल.
परत एक उदाहरण बुद्धाच्या राजकीय प्रगल्भतेचा आणि राजकारणाच्या मर्मगर्भाचा आपल्याला लक्षात घ्यावाच लागेल. ते उदाहरण म्हणजे मगध चा राजा अजातशत्रू चे आहे. अजातशत्रू हा मगधचा राजा होता. परंतु बुद्धाच्या विचारांना प्रभावित होऊन, अजातशत्रूने बुद्धाला शरण जाऊन धम्माचा अंगीकार केला. व राज्यकारभार करू लागला. बुद्ध धम्मातील अहिंसा तत्वाचा अंगीकार करून शस्त्राने नव्हे तर शांती व अहिंसेचा स्विकार करून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करू लागला. राज्यातील जनताही राज्याचा कारभार शांती व अहिंसेच्या मार्गाने चालतांना पाहून खुश होती. परंतु शेजारील राज्याकडून मगध साम्राज्यावर आक्रमणे होऊ लागली. सीमावर्ती भागात शत्रूंनी धुमाकूळ घातला. मगधचे राज्य लुटले जाऊ लागले. मगधची जनता असुरक्षित झाली. अजातशत्रू ला प्रश्न पडला की मी बुद्धाचा धम्म, बुद्धाचा मार्ग स्वीकारून देखील माझे राज्य असुरक्षित होऊ लागले. राज्य मी सुरक्षित ठेवू शकत नाही. राज्यातील जनतेला सुरक्षितता देऊ शकत नाही. परकीय आक्रमणांना थांबवू शकत नाही. अशा अनेक प्रश्नांनी अजातशत्रू ला घेरले होते. या प्रश्नांच्या समाधानासाठी अजातशत्रू बुद्धाकडे गेला. आणि बुद्धाला मगध साम्राज्यात चाललेली वास्तविकता सांगितली. मी तलवार टाकली आणि धम्म स्वीकारला. तेव्हा बुद्धाने अजातशत्रू ला जो संदेश दिला तो अतिशय महत्वपूर्ण होता. बुद्ध म्हणतात, “हे अजातशत्रू ! मी तुला धम्म दिला तो तुझ्या व्यवहार नीतीत बदल करणारा आहे. तुझ्या व्यक्तिगत जीवनात परिवर्तन करणारा आहे. तो तुला समतेने व न्यायाने वागायला शिकवेल. माझा धम्म तुला शांती प्रस्थापित करायला बाध्य करेल. अहिंसेपासून तुला परावृत्त करेल. राज्याला कल्याणाच्या मार्गावर नेण्यास मार्गदर्शन करेल. परंतु हे करीत असतांना अजातशत्रू हे लक्षात ठेव की तू या मगध साम्राज्याचा राजा आहेस. आणि राजाचे प्रथम कर्तव्य हे आहे की, त्याने आपले राज्य सुरक्षित ठेवले पाहिजे. परकीय आक्रमणापासून जनतेला सुरक्षित ठेवले पाहिजे. स्व साम्राज्याचे रक्षण करतांना तुला तलवार हातात घेऊन शत्रूंशी लढावेच लागेल तेव्हाच तुझे राज्य व राज्यातील जनता सुरक्षित राहील. आणि राज्य व राज्यातील जनता सुरक्षित राहिली तर तुला समतेचे, न्यायाचे व कल्याणाचे राज्य आपल्या राज्यातील जनतेसाठी करता येईल. माझा धम्म तुला तू राजा आहेस हे विसरण्यासाठी नव्हे तर तू राजा आहेस तर त्या राज्याचे कर्तव्य काय हे सांगण्यासाठी आहे. राजाने आपल्या प्रजेसाठी काय करावे हे सांगण्यासाठी माझा धम्म आहे. तू राजा आहेस हे विसरू नको. राज्याच्या व प्रजेच्या सुरक्षिततेसाठी तुला शस्त्र उचलावे लागतील तेव्हा माझा धम्म तुला तिथे अडविणार नाही.” बुद्धांचा हा संदेश ऐकून अजातशत्रूला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. बुद्धांची अशी अनेक राजकीय उदाहरणे देता येतील व अभ्यासायला मिळतील.
आधुनिक भारतात अजातशत्रू च्या रुपात दिसणाऱ्या (राजे नसले तरी) अनुयायांना बुद्धांच्या या संदेशातील राजकारण, राजकीय नीती किती कळली ? हा प्रश्न आहे. किंवा किती कळेल याची चिंता आहे. धम्माला राजाश्रय मिळाला म्हणून धम्माचा प्रचार व प्रसार झाला हे कुणीच नाकारू शकत नाही. तसेच कुठल्याही धर्माच्या सुरक्षिततेसाठी राजाश्रय हवाच असतो. इतिहासात तो राजाश्रय प्रत्येकच धर्माला मिळत गेला. नव्हे राजाश्रयातुनच धर्म फलद्रूप झाले. परंतु आधुनिक लोकशाहीत केवळ एका धर्माला राजाश्रय दिला जाऊ शकत नाही. राजेशाही संपून आता लोकशाही आलेली आहे. त्यामुळे या लोकशाहीत प्रत्येकच धर्माला समान राजाश्रय मिळणे आवश्यकच आहे. एकांगी धर्माला राजाश्रय मिळत गेला तर काय परिस्थिती उद्भवू शकते हे भारताने २०१४ ते २०१९ या ५ वर्षाच्या भाजप-आरएसएस च्या सत्ताकाळात अनुभवलेले आहे. त्यामुळे लोकशाहीत प्रत्येकच धर्माचे अनुयायी निदान धर्मसंरक्षणासाठी तरी संसदेत निवडून गेले पाहिजे. हा इतकाच साधा विचार जरी आम्ही करू शकलो, तर भारताची राजकीय परिस्थिती व बौद्ध धर्मीयांची राजकीय अवस्था बदलल्याशिवाय राहणार नाही. व या परिस्थितीत बदल करायचा असेल तर धम्म संदेश देणाऱ्या विहारातून या राजकारणाची सुरवात होणे गरजेचे आहे. हिंदूचे राजकारण मंदिरातून चालते. मुस्लिमांचे राजकारण दर्गाह व मशिदीतून चालते. शिखांचे राजकारण गुरुद्वारातून चालते. मग बौद्धांचेच राजकारण विहारातून का चालत नाही. याचा विचार बौद्ध अनुयायी म्हणविणाऱ्या सर्वांनी करणे गरजेचे आहे. बुद्ध व बाबासाहेब यांना मानणारा वर्ग जो विहारातून राजकारणाला हद्दपार करून, बुद्ध व बाबासाहेब या दोन्ही महान विचार पुरुषांची अवहेलना करून बसलेला आहे, त्याने बुद्ध व बाबासाहेब यांचे राजकीय विचार व त्याला अनुसरून चालणारे राजकारण लक्षात घेऊन आपल्या भूमाकांमध्ये बदल घडवून आणणे क्रमप्राप्त आहे. तेव्हाच बौद्धांना राजकीय मरगळ झुगारून बुद्ध व बाबासाहेब यांना अपेक्षित भारतीय लोकशाही या देशात निर्माण करता येईल.
ही परिस्थिती महाराष्ट्रात व येथील विहारातच आहे असे नाही. जवळपास भारतभरात सर्वच बौद्ध विहारात हीच राजकीय मरगळ लागलेली आहे. निवडणुका आल्या की विरोधकांच्या कच्छपी लागून आम्ही ‘विहारातून राजकारण नको’ असे ओरडायला लागतो. व स्वतःचे राजकारण स्वतःच संपवून बसतो. याचा अनुभव आम्ही मागच्या ७० वर्षांपासून घेत आहोत. आतातरी तथागत बुद्धाचे राजकारण समजून घेऊन धम्माचे व धम्म अनुयायांचे राजकीय मार्गक्रमण करण्यास सुरवात करूया.
महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी ने जनमानस ढवळून काढलेले आहे. बुद्धांनी सांगितलेली समतेची, न्यायाची, कल्याणाची लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या लोकशाहीला ज्या संविधानात मांडले, ते संविधान वाचविण्यासाठी सर्व मागास, वंचित व ब्राम्हणेत्तरांना सोबत घेऊन २०१९ ची लोकसभा लढविली आहे. येणाऱ्या ४-५ महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. या विधानसभा निवडणुकी पर्यंत बुद्ध, बाबासाहेब मानणाऱ्या बौद्ध धम्मियांनी व अनुयायांनी विहारातून बुद्धांचे व बाबासाहेबांचे राजकारण निदान समजून घेतले, त्यावर चर्चा केली, तरी येणारी विधानसभा व महाराष्ट्राची सत्ता बौद्धांना व आंबेडकरी अनुयायांना आपल्या ताब्यात घेता येईल. २०१९ च्या लोकसभेपर्यंत आलेला विहारांचा अनुभव विधानसभेपर्यंत बदलता आला तर खऱ्या अर्थाने आम्ही बुद्ध जयंती साजरी केली व बुद्ध खऱ्या अर्थाने समजून स्विकारला असे होईल. अन्यथा आधुनिक पुष्यमित्र शुंग तुमचा सामाजिक, धार्मिक व राजकीय वध करायला टपून बसलेले आहेत. बुद्ध व बाबासाहेब फक्त तोंडात राहून उपयोग नाही तर त्यांना बुद्धी, उक्ती व कृतीत उतरविता आले तरच धम्म टिकेल, बुद्ध टिकेल, बाबासाहेब टिकतील व तुम्ही आम्ही टिकू शकू. त्यामुळे ही बुद्धजयंती साजरी करीत असतांना आपल्यातले विहारात दडून बसलेले पुष्यमित्र शुंग ओळखा. बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय वध करू पाहणारे चातुर्वर्णी ओळखा. बुद्ध व बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय तत्वज्ञानाला व त्यांच्या हयातीत त्यांनी केलेल्या राजकारणाचा अभ्यास करून, या बुद्ध जयंतीला ‘राजकीय बुद्ध जयंती’ म्हणून साजरी करण्याचा निर्धार करून, महाराष्ट्राच्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समतेचे, न्यायाचे, कल्याणाचे व लोकशाहीचे चक्र गतिमान करण्यासाठी सज्ज होऊयात.
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


Friday, 10 May 2019

चला आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर वंचितांचा झेंडा फड्कावूया..


#Once_Again_Ambedkar
चला आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर वंचितांचा झेंडा फड्कावूया...
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              लोकसभा २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा महाराष्ट्रातील झंजावात २९ एप्रिल ला संपला. महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या ४८ जागांवर चार टप्प्यात निवडणुका पार पडल्या. कोण किती जागा जिंकणार ? कोण कुठे जिंकणार ? कोण कुठे पुढे असणार ? कुणी कुणी साथ दिली ? कुणी कुणी साथ सोडली ? कुठे चुकले ? कुठे जमले ? कुठे कमी पडले ? कुठे अंगलट आले ? कुणाचे पारडे जड ? कुणाचे पारडे हलके ? कोण किती मते खाणार ? कुणाची मते खाल्ल्याने कुणाचा फायदा होणार ? कोण हरणार आणि कोण जिंकणार ? अश्या साऱ्याच प्रश्नांचा बाजार, चर्चांचे फड, सोशल मिडीयावरील दावेदारी इथून पुढे २३ मे च्या निकालाच्या दिवसांपर्यंत रंगत जाणार. महाराष्ट्रात ही चर्चा तर अधिकच रंगतदार असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत घेतलेली भरारी लक्षवेधी ठरणार आहे. भाजप-सेना युती व कॉंग्रेस-राका महागटबंधन दोन्ही प्रस्थापित पक्षांना महाराष्ट्राने घाम फोडला. इथल्या वंचीतांनी पुकारलेला राजकीय एल्गार पारंपारिक राजकीय वातावरणाची दिशा बदलणारा ठरला आहे. ‘बदल होतोय, बदल घडतोय, वंचित आता राजकारणाचा चेहरा मोहरा बदलतोय.’ याचा प्रत्यय महाराष्ट्राने घेतला आहे. कालपर्यंत ज्यांची साधी दखलही घेतली जात नव्हती तो पक्ष, तो समूह, ते नेते आज प्रतिस्पर्धी बनले याचे शल्य प्रस्थापितांना सातत्याने सलत राहील.
          महाराष्ट्राच्या ४ टप्प्यातील निवडणुकीत सर्वच ४८ जागांवर तुल्यबळ लढती झाल्यात. संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-सेना-आरएसएस विरोधात उघड विरोध दिसून आला. सरकार विरोधातील मानसिकता ठळकपणे दिसून आली. त्यामुळे तुल्यबळ लढत देण्याइतपत मतदान देखील भाजप-सेना उमेदवारांना झाले असेल अशी शंका आहे. जिथे विरोधी पक्षांचे उमेदवार कमकुवत ठरले तिथे जनतेसमोर पर्याय नसल्याने नाईलाजास्तव भाजप-सेना उमेदवारांना मतदान करावे लागले असेल अशी परिस्थिती महाराष्ट्रात क्वचितच पाहायला मिळाली. असे असतांना देखील आज महाराष्ट्रातून सर्वाधिक उमेदवार भाजप-सेनेचे निवडून येतील असे दावे केले जात आहेत. त्या दाव्यांमध्ये किती सत्यता आहे याची तपासणी करणे गरजेचे आहे. जन्मात विरोधी असतांनाही भाजप-सेनेला सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याचा आत्मविश्वास येतो कुठून ? कुठल्या आधारावर असे दावे केले जातात ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे evm. evm हा एकमेव त्यांच्या आत्मविश्वासाचा बालेकिल्ला आहे.  त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत आहे.
राजकारणाच्या रंगतदार चर्चेत कार्यकर्ते आणि सट्टाबाजारी जोरदार बारूद भरीत आहेत. अनेक दावे, प्रतिदावे केले जात आहेत. जनमत चाचणीच्या नावाखाली आधीच विजयाचे फटाके फोडले जात आहेत. मतदार मात्र सर्वत्रच संभ्रमात आहे. मतदाराने इमाने इतबारे आपली जबाबदारी पार पाडली. पसंतीच्या पक्षाला, पसंतीच्या उमेदवाराला, पसंतीच्या नेत्याला मत देऊन, evm वर विश्वास टाकून मतदार मोकळा झाला. जिंकून कोण येईल याची शाश्वती त्याला नाही. त्याने ज्याला मत दिले किंवा त्याच्यासोबत अनेकांनी ज्याला मत दिले ते निवडून येतील कि evm मशीनला ज्याला निवडून आणण्याचा आदेश दिला जाईल त्याला ती evm मशीन निवडून येईल हे प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा सांगता येत नाही. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात मतदारांची इतकी संभ्रमावस्था आहे कि देशाच्या संसदेत निवडून गेलेला प्रतिनिधी जनतेने निवडून दिला कि, evm ने निवडून दिला हेच लोकांना कळत नाही.
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रात ४८ जागांवर उमेदवार लढविले आहेत. या ४८ जागांपैकी ४६ जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुल्यबळ लढतीत आहेत. फक्त नागपूर आणि रामटेक या २ लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारसा प्रभाव पाडू शकले नाही. उर्वरित ४६ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जवळपास ७० ते ९० टक्के आंबेडकरी समूह एकवटून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केले आहे. तसेच कमी अधिक प्रमाणात ४० ते ६० टक्के मुस्लीम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांना मतदान केले आहे. वंचित बहुजन ओबीसी मतदार हा जवळपास ३० ते ५० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा मतदार राहिला आहे. धनगर आणि माळी समूह त्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदार संघात तर ७० ते ९० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा होता. परंतु उर्वरित मतदार संघात देखील कमी अधिक प्रमाणात २० ते ४० टक्के वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा मतदार राहिलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने ज्या प्रकारे वंचित जात समूह ठळक स्वरुपात राजकारणात पुढे आणून जातीय समीकरण मांडले त्यानुसार महाराष्ट्रातील इतरही उमेदवारांना या समीकरणाचा लाभ होतांना दिसून येत आहे. आज महाराष्ट्रात पहिल्यांदा ही सोशल इंजिनीअरिंग वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे.
एकंदरीत या सर्व गोष्टींचा व झालेल्या मतदानाचा व मतदानानंतर आलेल्या मतदारांच्या कलाचा विचार केल्यास वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात १० ते १५ जागांवर पहिल्या १ नंबर वर राहणार आहे. या १० ते १५ जागांमधून काही जागा पराभूत झाल्याच तर अतिशय कमी फरकाने म्हणजेच २५ ते ५० हजार मतांच्या फरकाने पराभूत होतील असे चित्र दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास २० ते २५ जागा ह्या २ नंबर वर राहण्याची शक्यता आहे. आणि ह्या जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे कमी अधिक प्रमाणात ५० हजार ते १ लाख मतांच्या फरकाने पराभूत होतील असा अंदाज आहे. आणि उर्वरित १५ ते २० जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे जवळपास तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहतील परंतु या प्रत्येक उमेदवारांना मिळणारे मतदान हे जवळपास १ लाखाच्या पुढे असेल. फक्त नागपूर आणि रामटेक या २ मतदार संघातील उमेदवार हे २५ हजार मतदानाच्या खाली राहतील असा एकंदरीत अंदाज झालेल्या मतदानावरून दिसून येतो. अदखलपात्र मतदार या निवडणुकीत दखलपात्र होऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मोठा मतदार समूह म्हणून पुढे आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ही झालेल्या एकूण मतदानापैकी जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त मतदान २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निश्चितच मिळविणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडी प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्रात मान्यताप्राप्त होईल हे निश्चित आहे. हे सर्व विश्लेषण evm च्या सुचारू आणि पारदर्शक संचालनावर निर्भर राहणार आहे. evm ने निकाल फिरविला गेला तर हे विश्लेषण खोटे ठरेल पण evm ने पारदर्शक निकाल लावले तर वरील विश्लेषण तंतोतंत ठरेल व वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रात आपले पाय घट्ट करेल.
आज कुठल्याही जनमत चाचण्यात वंचित बहुजन आघाडीला स्थान दिले जात नाही. पण ही परिस्थिती आता चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर बदलणारी असणार आहे. महाराष्ट्राचा सर्वच जनमत चाचण्यांचा कौल १५ मे नंतर अचानक बदललेला दिसणार आहे. जसजसे निवडणुकांचा ७ वा टप्पा जवळ येईल व निवडणुका पार पडतील त्यानंतर सर्वच जनमत चाचण्या बदलतील. जनमत चाचण्या हा एक प्रकारचा मानसिक खेळ आहे. जो मतदारांसोबत खेळला जातो. विरोधातील मतांना व मतदारांना आपल्याकडे झुकविण्यासाठी हा जनमत चाचण्यांचा खेळ सुरवातीपासून संपूर्ण निवडणुकीत मतदारांशी खेळला जातो. परंतु शेवटच्या टप्प्यात या खेळाला चेहरा मोहरा बदलेला आपल्याला दिसणार आहे. व वास्तव म्हणून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातील जनमत चाचण्यात आपले स्थान निश्चितच मिळविणार आहे. सोबतच या निवडणुकीत महाराष्ट्रात काही मतदार संघात धक्कादायक निकालाची अपेक्षा आहे. ज्याचा अंदाज हा राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक, जनमत चाचण्या एक्स्पर्ट, विविध वृत्तवाहिन्या यांना अद्याप घेता आलेला नाही.
२०१९ च्या लोकसभेला समोर जातांना वंचित बहुजन आघाडीने ज्या अठरा पगड जात समूहांना सोबत घेऊन वंचिततेचा नारा लावून महाराष्ट्रातील संपूर्ण प्रस्थापितांच्या राजकारणाला ढवळून काढले. याचे नेतृत्व मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. हे पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ च्या प्रांतिक निवडणुकात स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून दिलेला राजकीय लढा आज प्रत्येक आंबेडकरवाद्यांना आठवतो आहे. अलुतेदार आणि बलुतेदार, खोत आणि कुळ यांच्या संघर्षातून उभा झालेला श्रमिकांचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून एका राजकीय न्यायाकडे घेऊन गेले. व समाजातील वंचित वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. व प्रांतिक विधिमंडळातून त्यांना न्याय मिळवून दिला. स्वतंत्र मजूर पक्षाच्या पहिल्याच निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १६ जागा प्रांतिक विधिमंडळावर निवडून आणल्या आणि तत्कालीन कॉंग्रेस च्या मुंबई प्रांतिक विधिमंडळातील सत्तेला आव्हान उभे केले होते. आज मा. बाळासाहेब आंबेडकरांनी वर्तमान मनुवादी भाजप-आरएसएस च्या सरकारच्या सत्तेपुढे वंचितांचे / वंचित बहुजन आघाडीचे आव्हान उभे केले आहे.
आज मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांवर पाऊल ठेवून आधुनिक भारतात महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अठरापगड जातीच्या वंचित समूहांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडी या राजकीय मंचावर एकवटून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत निकराचा लढा दिला. निकराची राजकीय झुंज दिली. प्रस्थापितांचे राजकारण तोडले. सत्तेची दारे वंचितांसाठी मोकळी केली. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले होते. आज मा. बाळासाहेब आंबेडकर हे देखील वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश संपादन करतील असा विश्वास आज महाराष्ट्रातील प्रत्येक वंचित समूहात निर्माण झाला आहे.
२३ मे च्या निकालातून वंचितांचे एकत्रीकरण दिसून येईल. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने वंचितांच्या राजकीय प्रवासाला सुरवात होईल. वंचितांच्या राजकारणाची पहिली पायरी मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील जनतेने चढलेली आहे. लोकसभा निवडणुकीत निदान ५ ते १० लोकसभेच्या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळाल्या तर निश्चितच त्याचा प्रभाव येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर पडणार आहे. वंचित बहुजन आघाडी या स्वतंत्र नावाने ही पहिली निवडणूक लढविली गेली. त्यामुळे अनेक विरोधकांकडून वंचित बहुजन आघाडी भोवती संशयकल्लोळ निर्माण करण्यात आला होता. निश्चितच त्याचा फटका काही प्रमाणात वंचित बहुजन आघाडीला झालेला आहे हे नाकारता येत नाही. महाराष्ट्रातील सर्वच वंचित समूह या निवडणुकीत एकवटला असे नाही. काहींनी दूर राहून बघ्याची भूमिका घेतली. तर काहींनी या वंचितांच्या प्रयोगाला बाहेर राहून तपासण्याचे काम केले. वंचित बहुजन आघाडीच्या या लोकसभा निवडणुकीतील यशाचे आकलन अनेकांना करता येत नाही आहे. त्यातही संभ्रम आहे. प्रश्नचिन्ह आहे. निकालात यश मिळेल कि नाही अशी साशंकता आहे. परंतु दबक्या आवाजात आज सर्वत्र, सर्व समूहात, सर्व पक्षांत, सर्व मतदारात हे बोलले जात आहे की, वंचित बहुजन आघाडी ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत किंगमेकर ची भूमिका निभावणार आहे. विधानसभेत वंचित बहुजन आघाडीला नेत्रदीपक यश संपादन करता येणार आहे. हा आशावाद पुढे पुढे सरकत गेला तर येणारी विधानसभा ही वंचित बहुजन आघाडीच्या हाती असणार आहे. राज्याची सत्ता वंचितांच्या हाती असणार आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या ५ लोकसभा जागा जरी निवडून आल्या तरी महाराष्ट्रातील हा आशावाद द्विगुणीत होईल. आणि महाराष्ट्रातून कॉंग्रेस – भाजप चे परंपरागत सत्ताबदल बेदखल होऊन एक नवा महाराष्ट्र अनुभवायला मिळणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक सोशल इंजिनीअरिंग च्या बळावर, भावनिक वातावरणाच्या बळावर, भाजप-आरएसएस विरोधात जनतेमध्ये असलेल्या नकारात्मक भावनेच्या बळावर, महाराष्ट्रात उभ्या झालेल्या सामाजिक संघर्षाच्या बळावर, सामाजिक आंदोलनात मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकांच्या बळावर काही प्रमाणात लढविली आहे हे नाकारता येत नाही. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापनावर पाहिजे तो भर दिला नाही. किंवा वंचित बहुजन आघाडीच्या व भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य ते निवडणूक व्यवस्थापन करता आले नाही हे प्रामाणिकपणे आपण स्वीकारले पाहिजे. निवडणूक व्यवस्थापनाच्या अभावी वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास ५ ते १० जागा अगदी थोड्या फरकाने पडणार आहेत. या मतदार संघात योग्य ते निवडणूक व्यवस्थापन केले गेले असते तर निश्चितच या जागांवर देखील वंचित बहुजन आघाडीला यश संपादन करता आले असते. भावनेच्या भरावर नेतृत्व लाट तयार होते परंतु लाट फार काळ राजकारणात तग धरून राहत नाही. नरेंद्र मोदी व भाजप याचे मोठे उदाहरण आहे. अगदी ५ वर्षाच्या काळात मोदी लाट संपली. व्यवस्थापन कौशल्य त्यांच्याजवळ होते परंतु नेतृत्व क्षमतेच्या अभावाने आज भाजप पराभवाच्या छायेत आहे. वंचित बहुजन आघाडीकडे खंबीर व क्षमतापूर्ण नेतृत्व आहे. पण व्यवस्थापन कौशल्य आपल्याकडे नाही.
हा लेख वाचतांना महाराष्ट्रातील जवळपास सर्वच टप्प्यातील निवडणुका संपलेल्या असतील. तेव्हा कार्यकर्त्यांनी झालेल्या निवडणुकीचे आत्मचिंतन केले पाहिजे. काय चुकले ? कुठे चुकले ? कुठे कमी पडले ? याचा गांभीर्याने विचार व्हावा. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करायला व त्यादृष्टीने व्यवस्थापन निर्माण करायला आम्हाला जवळपास ५ ते ६ महिन्यांचा कालावधी मिळतो आहे. या कालावधीत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योग्य ते निवडणूक व्यवस्थापन केले तर निश्चितच विधानसभेवर वंचित बहुजन आघाडी वंचितांचा झेंडा फडकवू शकणार आहे. मा. बाळासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र, अविरत घेतलेली मेहनत आम्हाला योग्य त्या निर्णयात परावर्तीत करावी लागणार आहे. संधी आलेली आहे. त्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हाती आहे. परत संधी मिळेल या भ्रमित आशावादात न राहता सातत्यपूर्ण व्यवस्थापनातून राजकीय प्रगल्भतेकडे, राजकीय स्थिरतेकडे आम्हाला प्रवास करावा लागेल. याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व वंचित बहुजन आघाडीच्या घटक समूहांनी व मतदारांनी घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेवर मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितांचा झेंडा हमखास फडकणार आहे. हे लक्षात घेऊन कामाला लागा. येणार राजकीय काळ हा वंचित समूहांच्या राजकीय उत्थानाचा काळ असणार आहे. उद्याचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वंचितांचा, वंचितामधील असणार आहे. हे आपल्या मस्तिष्कावर कोरून ठेवून कामाला लागा. 
§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275


Thursday, 11 April 2019

दलित आणि मुस्लीम समुदाय महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील निर्णायक मतदार


#Once_Again_Ambedkar
दलित आणि मुस्लीम समुदाय महाराष्ट्राच्या निवडणुकांमधील निर्णायक मतदार
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर.
              लोकसभा निवडणूक २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात ७ जागांवर पहिल्या टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. या ७ जागांवर मतदारांचा जो काही कल दिसून आला तो ग्रामीण भागातील कल हा जास्त होता. त्या तुलनेत शहरातील मतदारांचा कल पाहिजे तसा निवडणूक सहभागाचा दिसला नाही. भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, वर्धा, नागपूर आणि रामटेक या ७ लोकसभा मतदार संघात ११ एप्रिल ला मतदान घेण्यात आले. या पहिल्या टप्प्यात शहरातील मतदानाची टक्केवारी साधारणतः ५५ ते ६० टक्के च्या आसपास राहिली. तर त्या तुलनेत ग्रामीण भागात झालेल्या मतदानाची टक्केवारी ६५ ते ७५ टक्के च्या आसपास राहिली. शहरातील मतदारांचा कल कुणाकडे असेल व ग्रामीण भागातील मतदारांचा कल कुणाकडे असेल यावर या ७ मतदार संघातील निवडणुकांचा निकाल निर्धारित होईल. परंतु येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तीन टप्प्याचे मतदान होणार आहेत. त्यातला दुसरा टप्पा १८ एप्रिल ला, तिसरा टप्पा २३ एप्रिल ला व चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल ला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कल पाहता आपल्याला पुढील ३ टप्प्यातील मतदानाकडे वळावे लागणार आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
सद्यकालीन राजकारणाने कूस बदलली आहे. राजकीय प्रचाराचे रंग बदलले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांना सामोरे जात असतांना ज्या गोष्टी निदर्शनात आल्यात त्यावरून हे लक्षात येते कि दलित आणि मुस्लीम मतदार हा या निवडणुकांमध्ये महत्वाची निर्णायक भूमिका बजावू शकतो. दलित मतदार हा ग्रामीण भागात विसावलेला आहे. शहरी भागाच्या तुलनेत तो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. इतकेच नव्हे तर मागच्या अनेक निवडणुकांचे विश्लेषण केले तर असेही लक्षात येते कि ग्रामीण भागातील दलित मतदारांचे मतदानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रत्येक निवडणुकीत ९० टक्केच्या वर मतदान करणारा हा वर्ग आहे. मग तो शहरातील दलित वर्ग असो किंवा ग्रामीण भागातील मतदार वर्ग असो. मतदानात सक्रीय सहभाग घेणारा हा वर्ग आहे. त्यामुळे या वर्गाचा कल ज्याच्याकडे असेल तो निवडणुकीत जिंकेल असे सूत्र कायमचे झालेले आहे. त्यासोबतच अल्पसंख्यांक मुस्लीम समुदाय हा ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात अधिक विसावलेला आहे. या समुदायाची मतदानाची टक्केवारी ही देखील कायम ८० टक्केच्या वरची राहिलेली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आता झाले आहे. त्यावरून कोण जिंकेल व कोण हरणार याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु या सर्व तर्कवितर्कात कोण जिंकेल याचा आढावा घेतांना दलित व मुस्लीम समुदायाने कुणाच्या बाजूने मतदान केले यावरच जिंकणाराचे गणित मांडली जात आहेत. त्याच आधारावर आज महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजप विरोधी कल दिसून येत होता. दलित व मुस्लीम समुदायात तो कल मोठ्या प्रमाणात असणे हे नैसर्गिकच आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील दलित व मुस्लीम समुदायाचा कल मोठ्या प्रमाणात कॉंगेस च्या बाजूने पाहायला मिळालेला आहे. भाजप सरकार नको, मोदी सरकार नको म्हणून दलित व मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणात कॉंग्रेस ला पसंती दिल्याचे चित्र पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पाहायला मिळाले. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या ४१ मतदार संघात दलित व मुस्लीम समुदाय कुणाच्या बाजूने उभा राहतो त्यावर भविष्यातील सरकारची गणिते निघू शकतील.
या सर्वात महत्वाचे आहे ते असे की, दलित आणि मुस्लीम समुदायाची घट्ट मोट बांधून आंबेडकर आणि ओवेसी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचा तिसरा पर्याय घेऊन उभे आहेत. असे असतांनाही पहिल्या टप्प्यातील मतदानात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशीम हे मतदार संघ वगळले तर दलित आणि मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडे पाठ फिरवून कॉंग्रेसकडे झुकलेला दिसला. वंचित बहुजन आघाडीची उर्वरित ४ मतदार संघातील उमेदवारांची निवड, उमेदवारांनी चालविलेली प्रचार यंत्रणा, इतर पक्षांच्या कच्छपी लागून आर्थिक स्वार्थ साधून घेण्याची उमेदवारांची राहिलेली भूमिका हे सुद्धा त्यातले एक कारण आहे असे समजता येईल. परंतु या ४ मतदार संघात (ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, वर्धा) दलित आणि मुस्लीम समुदाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा झालेला दिसत नाही. त्यामुळे आज या ४ ही जागांवर निवडून येण्याची दावेदारी कॉंग्रेस करीत आहे. पूर्व विदर्भाचा हा भाग वगळला तर उर्वरित महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा योग्य रीतीने काम करतांना दिसून येत आहे. त्यामुळे तिथल्या युती व महाआघाडीच्या उमेदवारांच्या ही निवडणूक जिव्हारी लागलेली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत ज्यात प्रामुख्याने अमरावती, अकोला, हिंगोली, बुलढाणा, नांदेड, परभणी या वंचित बहुजन आघाडीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या मतदार संघात निवडणुका होणार आहेत. या सहाही मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकून येण्याच्या परिस्थितीत आहेत. तेव्हा या मतदार संघातील दलित आणि मुस्लीम समुदायाने इमाने इतबारे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले तर वंचित बहुजन आघाडीचे या मतदार संघातील उमेदवारांना कुणीही पराजित करू शकणार नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीने, आंबेडकर-ओवेसी यांच्या युतीने, दलित – मुस्लीम समुदायाच्या गठबंधनाने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील प्रयोगावर लागलेली आहे. दोन्ही समुदाय जे इतरांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान नोंदवितात त्या दलित आणि मुस्लीम समुदायाची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. याच टप्प्यातील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला माळी व धनगर मतदारांची देखील मोठी साथ असणार आहे. जी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत पाहिजे तशी भेटलेली दिसत नाही. त्यामुळे या टप्प्यातील निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच महाराष्ट्राच्या पुढील राजकीय समीकरणावर प्रभाव टाकणारी असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील दलित-मुस्लीम समुदाय आपल्या सोबत येणाऱ्या माळी व धनगर समूहाला सोबत घेऊन ज्यांनी दलित व मुस्लीम समुदायाची कायम मते घेऊन सत्ता केली ती कॉंग्रेस – राष्ट्रवादी व मागच्या २०१४ च्या निवडणुकीतील भाजपा या दोन्ही पक्षांना धूळ चारून एका नव्या परिवर्तनाच्या युगाची सुरवात करण्याची संधी या दोन्ही समूहाकडे असणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानात औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, सांगली, माढा, लातूर, उस्मानाबाद, जालना या प्रमुख मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे भाजप आणि कॉंग्रेस आघाडीला परास्त करण्यासाठी सज्ज आहेत. या मतदार संघात दलित-मुस्लीम समुदाय हा वंचित बहुजन आघाडीसोबत राहील अशी अपेक्षा केली तर माळी आणि धनगर समूहाची जबाबदारी या टप्प्यातील मतदानात महत्वपूर्ण असणार आहे. सोलापूर मधून खुद्द बाळासाहेब आंबेडकर, औरंगाबाद मधून इम्तियाज जलील, सांगली मधून गोपीचंद पडळकर, माढा मधून विजय मोरे आणि नाशिक मधून प्रशांत पवार हे प्रमुख उमेदवार असणार आहेत. या टप्प्यातील मतदानात वंचित बहुजन आघाडीचे सर्वात अधिक उमेदवार निवडून येण्याच्या परिस्थितीत आहेत. त्यामुळे या चौथ्या टप्प्यातील निवडणुकांचा केंद्रबिंदू हा दलित-मुस्लीम समुदायासोबतच धनगर-माळी हा देखील असणार आहे. हे या समुदायांनी लक्षात घेतले तर वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा परिणाम चौथ्या टप्प्यातील निवडणुकीवर व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर निश्चित पडणार आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यावरच चौथ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती यश मिळणार हे निश्चित होईल. चौथ्या टप्प्यातील मतदानात कोळी समुदायाची महत्वाची भूमिका असणार आहे. दलित-मुस्लीम, धनगर-माळी आणि कोळी हा समुदाय चौथ्या टप्प्यात एकत्र आला तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यावरच चौथ्या टप्प्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना किती यश मिळणार हे निश्चित होईल.
आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती अशी आहे की, मतविभाजन हा मतदारांना संभ्रमित करणारा मुद्दा समोर केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होईल व त्यामुळे भाजपा परत जिंकेल अशी भीती मतदारांच्या मनावर बिंबविल्या जात आहे. मुळात हि कॉंग्रेस महाआघाडीने स्वतःच्या फायद्यासाठी अवलंबिलेली नीती आहे. दलित-मुस्लीम समुदाय इतर पक्षाकडे झुकला जाऊ नये कारण हाच समुदाय कुठल्याही पक्षाला सत्तेची दारे खुली करून देणारा समुदाय आहे. त्यामुळे हा समुदाय ज्याच्या पाठीशी उभा झाला तो पक्ष सत्तेच्या खुर्चीवर बसतो हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे कुठलाच पक्ष या समुदायाला सोडण्याची हिम्मत करीत नाही. मुळात आपण मतविभाजनाचे तर्क समजून घेतले पाहिजे. दलित आणि मुस्लीम समूहाने तर ते समजून घेणे अत्यावश्यकच आहे. कारण त्याशिवाय हा समूह आपली पुढची राजकीय वाटचाल करू शकणार नाही.
खरे तर मतविभाजन हे भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यामध्येच होत असते. आजचे प्रस्थापित पक्ष मग ते भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो हे दलित आणि मुस्लीम समुदायाचे नैसर्गिक पक्ष होऊ शकत नाही. परंतु राजकीय पर्यायाविना आजपर्यंत हा समूह कॉंग्रेस सोबत जोडला गेला. मागच्या निवडणुकीत मोदीच्या फसव्या नीतीला भाळून भाजप च्या जवळ गेला. परंतु आज ती परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली नाही. आज वंचित बहुजन आघाडीचा सक्षम पर्याय या समूहाजवळ आहे. एक वास्तव आपण याठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे, भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांचा मतदार कोण आहे तर ओबीसी मध्ये जो स्वतःला उच्चवर्णीय समजतो तो कुणबी आणि तेली समूह व त्याच्या सोबत इथला मनुस्मृतीप्रनीत उच्चवर्णीय वर्ग हा या प्रस्थापित पक्षांचा मतदार आहे. या सर्व मतदारांची गोळाबेरीज केली तरी एकूण मतदारांच्या ४० ते ४५ टक्के च्या वर याची आकडेवारी जात नाही. मग या ४० ते ४५ टक्के मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष मग भाजप-सेना असो किंवा कॉंग्रेस-राष्ट्रवादी असो हे या ४० ते ४५ टक्के मतदारांचे विभाजन करून घेतात. व स्वतःच्या पदरात खूप झाले तर १० ते १५ टक्के मतदान पाडून घेतात. परंतु या १० ते १५ टक्के मतदानावर हे पक्ष निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे दलित व मुस्लीम समुदायाला एकदुसऱ्याची भीती दाखवून आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात व याच समूहाच्या बळावर आपल्या जिंकण्याचे व सत्तेचे गणिते बसवीत असतात. हे इथल्या दलित व मुस्लीम समुदायाने लक्षात घेतले पाहिजे.
आज महाराष्ट्रात दलित-मुस्लीम, धनगर-माळी, आदिवासी-भटका विमुक्त, कोळी-होलार असा जवळपास ५५ ते ६० टक्के समूहात राजकीय प्रेरणा निर्माण करण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केलेले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमुळे मतांचे विभाजन न होता समदु:खी समूहांच्या मतदारांचे एकत्रीकरण होत आहे. हे या समूहातील सुज्ञ मतदारांनी समजून घ्यावे. तुमच्या मतांचे एकत्रीकरण होऊ नये व यांची सत्तेची खुर्ची सुटू नये. यासाठी मतविभाजनाचा संभ्रमी प्रयोग प्रस्थापितांकडून कायम केला जातो हे आपण लक्षात घ्यावे. कारण तुमच्या मतांचे एकत्रीकरण हे वंचितांना सत्तेवर बसविणारे आहे जे कि प्रस्थापित पक्षांना कायमचे नको आहे. पुन्हा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, दलित आणि मुस्लीम समुदाय हा कॉंग्रेस – राष्ट्रवादी ला सत्तेवर बसविणारा आहे तर धनगर-माळी हा समुदाय भाजप-सेनेला सत्तेवर बसविणारा समुदाय आहे. दोन्ही प्रस्थापित युती-महाआघाडी कडून हा समूह जो त्यांना कायम सत्तेवर बसवितो तोच समुदाय त्यांच्यापासून दूर गेला तर मतविभाजनाचा खरा फटका भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या प्रस्थापित पक्षांना बसेल व वंचित बहुजन आघाडी ही देशाच्या संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. या वास्तवाकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही.
त्यामुळे आज महाराष्ट्रात दलित-मुस्लीम, आदिवासी-भटका विमुक्त, कोळी-माळी-धनगर, या समूहाला चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. मतदारांच्या मतविभाजनाची नव्हे तर मतदानाच्या एकत्रीकरणाची ती संधी आहे. मतदारांच्या एकत्रीकरणातून सत्तेची दारे वंचित समूहाला खुले करून देण्याची ती संधी आहे. मागच्या ७० वर्षात या समूहाच्या पदरी पडलेली सत्तेची निराशा कायमची दूर करून सामाजिक सत्ताधाऱ्यांवर राजकीय सत्तेच्या माध्यमातून वंचितांची सत्ता गाजविण्याची संधी आलेली आहे. वंचितांची सत्ता आणण्यापासून आपण फक्त २ पाऊले दूर आहोत. आज एकदुसऱ्याच्या सहकार्याने, विश्वासाने, आपुलकीने, बंधुभावाने हा समूह हातात हात घेऊन पुढे चालत राहिला व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभे राहिला तर नक्कीच वंचितांची वंचीतता संपून या देशात संविधानिक अधिकाराने प्रस्थापित होण्याची संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. फक्त विश्वास ठेवा. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा. विभाजन नव्हे तर या सर्व वंचित समूहाचे एकत्रीकरण करून सत्तेची दारे, खिडक्या उघडुया. व उद्याच्या सत्तेचे सत्ताधारी बनुयात.

§§§§§
adv.sandeepnandeshwar@gmail.com
-डॉ. संदीप नंदेश्वर-
8793397275